स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
☆ कवितेचा उत्सव ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ कवितेचे रसग्रहण☆ प्रस्तुति – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
[ शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुजर याचा एके ठिकाणी पराभव होऊन तो पळाला. शिवाजीला ही वार्ता समजताच रागाच्या भरात त्याने सेनापतीला एक निर्भर्त्सनात्मक पत्र लिहिले. ते वाचून आलेल्या उद्वेगाच्या आवेशात प्रतापरावाने सात सरदारांसह थेट शत्रूच्या छावणीत प्रवेश केला. या वेड्या प्रयत्नांमध्ये ते सातही वीर प्राणास मुकले ! कवितेची सुरुवात शिवाजीच्या पत्रापासून आहे. ]
वेडात मराठे वीर दौडले सात !
“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर आमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात
वेडात मराठे वीर दौडले सात !
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाहि मराठी शील
विसरला महाशय काय लाविता जात?”
वेडात मराठे वीर दौडले सात !
वर भिवई चढली दात दाबती ओठ
छातीवर तुटली पटबंदाची गाठ
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !
“जरि काल दाविली प्रभु, गनिमांना पाठ
जरि काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरी-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनि शीर करात”
वेडात मराठे वीर दौडले सात !
ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय,झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात,
निमिषात वेडात मराठी वीर दौडले सात !
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट,भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !
खालून आग,वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !
दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनी मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !
– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
[विशाखा कवितासंग्रह मिळवून संपूर्ण कविता घेतली. गुगलवर गाण्यातली फक्त चारच कडवी आहेत.]
(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)
प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈