सुश्री प्रभा सोनवणे
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 97 ☆
☆ स्फुट ☆
मी डोळे उघडले सकाळी
सात वाजता,
तेव्हा नवरा स्वतःचा चहा करून घेऊन, टेरेस वरच्या फुलझाडांना पाणी द्यायला गेलेला!
मी फेसबुक, व्हाटस् अॅप वर नजर टाकली…..
काल रात्री एक कवयित्री मैत्रीण म्हणाली,
“अगं तू “सुंदर” का म्हणालीस त्या पोस्टला? किती खोटं आहे ते सगळं…..”
खरंतर न वाचताच सांगीवांगी
मी त्या पोस्टला “सुंदर” म्हटलेलं,
मग फेसबुक वर जाऊन वाचलं ते
आणि
काढून टाकलं लाईक आणि कमेन्ट
खरंतरं न वाचताच मत देत नाही मी कधीच पण अगदी जवळच्या व्यक्तीनं भरभरून कौतुक केलेलं पाहून, मी ही ठोकून दिलं….”सुंदर”!
आता ते ही डाचत रहाणार दिवसभर….!
तिनं सांगितलं….एका कवीनं स्वतःचीच तारीफ करण्यासाठी फेसबुक वर
खोटी अकाऊंटस उघडल्याची आणि ते उघडकीस आल्यावर त्याला नोकरीवरून काढून टाकल्याची बातमी!
खोट्या पोस्ट टाकणा-यांनाही होईल अशीच काही शिक्षा!
बापरे…आत्मस्तुतीसाठी काहीही…..
काल रात्रीचा भात कावळ्याला ठेवण्यासाठी टेरेसवर गेले तर…
नवरा मोबाईल वर कुणाचा तरी “समझौता” घडवून आणत असलेला….
मी खुडली मोग-याची फुलं,
वीस मिनिटं कोवळी उन्हं अंगावर घेत,
नाष्टा बनवायला खाली उतरले,
पण मोबाईल वाजला…
दोन मिनिटं बोलली सखी छानसं…
तर मोबाईल वर दिलीप सायरा ची छबी!
आजकाल मला सायरा सती सावित्री वाटायला लागली आहे,
पुन्हा पुन्हा नव-याचे प्राण वाचवणारी…..
हे स्फुट टाईपत बसले,
आणि नव-यानं झापलं..”हे काय नाष्टा नाही बनवला?”
मोबाईल ठेवून किचनकडे वळले,
साडेनऊ ची वेळ पाळली चहा नाष्ट्याची!
तरीही नव-याच्या बोलण्यातली धार जाणवली ……
टोचत राहते नेहमीच,
“आपण खुपच निकम्मे आहोत की काय?” ही टोचणी,
आजूबाजूचे बरेच जण स्वतःला
खुपच ग्रेट समजत असताना!
खरंच हे किती बरं आहे, न्यूनगंडच असल्याचे, मला आठवते…. मी नेहमीच, ” ” शुक्रिया, आपने मुझ नाचिज को इस काबिल समझा।
म्हटल्याचे!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈