“उन्हातल्या चांदण्याचा बहर” श्री. दत्ता हलसगीकर – भाग १
सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एक कविता बऱ्याचदा भेटत गेली आणि त्या कवितेने मनात घरच केले. ती कविता होती
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत ||
अशाप्रकारे सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी ही आशयघन कविता ज्यांची आहे ते आहेत सुप्रसिद्ध कवी श्री गणेश तात्याजी हलसगीकर उर्फ दत्ता हलसगीकर. सात ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेले दत्ताजी शेवटपर्यंत सोलापूरला राहत होते. त्यांनी सोलापूरातच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत नोकरी केली. त्यांना लिखाणाची आवड होती. किशोर वयापासून अखेरपर्यंत त्यांनी काव्यलेखन आणि ललित लेखन केले.
दत्ताजींच्या वागण्या बोलण्यात साधेपणा, सोशिकता, अगत्य होते तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त होई. प्रेमळ, निर्मळ, सात्विक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
त्यांच्या काव्यरचना सोप्या, हळुवार,प्रवाही होत्या. त्यांनी आपल्या कवितेतून वंचितांचे दुःख मांडले. गोरगरिबांबद्दल कणव बाळगणारी यांची कविता मनाला भिडणारी, सामूहिक आवाहन करणारी आहे.
त्यांची कविता श्रमिकांपासून श्रीमंतांपर्यंत भाष्य करताना जास्त खुलून येते. तर श्रमिकांबद्दल जास्तीच हळवी होते. जगण्याचा आनंद कशात आहे, जगणे कसे सुखकर करता येईल हे त्यांनी कवितेतून सांगितले. ‘ उंची ‘या कवितेतून त्यांनी ‘ ज्यांची बाग फुलून आली ‘ अशा देखण्या शब्दात सामाजिक परिस्थितीची जाणीव समाजाला करून दिली.
या कवितेने इतिहास घडवला आहे.२२भाषांमधे तिचे भाषांतर झालेले आहे. आकाशवाणीवरून ही कविता असंख्य वेळा वाचली गेलेली आहे. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ताजींचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीत झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात दत्ताजींनी हीच कविता वाचली होती.
☆ उंची ☆
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळुन आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत ||
ज्यांच्या अंगणी ढग झूकले
त्यांनी दोन ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रीते करून भरून घ्यावे ||
सूर्यकुलाशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगाचा अंधार जेथे
पहाटेचा गाव न्यावा ||
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडेसे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना उचलून वरती घ्यावे ||
अतिशय तरल शब्दात त्यांनी सामाजिक जाणीवेचा वसा सांगितला आहे. त्यांची कविता समाज वेदनांनी व्यथित होतानाच वात्सल्याने भरून येते. अंधाराचे गाऱ्हाणे मांडताना प्रकाशाचे तोरण लावते.मातीशी इमान राखत आभाळाशी नाते सांगते. त्यामुळे त्यांचे शब्द कधी शीतल, सोज्वळ वाटतात तर कधी फटकारे मारणारे वाटतात.म्हणूनच
एकट्याने किती करावी जाग्रणे
झाडांशी अंगणे दुसऱ्यांची ||
असे परखड बोल ते सुनावतात.याच बरोबरीने
एवढासा अंधार मोठा होत गेला
त्याने सूर्य सुद्धा झाकून टाकला |
विनाशाची एवढीशी निसरडी वाट
एवढ्याशा छिद्राने रिता झाला माठ ||
असे चिरंतन जीवनज्ञानही ते सहजपणे सांगून जातात. एकूणच दत्ताजींची विचारसरणी सकारात्मक, वास्तवदर्शी आहे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता जिद्दीने पुढे जायचे हे सांगताना ते म्हणतात,
मला अजून पहाटेची स्वप्ने पडत आहेत
थोड्याशा अंधाराने मी निराश नाही
अजून मला वसंताची चाहून लागत आहे
थोड्याशा पानझडीने मी हताश नाही ||
अशी त्यांची कविता एकाच वेळी आनंद आणि दुःखाचे प्रेरणादायी अनुभव देते आणि आपल्या मनातही सकारात्मकता जागवते.