श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे
(सावित्री बाई फुले)
(जन्म – 3 जानेवारी 1831 मृत्यु – 10 मार्च 1897 )
☆ कवितेचा उत्सव ☆ पायवाट…. ☆ श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे ☆
आता.. आता स्त्रीवादाच्या
जाहीर गप्पा चालू होतील…
तुला माहित आहे का साऊ ??
केवळ आणि केवळ
तुझ्या जयंतीच्या निमित्ताने..!
मग मोबाईल च्या स्टेटस वर दाखवू
आम्ही, किती तुझ्या विचारांचे पाईक आहोत ते…
फक्त स्टेटस वर आणि त्याच दिवसापुरतं बरं का..!!
आणि ते पण इतरांचे स्टेटस पाहिले की इर्षा होते म्हणून,
कारण..आम्हालाही दाखवायचं असतं ना,
की आम्ही किती मोठे समाजसेवक आहोत ते…
बाकी काही नाही गं..!
जागोजागी होणाऱ्या तुझ्या जयंतीच्या कार्यक्रमातून
आम्ही मग समतेच्या बोंबा मारू
छाती ठोकठोकून…
पण केवळ त्याच दिवसापुरतं बरं का..!
खरे समतावादी
आम्ही अजून झालोच नाही बघ..!!
आणि स्त्रीचे स्वातंत्र्य आम्ही स्वीकारलंय
पण ते शेजारच्या घरात..
आमच्या घरात अजून स्त्री
चार भिंतीत आहे ..!!
आमच्या घराण्याचे नाक असते ना ती
म्हणून तिच्या चालण्या बोलण्यावर संशय
अगणित बंधनं… धाक आणि पारतंत्र्य देखील…!!
आमचा पुरुष
तुलाच घायाळ करतो
देहिक भुकेच्या वासनेने…
फसवणूक..बलात्कार..बळजोरी
छळ… कपट…हिंसा आणि बरचं काही…
पण, चालतं आम्हाला कारण तो पुरुष आहे..आणि,
स्वातंत्र्य हा फक्त पुरुषाचा
जन्मसिद्ध हक्क आहे
इतकं प्रखर संकुचित जगतो आम्ही..!!
तुमच्या नावानं चळवळी देखील झाल्या
पण त्यांनाही तुमचा मार्ग किती समजला हे अनुत्तरीत…
चळवळ ही समाजाभिमुख झाली
पण घराभिमुख नाही बरं का..!
स्त्रीवाद तर संपलाय कधीचाच..
सगळं काही आभासीच…!
उसन्या मोठेपणाची दुनिया झाली आहे
सत्यावर अन्याय होत आहे..
हा समाज मेलाय कायमचा…
आणि माणूस नावाचा प्राणी बेभान झालाय..
जाती-धर्म ,वर्ण,पंथ,भेदभाव,
आरक्षणाच्या समीकरणात..!!
साऊ,
आम्हाला आज खरचं तुमची गरज आहे..
तुम्ही पाझरावे आमच्या विचारांमधून
आमच्या कृतीतून
आणि आमच्या मानवतेच्या सच्चेपणातून…!!
तुम्ही येताय? परत येताय??
पण,आज तुम्ही परत येणार असाल
तर फक्त दोघेच येऊ नका…
आतापर्यंतच्या सगळ्या महापुरुषांना सोबत घेऊन या..
तुम्ही एक होता..एक आहात हे दाखवून द्या…
तेव्हाच आमचा माणूस भानावर येईल…
माणूस ” माणूस ” होईल
तुमच्या पायवाटेवर…!!
आता मोबाईल वरचा
काही वेळाने स्टेटस बदलेल
पण.. माणूस म्हणून जगण्यासाठी
तुम्ही दाखवून दिलेल्या
मानवतेच्या पायवाटा
अखंड राहतील हे मात्र नक्की..!!
© कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे
मु/पो-वेळू (पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511
मोबाइल-7743884307
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈