☆ कवितेचा उत्सव ☆ जागर ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
बऱ्याच वर्षांची आमची गट्टी
कधीच नाही झाली कट्टी
बी रुजले मैत्रीचे
अंकुर फुटले प्रेमाचे
त्याचा झाला वटवृक्ष
दाट मायेच्या सावलीचा
मैत्रीचा वेल वाढत गेला
ताणला तरी चिवट राहिला
जीवा जीवाचे नाते जुळले
द्वेषाने कधी मन नाही चळले
‘स्नेहाचा’ बंध बांधत राहिले
जोडलेला दुवा सांधत राहिले
‘ताई’ म्हटल त्यांना त्या होत्या ‘जेष्ठ’
प्रेमाचे त्यांच्याशी नात ‘घनिष्ठ’
परकेपणाचा पडदा निखळून गळला
उरातला ओलावा तिथेच कळला
ओलाव्याच्या तेलाची ‘पणती’ लावीन
साऱ्यांशी एक होऊन ‘मैत्री’ जागवीन !
स्नेहाचा कल्पून ‘नारळ’
मायेचा पांघरून ‘खण’
ओंजळीत भरीन जिव्हाळ्याचा ‘तांदूळ’
जीवाचे होईल ‘कुंकू’
कायेची होईल ‘हळद’
रेखीन मी त्यांच्या भाळी
नयनांच्या दोन ‘निरांजनातून’
ओटीची तयारी झाली
पदरात त्या साऱ्यांच्या भरली
पदरातली ओटी सांडू नका
अशी तशी समजू नका
जवळ तुमच्या जपून ठेवा
आठवणीत ‘मला’ जागवून पहा !
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈