☆ कवितेचा उत्सव ☆ वज्रदेही ☆ श्री प्रकाश लावंड ☆
ब्रॅन्डेड कपड्यांना जेव्हा
गृहिणी बोतरं म्हणते
तेव्हा समजून घ्यावं
तिच्या पुढ्यात
चार बादल्या धुणं पडलंय
ती चहाचा कप
दणकन् टेबलावर आपटते
तेव्हा पोपरातून डोकं वर काढून समजावं
हाताशी सांडशी नसल्यानं
चहाचं उकळतं पातेलं
तिनं हातानंच उचललंय
तिच्या मोबाईलची रिंग
वाजून वाजून गप्प झाल्यास
पलिकडच्यानं समजून जावं
तिचे हात कणीक तिंबण्यात
गुंतले आहेत
दारावरची बेल वाजवून ही
दार उघडलं नाही तर
लक्षात घ्यावं
ती बाथरूममध्ये आहे
तिनं कडक इस्त्री केलेले
कपडे अंगावर चढविताना
तिच्या सुरकुतलेल्या
ब्लाऊज आणि साडीकडं
एकतरी कटाक्ष टाकावा
दुपारी जेवणाच्या सुट्टीत
तिनं दिलेला परिपूर्ण डबा
फस्त करण्यापुर्वी
ती जेवली असेल का ?
की अजून तिचं
घरकामच आटोपलं नाही
याचा विचार करावा
रात्री जेव्हा ती
कपाळाला वेदनाशामक लावून
डोकं कापडानं बांधून
बेडवर लवंडते
तेव्हा काही न बोलता
हळुवार हातानं
तिचं डोकं चेपावं
महिन्यातून एखाद्या दुसऱ्यांदा
ती गाढ झोपी गेल्याची खात्री करून
हळूच उठावं
तिच्या चुरगळलेल्या
साड्यांना इस्त्री करून ठेवावी
सकाळी तिला बसलेला गोड धक्का
मिश्किल व प्रेमळ नजरेनं
अनुभवावा
ती मुळची वज्रदेही आहेच
पण
आपुलकीचं
जिव्हाळ्याचं
तेलपाणी केलं नाही तर
वज्रालाही गंज चढतो
हे ध्यानात घ्यावं
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.#e-abhivyakti
मोबा 9021497977
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈