☆ कवितेचा उत्सव ☆ माझी मातृभाषा ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆
माझी मातृभाषा आहे थोर मराठी
जीवलग वाटते मज सदा मराठी
कानी अंगाई नादावे मांडीवरी मराठी
मुखीअभंग ओव्या आईच्या मराठी
हाती वृत्तपत्र पित्याच्या असे मराठी
जगरहाटी शिकवे घरी सोपी मराठी
माझी मातृभाषा आहे थोर मराठी
जीवलग वाटते मज सदा मराठी
चिऊ काऊच्या गोष्टी गोड शैशवी मराठी
भावरंगी रंगलो कथां मधून कौमार्यी मराठी
व्यक्तीस खुलवे सौरभ यौवनी मराठी
जीवनी वाटे संगत सोबती मराठी
माझी मातृभाषा आहे थोर मराठी
जीवलग वाटते मज सदा मराठी
भाऊरायाच्या छंदात डोकावते हळूच मराठी
बन्धुराजाच्या पत्रांतून करे हितगुज मराठी
परदेशीभावाशी संवादते मराठी
भगिनीस साहित्य प्रेमी करे मराठी
माझी मातृभाषा आहे थोर मराठी
जीवलग वाटते मज सदा मराठी
सुसंस्कृत लाभले सुंदर माहेर मराठी
परप्रांतीय सासरचे सुद्धा बोलती मधाळ मराठी
गप्पांत भान हरपती मित्र-मैत्रिणी मराठी
ऋणानुबंध जुळताना अडसर नसते मराठी
माझी मातृभाषा आहे थोर मराठी
जीवलग वाटते मज सदा मराठी
हाती असू देत अक्षरवाॾ.मय मराठी
गात राहू सुरेल नवीजुनी गाणी मराठी
भावी पिढीला ज्ञानविज्ञान देईल मराठी
ठेवू अभिमान भाषेचा होऊन पाईक मराठी
माझी मातृभाषा आहे थोर मराठी
जीवलग वाटते मज सदा मराठी
© सौ. मुग्धा कानिटकर
२७/०२/२०२१
सांगली
फोन 9403726078
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈