मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोकळा श्वास ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ मोकळा श्वास ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

मोकळा श्वास घेण्या

धैर्यास गाठले मी

मुखवटे मीच माझे

टरटरा फाडले मी

 

साधण्या  स्वार्थ माझा

शकूनीही जोडले मी

कपटी कुटील फासे

कटकटा तोडले मी

 

कितिदा अश्व माझा

बैलांसवे  जुंपला मी

ती गाठ कासऱ्याची

सरसरा सोडली मी

 

शाश्वत विचार माझे

मी दाबले मुखाशी

बुरखा तटस्त्त तेचा

चरचरा फाडला मी

 

आनंद जीवनाचा

लूटण्या अधीर झालो

तो मोह मृगजळाचा

हळुवार टाळला मी

 

आहे तसाच जगण्या

बाहेर मी निघालो

पिंजरा प्रतिष्ठेचा

तटतता तोडला मी

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 74 – हे ईश्वरा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 74 ☆

☆ हे ईश्वरा ☆

किती स्वप्ने, दुःस्वप्ने पडतात नित्य..

 

परवरदिगारा….मसिहा….

जगाच्या नियंत्या…विश्वकर्मा…

कुठे चाललो आहोत आपण…

मनीचे भय कसे जाते निघून…

शिरावे सहज त्या अंधारगुहेत तसे ….

 

अन उमगते मग आलो कुठे हे…

दबा धरून होते…

कुणी तरी तेथे…..

 

हे ईश्वरा सख्या तूच बनतोस वाली…

आणि सर्व काही फक्त तुझ्याच हवाली!

 

मी अष्टभैरवांना घालीत साद होते,

शिवशक्तिला उराशी घेऊन नित्य होते!

गुरूपावलांना वंदित फक्त  होते!

 

हे नास्तिक्य आस्तिक्य येथे विरून जाते….

भक्तीचा मार्ग मिळता सारे तरून जाते…

ना जात, धर्म बंधन….श्रद्धा अतूट आहे…

 

गोरक्षनाथास मी रक्ष रक्ष म्हणते! तेहतीस कोटी देवांस हृदयी पाचारण करते .

या अल्लाह…ही विनवते…प्रभू देवबापास प्रार्थिते अन् सारे सुखी, सुखरूप रहाता सदा!

मी “आमेन ” उद् गारते अन् पराधीन मानवाला निष्ठेत बांधते!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ठेव ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

☆ कवितेचा उत्सव ☆ ठेव ☆ सौ. नीला देवल ☆

 

लेक गेला परदेशी, हुरहूर कासाविशी

मन गेले ते त्यापाशी तन उरे झुरे स्वतःशी

 

किती येड येड मन ठरयेना मज जवळी

समजाऊ किती त्याला राही व्याकुळ होऊनी

 

किती काळ गेला गेला तू आला आला वाटे

डोळे अंथरून वाटेवर जीव भ्रमला फार फार

 

नादावल फार फार नित्य काळजी सकल

उडे भुरकन भूर फिरून लेका तुझ्याजवळ

 

काय करू त्याला तोड लागे भेटीची ओढ ओढ

व्हॉट्सअँप,इंस्टाग्राम सारा मृगजळी सरंजाम

 

चंद्रताऱ्यांच्या डोळा भेटी तश्या संगणकी भेटी गाठी

हाय हॅलो रोज बोली रुक्ष ख्याली खुशाली

 

कशी करू याला तोड साऱ्या जीवाची घाल मेल

प्रेम झाले मती मोल धनापुढे सारे फोल

 

पैसा रोकडा ट्रान्स्फर एक गुलाब कटे फार

ये म्हणता नाही सवड डोळे अश्रूंनी कवाडं

 

तुला बोलावी आभाळ तोकडे जननीचे मोल

माझी अमूल्य तू ठेव, देवा ती ठेव सुखी ठेव

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

Email:- [email protected]

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – अभंग ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??️ एकादशी विशेष – अभंग ?️?

आज एकादशी

जावे पंढरीशी

भेटाया विठूशी

सावळ्या त्या!!१!!

 

सुरेख सावळी

उभी भीमातटी

सुंदर गोमटी

विठाबाई!!२!!

 

माझी विठूआई

सौंदर्यांची खाण

नसे तिथे वाण

कोणतेही!!३!!

 

चंद्रभागे तीरी

भक्त पुंडलीक

साधू जवळीक

त्याची आधि !!४!!

 

वाळवंटी होई

मृदंग गजर

टाळ चिपळ्या त्या

निनाद ती!!५!!

 

नामदेव चिरी

वसे महाद्वारी

सबाह्य अंतरी

दुजे नाही!!६!

 

चोखोबा बंकोबा

जनाईची भेट

तेव्हा दिसे नीट

पांडुरंग !!७!!

 

तुकोबा रायांना

ओढ विठ्ठलाची

झाली अनावर

दर्शनाची!!८!!

 

तुकोबा म्हणती

धन्य हे वैकुंठ

झाले हो प्रकट

भूमिवरी !!९!!

 

दिनांक:-२६-११-२०

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दान ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ दान ☆ श्री प्रकाश लावंड ☆ 

चिंब चिंब काळी आई

थेंब  थेंब  झेलतेय

गारठ्याशी शिरशिरती

झोंब अधिरी खेळतेय

 

कोंभ कोंभ डवरले

पान पान तरारले

हिरव्याकंच वावरात

गच्च तुरे पिसारले

 

फुललेल्या वावरीत

अंकुरते बीज दडे

मुळे रुजली,मातीची

गच्च गच्च दिठी पडे

 

जाता जाता दान दिलं

परतीच्या पावसानं

बळीराजा सुखावला

चढे त्याला अवसान

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इंद्रधनु! ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

☆ कवितेचा उत्सव :  इंद्रधनु! ☆ श्री मुबारक उमराणी ☆

चालतांना चाललीस

गीत उद्याचे ते गात

मनी माझ्या पेटवीत

ह्दयी प्रेमाची वात

 

तुझ्या सवे चाललो मी

प्रेम उद्याचे भरत

स्वर्ग सुखानंदी मीही

तुज ह्दयी धरत

 

झाडीवेली नाचतात

फुल सुगंधाचे गीत

मनीमोर रानभर

पंखफुले गंध पित

 

खळखळ वाहे झरा

थेंब मोती अंगावरी

चिंब चिंब भिजतांना

भासे रानस्वप्न परी

 

ओल्या तुझ्या कुंतलास

चुंबे गवताचे पाते

मनोमनी फुलतांना

फुल तुझे गुण गाते

 

पडे  प्रतिबिंब तुझे

लहानग्या त्या झ-यात

मंद मंद लहरत

निनांदे दरीखो-यात

 

पक्षी सारे बोले तुला

गीत श्रावणी ते म्हणू

फांदीवरी झुलतच

होऊ दोघे इंद्रधनु

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 25 ☆ सत्य परिस्थिती… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 25 ☆ 

☆ सत्य परिस्थिती… ☆

अध्याय माझा संपेल

मी रुद्र भूमीत असेल

घरी पेटतील चुली

सडा सारवण होईल

 

जेवायला बसतील सर्व

अश्रू डोळ्यांचे थांबतील

माझ्याच घरातील सर्व

भोजनाचा स्वाद घेतील…

 

स्वाद घेत घेत भोजनाचा

आग्रह एकमेकांना होईल

रुदन संपेल त्या क्षणाला

कामाला हात लागतील…

 

हे जीवन क्षणभंगुर

इथे कुणाचे स्थिर ते काय

आला त्याला जावे लागणार

यात आश्चर्य नाय…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विश्रांतीचा पार खुला ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ विश्रांतीचा पार खुला ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पाशही सगळे सोडू मोकळे,चल जाऊया दूर तिथे

तुझे, माझे ,देणे, घेणे     नसतील असले शब्द जिथे.

 

नसेल खुरटे घरटे अपुले,बंद ही नसतील कधी दारे

स्वच्छ,मोकळ्या माळावरूनी वाहत येतील शीतल वारे

 

आशंकेला नसेल जागा,नसेल कल्लोळ  कुशंकांचे

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे.

 

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत,पिल्ले येतील चिऊकाऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची

 

धकाधकीच्या जीवनातले क्षण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे,हासत पुढच्या हाती देऊ.

 

खूप जाहले खपणे आता,जपणे आता तुला मला

खूप जाहला प्रवास आता,करू विश्रांतीचा पार खुला.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीपांडुरंगाचा फराळ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

??️ श्रीपांडुरंगाचा फराळ ?️?

खा..ऽ..रे विठ्ठला उपासाची खिचडी..

खा…रे विठ्ठला..खा..!!धृ.!!

 

करायला घेतली उपासाची खिचडी!

साबूदाणा शेंगदाण्याने केली फाकडी !

किसून घातली त्यात मी काकडी!

खा…ऽ.रे विठ्ठला उपासाची खिचडी!!१!!

 

घेतले शेंगदाणे खमंग भाजून !

गूळ वितळवला तूप घालून!

चिक्की बनवली पाटावर थापून!

खा..ऽ..रे विठ्ठला गोड गोड चिक्की !!२!!

 

वरईचा तांदूळ तुपात भाजला !

खुमासदार छान शिजवून घेतला!

चिंच गुळाचा कोळ केला!

दाण्याच्या आमटीला कोळ घातला!

झाली चवदार तांदूळ आमटी!

खा..ऽ.रे विठ्ठला.. वाटी वाटी !!३!!

 

खजूर सोलली बिया काढूनी!

बदाम बेदाणे पिस्ते घालुनी!

मिरची मीठ चवीस घालुनी!

त्याची केली चवदार चटणी!

खा..ऽ..रे विठ्ठला.. खजूराची चटणी!!४!!

 

पिकलेली ती लिंबे आणली!

फोडी करुनी उकडून घेतली!

तिखट मीठ साखर टाकली!

झाले तयार चवदार लोणचे!

खा..ऽ.रे..विठ्ठला उपासाचे लोणचे!!५!!

खा..ऽ ..रे विठ्ठला..खा..ऽ..

 

दिनांक:-१६-११-२०

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नका येऊ बांधावर ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

जीवन परिचय 

  • स्थापत्य अभियंता.
  • युवा पिढी चा कवी.
  • काव्य आणि अभिनय याची आवड.

☆ कवितेचा उत्सव ☆ नका येऊ बांधावर ☆ श्री शुभम अनंत पत्की 

नाही मिळाला कसला न्याय,

नुसते झाले सरकारी दौरे

पाहणी करून उपयोग काय,

इथं उपाशी बसलेत मोहरे

 

मागं पळून तुमच्या जोरात,

दुखु लागले हताश पाय

कुजलेलं पिक दाखवून तरी,

पाहिलं मदत मिळेल काय

 

इथं सोन्याला येई झळाळी,

शेअर मार्केटला उसळी

पण शब्द घुमतो महगाई,

जेव्हा फुलते माती काळी

 

परत नका येऊ बांधावर,

राहुदे आम्हाला जरा शांत

तुम्ही फक्त भेटा चॅनेलवर,

आता अर्णब आधी सुशांत

 

© श्री शुभम अनंत पत्की

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print