मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पतंग… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कवितेचा उत्सव ☆ पतंग… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आशेच्या पतंगा वरी,

झुले मानवी सृष्टी!

 

रंगबिरंगी रूप तिचे,

हलेना त्यावरुनी दृष्टी!

 

पतंग ठेविला अंतराळी,

निसर्गावर मात करी!

सुटून गेली मानवा हाती,

त्याची संयमाची दोरी!

 

परमेश्वराच्या हाती होते,

मांजाचे ते रीळ !

मुक्त सोडले मानवाला,

नाही राहिली खीळ!

 

मांजा वरची पकड ‘त्याची’,

होती घट्ट धरलेली!

ढील त्याने देताच जराशी,

‌ पतंग जाई उंच आभाळी!

 

दु: स्वप्नाचे वर्षआपले,

‌‌ घेवून जा रे आभाळी!

फिरून येता घेऊन ये तू,

सुवर्ण किरणे ती सोनसळी!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टाक ☆ श्री मुबारक बाबू उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

 

☆ कवितेचा उत्सव ☆ टाक ☆ श्री मुबारक बाबू उमराणी ☆

वारा नसतांही

पांगले ते पक्षी

आसमंतातच

कोरीतच नक्षी

 

प्रखर बाणांच्या

ऊन्हांच्या त्या झळा

घसा कोरडाच

सोशितच कळा

 

गावातून वाहे

काळेनिळे पाणी

तेजाब ते पित

करपली वाणी

 

झाडांच्या  झुंडीत

रासच पानांची

बासरी अबोल

बेचैन कान्हाची

 

जागोजागी दिसे

सांडलेले पंख

चांदणेही आले

मारीतच डंख

 

पक्षी घालेनात

नदीकाठी गस्ती

झाडात फुलेना

पाखरांची वस्ती

 

गर्दीत मिळेना

कोणालाच थारा

सुकुनच गेला

ममतेचा झरा

 

गावोगावी उडे

टाररस्ता घुळ

कापीतच गेले

झाडांचेच मुळ

 

बेचैन  होऊनी

सारे मारी हाक

पानावर आज

चालेनाच टाक

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनसूर्य ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ मनसूर्य ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

कॅनव्हास वरील चित्रात

नेहमीच सूर्य कुठे दिसतो?

तरीही उजळतो आसमंत,

दिसतात हिरव्या ओल्या रेषा

रेषांच्या विविध छटा…आणि

ऐकूही येते खळखळ नद्यांची

आकाशाने कवेत घेतलेले पक्षी… त्यांच्या कुशीत आश्वस्त ,

वाटून घेणारे डोंगर….

 

दिसतं….

 

आकाश आणि नदीच अद्वैत…

आकाश आणि डोंगरांचे अद्वैत…

कधी झाडाचं…लता पल्लवीचं…

तर कधी साऱ्या सृष्टीचं अद्वैत….

त्या आकाशाशी!!

चित्रात सूर्य नसतानाही….

 

मग असाच एक मनसूर्य

प्रत्यक्ष प्रकट न होणारा … काळोखातूनही उजेड प्रसवणारा….

मुठीएव्हढ्या अंधारात वसलेल्या हृदयातून ,

तेजाळणाऱ्या गीतांना ताल देणारा…

तर कधी….

पान, फुल, सरिता, आभाळ होऊन त्यांना रंग नी रूप देणारा….

आणि तिमिरातूनही,

चैतन्याची वाट दाखवणारा,

आणि जीवनाच्या सुंदरतेशी,

अद्वैत करवणारा….

पडद्यामागचा कलाकार!

पडद्यामागचा कलाकार!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

आर्थिक कारणाने सरकारने सासवड येथे चालवलेली ही शाळा ७२ साली बंद केली. मग आण्णा-वहिनी पुण्याला त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या सासवडच्या किती तरी विद्यार्थिनी,  कधी मुला-बाळांना घेऊन, कधी नवर्‍याला घेऊन आण्णांकडे यायच्या. उज्ज्वलाचे   वडीलही पुण्यालाच राह्यचे. त्यामुळे एस.एस.सी.ची परीक्षा झाल्यावर,  तीदेखील पुण्याला आली. उज्ज्वला काळे पुण्यातच होती. त्यामुळे तिचे येणे वारंवार घडू लागले. कधी मुलांना घेऊन, कधी वडलांना,  कधी भावाला.  असं होता होता, उज्ज्वला आणि तिचा परिवार आण्णांच्या गोतावळ्यात कधी मिसळून गेला,  कुणालाच कळलं नाही.

आण्णा तिला एकदा म्हणाले, ‘नुसता एस.एस.सी.चा काय उपयोग?  तू डी.एड. हो. ‘नुसती सूचनाच नाही. तिच्या मागे लागून तिला डी.एड. ला प्रवेश घ्यायला लावला. तिचा अभ्यास करून घेतला. मग यथावकाश प्राथमिक शाळेत नोकरी, कायम होणं, हे सारं घडून गेलं. उज्ज्वलाचा संसार मार्गी लागला. हे सारं होईपर्यंत एखाद्या डोंगरासारखे आण्णा तिच्या मागे उभे राहिले. आण्णांचे हे ऋण उज्ज्वला नेहमीच मानते. ती म्हणते, `आण्णा नसते, तर लोकांच्या घरी धुणं-भांडी करून मला मुलांना वाढवावं लागलं असतं.’

उज्ज्वला मराठा समाजातली. वडील चांगले पदवीधर. पण समाजाची म्हणून एक रीत-भात असते. चाकोरी असते. तिचं लग्नं लवकरच,  म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी झालं. दोन मुले झाली आणि पठोपाठ वैधव्याच्या दु:खाला सामोरे जायची वेळ आली. आपघर उध्वस्त झाल्यावर बापघर जवळ करणं आलं. तिथे आसरा,  तात्पुरता आधारही मिळाला. पण कुटुंब मोठं. मिळवता एकटा. आसरा मिळाला तरी आपल्या पिलांच्या चारा-पाण्याची व्यवस्था तरी आपल्याला बघायला हवी. त्यासाठी शिक्षण हवे. आईने मुलांना संभाळायचे मान्य केले आणि उज्ज्वला  सासवडला राहिली. दोन वर्षात शालांत परीक्षा ती उत्तीर्ण झाली.

बुद्धिमान माणसे आपल्या कर्तृत्वावर पुढे जातात. सामान्य वकुब व कुवत असलेल्या व्यक्तींमध्ये चैतन्याची,  जिद्दीची ज्योत पेटवावी लागते. `तू ही गोष्ट निश्चितपणे करू शकशील, असा आत्मविश्वास जागवावा लागतो. ‘आण्णांनी उज्ज्वलाच्या बाबतीत नेमके हेच केले. उज्ज्वला सामान्य बुद्धीची मुलगी असली,  तरी कष्टाळू होती. `परीक्षेत पास होणे मुळीच अवघड नाही’ असा विश्वास त्यांनी तिच्यात निर्माण केला. तिचा अभ्यास घेतला. तिला मार्गदर्शन केले. म्हणूनच ती म्हणते, `आण्णांमुळेच मी आज शिक्षिका म्हणून उभी आहे. एरवी मला इतरांच्या घरची धुणं-भांडी करून मुलांना वाढवावं लागलं असतं.

– क्रमश:

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लागला मिसळण्या अश्रुधूर ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

☆ कवितेचा उत्सव ☆ लागला मिसळण्या अश्रुधूर ☆ श्री शुभम अनंत पत्की 

प्रसन्न वातावरण होते किती,

दिवस हा होता पवित्र किती

लागले गालबोट या नेत्यांमुळे,

पोलिसांचे कोंडले श्वास किती

 

लोकशाहीचं आदर्श मॉडेल,

स्विकारले होते आज देशाने

प्रजासत्ताक चिरायु होण्याचे,

७२ सोहळे झाले शांततेने

 

पोलिसांनी तारलं होतं,

कोरोनामध्ये सर्वांना

तुम्ही का चिरडलं आज,

गवत समजून दुर्वांना

 

करा कितीही सारवासारव,

ऊरात राहिल खदखद सर्वदूर

दिल्लीचे हे असह्य प्रदूषण,

लागला मिसळण्या अश्रुधूर

 

© श्री शुभम अनंत पत्की

२६/०१/२०२१

(कवितात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रेखीन माझ्या मीच ललाटा ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ वज्रदेही ☆ श्री प्रकाश लावंड ☆

ना  हाकाटी  ना बोभाटा

बुजून गेल्या साऱ्या वाटा

रान  काटेरी  माजलेले

पाय थकलेले पल्ला मोठा।।

 

कडे कातीव दऱ्या ताशीव

निसरडे दगड घोटीव

भणाण वारा भेलकांडतो

भिती दाखवी खडा चढाव

किती परीक्षा पाहतोस

रौद्ररूपा सांग विराटा  ।। १।।

 

काळोखा कर आकांडतांडव

तोंड पसरून भिती दाखव

नजर माझी प्रकाशमान

आणिक तगडे माझे सौष्ठव

तेजोमय झाले बघ माझे

शिवार,घर,अंगण ओटा ।। २।।

 

माझा प्रवास नाही सस्ता

माझ्यासाठी ना हमरस्ता

जीव पणाला नित्य लावतो

काळी माय कसता कसता

घामानं भिजवून माती

रेखीन माझ्या मीच ललाटा  ।। ३।।

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.#e-abhivyakti

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 83 – आरक्षण …. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 83 ☆

☆ आरक्षण  …. ☆

आयुष्याचा प्रवास करताना

प्रत्येकालाच हवी असते

आपापली आरक्षित जागा!

धकाधकीच्या जीवनात ही

लळत लोंबत जगण्याची वेळ

कधीच न आलेल्या प्रवाशाला तर

सहनच होत नाही गर्दीतली घुसमट!

आता निवांत रमावे इथे

असे वाटत असताना,

खिडकीतल्या चिमण्यांना

हुसकावून द्यावे अंगणात

तसे माहेरवाशिणींना

वागविले जाते तेव्हा

बंद करावा माहेरचाही प्रवास!

आपले अस्तित्व नाकारणा-यांकडे

थांबू नये मुक्कामाला!

सोडू नये आपली आरक्षित हक्काची जागा,

विनाआरक्षण करू नये प्रवास कदापिही!

कारण वयाचा आणि नात्याचा मान राखून

चटकन उठून जागा देणा-यांची पिढी

संस्कारली गेली नाही आपल्याकडून!

म्हणूनच करावी तरतूद,

आपल्या आरक्षणाची

कुठल्याही प्रवासाला निघण्यापुर्वी!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हल्ली…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ हल्ली…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

हल्लेच श्वापदांचे झालेत खूप हल्ली

रानातले शिकारी दमलेत खूप हल्ली

 

भलतेच बदल झाले वस्तीत पाखरांच्या

राव्यात कावळे ही लपलेत खूप हल्ली

 

बाजारपेठ ज्यानी काबीज आज केली

त्यांनीच देह त्यांचे विकलेत खूप हल्ली

 

भलत्याच चोचल्यानी केली दिवाळखोरी

त्यांचे लिलाव येथे घडलेत खूप हल्ली

 

रांधून वाढणारे गेले मरून सारे

बांधावया शिदोरी आलेत खूप हल्ली

 

जे पोसले बळे ते माजूरडे निघाले

खाऊन सकस खाणे सुजलेत खूप हल्ली

 

ऐकून भामट्यांची भलती मधाळ वाणी

स्वप्नात गुंतलेले फसलेत खूप हल्ली

 

सुखरूप मार्ग नाही जगण्यास आज उरला

वाटेत खाच खळगे पडलेत खूप हल्ली

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रजासत्ताक दिन विशेष – देशाभिमान ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ प्रजासत्ताक दिन विशेष – देशाभिमान ☆ श्रीशैल चौगुले ☆

ज्या देशाची हि पवित्र भूमी

त्याच देशाचा नागरीक मी

अभिमानाचा हा देश माझा

भारत देशाचा असे पाईक मी.

 

किती मिरवी गौरव गाथा

ज्ञान-विज्ञानाचा ध्यास नित्

वीर मनाची, वीर आकांक्षा

देशभक्तीचा तो नायक मी.

 

ध्वज चढवावा संविधानी

अन् माणूसकी जात खरी

फडके तिरंगा, स्वातंत्र्याचा

प्रजासत्ताकाचा लायक मी.

 

थोर महात्मे लढले तेंव्हा

अनेक शहीद मूर्ती झाले

कुणी सागरा पार करती

संस्काराचा असे आस्तिक मी.

 

शत्रूला नामोहरम केले

ते हसत फासावर गेले

हिंदुत्वाची अखंड गर्जना

त्याच सूताच्या सप्रतीक मी.

 

गांधी, नेहरू, सुभाषबाबू

वल्लभभाई, ते लजपत

टिळक, गोखले, ते अनेक

भारतमातेचा पुत्र एक मी.

 

ज्ञानज्योत ईतिहास तेवू

महानतेचे या गीत गाऊ

विश्व जिंकण्याचे स्वप्न पाहू

करेन कवणी ऊल्लेख मी.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 82 ☆ भिती ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 82 ☆

☆ भिती ☆

मला सूर्याची भिती वाटते

आग ओकत असतो डोक्यावर

पत्र्याच्या घरात जीव घाबरतो

बाहेर सावलीला जावं तर

झाडांची बेसुमार कत्तल झालेली

कुठल्याही लढाईखेरीज

आणि कत्तल करणारे पहुडलेल

एसी लावून गादीवर…

उष्माघाताने जीव जातात

तुमच्या माझ्यासारख्यांचे

आणि सूर्याला त्याचं देणं घेणंही नसतं…

 

तशीच ही थंडी, कुठून येते ते कळतच नाही

वाजते पण आवाज करत नाही

घरात हिटर आहे ना ?

मग काळजी कशाची ?

बाहेर थंडीत कुडकुडणाऱ्यांची काळजी करायला

परमेश्वर आहेच ना !

कधीकधी परमेश्वर, दानशूराच्या रुपात

वाटतो गरिबांना, काही शाली काही ब्लँकेट्स

तरी मरतातच काही कुडकुडून

या थंडीच्या त्रासदीने…

 

पाणी घुसतं झोपडपट्यांमधे

चाळीत आणि बंगल्यात सुद्धा

सुनामीच्या लाटा उध्वस्त करतात किनारे

वाहू लागतात निर्जीव वाहनांसोबत

प्राणी आणि माणसं सुद्धा

कशासाठी हा कोप, कशासाठी हे तांडव

अरे जीव जगवण्यासाठी हवी

थोडी मायेची उब,

तहान लागली तर घोटभर पाणी आणि

प्रसन्न राहण्यासाठी छान गुलाबी थंडी…

पण किती या दुःखाच्या डागण्या

फक्त सुखाची किंमत कळण्यासाठी…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares