सौ ज्योती विलास जोशी
☆ कवितेचा उत्सव ☆ घालमेल ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
करोनाचा विळखा
घट्ट होत चाललाय
माणूस परिस्थितीचा
गुलाम होऊ घातलाय
करोनाने माणसाला
अगदी पेचात टाकलंय
जणू आभाळाने क्षितिजाला
घेरून टाकलय
शाश्वत असा सूर्य
उद्या क्षितिजावर उगवेल
पण आशेचा किरण कोणता
हे माणसाला कसे उमगेल?
दुसऱ्याच्या दुःखाने
खरंच काळजात चर्र होते
पण इतके वरवरचे की
लगेचच विसरते
आपण आपले बरे
दुसरे गेले उडत
बेदरकार विचारांची
मन का ठेवते पत?
परदुःख शीतल
परिणीती झाली आज
लाज वाटली स्वतःची
मन झाले नाराज
बातमी एखादी जीवघेणी
काळीज पार वितळवते
वयच होते कारणीभूत
म्हणून मृत्यूला स्वीकारते
भडका आगीचा उठत नाही
घरात जोवर ठिणगी पडत नाही
आज सुपात तर उद्या जात्यात
याची जाणीव कशी होत नाही?
पोट भरून ढेकर दिलेले
पैशाचा ऊहापोह करतात
गरीब बिचारे मृत्यूला
गृहीत धरून चालतात
गरीब-श्रीमंत लहान-थोर
भेदभाव न करोनाच्या ठाई
जो तो आपल्या प्राक्तनाच्या
वेटोळ्यामध्ये अडकला जाई
माणसाला माणसापासून
दूर लोटलंस देवा
मनात असून देखील
घडत नाही की रे सेवा!
तेहतीस कोटी देवांना
आर्जव आहे दीनवाणी
नात्यांची पकड सैल नका करू
हीच तुम्हा चरणी विनवणी
नको विवंचना नको भ्रांत
चुकले माकले कर माफ
लेकराला घे पदरात
अन् कर मन साफ
दुःख झाले अतोनात
मन झाले जड
तुझ्याशिवाय कुणाला सांगू
अन् विषयाला लावू कड?
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
9822553857
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈