☆ कवितेचा उत्सव ☆ ऋतूरंग ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆
संपता संपता शिशिराने वसंताला साद दिली .
गोड गुलाबी थंडीतून पानझडी संपून गेली .
जुनीपुराणी पिवळी पाने गळून
आता पाचोळा झाली.
उघड्या बोडक्या झाडावरती नवी वस्त्रे लेवू लागली.
हिरवी कोवळी छान पालवी झाडे आता पांघरु लागली.
वसंत ऋतुचे वैभव सारे हिरवाई हीघेऊ लागली .
आम्रतरूवर मोहर फुलतो
गंधा संगे सूरही जुळतो .
कोकीळ सुस्वर पाना आडून रंगामध्ये तान मिसळतो.
ग्रीष्म तापला तरीही येथे फुले बहावा गुलमोहर तो
आषाढाचा काळा मेघही अमृतधारा इथे बरसतो.
सप्तरंगी ते इंद्रधनू नभी मोर हीनाचे पिसेफुलारूनी
निसर्ग पटला वरती उधळण नवरंगाची वर्षा ऋतुनी.
शरद ऋतूचे शुभ्र चांदणे दुधात न्हाली धरतीओली
समृद्धीचा रंग पसरला धनधान्याची रास ओतली.
हेमंताचा प्रेम गोडवा संक्रांतीचा रंगीत हलवा
फळा फुलांनी तरु बहरले ऋतू रंगाचा कुंचला नवा.
कृपाछत्र हे सहा ऋतूंचे नेम याचा कधीन चुकला
जीवनात ते रंग बहरती सुख-समृद्धी या जगताला.
© सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈