श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ विश्रांतीचा पार खुला ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पाशही सगळे सोडू मोकळे,चल जाऊया दूर तिथे
तुझे, माझे ,देणे, घेणे नसतील असले शब्द जिथे.
नसेल खुरटे घरटे अपुले,बंद ही नसतील कधी दारे
स्वच्छ,मोकळ्या माळावरूनी वाहत येतील शीतल वारे
आशंकेला नसेल जागा,नसेल कल्लोळ कुशंकांचे
परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे.
चिऊकाऊच्या गोष्टी सांगत,पिल्ले येतील चिऊकाऊची
मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची
धकाधकीच्या जीवनातले क्षण शांतीचे वेचून घेऊ
तुडुंब भरले कुंभ सुखाचे,हासत पुढच्या हाती देऊ.
खूप जाहले खपणे आता,जपणे आता तुला मला
खूप जाहला प्रवास आता,करू विश्रांतीचा पार खुला.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈