मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ नवलाख तळपती दीप विजेचे येथ….. ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

☆ कवितेचा उत्सव ☆ नवलाख तळपती दीप विजेचे येथ….. ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

(काव्यानंद मध्ये या कवितेचे रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित )

 

नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणू नगरात

परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा

त्या माजघरातील  मंद दिव्याची वात !

 

वार्यावर येथील रातराणी ही धुंद

टाकता उसासे,चरणचाल हो मंद

परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा

त्या परसामधला एकच तो निशिगंध !

 

हेलावे भवती सागर येथ अफाट

तीरावर श्रीमान इमारतींचा थाट

परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा

तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

 

बेहोष चढे जलशांना येथील रंग

रूणझुणता नूपुर जीव बने निःसंग

परि स्मरतो आणि करतो व्याकुळ केव्हा

तो आर्त मला जो ऐकविलास अभंग !

 

लावण्यवतींचा लालस येथ विलास

मदिरेत माणकापरि तरारे फेस

परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा

ते उदास डोळे, त्यातील करूण-विलास !

 

 – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 68 – जननी – जनक ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 68 ☆

☆ जननी – जनक ☆

माझ्या आईचा मी विचार करते तेव्हा मला खुपच चकीत व्हायला होतं, त्याकाळात सगळ्याच बायका गृहकृत्यदक्ष वगैरे असायच्या, माझी आई सुशिक्षित कुटुंबातली तिची आई सामाजिक कार्यकर्ती, वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते, निवृत्त झाल्या वर शेती करत होते ते कोकणातले आमराई ,भातशेती वगैरे ! खुप मोठा बंगला, आईचं लग्न घाटावरच्या भरपूर शेतीवाडी असलेल्या घरात झालेलं! पण ती आम्हा सख्या चुलत सहा भावंडांना घेऊन शहरात बि-हाड करून आमच्या  शिक्षणासाठी राहिली. आजोबा त्या काळात त्या भागातले मोठे बागाईतदार, त्यामुळे आईच्या हाताखाली कायम दोन तीन बायका असायच्या पण स्वयंपाक मात्र ती स्वतः करायची ! तिनं आम्हा बहिणींना कधीच घरातली कामं करायला लावली नाहीत, ती भरतकाम, विणकाम, खुपच सुंदर करायची, हौस म्हणून मशीनवर कपडे शिवायची, सुंदर  स्वेटर विणायची! स्वयंपाकात सुगरण होती, या कुठल्याच कला तिने मला शिकवल्या नाहीत किंवा मी शिकले नाही. पण तिला वाचनाची आवड होती तिची वाचनाची आवड आमच्यात उतरली, आणि पुढील काळात मी लेखन करू लागले, फार जाणीवपूर्वक तिनं काही आमची जडणघडण केली नाही, पण आरामशीर आयुष्य तिच्यामुळे मी जगत होते हातात काॅफीचा कप, आणि जेवायला ताट ही कामवाली देत असे. आई सतत आजारी असायची तरी  तिचा कामाचा झपाटा मोठा होता.

मी स्वयंपाक लग्नानंतर करायला शिकले, लग्नाच्या आधी आजीने भाकरी करायला शिकवली होती, कधीतरी चपात्या ही करत होते….. पण तिच्या सारखं प्रत्येक पदार्थ निगुतीनं करणं मला कधी जमलं नाही पण तिच्या हाताची चव मात्र माझ्या हातात उतरली आहे. भरतकाम, विणकाम, शिवण मी ही केलंय पण तिच्या इतकं सुबक नसे….. तरीही नूतन शेटे च्या ओळीप्रमाणे आज म्हणावंसं वाटतं अस्तित्व आज माझे….त्या तूच एक कारण….आपलं अस्तित्व हे आपल्या आईवडिलामुळेच! माझं हस्ताक्षर वडिलासारखं सुंदर आहे. कुरळे केस वडिलांसारखे आहेत, वडिलांची तब्येत एकदम चांगली होती, आखाडा गाजवलेले पहिलवान होते ते!

मधुमेह, संधीवात हे आजार अनुवंशाने आईकडून आलेले, आणि आता जाणवतं हे आजार तिने कसे सहन केले असतील??

आरामशीर, सुखवस्तू आयुष्य आईवडीलांमुळे जगता आलं ही कृतज्ञता आहेच! पण मला लहानपणी आईवडीलांचा नेहमीच धाक आणि दराराच होता.

 

आई बाप असतात

फक्त जन्माचे धनी

आयुष्याचे गणित

सोडवायचे ज्याचे त्यानी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ कवितेचा उत्सव ? कुठे कुठे क्षितिजाशी ?  सुश्री प्रज्ञा मिरासदार 

 

दूर कुठे क्षितिजाशी टेकडीच्या माथ्यावर |

शांत रम्य जागी उभे एक शिवाचे मंदिर ||१||

 

चार वृक्ष भोवताली दिसे वनश्रीची शोभा |

गाभाऱ्यात तेज फाके शिवपिंडीची ती प्रभा ||२||

 

पलिकडे शांत नदी जळ संथ संथ वाहे |

उतरत्या सांजवेळी सूर्य डोकावून पाहे ||३||

 

एक भगवी पताका मंदिराच्या वर डुले |

शांत नदीपात्रामध्ये दूर दूर होडी चाले ||४||

 

भक्तिरंगी परिसर होई सांजेच्या वेळेला |

पक्षी येती झाडांवर भक्तगण आरतीला ||५||

 

भास्कराचा लाल गोळा बुडताना पाण्यावर |

येई क्षितिजाभोवती लाल केशरी किनार ||६||

 

मंद नंदादीप तेवे शंकराच्या गाभाऱ्याशी |

दिसतसे संध्याराणी कुठे कुठे क्षितिजाशी ||७||

 

नंदादीपाच्या तेजाने जाई भरून गाभारा |

झाला निशेच्या अधीन रम्य आसमंत सारा ||८||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं रसग्रहण☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं  रसग्रहण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

विरह आणि प्रेम ही भावना एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादीत असत नाही. एखादा प्रसंग, एखादे ठिकाण, एखादी आठवण ही सुद्धा मनात अशी घर  करून बसलेली असते की मनाला थोडासा धक्का द्यायचा अवकाश, त्या उफाळून वर येतात. घडून गेलेल्या प्रसंगाची,  सहवासाची, आवडत्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले मन किती संवेदनशील आहे, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत आणि आपण ते किती टिकवून ठेवले आहेत यावरच ही प्रेमाची, विरहातून निर्माण होणार्या आर्ततेच्या भावनेची तीव्रता अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांची ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ ही कविता.

जीवनाविषयी अखंड आशावादी असणारा, तार्यांशी करार करणारा, क्रांतीचा जयजयकार करणारा हा कवी जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाशी समरस होतो, अंतर्मुख होतो तेव्हा …

परस्पर विरोधी परिस्थितीचे नेमके वर्णन कवीने या कवितेत केले आहे. प्रलोभन आणि संयम यात होणारे द्वंद्व  कवितेत सहजपणे दिसून येते. नेमक्या शब्दांच्या वापरामुळे कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो. विजेच्या दीपांना तारकादळे म्हटल्यामुळे त्यांची संख्या, व्याप्ती सहजपणे डोळ्यासमोर येते. श्रीमान इमारतींचा थाट हे शब्द वाचल्यावर मरिन ड्राइव्ह सारखा सागर किनारा आठवत नाही का ? लालस विलासापेक्षा करूण विलासच मन आकृष्ट करून घेतो.

लयबद्ध, प्रवाही अशी ही कविता वाचून झाल्यावर आपण त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण ती कविता पुन्हा वाचतो आणि मनात विचारांचे तरंग उठू लागतात. आपल्यालाही काहीतरी आठवते. हे आठवायला लावणं, विचार करायला लावणं हेच कवितेचं यश आहे.

जाता जाता आठवण होते ती आणखी एका कवितेची. स्वा. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची. ‘नभी नक्षत्रे’ किंवा ‘प्रासाद इथे……आईची झोपडी प्यारी’ या सारख्या ओळी सहज आठवतात. किंवा गदिमा यांच्या “धुंद येथ मी” या गीतातील शब्दही मनात गुणगुणले जातात. एक चांगली कविता वाचताना दुसर्या एक दोन चांगल्या कविता आठवाव्यात आणि आपला काव्यानंद वाढत जावा ही कविच्या कलाकृतीची यशस्विता नाही काय ?

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

निवेदन –

आपण अनेक पुस्तके वाचतो. त्यातील काही पुस्तकं आपल्याला आवडतात. त्यावर बोलावं, इतरांना सांगावं, असं आपल्याला वाटतं.  कित्येकदा आपल्या पुस्तकाबद्दल इतरांशी बोलावं, आपली त्यामागची भूमिका मांडावी, असंही काही वेळा  वाटत. या वाटण्याला शब्द देण्यासाठी एक नवीन सादर सुरू करत आहोत,पुस्तकांवर बोलू काही.’  आज त्यातील पहिला लेख  सुश्री संगीता कुलकर्णी यांचा.

संपादक मंडळ – ई – अभिव्यक्ती 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

अनुवादित पुस्तक – संवेदना

मूळ हिंदी लेखक – डाॅ. कमल चोपडा

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

समकालीन हिंदी प्रस्थापित लेखकांमध्ये  डॉ कमल चोपडा हे एक महत्वाचं नाव. त्यांच्या हिंदीतील निवडक लघुत्तम कथांचा अनुवाद  संवेदना या नावाने श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी केला आहे..

आपल्या सभोवतालचं जीवन त्यातील सहजता, गंभीरता, तर कधी कधी भयावहताही ते सहजतेने पाहतात व अनुभवतात. तसेच आपल्या भोवती घडणारे घटना- प्रसंग, ते घडवणा-या विविध व्यक्ती, त्यांचे विचार, विकार, वर्तमानात जाणवणारी सुसंगती- विसंगती, स्वार्थ, त्याग, सांमजस्य ताठरता यांचे ते सूक्ष्म निरीक्षण करतात.

श्रीमती उज्ज्वला केळकर

या त्यांच्या पुस्तकातील कथांत लक्षणीय विविधता आहे. कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक व्यवहार, सांप्रदायिक दंगे, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक पैलू या कथांमध्ये आहेत. कौटुंबिक नात्यातील अनेक प्रकारचे भावबंध त्यांनी उलगडलेले आहेत. मुलं, त्यांचे आई-वडील भावंड, सासवा- सूना या नात्यातील आत्मियता, प्रेम, जिव्हाळा त्यांच्यातील ताण-तणाव त्यातून प्रगट झालेले भाव- भावनांचे कल्लोळ या सा-याला चिटकून राहिलेले दारिद्रयाचे अस्तर त्यातूनच झरणारी आत्मीयतेची माणुसकीची जाण हे सर्व या कथांमधून प्रगट होते.

सासू-सुनेचे संबंध तर जगजाहीर… पण इथे मुलगा आणि सून यांच्यातील बेबनाव दूर करणारी सासू आहे. “ओठांत उमटले हसू– मूळ कथा छिपा हुआ दर्द ” या कथेत तर गावाहून सासू-सास-यांना भेटायला आल्यावर घरात फक्त मक्याचचं पीठ शिल्लक आहे बाकी काही नाही हे कळल्यावर…आम्ही फक्त तुमच्याच हातच्या मक्याच्या रोट्या खायला आलो आहोत पण त्या सोबत दूध, लोणी, तूप, साखर असं काहीही घालू नका. डाॅक्टरांनी आम्हाला खाऊ नका म्हणून सांगितलयं…असं म्हणत सासूचा आत्मसन्मान जपणारी समंजस सून आहे.

पतीचा अन्याय सहन करणारी स्त्री हे चित्र तर आपल्याला जागोजागी दिसतं. ” पती परमेश्वर–मूळ कथा- पालतू ” या कथेत तर दुस-या बाईकडे जाण्यासाठी बायकोकडे पन्नास रुपये मागणा-या नव-याचे पाय सुपारी देऊन गुंडाकडून निकामी करणारी व नंतर त्याला औषधोपचार करून भाजीच्या गाडीवर बसवून त्याला कामाला लावणारी व माझा पती ” पती परमेश्वर ” असेही म्हणणारी विरळा बायको भेटते…. दारूडा नवरा मेल्यानंतर आठ दहा वर्षांचा मुलाला सोडून दुसरा घरोबा करणा-या आईचं दुःख समजून घेणारा..आपल्याला सोडून गेल्यावरही आपल्यात कटुता येऊ न देणारा ” असेल तिथे सुखी असो– मुळ कथा– जहाँ रहे सुखी रहे ” अशी इच्छा बाळगणारा मुलगाही येथे आपल्याला भेटतो..

सांप्रदायिक दंग्याच्या पार्श्वभूमीवरच्या अनेक कथांही यात आहेत. पण प्रत्येक कथेचा रंग वेगळा सांगण वेगळ…” विष-बिज ” मूळ कथा विष-बिज मधील म्हातारी म्हणते लूटमार, आगं लावणं यामुळे तुमच्या धर्माची प्रतिष्ठा कशी वाढेल? उलट अशा प्रत्येक घटनेतून तुमच्या शत्रूंची संख्याच वाढत जाईल आणि मग ही आग तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मुलांबाळांपर्यंत पोचेल….

तर “तपास–मूळ कथा- शिनाख्त ” या कथेत पोलिसांची कुत्री त्या भागातला एक कुख्यात गुंड एक आमदार एक गुन्हेगार यांच्यापर्यंत पोचतात. इन्स्पेक्टर आझाद आपल्या अधिका-याला अहवाल सादर करतो. खरे गुन्हेगार कोण? हे कळल्यावर तो अधिकारी म्हणतो तुला ‘ तपास ‘ नाही ‘ तपासाच नाटक ‘ करायला सांगितलं होतं. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो माझा तपास पूर्ण झालाच नव्हता. चौथ्या गुन्हेगारापर्यंत मी पोचलोच नव्हतो. चौथा गुन्हेगार पोलिस म्हणजे आपण..

आजारी मुलाच्या औषधपाण्यासाठी पैसे हवे असलेला एक सामान्य माणूस..पैशासाठी बस मध्ये बाँम्ब ठेवायला तयार होतो. उतरता उतरता त्याला एका लहान मुलाचं रडणं ऐकू येतं. त्याला ते आपल्याच मुलाचं वाटतं व तो बस मध्ये बाँम्ब आहे हे सगळ्यांना सांगून खाली उतरायला लावतो. लहान मुलाचे रडण्या- हसण्याचे आवाज आपल्याच मुलासारखे कसे वाटतात? मग ते कुठल्या का धर्माचे असेनात…कथा– ‘धर्म– मूळ कथा– धरम ‘

‘सफरचंद– मूळ कथा– फल’ व ” पैसा आणि परमेश्वर — मूळ कथा–पैसा और भगवान ” या कथांत तर मुलांचे मन, त्यांना पडणारे गमतीदार प्रश्न मांडले आहेत. ” पैसा व परमेश्वर ” या कथेत तर देवाला पैसे टाकताना पाहून ‘ देव भिकारी आहे का? ‘ त्याला पैसे टाकून त्याच्याकडे भिका-यासारखं काही का मागतात? त्याला जर पैसे हवे असतील तर तो आपल्या जादूने पैशाचा ढिग निर्माण करणार नाही का? असं विचारणारा व विचार करायला लावणारा निरागस पिंकू इथे आहे…

अशा अनेकविध कथांतून सांप्रदायिक कट्टरतेच्या दरम्यान सद्भभावना आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीचा आशय अतिशय सुंदररित्या मांडलाय..विविध पातळ्यांवर विविध अंगाने होणा-या शोषणाचे अनेक रूपरंग त्यांच्या या कथांतून प्रगट झाले आहेत..

डाॅ. कमल चोपडा यांच्या कथा जीवनातील, लोक व्यवहारातील, आचार-विचारातील विसंगतीवर नेमकं बोट ठेवते व मोजक्याच शब्दांतून त्यांचं मार्मिक दर्शनही घडवतं..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

मो 9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 67 ☆ अर्थव्यवस्था (हज़ल) ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 67 ☆

☆ अर्थव्यवस्था (हज़ल)  ☆

रोज सकाळी हवा उतारा उठल्या नंतर

इलाज नाही दारुत पुरता फसल्या नंतर

 

नशा शोधली अशी कशी ही अरे माणसा

तरंगताना दिसतो दारुत बुडल्या नंतर

 

अपशब्दांची उधळण होते तोंडामधुनी

असेच घडते त्यांच्या सोबत बसल्या नंतर

 

बैठक आता कशी थांबवू तुम्हीच सांगा

ग्लास दारुचा ओठांना ह्या भिडल्या नंतर

 

हातामधला ग्लास डोलतो चढते त्याला

मी तर मानव डोलणार ना चढल्या नंतर

 

दया करावी धर्म सांगती सारे येथे

पामरास या उचलुन घ्यावे पडल्या नंतर

 

देशाची ह्या अर्थव्यवस्था माझ्यावरती

देश चालणे कठीणच दारु सुटल्या नंतर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाया प्रपंचाचा…. ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ पाया प्रपंचाचा…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

गणिते मांडावीत

आठवे सांडावीत

मनात कोंडावीत

दुःख-कष्टाची सूत्रे.

 

पायरी सोडवता

ऊत्तरे घडवता

बेरीज-गुणाकार

प्रायश्चीते चुकांचे.

 

भुमिती कोन-बाजूंची

कसोटी संघर्षांची

प्रमेये संयमात

जीवन सिध्दातांचे.

 

आयुष्याचे ग्रंथ

हाताळता संभाव्ये

भावनांचे अवयव

वर्ग-घातांकावे क्षण.

 

त्रिकोणाचा छेद

हृदय संवेदना

प्रेमळ वर्तुळात

पाया प्रपंचाचा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 18 ☆ अभंग—शब्दगंगा… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 18 ☆ 

☆ अभंग—शब्दगंगा… ☆

शब्दांचा प्रवाह,

वाहता असावा

मनात नसावा, न्यूनगंड…०१

 

शब्द गंगा सदा

वैचारिक ठेवा

अनमोल हवा, संदेश तो…०२

 

निर्मळ, सोज्वळ

असावे प्रेमळ

साधावे सकळ, योग्यकर्म…०३

 

शब्द ज्ञान देती

शब्द भूल देती

शब्द त्रास देती, नकळत…०४

 

म्हणुनी सांगणे

सहज बोलणे

शब्दांत असणे, प्रेमळता…०५

 

कवी राज म्हणे

अलिप्त असावे

सचेत रहावे, सदोदित…०६

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देव ☆ कवी आनंदहरी

☆ कवितेचा उत्सव ☆ देव ☆ कवी आनंदहरी ☆ 

मूर्ती नाही घरी माझ्या

अंतरात देव

नाही कपाळी हो टिळा

मनात या भाव

 

माणसाच्या कर्मातील

देव मी पहातो

हात नाही जोडत मी

हात हाती देतो

 

जात नाही देवालयी

विश्व देवघर

माणसाच्या मनातील

माणूस जागर

 

दीन-दुबळ्यांच्यासाठी

जीव जो झटतो

सवे त्याच्या चालताना

देवचि भेटतो

 

© कवी आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तन भिजलेले ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ तन भिजलेले ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

तन चिंब भिजलेले

मन धुंद मोहरलेले

 

पावसाच्या ओढीने

बेधुंद थरथरले !

 

ओल्या स्पर्शाने थरथरली काया

लाजून गाल आरक्त झाले

 

ओठही विलग झाले

बोलण्या तुझ्यासवे आतुरले

 

तनुस होता स्पर्श

झंकारले तप्त सूर

 

प्रेमाच्या त्या स्पर्शाने

लाजून चूर झाले

 

गंधाने तुझिया मी खुलले

रोमांच अंगी उभे राहिले

 

नजरेतले तुझे इशारे कळले

मी ही मग स्वतःस विसरले

 

श्वास दोघांचे एकमेकांत मिसळले

घेता मिठीत मनोमिलन झाले…!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print