सुजित शिवाजी कदम
(सुजित शिवाजी कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक अतिसुन्दर भावप्रवण कविता “घुसमट*….”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )
☆ सुजित साहित्य – घुसमट….☆
दिवसभर टपरीवर
काम करून घरी गेल्यावर
पोराला कुशीत घ्यायचं असुनही…
कुशीत घेता येत नाही
कारण…
कपड्यांना येणाऱ्या तंबाखूच्या वासानं
पोरगं क्षणभरही
माझ्या कुशीत थांबत नाही
तेव्हा वाटतं..
खरडून काढावा हा तंबाखूचा वास
अगदी शरीराच्या कातड्यासकट
जोपर्यंत दिवसभर पानाला कात लावून
रंगलेले हात..
रक्ताने लाल होत नाही तोपर्यंत
कारण..
दिवसभर ज्याच्या साठी मी
जीवाच रान करून झटत असतो
तेच पोरग जेव्हा माझ्याकडे पाठ करून
आईच्या कुशीत शिरत
तेव्हा काळजातल्या वेदनांना अंतच
उरत नाही…
आणि काही केल्या
अंगाला येणारा तंबाखूचा वास काही जात नाही
तेव्हा कुठेतरी आपण करत
असलेल्या कामाचं वाईट वाटतं
वाटतं…!
सोडून द्यावं सारं काही
आणि
लेकराला बरं वाटेल
अंस एखादं काम बघावं
मग कळतं की
आपण करत असलेल हे
काम त्याच्या साठीच आहे
समज आल्यावर,
त्याला आपसूक सारं कळेल
आणि…
बापाच्या कुशीतला तंबाखूचा
वासही मग त्याला
अत्तरा सारखा वाटेल
शेवटी फक्त एवढच वाटतं
आपण करत असलेल काम
आपल्या पोरांन करू नये
त्याच्या लेकरांन तरी त्याच्याकडे
पाठ करून
आईच्या कुशीत झोपु नये…
© सुजित शिवाजी कदम
पुणे, महाराष्ट्र
मो. 7276282626