श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “गुलामगिरी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 56 ☆
☆ गुलामगिरी ☆
वस्तीच्या ठिकाणी पोट भरत नाही म्हटल्यावर
पंखातील बळ एकवटून
लांबवर अन्न पाण्यासाठी भटकण्याची आम्हा पाखरांची सवयं
स्वतःच पोटभरून
पिल्लांसाठीचा चारा देखील हाती लागतो.
फक्त उडण्याची जिद्द हवी.
ज्यानं चोच दिली तो चारा देणारच
हा विश्वास हवा.
असेच एके दिवशी उडत असतांना
जवळच उष्टावलेल्या पत्रावळ्या, नजरेस पडल्या
उष्ट्या पत्रावळ्यांवर ताव मारून
तृप्त मनाने, लवकरच रानात पोहोचलो त्या दिवसापासून आमचे कष्ट संपले…
गाव सधन होतं
रोजच कुठे ना कुठे
भोजनाचे सोहळे होत होते
आम्ही उष्ट्या पत्रावळ्यांवर ताव मारत होतो
जीवन खूप मजेत चाललं होतं…
पण एकेवर्षी दुष्काळ पडला
अन्ना पाण्यासाठी लोक
गाव सोडून जाऊ लागले
आता आमचीही उपासमार सुरू झाली
आता पहिल्या सारखी दूरवर उडण्याची ताकद
पंखांत राहिली नव्हती
उष्ट्या पत्रावळीसाठी स्विकारलेली गुलामगिरी
आता जीवघेणी ठरत होती
आळसावलेले पंख
आकाश तोलू शकतील का ?
या शंकेनेच जीव फडफडत होता
जिद्द सोडून चालणार नाही
मेहनती पंखांत पुन्हा विश्वासाचं वारं भरावं लागेल…
आणि आकाशात उडावंच लागेल…!
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८