मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #31 – शालीन वारा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  भावप्रवण कविता  “शालीन वारा”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 31☆

 

☆ शालीन वारा ☆

 

दुःख माझे काल आलो सोडुनी होतो वनी

ते पुन्हा श्वानाप्रमाणे काढते मज शोधुनी

 

राहिला शालीन वारा आज कोठे सांग ना

गंध आणिक श्वास नेला आज त्याने चोरुनी

 

हिरवळीवर चालताना चाल थोडी हुरळली

अन् तिच्याशी प्रीत जडता पाय गेले गोठुनी

 

एवढी का थंड आहे सहज होतो बोललो

तापली सूर्याप्रमाणे चूक केली बोलुनी

 

जन्म हा काट्यात जातो ह्या गुलाबाचा तरी

हास्य ओठावर सदोदित सांग येते कोठुनी

 

पान कोरे हे बदामी उडत आले अंगणी

मीच त्यावर नाव माझे घेतले मग कोरुनी

 

कागदावर वचन होते अक्षरांना भान ना

काय पत्राचे करू त्या टाकले मी फाडुनी

 

लाकडांचे देह जळती या इथे सरणावरी

हुंदकाही येत नाही का कुणाचा दाटुनी ?

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 30 – बालगीत – लाडू ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है अतिसुन्दर बालगीत “लाडू” । )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 30 ☆ 

 ☆ बालगीत – लाडू

 

दिवाळी सण खुलले मन

घरदार सजेल पंगतीने ।

फराळ भारी  पाहुणे दारी

लाडूंच्या पराती चळतीने।।धृ।।

 

लाडू करंजी चकली चिवडा

खुशाल खाऊ या गमतीने।

दिवाळीची ही लज्जत वाढेल

तऱ्हेतऱ्हेच्या लाडूने।१।।

 

बुंदीच्या लाडूची मजाच न्यारी

दाण्या दाण्याची लज्जत भारी।

केशर काडी नि वेलची थोडी।

किसमीस चाखूया गमतीने।।2।।

 

बेसन बर्फीला वर्खाची रंगत।

जोडीला काजू बदाम संगत।

खोबरे किस अन् चारोळी तीस।

मिटक्या मांरूया संगतीने।।३।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मराठी कविता ☆ हायकू ☆ उद्याने ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

☆ सुश्री स्वप्ना अमृतकर ☆ 
(सुप्रसिद्ध युवा कवियित्रि सुश्री स्वप्ना अमृतकर जी का अपना काव्य संसार है । आपकी कई कवितायें विभिन्न मंचों पर पुरस्कृत हो चुकी हैं।  आप कविता की विभिन्न विधाओं में  दक्ष हैं और साथ ही हायकू शैली की सशक्त हस्ताक्षर हैं। आज प्रस्तुत है सुश्री स्वप्ना जी की  हायकू शैली में कविता “”उद्याने”(७ रचना)”। )

 

☆ “उद्याने”(७ रचना) ☆ 

(हायकू शैली)

 

छान उद्याने
गाव असो शहर
वाटे सुंदर           १,

असंख्य फुले
उद्यानातला गंध
करी बेदुंध           २,

फुलपाखरें
हो फुला फुलांवर
रंगीत तारें           ३,

अफाट माया
अनाथांना लाभते
झाडांची छाया         ४,

निवांतक्षणीं
गुजगोष्टी करती
वृध्दांची वस्ती         ५,

आपसूकच
दिसे पिकली पानें
कोवळी मनें           ६,

उद्यानांतच
काव्यांनंदचा स्पर्श
सुखद हर्ष           ७.

 

© स्वप्ना अमृतकर , पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ सावित्रीमाई फुलेंच्या 189 व्या जयंती निमित्त ☆ क्रांती….!!! ☆ – श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे

श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे

 

(आज प्रस्तुत है श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे जी की  नारी सशक्तिकरण एवं नारी शिक्षा के क्षेत्र में क्रान्ति की ज्योति जगाने वाली  स्व सावित्रीबाई फुले जी की  3 जनवरी को  उनकी 189 वी जयंती पर उन्हें सादर नमन करते हुए यह  एक भावप्रवण कविता “☆ क्रांती….!!! ”।)

 

☆ क्रांती….!!! ☆ 

(सावित्रीमाई फुलेंच्या 189 व्या जयंती निमित्त  शिक्षणाच्या क्रांतिज्योतींना विनम्र अभिवादन…. )

 

हे सावित्रीच्या सावित्री

माझी झलकारी,काशी,आनंदीबाई

आम्ही किती केला गाजावाजा

तुझ्या त्या समर्पणाचा….

विद्रोहाने पेटून उठाणाऱ्या

तुझ्या त्याच स्त्रीवादाचा…!

याचं स्त्रीवादाच्या नावाखाली

तुझचं शस्त्र आणि सांत्वन करून

तुलाच पुन्हा नव्याने आज

बेड्या घातल्यात

…त्या मानसिक गुलामीच्या..!!

लग्न,संसार,प्रेम आणि

एकनिष्ठतेच्या रांडाव मर्माखाली

तूचं तुला खरं तर

घेराव घातलायसं,

….सत्ताकतेच्या उंबऱ्याआड़..!!!

शिक्षणाच्या शस्त्रामुळं

तू आता मात्र

झगड़ा करतीयेस

सर्व काही झुगारून

…बेमुदत मुक्त जगण्यासाठी..!!

“अगं ,

तू-

ओरड़तेस..

रडतेस..

झगड़तेस..

लढतेस..नव्हे नव्हे तर

फटकारतेस सुद्धा…

कारण,

तुला तुझं “माणुसपणं” हवं आहे..!!”

पण माफ कर आम्हाला

आम्ही याचचं बाजारीकरण केल गं

आणि तुझं बाईपणं माननं

अजुन सोडलचं नाही..!!

आता मात्र पुन्हा

तुलाच लढावं लागेल

साऊ बरोबर ज्योतीही व्हावं लागेल

तुझच बाईपणं तुलाच सोडाव लागेल

तेव्हाच स्त्रीवादाची क्रांती होईल…

-ती फ़क्त माणुसपणासाठी…!!!

 

©  कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे

मु/पो-वेळू (पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511

मोबाइल-7743884307  ईमेल – [email protected]

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ नव वर्ष ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की नव वर्ष पर एक कविता  “ नव वर्ष ”।)

 

☆ नववर्ष ☆

 

धुंद अशा वाऱ्याच्या झुंडीच्या झुंडी

निघाल्यात नववर्षाचं स्वागत करायला

हातात सुरई घेऊन…

 

वाऱ्याचा तोल सुटलाय सर्वत्र दर्प पसरलाय

रस्त्यात मद्याचा वास हुंगणारी काही यंत्र थांबलीत

शिकारी चित्त्यासारखी…

 

डांबराच्या नद्यांवरून वाहणाऱ्या गाड्या

आणि त्यात वळवळणारे काही मासे

लागताहेत गळाला…

 

रात्री बारानंतर फोनचा त्रास नको म्हणून मोबाईल बंद करून झोपलेय मी

पण पहाटे उठून पहातो तर काय

व्हाॕटस्अॕप व फेसबुकवर शुभेच्छांचा

मुसळधार पाऊस होऊन गेलेला…

 

थोड्याच वेळात सूर्यानं उत्साहत

माझ्या शहरात आगमन केलं

मी थोडं वेगळ्या नजरेनं त्याच्याकडे पहात होतो

तो मात्र नेहमी सारखा

नववर्षाचे कुठलेही भाव

त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसले नाहीत

 

तो मला जवळच्या मित्रासारखा वाटला

उत्तररात्रीपर्यंत चाललेल्या पार्ट्यांचा

आमच्या दोघांवरही काहीच परिणाम झाला नव्हता…

 

मध्य रात्रीच्या गडद अंधारापेक्षा

सूर्याच्या स्वच्छ प्रकाशात,

सूर्याच्या साक्षिणे

मी माझ्या परिवाराकडून,

आपल्या परिवारास,

२०२० ह्या नववर्षासाठी

मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो…!

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 28 – उत्तर..! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर कविता उत्तर..!)

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #28☆ 

☆  उत्तर..! ☆ 

 

परवा बाप झालो

खूप आनंद झाला आणि

खूप तांराबळ ही उडाली

काय करायच काहीच कळत नव्हतं

तेव्हा आईची आठवण आली

मी म्हटलं तिला..,

अत्ता आई हवी होती..

ती एकटक माझ्याकडे

पहात राहिली..आणि

काहीशा

तुसड्या शब्दांतच तिनं

मला उत्तर दिलं…

घेऊन या तिला वृध्दाश्रमातून

माझी आई येई पर्यंत..

 

© सुजित कदम, पुणे

7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 30 – जन्म सोहळा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी अतिसुन्दर कविता  “जन्म सोहळा.  आखिर नव वर्ष का शुभारम्भ किसी जन्म उत्सव से कम तो नहीं है न ? 

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 30 ☆

☆ जन्म सोहळा ☆ 

 

वृत्त-आनंद कंद

गागाल गालगागा  गागाल गालगागा

 

आहेत चांदण्याचे माझ्या घरी पसारे

मोहात पाडती ते  शब्दातले इशारे

 

मी रंगले कधीची स्वप्नामधेच माझ्या

सा-या खुणा सुखाच्या आहेत नित्य ताज्या

 

मी वेगळीच आहे, जेव्हा मला कळाले

तेव्हाच दुःख माझे एका क्षणी जळाले

 

मी कोणत्या कुळाची,आले कुठून येथे

माझे मला कळेना ही वाट कोणती ते

 

मी मंत्रमुग्ध झाले पाहून त्या सुखाला

हातात येत गेले आकाश, मेघमाला

 

वर्षाव कौतुकाचा मी ओंजळीत घेता

आजन्म तृप्त झाले या सोहळ्यात आता

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #30 – चेहऱ्यावर चेहरे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  भावप्रवण कविता  “चेहऱ्यावर चेहरे”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 30☆

 

☆ चेहऱ्यावर चेहरे ☆

 

आसवांना अंतरी दडवू नको

आरश्याला तू असे फसवू नको

 

मखमली हा चेहरा नाराज का ?

चेहऱ्यावर चेहरे चढवू नको

 

सूर्य पाठीशी उभा असता तुझ्या

भर दुपारी काजवे जमवू नको

 

नेत्रपल्लव त्यात मजला झाक तू

तेथुनी मजला पुन्हा हलवू नको

 

जन्मठेपेची सजा तू दे मला

अन् जगापासून हे लपवू नको

 

सूर अपुले पाहुनी घेऊ जरा

मैफिलीचे काय ते ठरवू नको

 

बेत ठरला जर नकाराचा तुझा

ठेव हृदयी तो मला कळवू नको

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 29 – विद्याधन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है अतिसुन्दर  शिक्षाप्रद कविता   “विद्याधन ” । )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 29 ☆ 

 ☆विद्याधन

 

जगी तरण्या साधन

असे एक विद्याधन।

कण कण जमवू या

अहंकार विसरून ।

 

सारे सोडून विकार

करू गुरूचा आदर।

सान थोर चराचर।

रूपं गुरूचे सादर ।

 

चिकाटीने धावे गाडी

आळसाची कुरघोडी।

जरी जिभेवर गोडी।

बरी नसे मनी अढी।

 

घरू ज्ञानीयांचा संग

सारे होऊन निःसंग।

दंग चिंतन मननी

भरू जीवनात रंग ।

 

ग्रंथ भांडार आपार

लुटू ज्ञानाचे कोठार।

चर्चा संवाद घडता

येई विचारांना धार।

 

वृद्धी होईल वाटता

अशी ज्ञानाची शिदोरी।

नका लपवू हो  विद्या

वृत्ती असे ही अघोरी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – समाजपारावरून साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प तेवीस # 23 ☆ कँलेंडर ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।  इस साप्ताहिक स्तम्भ के माध्यम से वे किसी न किसी सामाजिक  अव्यवस्था के बारे में चर्चा करते हैं एवं हमें उसके निदान के लिए भी प्रेरित करते हैं।  आज प्रस्तुत है श्री विजय जी की एक सामयिक कविता  “कँलेंडर ”।  आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  )

☆ साप्ताहिक स्तंभ –समाज पारावरून – पुष्प तेवीस # 23 ☆

☆ कँलेंडर ☆

 

डिसेंबर संपता संपता ….

आयुष्याच कोरं पान……..

उगीच भरल्या सारखं वाटतं,

शिशिराच्या पानगळीत सुद्धा

वसंत वैभवात मन रमतं…….!

 

किती सहज  उलटतो पाने ……

संकल्पाने सालंकृत…

कार्येप्रवणतेने आलंकृत…

एक एक स्मृती  सजवतो…

हृदयाच्या कोंदणात . . . . !

 

मागील पानांवर,

पुन्हा पुन्हा जाते नजर..

आठवणींची हळवी जर,

तिलाच असते कदर कृतीशील स्मरण नोंदी,

झळकतात पानावर

शब्दांचा  पारा, कधी गडद ,कधी धूसर

नजर वर्तमानात पण मन मात्र गतकाळावर.  . . . !

 

काही चौकटी  उगाच  ठसतात मनात

अन ताज्या होतात विस्मृती…….

आकडेवारी बदलत नाही . . .

बदलतात संदर्भ कागद, शाई अन पानांचे . .

मानवी  नात्यांचे नात्यातील रंगाचे  . . . !

 

सुख-दुःखाच्या चौकटी ………

आनंदाश्रूंच्या स्नेहधारा……..

मान-अपमानाचा वर्षाव……….

विश्वास- बेईमानीचा संघर्ष ………

विसरता येत नाही. . . . !

 

खऱ्या-खोट्याचे ठोकताळे ……….

हव्या-नकोशा आठवणी …

प्रेम-प्रितीच्या वंचना . .  वल्गना  …

आपल्या माणसांचे वाढदिवस ……..

गावातल्या जत्रा,  उरूस,  मेळे

विसरता येत नाही. . . . . !

 

ऊन-सावलीच्या चौकटी ……..

जगवतात जीवन तरू…………

याच कॅलेंडरच्या जीर्ण पानात

सुई, दोरा टोचलेल्या  आठवात

दिवस रात्रीच्या ऋतूचक्रात .. . !

 

कुणीतरी येत, कुणीतरी जातं

स्वभाव तोच आठवण बदलते

आकडे तेच तिथी वार बदलेला

आठवणींचा ओला श्वास

पानापानावर थांबलेला.. !

 

शब्दाचं कुटुंब कागदावर सजलेलं

आठवणींच गोकुळ मनामध्ये नटलेलं

भूत, भविष्य, वर्तमान, पानामध्ये सामावलेलं

नवीन वर्ष,  नवीन कॅलेंडर,  प्रतिक्षेत थांबलेलं

निरोप आणि स्वागताला सदानकदा  आसुसलेलं.. !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares
image_print