मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टपोरी व्हायाचं… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ टपोरी व्हायाचं… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं

चार – पाच टपोर्‍या पोरी घेऊन झुंडीनं र्‍हायाचं ॥

*

सगळीकडे महिलांसाठी आहेच ना आरक्षण

तरी पण त्यांना सांग कुठे असते गं संरक्षण

आता तुझ्यावर अन्याय करणार्‍याला उभं तू जाळायचं

शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥

*

रहा तू बिनधास्त जगात हातात अस्त्र बाळगून

महिषासूर मर्दिनी, काली पहा जरा निरखून

शिरजोर होऊ लागताचं कोणी त्याला आडवं चिरायचं 

शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥

*

अन्याय करणार्‍यांना कठोर शासन होत नाही

न्यायदेवता आहे आंधळी – पांगळी

तू का नाही याचा फायदा घेत?

काढ राक्षसांच्या कोथळी

काळकोठडीत गेलीस तरी अब्रूनच रहायचं

शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥

*

एक एका राक्षसाला तूच आता गाठ

झुंडीनं हल्ला चढव दाखव स्मशान घाट

कालिकेचं रूप तुझं नराधमांना दावायचं

शालीन कुलीन सोड पोरी, आता तू ही टपोरी व्हायाचं ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेंगदाणा विडंबन… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ शेंगदाणा विडंबन… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

भाजून सोलणे अन्

निवडून ते पहाणे

मी ओळखून आहे

कुठल्या डब्यात दाणे ॥धृ॥

 

जाता घरातूनी तू

घेईन एक वाटी

खाईन मस्त दाणे

येईल मौज मोठी

हे स्वप्न जीवघेणे

भरतो सुखे बकाणे ॥१॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

 

हाती डबा जयाच्या

त्याला कसे कळावे

पोटात भूक ज्याच्या

त्यालाच दु:ख ठावे

लपवून लाख ठेवा

शोधू आम्ही दिवाणे ॥२॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

 

पोटास वेदनांचा

का सांग त्रास व्हावा ?

इतका चविष्ट खाऊ

का औषधी नसावा ?

येवो कळा कितीही

सोडू आम्ही न खाणे ॥३॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

कवी : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाते… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नाते ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

रीत माणसांची न्यारी

म्हणे पाऊस लहरी

छळवाद करण्याची

त्याची चाले कामगिरी

*

वाट पाहून थकती

तेव्हा शिव्याशाप देती

तोच जोरात येताना

लोकं जीवाला जपती

*

होतो पाऊस खजील

थांबवितो हालचाल

कोण घेत नाही कधी

त्यांच्या मनाची चाहूल

*

कुठे तोडून चालते

जगी जोडलेले नाते

पण लोकांचे बोलणे

दोन्ही बाजूंनी चालते

*

जग सारे पोसायस

आहे बांधील पाऊस

तोच भारावून म्हणे

जरा जोमाने बरस

*

करी धरणी स्वागत

पावसाला वाटे खंत

हात सोडता आभाळ

पाणी दाटते डोळ्यात

*

कवी मन भारावते

त्यांचे काळीज जाणते

पावसाचे किती होते

आभाळाशी दृढ नाते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ यशाची हंडी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

यशाची हंडी !  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

उंच बांधा हंडी ध्येयाची 

रचा मनोरा मेहनतीचा,

हंडी लागता मग हाती 

स्वाद घ्या गोड काल्याचा !

*

जरी कोसळला मनोरा 

हंडी फोडतांना यशाची,

नव्या दमाने पुन्हा उभारा 

रचना तुम्ही मनोऱ्याची !

*

होता पार मार्गातील

सारे अडचणीचे थर,

कर पोचता हंडीपर्यंत 

फुलेलं अभिमानाने ऊर !

*

हाती येता हंडीचे श्रीफळ 

फोडा मटकी तुम्ही यशाची,

लुटाल मजा आयुष्यभर

तुम्ही कृष्ण जन्माष्टमीची !

तुम्ही कृष्ण जन्माष्टमीची !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विडंबन गीत – मळ्यातली भाजी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ विडंबन गीत – मळ्यातली भाजी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

(चाल–एका तळ्यात होती बदके पिले सुरेख )

एका मळ्यात होती भाजी सुरेख ताजी,

मन मोहवून गेले पाहूनी रान सारे…

*

झाडावर वांगी डुलती, कोवळी सुरेख ताजी,

भेंडी, गवार, मिरची वाऱ्यासवे हलती

चुटूक लाल गाजर

भूमीत लपती मुळे

 मन मोहवून गेले, पाहूनी रान सारे…

*

द्राक्षाचे हलती घोस, आंब्याचा फुले मोहर

केळीची फुलली बाग, ऊसाचा वाढे फड

पाण्याचे पाट वाही भिजवून शेत गेले

मन मोहवून गेले पाहुनी रान सारे…

*

खुडली सुरेख मेथी, चवदार काकडी ती

ज्वारीची केली भाकर, वांग्याची भरली भाजी

ठेच्यासवे दही विरजले, जेवावयास यावे

 मन मोहवून गेले, पाहुनी रान सारे…

*

भरभरुनी दान मिळते, निसर्गाची हीच किमया

घेऊ किती कळेना, भूमीतला खजिना

ही जाण ठेवा सारे, रक्षण करु निसर्गाचे

 मन मोहवून गेले, पाहुनी रान सारे…

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।

एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १ ॥

कथित श्रीभगवान 

देहासी या कौन्तेया क्षेत्र नाम जाण

क्षेत्राचे ज्या ज्ञान त्यासी म्हणती क्षेत्रज्ञ ॥१॥

*

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।

क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ २ ॥

*

समस्त क्षेत्रांमध्ये भारता मीच जाण क्षेत्रज्ञ

ऋतज्ञान जे जाण देते क्षेत्र तथा क्षेत्रज्ञ ॥२॥ 

*

तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्र्च यत् ।

स च यो यत्प्रभावश्र्च तत्समासेन मे शृणु ॥ ३ ॥

*

ऐक अर्जुना तुला सांगतो क्षेत्र प्रकार विकार कार्य

क्षेत्रज्ञ कोण प्रभाव त्याचा काय तयाचे कार्य ॥३॥

*

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।

ब्रह्मसूत्रपदैश्र्चैव हेतुमद्भिर्विनिश्र्चितैः ॥ ४ ॥

*

बहुत ऋषींनी बहुछंदांतुन पदांतुनी गाईले

कार्यकारणरूप तयांचे ब्रह्मसूत्रे दाविले ॥४॥

*

महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५ ॥

*

इच्छा द्वेषः सुखंदुःखं संघातश्र्चेतना धृतिः ।

एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६ ॥

*

महाभूते अहंकार मति यांनी झाले साकार

दशैकिंद्रिये पञ्चेंद्रियासी पञ्चविषय गोचर

द्वेष कामना सुखदुःख चेतना इंद्रिय संतुलन धैर्य 

उपांग तयांचे विकार समस्त एकत्रित ते क्षेत्र ॥५, ६॥

*

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।

आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७ ॥

*

इंद्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।

जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८ ॥

*

असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।

नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९ ॥

*

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।

विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥

*

अभिमान विरहित स्पर्श ना दंभाचा

क्षमाशीलता अहिंसा सरळ स्वभावाचा

गुरुसेवा अनुष्ठान निग्रह मनाचा

स्थैर्य शुचिर्भूतता विरक्त इंद्रियांचा

अहंकारहीन लीन अनासक्त मनाचा

विरक्त जीवन न गुंता संसारमोहाचा

दोष जननमरणाचा व्याधीचा वार्धक्याचा

इष्टानिष्ट प्राप्ती समता चित्ताची 

अढळ भक्ती अनन्यभावाची

जीवनी आचरण एकान्तवासाचे ॥७-१०॥ 

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नातवंड म्हणजे नक्की काय असतं?… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

नातवंड म्हणजे नक्की काय असतं? – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

नातवंड म्हणजे नक्की काय असते?

 

आजी-आबा म्हणून सारखे येऊन बिलगते तेव्हा परत एकदा आई-बाप झाल्याचा feel जे देते

ते असते नातवंड!

 

Grandparents Day ला ज्याच्यामुळे परत एकदा शाळेत प्रवेश मिळतो,

“Celebrity” म्हणून मिरवायला मिळते

ते असते नातवंड!

 

कितीही वेळा एकच गोष्ट त्याने दाखवली,

तरी दरवेळेस ज्याचे अप्रूप वाटते

ते असते नातवंड!

 

धकाधकीच्या आयुष्यात आपल्या मुलांसोबत

वेळ घालवता आला नाही

ही खंत पुसून टाकणारे एक Eraser,

ते असते नातवंड!

 

“नको ग ओरडू त्याला तो लहान आहे”

असे ज्याच्यासाठी कायमच म्हटले जाते

ते असते नातवंड!

 

गर्दीतून सुद्धा ज्याचे डोळे आपल्याला शोधतायत

हे मनाला सुखावून जे देते

ते असते नातवंड!

 

Lockdown मध्ये सुद्धा २४/७ busy ठेवणारे entertainment channel

ते असते नातवंड!

 

दमलो रे, थकलो रे असे जराही वाटून देत नाही,

Diabetes मध्ये सुद्धा चालणारे गोड गोड tonic

ते असते नातवंड!

 

आपल्याच बालपणाचे प्रतिबिंब जे दाखवते

ते असते नातवंड!

 

बस! देवा, “आता काहीच नको आयुष्यात, फक्त “तुझे” गोड गोड हसू आणि पापा हवा”!असे ज्याच्यासाठी वाटते

ते असते नातवंड!

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृष्ण आहे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी  ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

अल्प परिचय : 

मराठीत वाङ्मय पारंगत आहे.

काही काळ कारंजा व अकोला येथे वरिष्ठ महाविद्यालयात कंत्राटी प्राध्यापिका म्हणून कार्यरत.

? कवितेचा उत्सव ?

☆ कृष्ण आहे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(वृत्त: आनंदकंद) 

स्वप्नात भासले मज दारात कृष्ण आहे

मी जागता कळाले विश्वात कृष्ण आहे

*

राधा सखी कितीदा मुरलीधरास शोधे

जाणीव होत गेली हृदयात कृष्ण आहे

*

वाटेत चालताना वाटाच बंद झाल्या

दिसतील मार्ग नक्की स्मरणात कृष्ण आहे

*

कृष्णास शोधते पण दगडात देव नाही 

साधेच नाम घेता ओठात कृष्ण आहे

*

युद्धास तोंड देते पळण्यात शौर्य नाही

साथीस आज माझ्या समरात कृष्ण आहे 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ती सध्या काय करते?” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “ती सध्या काय करते?” ☆ श्री आशिष मुळे ☆

ऐक पोरा बोल अनुभवाचे

ऐकायला काहीच खर्च नाही

‘ ती सध्या काय करते ‘

याला काही अर्थ नाही 

*

चिडू नकोस रडू नकोस

त्याचे तिला काहीच नाही

परी हृदयावर हसऱ्या

तिची तलवार…. चालत नाही

*

खरंच होते का नव्हते

याने शिलकीत भर नाही

काय होते किती होते

हिशोबात या…. ‘अर्थ‘ नाही

*

तिच्यासाठी झुरण्यापेक्षा

मर्द बनण्यात नुकसान नाही

असेल गरज तर येईलही

नाही आली तरी….. हरकत नाही

*

हो अभेद्य उत्तुंग इतका

चोर वाटांची गरज नाही

उधळू दे अश्व आत्मज्ञानाचा

अश्वमेधाला…. मुहूर्त नाही

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समंजसतेने… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ समंजसतेने… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

किती जागवाव्या रात्री

 टक्क पापण्यांनी….

 किती होरपळावे या

 चंद्र चांदण्यांनी…

*

किती ग्रीष्म शिशिरांना

 सोसावे निमूट…

 किती समंजसतेने

 वागायचे नीट…

*

किती कश्या कश्याचे रे

 पेलायचे भार…

 शांततेने वादळे नी

 सहायचे पूर…

*

किती वाहू द्यावे पाणी 

 ओंजळीमधून…

 किती जगायचे, दार

 मनाचे झाकून…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares