मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ व्यथा… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ व्यथा… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(वृत्त- दिंडी)

काय झाली हो चूक उभयतांची

एक पुत्रासी दूर धाडण्याची

स्वप्न एकच ते मनी जपुन होतो

प्राप्त करुनी यश पूत गृही येतो॥१॥

*

लेक भारी हो गुणी आणि ज्ञानी

अती लोभस अन् गोड मधुर वाणी

मान राखी तो वडील माणसांचा

गर्व नच त्यासी कधीही कशाचा॥२॥

*

काय जादू हो असे त्याच देशी

विसर पडतो का त्यास मायदेशी

परत येण्याचे नाव घेत नाही

जवळ वाटे का तोच गाव त्याही॥३॥

*

वदे आम्हासी का न तिथे जावे

“सर्व त्यजुनी का कसे सांग यावे

याच मातीतच सरले आयुष्य

याच भूमीतच उर्वरित भविष्य”॥४॥

*

नसे आम्हा तर अपेक्षा कशाची

पडो कानांवर खबर तव सुखाची

वृद्ध आम्ही रे आश्रमात जावे

एकमेकासह सुखाने रहावे॥५॥

*

 दुःख होते रे फार तुझ्यासाठी 

कुठे आहे ती आमुचीच काठी

कथा आहे ही बहुतशादिकांची

हरवलेल्या त्या जेष्ठ बांधवांची॥६॥

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला श्रावण पाहुणा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ आला श्रावण पाहुणा…  सुश्री नीलांबरी शिर्के 

सारीकडे पावसाचा 

सुरू आहेच धिंगाणा

त्यात आवडता मास

आला श्रावण पाहुणा

*

 पाणलोट वाढलेला

तो गिळे कितीकाला

 जीव देणारा पाऊस

 झाला जीव भ्यायलेला

*

 काही समजेना मना

पंचमहाभुताचा खेळ

 कसा काय जगण्याचा

सांगा लावायचा मेळ

*

 गुरे गोठ्यात बांधून

 पाण्याखालती वैरण

 गायीचे निरागस डोळे 

 तीची रिकामी गव्हाण

*

 पाणी वाढता चौफेर

 पंप गेले पाण्याखाली

 विजेचाही चाले खेळ

 आत्ता होती आत्ता गेली

*

 सारीकडे चिकचिक

 वाढे साम्राज्य डासांचे

 रोगराई वाढविण्या हे

 कारण असे महत्वाचे

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

प्रा. भारती जोगी

 काव्यानंद

☆  शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची! 

या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…

नाट्यपद…

शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या। 

शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |

*

तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |

सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी। 

*

हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |

क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |

हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव! 

त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”

मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!! 

 सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद! 

सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…

‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘

… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!

पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…

‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!

सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘

… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!! 

प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.

 गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.

शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा ! 

सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…

हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी

क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!! 

… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘ 

विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘ 

हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा ! 

या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधाकृष्ण… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ राधा कृष्ण ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(पंचाक्षरी)

 कृष्ण सावळी,

 राधा बावरी !

 खेळत होती,

 यमुना तीरी !

*

 कदंब वृक्षी,

 फांदी वरती!

 कृष्णसख्याची,

 वाजे बासरी!

*

 मुग्ध होऊनी,

 मनी तोषूनी!

 राधा गुंगुनी,

 गेली मन्मनी!

*

 घर विसरे,

 मन विसरे !

 एकरूप ते,

 चित्त साजरे!

*

 राधा कृष्णाची,

 रास रंगली!

 गोकुळात ती,

 टिपरी घुमली !

*

 सारे गोकुळ,

 गाऊ लागले!

 नाचू लागले,

 तद्रुप झाले!

*

कृष्ण किमया,

वृंदावनी त्या,

कालिंदी काठी,

अवतरली !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगणे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जगणे ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

साधे भोळे जगणे नाही

ते लाटांचा सागर आहे 

वादळवा-याची ही तेथे

कायमस्वरूपी घरघर आहे

*

संसाराचा खेळ घडीभर

आवडणारा खेळायाचा

अनुभवताना तोच खरे तर

कौशल्याचा वापर आहे

*

जगणे म्हणजे एक लढाई

आपण लढतो हारजितीची

मनमोहक पण आज तिचाही 

राखत आलो आदर आहे

*

देत बसावे आनंदाने

ज्याचा त्याला मानमरातब

संस्कारांच्या घडवणुकीने 

तो तर दिसतो जगभर आहे

*

कर्तव्याचा ओझ्याखाली

वावरताना दबतो मानव

ज्याला त्याला काम जबर पण

उरकायाचे भरभर आहे

*

तुमचे माझे हतबल जगणे

सावरताना बदलत जावे

जगता जगता तनमन मारत

घालायाचा आवर आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 186 ☆ अभंग…रक्षाबंध ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 186 ? 

☆ अभंग… रक्षा बंध ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

बहीण भावाचा, सण हा पवित्र

साजरा सर्वत्र, आज होई.!!

*

रक्षाबंध नामे, ओळखती याला

बहीण भावाला, राखी बांधे.!!

*

द्वापार युगात, श्रीकृष्ण द्रौपदी

देऊनिया नांदी, प्रत्यक्षात.!!

*

भरजरी शेला, फाडीला त्यावेळी

सुवर्ण सु-काळी, दिव्य लीळा.!!

*

कवी राज म्हणे, वस्त्र पुरविले

कर्तव्य ही केले, बंधुत्वाचे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वासुदेव… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ वासुदेव… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मोरपिसांचा शिरी मुकुट घे वासुदेव ये दारा

जीवनार्थ सांगे न्यारा ||ध्रु||

*

काळप्रवाहावारी तरंगे आयुष्याचा बुडबुडा

फेस किती जाहला तरीही क्षणभंगुर हा देई धडा ||१||

*

आयुष्याच्या बाजारातुन कृपा विकत घ्या देवाची

भावभक्ती हे मोल तयाचे ना दडवुनी ठेवायाची ||२||

*

देह लाभला आत्म्याला हा कर्म कराया उद्धारा

फलासी ना गांठी राखावे अर्पण करणे मार्ग बरा ||३||

*

आपुल्यासाठी नाही जगणे हाच जीवना अर्थ खरा

जीवन अर्पण सकलांसाठी जगण्याचा परमार्थ धरा ||४||

*

घाम गाळुनी कमविलेस ते इथेच भोगुनिया जावे

पुढे आपुला मार्ग एकला मोह सोडुनिया जावे ||५||

*

आयुष्याचा खडतर मार्ग आपुल्यासाठी जगतांना 

काय हरवले काय गवसले हिशेब याचा मांडा ना ||६||

*

कुठून आलो कुठे जायचे नाही कुणाला हे ज्ञात

प्रवास जीवनी असा करू या करून षड्रिपुंचा अंत ||७||

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

           एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कै. आचार्य अत्रे यांना काव्यांजली ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ कै. आचार्य अत्रे यांना काव्यांजली … ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

स्फंदू लागले कभिन्न काळे सह्याद्रीचे कडे

मूक जाहले कडाडणारे डफ, ढोलक, चौघडे

सीमा लढ्याचे सुरू जहाले पर्व नव्याने आता

अशा अवेळी केलीस का तू युद्धाची सांगता

*

शिवशक्तीच्या बुरुजावरची तोफच होता मूकी

हर्षौन्मादे नाचू लागतील वैरी ते घातकी

तुझ्या भयाने थरथरली ती जुल्मी सिंहासने

राष्ट्रघातकी हैवानांची डळमळली आसने

*

तुझ्या प्रयाने आज निखळला मराठभूचा कणा

आज भवानी म्यान जाहली शिवरायांची पुन्हा

अहर्निश पेटती ठेवली मराठमोळी मने

तुझ्यावाचून आता तयांची थांबतील स्पंदने

*

नाट्यदेवता विष्षण झाली जाता धन्वंतरी

हसण्याचेही विसरून जाईल विकलांगी वैखरी

टाळ्यांचे ते गजरही होतील अबोल आता खरे

चांडाळांची कोण लोंबवील वेशीवर लक्तरे

*

“सुर्यास्ता” ची शोभा स्मरते ‘सिंहगर्जना ‘ जुनी

प्रीतीसंगमी स्वैर विहरली तुझी दिव्य लेखणी

या झरणीचे झाले भाले प्रसंग बाका येता

आपत्काली तुवा राखिली मराठीय अस्मिता

*

चिरयौवन भोगिती अजून ती तव “झेंडूची फुले “

आज क-हेचे पाणी आटले शल्य अंतरी सले

जगण्यात असे तो मौज मरावे वचना तू पाळिले

विनम्र माथा नयनी पाणी काळीज आमुचे उले

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातीपण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ मातीपण… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

एकेकाळी तू मातीत राबताना,

मातीच्या कणाकणानी माखून जायचीस.

इतकी की, जणू मातीचीच व्हायचीस

अगदी न ओळखता येण्या इतकी.

इतकं सहजपणे तू मातीपण जपत होतीस.

त्या मातीचा रंग आणि गंध माखून जायचा,

तुझ्या साडीचोळीला.

अन हाताततल्या बांगड्यांचा आवाज,

भिडून जायचा रानाला.

राजा जनकला सुध्दा सीता अशीच

भेटली असेल का ?

कदाचित तुझ्यासारखीच …. मातीने माखलेली.

पण आज तू रानात राबतेस तुझं बाईपण विसरुन

घरातल्या गड्याचा जुनाट सदरा चढवून,

आणि चेहरा रूमालात लपेटून

तुझी कुणबी ओळख लपवून

*

आजकाल त्या मातीचा गंध कुठे दरवळत

नाही ग तुझ्या साडीचोळीला.

काय म्हणावं तुझ्या या तुसडेपणाला.

कुणब्याची लेक तू,

मातीत लोळत वाढलेली.

मातीनेच, अंगाखांद्यावर तुला खेळवलेली.

कदाचित त्या , मातीला पण दुःख होत असेल,

तुझ्या अशा तुटक वागण्याचं…

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मैत्रीचं झाड…” – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “मैत्रीचं झाड…” – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

मैत्रीच्या थोड्या बिया

मला एकदा मिळाल्या

जिथे जिथे राहिले मी

तिथे लावून टाकल्या…

*

जेव्हा जेव्हा जाते तिथे

वाढलेली पानं डोलतात

वाकून वाकून माझ्याशी

दोन शब्द तरी बोलतात…

*

आनंदाने सांगतात झाडं

सुखदुःखाच्या कथा

विसरुन जाते मी

माझ्या मनीच्या व्यथा…

*

रोज कोवळी पालवी

अलवार फुटत जाते

तसेच नाते या मैत्रीचे

मनामध्ये रुजत जाते…

*

प्रत्येक झाडाच्या सयी

मनात ठेवल्या साठवून

कधी एकटी असताना

सोबत होते आठवून…

*

एक झाड असेल माझं

तुमच्या शेजारी कदाचित

जमलं तर वाढवा त्याला

भेटेन मी त्यात अवचित !

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares