मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “वारी पंढरीची…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “वारी पंढरीची” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी 

आली पंढरीची वारी

 झाली आळंदीत तयारी 

निघे पालखी ज्ञानदेवांची 

भेट घेण्या विठूरायाची 

*

झाले पादुकांना स्नान 

 इंद्रायणीच्या जळात 

विठ्ठल नामघोष चाले 

अन् नाद हो टाळात  

*

पुणे मुक्कामी पालखी 

भक्त सागर हो लोटी 

झाले कीर्तन प्रवचन

 हाती प्रसादाची वाटी

*

दिवे घाटात पालखी  

मार्ग अवघड वळण

 क्षीरसागराची नदी  

झेंडे फडके हो निशाण

  *

आले सासवड सासवड  

भेटे सोपान  समाधी

झाली भेटं उराउरी

 पालखी निघाली जेजुरी  

*

वल्ले लोणंद तरटगाव

 तिथे रिंगण सोहळा 

अश्व धावती सरळ 

अन् भेटती देवाला  

*

फलटण पुढे माळशिरस

 गोलरिंगणाचा घाट

आकाशी पाहता दिसे 

ब्रह्मांड सोहळयाचा थाट

*

भजन  कीर्तना आरती 

रोजच चाले हो दिंडीन 

नाही आपपरभाव

 नाचती विसरुन देहभान  

*

आलं बघता बघता

 आली वाखरी वाखरी 

आता उठता बसता 

आलीपंढरी पंढरी 

*

दिसे कळस मंदिरी

 तिथं भेटेल श्रीहरी 

माझी  विठ्ठल रकुमाई

माझी वारी तेच्या पाई

*

नामदेवाची पायरी 

माथा टेकून वलांडिन 

 गरुड खांबाची ती मिठी

  नादब्रह्म कवटाळीन

*

दिसे विठ्ठल सावळा 

माथी चंदनाचा टिळा 

कासे पितांबर नेसला 

गळा शोभे तुळशीमाळा  

*

माय रखमाई साजरी

 वाट पाही लेकराची 

 माझा माथा  तुचे पाय 

जणू भेटली हो माय

*

बुक्क्या चुरमुऱ्याचा प्रसाद

 नेईन जाताना माघारी 

गळा घालीन तुळशीमाळ   

मुखे विठ्ठल हाती टाळ    

॥विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल   ॥

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #248 ☆ रेड अलर्ट… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 248 ?

☆ रेड अलर्ट ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

रेड अलर्ट ऐकून पाऊस पडला होता गार

ढगोबानं बंद करून घेतलं आपलं दार

*

नदी नाले बंद करून केल्यात वाटा बंद

काल माझ्यासाठी होते सारे मार्ग रुंद

अडथळ्याची शर्यत येथे मीही करतो पार

*

गुप गुमान गेलो असतो गटारीच्या खालून

गटारही साफ केली नाही तुम्ही खोलून

कुरण भ्रष्टाचाराचं माजलंय येथे फार

*

सिमेंटमुळं घेत नाही धरती मला कुशीत

बागडू शकत नाही आता मीही येथे खुशीत

स्वप्ने स्वार्थी तुमची सारी होऊ देत साकार

*

इतके कसे झाला तुम्ही सांगा रे बेबंद

घरात तुमच्या घुसण्यामध्ये नाही रे आनंद

चुका तुमच्याकडून कशा होतात वारंवार

*

माझ्यामुळे शेतामध्ये येते आबादानी

खूश होऊन शेतकरी गातो छान गाणी

मी तुमच्या सोबत असतो केवळ महिने चार

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नेमेचि येतो असा पावसाळा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – नेमेचि येतो असा पावसाळा – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

पडला पाऊस  | तुंबली मुंबई |

पोल खोल होई | यंत्रणेची ||१||

*

 नाल्यांची सफाई | करोडो मलिदा |

 कोणावर फिदा | प्रशासन ||२||

*

 रस्त्यावर खड्डे | खड्ड्यातून रस्ता |

 जीव झाला सस्ता | सामान्यांचा ||३||

*

पडताच सरी | प्रशासन जागे |

कंत्राटाचे धागे  | लपवाया ||४||

*

कारवाईची ना | कोणालाच भीती |

पावसाळे किती | पडोनिया ||५||

*

रस्त्यावर नदी | सार जलमय |

त्रासाची सवय | जनतेला ||६||

*

नेहमीची येतो | ऋतू पावसाळा ||

सोसाव्यात कळा | बिब्बा म्हणे ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विनवणी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ विनवणी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

खळ नाही आभाळाला

अविरत धरलीस धार

ओल्या दुष्काळाचे सावट,

करू लागले मनी घर !

घे उसंत आता जराशी

नदी नाल्या आले पूर,

वावरात शिरे पाणी

तोडूनिया त्याची मेर !

धीर सुटे बळीराजाचा

पाणी डोळ्याचे खळेना,

उघड्या डोळ्यांनी पाहे

पेरणीच्या शेताची दैना !

कर उपकार आम्हांवर

पुन्हा एकदा विनवितो,

भाकर तुकडा लेकरांचा

सांग कशास पळवतो ?

सांग कशास पळवतो ?

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 183 ☆ पावसाळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 183 ? 

☆ पावसाळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

पावसाळा म्हंटल की, चिखल आला

पावसाळा म्हंटल की, छत्रीही आली.!!

*

पावसाळा म्हंटल की, शेतकरी सजग होतो

पावसाळा म्हंटल की, बळीराजा पेरणी करतो.!!

*

पावसाळा म्हंटल की, हिरवळ सजली

पावसाळा म्हंटल की, चहा भजी आली.!!

*

पावसाळा म्हंटल की, अगोदर हुरूप असतो

पावसाळा म्हंटल की, नंतर कंटाळा ही येतो.!!

*

पावसाळा म्हंटल की, शाळेला सुट्टी मिळते

पावसाळा म्हंटल की, नदी लिलया फुगू लागते.!!

*

पावसाळा म्हंटल की, प्रेम कविता बनतात

पावसाळा म्हंटल की, भावना अनावर होतात.!!

*

असा हा पावसाळा, अनेक कारणांनी गाजतो

तो कधी प्रलय तर, कधी सौख्य ही प्रदान करतो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सावळा – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सावळा – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आभाळात काळ्या ढगांची गच्च दाटी झाली होती…

 काळोख दाटून आला होता ..  अंधारलं होतं 

 तो भार ढगाला सहन होईना

 तसा कोसळायलाच लागला

 धो धो ..  कितीतरी वेळ .. अविरत…

 मग एक क्षण असा आला

 .. सगळं मोकळं झालं

 ढगातून सोनेरी ऊन बाहेर पडलं

 ती बघतच राहिली…

 

 आता धरणी ते पाणी कुशीत घेईल नव्या सृजनासाठी..

 कोवळे अंकुर वर येतील पावसाळ्यातला हा सोहळा..

 आज तिने नीट समजून घेतला

 

 निसर्ग शिकवतो आपल्याला

 भरून आलं की योग्य ठिकाणी मोकळं करावं.. मन…

  मनातलं बोलून सांगून..

 प्रेमाने समजून घेणाऱ्याकडे

 

 मग समजूतीचे अंकुर फुटतात नव्याने जगण्यासाठी….

मायेचा प्रेमाचा प्रकाश मिळाला की अंकुरातून पाने येतील…

 पुढे फुलं फळं सुद्धा येतील

 

 तो सावळा ..

आभाळातला…

 आज तिच्यासाठीच बरसला

 म्हणजे खरंच तो तिथे असतो…

 

 अरे  खरंच की..

मग आता चिंताच नको 

आज तिचा तिला साक्षात्कार झाला.  तिने वर पाहून समाधानाने हात जोडले…

 कधी   कुठे कुठल्या रूपात भेटशील कळतच नाही रे .. .. 

  माझ्या सावळ्या…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आषाढी एकादशीचे दंडवत ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

आषाढी एकादशीचे दंडवत…  श्री सुहास सोहोनी ☆

अक्कड बक्कड, सख्खे भाऊ

दोघांनी ठरवलं, फिरायला जाऊ

अक्कड म्हणाला, तू वाट दाखव

बक्कड म्हणाला, तू वाट दाखव

*

जायचं कुठे, ठरलंच नव्हतं

रस्ता चुकायचं, कारणच नव्हतं

चाल चाल, चालत राहिले

पाय थकले, मोडुन गेले

*

भरकटल्यावर, संवाद संपला

कारण नसता, विवाद झाला

अक्कड म्हणे, डावीकडची वाट

बक्कड म्हणे, उजवीकडचा घाट

*

चालतच राहिले, अक्कड बक्कड

वाटेत त्यांना भेटला कक्कड

डोळ्यात हुशारी, डोक्यात अक्कल

वागण्या-बोलण्यात एकदम फक्कड

*

थकलेल्या जीवांना आधी

कक्कड देई कांदा भाकर

सुकलेल्या कंठांना सुखवी

थंडगार पाणी लोटाभर

*

कक्कड झाला गुरू तयांचा

अक्कड बक्कड झाले चेले

कक्कड सांगे मेख आतली

अक्कड बक्कड बघत राहिले

*

प्रथम ओळखा स्वतः स्वतःला

जाणुन घ्या तुमच्या शक्तीला

अंतर्मन तू असशी अक्कड

बहिर्मनाचा धनि तू बक्कड

*

स्वभाव भारी चंचल तुमचे

एका जागी नाही बसणे

लगाम तोडून सैरावैरा

भरकटणे अन् धावत सुटणे

*

कुठे जायचे, ठाऊक नाही

वाट कोणती, माहित नाही

हात मिळवुनी जाल पुढे तर

दैवदत्त मग मिळेल काही

*

चालत गेले चालत गेले

रात्री सरल्या दिवस संपले

मैलोगणती अंतर सरले

दैवाने परि काहि न दिधले

*

निराश झाले भाऊ दोघे

तोच कानि ये ध्वनि लयकारी

मृदुंगासवे टाळ वाजला

विठुनामाची हो ललकारी

*

बघता बघता गुंतुनि गेले

नकळत दिंडित सामिल झाले

अबीर बुक्का कुणी लावला

उतावळी जाहली पाउले

*

मंदिरि येता मस्तक लवले

नेत्रामधुनी अश्रू झरले

एक विचारे, एक मनाने

दो बंधुंचे सख्य जाहले

*

दर्शन घेता मुखचंद्राचे

पारावार न आश्चर्यासी

अविश्वासे स्थितीहि अवघड

उभा विटेवरि साक्षात कक्कड !!

उभा विटेवरि साक्षात विठ्ठल !!!

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वागत ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

स्वागत

वर्षाबाईचं लगीन ठरलं,

 वरूणराजाच्यासंग!

 सुपारी फुटली,आवतण देतो,

 मेघ,बिजलीच्या संग!

 गुलाल उधळीत,समीर जाहला

 पहा कसा बेधुंद!

 साथ देतसे धरती तयाला, दरवळतो मृदगंध!

 सुरू जाहली पहा तयारी,

 नटण्या-सजण्याची,

 आली टवटवी,अंगे धुवूनी,

   वेली-वृक्षांसी!

 अलंकार हिरे-मोत्यांचे,

 वैभव मिरविती,

 नाचत,डोलत आनंदाने,

 गुजगोष्टी करती.

 शालू पोपटी,नेसून सजली

  अवघी ही सृष्टी,

रूप खुलविते ,चोळीवरची,

 रंगबिरंगी नक्षी!

 किलबिल किलबिल करती पक्षी,वाजे शहनाई,

 तडतड तडतड घुमला ताशा ,

 घाई मुहुर्ताची!

 कडकड,चमचम,बिजली या, लवलवते  मंडपी !

 लगीन लागलं आकाशी अन्

  जलधारा अंगणी,

 स्वागत करूया,आनंदाने            

    झेलूया पावसाच्या सरी!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विठ्ठल विठ्ठल म्हणता… — दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ विठ्ठल विठ्ठल म्हणता… — दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

१ ) 

वारीमधे चालताना

डोईवर वृंदावन

गळा वैजयंती माळ

मुखे विठु गुणगान

*

एकरूप होती सारे

विठुमाऊली ओढीने

विठ्ठल विठ्ठल म्हणता

मिळे मना संजीवन

*

 आषाढाचे मेघ नभी

 सावळ्याचे रूप जणू

 ते  रिमझिम पडताना

  गोडी तया अभंगाची

*

  श्वास येतो आणि जातो

  त्याने मिळे देहभान

  वारीमधे चालताना

 मना ईश्वरीय आश्वासन

*

   विठू माऊलीची माया

   चंद्रभागेच्या पाण्यात

   तिच्या काठावर दिसे

   तीच वाळूच्या कणात

*

   दर्शनाचा लाभ होता

   पायी टेकताच डोई

   एक अनामिक ऊर्जा

   क्षणी संचारते देही

*

   देहातली  स्पर्श ऊर्जा

   जगण्याची साफल्यता

   माऊलीच मायबाप

   पांडुरंग बहिण बंधू भ्राता

*

   सर्व सुकूमार मृदू धागे

   जडलेत विठ्ठलाचे पायी

   पदराची सावली नित्य

   देते माझी रखुमाई

—  कवयित्री : नीलांबरी शिर्के

२ ) 

आली पावसाची सर

 हिंडे साऱ्या दिंडीभर

 पूर्ण दिंडीत ऐकु येई

 विठू नामाचा गजर

*

 सर वारीत फिरली

भक्तिरसात भिजली

 तिच्या थेंबाथेंबातच

 विठू माऊली भरली

*

 आता सरी  बरसणे

 वाटे अभंगाचे गाणे

 आषाढी पालखीचे

 आहे स्वरूप देखणे

—  कवयित्री : नीलांबरी शिर्के

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वाखरीला आलो… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

☆ वाखरीला आलो… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

(आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी सर्व पालख्या पंढरपूरच्या अलीकडील गावी वाखरीला पोहचतात. तिथे पालखीतील शेवटचे उभे रिंगण होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पालख्या पंढरपूरला येतात. त्या आदल्या दिवसाचे वर्णन करण्याचा प्रयत्न या अभंगामध्ये केला आहे.)

|| वाखरीला आलो ||

विठ्ठल विठ्ठल| एकची गजर|

लागली नजर| वेशीवरी|

*

वाखरीला आलो| भरून पावलो|

भक्तीरसा न्हालो| रिंगणात||

*

अवघ्या पालख्या| भेटी जणू सख्या|

प्रेमाची ही व्याख्या| काय सांगू||

*

शिजे परी दम| निवे परी नाही|

वाट आता पाही| पहाटेची||

*

पंढरी येऊन| माथा टेकवून|

दर्शन घेऊन| सुखी होई||

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares