मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 179 ☆ पाऊस तुझा नि माझा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 179 ? 

पाऊस तुझा नि माझा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

पाऊस तुझा नि माझा

तफावत खूप आहे

तुज आवडे रिमझिम

माझे मन, त्यात नं राहे.!!

*

पाऊस तुझा नि माझा

एकच छत्री मला हवी

त्या पावसात सोबती

मज बिलगून तू रहावी.!!

*

पाऊस तुझा नि माझा

कधीच सोबत येत नाही

मी पाहतो वाट तुझी अन्

पाऊस माझा, अंत पाही.!!

*

पाऊस तुझा नि माझा

खेळतो पाठशीवणीचा खेळ

गरम गरम चहा पिण्यातच

जातो मग आपला वेळ.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆  भिंगरी घर… – सौमित्र ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज आपण एक आगळीवेगळी कविता या ठिकाणी पाहणार आहोत… जीवन स्थिर नसतं,पण आपल्याला स्थैर्य हवं असतं… तुम्ही आम्ही सर्व जण कधीच एका जागी स्थिर असत नाही… सतत फिरते … प्रगती विकास च्या नावाखाली हलत राहतो… कधी स्वता तर कधी दुसरा आपल्याला हलवत असतो… गती देत असतो… जशी गती मिळते तेव्हढं आपण स्वता भोवती गिरकी घेत राहतो..

स्वताच्या पायावर उभे राहतो काही क्षण… गती संपताच आपण कलडूंन पडतो..पायाच नसल्या सारखं… एखादी भिंगरी सारखं…. होय आपण ओळखलंत .. कवि सौमित्र यांची भिंगरी घर या कवितेबद्दल बोलतोय…

☆ भिंगरी घर ☆

आधी घर छोटं होतं म्हणून तू बाहेर झोपायचास

नंतर डोक्याला शांतता हवी म्हणून बाहेर असायचास

*

मग गेले वडील तेव्हा त्यांची जागा तुझी झाली

काही दिवसांनी भावाचं लग्न,त्याची बायको घरात आली

गुपचुप उचललास बिछाना आणि हळुच देऊळ गाठलंस

फुटपाथ रस्ता देऊळ दुकान यानांच आपलं मानलंस

*

अचानक मग अधून मधून तू शहराबाहेर जायचास

एकटा एकटा एकटा फिरून पुन्हा परत यायचास

*

पैसे देऊन हक्काची जागा हाॅटेलमधे शोधायचास

काही दिवस काही रात्री काॅंफीडंटली वागायचास

*

एक दिवस प्रेमात पडलायस असं कुठुन कळलं

तुझं सारंच आठवलं अन् काळीज उगाच जडलं

*

एका जागी स्थिरावणार,तू याचंच हायसं वाटलं

शेवटी एकदाचं तुझ्या हक्काचं कुणी तुला भेटलं

*

आणि मग तू लग्न केलंसन घर घेतलस स्वत:च

खरंच खूप छान केलंस,ऐकलंस फक्त मनाचं

*

मग एक दिवस आई म्हणाली,’घर मोठ्ठं आहे तरी?’

तुझी बायको म्हणते,तू अधूनमधूनच असतोस घरी?

*

अंग थरथर कापू लागलं जीभ माझी कोरडली

आईनं हातात पट्टी घेतली,आई माझी ओरडली

*

सांग…सांग तुझी जागा तू कुठे जाऊन फेकलीस?

अशी कशी भिंगरी बाळा पाया लावून घेतलीस?

… छोट्या घरात राहणाऱ्या मोठ्या कुटुंबाची कहाणी… झोपायची अडचण … वडीलधारी मंडळी घरी झोपावीत म्हणून बाहेर झोपणारा मी सतत दुसऱ्याची सोय बघत गेलो… वडील गेले नि घरात जागा झाली हक्काची काही क्षणाची… भावाने लग्न केले मुहूर्तावर बायको आली घरी नि माझी वरात फिरून दारी…पाहता पाहता त्या निरंकुशतेच्या कुशीत शिरलो… तिनं दाखवले ते आकर्षणाचं जगं… एक जागा अशी राहिली नाही सतत बदलत गेलो… फुटपाथ रस्ता देऊळ दुकान सगळा फुकटचा आणि उघडयावरचा कारभार… मग शहाराची लागली चटकं.. ते सुख सुखासुखी सोडवत नव्हते… कधी खिसा गरम असला तर चार पैसे टाकून हाॅटेलच्या गादीवर रात्र काढू लागलो बिनधास्त…

… प्रेमाचं बिंग फुटलं,.. आईला बरंच वाटलं..चंचलेला लगाम बसेल .. मी स्थिर होईन हि आशा वाटली… हक्काची सावली मिळणार होती… लग्न हि झालं तसं स्वताच घरही झालं… आता भिरभिरणाऱ आयुष्य संपलं असं त्यांना वाटलं…. पण ते माझं मन मला कासाविस करू लागलं… हक्काचं ते असून बाहेरचं सुख सुखासुखी सोडवत नव्हते…बायकोची तडफड आईला समजली… फैलावर घेत ती मला म्हणाली… घर असताना का भिकेचे डोहाळे लागले…. भिंगरी लावून घर घर का भिरभिरतोस … आता तरी स्थिर हो…

भिंगरीचं घर रुपक  सतत दुसऱ्यानं गती दिली तर फिरते… तेव्हा ती स्वताचं भान हरपते.. स्वताच्या पायावर तोल सा़भाळते स्थिर दिसते पण गती संपताच कलंडून कोलमोडून पडते… पायाच नसल्या सारखी.. अडगळीत पडल्या प्रमाणे…  माणसं भि़गरी सारखी गरगर फिरतात स्वताच्या जीवनामध्ये … स्थैर्य हवं असतं म्हणून… कुणाला लाभलं असं वाटतं तर कुणाला नाही … साराच भासआभासाचा खेळ असतो तो….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहिला पाऊस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ पहिला पाऊस !  ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

धारा कोसळता मृगाच्या 

भेगाळल्या धरतीवर

मृदगंधाच्या गंधाने

जाई व्यापून चराचर

*

नाचे आनंदाने निसर्ग

झाडे वेली प्रफुल्लित होती

झटकून धूळ अंगावरची

वाऱ्यासवे डोलू लागती

*

ओहोळ सारे माथ्यावरले

आता होतील जलप्रपात

दरीत उतरून खळाळत

होतील समर्पित सागरात

*

अंग झटकून कासकर

लागे पेरणीच्या कामाला

ढवळ्या पवळ्या खुशीने

घेती जोडून नांगराला

*

पीक घेणार बळीराजा

यंदा शेतात सोन्याचे

विनवी प्रमोद प्रभूला

रक्षण करा धान्याचे

रक्षण करा धान्याचे

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोन छत्र्या… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

दोन छत्र्या… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

दोन छत्र्या रस्त्यात भेटल्या

हाय, हँलो म्हणून खुदकन् हसल्या 

*

किती दिवसांनी भेट झाली

विचार दोघींच्या आला मनी

*

भेटलोच आहोत तर गप्पा मारू

सुखदुःखाच्या चार गोष्टी करू

*

काय चाललय सध्या तुझं

इतके दिवस तू होतीस कुठं

*

काय सांगू बाई तुला

असा कसा गं जन्म आपला

*

उन्हात तापायच,पावसात भिजायच

रस्त्यावर नुसत गरगर फिरायच

*

तुझी सुध्दा हीच नं कथा

दुसऱ्यांसाठीच जन्म आपला

*

दोघींनीही मोकळे केले मन

किती दिवसांची मनाची तगमग

*

अजूनही थोड बोलायच होत

मनातल सार सांगायच होत

*

पण हाय रे दैवा

आमच्याकडे एवढा वेळ कुठला

*

खसकन् माझ नाक दाबल

ड्युटीवर रूजू व्हावच लागल

*

दोघीही मनातून खट्टू झाल्या

मालकिणीसंग विरूद्ध दिशेला गेल्या

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सृजनता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ सृजनता … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

करवतीने कापा करकर

घाव कुऱ्हाडीचे दणादण

पाण्यामधे करा प्रवाही

कुजेन मी मग तेथे कणकण

*

पाण्यामधे कुजता कुजता

शेवटपर्यंत जपेन सृजनता

जलावरच्या देही जन्मली

म्हणूनच ही सृष्टी संपन्नता

*

या निसर्ग वृत्तीमुळेच आहे 

अजूनही जगी या हिरवाई

अमानुष कत्तल  वृक्षांची

 अन कसरत ही समतोलाची

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कण… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ कण… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

दुःख दिसलं सुपभर

सुख मिळालं कणभर

डोंगर होता भरल्या काट्यानी

करवंद बसली जाळीवर

*

आवळा बसला झाडावर

भोपळा दिसला वेलीवर

देवा तुझं ईपरीत काहीं

आंबा लोम्बतो वाऱ्यावर

*

सुखातला दुःखाचा बिब्बा

नदीकाठी काळी घागर

अंधारातील खेळ जगाचा

जीवनाचा होतो मग जागर

*

 येळकोट येळकोट घेताना

 म्हाळसाचा होतो विसर

 संबळ डंबळ वाजवताना

  पिवळा भडक होई नांगर

*

 पिकली शेती रांधली चूल

 काळ्या मातीचा होतो चाकर

 चटके हाताला बसताना

 पोटात जाई कोर भाकर

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंगणासारखे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अंगणासारखे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

जगावे कधी मी मनासारखे?

कधी ग्रीष्म ही श्रावणासारखे

*

मला दुष्ट होता न आले कधी

जगा सोसले सज्जनांसारखे

*

उपाशीच अन् फाटका राहिलो

ऋतू हे जरीही सणासारखे

*

न छाया, सुगंधी फुले,ना फळे

जिणे लाभलेले तणासारखे

*

मिळो प्रेम किंवा उपेक्षा मिळो

करा प्रेम ओल्या घनासारखे

*

कुणासारखे मी असाया नको

असावेच मी ‘आपणा’सारखे

*

करंटेपणी भाग्य हे केवढे

मला बाळ हे ‘श्रावणासारखे’

*

मला द्यायचे मान्य केले जरी

दिले सर्व त्यांनी ‘पणा’सारखे

*

न बक्षीस..वा दान ही लाभले

मला जे मिळे ते ऋणासारखे

*

नको दार..वा चौकट्या..या मना

असावे खुल्या अंगणासारखे

*

जरी गोड त्यांचे  हसू… बोलणे

मना शब्द होते घणासारखे

*

मला टाळता लोक आले न ‘ते’

नकोश्याच होते क्षणांसारखे

*

नको श्रेष्ठता तारकांची मला

मिळो भाग्य धूलीकणासारखे

*

उराया नको होऊनी कोळसा

झिजावे तरी चंदना सारखे

*

कृतघ्ने जरी वागले सर्वही

मला वाटले अंजना सारखे

*

नसे स्त्राव नाही जरी वेदना

तुझे राहणे गे व्रणासारखे

*

असे निष्कलंकी प्रतीमा तुझी

तुला मानले दर्पणा सारखे

*

दिसाया जरी मी बटूसारखा

मला रूप ही वामनासारखे

*

मना..पावला भिंगरी लाभली

बसू मी कसे आसना सारखे?

*

इथे सर्व ठायी लढाई…लढे

पडे स्वप्न तेही रणासारखे

*

सुखाला गुरू..मंत्र नाही जरी

नसे सूख रे वाचनासारखे

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘कोणी नसे कुणाचे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री शिवकुमार कर्णिक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘कोणी नसे कुणाचे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री शिवकुमार कर्णिक ☆

प्रत्यक्ष वेळ येता

कोणी नसे कुणाचे ।।धृ ||

*

कन्या स्नुषा नृपांची, प्रत्यक्ष रामभार्या ।

पिचली क्षणाक्षणाला, कारुण्यरुपी सीता ।

कामी तिच्या न आले, सामर्थ्य राघवांचे….

प्रत्यक्ष वेळ येता,

 कोणी नसे कुणाचे  ll १ ll

*

त्यागून सूर्यपुत्रा,

 कुंती पुन्हा कुमारी ।

कर्णास अनुज माता, सारेच जन्म वैरी ।

कौतुक का करावे,

 त्या रक्तबंधनाचे ….

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कुणाचे  ll २ ll

*

केली द्यूतात उभी,

साक्षात कृष्णभगिनी ।

सम्राट पांडवांची, रानावनात राणी ।

पति पाच देवबंधू ,

तरी भोग हे तियेचे…….

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कुणाचे  ll३ll

*

ठेवू नको अपेक्षा,

असल्या जगाकडूनी ।

निरपेक्ष आचरी तू,

कर्तव्य प्रेम दोन्ही,

मग चालूदे सुखाने, अव्हेरणे जगाचे 

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कोणाचे..||४||

कवी:अज्ञात

प्रस्तुती: श्री. शिवकुमार कर्णिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वटपौर्णिमा… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – वटपौर्णिमा – ? ☆ श्री राहूल लाळे ☆

तो वड एक महान

घालून प्रदक्षिणा ज्याला

परत  मिळवले सावित्रीने

आपल्या प्रिय पतीचे प्राण

*

तो आणि असे अनेक वड

अजूनही उभे आहेत

पाय जमिनीत रोवून घट्ट

ऐकतात दरवर्षी ते

नवसावित्रींचें  पतीहट्ट

*

वडाला फेऱ्या मारणाऱ्या

दोरीचे बंध बांधणाऱ्या,

सगळ्याच स्त्रिया का  सावित्री असतात ?

ज्यांच्यासाठी  त्या व्रत करतात

सगळे का  ते सत्यवान असतात ?

*

सात जन्मी हाच मिळावा जोडीदार

यासाठीच  होते जरी प्रार्थना

मनात दोघांच्या असतात का

नक्की तशाच भावना ?

*

सावित्रीला आजच्या.. खरंच का हवा आहे

सत्यवान तो जन्मोजन्मी ?

आणि ज्याच्यासाठी उपास करतात

सत्यवानाला त्या  हवीय का तीच सावित्री पुढल्या तरी जन्मी !!!

*

सावित्री -सत्यवान महती त्यांची थोर

त्यांच्यापुढे आपण सारे लहानथोर

महत्वाची आहे तरी प्रेमभावना

*

सात जन्म कोणी पाहिलेत ?

हाच जन्म महत्वाचा

मिळाली ती सावित्री

आहे तो सत्यवान जपायचा

*

संस्कार म्हणून  वटपौर्णिमा

सण साजरा करत राहूया   …

पतीपत्नी सारे विश्वास अन् प्रेमाचं रोप सतत फुलवत ठेऊया

© श्री राहुल लाळे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 226 ☆ द्या आम्हा प्रेरणा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 226 – विजय साहित्य ?

☆ द्या आम्हा प्रेरणा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

द्या आम्हा प्रेरणा

दान धर्मातून

कळे कर्मातून,

पदोपदी. . . ! १

*

माय बाप तुम्ही

काळजाची छाया

जपतोय माया,

उराउरी. . . ! २

*

द्या आम्हा प्रेरणा

संवादाचा नाद

टाळतोच वाद,

अनाठायी. . . ! ३

*

जीवन प्रवास

अनुभवी धडा

चुकांचाच पाढा,

वाचू नये. . . . ! ४

*

द्या आम्हा प्रेरणा

पिढ्यांचे संचित

कुणी ना वंचित

सन्मार्गासी . . . ! ५

*

द्या आम्हा प्रेरणा

यशोकिर्ती ध्यास

कर्तव्याची आस

आशिर्वादी. . . . ! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares