…. असा हा नजर खिळवून ठेवणारा …. ज्याचे वर्णन करण्यासाठी शब्दांनाही जणू बहर यावा असा बहावा … बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो. याला पावसाचा ” नेचर इंडीकेटर ” असेही म्हणतात, या वर्षी हा लवकर फुलला आहे. आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला ‘ शॉवर ऑफ फॉरेस्ट ‘ असेही म्हणतात. आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो …..
कवयित्री इंदिरा संत यांनीही या देखण्या बहाव्याचं किती सुंदर आणि बोलकं चित्ररूप वर्णन केलंय बघा — …
नकळत येती ओठावरती
तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेऊन
दिमाखात हा उभा बहावा।।
*
लोलक इवले धम्मक पिवळे
दवबिंदूतुन बघ लुकलुकती,
हिरवी पर्णे जणू कोंदणे
साज पाचुचा तया चढवती ॥
*
कधी दिसे नववधू बावरी
हळद माखली तनु सावरते
झुळुकीसंगे दल थरथरता
डूल कानिचे जणू हालते ।।
*
युवतीच्या कमनीय कटीवर
झोके घेई रम्य मेखला,
की धरणीवर नक्षत्रांचा
गंधर्वांनी झुला बांधला॥
*
पीतांबर नेसुनी युगंधर
जणू झळकला या भूलोकी,
पुन्हा एकदा पार्थासाठी
गीताई तो सांगे श्लोकी ।।
*
ज्या ज्या वेळी अवघड होई
ग्रीष्माचा तुज दाह सहाया,
त्या त्या वेळी अवतरेन मी
बहावा रुपे तुज सुखवाया ॥
(कवयित्री : इंदिरा संत)
☆
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
झलक, निषाद या संस्थांसाठी सुमारे २५०० सांस्कृतिक कार्यक्रम सादर
पुणे फेस्टिवल साठी ‘पुणे नवरात्री महोत्सवात सहभाग
दूरदर्शन, आकाशवाणी साठी मालिका,संगितिका, गीतरामायण, बालोद्यान इ.सहभाग व सादरीकरण.
मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन
शिक्षकांसाठी बालचित्रवाणीतील कार्यक्रमास राष्ट्रीय पुरस्कार
बालसाहित्य , सीडी,कॅसेट प्रकाशित
अ.भा.साहित्य संमेलन, आळंदी येथे सहभाग
अंगणवाडी,बालवाडी ,शिक्षक प्रौढसक्षरता विभागासाठी शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती
विविध सन्मान : पणे महानगरपालिका,नॅशनल मुव्हमेंट आर्ट,अ.भा.जैन संघटना,कुलफौंडेशन, रोटरी क्लब, अ.भा.नाट्यपरिषद पुणे कलांगण मुंबई अशा अनेक संस्थांकडून सन्मान व पुरस्कार प्राप्त.
सभासद : अभिनव कला भारतीय संघटना,अ.भा.नाट्यपरिषद परिषद,हरि किर्तनोत्तेजक संस्था, गानवर्धन आदी नामांकित संस्थांचे सदस्य आहेत.
☆ “अंतराळवेध” – लेखक : श्री राजीव पुजारी ☆ परिचय – सौ. सुनीता पुजारी ☆
लेखक – राजीव गजानन पुजारी
प्रकाशक – क्राऊन पब्लिशिंग, अहमदाबाद
पृष्ठ संख्या – २८८
किंमत – ₹ ३५०/-
मागील आठ दिवसांत श्री राजीव पुजारी लिखित ‘अंतराळवेध’ हे पुस्तक वाचले. खरोखर हे पुस्तक म्हणजे अंतराळ क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी मोलाचा खजिनाच आहे. पहिल्यांदा लक्ष वेधून घेते ते मुखपृष्ठ. पुस्तकाच्या नावाला साजेसेच हे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर भारताला ललामभूत ठरलेला विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर चांद्रपृष्ठाच्या पार्श्वभूमीवर ठसठशीतपणे उठून दिसतात. वरच्या उजव्या कोपऱ्यात अमेरिकेचा पर्सिव्हिरन्स रोव्हर मंगळभूमीवर कार्यरत दिसतो. वरच्या उजव्या कोपऱ्यात भारताचा मानदंड असणाऱ्या इस्रोचा लोगो दिसतो व दोहोंच्या मध्ये भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ विक्रम साराभाई यांचे छायाचित्र दिसते. पर्सिव्हिरन्सच्या खाली चांद्रयान -३ च्या चंद्रावतरणाचा क्षण अचूक दाखविला असून त्या खाली इस्रोचा प्रक्षेपक अवकाशात झेपवतांना दिसतो. मुखपृष्ठ पाहूनच वाचकांना पुस्तक खरीदण्याचा मोह होतो. मालपृष्ठावर पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती दिली आहे.
पुस्तक एकूण चार विभागात आहे. पहिल्या विभागात नासाची मार्स २०२० मोहीम दहा भागांत विशद करून सांगितली आहे. पहिल्या भागात पर्सिव्हिरन्स रोव्हर विषयी जाणून घेण्याचे सात मुद्दे विस्ताराने सांगितले आहेत. दुसऱ्या भागात प्रथमच दुसऱ्या ग्रहावर स्वायत्त उड्डाण भरणाऱ्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी जाणून घेण्याच्या सहा गोष्टी सांगितल्या आहेत. तिसऱ्या भागात मार्स २०२० मोहिमेविषयी तांत्रिक माहिती सांगितली आहे. चौथ्या भागात मंगळ ग्रहाविषयी व मार्स २०२० यानाच्या प्रक्षेपणाविषयी माहिती दिली आहे. पाचव्या भागात यानाचा मंगळाच्या वातावरणात प्रवेश, अवरोहण व प्रत्यक्ष मंगळावतरण याविषयीची माहिती आहे. सहाव्या भागात यान मंगळावर उतरल्यावर त्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागल्या याविषयीची माहिती आहे. सातव्या भागात रोव्हर व खडकाचे नमुने सठविण्याच्या प्रणालीविषयीची माहिती आहे. आठव्या भागात मंगळाकडे जातानाच्या मार्गक्रमणाचे टप्पे, त्या टप्प्यांवर असणारी वैज्ञानिक उपकरणे व मोहिमेचा उद्देश विशद केला आहे. नवव्या भागात रोव्हरला ऊर्जा पुरविणाऱ्या MMRTG विषयी माहिती आहे तसेच उड्डाणापासून ते अवतरणापर्यंत यान व पृथ्वी यांदरम्यान दूरसंभाषण कसकसे होत होते या विषयीची माहिती आहे. दहाव्या भागात यानावर असणारी प्रायोगिक उपकरणे म्हणजे MOXIE व इंजेन्यूटी हेलिकॉप्टर विषयी माहिती दिली आहे तसेच नमुने गोळा करण्याची प्रणाली व एकंदरीतच यानाच्या जुळणीच्यावेळी घेतलेल्या कम्मालीच्या स्वच्छतेसंबंधी अचंबित करणारी माहिती दिली आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात नासा व इस्रोच्या विविध मोहिमांची माहिती दिली आहे. यात LCRD, IXPE, DART, LUCY, जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण, आर्टिमिस योजना व मंगळ नमुने परत योजना या नासाच्या मोहिमा तसेच SSLV-D1, SSLV-D2, चंद्रयान ३, आदित्य एल 1 या इस्रोच्या मोहिमांविषयी साद्दंत माहिती दिली आहे. तसेच गुरूत्वीय लहरींच्या वैश्विक पार्श्वभूमीच्या शोधाविषयी विस्तृत माहिती आहे. हे वाचून लेखकाच्या अंतराळाविषयीच्या सखोल अभ्यासाची अनुभूती येते.
पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात दोन अंतराळविज्ञान कथा आहेत. पहिली कथा आहे ‘आर्यनची नौका’. हि कथा मानव भविष्यात मंगळावर करू पाहणाऱ्या वसाहतीसंबंधी आहे. सध्या मंगळ जरी शुष्क दिसत असला तरी एकेकाळी तो सुजलाम् सुफलाम् होता. कालांतराने त्याचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण नाहीसे झाले. याच्या परिणामस्वरूप तो शुष्क झाला. या कथेत इस्रोने मंगळाचे चुंबकीय क्षेत्र व वातावरण कसे पुनरुज्जीवीत केले, ऑक्सिजनची पातळी कशी वाढवली, ध्रुवांजवळील व घळींमधील गोठलेले पाणी द्रवरूपात आणून मंगळ सुजलाम् सुफलाम् कसा केला व पृथ्वीवरील निवडक माणसांनी इथे वसाहत कशी वसवली याचे वैज्ञानिक शक्यतांच्या अगदी निकट जाणारे कल्पचित्र रंगवले आहे.
दुसरी कथा आहे ‘ भेदिले शून्यमंडळा ‘. या कथेत लेखकाच्या स्वप्नात यंत्रमानव मंगळावर जातात. तेथे उत्खनन केल्यावर त्यांना मंगळावर एके काळी वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत पुढारलेली जमात होती असे निदर्शनास येते. उत्खननात त्यांना कांही विज्ञान विषयक पुस्तके मिळतात. त्यातील एक पुस्तक कृष्णविवरांसंबंधी असते. त्यात कृष्णविवरात प्रवेश कसा करायचा याचे विवरण असते. तदनुसार लेखक कृष्णविवरात प्रवेश करून धवल विवरातून बाहेर येऊन समांतर विश्वात जातो व पृथ्वीवर भारताने हरलेली मॅच तिथे भारत जिंकल्याचे त्याच्या निदर्शनास येते. दोन्ही कथा वाचतांना लेखकाचा अभ्यास व त्याची कल्पनाशक्ती यांचा कसा उत्कृष्ट मिलाफ झाला आहे याची प्रचिती येते.
चौथ्या भागात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, त्याची विविध केंद्रे, तेथे चालणारे संशोधन याची माहिती दिली आहे. तसेच ज्या शास्त्रज्ञांनी इस्रो वाढविण्यासाठी योगदान दिले आहे त्यांची चरित्रे थोडक्यात दिली आहेत.
पुस्तक पेपरबॅक स्वरूपात असून फॉन्ट मोठा असल्याने डोळ्यांना त्रास होत नाही. एकूणच हे ‘अ मस्ट रीड’ पुस्तक आहे.
परिचय : सौ. सुनीता पुजारी, सांगली
सांगली (महाराष्ट्र)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈