☆ “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” – लेखक – डॉ. शैलेंद्र देवळाणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक: बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा
लेखक: डॉ. शैलेंद्र देवळाणकर (सुप्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक)
पृष्ठे: ३७६
मूल्य: ४९९₹
परराष्ट्र धोरण या विषयाशी सामान्य माणसाचा संबंध काय, असं बहुतेकांना वाटत असतं. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ अशी एक जीवशास्त्रीय संज्ञा आहे; त्यानुसार भूमध्यसागरी प्रदेशात कुठेतरी एखाद्या फुलपाखराने आपले पंख फडफडवले की, पर्यावरणावर त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. परराष्ट्र धोरण हा विषय अगदी असाच आहे. दूरवर दिल्लीत बसून सरकार जी ध्येयधोरणे ठरवतं त्याचा परिणाम गल्लीत राहणाऱ्या माणसांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे होतच असतो.
शीतयुद्धोत्तर काळात जगाच्या पटलावर नव्या आर्थिक व राजकीय महासत्ता उदयास येत आहेत. जागतिक आणि ऐतिहासिक अंतर्वळणे बदलून टाकणाऱ्या घटना जगभरात घडत आहेत. या सगळ्यांत भारत कुठे आहे? आज ‘विश्वबंधू’ म्हणून आपलं परराष्ट्र धोरण राबवणारा भारत महासत्ता बनू शकेल का? जागतिक दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, तेलाचे राजकारण आणि विकसित भारताची बलस्थाने आणि आव्हाने या सगळ्यांचा ताळेबंद एका तज्ज्ञाच्या लेखणीतून.
भारताचे पूर्वीचे व आजचे परराष्ट्र धोरण, त्या अनुषंगाने भारताचा आर्थिक व सांस्कृतिक राजनय, विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी या सगळ्यांचा ऊहापोह प्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या पुस्तकात आपल्या अभ्यासपूर्ण आणि विश्लेषक शैलीत केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याची लवकरच शतकपूर्ती होईल. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात आपण विकसनशील भारताला विकसित भारत बनविण्याचं व्यापक उद्दिष्ट ठेवलं आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण कोणत्या क्षेत्रांत आमूलाग्र बदल करण्याची आणि त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, हे प्रामुख्याने डॉ. देवळाणकर आपल्याला सांगतात.
विविध स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण यांचे अभ्यासक, पत्रकार, प्राध्यापक आणि हा विषय समजून घेण्यास उत्सुक असणाऱ्या प्रत्येक नागरिकास हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरेल.
लेखक परिचय : डॉ. शैलेंद्र देवळाणकर
तीन दशकांपासून परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे संशोधक आणि विश्लेषक. या विषयातील तज्ज्ञ विश्लेषक म्हणून डॉ. शैलेंद्र देवळाणकर आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि ते यशवंतराव चव्हाण सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. पुढे त्यांनी एम. फिल नंतर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी इथून ‘आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण’ या विषयावर पीएच. डी. केलेली असून गेली अनेक वर्षे ते या विषयावरील संशोधन आणि लेखन करत आहेत. यापूर्वी या विषयावरील प्रकाशित झालेली त्यांची चौदा पुस्तके स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, पत्रकारांना, संपादकांना मोलाचे मार्गदर्शन करणारी ठरली आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर ते विविध माध्यमातून सखोल विश्लेषणाद्वारे मार्गदर्शन करत आलेले आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते संशोधक, शिक्षक, लेखक आणि प्रशासक अशा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ऐवज विचारांचा” – प्रा. स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ऐवज विचारांचा “.
स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह
पृष्ठे : ४३९
मूल्य : ५००₹
प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ‘ऐवज विचारांचा’ प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वतःचा एक विशिष्ट ठसा उमटवला. ‘राष्ट्रवाद’ या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले.
प्रस्तुत पुस्तकात स. हं. च्या लेखांची विभागणी ‘राष्ट्रवाद’, ‘सामाजिक आणि आर्थिक’, ‘व्यक्तिचित्रे’ आणि ‘संकीर्ण’ या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून प्रा. देशपांडे यांची स्वतंत्र लेखनशैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
ग्रंथात चार विभाग केले केले आहेत.
विभाग एक : राष्ट्रवाद
या विभागात आठ लेख आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल स. ह. देशपांडे यांना काय वाटतं होते, ते मांडण्यात आले आहे.
विभाग दोन : समाजकारण व अर्थकारण
या विभागात पाच लेख आहेत. यामध्ये चार लेख विविध विषयांवर आहेत.
विभाग तीन : व्यक्तिचित्रे
या विभागात सहा लेख आहेत. यामध्ये पाच जणांचे व्यक्तिचित्रण आहे.
विभाग चार : संकीर्ण
या विभागात सात लेख आहेत. यामध्ये स. ह. देशपांडे यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत.
स. ह. देशपांडे यांचे सुपुत्र डॉ. चंद्रहास देशपांडे यांनी ‘सलाम, ‘त्या’ ध्यासाला, ‘त्या’ अभ्यासाला… !’ या लेखात आपल्या वडिलांच्या पैलूंबद्दल लिहिले आहे. त्यातील काही परिच्छेद इथे देत आहे. ते लिहितात- ‘सल्लामसलत, चर्चा, विचारमंथन, मतप्रवाहांची देवाण-घेवाण, या सध्याच्या जगात (दुर्दैवाने) होत चाललेल्या शिक्षण पद्धती हा तर बाबांच्या शिक्षकी प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा आत्माच होय. बऱ्याच वर्षांपूर्वी पार्ल्याच्या घरी नियमितपणे एक चर्चासत्र बाबा मुद्दाम घडवून आणीत. अनेक विषयांवर त्यात खुली, खेळीमेळीच्या वातावरणातील, पण गंभीर चर्चा व्हायची, वादाच्या फैरीही झडायच्या. ’
‘स्वतःच्या मतांबद्दल आग्रही, नव्हे क्वचितप्रसंगी अत्याग्रही राहूनही, वैचारिक विश्वात वावरताना मात्र बाबा सदैव विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्तेच होते. उदाहरणार्थ- जेव्हा बाबांच्याच एखाद्या लेखावर वा पुस्तकावर चर्चा असायची, तेव्हा आपल्या प्रतिपादनाच्या विरुद्ध भाष्य करणाऱ्या अभ्यासू व्यक्तींना आवर्जून बोलवायला बाबा आयोजकांना सांगत असत; पण त्याबद्दल स्वतःही प्रयत्नशील असतं. ‘
‘एक व्यक्ती म्हणून बाबांकडे बघताना मला जर कायम जाणवणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हा एक ‘अस्वस्थ आत्मा’ होता. अनेक प्रकारच्या संवेदना असूनही बाबांना नेहमी जाणवत असे वा भिडत असे, ती एखादी सामाजिक वेदना. भोवतालच्या परिस्थितीत फार झपाट्याने सामाजिक- आर्थिक व मुख्यतः नैतिक अधःपात होत आहेत, मूल्यांचा पदोपदी ऱ्हास होत आहे, आपल्या देशाची अशी आयडेंटिटीच जणू वेशीवर टांगली आहे की काय, या व इतर अनेक समस्यांनी बाबा कायमच अस्वस्थ असत, त्यासाठी कायम एखाद्या विधायक मार्गाच्या शोधात असत. मात्र, आपले काम हे हातात मशाल घेऊन जाणाऱ्याचे नसून, वैचारिक पातळीवरून समाजाला काही मार्गदर्शन करण्याचे आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. तत्त्वांशी ते तडजोड खपवून घेत नसत व आपल्या डोळ्यांदेखत कोणावरही अन्याय झालेला त्यांना सहनही होत नसे. त्यासाठी निर्ढावलेल्या सरकारी अधिकाऱ्यापासून, उद्धट बसवाहकापर्यंत कोणाशीही भांडायला ते मागेपुढे पाहात नसत. शारीरिक जोखीम पत्करूनही त्यांनी अनेक प्रसंगांना धैर्याने तोंड दिले आहे. ‘
‘आज मागे वळून पाहताना बाबांच्या वैविध्यपूर्ण, लालित्यपूर्ण तसेच सखोल लेखनाचा काहीसा अचंबा वाटतो. एकीकडे भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण आहे, तर ग्रामीण आर्थिक वास्तवाचे (भावुक न होता) परीक्षण आहे; मान्यताप्राप्त व्यक्तींची/विभूतींचीही डोळस चिकित्सा आहे, तसेच राष्ट्रवादासारख्या स्फोटक विषयाची अभ्यासपूर्ण व अभिनिवेशरहित मीमांसाही आहे. रसग्रहण आहे, तेही मर्मग्राही आहे. प्रतिवाद करताना कोठेही आत्मप्रौढी नाही, अहंकार नाही. केवळ आणि केवळ मतभेद व्यक्त करणे आहे (जेथे वैयक्तिक टीका झाली, तेथे मात्र त्याचाही समाचार घेतला गेला आहे). दर्जा, पातळी कधीही घसरलेली नाही, ना शब्दांवरचा ताबा कधी सुटल्याचा प्रसंग… ‘
– – – वैचारिक, तर्कशुद्ध वाचनाची आवड असणाऱ्यांनी हा विचारांचा ‘ऐवज‘ अवश्य वाचावा. यामुळे आपल्या मनाची ‘वैचारिक‘ घुसळण मात्र नक्कीच होईल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माइंडफुलनेस” – लेखक – डॉ. राजेंद्र बर्वे ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : माइंडफुलनेस
– – वर्तमान क्षणात जगण्यासाठीची ‘पूर्णभान’ संकल्पना
लेखक: डॉ. राजेंद्र बर्वे
पृष्ठ: १३७
मूल्य: २००₹
सोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची !
पूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुगत आचार्य डॉ. राजेंद्र बर्वे.
आता आधुनिक काळातील मानसोपचारांना वर्तमानकाळाचे वेध लागले जे काही घडवायचं ते ‘इथेच आणि आताच’ अशा पद्धतीने करायला हवेत असे विचार रुजले.
इंग्रजीत या संकल्पनेला ‘हियर अँड नाऊ’ असं संबोधतात. त्यानंतर १९७९ मध्ये जॉन कब्याट झीन यांनी हे आव्हान स्वीकारलं, मानसिक ताण-तणावाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यांनी ‘माइंडफुलनेस ‘ प्रणालीचा वापर करून त्यावर शोधनिबंध लिहिला आणि मानसशास्त्रामध्ये त्याला सार्वमत मिळालं. हा बदल ऐतिहासिक ठरला. कारण ‘इथे आणि आता’ या संकल्पनेला समर्पक आयाम लाभला.
झीन स्वतः विपासनेचे विद्वान अभ्यासक, अचूक शब्दांत त्यांनी माइंडफुलनेसच्या संकल्पनेची व्याख्या मांडली. वर्तमानावर हेतुपूर्ण लक्ष्य केंद्रित करून जे मनात आणि आसमंतात घडतं आहे त्याचा विनाअट आणि विना निवाड्याने स्वीकार करणं म्हणजे माइंडफुलनेस !
झीन यांनी वर्तमानकाळाचा असा अचूक वेध घेतला. यावर अत्यंत काटेकोर संशोधन केलं. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि इतिहास घडला.
आत्ताचा क्षण आनंदाने आणि समस्यामुक्तपणे जगण्याचा मंत्र देणारं पुस्तक माइंडफुलनेस.
लेखक परिचय
डॉ राजेंद्र बर्वे यांनी एल. टी. एम. मेडिकल कॉलेज, सायन मुंबई येथून पहिल्या क्रमांकासह एम. डी. ची पदवी प्राप्त केलीगोडा मेडिटेशन सेंटर, कोलंबो, श्रीलंका येथून भन्ते ओलाआनंदा यांच्या हस्ते त्यांना ‘माइंडफुलनेस टीचर’(सुगत आचार्य) ही पदवी प्रदान करण्यात आली. पाश्चात्त्य वैद्यकीय विज्ञान पटक आणि पौर्वात्य तत्त्वज्ञान यांचा सुयोग्य संगम साधून माइंडफुलनेस अर्थात पूर्णभान या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत देश-विदेशातील विविध कार्यशाळा आणि परिषदांमधून त्यांनी ‘न्यूरो सायन्स’, ‘मानसिक आरोग्य’ आणि ‘समग्र आरोग्य विचार‘ या विषयांवर तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केलं आहे. कतार इथे एका मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी माइंड लनेस या विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतली असून, लंडन येथील एका खासगी वाहिनीसाठी माइंडफुलनेस विषयावर मुलाखतही दिली आहे.
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “फिनिक्सच्या राखेतून उठला मोर” (कथासंग्रह) – लेखक : श्री जयंत पवार ☆ परिचय – श्री प्रसाद साळुंखे ☆
पुस्तक : फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
लेखक – श्री जयंत पवार
प्रकाशन – लोकवाङ्मय गृह
मागे एक एकांकिका लिहित होतो. चाळीत घडणारी कथा होती. आणि त्याला गिरणी संपाचा चुटपुटता स्पर्श होता. तेव्हा वाचन वाढव असा सल्ला देणाऱ्या मित्रांमध्ये ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ या जयंत पवारांच्या कथासंग्रहाचं नाव वारंवार येत होतं. मी मात्र आपलं घोडं दामटवून अधाशासारखी एकांकिका खरडली. मित्राला पहिला खर्डा दाखवणार तोपर्यंत त्याचा अपघातात दुर्दैवी अंत झाला, मग इतर कोणाला द्यायची नाही असं ठरवलं.
हे सगळ पटपट उफाळून यायचं कारण म्हणजे त्या दिवशी किताबखानाला हा कथासंग्रह पाहिला. डोक्यात हे सारं घोळत असताना आपसूकच हात या कथासंग्रहाकडे गेले आणि मी तो पदरी पाडून घेतला. जयंत पवार हे नाव नाट्यरसिकांच्या परिचयाचं. पण कथासंग्रह वाचल्यावर आपल्याला कथाकार म्हणूनही ते तितकेच भावतात. म्हणजे नाट्यसंहिताच थोडी उणी अधिक वाक्य टाकून कथेचं लेबल लावून पेश केलीय असे नाही. कथा रचनेचा समर्थ वापर जयंत पवार यांनी केलेला आढळतो. कथाकार म्हणून त्यांची कथाकथनाची शैली अफलातून आहे.
पुस्तकाची पहिली आवृत्ती जुलै २०१० ला प्रकाशित झाली. या कथासंग्रहात २००२ पासून २००९ पर्यंतच्या जयंत पवारांच्या वेगवेगळ्या अंकात प्रसिद्ध झालेल्या सात कथा आहेत. यातूनच समजते की कथालेखन अभ्यासूपणे आणि गांभीर्याने केलेलं आहे. केवळ दिवाळी अंकांच्या आग्रहाखातर केलेलं हे लिखाण नाही. तसंही असं लिखाण आतून स्फुरावं लागतं. अनुभवाची सरमिसळ त्यात असते, वाचनाचा व्यासंग असतो, मग त्यावर कोणाचाही आग्रह चालत नाही अगदी स्वतःचाही. तर अशा फार गडबडीने न लिहिता संवेदना वेचत, आयुष्याच्या अनुभवांच्या, कल्पनांच्या हलक्या धगीवर निवांत मुरू देत बनलेल्या ताज्या कसदार कथा आहेत.
‘टेंगशेंच्या स्वप्नातील ट्रेन’ या पहिल्या कथेपासून हा प्रवास सुरू होतो. या कथेत जगण्यातलं बोटचेपं धोरण, व्यवस्थेच्या दडपणात अंकुरलेला आणि फैलावलेला मध्यमवर्गी षंढपणा आपल्याला दिसतो. ज्यावर कथा, ललित काही लिहिलं किंवा आजच्या भाषेत फेसबुकवर किंवा अन्य सामाजिक प्रसार माध्यमावर माफक हळहळलो म्हणजे “मी त्यांचा भाग नाहीए हं” हा भंपकपणा अधोरेखित होतो.
नंतर आपण ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमचे सुरू! ‘ कथा वाचतो. ज्यात एका हिशोबाच्या गैरसमजामुळे दोन समाज एकमेकांना हिशोबात ठेवण्याचं प्रयत्न करतात, पण त्याच्या या कुरघोडीत कोणाचा फायनल हिसाब होतो हे वाचणं रंजक वाटतं.
नंतर ‘ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ‘ ही कथा आपण वाचतो ही कथा गिरणी संपावर बेतली आहे. ज्यात गिरणी कामगारांच्या कुटुंबावर भाष्य आहे. फिनिक्स मॉलचा झगमगाट यांच्या आयुष्यातला अंधार घालवू शकणार आहे का? तिथला एसी भूतकाळातील जखमांवर थंडावा देईल का? तो चकचकीतपणा स्वप्नांवरची वास्तववादी धूळ फुंकेल का? अशा कोंदटवाण्या प्रश्नांवर आपल्याला विचार करायला ही कथा भाग पाडते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ अशी कथा सफाईने फिरत राहतो त्यामुळे पात्रपरिचय, पात्राचे निरनिराळे पैलू आपल्याला पाहता येतात.
‘जन्म एक व्याधी’ नावाची एक कथा आहे. ज्यात कथेचा निवेदक घरातले छोटे मोठे कलह काही त्याच्या डोळ्यासमोर घडलेले तर काही घरातल्यांकडून ऐकलेले सांगत राहतो. हे सांगणं फार नाट्यपूर्ण आहे. एखादा सुधारणाप्रिय माणूस आपल्या चुकांवर मात करून सुधारु शकतो का? का त्याची भूतकाळाची लेबलं लोक आपल्या सोईसाठी वापरतात, असे बरेच विचार ही कथा वाचताना येतात.
मग पुढची गोष्ट म्हणजे ‘ चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम में टढ्ढुम ‘ ही माझी या कथा संग्रहातील सगळ्यात आवडती कथा. ही कथा खुसखुशीत आहे. कथानायक (? ) चंदू जवळपास मन जिंकून घेतो आहे. त्याच्या वात्रटपणाकडे आपण सुरुवातीला डोळेझाक करतो. पण कथा जसजशी पुढे सरकत जाते तसतसं आपलं मतपरिवर्तन होतं. आपण जवळपास चंदू होऊन जातो. एवढे गुंतून जातो की कपाळावरच्या आठ्या चंदूला ‘अरे नको करू’ असं बजावत राहतात. या कथेवर कोणी चित्रपट काढला तर धमाल होईल, म्हणजे कलाकारांची उत्तम भट्टी जमली तर फर्स्ट हाफ तरी अफलातून होईल.
नंतर सुरू होतो ‘एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास’ थेट पुन्हा गिरणी संपाची पाश्र्वभूमी. बाहेर गिरणी संपाचा लढा तर चाळीत चाळीतल्या संडासावर ताबा मिळवण्याच्या कुरघोड्या अशा दोन घटना आपण समांतर पाहतो. संपाच्या लढ्याचा वेदनादायी निकाल बहुतेकांना माहितीच आहे पण या चाळीतल्या दुसऱ्या तुंबळ युद्धाचं नेमकं काय होतं यासाठी ही कथा वाचावी लागेल.
सातवी म्हणजे अगदी शेवटची कथा म्हणजे
‘छटाकभर रात्र आणि तुकडा तुकडा चंद्र ‘ आयुष्याच्या छटाकभर रात्री ज्यांनी बारमध्ये घालवल्या त्यांना तुकड्या तुकड्यात दिसलेल्या एका चंद्राविषयी हे लिहिलं आहे. तीन कवी आणि एका गूढ कथा लेखकाच्या आसपास ही कथा फिरते. एकच गोष्ट त्यांना निरनिराळी दिसते, सत्याचा शोध घेत घेत अंतिम सत्य उरते ते म्हणजे मृत्यू. या कथेत नेमका निवेदक कोण याचा गल्लत होते आणि तळटीप वाचून तर गुंता अधिकच वाढतो. ही कथा वाचून मी प्रस्तावनेकडे वळलो काही तिरबागडं लिहिलं जाऊ नये म्हणून.
निखिलेश चित्रे यांची प्रस्तावना अत्यंत अभ्यासूपणे लिहिली आहे. आणि खरोखर वाचतांना किंवा वाचल्यानंतरही आपल्याला उमगलेल्या अर्थाचा पडताळा करण्यासाठी ही विस्तृत आणि मुद्देसूद प्रस्तावना कथेतल्या वास्तवाच्या भावनिक दाहावर फिरणारं हळुवार मोरपीस ठरतं.
सात कथांचे सात सूर वेगवेगळ्या संवेदनांना हात घालतात. पण सूरांना घट्ट पकडून ठेवलेल्या या कथा एका भन्नाट मैफलीचा आपल्याला आनंद देतात. या राखेतून उठलेल्या मोरपिसाऱ्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या छटा दिसतात, ज्यामुळे कधी विचारांचं काळोखं मळभ दाटतं, तर कधी आतल्या पडझडीत काहीतरी संततधार चिंब कोसळत राहतं.
परिचय : श्री प्रसाद साळुंखे
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9664027127
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “गड्या आपला गाव बरा” – लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : गड्या आपला गाव बरा
लेखक : ॲड. अजित लक्ष्मण पुरोहित, मो. 9637730625
प्रकाशक :सरस्वती प्रकाशन
कोकळे
☆ गड्या आपला गाव बरा… बरा नव्हे उत्तमच! – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करुन इतिहास लिहीणे हा एक स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या आठवणी एकत्र करुन आणि त्यामध्ये इतरांनी सांगितलेल्या विश्वासार्ह माहितीची भर घालून एक महत्वाचा दस्तावेज तयार करणे हे ही तितकेच अवघड व कौशल्यपूर्ण काम आहे. हे काम केले आहे ॲड. अजित पुरोहित यांनी. माता आणि माती म्हणजेच मातृभूमी या दोन्हीही आपल्यासाठी वंदनीय आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मातेविषयीच्या आठवणी भिन्न भिन्न असू शकतात. त्यांच्यातील कौटुंबिक नाते व त्यातून निर्माण होणारे मर्मबंध वेगळ्या स्वरुपाचे असू शकतात. पण जी अनेकांची माता आहे त्या मातृभूमीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आपला दृष्टिकोन कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता अधिक व्यापक ठेवावा लागतो. एकाच मातीत रमलेलं एक खूप मोठं कुटुंब म्हणजे आपलं गाव. आयुष्याचा दीर्घ प्रवास झाल्यानंतर या गावाकडे वळून पाहताना, गावाविषयी, तेथील लोक व लोकजीवन याविषयी जे जे वाटलं, समजलं ते लिहून काढताना गावाचचं एक सुंदर ‘व्यक्तिचित्र ‘ रेखाटण्याचं काम ॲड. पुरोहित यांनी केलं आहे. त्यांनी लिहीलेले ‘ गड्या आपला गाव बरा ‘ हे पुस्तक नुकतेच वाचून झाले. कोणतं आहे हे गाव आणि काय लिहीले आहे त्याविषयी हे सांगण्याचा हा एक प्रयत्न.
सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे हे ॲड. पुरोहितांचे गाव. सांगलीच्या पूर्वेला, ६५ कि. मी. अंतरावर, सुमारे साडेचारहजार लोकवस्तीचे हे गाव. या गावाविषयी लिहीताना त्यांनी पुस्तकाची मांडणी अत्यंत नियोजनबद्ध केलेली आहे. सुरुवातीलाच या गावाचे भौगोलिक स्थान सांगून ते कर्नाटकच्या खूप जवळ असल्यामुळे, भाषा, संस्कृती, व्यक्तींची नावे अशा अनेक बाबतीत कन्नड छाप पडलेली आहे हे ते स्पष्ट करतात. पुढे पुस्तक वाचताना आपल्याला याचे प्रत्यंतर येते.
या पुस्तकात एकूण वीस प्रकरणे आहेत. या गावाची श्रद्धास्थानं, धार्मिक सप्ताह, यात्रा, सांस्कृतिक परंपरा, वाड्या-वस्त्या, शेती, शिक्षण, नाट्यपरंपरा, खेळ अशा विविध पैलूंचा विचार करण्यासाठी स्वतंत्र प्रकरणे आहेत. याशिवाय येथील कर्तृत्ववान व्यक्ती, जीवसृष्टी, गावचा ओढा, १९७२ चा दुष्काळ व त्याचे झालेले परिणाम आणि कोरोनाचे आलेले संकट या सर्वांविषयी त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात २१ दिवसांच्या लाॅकडाऊनच्या काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
गावाच्या श्रद्धास्थानांविषयी लिहिताना त्यांनी श्री हनुमान, बसवेश्वर, ग्रामदैवत यल्लम्मा म्हणजेच रेणुकादेवी, परशुराम, मायाक्का, लक्ष्मी, मरगुबाई, म्हसोबा, बालाजी यांबरोबरच यमनूर पीर, चिंध्यापीर, मिरासाहेब दर्गा यांविषयी माहिती देऊन गावातील धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे. देव हा आयुष्यात संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असतो अशी श्रद्धा असणारे लोक आजही आहेत व म्हणून ही श्रद्धास्थाने आजही पहायला मिळतात.
१९७२ पर्यंत जीवंत असलेल्या गावच्या ओढ्याबद्दल त्यांनी सविस्तरपणे लिहीले आहे. ग्रामीण लोकजीवन हे ओढ्यातील पाण्यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांनी हे अत्यंत आत्मियतेने लिहीले आहे. ओढ्याची पूर्वीची स्थिती, गावठाणाची जागा, आजुबाजूची झाडे व वनस्पती, नंतर बांधलेले पूल, ७२ च्या दुष्काळानंतर झालेली अवस्था, अलिकडेच बांधलेले बंधारे अशा अनेक विषयांचा आढावा घेत ओढ्याच्या आजच्या अवस्थेविषयी ते हळहळ व्यक्त करतात.
गतकाळातील ‘सप्ता ‘ म्हणजेच सप्ताह कसा असायचा याचेही त्यांनी छान वर्णन केले आहे. बदलत्या काळात त्याचे स्वरुप बदलले, महत्व कमी झाले. तरीही परंपरा चालू ठेवणारे काही लोक अजूनही गावात आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात भरणा-या गावच्या यात्रेनिमित्त ते म्हणतात की पूर्वीची यात्रा आणि आताची यात्रा यात फार बदल झाला आहे. म्हणूनच हे प्रकरण वाचण्यासारखे आहे. कारण त्याशिवाय पूर्वीची यात्रा कशी होती ते समजणार नाही. शिवाय जत्रेतील काही विशिष्ट कार्यक्रम किंवा विधी म्हणजे काय हे ही समजणार नाही. उदा. कीच, बोनी, वालगे, लिंब नेसणे, मुले उधळणे हे सर्व वाचल्याशिवाय कसे समजेल?
‘जगण्यासाठी सर्व काही ‘ या प्रकरणात लेखकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्रण केले आहे. बारा बलुतेदार, कुटीरोद्योग, लघुउद्योग हे सर्व मुख्य शेतीव्यवसायाशी कसे निगडीत व पूरक होते हे समजून घेण्यासारखे आहे. यातही स्थित्यंतरे होत गेली. त्याचीही नोंद लेखकाने घेतली आहे. कष्ट करण्याची फारशी तयारी नाही, कमी कष्टात कमी वेळेत भरपूर पैसा मिळावा आणि वाढत जाणारी स्पर्धा यामुळे पूर्वीचे चित्र बदलले आहे. पण सर्वांनी विचार केला तर गाव परिपूर्ण होईल अशीही त्यांना आशा आहे.
‘शेती’ या प्रकरणात सुरुवातीलाच ‘कोकळे ‘ हे गावाचे नाव कसे पडले असावे याचा अंदाज लेखकाने व्यक्त केला आहे. कोकळ्यातील हळद, केळ, ऊस, पानमळे, बागायती शेती, गु-हाळे, भाजीपाला, फळबागा याविषयीचे लेखन वाचताना त्यांनी सगळ्या शेतातूनच फिरवून आणले आहे असे वाटते.
गावातील सांस्कृतिक परंपरांविषयी त्यांनी लिहिले आहे. गोकुळाष्टमी, नागपंचमी, खंडेनवमी यासारख्या सणातील पारंपारिक खेळ, गाणी, विधी यांचे वर्णन वाचायला मिळते. अलिकडच्या काळात महापुरुषांचे स्मरण करण्याच्या निमित्तानेही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. काही पारंपारिक गीतेही त्यांनी या प्रकरणात दिली आहेत.
सर्वसाधारणपणे खेडेगाव म्हटलं की मनोरंजनासाठी तमाशा हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण कोकळ्याचे रहिवासी नाट्यवेडे आहेत हे वाचून आश्चर्य वाटत. कोकळ्याला असलेली नाट्यपरंपरा, तिथले स्थानिक कलाकार, तिथे बसवलेली नाटके, कधी मशिदीच्या कट्ट्यावर तर कधी बॅरलचे केलेले स्टेज अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत कोकळ्याचा नाट्यसृष्टीपट लेखकाने आपल्या डोळ्यासमोर मांडला आहे. परगावाहून येणा-या स्त्री कलाकारांनीही कोकळेकरांचे कौतुक केले आहे हे रसिकतेला प्रमाणपत्रच मिळाल्यासारखे आहे.
कोकळ्यात प्राथमिक शाळा सुमारे ९० वर्षांपूर्वी सुरु झाली. त्यामुळे या गावाला शैक्षणिक परंपराही आहे. देवळात किंवा एखाद्या वाड्यात शाळा भरवली जायची. शिक्षक परगावाहून आले तरी गावातच सहकुटुंब रहायचे. पहिली ते चौथी एकच शिक्षक असायचे. शाळेची स्वच्छता, छोटेसे ऑफिस तेही एका वर्गातच, दर वारी म्हणायच्या प्रार्थना हे सर्व वाचताना त्या काळातील शाळेची कल्पना येते. शाळेच्या सहली, सेंटरच्या परीक्षा, त्या शिवाय चित्रकला, हिंदी, गणित अशा बाहेरच्या संस्थांच्या परीक्षाही होत असत. शैक्षणिक प्रगतीमुळे मुला मुलींच्या वेगवेगळ्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. महिला प्रौढ शिक्षण वर्ग ही सुरु झाले. शैक्षणिक वातावरण चांगले असल्यामुळेच या गावाने अनेक इंजिनिअर, डाॅक्टर, वकील, न्यायाधीश, सरकारी नोकर दिले आहेत.
शिक्षणाबरोबरच खेळाच्या क्षेत्रात काय परिस्थिती होती याविषयीही लेखकाने लिहीले आहे. पूर्वी तालमी असत. कुस्तीगिर परिषदेकडून सत्कार झालेले पहिलवान या गावाने दिले आहेत. सुरफाट्या, चिन्नीदांडू, लगोरी, भोवरा, गोट्या, लंगडी, काचाकवड्या यासारख्या बिनभांडवली खेळाबरोबरच व्हाॅलीबाॅल, बुद्धीबळ अशा खेळांनाही गावाने आपलेसे केले आहे.
काही कारणानी किंवा पोट भरण्याचा व्यवसाय म्हणून गावात काही मंडळी नियमितपणे यायची. त्यांना लेखकाने ‘ पाहुणे’ असे म्हटले आहे. हे पाहुणे म्हणजे गारुडी, दरवेशी, हेळवी, डोंबारी, माकडवाले, बहुरुपी, तांबट, पिंगळा, मोतीवाले, छत्रीवाले इत्यादी इत्यादी. हे आता दुर्मिळ होत चालल्यामुळे वाचनातूनच त्यांच्याविषयी माहिती मिळू शकते.
विविध क्षेत्रात नाव कमावून गावचा झेंडा फडकवणा-या कर्तृत्ववान कोकळेकरांचा परिचयही लेखकाने करुन दिला आहे.
अशाप्रकारे आपल्या गावाविषयी लिहीताना लेखकाला काय लिहू आणि काय नको असे झाले आहे.. त्यांनी वाड्या, वस्त्यांविषयी लिहीले आहे. एवढेच नव्हे तर पशू, पक्षी, किटक, झाडे अशा जीवसृष्टीवरही लिहीले आहे.
आणि चुकून काही राहू नये म्हणून ‘उरलं सुरलं ‘ या प्रकरणात अनेक लहान सहान गोष्टी व त्यात होत गेलेले बदल यांवर लिहीले आहे.
कोरोना काळात या पुस्तकाचे बरेचसे लेखन झाल्यामुळे त्या कटू आठवणींचा उल्लेख करुन आपले गावाविषयीचे लेखन त्यांनी थांबवले आहे.
शेतात न जाता शेताच्या बांधावरून फिरताना शेताची साधारण कल्पना येते. पण संपूर्ण शेत नजरेसमोर येत नाही. पुस्तकाच्या या परिचयाचेही तसेच आहे. खूप सांगण्यासारखे आहे. पण शेवटी लेखन मर्यादा आहे. म्हणून पुस्तक वाचण्याला पर्याय नाही. ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणारे एक खेडे व त्याची माहिती म्हणून या पुस्तकाकडे पाहिले तर तर इंडिया नव्हे तर भारताविषयी कल्पना येऊ शकेल. ग्रामीण भागाशी संबंध असणा-यांना हे गाव आपले वाटेल आणि ग्रामीण भागाशी संबंध नसणा-यांना ‘गाव’ समजून घेता येईल.
” निशिदिनी नित्य जन्मुनी मरण सोसावे परी कोकळ्यातच पुन्हा जन्मा यावे “
– – – असे म्हणणाऱ्या ॲड. अजित पुरोहित यांचे हे पुस्तक अन्य ‘गावक-यांना’ स्वतःच्या गावाविषयी लिहायला उद्युक्त करो हीच सदिच्छा!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ लाख मोलाचा जीव – लेखक- डॉ. अरुण लिमये – सहलेखन व संपादन : उषा मेहता ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
पुस्तक : लाख मोलाचा जीव
लेखक : डॉ. अरुण लिमये
सहलेखन व संपादन : उषा मेहता
ग्रंथाली प्रकाशन
एकूण पृष्ठे-३००
किंमत (जुनी आवृत्ती)-९०₹
माणसाचा जन्म दुर्मिळ आहे. मागील जन्मी आपण भले/बरे कसे वागलो हे माहीत नसते म्हणून या जन्मात आपण चांगलं वागलं पाहिजे, सत्कर्म केली पाहिजेत आणि संसाररूपी दुःखातून मोक्ष, मुक्ती मिळवायला हवी असे आपली संत परंपरा सांगते. मोक्ष मुक्ती मिळो न मिळो पण माणूस म्हणून आपण नक्कीच चांगलं जीवन जगायला हवे आणि ते जगताना इतरांनाही ते जगण्यासाठी मदत करायला हवी, हीच खरी मानवतेची शिकवण, हाच माणुसकीचा धर्म. पण खरेच हा धर्म सर्वजण पाळतात? ही शिकवण आचरणात आणतात? याचं उत्तर ‘नाही’असंच येतं. आपला जीव अडचणीत येतो, तेव्हा तो किती बहुमोल आहे हे लक्षात येतं पण तोवर वेळ निघून गेलेली असते, बरेच काही करायचे आणि उपभोगायचे राहूनच जाते. त्यावेळची मनःस्थिती ज्यावर ही वेळ आली त्यालाच समजते. बाकीचे सर्व अमर असल्यासारखे जीवन जगतात.
‘युक्रांद’चे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘क्लोरोफार्म’चे लेखक डॉ. अरुण लिमये यांचे’लाखमोलाचा जीव’हे पुस्तक असेच हृदयस्पर्शी. जीव लाखमोलाचा आहेच तो या कारणास्तव की तो एकदा गेला की परत मिळत नाही, दुसरे यासाठी की शरीराला एखादा दुर्धर आजार झाला की जीव वाचवण्यासाठी उपचारार्थ लाखों रुपये मोजावे लागतात. ‘health is wealth’चा हाही एक व्यवहारी अर्थ आहेच. ज्याची आर्थिक परिस्थिती उपचाराला पैसे खर्च करण्याइतपत असते, ते जीव जगवण्याचा प्रयत्न करतात, यशस्वी/अयशस्वी होतात मात्र ज्यांची आर्थिक स्थिती नसेल त्यांची मनःस्थिती, मनाची घालमेल किती होत असेल?
कॅन्सरची शंका, तपासण्या आणि निदान झाल्यानंतर उपचार सुरू झाल्यानंतर जीवाचे होणारे हाल, डोळ्यासमोर क्षणाक्षणाला दिसणारा मृत्यू तरीही प्रचंड जीवनेच्छा बाळगून सारं काही सोसत जगण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. च्या मानसिक स्थितीचे हृदयस्पर्शी वृत्तांत या पुस्तकात आहे. उपचारासाठी वारंवार परदेशात जावे लागले त्यासाठी करावी लागणारी यातायात, पैशांची जुळवाजुळव, अटेंडंट शोधणे, त्याची पेशंट सोबत राहण्याची मानसिक तयारी होणे या सर्व बाबी आणि इतकं करूनही आपण परत येऊ की नाही? ही अनिश्चितता. उपचारांनंतर होणाऱ्या प्रचंड त्रासाने, आजाराच्या वेदनांनी चिडचिडा झालेला स्वभाव आणि अटेंडंटवर काढलेला सर्व वैताग, पश्चाताप दग्ध मन, कुटुंबियांची काळजी, आठवण, मित्र मैत्रिणींच्या सहवासातले क्षण, त्यांची नाजूक क्षणी येणारी आत्यंतिक आठवण, अशातच पत्नीचे साथ सोडणे, आपल्या सामाजिक कार्याची चिंता ही सर्व आवर्तने मनात प्रत्येक वेळी आदळणे आणि त्यातून येणारी अगतिकता व जीवाची घालमेल याचे वर्णन वाचून वाचक प्रत्यक्ष लेखकासोबत आहे असेच वाटत राहते. उपचाराबरोबरच परदेशातील काही ठिकाणी पर्यटन स्थळांना सुद्धा डॉ. नी भेटी दिल्या, त्याचेही तपशील या पुस्तकात आहेत. त्यामुळं ते चित्र आपल्या डोळ्यासमोर तसेच उभे राहते. पुढं काय? पुढं काय? याची उत्सुकता मनाला ताणते.
अखेर सहा वर्षे कॅन्सरशी निकराने झुंज देऊनही डॉक्टरांची प्राणज्योत मावळलीच. आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा न हारता, न घाबरता आजाराशी चिवट झुंज देत आपली कार्ये होता होईल तेवढी तडीस लावण्याच्या प्रयत्नांना वाचक मनोमन सलाम करतो.
१९८६-८७ला मी आठवी नववीत असताना प्रथम मोठ्या भावाने हे पुस्तक आमच्या घरी आणले. त्यातली सुरुवातीची काही पाने त्याच्याबरोबरच मी वाचली होती. तो पुस्तक सोबत घेऊन गेला न मी त्या पानावरच थांबले. त्यानंतर ते पुस्तक वाचायचं म्हणलं तरी मिळालं नाही. पुढं पुस्तकाचं अर्ध नाव, लेखकाचं अर्ध नाव मी विसरले आणि पुस्तक मिळवायचं अवघड झालं. आता सहजच भावाला त्यासंबंधी विचारलं तर त्याने लगेचच काढून दिलं. पण जुनी आवृत्ती, अक्षर लहान त्यामुळं वाचायला गोडी लागेना. त्यातच लेखनात एकसंघता नाही. त्यामुळं तुकड्या तुकड्यात वाचताना मनाचा विरस होतो. संपादक उषा मेहता या डॉक्टरांच्या शेवटच्या दिवसाअगोदर अटेंडंस म्हणून सोबत राहिल्या होत्या. त्यामुळं त्यांनीही डॉक्टरांच्या आजारपणातील हाल पाहिले होते, जवळचा मित्र असल्याने स्वभावातील बारकावे सुद्धा टिपणे त्यांना सहज शक्य झाले. त्यांच्या जाण्याने आप्तेष्ट, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, त्यांचे सर्व रुग्णांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. एक डॉक्टर म्हणून एक माणूस म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वैविध्य आहे.
चांगल्या माणसांना अल्पायुष्य असते असेच इतिहास नेहमी सांगत आला आहे आणि डॉक्टर अरुण लिमये सुद्धा अपवाद नाहीत.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील लेखकाच्या जीवन कथेला अतिशय साजेसे आहे. तेजस्वी सूर्याला ग्रहण लागल्याचे चित्र हेच दर्शवते की एका प्रखर व्यक्तिमत्वाच्या जीवाला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेय आणि त्याची आभा झाकोळलीय. बरेचदा आपल्याला चांगली पुस्तकं नेमकी कुठली? ते समजत नाही कारण इतरांनी वाचलेली, शिफारस केलेलीच आपल्याला माहीत होतात, पण कधीतरी आपल्या हाती अवचित एखादं पुस्तक हातात पडतं आणि स्वानुभवाने आपल्याला कळतं नेमकी कोणती पुस्तकं वाचायला हवीत?
…. ‘ लाखमोलाचा जीव ‘ त्यातीलच एक होय.
परिचय :सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “डायरीतील कोरी पाने ” – लेखक : श्री अरविंद लिमये ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक- डायरीतील कोरी पाने (कथासंग्रह)
लेखक – अरविंद लिमये
प्रकाशन – अमित प्रकाशन
पृष्ठे – २००
मूल्य – ३८० रु.
नुकतीच डायरीतील कोरी पाने ‘ पाहिली ‘. पण, ती कोरी होतीच कुठे? त्यावर नानाविध कथांचे नाना रंग उधळले होते. प्रत्येक ठिपका म्हणजे जीवनाचा एकेक तुकडाच. हा कथासंग्रह आहे सुप्रसिद्ध कथालेखक अरविंद लिमये यांचा. साधी-सोपी भाषा, सहज संवाद, उत्कटता, गतिमानता अशी काही वैशिष्ट्ये या कथांची सांगता येतील. संस्कारक्षमता हे मूल्य बहुतेक सगळ्या कथेतून व्यक्त होत असलं, तरी कुठे कुठे हे संस्कार उघडपणे व्यक्त होतात, कुठे कुठे ते सहजपणे नकळत व्यक्त होतात. या १७ कथांमधील बहुतेक कथा नायिकाप्रधान आहेत.
श्री अरविंद लिमये
पहिलीच कथा आहे ‘हँडल विथ केअर’. ही कथा सविता, तिचे वडील अण्णा, तिचे दादा-वाहिनी यांच्याभोवती गुंफलेली. आई गेल्यावर तिचे दादा-वहिनी अण्णांना त्रास देतात, कष्ट करायला लावतात, असा तिचा समज. ती जाब विचारायला म्हणून गावी येते. त्यानंतर संध्याकाळी ती अण्णांबरोबर देवाला जाते. तिथे अण्णा तिचा समज हा गैरसमज असल्याचे पटवून देतात आणि म्हणतात, ‘नाती जवळची-लांबची कशीही असोत, ती नाजूकच असतात. त्यांना ‘हँडल विथ केअर’ हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं. तरच ती हलक्या हाताने जपता येतात. कथेचा शेवट अर्थातच गोड. कसा? त्यासाठी कथा वाचायलाच हवी.
‘अक्षयदान’ मधील वैभवीची आई आणि ‘त्या दोघी’ मधील सुवर्णाची आई.. दोघीही ग्रामीण, दरिद्री, कष्टकरी, ज्यांना आपण सर्वजण अडाणी म्हणतो अशा. पण त्यांचं शहाणपण लेखकाने वरील कथांमधून मांडले आहे. केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला हवं, असे संस्कार वैभवीची आई रुजवते. तर ‘त्या दोघी’ मधील ‘मी इतक्यात लग्न करणार नाही. खूप शिकणार आणि स्वत:च्या पायावर उभी रहाणार’ असे म्हणणाऱ्या निग्रही सुवर्णाच्या मागे तिची आई ठामपणे उभी रहाते. सुवर्णा पैसे मिळवायला लागल्यावर घरी पैसे पाठवते, तेव्हा मात्र तीच आई निग्रहाने सांगते, ‘एकदा पैशाची चव चाखली आमी, तर नंतर कष्ट नको वाटतील. ’ आपल्या दोन्ही मुलांनाही ती म्हणते, ‘ताईचे पैसे घ्यायचे नाहीत. तिच्यासारखे कष्ट करा आणि तुम्ही मोठे व्हा. ’
‘आनंद शोधताना’ कथेचा नायक रोहन. त्याची बँकेच्या रूरल ब्रँचमध्ये मॅनेजरच्या पदावर बदली होते. नव्या वातावरणाशी तो जुळवून घेत असताना, त्याला दिसतं, की एक वयस्क पेन्शनर ३ नंबरचे टोकन दिले की बिथरतात. स्टाफ मग मुद्दामच त्यांना ३ नंबरचे टोकन देऊन बिथरवतात आणि आपली करमणूक करून घेतात. रोहन मात्र तसं न करता ते कारण समजून घेतो. त्यांच्या व्यथा-वेदनांची कहाणी ऐकतो. त्यांना सहानुभूती दाखवतो. ते कारण कोणतं, हे कथेतच वाचायला हवं. त्याला निघताना आईचं बोलणं आठवतं. ’आनंद मिळवण्यासाठी मुळीच आटापिटा करू नकोस. मनापासून आणि जबाबदारीने तू तुझं काम कर. ते केल्याचाही एक वेगळाच आनंद असतो. ’ हा आनंद रोहन, त्या आजोबांना मदत करून मिळवतो.
‘काही खरं नव्हे’ ही गूढ कथा आहे. याची सुरुवातच बघा… ‘मृत्यूचं काही खरं नाही. तो चकवा दिल्यासारखा चोर पावलांनी कसा, कुठून येईल आणि कधी झडप घालेल, सांगताच येत नाही. ज्या क्षणी तो येतो, त्याच क्षणी होत्याचं नव्हतं करून टाकतो. ’.. माधवराव आणि मालतीबाईंची ही कथा. त्यांचं वानप्रस्थातलं रखरखीत सहजीवन. एक दिवस माधवरावांना कांद्याची भजी खायची तीव्र इच्छा होते. दोघांच्या या विषयावरील बोलाचालीनंतर दुपारी चहाच्या वेळी भजी करायचं मालतीबाई मान्य करतात. जेवण करून माधवराव झोपतात आणि त्यांना अनेक भास होऊ लागतात. पत्नी मेलीय. शेजाऱ्यांच्या मदतीने अंत्यविधी केले, रात्री मुलगा-सून आले. त्यांच्या बोलण्यातून आई आहे असं जाणवतं. माधवराव चक्रावतात. आणि कथेचा शेवट – अगदी अनपेक्षितसा. वाचायलाच हवा असा. लेखकाचं कौशल्य हे की, प्रत्यक्ष लेखनात ते माधवरावांचे भास न वाटता वास्तव प्रसंग आहेत, असंच वाटतं. एक उत्तम जमलेली कथा असं या कथेचं वर्णन करता येईल.
‘आतला आवाज’ ही कथा, अभि, समीर आणि अश्विनी या तीन मित्रांची. ते तिघे कॅम्पस इंटरव्ह्यूतून निवड होऊन ‘कॅम्बे’ ही आय टी कंपनी जॉईन करतात. इथे त्यांच्या बरोबरीचाच असलेला सौरभ त्यांचा बॉस आहे. त्याचेही यांच्याशी मित्रत्वाचे संबंध जुळतात. समीर तर त्याचा खास जवळचा मित्र होतो. पण पुढे प्रमोशनसाठी नावाची शिफारस करायची असते तेव्हा तो समीरऐवजी अश्विनीची शिफारस करतो. का? ते कथेत वाचायला हवं. समीर बिथरतो, अश्विनीने प्रमोशन नाकारावं म्हणून तिला गळ घालतो. त्यासाठी अनेक खरी-खोटी कारणे देतो. अश्विनी मान्यही करते, पण त्याने सांगितलेले एकेक कारण खोडत म्हणते, ‘तू जे बोलतोयस, त्याच्यामागे स्वार्थातला ‘स्व’ आहे की ’स्व’त्वातला ‘स्व’ आहे? तुझा ‘आतला आवाज’ काय सांगतोय? मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. ’ समीरला आपला आतला आवाज क्षीणपणे कण्हतोय, असं वाटू लागतं. या कथेत चौघांचेही मनोविश्लेषण करणारे संवाद लिहिणं आव्हानात्मक होतं, पण लेखकाने ते लीलया पेलले आहे.
‘झुळूक’ या कथेमध्ये, डॉ. मिस्त्रींचं, तर ‘निसटून गेलेलं बरंच काही’ मध्ये पेईंग गेस्ट ठेवून चरितार्थ चालवणाऱ्या आणि दीड-दोन वर्षे लेखकाला जेवूही घालणाऱ्या काकूंचे शब्दचित्र रेखाटले आहे. या दोघांचा आणि लेखकाचा सहवास अल्पच, पण या दोन्ही व्यक्ती आठवणीत रेंगाळत रहाणाऱ्या. त्या तशा का, हे कथा वाचूनच कळेल.
‘डायरीतील कोरी पाने’ कथेची सुरुवात अशी …. नंदनाला डायरी लिहिण्याची सवय असते. सासरी गेल्यावर ती एकच दिवस डायरी लिहिते. नंतर तिला वाटतं, ‘आपण खरं खुरं लिहिलेलं राहूलच्या वाचनात आलं तर?’ मग ती डायरी लिहिणंच बंद करते. सासरी सगळं आलबेल आहे असं तिला वाटतं, पण तसं ते नसतं. तिला तिची मोठी जाऊ प्रभा आक्रस्ताळी, विचित्र वागणारी-बोलणारी वाटते. एकदा नंदना आणि ती मोकळेपणाने बोलताना, प्रभाच्या वागण्या -बोलण्यामागचं कारण तिला कळतं. ‘या घरात हिसकावून घेतल्याशिवाय काही मिळणार नाही’, असा आपला अनुभव प्रभा तिला सांगते. तिला आनंद मिळेल, असं घरात कुणी कधी वागलेलंच नसतं. ती आपली कर्मकहाणी नंदनाला ऐकवते. त्यांच्या कुटुंबाला वेगळं काढायचं घरात घाटत असतं. नंदना रात्री राहूलशी प्रभावहिनींबद्दल सविस्तर बोलते आणि म्हणते, ‘आपण त्यांना वेगळं करण्यात सहभागी व्हायला नको’ राहूल मान्य करतो. त्याला तिचं हे रूप विशेष भावतं. नंदनाला वाटतं, ‘डायरीतील मधली कोरी पाने’ मनासारखी लिहून झालीत. ’
‘ पत्र ’ आणि ‘फिनिक्स’ कथांमधील नाट्यमयता विशेष लक्ष वेधून घेते.
खरं तर यातील सगळ्याच कथांमधील संवाद वाचत असताना आणि प्रसंगांचे वर्णन वाचत असताना असं वाटतं, की यात नाट्य आहे. याचं नाटकात माध्यमांतर चांगलं होईल. यापैकी पत्र, अॅप्रोच, काही खरं नव्हे, या कथांवर लेखकाने एकांकिका लिहिल्या आहेत, व त्यांचं सादरीकरणही लवकरच अपेक्षित आहे. ‘वाट चुकलेले माकड’ या कथेवर बालनाट्य लिहिले आहे व ते सादरही झाले आहे.
‘देव साक्षीला होता’ ही महार जातीच्या बबन्याची करूण कहाणी हृदयद्रावक. ऑपरेशन करून घरी परतताना अचानक मोठा पाऊस येतो. इतरांप्रमाणे त्याला शाळेपर्यंत पळवत नाही, म्हणून तो जवळच्या देवळात आश्रय घेतो, तेव्हा लोक ‘म्हारड्याने देव बाटवला’ म्हणून त्याच्यावर दगडांचा वर्षाव करतात आणि त्याचा जीव घेतात.
‘एकमेक’ ही १७ वी आणि शेवटची कथा. यातील नायिका साधी, सरळ, समाधानी. कसलाच आग्रह नसलेली, आणि निर्णयक्षमताही नसलेली.. पण जेव्हा तिच्यावर संकट कोसळते, तेव्हा ती कशी खंबीरपणे उभी रहाते, संकटाचा मुकाबला करत रहाते, सगळं कसं धीराने घेते, आणि त्याचं श्रेयही मुलांना आणि शय्येवर पडून राहिलेल्या अपंग नवऱ्याला देते, हे सगळं सांगणारी ही कथा.. नेमकी प्रसंगयोजना आणि उत्कट संवाद यामुळे चांगलीच लक्षात रहाते.
यातील अनेक कथा पूर्वप्रसिद्ध आहेत. ‘अक्षयदान’, ‘हॅण्डल विथ केअर’, अॅप्रोच’ या तीन कथांना ‘विपुलश्री’ या दर्जेदार मासिकाच्या कथास्पर्धांमधे पुरस्कारही मिळालेले आहेत.
सर्वांनी आवर्जून वाचावा आणि कथावाचनाचा आनंद घ्यावा, असाच हा संग्रह …. ‘डायरीतील कोरी पाने !’
परिचय –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ माझा साक्षात्कारी हृदयरोग – लेखक- डॉ. अभय बंग ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
पुस्तक – माझा साक्षात्कारी हृदयरोग
लेखक – डॉ. अभय बंग
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
एकूण पृष्ठे-१७३
किंमत-१२५₹
एखादे यंत्र बंद पडत नाही किंवा चालायचे बंद होत नाही तोवर आपण तिकडं लक्ष देत नाही मात्र यंत्र कुरकुर करू लागले, बंद पडले की आपण त्याची दुरुस्ती, तेल पाणी करतो. त्याचे सांधे फारच खिळखिळे झाले असतील, झिजले असतील तर ते दुरुस्त होत नाही मग पर्यायी अवयव जोडून मशीन चालू करतो;अगदी तसेच आपल्या शरीराचे देखील नाही काय? शरीररुपी गाडी चालते, पळते तोवर आपण ती चालवतो, पळवतो अगदी थकेपर्यंत मग गाडीला घुणा लागतो न गाडी थांबते, अर्थात एखादा आजार बळावतो न मग आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो, आरोग्याबाबत सजग होतो. आजार छोटा असेल तर जगण्याची संधी मिळते, अवयव प्रत्यारोपण होऊन नवजीवन मिळते, अन्यथा आपल्या निष्काळजीपणाने आपलं आयुष्य संपते आणि जगायचं राहूनच जातं.
‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’हे पुस्तक हेच तर सांगतं. डॉ. अभय बंगाबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहेच. त्यांचे आदिवासी कुपोषित बालकांसाठी केलेले काम आणि अजूनही समाजसेवेत व्यग्र असणारे डॉ. अभय बंग याना हृदय विकार झाल्यावर आलेल्या अनुभवांचे हे यथार्थ चित्रण आहे.
एक दिवस सकाळी चालता चालता त्यांना एकदम छातीत दुखू लागलं न पुढं लगेच हृदयविकाराचा झटका आला. उपचार व दवाखान्यातील वास्तव्य या दरम्यान त्यांनी स्वतःला का झटका आला असावा याचे केलेले आत्मपरीक्षण आणि अवलोकन म्हणजे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग. ‘साक्षात्कारी अशा साठी की आत्मपरीक्षण आणि उपचारादरम्यान त्यांना ज्या गोष्टींचा उलगडा झाला, तो म्हणजे साक्षात्कार. गांधीजींनी जसे सत्याचे प्रयोग स्वतःवर केले तसेच डॉ. नी सुद्धा. झटका, त्यानंतर झालेल्या गुंतागुंतीच्या समस्या आणि दृढ झालेली ईश्वरावरील श्रद्धा याचा लेखाजोखा म्हणजे त्यांचे हे छोटेसे पुस्तक आहे.
आपल्याला का बरं झटका आला असावा? असा ते स्वतःशीच प्रश्न करतात. कारण त्यांची प्रकृती अतिशय कृश होती त्यामुळं तेही भ्रमात होते की आपल्याला असे काही होणार नाही. पण भ्रम फुटला, दैव बलवत्तर म्हणून दोनदा या जीवघेण्या संकटातून ते वाचले, शस्त्रक्रिये दरम्यान गुंतागुंत झाली.
दवाखान्यात ऍडमिट असताना ते स्वतःचा, त्यांच्या आरोग्याचा आणि दररोजच्या जीवनशैलीचा मागोवा घेताना आपण आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले लक्षात आले. याचबरोबर स्वप्नांचा पाठपुरावा करताना स्वप्न पूर्ण करताना होणारी दमछाक, पुरेशी झोप न घेणे आणि व्यायामाचा अभाव या गोष्टी निदर्शनास आल्या. त्याचबरोबर चुकीची आहारपद्धती सुद्धा हृदयविकार होण्यास कारणीभूत असलेली समजली. म्हणजेच या तीनही गोष्टी हातात हात घालून हृदयविकार होण्याकडे वाटचाल करतात. झटका येण्यागोदरची सुद्धा काही प्राथमिक लक्षणे डॉ नी दुर्लक्षित केलेली, या सर्वांचा परिपाक म्हणजे तीव्र झटका आणि शस्त्रक्रिया.
स्वतःवर ओढवलेल्या या प्रसंगातून वाचण्यासाठी आणि इतरांनाही काही गोष्टी माहीत होण्यासाठी डॉक्टरांनी सखोल माहिती घेऊन हृदयविकाराबद्दल आपल्या मित्रपरिवारात जागृती केली. त्यांचे हे मार्गदर्शनपर लेख दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले आणि पुढं ते पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले.
निरोगी राहण्यासाठी, हृदयविकार होण्यापासून वाचण्यासाठी त्यांनी दिलेले सल्ले आणि मार्गदर्शन बहुमोल आहे. सर्वच स्तरातील व्यक्तींना हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. अगदी छोटेसे पुस्तक आहे पण त्यातील अनुभव आणि मार्गदर्शनाचा उपयोग आपण नेहमीच्या दैनंदिन जीवनात केला तर हृदयरोगापासून आपण दूर राहू. प्रत्येकाने संग्रही ठेऊन वारंवार उजळणी करण्यासारखेच हे पुस्तक आहे.
परिचय :सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आउटलिव्ह” – इंग्रजी लेखक : डॉ. पीटर अटिया / बिल गिफोर्ड – मराठी अनुवाद : डॉ. अजेय हर्डीकर – परिचय : डॉ. मीरा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आउटलिव्ह (दीर्घायुष्यामागची कला आणि विज्ञान)
लेखक : डॉ. पीटर अटिया आणि बिल गिफोर्ड
अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर
पृष्ठे : ३७६
मूल्य: ४००₹
‘‘म्हतारी व्हय, हिंडती फिरती ऱ्हाय, हसती खेयती ऱ्हायजो. ’’ असा लांब आशीर्वाद मला मिळायचा, जेव्हा जेव्हा माझ्या विदर्भातल्या बहिणाआत्याला मी नमस्कार करत असे. लहानपणी मला वाटायचं की ही आत्या ‘‘म्हातारी हो’’ असं का म्हणते? मोठं झाल्यावर ‘म्हातारं होणं’ यातला गर्भितार्थ कळला. या आशीर्वादाचा अन्वयार्थ मात्र डॉ. पीटर अटिया आणि बिल गिफोर्ड यांनी लिहिलेलं ‘आउटलिव्ह द सायन्स अँड आर्ट ऑफ लाँजेविटी’ हे पुस्तक वाचताना उमजला.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक दीर्घायुषी माणसं पाहतो. पण त्यांच्या वयाच्या शेवटच्या दशकात त्यांना स्वत:चं स्वत: उठता येत नाही. ते बाथरूमपर्यंत एकटे जाऊ शकत नाहीत. तर कधी तोल जाऊन बाथरूममध्ये पडतात, पायाचं हाड मोडतं, बिछान्याला जवळ करावं लागतं. हे परावलंबित्व खूप क्लेशकारक असतं. त्या माणसासाठी आणि त्या घरासाठीही. असं दीर्घायुष्य डॉ. अटियांना अभिप्रेत नाही. माझ्या आत्यालाही नव्हतं. यासाठी लेखक इथे दोन संकल्पनांचा ऊहापोह करतात. ‘लाइफ स्पॅन’ म्हणजे जगण्याची लांबी, ‘हेल्थ स्पॅन’ म्हणजे आपल्या आयुष्यातला कुठलाही आजार नसलेला काळ किंवा जगण्याची गुणवत्ता. शरीराच्या आणि आकलनाच्या क्षमता कमी झाल्या की गुणवत्ता घसरते. संपूर्ण पुस्तकभर लेखक ही गुणवत्ता जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याबद्दल विस्ताराने सांगतात त्यामुळे जगण्याची लांबीही आपोआपच वाढेल असं त्यांना वाटतं.
जगभरातले ८० टक्के मृत्यू साधारण चार प्रकारच्या आजारांमुळे होतात. रक्तवाहिन्यांच्या काठिण्यामुळे होणारे आजार (स्ट्रोक, हार्ट अटॅक), चेतासंस्थेचे आजार (स्मृतिभ्रंश), चयापचयाचे आजार (टाइप टू डायबेटिस) आणि कर्करोग. लेखक या आजारांना चार घोडेस्वार म्हणतात. हे घोडेस्वार जेव्हा चाल करून येतात तेव्हा ती पुढे येणाऱ्या महाभयंकर संकटाची नांदी असते.
या चारही प्रकारच्या आजारांना ते एका सामायिक सूत्रात गुंफून त्यांच्या मागचे विज्ञान आपल्यासमोर रंजकतेने मांडतात. वरवर पाहता हे वेगवेगळ्या अवयवांचे आजार दिसत असले तरी यांच्या मुळाशी चयापचयाचे अनारोग्य असते. बिघडलेल्या चयापचयाचे दृश्य स्वरूप म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाइप टू मधुमेह. एकदा का या दोघांनी आपल्या शरीरात पाया घातला की उरलेले आजार त्यावर आपले इमले भराभर चढवतात. लेखक पुस्तकात जागोजागी आपल्याला सांगतात- ‘सावध ऐका पुढल्या हाका’.
जगण्याची गुणवत्ता कायम ठेवत आयुर्मर्यादा वाढवायची तर आपल्याला वर उल्लेखलेल्या आजारांपासून स्वत:ला जास्त काळ दूर ठेवावे लागेल. यासाठी सध्याची आरोग्य व्यवस्था फारशी कामाची नाही, असं त्यांचं मत आहे. आजार झाल्यावर काय करायचं यात ती निष्णात आहे. ती आयुर्मर्यादा वाढवते पण उरलेलं आयुष्य ते आजार आपल्या सोबत राहतात आणि असंख्य प्रकारच्या गोळ्या घेत अप्रत्यक्षपणे फार्मा कंपन्यांचा फायदा करून देत आपण जगतो. आपलं ध्येय जर आजाराविना जास्त काळ जगण्याचं असेल तर आपल्याला यासाठी दूरदृष्टी ठेवून या आजारांनी नेहमीच्या तपासण्यांच्या आरशात आपला चेहरा दाखवण्यापूर्वीच स्वयंप्रेरणेने बरीच वर्षं आधीच उपाय सुरू करावे लागतील.
याच संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा, वेगळा आणि आधी आपल्याला कोणीही न विचारलेला प्रश्न लेखक या पुस्तकातून विचारतात. अशी कोणती दहा दैनंदिन शारीरिक कामं आहेत जी तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या दशकातदेखील करता यावीत असं वाटतं. जसं की कुणाच्याही मदतीशिवाय खालून उठणं, उकीडवं बसणं, नातवंडाला उचलणं, दोन जिने न थांबता चढणं, सामान आणणं, छोटी सुटकेस उंचावरच्या कप्प्यात ठेवणं, सीलबंद जार हाताने फिरवून उघडणं वगैरे. ही यादी प्रत्येकाची वेगळी असेल. या १० कृतींना लेखक ‘सेंटेरियन डेकॅथलॉन’ असं म्हणतात. ऑलिम्पिक खेळांमध्ये दहा वेगवेगळे खेळ एकत्रितपणे खेळण्याला ‘डेकॅथलॉन’ म्हटलं जातं. आयुष्यातही टिकून खेळणं महत्त्वाचं. म्हणून ही दहा कामांची यादी आवश्यक. आपण विचारच केलेला नसतो की आयुष्याच्या शेवटच्या दशकात माझा फिटनेस कसा असेल. कुठल्यातरी दीर्घकालीन आजाराने ग्रस्त राहून थकत जाऊ असाच विचार आपण करतो. पण डॉक्टर अटिया आपल्याला हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतात. हे या पुस्तकाचं महत्वाचं फलित. या १० गोष्टींची यादी आयुष्याच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी, जगण्याच्या गुणवत्तेसाठी एक ठोस ध्येय ठरवायला प्रेरित करते. पानोपानी या प्रवासासाठी उपयुक्त सूचना देत, हे पुस्तक तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला एक चालण्याजोगा मार्ग सांगतं.
दर वर्षागणिक आपली स्नायूंची शक्ती कमी होत जाणार हे कटू सत्य ध्यानात ठेवून वयाच्या ऐंशीच्या दशकात जर मला स्वत:च स्वत: उठायचं आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणाला विरोध करून स्वत:च्या शरीराचं वजन उचलायचं आहे, वर नमूद केलेल्या कृती करायच्या आहेत तर मग त्यासाठी आपण आज काय करायला हवं याविषयी हे पुस्तक सांगू पाहतं. आयुष्यात हा ‘आज’ महत्त्वाचा आहे, मग तुम्ही कितीही वयाचे असलात तरी.
‘‘तुम्ही असंच करा, तुम्ही १०० वर्षं जगाल’’ किंवा ‘‘हेच खा मग फिट राहाल’’ असं कुठलंही पोकळ आश्वासन हे पुस्तक देत नाही. तुमचं उद्दिष्ट आणि तुमचेच प्रयत्न यावर भर देतं. कारण आपण प्रत्येकजण आपली आनुवंशिकता, सवयी, सध्याची स्थिती यात पूर्णपणे वेगळे आहोत. मला एक जुनी कविता आठवली. चित्रकला शिकवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांबद्दलची….
काही शिक्षक म्हणतात मी काढलेलं गिरव.
काही सांगतात मी रंग वापरलेत तसेच वापर
खरा शिक्षक मात्र कोराच कॅन्व्हास हातात देतो.
बाजूला नुसता राहतो उभा,
तुमच्या कल्पनेला पूर्ण मुभा,
चुकल्या वळणावर करतो खूण,
तुमच्या प्रयत्नांना पूर्ण गुण…
अशी सोबत हे पुस्तक करतं. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोरण आखायचं आणि धोरण अमलात आणण्यासाठी साधे उपाय सुरू करायचे अशी तरुण वयापासूनच सातत्याने चालण्याची एक वाट लेखक आपल्या दृष्टिक्षेपात आणून देतात. हे धोरण ठरवण्यामागे विज्ञान आहे आणि ते अमलात आणणं हे कौशल्य. म्हणून या पुस्तकाच्या नावात आहे ‘सायन्स’ अँड ‘आर्ट’ ऑफ लाँजेव्हिटी.
दीर्घायुष्याचा खेळ आरोग्यपूर्ण मार्गाने खेळायचा असेल तर हुकमाचे चार पत्ते डॉक्टर आपल्या हातात देऊ इच्छितात. व्यायाम, झोप, आहार काही औषधं. या गोष्टी काही नवीन नाहीत. पण या चारही बाबतीत हे पुस्तक जे मुद्दे मांडतं त्यांचा समावेश आपल्या डॉक्टरांच्या नेहमीच्या सल्ल्यात सहसा नसतो.
व्यायाम हा हुकमाचा एक्का. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने व्यायाम का करायचा हे ते पहिल्यांदा सांगतात. एखाद्या गोष्टीमागचं ‘का’ समजलं तर ती गोष्ट आपण नेटाने करतो. व्यायाम ही एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्याला हृदयाचं, स्नायूंचं, मनाचं, चयापचयाचं असं साऱ्या प्रकारचं आरोग्य सहज बहाल करू शकते. पेशींच्या पातळीवर व्यायाम आपलं पॉवर हाऊस जास्त पॉवरफुल बनवतं. आपलं शरीर चालायला लागणारी शक्ती प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या मायटोकाँड्रिया नावाच्या पॉवरहाऊसमध्ये तयार होते. व्यायामामुळे सक्षम मायटोकाँड्रिया निर्माण होतात जे ग्लुकोज आणि चरबी दोन्हीपासून ऊर्जा तयार करतात, ज्यामुळे आपली मेटॅबॉलिक हेल्थ चांगली राखली जाते आणि अर्थातच उरलेले आजार फारसे जवळ येत नाहीत. शरीरात जुन्या पेशी मोडीत काढून प्रथिनांची नीट सफाई व्हावी लागते नाहीतर त्यांचे गोळे बनतात. जे पार्किन्सन्स, अल्झायमरसाठी कारणीभूत ठरतात. ही सफाई व्यायामामुळे वेगाने होते.
साधारण तीन प्रकारचे व्यायाम गरजेचे असतात. हृदयाच्या क्षमतेसाठी, स्नायूंच्या शक्तीसाठी, स्थिरता अबाधित ठेवण्यासाठी. पहिल्या प्रकारात चालणं, सायकलिंग, पळणं, पोहणं असे व्यायाम येतात. ते किती तीव्रतेने करायचे याला लेखक फार महत्त्व देतात. ‘‘डॉक्टर म्हणतात म्हणून फिरतो थोडं मी. मग परत येताना कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये नाश्ता पण करून येतो. ’’ असं फिरणं काही कामाचं नाही. व्यायामाची तीव्रता काही झोन्समध्ये विभागली जाते. झोन टूमध्ये आठवड्यातले काही तास तरी व्यायाम करायला हवा. आपण झोन टूमध्ये आहोत का हे सांगणारी एक सोपी पद्धत म्हणजे टॉक टेस्ट. म्हणजे तुम्ही व्यायाम इतक्या तीव्रतेने करायला हवा की तो करताना तुम्ही दुसऱ्याशी बोलू शकता पण ते सहज नसतं. आणि तुम्ही असं बोलणं शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करता. जर तुम्हाला कुणाचा फोन आला तर तुम्ही उत्तर दिल्यावर पलीकडच्या व्यक्तीला कळायला हवं की तुम्ही व्यायाम करता आहात.
स्नायूंची शक्ती आणि वजन हे म्हातारपणासाठी बँकेत ठेवलेल्या पुंजीइतकं महत्त्वाचं आहे. म्हणून वजनं उचलण्याचे व्यायाम ज्याला ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’ म्हणतात ते करायलाच हवेत. ‘‘मी ६० वर्षांची झालेय, मग मी काय उचलणार वजनं? आता कशी माझ्या स्नायूंची शक्ती वाढणार?’’ हा गैरसमज हे पुस्तक दूर करतं. लेखकाचं म्हणणं की तुम्ही कोणत्याही वयात व्यायाम सुरू करा, त्याचा फायदाच होईल आणि जितका जास्त कराल तितका जास्त फायदा होईल.
आहार आणि झोप यावरची पुस्तकातली प्रकरणं प्रत्यक्ष वाचायला हवीत. कमी खा आणि जास्त जगा हे महत्त्वाचं तत्त्व मांडतं, स्नायूंच्या शक्तीसाठी महत्त्वाची असलेली प्रथिनं किती आणि केव्हा खावीत हे सांगतात. नैसर्गिक झोप सात तासांपेक्षा कमी घेतली तर शरीरात काय काय घडतं हे वाचल्यावर तर आपण खडबडून ‘जागे’ होतो. लेखक शेवटी त्यांच्या भावनिक आरोग्याबद्दल बोलतात. तीव्र भावनांमुळे बिघडलेल्या नात्यांबद्दल सांगतात. हे वाचताना मला डॅनियल गोल्डमन आठवले. त्यांनी पहिल्यांदाच भावनिक बुद्धिमत्तेवर सविस्तर लिहिलं होतं. काय असते भावनिक बुद्धिमत्ता? स्वत:च्या उणिवांचा आणि क्षमतांचा सहजपणे केलेला स्वीकार, आपल्या भावनांचं नियमन आणि इतरांच्या भावना समजून घेणं असतं. स्वत:शी आणि इतरांशी असलेलं नातं ज्यामुळे सुखद राहू शकतं. अनेकांना वाटेल तरुणपणापासून आहारावर, झोपेवर निर्बंध कशासाठी घालायचे. परवाच कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या इंजेक्शनची जाहिरात होती, लठ्ठपणा कमी करणाऱ्या गोळ्या आहेतच. आयुर्मर्यादा वाढवणाऱ्या काही गोळ्यांवर संशोधन सुरू आहे. मग काय एकेका गोष्टीसाठी एक एक गोळी घ्यायची, आणि फिट राहायचं. नजीकच्या भविष्यकाळात कदाचित हे होईलही.
आपण फीट राहूही, पण सुखी राहू का? कारण एकमेकांशी चांगले संबंध असण्याची गोळी नाही. वागण्यात आस्था निर्माण करणारी गोळी नाही. स्वत:चं स्वत:शी आणि इतरांशी असलेलं नातं टवटवीत ठेवण्याची गोळी नाही. दीर्घायुष्याच्या समीकरणात शेवटी प्रश्न उरतो की कशासाठी आणि कुणासाठी जगायचं? आपले नातेसंबंध चांगले नसतील, आपल्याला जगण्यासाठी काही उर्मी नसेल तर दीर्घायुष्याचा काहीच अर्थ नाही. श्रेयस महत्त्वाचं आहे लांब जगण्यासाठी… ‘आउटलिव्ह’ने दाखवलेल्या या वाटेवर आपण किती लांब चालत जाऊ माहीत नाही. अंतर किती कापलं यापेक्षा आरोग्याच्या किती गुणवत्तेसोबत कापलं हे महत्त्वाचं. माझ्या बहिणाआत्याच्या आशीर्वादातला अर्धा भाग हेच तर सांगतो.
पुस्तकातील सर्व माहिती विज्ञानाधारित असली तर सर्वांना समजेल अश्या सोप्या प्रकारे सांगितली आहे.
हे पुस्तक आरोग्याची काळजी असणाऱ्या प्रत्येकाने स्वतः वाचावे व आपल्या मित्र-नातेवाईकांना आवर्जून भेट द्यावे असे आहे.
परिचय : डॉ. मीरा कुलकर्णी
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “संभाजी” – लेखक – श्री विश्वास पाटील – परिचय – श्री आदित्य पाटील ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : संभाजी
लेखक : श्री विश्वास पाटील
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
पृष्ठ: ८६८
मूल्य: ७९५ ₹
स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी राजे ह्यांचं आयुष्य एकूणच वादळ होतं. एका युगपुरुषांच्या पोटी जन्म घेऊन, जिजाऊमातासारख्या एका युगस्त्रीच्या सहवासात लहानाचे मोठे होणाऱ्या छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्याभोवती बदनामीची वलयं फिरत राहिली. राज्यकारभारयांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील हस्तक्षेप, गृहकलह, फंदफितुरी या युद्धाच्या आयुष्यात वादळासारख्या वावरत होत्या. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचा मृत्यू, कोणत्या वयात बोट भरून चालला शिकवणाऱ्या आजीचा मृत्यू ह्यांसारखी असंख्य संकट पार करत शंभूराजांनी आपलं नाव इतिहासात अजरामर केलं.
विश्वास पाटील लिखित संभाजी ही कादंबरी खऱ्या अर्थाने संभाजीराजांच्या आयुष्याची सर्वांगांनी ओळख करून देते. अनेक इतिहासकार संभाजी राजांचे चरित्र मलीन करण्यात व्यस्त होते, अनेक लेखक यांना बदफैली ठरवत असताना अनेक सुजाण लेखक, इतिहासकारांनी संभाजी राजांच्या चरित्राला न्याय दिला. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ही कादंबरी. शिवरायांच्या घरातील अंतर्गत वाद ते संभाजीराजांनी रणांगणी चौखूर नाचवलेला घोडा सगळंच वर्णन अगदी ओघवत्या आणि रसाळ भाषेत लेखक विश्वास पाटील यांनी केलं आहे.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या औरंगजेबाला संभाजीराजांनी एक किल्ला लढवण्यासाठी सहा ते सात वर्ष झुंज दिली. जंजिर्याच्या सिद्दीला धाकात ठेवलं, पोर्तुगीजांना पुरतं नेस्तनाबूत केलं. पण मराठ्यांच्या फंद फितुरीमुळे वैरयाने डाव साधला आणि संभाजी राजे इतिहासात अमर झाले.
एकूणच कादंबरी मोठी आहे परंतु वाचनाची आणि मनाची पकड इतिहास सहज घेते की अवघ्या पंधरा दिवसात मी कादंबरीचा फडशा पाडला. मात्र शेवटची शंभर-दीडशे पानं माझी नेत्रकडा कोरडी ठेवू शकली नाहीत.
सरतेशेवटी इतकेच सांगू इच्छितो – बदनामी बदफैलीच्या काळ्याकुट्ट ढगांनी कितीही झाकोळण्याचा प्रयत्न केला तरीही सुर्यरूपी शंभू चरित्र कायमच जनमानसांत प्रेरणारुपी प्रकाश देत राहील.
सर्व शिव शंभू भक्त आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने ही कादंबरी वाचायला हवी.
परिचय : आदित्य पाटील
प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈