सूर्य अस्ताला चालला आहे. सर्वत्र केशरी संधीप्रकाश पसरला आहे. तेच प्रतिबिंब जलात असून जलकाठावर असलेल्या एका झाडावरून एक पक्षी ओरडत आहे. असे एक साधारण संध्याकाळचे चित्र.
त्यावरील शिर्षक सांजधून हे तो पक्षी ओरडत नसून एक धून गात आहे असे सुचवते.
मन सांजेप्रमाणे विभोर होते आणि मनात संध्या समयीची हुरहूर जाणवते.
साधारण संध्याकाळ झाली की देवघरात दिवा लावतात. तसाच सृष्टीच्या घरातील क्षितिजावरील देवघरात हा संध्यादीप कोणी लावला आहे असा विचार मनात येतो.
संध्याकाळ जाऊन आता अंधार पडणार आहे ती कातरता नकळत मनाला जाणवते. तशीच ती ढगांच्या कडेवरही जाणवते.
मग उगचच तो पक्षी चकोर पक्षी आहे आणि आता आकाशात चंद्र उगवेल म्हणून ते चांदणे प्यायला सज्ज होऊन चोच उघडून बसला आहे असे वाटते.
सूर्यबिंब हे अस्ताला गेले तरी चराचर जागृत राहणार आहे हे झाडाच्या आणि पक्षाच्या छबीतून समजते.
एका दिवसाची कहाणी संपत असली तरी मनात उद्याची आशा देणारी छान स्वप्नांची रजनी प्रदान करणारी अशी संध्याकाळ वाटते.
भगवेपणामुळे सन्यस्त योग्या प्रमाणे वाटणारा सूर्य मनाला धीरगंभीरताही प्रदान करतो.
असे संध्याकाळचे अनेक अर्थ सांगणारे हे चित्र आहे.
पण सरळ सरळ असे वाटणारे चित्र जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर हे एक सांकेतिक अर्थ सांगणारे चित्र वाटते. सगळ्यांनाच हे माहित आहे की शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली होती. मग त्या सोन्याच्या स्पर्शाने सगळी भूमी सोन्याची झाल्यासारखी वाटून त्या भूमीवर येणाऱ्या झाडांना सोन्याची फळे येतील ही ग्वाही तो पक्षीही सकलांना देत आहे.
म्हणूनच की काय पण शिवाजी महाराजांनी फडकवलेली ही भगवी पताका रोज आपण विसरलो तरी निसर्ग विसरत नाही आणि नेमाने ही पताका फडकवतो असे वाटते.
गुढार्थ बघितला तर कोणी सन्यस्त योगी सूर्य रूपाने येणार तो जाणार असे शिकवून आता जो क्षण लाभला आहे तो आनंदाने जगून घ्या सन्मार्गी लावा असा संदेश देत आहे.
पुस्तकाच्या अंतरंगात डोकावले की कळते हे श्री मोहनलाल वर्मा यांच्या हिंदी भाव कथानचा मराठी अनुवाद आहे. मग असे वाटले हे त्या भाव कथानंमधील वेगवेगळे भावरंग दाखवून सुरेखशी संध्याकाळ स्वतः एक सांजधून गात आहे.
खरच वेगवेगळ्या कथामधील वेगवेगळे भाव पण एकाच मनात दाटणारे असे एकाच चित्रात दाखवणारे हे चित्र वरवर पाहाता अगदी साधे वाटते पण खूप सारे भाव जगवणारे आहे.
इतके छान मुखपृष्ठ चित्र देणाऱ्या श्री अन्वर पट्टेकरी, प्रकाशक पराग लोणकर :-प्रियांजली प्रकाशन आणि लेखिका सौ उज्ज्वला केळकर यांना खूप खूप धन्यवाद
☆ “हाती ज्यांच्या शून्य होते” – लेखक : श्री अरुण शेवते ☆ परिचय – सौ. जस्मिन रमजान शेख ☆
पुस्तक परिचय
पुस्तक : “हाती ज्यांच्या शून्य होते”
संपादकः श्री अरुण शेवते
प्रकाशक : ऋतुरंग प्रकाशन,मुंबई
३५ वी आवृत्ती : ऑगस्ट २०१७
पृष्ठः २३२
किंमतः २५०/-
शून्य म्हणजे काहीच नाही असेच आम्ही शाळेत शिकलो अन् आता शिकवतो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर कळलं की शून्याला किती किंमत आहे, शून्य किती शक्तिवान आहे. ज्यांच्या हाती बाकी उरलेली असते, ते त्या बाकीच्या बेरीज वजाबाकीतच अडकून पडतात. मात्र ज्यांच्या हाती शून्य असते ते नवे विश्व निर्माण करतात. अवघ्या विश्व निर्मितीची शक्ती या शून्यात आहे.
लेखकाच्या मनोगतातील पहिले वाक्यच मेंदूला झिणझिण्या आणणारे आहे. कर्तृत्ववान माणसाच्या ऐश्वर्यामागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. खरंच यशाच्या शिड्या चढून वर गेलेली व्यक्ती आपण पाहतो, पण त्या शिड्यांच्या जुळवाजुळवीचे श्रम किती भयानक आणि कष्टप्रद असू शकतात याचा विचारच कोणी करत नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्या लखाखत्या यशापेक्षा तो श्रमाचा काळाकुट्ट अंधारच इतरांचे आयुष्य उजळवणारा ठरतो. या अंधारातील प्रकाश शोधण्याचं आणि ते सर्वांपुढे मांडण्याचं शब्दरुपी ,उत्तूंग असे कार्य लेखक, संपादक अरुण शेवते यांनी केलेले आहे.
या संग्रह पुस्तकात गदिमा,सुधीर फडके, ए.पी.जे.अब्दुल कलाम, यशवंतराव गडाख, लता मंगेशकर, महेमूद, कर्मवीर भाऊराव पाटील, एम.एफ.हुसेन, सुशीलकुमार शिंदे, निळू फुले, अशा आपल्या भारतातील, तर शेक्सपिअर, अब्राहम लिंकन, चार्ली चापलीन, स्टीव्ह जॉब्स, ग्रेटो गार्बो अशा अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कीर्तिमान व्यक्तींच्या आयुष्यातील गडद सावलीचे दर्शन आपल्याला घडवून आणलेले आहे. एका एका हिऱ्याचे पैलू खुलवून दाखवले आहेत.
मंधू मंगेश कर्णिक यांच्या ‘ नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होतो ‘ असे शिर्षक असलेल्या लेखामध्ये ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील बरेच बारकावे टिपलेले आहेत. त्यातील काही वाक्ये आणि त्यांचे अनुभव कलाम यांच्या प्रेमळ, संवेदनशील मनाचे रहस्य उलगडून समोर आणतात. ती वाक्ये म्हणजे “प्रार्थना, उपासना सर्वत्र एकाच पवित्र भावनेने केली जाते “ हा महान मंत्र त्यांना श्री रामेश्वरम येथील शिवमंदिरातील घंटानादाने आणि नजीकच्या मशिदीतील आजान यांनी शिकवला. ‘ सर्व जगातील माणूस हा एकच आहे आणि त्याचे कल्याण साधण्यातच परमेश्वराची खरी उपासना आहे.’ त्यांच्या पुढील आयुष्यातील यशाचे गमक इथे सापडते.
श्यामला शिरोळकर लिखित ‘ ग्रँड इंडियन सर्कसचे सर्वेसर्वा विष्णुपंत छत्रे, यातून श्री छत्रे यांच्या आयुष्यातील अनेक घटना आपल्याला प्रेरकच ठरतात. ‘आपल्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडावे ‘ असे विचार लहानपणापासूनच विष्णूपंत यांच्या मनात थैमान घालत होते. त्यांच्या चाबुकस्वाराच्या नोकरीपासून ते ग्रँड सर्कसच्या उभारणीपर्यंत त्यांच्या जीवनात आलेले चढ उतार वाचताना प्रत्येक घटना डोळ्यासमोरून चित्रपटासारखी सरकत जाते. हातात काहीही नसताना हजारो लोकांपुढे विल्सन सर्कसच्या मॅनेजरसमोर त्यांनी केलेली गर्जना त्यांनी एका वर्षात पूर्ण केली. त्यांचे धाडस, हुशारी आणि जिद्द वाचकाला बरंच काही शिकवून जाते.
तसेच कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवणारे स्टीव्ह जॉब्ज, पोस्टमास्तर असलेले पण पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले अब्राहम लिंकन, खाटीकखान्यात नोकरी करत, रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता जगविख्यात नाटककार बनलेले शेक्सपिअर, कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी करत, घर व कुटुंब सांभाळत स्वतःच्या कलेवर जग जिंकणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर, गदिमा, गुलजार, एम.एफ. हुसेन, धीरुभाई अंबानी अशा अनेक दिग्गज लोकांच्या जीवनातील संघर्षाचे आणि त्यातून संपादन केलेल्या उत्तुंग यशाचे चित्रण या संपादकीय पुस्तकात वाचायला मिळते. या सर्वांच्या आयुष्यात एकच सामाईक गोष्ट होती ती म्हणजे शून्य ! त्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले. जगापुढे एक आदर्श ठेवला.
शेवटी संपादकीय मनोगतात मा. अरुण शेवते म्हणतात, “ तुम्हीसुद्धा हाती शून्य असताना स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण करू शकता.” ….. हे वाक्य प्रत्येकाला आकाशात उंच भरारी घेण्याचे बळ देते. म्हणूनच हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे.
परिचय : सौ. जस्मिन रमजान शेख
मिरज जि. सांगली
9881584475
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
ठसठशीत कुंकू काळजीची नजर आणि त्या नजरेच्या टप्प्यातले एक बालक एवढेच चित्र आणि त्याखाली लिहिलेले बियॉण्ड लिमिट्स हे शीर्षक. बस एवढेच छायाचित्र.
पण बारकाईने पहिले तर हे चित्र खूपसे बोलू लागते.
अगदी सरळ भाषेत म्हटले तर घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी या म्हणीवर आधारित चित्र काढा म्हटले तर ते असेच असेल.
एक आई संसार आणि नोकरीं दोन्ही सांभाळताना कायम तिच्या मनात आपल्या बाळाचे विचार असतात. तिला तिच्या बाळाचे रूप नजरेत कायम दिसते. याच विचारात ती आपली नोकरीं करत असते. ती आईची व्यथा, वेदना या चित्रातून स्पष्ट दिसते.
आईचे घर म्हणजे तिची धरती, तिची नोकरी म्हणजे तिचे आकाश. मग या धरती अंबरच्या मिलनी अर्थात क्षितिजावर तिला तिचे मूल स्पष्ट दिसत असते आणि या क्षितिजावरूनच त्याने गगनभरारी घ्यावी हे तिचे स्वप्न अगदी हुबेहूब रेखाटले आहे वाटते.
आपले बाळ हे स्त्रीचे हळवेपण असते तर तेच बाळ त्या बालकावर संकट आले तर तिचे बलस्थान पण होऊ शकते. हीच खंबीर नजर त्याचे कवच ठरू शकते असेही दाखवते.
बियॉण्ड लिमिट्स हे वाचल्यावर याच एका स्त्रीला आपल्या मर्यादा ओलांडून आपल्या बाळासाठी काही करण्याची इच्छा आहे हे लक्षात येते.
आईची नजर कायम आपल्या बाळावर असतेच पण ते कमी आहे म्हणून की काय पण कुंकवाचा तिसरा नेत्रही बाळाकडे रोखून पहात आहे असे वाटते.
हाच तिसरा नेत्र बालसूर्य होऊन बाळाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत आहे असे वाटते.
त्या चेहऱ्यावरील काळजीचा एक नेत्र क्षणभरही बाळाला ओझर होऊ देत नसला तरी दुसरा डोळा त्याच्या काळजीने झरतो आहे पण मोठ्या कौशल्याने हे अश्रू ती लपवते कोणाला दाखवत नाही असेही हे चित्र सांगते.
त्या चेहऱ्यावर केस विखुरलेले दाखवले आहेत. तिचे मन त्या प्रमाणे विस्कटलेले असले तरी तेच केस मुलायम रेशमी बंध होऊन मुलाला आईकडे खेचतात असाही अर्थ निघू शकतो पण एक आई आणि तिचे बाळ यामधील अतूट बंधाचे हे चित्र आहे एवढे मात्र निश्चित असले तरी अंतरंगात डोकावल्यावर कळते की आपल्या एकुलत्या एक मुलाला झालेल्या ब्लड कॅन्सर मुळे पिळवटलेले काळीज डोळ्यातून पाझरले तरी त्या लेकराला यातून बाहेर काढण्याची आई वडिलांची ही संघर्ष कथा तर मुलगा तन्मय याची या दुखण्यावर मात केलेली ही यशोगाथा आहे. तेच भाव या चित्रात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच या पुस्तकात गव्हान्कुराचा उल्लेख प्रामुख्याने औषधाच्या रूपाने आला आहे. या चित्रातील चेहऱ्यावरील केस किंवा पदराचे काठ हे त्या गव्हांकुरासारखे दिसतात. तेच तिच्या डोक्यात आहेत आणि त्यानेच ते बाळ वाढतंय असेही वाचल्यानंतर चित्रातून प्रतीत होते.
खरोखर वाचण्यासारखी प्रेरणादायी अशी ही कादंबरी किंवा जीवनकथा आहे.
त्यासाठी मुखपृष्ठ कार अरविंद शेलार, परिस पब्लिकेशन आणि सगळ्यात महत्वाचे लेखिका हेमलता तुषार सपकाळ यांचे मन:पूर्वक आभार.
200 पानांची ही कादंबरी 350 रुपये एवढे मूल्य आहे. आशा आहे आपण ही कादंबरी घेऊन वाचालच पण एक प्रेरणादायी कथा म्हणून ती इतरांना पण भेट द्याल.
सौ राधिका भांडारकर यांचे पैंजण हे एकूण ३५ लेखांचे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. या आधीही त्यांचे लव्हाळी आणि ग म भ न हे दोन लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. पुस्तकाची पृष्ठसंख्या केवळ ११३ असल्याने सर्व लेख सहज एका बैठकीत वाचता येतात. मुखपृष्ठ पाहताच पैंजणांची नादमधूर किणकिण कानी पडल्याचा भास होतो.एकेक लेख जसजसे वाचत जावे तसतसे लेखांना साजेसे असेच मुखपृष्ठ आहे याची खात्री पटते.
पुणे शहरी वास्तव्य असणारे सेवानिवृत्त शिक्षक,आणि सर्वांचे लाडके कवि/लेखक श्री. अरूणजी पुराणिक यांची या पुस्तकाला फार सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे. जवळ जवळ प्रत्येकच लेखावर त्यांनी त्यांचे भाष्य केले आहे. ती वाचूनच या पुस्तकाचे स्थान किती मौल्यवान आहे याची कल्पना येते.
पैंजण या पुस्तकात त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, घरगुती, प्रेम, वात्सल्य, ममता, विविध क्षेत्रातील व्यक्ती, असे बहुविध विषय हाताळले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुबोध आणि ओघवती भाषा आणि लेखनातून सखोल विचार मांडण्याची हातोटी. नदीच्या प्रवाहाप्रमाणे त्यांची लेखणी सरसर पुढे जाते आणि नदी जशी वाहत असताना दुतर्फा काठावरील लता वेलीना पाणी पाजत पाजत जात असते तद्वतच राधिका ताईंचे लिखाण वाचताना वाचकांची तृष्णा शमून समाधान वाटते.
दिवाळीसारख्या मोठ्या सणाचे एक आगळे महत्त्व ‘एक दिवा त्यांच्यासाठी’ या लेखात आपल्याला वाचावयास मिळते. जे उपेक्षित आहेत, ज्यांच्या घरात रोजची चूल पेटणेही अशक्य आहे, अशा वस्तीत जाऊन त्यांना दिवाळीचा आनंद देणे ही खरी दिवाळी असे त्या म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेल्या पसायदानाचा नेमका अर्थ या लेखातून वाचकांना नक्कीच उलगडतो.
पैंजण या नादमधूर शब्दाविषयी राधिका ताईनी केलेली सुरुवातच पैंजण या लेखात वाचकांना आकर्षित करते. त्या लिहितात, ” पैंजण हा एक तीन अक्षरी अनुनासिक शब्द. पण तो ओठावर येता क्षणीच निसर्गातील संपूर्ण रसमय रुणझुण घेऊन अवतरतो. पैंजण या शब्दात लाडीक भाव आहेत, लडिवाळपणा आहे, वात्सल्य आहे…” वाचकांना या शब्दातच रुणझुण आहे असं वाटत नाही का? मला तर हा लेख वाचताना छुम छुम करीत लाडिकपणे कृष्णाकडे चाललेली राधाच डोळ्यासमोर उभी राहिली. संपूर्ण लेखाची भाषा किती हळुवार आहे, हेच त्या लेखाचे यश आहे.
आईचा डब्बा प्रत्येकाने अनुभवलेला. आईने डब्यात पोळी चटणीचा रोल दिलेला असो, पोळी भाजी तर कधी इडली चटणी असो, किंवा उपमा पोहे असोत. या डब्याच्या आठवणीने सुखद अनुभूतीचा पुनःप्रत्यय घेताना फार आनंद वाटतो. म्हणूनच हा लेख मला पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो. आपल्या मुलांसाठी पोळी भाजीचा डबा करताना, आईच्या हातच्या डब्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जीवनातील असे छोटे छोटे क्षण, परंतु ब्रह्मानंद देणारे लेखिकेने टिपले आहेत. अगदी साधा विषय परंतु किती आनंद देणारा.
गौराई आली, ॠषिपंचमी महात्म्य, अक्षय तृतीया हे लेख वाचताना हिंदू संस्कृती, परंपरागत चालत आलेले हे सण, त्यामागील कथा या सगळ्यांचा राधिकाताईंनी परामर्श घेतला आहे. तसेच भारत हा कृषीप्रधान देश आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता आपले बहुतांशी सणवार, उत्सव आपल्या भूमीशी, मातीशी जोडलेले आहेत यावर लेखिकेने विशेष भर दिल्याचे जाणवते. या सणांच्या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे जरुरीचे आहे ही शिकवण मिळते.
‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे ‘ हा लेख ! शीर्षक वाचल्यावाचल्या काहीतरी गहन विचार मांडले असावेत अशी शंका येते, परंतु त्या लेखाची सुरुवातच अशी करतात की त्यांना वाचकांना कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही. या लेखात आपल्याला फक्त राधिकाताईच दिसतात. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची विचार करण्याची पद्धत, आणि मनात जे आहे, ते स्पष्टपणे, निर्भीडपणे मांडण्याची त्यांची वृत्ती स्वच्छ दिसते. आजच्या काळाला अनुसरून त्यांनी जीवनाचा इनबॉक्स, अज्ञात सेंडर, रोजच्या रोज येणाऱ्या मेल्स, त्यातल्या मोजक्या वाचायच्या बाकी डिलीट करायच्या अशा प्रकारची शब्दयोजना करून वाचकांचे मनोरंजनही केले आहे. वाचकांना पुस्तकात कसे खिळवून ठेवावे हे राधिकाताई चांगले जाणतात यात शंकाच नाही.
राधिकाताई त्यांच्या मतांविषयी ठाम असतात आणि ती मते त्या प्रामाणिकपणे मांडतात. ‘ नांदतो देव हा आपल्या अंतरी ‘ हा लेख वाचताना याची प्रचिती येते. त्या कबूल करतात की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या गोष्टी केवळ आपले कुटुंबीय, सगेसोयरे श्रद्धेने करतात म्हणून आपणही करावयास पाहिजेतच असे त्यांना कधी वाटत नाही. त्या देवळाच्या रांगेत देवदर्शनासाठी उभ्या राहणार नाहीत, पण म्हणून त्या नास्तिक आहेत असं नाही. देव म्हणजे नक्की काय? अस्तिक्यवाद, ईश्वर वाद वगैरे क्लिष्ट तत्त्वज्ञानात डोके घालण्याची त्यांची इच्छा नाही, कारण त्या सामान्य बुद्धीच्या आहेत हे कबूल करण्याची प्रामाणिकता त्यांच्यात आहे. शाळेत मॉरल सायन्समध्ये शिकलेले ” गॉड इज एव्हरीव्हेअर” हे वाक्य त्यांच्या मेंदूत चिकटलेले आहे.
क्षमा करणे ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. क्षमा एक अप्रतिम गुण. या लेखात क्षमेचे महत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. ज्याला क्षमा करता येत नाही त्याची वृत्ती हिंसक आहे असे त्यांना सांगायचे आहे. कारण त्या लिहितात की “आजकाल विविध माध्यमातून … “मै तुम्हे देख लूंगा”.. “मुझसे बढकर कोई बुरा नही”..” आजपर्यंत माझी मैत्री पाहिलीस आता दुश्मनी अनुभव ” … अशा प्रकारची वाक्ये कानावर सतत आदळत असतात. ही सूडबुद्धी दर्शविणारी वाक्ये म्हणजे वाद,अशांतता माजविणारी हिंसक भाषा आहे.”
उन्हाळ्यात बागेतील सर्वच झाडे जेव्हा मरगळलेली दिसतात तेव्हा कोपऱ्यात वाढलेला निवडुंगच तेवढा आपले काटे दिमाखाने मिरवत हिरवागार राहिलेला असतो. लेखिकेच्या मनात येते की तिनेही असेच निवडुंगासारखे विराट वाटेवरही टवटवीत राहावे. मनातली ही भावना व्यक्त करणारा निवडुंग हा लेख, वाचनीय !
जनरेशन गॅप हा प्रश्न नेहमीच सर्वांना भेडसावणारा आहे. हाच विषय घेऊन वृद्ध आणि तरुण पिढीतील वैचारिक अंतर हा लेख राधिकाताईंनी लिहिला आहे. दोन पिढ्यातील अंतर आणि वैचारिक वाद हे सर्वच काळात चालू असतात आणि असणारच. पण म्हणून आधीच्या पिढीतील वृद्धांनी त्यांच्या काळानुसार समजून घेणे किती आवश्यक आहे हे राधिकाताई या लेखात आवर्जून सांगतात. त्यांचे विचार किती प्रगल्भ आणि प्रॅक्टिकल आहेत हे हा लेख वाचताना जाणवते आणि त्यांच्याविषयी मनात आदरभाव निर्माण होतो. “नव्याकडे नव्याने दृष्टी बाळगावी. तक्रारीच्या सुरापेक्षा स्वीकृतीची, शिकण्याची मानसिकता बाळगावी. तेव्हाच दोन पिढीतील वैचारिक अंतर सुसह्य होईल” हा फार मौलिक संदेश त्यांनी वाचकांना दिला आहे.
सर्वच पस्तीस लेखांवर भाष्य करणे उचित ठरणार नाही. थोडक्यात परामर्श घेताना एवढेच सांगेन की.. या ती आनंदाचे झाड लावून गेली अशा लेखातून मातेची ममता, वात्सल्य, तिने केलेले संस्कार यांचे किती महत्त्व असते, अशी ही शाळा यातून दिसणारा नात्यातला ओलावा, पुतळाबाईच्या जीवनातील कारुण्य, तरी करारी व्यक्तिमत्त्व, सावरकरांच्या जाज्वल्य आठवणी … हे सर्व वाचताना मनातील अनेक भावना उचंबळून येतात.
या पुस्तकातील प्रत्येकच लेख वाचकांना अंतर्मुख करतो आणि त्या त्या विषयावर चिंतन करावयास लावतो.
राधिका ताईंच्या लेखणीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही विषय हाताळताना त्या त्या संदर्भात राधिकाताई त्यांच्या जीवनातील विविध कटू गोड अनुभव सांगतात, त्यामुळे कोणताही विषय कधीच क्लिष्ट वाटत नाही. एक एक लेख जसजसे वाचत जावे, तसतशा राधिकाताई वाचकाला समजत जातात. त्यांचा वाचन ~लेखनाचा छंद, त्यांची रुढी परंपरा याविषयीची परखड मते, त्यांची सकारात्मक मानसिकता, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतूनही काहीतरी शिकण्याची त्यांची जिज्ञासा, त्यांचे संवेदनशील मन, त्यांच्या विचारातील स्पष्टता … असे नानारंगी व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांच्या लेखनातून उलगडत जातात. नकळतपणे वाचकांची आपापल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलत जाते हा माझा अनुभव आहे. राधिकाताईंचे एक एक लेख कुठेतरी आपल्याही जीवनाशी निगडित आहेत असे वाटते आणि हेच त्यांच्या लेखनाचे यश आहे.
परिचय : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पिंपरी चिंचवड गाव ते महानगर” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल☆
श्रीकांत चौगुले लिखित पिंपरी चिंचवड गाव ते महानगर या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली. हाती आलेल्या प्रति वरून पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले आणि मनात विचारांची गर्दी झाली.
ठसठशीत नावावरून आणि त्यावरील दोन चित्रावरून हे पूर्वीचे पिंपरी चिंचवड आणि हे आत्ताचे पिंपरी चिंचवड आहे हे चाणाक्ष लोकांच्या लगेच लक्षात येते. किती बदलले ना हा विचारही मनात निर्माण होतो
नीट लक्ष देऊन पाहिले तर हे चित्र खूप काही बोलून जाते.
१) हल्लीच्या ट्रेंड नुसार पूर्वीची मी आणि आत्ताची मी असे लवंगी मिरची आणि ढब्बू मिरची आरशासमोर दाखवून केलेली दोन चीत्रे नजरेसमोर येऊन पूर्वीचे पिंपरी चिंचवड आणि आत्ताचे पिंपरी चिंचवड असेही चित्र आहे असे वाटले.
२) पूर्वीच्या पिंपरी चिंचवडचे स्वरूप आणि आत्ताचे हे रूप यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे सांगते
३) बैलगाडीचे कच्चे रस्ते ते आताचे उड्डाण पुलावरील मोठे पक्के रस्ते हा बदल प्रामुख्याने जाणवतो
४) पूर्वीचे संथ जीवन आणि आत्ताची प्राप्त झालेली गती त्यावरून लक्षात येते
५) नीट पाहता गावाने केलेला मोठा विस्तार लक्षात येतो
६) हे वरवरचे अर्थ झाले तरी गर्भित अर्थ खूपच वेगळं काही सांगून जातो पूर्वीच्या आणि आत्ताच्या पिंपरी चिंचवड मधून वाहणारी पवनामाई यातून दिसते
०७) या पवना माईचे हे ऐल तट पैलं तट असून ऐल तटावर विस्तारलेले पिंपरी चिंचवड दिमाखाने उभे आहे तर पैल तट दूर राहून तेथे मनात जुने पिंपरी चिंचवड दिसत आहे
०८) पुस्तकाच्या नावावरून त्यातील ते या शब्दावरून हा एक प्रवास आहे असे लक्षात येते आणि हा प्रवास श्रीकांतजी चौगुले यांनी केलेला असून ते प्रवासवर्णन आपल्याला यातून मिळते
०९) हा प्रवास पवनामाईतून जणू बोटीन केलेला आहे आणि ह्या बोटीचे रूप त्या नावातील मांडणीवरून वाटते आणि या बोटीचे खलाशी श्रीकांतजी चौगुले आहेत हे स्पष्ट होते
१०) या चित्राचे दोन भाग म्हणजे शहराच्या विकासाचा विस्ताराचा डोंगर आणि त्या डोंगराने तितक्याच आदराने घेतलेली जुन्या संस्कृतीची पताका अखंड फडफडती ठेवली आहे याचे प्रतीक वाटते.
११) मधला पांढरा भाग उभा करून पाहिला तर A अक्षर वाटते दोन चित्रांचे रूप बघितले ते Z अक्षर वाटते म्हणजेच पिंपरी चिंचवडचे गाव ते महानगर या प्रवासातील सगळी स्थित्यंतरे इत्तमभूत A to Z यामध्ये लिहिलेली आहेत हे दर्शवते
१२) पुरणकाळाचा संदर्भ घेतला तर पवना माईचे या दंडकाच्या मेरुनी केलेले हे मंथन असून त्यातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका टाटा मोटर्स टेक महिंद्रा पक्के रस्ते उत्तुंग इमारती उद्योग कारखान्यांचा झालेला गजबजाट हि लाभलेली रत्ने महानगराला चिकटलेली आहेत
१३) शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीतून भक्ती शक्ती प्रतीत होत असली तरी गाव संस्काराचे मोरया गोसावी यांचे मंदिर यातून उद्बोधित झालेली भक्ती आणि गावाची प्रगतीची विकासाची शक्ती असे वेगळे भक्ती शक्ती रूप यातून दिसते.
१४) गावाची अंगभूत असलेली ऐतिहासिकता अंगीकारलेली औद्योगिकता यातून स्पष्ट होते
१५) मधला पांढरा भाग हा पावना माईचे प्रतीक वाटून सुरुवातीला अगदी चिंचोळा असलेला हा प्रवाह पुढे अतिशय विस्तारलेला आहे आणि पुढे अजून विस्तार होणार आहे असे सांगते.
१६) पूर्वीच्या पिंपरी चिंचवड मधे फक्त साधी रहाणी असावी असे वाटते. पण त्याच साध्या रहानिमनातून उच्च विचारसरणी ठेऊन संपादन केलेले ज्ञान अर्थात सरस्वती आणि सगळ्यात श्रीमंत अशी महानगरपालिका म्हणजे लक्ष्मी अर्थात लक्ष्मी सरस्वती एकत्र नांदतांना दिसतात.
कदाचित अजूनही काही अर्थ या चित्रांमधून निघू शकतील. मला वाटलेले अर्थ मी येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एवढा सर्वांगीण विचार करून तयार केलेले मुखपृष्ठ हे संतोष घोंगडे यांचे आहे.तसेच हे चित्र निवडण्याचे काम संवेदना प्रकाशन यांच्या नीता नितीन हिरवे यांनी केले.त्यास मान्यता श्रीकांतजी चौगुले यांनी दिली. या सगळयांचे मन:पूर्वक आभार.
☆ ‘आनंदनिधान’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
लेखक – श्री विश्वास देशपांडे
प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे
पृष्ठसंख्या – १६० पाने
पुस्तकाचे मूल्य – २०० रुपये
(पुस्तक खरेदीसाठी लेखक श्री विश्वास देशपांडे यांच्याशी ९४०३७४९९३२ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा.)
श्री विश्वास देशपांडे
कोजागिरी पौर्णिमेचे आनंदपर्व आटीव दूध, शर्करा, केशर अन पौष्टिक मेव्याने सजलेले असते. तद्वतच २८ ऑक्टोबर २०२३ च्या कोजागिरीच्या दिवशी चाळीसगावचे जेष्ठ आणि प्रथितयश साहित्यिक श्री विश्वास देशपांडे यांचे प्रकाशित झालेले ‘आनंदनिधान’ हे नवे पुस्तक ‘आनंद-सुधा’ च आहे असे प्रतीत होते. पुस्तकाचे नाव सार्थ ठरवणाऱ्या मुखपृष्ठावरील प्रसन्न सूर्यफुले, निळाईच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसतात. एकंदरीत लेख ३३, एखाद-दोन अपवाद वगळल्यास ४-५ पानात आटोपशीर रित्या, मुद्देसूद अन गुटगुटीत शब्दकळात बांधलेले, हे विश्वास सरांचे बलस्थान आहे, आधीच्या आणि या साहित्य निर्मितीचे देखील! वाचकांना त्यांच्या ललित लेखनाच्या लालित्याचा लळा लागलेला आहेच. त्यांच्या दृष्टीने अखिल सृष्टीच आनंदनिधान अर्थात आनंदाचा झरा आहे. हे जे आनंदामृत पाझरणारे स्रोत आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनाचाच भाग आहेत. मात्र त्यांत आनंददायी रंग शोधण्यासाठी रसिक वृत्ती हवी विश्वास सरांसारखी!
पुस्तकातील काही बोलकी उदाहरणे देते. आपला दिवस घड्याळाच्या काट्याबरहुकूम चालतो. मात्र ‘निसर्गरुपे’ या प्रदीर्घ लेखात दिनदर्शिका एखाद्या लावण्यलतिकेच्या बदलत्या रूपाला न्याहाळणाऱ्या दर्पणासारखी आहे. इथे प्रभात, दुपार, संध्याकाळ अन रात्र यांची अप्रतिम निसर्गचित्रे, शब्दांचे आकर्षक रंग लेऊन आनंदाचे इंद्रधनुष्य वाचकांसमोर उभे करतात. त्याचप्रमाणे आपले आयुष्य आनंदविभोर करणारे सण, त्यांची सांस्कृतिक परंपरा अन त्यांचे आजचे रूप, इत्यादींचा उहापोह गुढीपाडवा, दीपावली अन संक्रांत यांवरील लेखात उत्तम तऱ्हेने सादर झाला आहे.
‘आँखों से जो उतरी है दिल में’ या लेखाचे शीर्षकच संगीतमय. विश्वाससरांच्या संगीताच्या आवडीचे प्रतिबिंबच. संत ज्ञानेश्वर असोत की ग दि मा, त्यांची ‘ऐसी अक्षरे मेळवीन’ असे ब्रीद असले की हे अक्षर माहात्म्य ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण करणारच. हाच अनुभव या लेखातून येतो. वाचन संस्कृतीशी संबंधी ‘सरीवर सरी आल्या ग’ चे फील देत बरेच लेख पुस्तकात विखुरलेले आहेत. यातून जाणवते की आधी हाती पुस्तक धरून सुविद्य व्हावे, अन मग त्याच हाती अलगद लेखणी धरावी, मग बघा सरस्वती त्या लेखणीत अवतरते की नाही! याच विषयाचे धागे दोरे गवसले, ते पुढील लेखात, ‘देणाऱ्याचे हात हजारो’. वाचनालय म्हणजे अभ्यासू व्यक्तींचे अक्षरशः दुसरे घरच. विश्वास सरांच्या चाळीगावातील एक दर्शनीय आणि श्रद्धेचे स्थान म्हणजे ना बं वाचनालय! याची ग्रंथसंपदा नेत्रदीपक आहेच, पण येथील लक्षणीय कर्तृत्व म्हणजे ८४ वर्षांची अभूतपूर्व परंपरा जपत प्रज्वलित असणारी ज्ञानज्योती, अर्थात ‘सरस्वती व्याख्यानमाला’ ! वाचन, श्रवण, चिंतन आणि मनन या आयुष्य समृद्ध करणाऱ्या पायऱ्यांचे गुणगान करणारा हा लेख अतिशय भावला !
तसाच एक अन्य लेख ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या विषयावर असून लगेच ध्यानात येते की, आजच्या क्षणी कालच्या थोर वक्त्यांची भाषणे आपल्याला का स्मरतात. साहित्य, इतिहास, राजकारण, पुरातन संस्कृती अशा विविध प्रांतातील अजरामर वक्त्यांची नामावली या लेखात आहे. जनतेसमोर आपले वैचारिक दारिद्रय प्रकट करण्याचे आजच्या नेत्यांचे हक्काचे स्थान म्हणजे राजकारणी व्यासपीठ. हा विरोधाभास उद्विग्न करणारा, म्हणूनच हा लेख प्रासंगिक आहे. याच वाचन परंपरेत ‘साहित्य अभिवाचनाची पंढरी- चाळीसगाव’ या लेखात २००० सालापासून ‘इवलेसे रोप लावियले दारी’ अन त्यातून आता दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या अभिवाचन स्पर्धेचा डेरेदार वृक्ष कसा फोफावलाय याचे विश्वास सरांनी साद्यन्त अभिमानपूर्वक केलेलं वर्णन नक्की वाचावे. चाळीसगावाच्या सकस मातीत सारस्वतांची सुमने कशी उमलतात हे त्यातून कळून येते. लेखकाची चतुरस्त्र लेखणी आणि भाषणे याच समृद्ध मातीची देणगी असावी असे वाटते.
लेखकाचं संतवाङ्मयावर विशेष प्रभुत्व आहेच. भक्तिरसात न्ह्यालेला स्वामी समर्थांची अगाध लीला प्रकट करणारा स्वामीकृपा नावाचा अद्भुत लेख अंतर्मुख करून गेला. या विज्ञान युगात असे काही चमत्कार घडतात, ज्यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाची अन सानिध्याची प्रकर्षाने खात्री पटते. ही कहाणी केवळ स्वामीभक्तांसाठीच नव्हे तर, त्या प्रत्येकासाठी असावी, ज्यांची कुठली ना कुठली श्रद्धास्थाने आहेत.
एक खास लेख भावनावश करून गेला. ‘कृतज्ञता’! २ डिसेंबर २०२२ रोजी कार अपघातातून बचावल्यावर लेखक आणि त्यांच्या पत्नीवर त्यांच्या शुभचिंतकांनी केलेला सदिच्छांच्या आणि प्रेमाच्या वर्षावाने भारावून जाऊन लेखकाने लिहिलेला हा लेख अति हृदयस्पर्शी आहे. विश्वास सरांचे भावनाशील मन यात प्रकट होतेच, पण ऋजू व्यक्तिमत्वामुळे आणि सरस साहित्यनिर्मितीमुळे वर्धिष्णू झालेला त्यांचा लोकसंग्रह किती विशाल आहे याची जाणीव नक्कीच होते.
एक लेख मनापासून भावला ! मराठी संगीत नाटक म्हणजे जणू आपल्या जिवाचा जणू जिवाभावाचा मैतरच! ‘संगीत देवबाभळी’ या गाजलेल्या संगीत नाटकाचा जिवंत अनुभव लेखकाने नाटकाच्याच नावाच्या लेखात विशद केलाय. उत्कट भावानुभूती साकार करतांना एक तरी ओवी अनुभवावी, तसेच या नाटकाचा एक तरी प्रयोग अनुभवावा! नाटकाचे हे रंगमंचीय समीक्षण अगदी ‘इंद्रानीच्या डोहासारखेच’ गहिरे अन मनाचा ठाव घेणारे आहे!
वाचकांना एक लेख वाचून जाणवेल की विश्वास सर कलेचे भोक्ते आहेतच, पण ते जेथे जातील तेथील वैशिष्ठे टीप कागदापेक्षाही अधिक चाणाक्ष नजरेने टिपून घेतात. पुरातन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, इत्यादींवर त्यांचे लेख वाचनीय आहेतच. मात्र हा विशेष लेख आहे, ‘अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन’. बोधिसत्व पद्मपाणी या जगप्रसिद्ध चित्राचे मूर्तिमंत वर्णन असो वा बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे चित्रण करणारी दृश्ये असोत, विश्वास सरांनी या दीर्घ लेखात हे सर्व त्यांच्या ओघवत्या भाषेत वर्णन केले आहे. अजिंठा लेण्यांना भेट देण्याआधी हा लेख वाचला तर या लेण्यांच्या अभिजात सौंदर्याचा आपण अधिक बारकाव्यांनिशी अनुभव घेऊ शकतो.
या पुस्तकात हास्यरसाची हलकी फुलकी कारंजी निर्माण करणारे मोजके लेख आहेत. ‘अग्ग बाई, अरेच्या!’ विश्वास सर असे विनोदी लिखाण देखील करतात बरं का, ही खात्री पटते. वानगीदाखल एक लेख! ‘इकडची स्वारी’! विषय मजेशीर, नवऱ्याला बायको काय काय म्हणून संबोधते हा! याची सुरुवात ‘इकडची स्वारी’ पासून उत्क्रांती पावत आजच्या पिढीतील नवऱ्याला सर्रास नावाने (कधी नावे ठेवत) नवी अन जुनी नवरी कसली हाक मारते हे दर्शवले आहे. आपल्या लेखनकौशल्याने खुसखुशीत खुमारी भरत लेखकाने या नावरसाचा गोडवा सुंदर रित्या वाचकांना उपलब्ध करून दिलाय. कशीही हाक मारा, पण प्रेम अबाधित असू द्या, हा लेखातील सुरेख संदेश हृदयात घर करून गेला. आणिक एका विनोदी लेखाचा उल्लेखच करते मंडळी! ‘खाणाऱ्याने खात जावे’ हा खाद्य संस्कृतीवर आधारित लेख मूळ पुस्तकातूनच अस्सल भोजनभाऊ (अथवा बहीण) बनून अधाशासारखा आकंठ ओरपावा ही नम्र विनंती. वाचकहो, ही झाली काही लेखांची ओझरती झलक !
विश्वास सरांच्या पुस्तकांची लेटेस्ट संख्या १०, पण त्यांची साहित्यिक गुणवत्ता मात्र १०० टक्क्याहून अधिक, बावनकशी सोन्यासारखी ! आधीच्या लोकप्रिय (त्यातील दोन पुरस्कृत) पुस्तकांच्या सोबतच हे पुस्तक देखील प्रसिद्धी पावेल यात शंका नाही. मंडळी, आपल्याला जीवनात हव्यास असतो आनंदाच्या क्षणाचा. ‘हवास मज तू, हवास तू’ सारखे बेफाम गाणे गात आपण त्याच्या शोधात असतो ! मात्र आपल्याच सभोवती नजर पोचेस्तोवर आनंदाची असंख्य बेटे आहेत हे जाणवायला अन त्यांच्यापर्यंत पोचण्यास जास्त काही करण्याची गरज नाही, कागदाची कोमल नौका पुरे. अट एकच ! ही नौका बनवण्याकरता कागद मात्र ‘आनंदनिधान’ या पुस्तकाचा हवा. यासाठी हे पुस्तक घेणे आणि इतरांना देणे आलेच! कसे अन कुठे ते सांगते, पण हे आनंदपर्व केव्हा साजरे करायचे ते तुम्हीच ठरवायचे !
गोष्टी गावां शहरांकडील हे पुस्तकाचे नाव आणि मुखपृष्ठावर दोन चित्रे एक गावाचे एक शहराचे यावरून सहजच सगळ्यांना समजते गाव आणि शहर यामधील गोष्टी लेखक सांगणार आहेत
पण नीट विचार करता लक्षात येते की गाव आणि शहर दाखवले असले तरी यावर विचार करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत
१) अगदी पहिल्यांदा एक खेळ आठवला ज्यामध्ये दोन चित्रातील फरक ओळखा असे लिहिलेले असते आणि प्रामुख्याने फरक लक्षात येतो तो म्हणजे एक गाव आहे एक शहर आहे
२) मग रेखाटनावरून लक्षात येते ते गावाची बैठक आणि शहराची ठेवण
३) अजून विचार करता गावातील नैसर्गिकता आणि शहरातील कृत्रिमता प्रामुख्याने जाणवते
४) गावाकडचे वातावरण आणि शहराचे वातावरण हे देखील चटकन लक्षात येते
५) थोडा अजून विचार करता लक्षात येते की गावाकडची संस्कृती आणि शहराची संस्कृती या दोन संस्कृतीमध्ये असलेला फरक दाखवायचा आहे
६) अजून खोल विचार करता असे लक्षात येते की गावाची जागा आता शहराने घेतलेली आहे आणि ही खूप चिंताजनक गोष्ट आहे
७) गावाचे प्रतिबिंब मनात शहराचे रूप घेऊन येते आणि हा एक प्रगतीचा आरसा वाटतो
८) जमिनीची ओढ संपून आकाशाला हात लावण्याची वृत्ती निर्माण झालेली असल्याने छोटी बैठी घर जाऊन गगनचुंबी इमारती आलेल्या आहेत हे जरी समाधानकारक असले तरी तितकेच घातकही आहे
९) गाव आणि शहर या दोन्ही राहणीमानामध्ये पडलेला फरकही उद्धृत होतो
१०) नाईलाजाने शहराकडे आलेला आजोबा आपल्या नातवाला आमच्या वेळी की नाही असे म्हणून जेव्हा गोष्टी सांगतो तेव्हा त्याच्या नजरेसमोर येणार गाव आणि आत्ताच शहर हे हे त्याच्या दोन डोळ्यात दिसणारे चित्र स्पष्ट केलेले आहे
११) बारकाईने पाहता असे लक्षात येते की गावाकडच्या झाडांचा रंग आणि शहरातील झाडांचा रंग यामध्ये फरक दाखवलेला आहे तो म्हणजे नैसर्गिक रित्या वाढलेली झाडे किती छान दिसतात आणि कृत्रिम रित्या वाढवलेली झाडे जरी वाढली तरी ती कशी खुरटी खुरटलेलीच दिसतात
१२) गावाकडील मोकळी जागा मोकळे वातावरण हिरवी जमीन शहरातील कोंडतं वातावरण गजबजीत जागा आणि सिमेंट जंगल
१३) मोकळ्या हवेमुळे निर्माण झालेली प्रसन्नता कोंदट हवेने प्रदूषण वाढल्याने निर्माण झालेला तणाव
१४) लेखकाच्या दृष्टीचा पडलेला गाव आणि शहरावरचा प्रकाशझोत
अशा अनेक कल्पनांना वाव देणारे साधेसे चित्र पण अतिशय चिंतनीय. विचारशील असे हे चित्र. रमेश नावडकर यांनी चितारलेले विषय पूरक असे असून साध्या गोष्टीतूनही सामाजिक भान जागे करणारे असे आहे त्याची निवड प्रकाशक उषा अनिल प्रकाशनच्या उषा अनिल शिंदे यांनी केली आणि लेखक नारायण कुंभार यांनी त्याला मान्यता दिली म्हणून त्यांचे मन:पूर्वक आभार
अळवावरचं पाणी हे पुस्तक हातात आले. मुखपृष्ठच इतके छान.. .हिरव्या पानावर मोत्यासारखे चमकणारे जलबिंदू… काय म्हणायचे असेल लेखिकेला?— आयुष्य म्हणजे अळवावरचे पाणी, ते घरंगळून जाते.
आयुष्यातल्या कटू आठवणी, कुणाबद्दलही कटुता मनात न ठेवता केलेला हा उषाताईंचा जीवनप्रवास.
त्यांनी जशा आठवतील तशा आठवणी राधिकाताईंना सांगितल्या. त्यांनी त्या टिपून घेतल्या आणि शब्दांकित करून या पुस्तकरूपाने आपल्यासमोर ठेवल्या.
एका कर्तृत्वावान स्त्रीची ही जीवनगाथा खूप प्रेरणादायी आहे.
सौ.राधिका भांडारकर
राधिकाताईने या पुस्तकात उषाताईंच्या जीवनयात्रेचे विविध पैलू दाखविण्यासाठी ३१ भाग केले आहेत.
कुठलेही पान उघडून कुठलेही पान वाचले तरी त्यातून एक मनस्विनी, कार्यरत, संवेदनाशील झुंजार व्यक्त्तिमत्वाचे दर्शन होते. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा राहतो.अंगावर सरसरून काटा येतो.
उषाताईंचे लहानपण अमळनेर येथे गेले. त्यांना सानेगुरुजींचा सहवास मिळाला.त्यांचे संस्कार बालवयातच घडले. राष्ट्रीय भावना ,सामाजिक बांधिलकी, धर्मसहिष्णुतेची रेघ मनावर कोरली गेली. घरी हरिजनांची वेगळी पंगत गुरूजींनी बंद केली. खेडेगावातील वसतिगृहातील मुलांना उषाताईंची आई घरी जेवण द्यायची. त्यामुळे माणुसकीचा धर्म मनावर लहानपणापासून बिंबला.
हा काळ होता १९४० ते १९७५ पर्यंतचा. त्याकाळी मुला मुलींत आईवडील खूप भेदभाव करत.
मुलांना दूध तर मुलींना ताक… का तर सासरी दूध मिळाले नाही तर मुलीला सवय असावी.
मुलीला नहाण आले की तिच्या लग्नाची बोलणी सुरू. मुलींना सारखा नन्नाचा पाढा.हे करू नको,ते करू नको. पाचवारी साडी नेण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागे.
— हा संघर्ष करताना उषाताईंना जाणवले की त्या प्रतिकार करू शकतात. त्यांच्या संवेदना प्रखर आहेत. त्या इतरांहून वेगळ्या आहेत….. राधिकाताईंनी हे मनाचे हेलकावे सुंदर टिपले आहेत.
उषाताईंमधली कार्यकर्ती त्यांना स्वस्थ बसू देत नसे. पुण्यातील कामगार महिलांना संघटित करुन त्यांना शिवणकाम शिकविले. महिलांना मोठ्या ऑर्डर मिळवून दिल्या. कांग्रेस भवन उद्योगाने भरले. महिलांना रोजगार मिळाला. मालाची ने आण उषाताई स्वतः करीत. पण आबासाहेब खेडकरांनी वैयक्तिक अधिकारात परवानगी देऊन सुद्धा विरोधकांच्या पोटदुखीमुळे काँग्रेस भवन खाली करावे लागले.
असे खच्चीकरणाचे प्रसंग वेळोवेळी आले. विरोधक त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची खिल्ली उडवीत होते. समाजातील हा कडवट अंतःप्रवाह त्यांची उमेद जाळत होते… परंतु त्यांची जिद्द त्यामुळे वाढली.
सामाजिक कार्यासाठी त्यांनी त्यांचे कौटुंबिक जीवनही कसे पणाला लावले याचे वर्णन राधिकाताईंनी केले आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय भक्कमपणे त्यांच्या पाठीशी सदैव होते.
उषाताईंचे यजमान श्री.चौधरी त्यांना सांगत, “समाजकार्य करायचे असेल तर भविष्यात पदरात दगड धोंडे पडतील.ते झेलण्याची तयारी ठेव. तू पक्की रहा. नंतर खचू नकोस. मी खंबीर आहे.”
‘उषाताई वाईट चालीची बाई आहे, तिचे पदस्थांशी अनैतिक संबंध आहेत ‘… इतक्या खालच्या पातळीवरची चिखलफेक विरोधकांनी केली. .परंतु तरीही त्यांचा संसार अबाधित राहिला.कारण श्री.चौधरी यांचे भक्कम कवच त्यांच्या पाठीशी होते. सालस मुलगी अलका, हुषार मुलगा अजय, देवमाणसासारखा जावई सतीश, समंजस सून, सूनेचे आई वडील, सर्वांचा त्यांना सदैव पाठिंबा मिळाला.
राजकारणात त्यांना जसे पाय मागे खेचणारे भेटले तसेच त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे करणारेही भेटले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, यांना कदर होती. त्यांच्या कार्याला स्वतःहून देणगी देणारे ही भेटले. तरीही राजकारणातून त्यांचे मन उबगले.
करायची इच्छा असेल तर करता येण्यासारखे खूप असते.. उषाताई म्हणतात, “ मी दैववादी नव्हते. श्रमवादी होते. काहीतरी सृजनशील करावे ही मनाची भूक. समाजकार्याची तळमळ असेल तर त्यासाठी राजकीय पदाची आवश्यकता नाही. दुसरे माध्यम असू शकते. राजकारणात कधी कधी तत्त्वांची गळचेपी होते. जनतेचा फायदा व्हावा म्हणून मी झटले. परंतु त्यामुळे मी वैरभाव ओढवून घेतला. पक्षाच्या गणितात माझी वजाबाकी झाली. परंतु शेवटी महत्वाचे काय? कामगारांचे कल्याण की माझे राजकीय स्थैर्य?
एखादे कार्य हाती घ्यावे .. उदा. महिला उद्योजक संघाची स्थापना. बी पेरावे,अंकुर फुटावा, त्याने जोम धरावा, आणि विरोधकांचे वादळ उठावे.हा अनुभव प्रत्येकवेळी आला. त्यामुळे सतत अडथळे ओलांडावे लागले. त्यामुळे मी जीवन जगायला शिकले.”
राधिकाताईंनी उषाताईंच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग चित्तथरारक रितीने शब्दांकन केला आहे. असं वाटतं की आपल्यावर असा प्रसंग ओढवला असता तर ! प्रत्येक प्रसंग जीवनाला कसे सकारात्मक सामोरे जायचे हे दर्शवितो.
उषाताईंचे आयुष्य म्हणजे अर्धा पेला सुखाचा, अर्धा पेला दुःखाचा. एक घोट गोड तर एक घोट कडू.
आज उषाताई हयात नाहीत. परंतु त्यांची कार्यप्रणाली चालू राहील.
आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या मनात कुणाबद्दलही कडवटपणा नाही.आकस नाही.
अळवावरच्या पाण्यासारखा तो ही त्यांनी घरंगळून दिला. निराधार, परित्यक्ता, असहाय्य,अगतिक स्त्रियांसाठी त्या शेवटपर्यंत झटल्या. त्यासाठी कुठले पद नको, हुद्दा नको,.. त्यांच्याकडे होते समाजशील मन.
या पुस्तकाबद्दल लिहावे तेवढे थोडेच. भाषा अतिशय साधी, सरळ, सोपी पण काळजाचा ठाव घेणारी. अंतःकरण हेलावून टाकणारे हे चरित्र आहे. शिवाय या पुस्तकासोबत उषाताईंच्या कुटुंबियांनीही त्यांच्याविषयीच्या आठवणी आत्मीयतेने आणि कृतज्ञ भावनेने लिहिल्या आहेत. सर्वार्थाने हे पुस्तक सुरेख आहे. सर्वांनी जरूर वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
राधिकाताई उत्कृष्ट कथालेखिका आहेत,.कवयित्री आहेत. हा चरित्रात्मक प्रकारही त्यांनी अप्रतिमपणे मांडला आहे. मी त्यांना या पुस्तकासाठी व त्यांच्या पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा देते.
परिचय : सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक वरून पांढरा आणि खालून काळा असलेला ढग. त्यातून ठिबकणारे पाणी. असा ढग पेलणारा एक हात.
असे चित्र पहिले आणि मन विचारात गुंतले. या ठिबकणाऱ्या थेंबाप्रमाणे अर्थाचे एक एक सिंचन होऊ लागले.
१) पहिल्यांदा गाणे आठवले जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे… निराधार आभाळाचा तोच भार साहे. खरंच निराधार आभाळाला पेलणारा अदृश्य हात दृश्य झाला तर कदाचित असाच दिसेल.
२) एक ढग जो पांढरा आहे तोच भरून आला तर काळा होतो आणि आपुलकीचा स्पर्श झाला की आपोआप ठिबकू लागतो.
३) कितीही मोठ होऊन आभाळाला हात लावले तरी आभाळाचं मन पाणी रूपाने येऊन जमिनीची ओढ घेते
४) आभाळ कवेत घेऊ पाहणाऱ्या हाताचा स्पर्श झाला की आभाळ ही बोलके होऊन थेंब रूपाने बोलू लागते
५) आभाळाला हात टेकवणारी व्यक्ती नक्कीच सामर्थ्यशाली असते
६) आभाळाचा अर्थ जीवनाशी संलग्न घेतला तर जीवनातील दुःखाने रडू येते किंवा सुखाने ही डोळ्यात आसू येतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेळच्या आभाळातून डोकावणारे पाणी हे वेगवेगळे भाव दाखवून जाते
७) पावसाळी महिन्यातील वेगवेगळया महिन्यामध्ये आभाळाचे वेगवेगळे रूप दिसते आणि त्यातून पडणारा जो पाऊस असतो त्याचाही वेगळा वेगळा अर्थ जीवनाशी संदर्भात लागू शकतो
अशा विचारांमध्ये मग्न होत असतानाच लक्ष पुस्तकाच्या शीर्षकाकडे जाते मन आभाळ आभाळ मग त्याच्या संलग्न असे वेगवेगळे अर्थही यातून उध्रुत होतात.
८) मनाचे आभाळ ही वरून पांढरे दिसले तरी त्याच्या तळाशी खोल गाळ साचून ते काळे झालेले असते दुःखाच्या या काळेपणा आलेले अश्रू आपल्यातच सहन केले जातात.
९) मनातले विचार हे भावनांच्या रूपाने बरसत असतात. त्या बरसण्याचे रूप वेगवेगळे असते.
१०) आनंद ओसंडतो मेघ आभाळी पाहुनी
पण मनातला पाऊस पाहिला ना कोणी
११) सृजन काळ जवळ आलेला आहे त्यामुळे आकाशातील पाऊस जमिनीवर पडल्यावर काहीतरी अंकुरणार आहे तसेच मनातले आभाळ दाटून आले की विचार पावसाने काहीतरी लेखन निश्चित घडणार आहे
१२) मनातल्या पावसाला हात घातला की विचारांचे ओघ बाहेर पडून भावनांना अंकुर फुटतात
१३) कवयित्री स्त्री जाणिवा जाणत असल्यामुळे हे स्त्रीचे मन आहे असे धरले तर स्त्री आपले दुःख कोणाला दाखवत नाही ती वरच्या ढगाप्रमाणे असते आणि दुःख हे हृदयात ठेवलेले असते खालच्या काळ्या ढगाप्रमाणे आणि हा आपल्या आतच बरसत असतो.
१४) मन म्हणजे काय हे समजणे अवघड असले तरी मन हे आभाळासारखे असे मानले तर या मनाला पकडण्याचे मोठी ते घेण्याचे धैर्य सामर्थ्य घेऊन त्याला ओंजळीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा कितीतरी अन्वयार्थाने भावार्थानी सजलेले हे साधे से चित्र अरविंद शेलार यांनी काढलेले असून परिस पब्लिकेशन नी त्याची मुखपृष्ठ म्हणून निवड केली आणि कवयित्री वंदना इन्नाणी यांनी त्यास मान्यता दिली म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार
☆ “बोल बच्चन” – लेखक : श्री रूपेश दुबे – अनुवादिका – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : बोल बच्चन
लेखक : रुपेश दुबे
अनुवाद : सौ. मंजुषा मुळे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे : १८८
मूल्य : रु. २५०/_
यशाची शिखरं गाठत जावं आणि तिथे कायम टिकून रहाव असं कुणाला वाटत नाही ? पण यश मिळवणं सोपं असतं का ? त्याचा पाठलाग करताना, ध्येय गाठताना अपयश आलं तर ? यशाचा मार्ग सोडून द्यायचा की खंबीरपणे पुढे जायचं ?
सौ. मंजुषा सुनीत मुळे
या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा पारंपारिक मार्ग म्हणजे उपदेश करणे. पण उपदेश ऐकून घेणार कोण ? त्यामुळे तेच कडू औषध आवडत्या गोड पदार्थांबरोबर दिल तर ? औषध सहज पचनी पडेल ना? नेमका हाच विचार श्री. रूपेश दुबे यांनी केला आहे.
श्री रुपेश दुबे यांनी सुमारे वीस वर्षे टेलिकॉम कंपनीत व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पद भूषवून आता ते स्वतःचा व्यवसाय करत आहेत. ‘बोल बच्चन ‘ हे हिंदी भाषेतील पुस्तक त्यांनी लिहीले आहे. या पुस्तकाचा अनुवाद मराठीत सौ. मंजुषा मुळे यांनी केला आहे. हे अनुवादित पुस्तक अलिकडेच वाचून झाले. त्या पुस्तकाविषयी थोडसं.
काय आहे या पुस्तकात ?
अनुभवातून आलेले शहाणपण, सकारात्मकता आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम म्हणजे हे पुस्तक. यशाचा मार्ग दाखवणारा आणि अपयश पचवायला शिकवणारा मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मग इथे बच्चन म्हणजे अभिताभ बच्चन यांची काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कटू औषध पचवण्यासाठी, त्यावर गोड आवरण लावण्यासाठी बच्चनजींना आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन माहित नाहीत असा माणूस सापडणे विरळाच. त्यांचे चित्रपट व त्यातील भूमिका या तर प्रचंड गाजल्याच पण त्यांचे अनेक संवाद रसिकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्यासाठी गायली गेलेली गीतेही लोकप्रिय झाली आहेत. याच लोकप्रियतेचा फायदा उठवून आपण जर काही सांगितले तर लोक सुरूवातीला उत्सुकतेपोटी आणि मग अधिक रस घेऊन वाचू लागतील असा विश्वास वाटल्यामुळेच लेखकाने हे तंत्र अवलंबले आहे. अमिताभजी यांनी प्रत्यक्ष जीवनात अनेक वेळेला अपयश पचवून यशाचे शिखर गाठले आहे. चित्रतटातील त्यांच्या बहुसंख्य भूमिका या संघर्षमय आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडून आलेले उद्गार, त्यांचे संवाद वाचकाला अधिक जवळचे वाटतात व मनाला जाऊन भिडतात.
लेखकाने या पुस्तकात यशाची १८ सूत्रे सांगितली आहेत. प्रत्येक सूत्र सांगण्यासाठी एक एक प्रकरण लिहिले आहे. या प्रकरणाला त्यांनी बच्चनजींचे प्रसिद्ध गीत किंवा संवाद शिर्षक म्हणून वापरले आहे. तेच शिर्षक का ठेवले आहे याचा उहापोह केला आहे. आपल्या प्रत्यक्ष जीवनात ते कसे लागू पडते हे उदाहरणे देऊन रंजकतेने पटवून दिले आहे. बोधकथेला तात्पर्य सांगावे त्याप्रमाणे लेखाच्या शेवटी लेखकाने चौकटीमध्ये एक अर्थपूर्ण असे वाक्यही दिले आहे. या वाक्याव्यतिरिक्त लेखातील अनेक वाक्ये सुभाषिताप्रमाणे वापरावीत अशी आहेत. त्यामुळे प्रत्येक लेख ज्ञान आणि मनोरंजन यांनी परिपूर्ण असा आहे.
फक्त एक उदाहरण पाहू. एका लेखाचं नाव आहे ‘ देखा एक ख्वाब ‘. अमिताभ बच्चन यांच्या सिलसिला या चित्रपटातील एका गीताचे सुरुवातीचे बोल. या गीताचा आधार घेऊन लेखकाने स्वप्न आणि सत्य यात असणारी तफावत कशामुळे असते त्याची कारणे शोधली आहेत. वास्तविकता काय असते त्याची जाणीव करून दिली आहे. मेहनतीशिवाय स्वप्ने पुरी होत नसतात. असामान्य यश मिळवणारी माणसं स्वप्नही असामान्य बघतात. उच्च बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रम
यामुळे ते स्वप्न पूर्ण करू शकतात. शेवटी वर उल्लेख केल्याप्रमाणे एका चौकटीत लिहीतात ” स्वप्न बघा, मोठी मोठी स्वप्नं बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःचा विचार, सामर्थ्य आणि सकारात्मकता या सगळ्या गोष्टींना एकाच दिशेने म्हणजे अर्थातच तुमच्या ध्येयाच्या दिशेने कार्यान्वित करा. “
अशाप्रकारे लेखाची मांडणी करून अठरा लेखांमधून यशाची अठरा सूत्रे सांगितली आहेत.
हे पुस्तक आपण मराठीतून वाचतो. पण सौ. मंजुषा मुळे यांनी अनुवाद करताना वापरलेली भाषा इतकी नैसर्गिक वापरली आहे की हा अनुवाद आहे असे वाटतच नाही. मराठीत वेगळ्या विषयावरचे पुस्तक आणल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांनीच, विशेषतः युवकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे वाटते. आयुष्याची जडण घडण करण्यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल.
पुन्हा एकदा अनुवादकर्त्या सौ. मंजुषा मुळे यांना धन्यवाद !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈