☆ पाचवा कोपरा (मराठी कथासंग्रह) – लेखिका – प्रा. सुनंदा पाटील ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆
लेखिका प्रा.सुनंदा पाटील
प्रकाशक शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
पृष्ठे 136
मूल्य रु 250/-
प्रा. सुनंदा पाटील
प्रा. सुनंदा पाटील यांचे जेष्ठ नागरिकांना समर्पित केलेला कथासंग्रह आजच वाचून पूर्ण केला.
कथा वाचनापूर्वी लेखिकेचे मनोगत ही वाचले होते ते जरा मनात धाकधूक ठेऊनच ! याचे कारण अस कि जेष्ठंना सूचना, सल्ला, पर्याय हे सतत मिळत असतात . सांगणाराही मदत करण्याच्या उद्देशाने किंवा त्रास कमी करण्याच्या हेतूनेच सांगत असतो. पण प्रत्येक घरातील माणसांची पध्दत व आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने हा सल्ला वापरता येतोच अस नाही.अशावेळी जर मानसिकरित्या संभ्रमीत असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळतो तो प्रत्यक्ष अश्या परिस्थितीतून वाट काढणाऱ्या आपल्या सहकारी मित्रांची. नेमकी हीच उपलब्धी या कथांनी दिली आहे.
कथासंग्रहातील कथा जेष्ठांच्या असल्या तरी वैविध्य पूर्ण आहेत. एकट्याने रहाताना आपली पेंटिंग ची आ्ड जपणार्या भरारी मधील सुनिताताई असोत किंवा वाटचाल मधल्या शारदबाई वागळे असोत , आपल्या छंदांना त्यांनी म्हातारपणीच्या काठीचा मान दिला, तर मनात ओसंडून वाहणाऱ्या मायेला मला आई हवी अस म्हणणाऱ्या मुलाला माधवीताईंनी आईची माया दिली. रिटायर झालेल्या अण्णांना पैशाची नड भासू लागली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची संस्कृत ची आवड हेरून पौरोहित्याचा मार्ग दाखवला विक्री या कथेतील मनोहरपंतांनी आपल्या भावांचे नाते पैशापेक्षा जास्त मोलाचे मानले. मोकळा श्वास मधील अक्कानी तर मला जोरदार धक्काच दिला. ज्या आक्का देवासमोर माझ्याआधी माझ्यापतीचे निधन होउदे असे मागणे मागत होत्या त्या घर सोडायची हिमंत बांधतात वजरा छोट्या गावात घर घेऊन स्वतंत्र राहू बघतात ही धीराची कल्पना आहे.
ज्या कथेचे नाव कथा संग्रहाला दिले आहे ती पाचवा कोपरा ही कथाही वास्तवाशी नाते सांगणारी आहे.घरात उपर्यासारखी मिळणारी वागणूक, साध्या साध्या गोष्टी वर लादलेली बंधने, आवडीच्या गोष्टींना मुद्दाम अडथळे आणणे या सर्व गोष्टींना वैतागून श्रध्दाताई वृध्दाश्रमात रहायला जातात व तेथे आपला लिखाणाचा छंद पुरा करतात .हे सर्व करताना त्यांनी आपला मनाचा मोठेपणा जपला आहे. त्या मुलाला आपल्या अकौंटमधले पैसे काढून मोठे घर घेण्यास सुचवतात. आपल्या घरातील माणसांना कमी लेखू नये, क्षमता ही स्वतंत्र गोष्ट आहे त्याचा आदर करायला शिक हेही त्या सांगायला विसरत नाहीत. अत्यंत भावपूर्ण शब्दांत लेखिकेने कथेचा शेवट केला आहे.
सर्व कथांचे तात्पर्य मात्र सर्व जेष्ठांनी लक्षात ठेवले पाहिजे .. ते म्हणजे जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाट देउ नये अशी आपली जुनी म्हण. ही मात्र वारंवार प्रचितीस येते.
लेखिकेने आपल्या मनोगतात आपले विचार व्यक्त करतानाही ही अपेक्षा ठेवली आहे. पुस्तकाच्या समारोपाच्या कथेनंतर वाचकाचाही हाच विचार पक्का झाला तर लेखनाचे सार्थक झाले असे होईल.
सर्व जेष्ठांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.
परिचय : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रीकृष्णाच्या अद्भुत लीलांनी व कथांनी युक्त असा भागवतातील दहावा स्कंध म्हणजे जणू भागवताचा आत्माच!! मागील भागात आपण या दहाव्या स्कंधातील पूर्वार्ध पाहिला. (पाचव्या भागात).आता या दहाव्या स्कंधाचा – पर्यायाने- श्रीकृष्ण चरित्राचा उत्तरार्ध पाहू या.
सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने वेदस्तुती या कथा भागाने केली आहे. शब्दांनी वर्णन न करता येणाऱ्या परब्रम्ह परमात्म्याची वेदांनी केलेली ही स्तुती आहे. भागवत ग्रंथामध्ये दशम स्कंधाच्या ८७ व्या अध्यायातील हे २८ श्लोक म्हणजे वेद वेदांताचे सार आहे असे लेखक म्हणतात. वाचायला फारच कठीण असणाऱ्या पण सुंदर संस्कृत श्लोकांनी आणि या वेदस्तुतीने सहाव्या दिवसाची सुरुवात लेखकाने केली आहे.
नंतर लेखक पुन्हा श्रीकृष्ण चरित्राकडे वळले आहेत. शुकाचार्य परीक्षित राजाला कंसवधा नंतरची कथा सांगतात. कंस हा जरासंधाचा जामात होता. जरासंधाच्या दोन मुली अस्ति आणि प्राप्ति या कंसाच्या पट्टराण्या होत्या. कंस वधा नंतर त्या पित्याकडे गेल्या तेव्हा जरासंधाला दुःख व संताप झाला. त्याने तेवीस अक्षौहिणी सैन्यासह मथुरेला वेढा घातला. संपूर्ण यादव कुळ नष्ट करण्याचे ठरवले. श्रीकृष्णानेही पृथ्वीवरील हा दैत्य भूभार कमी करण्याचे ठरवले. आकाशातून सूर्यरथासारखे तेजस्वी दोन रथ पृथ्वीवर उतरले. कृष्णाने एक बलरामाला दिला. श्रीकृष्णाचा दारुक नावाचा सारथी होता. यानंतरच्या या तुंबळ युद्धाला सुरुवात कशी झाली, परस्परांशी कसे युद्ध खेळले गेले , शस्त्रविद्या वगैरेचे अतिशय रोचक, अंगावर काटा आणणारे वर्णन लेखकाने केले आहे. जरासंधाचा पूर्ण पराभव करूनच श्रीकृष्ण मथुरेला परतले. जरासंध पुन्हा मगध राज्यात परतला. पण नंतर असेच तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याने एकूण सतरा वेळा मथुरेवर हल्ला केला. प्रत्येक वेळी त्याचे सारे सैन्य नष्ट करून श्रीकृष्णाने त्याला उदारपणे सोडून दिले. पण भूभार नष्ट केला.
अठराव्या वेळी कालयवन नावाचा म्लेंच्छ तीन कोटी सैन्य घेऊन आला. हे संकट महा भयंकर आहे . हे जाणून श्रीकृष्णाने समुद्रात बारा योजने दूर विस्तीर्ण नगरी विश्वकर्म्या कडून वसवून तिथे सर्व यादवांना सुरक्षित ठेवले. हीच द्वारका नगरी होय!! या नगरीचे वर्णन लेखकाने अत्यंत सुंदर केले आहे. त्या नगरीतून बाहेर पडणाऱ्या श्रीकृष्णाचा कालयवनाने पाठलाग केला. कालयवनाला एका गुहेपर्यंत आणून मांधाता राजाचा मुलगा मुचकुंद याचे कडून त्याला भस्मसात करविले. ही मुचकुंदाची कथाही खूपच सुंदर रंगविली आहे. श्रीकृष्ण रणांगणातून पाठ दाखवून पळाले म्हणून त्यांना रणछोडदास नाव पडले . जरासंधही त्यानंतर पुन्हा युद्धास आला त्या युद्धाचेही वर्णन खूपच रंजक आहे.
यानंतरची रम्य व रसाळ कथा रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणी हरण याची आहे. ही कथा प्रत्यक्ष वाचावी अशीच आहे.स्वयंवरानंतर कृष्णाने जमलेल्या सर्व राजांच्या देखत रुक्मिणीला रथात बसवले. शिशुपाल व रुक्मिचा पराभव केला (रुक्मि हा रुक्मिणीचा भाऊ !) आणि श्रीकृष्ण रुक्मिणीस घेऊन द्वारकेला गेले. शंकराने कामदेवाला (मदनाला) भस्म केले. तेव्हा मदनाने पुन्हा देह मिळावा म्हणून भगवंताची प्रार्थना केली होती. तोच कामदेव, भगवंत व रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्माला आला. त्या प्रद्युम्नाची छोटी कथा पुढे आली आहे .नंतर श्रीकृष्णाचा जांबवती व सत्यभामाेशीही विवाह झाला. पुढे स्यमंतक मण्याची मनोरंजक कथा आहे. यानंतर श्रीकृष्णाने कालिंदी व इतर स्त्रियांशी विवाह केल्याची कथा आहे. तसेच श्रीकृष्णांनी इंद्राचे छत्र बळकावणाऱ्या नरकासुरास ठार केल्याची रम्यकथा लेखकाने वर्णन केली आहे. त्याने बंदीवासात टाकलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांशी भगवंताने तितकी रुपे घेऊन विवाह केले. श्रीकृष्णाने एकदा गंमतीने रुक्मिणीच्या पती प्रेमाची परीक्षाही घेतली. ही कथा खूप छान रंगविली आहे.
यानंतर श्रीकृष्णाच्या मुख्य आठ राण्यांची नावे सांगितली आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, सत्या (नाग्नजिती), कालिंदी, लक्ष्मणा, मित्रविंदा, भद्रा अशा या आठ राण्या!! या राण्यांच्या मुलांची ही नावे सांगितली आहेत .या सोळाहजार स्त्रियांनाही प्रत्येकी दहा मुले झाली असल्याचा उल्लेख आहे. प्रद्युम्नाचा विवाह रुक्मिची कन्या रुक्मवती हिच्याशी तर प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध याचा विवाह रुक्मिची नात रोचना हिच्याशी झाला होता. बाणासुर दैत्याची मुलगी उषा! हिचे अनिरुद्धावर प्रेम होते. त्याचे सुंदर वर्णन कथाकाराने केले आहे. त्यावरून बाणासुराचे श्रीकृष्णाशी युद्ध झाले. त्याला कृष्णाने मुक्ती दिली.
या आणि यापुढील काही कथा आपल्याला माहीतही नसाव्यात. श्रीकृष्णाची मुले खेळत असताना त्यांना कृकलास नावाचा पर्वतप्राय खेकडा दिसला. श्रीकृष्णाने त्याला विहिरीतून बाहेर काढले. तो पूर्वजन्मी इक्ष्वाकूचा मुलगा नृग नावाचा दानशूर राजा होता. या नृग राजाला त्याची चूक नसताना केवळ गैरसमजाने खेकड्याचा जन्म मिळाला ही कथा आहे.
एकदा बलरामांनी गोकुळाला भेट दिली, त्याचे वर्णन पुढे दिले आहे. पुढची कथा स्वतःला श्रीकृष्ण समजणाऱ्या पौंड्रकाची आहे. त्याच्याशी युद्ध करून कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडविले. काशी राजाचा वध केला. ते पाहून सुदक्षिण नावाचा काशीराजाचा मुलगा श्रीकृष्णावर चालून आला. त्याचाही वध कृष्णाने सुदर्शन चक्राने केला व काशीनगरीही भस्मसात केली. बलरामांनीही काही अद्भुत पराक्रम केले. त्याच्या कथा शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितल्या आहेत. द्विविद नावाच्या वानराचा वध बलरामाने केला. तो सुग्रीवाचा मंत्री होता. पण नरकासुराचा परममित्र होता. बलरामाने हस्तिनापुरास जाऊनही खूप पराक्रम गाजविला. कौरव घाबरले. दुर्योधनाने बलरामाला बाराशे हत्ती, एक लाख वीस हजार घोडे, सहा हजार सुवर्ण रथ आंदण दिले.
नारद मुनींनी एकदा द्वारकेस जाऊन श्रीकृष्णाचा संपूर्ण संसार व परिवार पाहिला. या कथेनंतर श्रीकृष्णाची दिनचर्या लेखकाने वर्णन केली आहे. नंतर भीमाकरवी श्रीकृष्णाने युक्तीने जरासंधाचा वध करविला. ही कथा आहे. जरासंधाने बंदी बनवलेल्या सर्व राजांची मुक्तता श्रीकृष्णाने केली. शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर त्याचा सुदर्शन चक्राने वध केला. तीन जन्म तो वैरभावनेने का होईना कृष्णाचाच जप करीत होता. त्यामुळे शिशुपालाला कृष्णाने मुक्ती दिली.
मयासुराने निर्माण केलेल्या भवनात दुर्योधनाची फजिती झाली. तेव्हा द्रौपदी त्याला हसली. मग दुर्योधन संतापला. ही कथा थोडक्यात सांगितली आहे. यानंतर शाल्व या शिशुपालाच्या मित्राचा वध, बलराम कौरव पांडवांच्या युद्धात निष्पक्ष म्हणूनच राहिले, ते तीर्थयात्रेस निघून गेले ही कथा आहे. बलराम नैमिषारण्यात आले. प्रभास क्षेत्री गेले. तिथून द्वारकेस परतले. या काळात त्यांनी अनेक पराक्रम केले. त्याचे वर्णन लेखकाने केले आहे.
यानंतरची कथा सुदाम्याची आहे. ही कथा सर्वांनाच ज्ञात आहे. ती लेखकाने फारच सुंदर वर्णलेली आहे. सुदाम्यावर कृष्णाने अनुग्रह केला. यानंतर श्रीकृष्ण खग्रास सूर्यग्रहणाचे वेळी स्यमंतपंचक या क्षेत्री गेले. तिथे त्यांची नंद यशोदा व इतर गोपगोपींची भेट झाल्याचे वर्णन आहे.द्रौपदीने सर्व कृष्णपत्नींची भेट घेतल्याची कथा पुढे आली आहे.वसुदेवाने श्रीकृष्णा कडून कर्माचा निरास कसा होईल याविषयी सर्व तत्त्वज्ञान समजून घेतले. श्रीकृष्णांनी देवकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिला कंसाने मारलेली तिची सात मुले देखील ब्रह्मदेवाकडून आणून आईला त्यांची भेट घडविली.
पुढे सुभद्रा हरणाची कथा आहे. बहिणीच्या स्वयंवराचे वेळी तिचे हरण करण्यास अर्जुनाला श्रीकृष्णाने मदत केली. हा कथा भाग आहे. यानंतर वृकासुराची कथा आहे. त्याने शंकराची आराधना करून- मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून जावा- म्हणून वर मागितला. त्यामुळे पृथ्वीवर हाहा:कार माजला. श्रीविष्णूंनी एकदा बटूचे रूप घेऊन त्याला सांगितले की शंकराने तुला खोटा वर दिला आहे. तू त्याची प्रचिती पहा. असे म्हणून त्याला स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि त्याला युक्तीने भस्मसात केले.
शेवटी द्वारकेचे वैभव व कृष्ण महिमा या वर्णनाने दहाव्या स्कंधाची व सहाव्या दिवसाच्या कथा भागाची समाप्ती होते.
सहाव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर विष्णूंच्या गळ्यातील वैजयंती माळेचे चित्र आहे. तिच्यात मुक्ता, माणिक्य, मरकत, इंद्रनील,हीरक ही पाच रत्ने गुंफलेली असतात. ती पाच रंगांची व गुडघ्यापर्यंत लांब असते. ही माला पंचमहाभूते व पंचतन्मात्रा यांचे प्रतीक आहे.
☆ निशिगंध (भावगीत संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
कवी: डॉ. निशिकान्त श्रोत्री
प्रकाशक: नीलकंठ प्रकाशन (श्री प्रकाश रानडे)
पृष्ठ संख्या: २१२
किंमत: Rs. २००
डॉक्टर निशिकान्त श्रोत्री हे नाव साहित्य क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या या भावगीत संग्रहात भक्तीपासून शृंगारापर्यंत विविध अंगांना आणि विषयांना स्पर्श करणारी गीते असल्यामुळे विषयांनुसार गीतांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. एकूण नऊ भागात ही गीते विखुरली आहेत. भक्ती, देशभक्ती, चिंतन, प्रीती, युगुल, विरह, शृंगार सगे सोयरे आणि नारी जीवन असे हे विभाग आहेत. जवळजवळ २०० हून अधिक गीते यात समाविष्ट आहेत आणि सगळीच गीते एकाहून एक सरस आहेत.
या गीत वाचनात वाचक अगदी सहजपणे रमून जातो ते त्यांतील सुंदर शब्दरचना आणि तितक्याच सुंदर विचारांमुळे. गीतांच्या शब्दांत अडकत असतानाच अगदी सहज प्रत्येक विभागासाठी काढलेली रेखाचित्रेही खूप बोलकी आहेत. या रेखाटनांंमुळे गीते वाचणारा रसिक त्या वातावरणाशी या चित्रांमुळे पटकन जोडला जातो.
वास्तविक यातली सारीच गीते म्हणजे उत्तम काव्य, अनमोल विचार, भाषा, भावना यांचा एक समृद्ध झराच आहेत. सर्वच गीतांविषयी लिहिणे केवळ अशक्य आहे. मात्र काही लक्षवेधी भावगीतांबद्दल आपण इथे नक्कीच बोलूयात.
भक्ती विभागातील पहिलेच गीत गणनायका. गणेश प्रार्थना सादर करून या पुस्तकाची सुरुवात एक सुंदर भक्ती पूर्ण आणि “प्रथम वंदना तुजला गणेशा” या पारंपारिक प्रथेप्रमाणे होते.
धन न वांच्छितो संपत्ती हिरे
दर्शन दे मजला कर ठेवून शिरावरती या.. आशीर्वच दे मला…
संग्रहाची सुरुवातच अशी भक्तीमय, लीन आणि नम्रतेने होते. कलाकार कसा नम्र, समर्पित असावा याची जाणीव होते. या विभागात अनंत स्तोत्र, शारदा स्तवन, भूपाळी, प्रार्थना, गवळण, परमेश्वराची, ब्रह्मचैतन्याची केलेली आळवणी आहे.
जनमनाचा अधिनायक
कोट्यावधीचा तो विधायक
व्यापिले ज्याने अंतःकरणाला अभिमानाने जगायला
राज्य राज्यांच्या देशभक्तीला जाती-जातीच्या मिलनाला
लोक तंत्राने एकवटला
मान देऊया तिरंग्याला
वंदू या भारत देशाला..
(वंदू या भारत देशाला)
…वरील प्रत्येक ओळीमध्ये देशाप्रती गौरवाची, अभिमानाची भावना जागृत करण्याचं सामर्थ्य जाणवतं.
वैभवात जी नाती जपली.
दैन्ये ना त्यागली
नसे अपेक्षा कृतज्ञ प्रीती
मनात जोपासली…
— ‘ वेध निवृत्तीचे ‘ या कवितेत ते म्हणतात,
कर्मयोग हे दैव जाणिले
अविरत गतीला नाही रोखले
चल चक्राची गती थोपवा
काया शिणली
कार्य संपवा…
जीवनाविषयी केलेले सखोल चिंतन या काव्यरचनांतून जाणवतं. कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे हा जीवनानुभवातून आलेला अनमोल संदेश कवी सहज जाता जाता देऊन जातात.
अतिशय हळुवार, अलवार, कोमल मोरपिशी, शब्दांतून कवीचे प्रीत काव्य उलगडत जाते.
मुक्त संचार तुझा माझ्या गे स्वप्नात
कधी असतो का रात्री मी तुझ्या ध्यानात
करितो अर्ज मी मुग्ध तुझ्या नयनाते
एकदा घेई मजला बंद तुझ्या पापणीते
(एक वार हळूच पाहू दे)
…या गीतातल्या या सुंदर प्रेमाचं आर्जव करणाऱ्या ओळी. एखाद्या सुकलेल्या, व रुक्ष मनालाही उमलवतात आणि गतकाळाच्या आठवणीत रमवतात.
युगुल विभागातील गीते तो आणि *ती*चीच आहेत. या गीतांमध्ये इतकं माधुर्य आणि गेयता आहे की वाचता वाचता आपण सहजच मनाचा एक ठेका पकडतो.
ती: तुझं जालं मी ल्याले
मन तुजं मी प्याले
जीव तुज्यात विरलाय माजा
लाटं लाटंत झेलिन होरी तुजी मी
जीवाचा तू तर राजा..
तो: का डोल्यात पानी तुज्या
व्हटात गानी
रानी खरी जीवाची माज्या… या कोळीगीतातला प्रेमाचा हळुवार अविष्कार आणि ठसका, एकमेकात गुंतलेली मनं वाचकांच्या हृदयात आनंदाच्या लाटाच उसळवतात.
पाजुनी दवबिंदू
मी कलिका मनी जोपासली
कंटकाची बोच म्हणून
दूर तिज सारू कशी..
(भैरवी)
किंवा..
जगण्याची आशा जात असे सुकून
साथ नसताना कसे जा जगू जीवन
(खिन्न कातरवेळ)
अबोल्यात जर जगायचे
तर प्रतीक्षा तुझी कशासा गे
पहायचे जर नसेल तुजला
नेत्र मिटू दे अखेरचे..
(दिवा स्वप्न)
विरहाचे बोचरे दुःख व्यक्त करणारी ही गीते खरोखरच मन उदासही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी विराणीचे क्षण येतातच. त्या क्षणांना पुन्हा एकदा भावनांचा झोका या गीतांमुळे दिला जातो. इतक्या सजीवपणे या गीतांचे लेखन झालेलं आहे.
पाकळी चुंबता अंतरी लाजले
चिंब पदरातुनी वक्ष आसुसले
दाटली आर्तता नयन पाणावले
स्पर्श तव जाहला प्रेम अंकुरले
(चित्त धुंदावले)
शृंगारातला उन्नतपणा, आतुरता, देहभावना, लज्जा, औत्स्युक्य या साऱ्या प्रणय भावनांचं सुरेख मिश्रण या शब्दांतून ठायी ठायी पाझरतं. पण तरीही या शब्दांमध्ये कुठेही अश्लीलता जाणवत नाही. इथे राखलेलं आहे ते शृंगाराचं पावित्र्य आणि हेच या गीतांचं वैशिष्ट्य.
काही नाती ही जन्मभर आपल्या सोबत राहतातच. त्या व्यक्ती या जगात असोत वा नसोत पण त्यांनी जे दिलेलं आहे ते आपल्या आयुष्यासोबत अखंड येत असतं. याची जाण देणारी सुंदर गीते सगे सोयरे या भागात वाचायला मिळतात. ही गीते वाचताना कुठेतरी कवीच्या मनातली सगे सोयऱ्यांविषयीची कृतज्ञता ही जाणवते.
सुकून जाईल कैसे जीवन
पाखर धरी ती दृष्टी
कितीक रुजले किती उमलले
कृतज्ञतेची वृष्टी
आज पोरकेपणी वरद हा आहे आधाराला
उजाड धरतीवरी पसरला पावन पाचोळा
(दोन तरुंची छाया )
निसर्ग नियमाप्रमाणे सोडून गेलेल्या मात्यापित्यांनी पसरवलेल्या अनेक संस्कार पर्णांना ते पावन पाचोळा असं संबोधून त्यांच्या ममतेचा गौरवच करतात.
जीवन सारे शिल्प जाहले
तुझीच ही किमया
कवतुक तुझीया नयना मधले
मोहरली ही काया
(नाही मजला जगायचे)
अत्यंत प्रिय व्यक्तीच्या प्रोत्साहनने जीवन कसे बहरते हेच यातून व्यक्त होते तसेच त्यांच्याविना जीवन कसे शुष्क होते याही भावना इथे प्रकट होतात. सगे सोयरे कोण असतात, का असतात, त्यांची जीवनातली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे अर्थ प्रत्येक गीतात वाचायला मिळतात. मातृत्वाची सर्वंकष महती सांगणाऱ्या गीतरचना नारी जीवन विभागात वाचताना धन्य तो नारी जन्म आणि नारी जन्माचा सन्मान व्हायला हवाच असे वाटते आणि असाच संदेश देणाऱ्या रचना यात आहेत. या गीतांमधून नारित्व, स्त्रीत्व या संज्ञांचा अतिशय नेमकेपणाने अर्थ उलगडलेला आहे. त्याचबरोबर नारीचा झालेला अनादर, तिच्या देहाची विटंबना याविषयीची चीडही कवीने व्यक्त केलेली आहे.
धुक्यापरीही धूसर झाली
पावन सारी नाती
मोल न काही लेकीला ती केवळ पैशापोटी
विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा
छाया ही नच नाही मृगजळ नसे कुठेही थारा..
(बावरलेली जखमी हरणी)
विश्वासाचे धामही झाले काटेरी पिंजरा ही शब्दपंक्ती मनावर खरोखरच आघात करते. आणि जगाचा एक कडवट वास्तव अनुभव देते. समाजात घडत असणाऱ्या स्त्री अत्याचारांची कवीने सखेद दखल घेतलेली आहे.
या सर्वच काव्यातून कवीचे एक सामाजिक, संवेदनशील, विशाल, बांधील मन जाणवते.
एकंदरच निशिगंध हा सर्व विषय स्पर्शी गीत संग्रह आहे. मानवी जीवन, माणूस टिपणारा आहे. प्रत्येक गीतात मौल्यवान असा विचार मांडलेला आहे. शिवाय या सर्वांतून कवीचा त्या त्या विषयावरील अभ्यास, निरीक्षण, संवेदना, सहअनुभूती आणि भाषेची अत्यंत मजबूत पकड जाणवते. मुख्य म्हणजे कुठेही विचारांचा गोंधळ नाही. स्पष्टता आहे. प्रत्येक ओळ गतीत वहात वहात रसिकांच्या मनात अलगद फुटते. शिवाय या सर्व गीतांमधून एक काव्यधर्मही त्यांनी जपलेला आहे. ऊपमा, उत्प्रेक्षा, लयबद्धता, गेयता, सहज यमके यामुळे काय वाचू, किती वाचू आणि किती वेळा वाचू अशीच वाचकाची मनस्थिती होते. काही कविता अवघड भासतात, पटकन अर्थ लागत नाही, कवीला नेमके काय म्हणायचे आहे ते समजायला वेळही लागतो. पण तेच काव्य पुन्हा पुन्हा वाचलं की कवीच्या विचारांशी आपण जाऊन पोहोचतो आणि त्या वेळेला जो आनंद होतो तो शब्दातीत आहे.
“डॉक्टर निशिकांत श्रोत्री, इतका सुंदर गीत संग्रह सादर केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदनही.
(कंसात कवितेची शीर्षके दिली आहेत)
परिचय : राधिका भांडारकर पुणे.
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मी आज श्रीमद् भागवत कथेचा जो भाग लिहीत आहे तो सर्वांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आपण एकूण नऊ स्कंध वाचले. आजचा हा दशम स्कंध म्हणजे भागवत पुराणाचा आत्मा आहे. हा भाग पूर्णपणे श्रीकृष्णाच्या लीलांनी व्यापलेला आहे. रासक्रीडेचेही वर्णन रसभरीतपणे यात आहे. या पुस्तकाची सुरुवात लेखकाने गोपीगीताने केली आहे. हे गोपीगीत म्हणजे गोपींना श्रीकृष्णाच्या सहवासाचा गर्व झाला होता, तो दूर करण्यासाठी व त्यांना शुद्ध भक्तीचा धडा देण्यासाठी भगवंत गुप्त झाले. मग मात्र गोपी विराहाने वेड्या झाल्या. सर्व चराचरसृष्टीत श्रीकृष्ण कोठे आहे म्हणून विचारीत फिरत राहिल्या. निराशेने कालिंदीकाठी बसून श्रीकृष्णाची त्यांनी आर्त विनवणी केली. दशम स्कंधातील हा भाग गोपीगीत म्हणून प्रसिद्ध आहे. तो कृष्णा वरील अनन्य भक्तीचा एक उत्तम ठेवा आहे. एकूण एकोणीस संस्कृत श्लोकांच्या, गेय असणाऱ्या गोपीगीताने या पुस्तकाची सुरुवात होते.
पुढे मात्र संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र आहे. पहिली कथा वसुदेव देवकीच्या विवाहाची आहे. मागील स्कंधात शुकाचार्यांनी परीक्षित राजाला यदुवंशाचा विस्तार सांगितला होता. तेव्हा परीक्षिताने पुढील वृत्तांत जाणून घेण्यासाठी शुकाचार्यांना काही प्रश्न विचारले की, माझे आईच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून संरक्षण कसे झाले? कंसाला देवाने का मारले? त्याचे आयुष्य, पत्नी वगैरे वगैरे!! त्यानंतर शुकाचार्य परीक्षिताला श्रीकृष्ण चरित्राचे कथन करतात. दानवांच्या भाराने पृथ्वी व्यथित झाली.. ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवांकडे गेली. सर्वांनी मिळून भगवान श्रीविष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा आकाशवाणी झाली की शेष आदिमाया यांच्यासह भगवंत स्वतः वसुदेवाच्या पोटी अवतार घेणार आहेत.. सर्व देवांनी व देव स्त्रियांनी यदुकुलात गोपगोपींच्या रूपात अवतार घ्यावा, असे ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले.
वसुदेव देवकीचा विवाह झाला. त्यांच्या रथाचे सारथ्य देवकीचा बंधू कंस मोठ्या आनंदाने करीत होता. एवढ्यात आकाशवाणी झाली की “याच देवकीचा आठवा गर्भ तुझा काळ बनणार आहे” हे ऐकून कंसाने ताबडतोब वसुदेव व देवकीस बंदीवासात ठेवले. त्यांची मुले जन्मतःच कंसाला आणून द्यायचे वचन कंसाने वसुदेवाकडून घेतले. पहिल्या मुलाचा जन्म झाला तेव्हा प्रामाणिकपणे वसुदेव मुलाला घेऊन कंसा कडे आला. पण कंसाने सांगितले की “या मुलाला घेऊन जा परत. तुझा आठवा मुलगा मला मारणार आहे.” वसुदेव आनंदाने परत गेला. पण मग कंसाचे सगळे अपराध भरणे आवश्यक होते. म्हणून नारद मुनी त्याला म्हणाले की “देवकीच्या पोटी येणारा कोणताही मुलगा विष्णूचा अंश असू शकतो”. मग मात्र कंसाने देवकीची मुले जन्मतःच मारून टाकली. अशी सहा मुले त्याने मारली.. सातव्या वेळी योगमायेने यशोदेच्या गर्भात प्रवेश केला. शेषाने रोहिणीच्या पोटी अवतार घेतला. तो बलराम!!
आठव्या वेळी मात्र भगवंताने देवकीच्या पोटी जन्म घेतला त्या वेळचे सृष्टीतील बदलांचे सर्व रम्य वर्णन लेखकाने केले आहे. ते प्रत्यक्ष वाचायलाच हवे.. वसुदेवाने तो अंश गोकुळात नंदाघरी नेऊन ठेवला व यशोदेची नवजात मुलगी देवकी पुढे आणून दिली. तिला धरून कंस तिला शिळेवर आपटणार इतक्यात ती योगमाया त्याच्या हातून निसटली. कंसाला उपदेश करून ती अंतर्धान पावली. नंतर श्रीकृष्ण यशोदेच्या मायेत गोकुळात वाढू लागला. असंख्य लीलांनी त्याने गोकुळाला तोषविले. ते सर्व वर्णन पुस्तकात आले आहे. कंसालाही समजले की आपला शत्रू कुठेतरी अवतीभवतीच्या गावात वाढतो आहे. त्याने पूतना या राक्षसीला सर्व गावातील लहान मुले मारून टाकण्याची आज्ञा दिली. ती रूप पालटून गोकुळातच आली. श्रीकृष्णाने तिचे स्तनपान करताना तिचे रक्त व प्राणही प्राशन केले. तिला नंतर मुक्ती ही दिली. यानंतर शकटासूर तृणावर्त वगैरे राक्षसांचे वध ही कृष्णाने युक्तीने केले. पुढची कथा बलराम व कृष्णाच्या नामकरणाची आहे. ती अगदी रसाळ कथा आहे.
यशोदेने खोड्या करणाऱ्या कृष्णाला उखळाला बांधले. त्याच उखळांना दोन झाडांच्या मधून ओढत नेऊन कृष्णाने शापित रुद्र सेवकांचा उद्धार केला. ते वृक्ष म्हणजे नारदांच्या शापाने वृक्ष बनलेले रुद्र सेवक- कुबेराचे मुलगे होते. पुढची कथा सर्व गोकुळ वासियांचे वृंदावनात स्थलांतर, अघासुराचा वध यासंबंधी आहे. ब्रह्मदेवांनीही कृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी गाई गुरांना व गोपांना पळवून नेले. तेव्हा कृष्णाने जेवढी गाई गुरे व गोपाळ होते तेवढी रूपे धारण केली. याआधी सर्व गोपाळांसमवेत बलराम व कृष्णाने केलेल्या गोपाळकाल्याचा व भोजनाचा अतिशय सुंदर कथाभाग लेखकाने वर्णन केला आहे. पुढे ब्रहमदेवानेही श्रीकृष्णाची परीक्षा पाहण्याचे ठरविले. गाई वासरे व गोपाळ परत पाठवले आणि त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती केली धेनुकासुर या दैत्याच्या वधाच्या नंतर देवांनी कृष्णावर पुष्पवृष्टी केली, ती कथा आली आहे.
यानंतरचे कालिया मर्दनाचे अतिशय सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. कालियाचा पूर्वेतिहासही पुढे आला आहे. प्रलंब राक्षसाचा वध, श्रीकृष्णाने जंगलातील वणवा प्राशन केला, गोपींनी श्रीकृष्णाचे गुणवर्णन केले, गोपींनी कृष्ण हा पती म्हणून लाभावा म्हणून केलेले कात्यायनी व्रत, विप्रस्त्रियांवर श्रीकृष्णाने अनुग्रह केला वगैरे छोट्या कथा आल्या आहेत. यापुढची कथा मात्र इंद्राचा क्रोध, गोवर्धन पूजा, श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून इंद्राचे गर्वहरण केले. ही रसाळ कथा लेखकाने सुंदररीत्या वर्णिलेली आहे. कृष्णाने महावृष्टीतून ब्रज स्त्रियांचे, व्रजवासीयांचे रक्षण केले तेव्हा इंद्राने कृष्णाची क्षमा मागितली. इंद्राने आकाशगंगेच्या जलाने व कामधेनूने दुग्धाने कृष्णाला सर्वाधीश म्हणून अभिषेक केला व त्याला गोविंद असे नाव दिले.
पुढचा कथा भाग हा रासक्रीडेचे रसभरीत वर्णन आहे. गोपींचे गर्वहरण, गोपी गीत, या कथा फारच छान आहेत. शंखचूडाच्या वधाची कथा त्यातच आहे.वृषभासुर,केली, व्योमासुर इत्यादी कंसाने पाठवलेले दैत्य कृष्णाने मारले. त्यामुळे कंस अस्वस्थ झाला. त्याने अक्रूराला पाठवून कृष्णाला मथुरेत पाचारण केले. अक्रूर बलराम, कृष्णाला घेऊन गेला. तिथे कृष्णाने कुब्जेचा उद्धार केला. या कथा सतत वाचत राहाव्या असे वाटते. कृष्णाने कंसाच्या निमंत्रणानुसार आखाड्यात प्रवेश करून प्रथम कुवलयापीड या मत्त हत्तीचा वध केला. मुष्टिक, चाणूर यांचाही वध केला आणि सर्वात शेवटचे वर्णन आहे ते कंसवधाचे!!!! प्रत्यक्ष वाचायलाच हवे .
मग श्रीकृष्ण आपल्या जन्मदात्या मात्यापित्यांना भेटले. मातामह उग्रसेन यांना कृष्णाने राज्यावर बसविले. मग ते दोघे बंधू सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी गेले . चौसष्ट दिवसात चौसष्ट विद्या आत्मसात करून त्या दोघांनी गुरुदक्षिणा म्हणून गुरूंना त्यांचा प्रभासक्षेत्री समुद्रात बुडून मेलेला मुलगा परत आणून दिला. हा ही कथा भाग खूपच छान आहे. तसेच अक्रूराला त्यांनी गोकुळात पाठवले. तिथली अवस्था काय आहे हे जाणून घेतले ..तेव्हाचे कृष्ण नसलेल्या गोकुळाचे वर्णन अगदी व्यथित करणारे आहे. नंतर कृष्णाने उद्धवावर अनुग्रह केला. ती कथा आहे. नंतर कुंतीची व धृतराष्ट्राची हस्तिनापुरला जाऊन भेट घेतली. तिथे त्याने धृतराष्ट्राला कृष्णाचा उपदेश सांगितला की “सम बुद्धीने वागावे” वगैरे!! पण धृतराष्ट्राने ते ऐकले नाही. तेव्हा अक्रूर परत मथुरेला गेला आणि त्याने धृतराष्ट्राचे वर्तन श्रीकृष्णाला सांगितले. इथे दहावा स्कंध समाप्त होतो. तसाच पाचव्या दिवसाचा कथा भागही संपतो.
पाचव्या दिवसाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्री विष्णूंच्या रत्नखचित किरीटाचे चित्र आहे. किरीट व मुकुट वेगळे असतात किरीट हा निमुळता, शिखरासारख्या आकाराचा तर मुकुट त्रिकोणी असतो. श्रीविष्णूंच्या मस्तकी दोन्ही दिसतात. त्याचे वर्णन श्री शंकराचार्यांनी केले आहे.
सारांश — 100 सूर्यांच्या तेजाप्रमाणे तेज असलेले, संसार सागरातून बाहेर काढणारे आणि कलिकालाचा अंधार दूर करणारे श्री विष्णूचे हे किरीट आम्हाला शाश्वत सुख ( मोक्ष )देवो.
☆ “प्रेरणादायी पुस्तके” – लेखक : श्री सुबोध जोशी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
सर्वसाधारणपणे आपण एका वेळेला एक पुस्तक वाचतो. काही लोकांना वेगळ्या विषयांवरील दोन पुस्तके आलटून पालटून वाचायची सवय असते. पण एकाच वेळेला, एकाच पुस्तकात नऊ पुस्तकांचा खजिना सापडला तर ? ही किमया केली आहे सांगलीचे प्रा.सुबोध अनंत जोशी यांनी.
श्री.सुबोध जोशी सरांचे ‘प्रेरणादायी पुस्तके ‘ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले व वाचायलाही मिळाले. आयुष्याला प्रेरणा देणा-या व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणा-या नऊ पुस्तकांचा परिचय या एकाच पुस्तकात करुन देण्यात आला आहे. एका लेखमालेच्या निमित्ताने लिहीलेले हे लेख आता पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यासमोर आले आहेत. भारतीय लेखकांनी इंग्रजीत लिहीलेल्या नऊ पुस्तकांचे सविस्तर विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. मुख्यतः प्रेरणा देणारी व वाड्मयीन मूल्य असलेली पुस्तके यासाठी निवडण्यात आली आहेत. ही पुस्तके व त्यांचे लेखक खालीलप्रमाणे.:—
1 You Can Win…. शिव खेरा
2 You Are Unique…. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
3 Smile Your Way To… Accomplishment and Bliss… कमरुद्दीन
4 The Best Thing About…. You Is You…अनुपम खेर
5 Count Your Chickens … Before They Hatch… अरिंदम् चौधरी.
6 Secrets of Happiness… तनुश्री पोडेर
7 “The Heads – We Win; ” The Tails – We Win”… कर्नल पी.पी.मराठे
8 Winners and Losers… उज्वल पाटणी
9 The Tao of Confidence… एरी प्रभाकर
श्री.जोशी यांनी या नऊ पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर हे पुस्तकांचे परीक्षण नाही, तर पुस्तकाच्या सर्व अंगोपांगांचे रसग्रहण आहे. या पुस्तकांच्या परिचयाशिवाय पुस्तकातील वाड्मयीन सौंदर्यही त्यांनी दाखवून दिले आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने आपल्या प्रस्तावनेत काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे. प्रेरणा किंवा प्रेरक शक्ती म्हणजे काय ? प्रेरणाविषयक सिद्धांत, फ्राईड यांचा जीवनप्रेरणा-मृत्यूप्रेरणा सिद्धांत, मॅस्लोने यांची गरजांची क्रमवारी, अशा अनेक संकल्पनांचा उहापोह प्रस्तावनेत केला असल्यामुळे, मूळ पुस्तकांतील विविध लेखकांचे विचार समजून घेण्यास मदत होईल हे नक्कीच. उत्तम व्यक्तिमत्त्व संपादन करून परिपूर्तता गाठणे हे अंतिम ध्येय कसे गाठता येईल याविषयी मार्गदर्शन करणारी ही पुस्तके आहेत. ‘व्यक्तिमत्त्व विकास’ आणि ‘भारतीय परंपरेतील आत्मशोधन’ यातील साम्यही लेखकाने दाखवून दिले आहे. प्रेरणादायी पुस्तक म्हणजे यशाचा शाॅर्टकट नव्हे हे लक्षात ठेवून जो याचे वाचन करेल त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधणे सहज शक्य होईल, असा विश्वास लेखकाने शेवटी व्यक्त केला आहे.
पुस्तकांचा परिचय करुन देत असताना लेखकाने प्रत्येक पुस्तकातील महत्वाचे मुद्दे वाचकासमोर ठेवले आहेत. त्यामुळे मूळ पुस्तकांतील मुद्देसूदपणा लक्षात येतो. तसेच आपल्या मनातील अनेक संकल्पनांविषयी असलेला गोंधळ, गैरसमज दूर होण्यास मदत होईल असे वाटते. त्यामुळे श्री.जोशी सरांच्या या पुस्तकाच्या वाचनानंतर त्यांनी सुचवलेली पुस्तके वाचणा-यालाच संपूर्ण ‘फळ’ मिळेल, हे मात्र नक्की.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य त्याच्या निर्मितीत दडले आहे. प्रा.सुबोध जोशी यांनी जी लेखमाला लिहिली होती, ती कल्याण येथील प्रा.मुकुंद बापट यांच्या वाचनात आली व या मालिकेचे रुपांतर पुस्तकात व्हावे असे त्यांना वाटले. प्रा.जोशी यांनी तशी परवानगी देताच या पुस्तकाचा जन्म झाला. परंतु विशेष असे की श्री. बापट सरांनी प्रकाशन खर्च स्वतः केला व लेखक प्रा.जोशी यांनी कोणतेही मानधन घेतलेले नाही. हे पुस्तक खाजगी वितरणाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व लोकांना जीवन घडवण्यासाठी प्रेरणा मिळावी या एकाच हेतूने हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला आहे.
… हे सुद्धा प्रेरणादायीच नाही का ?
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बाल साहित्य – “कुछ समझे बच्चमजी ?” – लेखिका : सुश्री वर्षा चौगुले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक कुछ समझे बच्चमजी ?
लेखिका वर्षा चौगुले
प्रकाशक अक्षरदीप प्रकाशन
पृष्ठे 72
मूल्य 70/
वर्षा चौगुले यांचं ‘ कुछ समझे बच्चमजी ‘ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येईल की हे पुस्तक बालगोपालांसाठी आहे. वर्षा चौगुले यांनी विपुल बाल साहित्य लिहिले आहे. तसेच बाल साहित्य चळवळीतही त्या सक्रिय असतात.त्यामुळे मुलामुलींशी संवाद साधणे त्यांना छान जमते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक !
जिज्ञासा हे बालमनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना सतत कसले ना कसले प्रश्न पडलेले असतात. हे असंच का, ते तसंच का, असे प्रश्न त्यांची पाठ सोडत नाहीत. शिवाय आपण लहान असलो तरी आपण ‘तितके काही’ लहान नाही असा एक समज असतो. त्यामुळे ती सारखी स्वतःची तुलना मोठ्यांबरोबर करत असतात. त्यामुळे त्यांना काही सांगायला जावं तर पटेलच याची खात्री नसते. शिवाय त्यांच्या वयाचे असे काही खास प्रश्न किंवा समस्या असतात. काही सांगायला जावं तर फारच उपदेश करताहेत असं वाटतं. काही सांगू नये म्हटलं तर त्यांच्या चुका कशा सुधारणार ? त्यांना चांगल्या सवयी कशा लावणार ? त्यामुळे बालक आणि पालक या दोघांमध्ये सुसंवाद कसा साधायचा हा एक प्रश्नच असतो. पण या प्रश्नाचं उत्तर हे पुस्तक वाचल्यावर मिळतं. मुलांना समजून घेऊन, त्यांच्याच भाषेत, कधी गोड बोलून, कधी एखादी गोष्ट सांगून, तर कधी एखादे उदाहरण देऊन त्यांना समजावून सांगितले तर ते त्यांनाही पटते. मग त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर होतात. हे सगळं पटवून देणारं हे पुस्तक !
मुलांना अभ्यासाचा कंटाळा तर येतोच. पण अन्य काही वाचा म्हटलं तर तेही नको असतं. खाण्याच्या बाबतीत आवडीनिवडी असतात. स्वच्छता, टापटीप, शिस्त हे सगळे नावडते विषय. शिवाय मोठ्यांच्या गरजा, फॅशन्स यावरही त्यांचं लक्ष असतं. पाठांतर टाळणे, टीव्ही बघणे ,चांगलं वाईट यातला फरक न कळणे, यासारखेही प्रश्न असतातच. ते सोडवायचे असतील तर त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, संवाद साधला पाहिजे. तो कसा साधावा ते हे पुस्तक वाचल्यानंतर पालकांना समजू शकेल. तसेच मुलांच्या मनातील गैरसमज हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच दूर होतील. अशाप्रकारे पालक व पाल्य असे दोघांनाही उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
मुलांना समजावून सांगत असतानाच नकळतपणे संस्कार होत असतात. संस्कारक्षम वयातील ‘बच्चमजी’ सहज समजू शकतील असे हे पुस्तक त्यांनी अवश्य वाचावे असे आहे. हातात छडी न घेता वर्षा चौगुले यांनी शिक्षिकेची भूमिका उत्तमपणे पार पाडली आहे.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आद्य शंकराचार्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे .दक्षिणेतील कालाटी या ठिकाणी शंकराचार्यांचा जन्म झाला. पूर्णा नदीच्या काठी असणारे हे छोटेसे गाव होते. काहींच्या मते तो काळ इसवीसन पूर्व आहे तर काहींच्या मते तो इसवी सन 812 आहे. ‘ परंतु जन्मतिथी बद्दल वाद घालण्यापेक्षा शंकराचार्यांनी सनातन वैदिक धर्मातील केलेले कार्य महत्त्वाचे आहे.’ असे लेखिका म्हणते. सनातन हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी शंकराचार्यांनी अफाट श्रम घेतले. या कादंबरीत त्यांनी केलेला प्रवास, आचार्यांची स्तोत्र, त्यांचे मराठी अर्थ उद्धृत केलेले आहेत.
प्रासादिक संतवाड्मयीन चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिण्यात लीला गोळे या अग्रस्थानी आहेत. त्यांचे लिखाण प्रवाही आहे आणि त्यांनी शंकराचार्य यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य स्थान देऊ केलेले आहे.
शंकराचार्य यांचा जीवन प्रवाह उलगडताना कालाटीच्या निसर्गाचे वर्णन मनोहारी आहे. त्यांचे वडील बालपणीच गेले. पण त्यांच्या आईने त्यांना खंबीरपणे पण प्रेमाने वाढवले. त्यांची आईवर खूप निष्ठा होती. शंकराचार्यांची कुशाग्र बुध्दी लहान वयातच दिसून आली. त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी घराबाहेर पडायचे होते,
पण आईचा त्यांना विरोध होता. या सर्व गोष्टी चांगल्या रंगवल्या आहेत. एक दिवस लहानग्या शंकरने मनाशी निश्चय केला की काहीतरी करून आपण इथून बाहेर पडायचे.
एकदा ते नेहमीप्रमाणे पूर्णा नदीवर आंघोळीला गेले होते. त्या नदीत काही मगरीही होत्या. त्यांनी मगरीने पाय पकडला अशी ओरड केली. सगळे घाबरून त्यांच्या आईला घेऊन नदीवर आले. तेव्हा ‘ तू जर मला ज्ञानार्जनासाठी बाहेर पडू दिलेस तरच ही मगर माझा पाय सोडेल ‘,असे सांगितले. आईने आपल्या मुलाला मगरीने सोडावे म्हणून ‘ तुला मी जाऊ देईन ‘असे मान्य केले.आणि मगच शंकर पाण्याबाहेर आले. आईचा आशीर्वाद घेऊन ज्ञानाच्या शोधार्थ शंकर घराबाहेर पडतो आणि मोठ्या युक्तीने ‘ तू मला संन्यास घेण्याची परवानगी दे ‘ ही गोष्ट आईला सांगतो.
पुढे धर्मयात्रेच्या निमित्ताने त्यांनी देशभरात प्रवास करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांचा एक मित्र त्यांच्या बरोबर होता, पण शंकरने त्याला तू माझ्याबरोबर नको येऊस, माझा मार्ग खडतर आहे, असे सांगून दूर केले. ते ओंकारेश्वरापर्यत गेले. तिथे त्यांना एक साधू भेटले. त्यांनी त्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.
या सर्व प्रवासात शंकराचार्य भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करत होते.
त्या काळात आपला वैदिक धर्म रूढीवादी कर्मकांड व नास्तिकवादी जडवादाच्या गर्तेत सापडला होता.
बौद्ध धर्माचा निष्क्रिय वाद सगळीकडे बोकाळला होता. कर्म करण्यापेक्षा निष्क्रियतेने कफनी घालून फिरणे, स्त्रियांना ही धर्मासाठी भिक्षुणि करणे आणि त्यातूनच काही वाईट गोष्टी घडत होत्या हे त्यांनी पाहिले. त्यामुळे शंकराचार्यांनी पहिली गोष्ट काय केली तर हिंदू धर्माचा प्रसार अधिक प्रमाणावर सुरू केला. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार लोकांनी करू नये यासाठी प्रयत्न केला. वेगवेगळ्या क्षेत्री जाऊन तेथील
धर्माविषयी वादविवाद आणि चर्चा सुरू केल्या. धर्म जागृतीचे महत्वाचे काम शंकराचार्यांनी सुरू केले.हिंदू धर्माचे मूलभूत तत्वज्ञान सांगण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशभ्रमण करत असताना त्यांचा जुना मित्र ही त्यांना येऊन मिळाला. देशात ही जागृती करण्यासाठी देशाच्या चारही बाजूंना हिंदू शक्तिपीठे स्थापण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि चारही दिशांना चार शक्तीपीठ स्थापन केली…. द्वारका, जगन्नाथ पुरी, कालाडी, काश्मीर, आणि काशी…. हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण देशात जागृती निर्माण केली. या प्रत्येक ठिकाणी मठपती नेमले. ह्या मठपतीनी कसे वागावे ह्याबाबत आचार संहिता तयार केली. या मठपतींच्या हाताखाली काही स्थानिक लोकांची नेमणूक केली, ज्यायोगे तेथील काम अधिक चांगले होईल. त्यामुळे हिंदू धर्माचा लौकिक दूरवर पसरण्यास मदत झाली…… लेखिकेने हा सर्व तपशील या कादंबरीत खूप छान प्रकारे आणि ओघवत्या भाषेत सांगितला आहे.
शंकराचार्यांचे आईवर अपरंपार प्रेम होते. त्यांनी तिला शब्द दिला होता की तुझ्या अंत्यक्षणी मी नक्की परत येईन. त्याप्रमाणे ते परत आले होते . त्यांची लहानपणापासूनची शेजारी आणि भक्त असलेली गौरम्मा हिने शेवटपर्यंत आईची सेवा केली. आणि संन्यस्त बनून तेथे राहिली.
शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी केलेले कार्य अफाट आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे, श्लोक लिहिले. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा समन्वय साधला. भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय शंकराचार्यांकडे जाते.
आपले जीवित कार्य संपल्यावर हे कैवल्याचे लेणे कैवल्याशी एकरूप झाले !
या कादंबरीची भाषा फार ओघवती, प्रासादिक आहे.. कादंबरी खूप छान आणि नवीन माहिती देणारी आहे.
मला कादंबरी वाचनीय वाटली … सर्वांनी अवश्य वाचावी अशी !
परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ काव्य संग्रह “समईच्या वाती” – कवी : सुभाष कवडे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काव्यसंग्रह : समईच्या वाती
कवी : श्री.सुभाष कवडे
प्रकाशक : शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे : 72
मूल्य : 80/_
सांगली जिल्ह्य़ातील भिलवडी येथील ज्येष्ठ साहित्यिक श्री.सुभाष कवडे यांचा ‘ समईच्या वाती ‘ हा पाचवा काव्यसंग्रह. काव्यसंग्रह संपूर्ण वाचल्यानंतर समजते की या संग्रहाचे नाव किती सार्थ आहे ! समईच्या मंदपणे तेवणा-या वातीत प्रखर दिव्याचं सामर्थ्य नसत.पण या वातींत संस्कारांशी नातं जोडून शांतपणे तेवत राहण्याचं सात्विक तेज आहे.या संग्रहातील कविता म्हणजे काव्यरुपी समईची एक एक वातच आहे.प्रत्येक पानावरील एक कविता म्हणजे मनाचा एक एक कोपरा उजळून टाकणारी वातच आहे . ते ही अगदी सहजपणे.दाहकता नाही पण तेज आहे.भडकत नाही पण विचारांचा वन्ही चेतवते.सात्विक ,संयमी आणि समर्पक शब्दांमुळे तिचे सामर्थ्य अधिकच वाढलेले दिसते.कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सौम्य शब्दात पण अचूकपणे केलेली कानउघाडणी श्री.कवडे यांच्यातील जातिवंत शिक्षकाचे दर्शन घडवते.
या संग्रहातील कवितांमध्ये विषयांची विविधता आहे.इथे निसर्गाच्या निरनिराळ्या रुपांच दर्शन होते.ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या संस्कृती पहायला मिळतात.इथे उपदेश आहे पण बोचरी टीका नाही.इथे कानउघाडणी आहे पण कुत्सित निंदा नाही.इथे मातीशी इमान आहे आणि बेईमानीला थारा नाही.इथे सात्विकतेला मुजरा आहे पण दांभिकतेवर प्रहारही आहे.शब्दांचे अवडंबर नाही पण ह्रदयाला घातलेली साद आहे.सु विचारांची पेरणी करत संस्कारांचे मळे फुलवणारी श्री.कवडे यांची कविता मनाला सात्विक आनंद देऊन जाते,जी सात्विकता फक्त समईच्या वातीतच असू शकते.समईची जागा देवघरात असते.या संग्रहातील कविता प्रत्येक रसिकाच्या मनाच्या घरात वास करून राहील याबद्दल शंकाच नाही.आधुनिकतेच्या नावाखाली छानछोकीने नटलेल्या गर्दीत,एखाद्या स्त्रीने पारंपारिक वेषात प्रवेश करावा तशी श्री.सुभाष कवडे यांची कविता अवतरते.समईला साजेल अशा अभंगस्वरुप रचना मनाच्या गाभा-यात विचारांचा घंटानाद केल्याशिवाय रहात नाहीत.म्हणूनच …..
“आरती शब्दांची
वाटे आनंदाची
मजला सुखाची
नित्य नवी “
असं ते म्हणतात ते योग्यच वाटते..
मनातील भाव व्यक्त करताना सर्वप्रथम त्यांना आठवण होते ती माणसांची.ते म्हणतात
” माझीया मनात
माणूस उरात
आवाज कानात
माणसांचा “
हाच माणूस जेव्हा चुकीच्या मार्गाने जाताना दिसतो तेव्हा ते हळहळतात आणि लिहून जातात
” दिवस धनाचे
नाहीत घामाचे
जगणे फुकाचे
हवे हवे
गुणांचा पाचोळा
बघवेना डोळा
आपसात खेळा
खेळ नवे “
अशा दिखाऊ जगात म्हणून तर ….
” माणूस वाचावा
अंतरी जाणावा
शब्द पारखावा
येता जाता”
असा इशाराही ते देतात.
” कसे दिस आले
गाभारे सजले
विठूचेही शेले
पळविले ”
हे खरे असले तरी आपण मात्र
” दीप असे व्हावे
जग उजळावे
उरी मिरवावे
माणसांनी “
जगण्याचे सार हरवत चाललेले असताना निसर्गानेही साथ देऊ नये यासारखे संकट अन्य कोणते असणार ? दुष्काळाची तीव्रता,पाण्याचा अभाव,त्यामुळे सोन्यासारख्या मातीतून अंकूर फुटू शकत नाही .हे दुःख कुणाला सांगावे.?
” मातीवरी पाय
करपली साय
सांगू कुणा काय
बोलवेना “
अशा अवस्थेत
” मेघांचा सोहळा
मातीचा उमाळा
तुझा कळवळा
प्रकटावा “
एवढीच कविची प्रार्थना आहे.ती ऐकून कधी मेघ बरसतो आणि मग करप्या मातीलाही साज चढू लागतो.
“जग आता सारे
आनंदाचे वारे
श्रीरंग भरे
अंतरात “
अशा या माणसाच्या सुखदुःखाशी समरस होणा-या कविता.माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते उलगडून दाखवणा-या.संकटातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करणा-या.निसर्गाची रुपे रंगवणा-या.आणि शब्द हेच कविचे खरे धन आहे हे सांगणा-या.
“शब्द माझे धन
दिधला सन्मान
आनंद निधान
जीवनात ”
…. असे कवी निःसंदिग्ध पणे म्हणत आहे.
प्राचार्य डाॅ.सयाजीराव मोकाशी यांची लाभलेली प्रस्तावना ही सुद्धा अत्यंत वाचनीय आहे.या निमित्ताने त्यांनी मराठी कवितेचा परामर्ष घेत घेत अत्यंत काव्यात्म शब्दांत संग्रहातील कवितांची बलस्थाने दाखवली आहेत.’ कल्पकतेने काव्याची कोवळीक कलापूर्ण बनली की कवितारुपी केवड्याचे कणीस कौतुकास पात्र ठरते.’ यासारख्या काव्यात्मक वाक्यातून दिसणारे शब्दलालीत्य अनुभवल्यावर ‘प्रस्तावना’ विषयीच्या कल्पनाच बदलून जातात.अशा प्रस्तावनेमुळे काव्यसमईच्या वाती अधिकच लखलखीत झाल्या आहेत.अंतरंगाप्रमाणेच श्री.अविनाश कुंभार यांनी सौम्य रंगसंगतीतील रेखाटलेले मुखपृष्ठ मन शांत करणारे आहे.
या वातींच्या प्रकाशात श्री.सुभाष कवडे यांचा लेखनप्रवास अखंडपणे चालू राहो , ही सदिच्छा !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मोहिनी हेडाऊ यांनी लिहिलेलं ‘मनातलं’ हे पुस्तक नुकतंच वाचलं! नुसते वाचून बाजूला सारण्यासारखे हे पुस्तक नाही हे पहिला लेख वाचल्यावरच लक्षात आले. मोहिनीयांचा जनसंपर्क खूप अफाट आणि अनुभवाचा आवाक्या त्याहून अवाढव्य. हे या पुस्तकातील विविधरंगी, विविधविषयी लेख वाचल्यावर लगेच कळते. इतके लेख लिहूनही या चिरंतन शाश्वत विश्वाची, अनोख्या अंतराळाची, असंख्य पुस्तकांची अन अमोप आत्मचिंतनाची त्यांची तृष्णा वाढता वाढता वाढे असे वाटते. पुस्तकातील लेखांची संख्या ६५! एखादा कॅलिडोस्कोप (बहुरूपदर्शक) फिरवतांना उमटणारे बहुरंगी भूमितीय आकार बघून जसे डोळे दिपतात आणि निवतात तसे हे पुस्तक वाचल्यावर झाले. डिझाइनर साडीसारखे एक डिझाईन एकदाच दिसते, एक आकार एक रंग आणि एक गंध परत येत नाही, तसेच त्यांच्या लेखांचे कुठलेही विषय रिपीट होत नाहीत. त्यांना इंद्रधनुषी रंग म्हणता येणार नाहीत कारण त्याच्या सप्तरंगाला सीमा असते! मात्र या पुस्तकाचे लेखनरंग अनवट मिश्रण घेऊन येतात.
पुस्तकाचा बाह्यरंगी प्रारंभच मनाला सुखद अन शीतल आनंद देणाऱ्या मुखपृष्ठापासून होतो. लेखिकेच्या ‘मनोगतामध्ये’ मध्ये तिचे प्रसन्न मनमोहिनी रूपच नव्हे तर तिचे स्वतंत्र विचार ल्यायलेले मन उलगडायला सुरुवात होते. आल्या आल्या सिक्सर मारून आपले नैपुण्य सिद्ध करणाऱ्या फलंदाजासम पहिल्या चार लेखांतच लेखिकेची लेखणीवरची मजबूत पकड जाणवते. एका जगप्रसिद्ध बहुमुखी व्यक्तित्वाची ओळख होते, ‘लिओनार्दो द विंची’ आणि त्याच्या तितक्याच जगन्मान्य चित्रनायिकेची, ‘मोनालिसा’ हिची! यातूनच चित्रनायिका आणि चित्रकार यांची एकमेकांना पत्रे. ही कल्पनाच भन्नाट! बहुदा विचार रवंथ चालू असतो या चित्राच्या निर्मितीवर वा या चित्राच्या ‘चोरीवर’!
मोहिनी यांचे, मळलेल्या वाटा सोडून केलेले हे ‘लॅटरल थिंकिंग पॅटर्न’ चे प्रयोग लय भारी! ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ असा या पुस्तकाचा टवटवीतपणा पहिल्या ते शेवटच्या पानापर्यंत अनुभवास येतो. प्रत्येक लेखागणिक लेखिकेच्या मनातले विचारतरंग एकामागून एक जिवंत होतात. पारदर्शक तरंगांचे रंग, गंध आणि स्पर्श लगेच जवळून जाणवतात! शब्दांचा अन अर्थाचा कुठलाही फापटपसारा नाही, धारदार बुद्धिमत्ता असूनही तिचे अवास्तव प्रदर्शन नाही, लेखांची लांबी (कधी अर्धेमुर्धे पान तर कधी ३-४ पाने (यापेक्षा जास्त नाही) अशी की विषय आत्मसात तर होईल, पण वाचकाला अंतर्मुख करेल आणि त्याला विचारमंथन करायला भाग पाडेल. एक लेख वाचला की तो विषय आटोपला, म्हणजे तुम्ही आरामात बुक मार्कर ठेवा अन नंतरचा लेख थोड्या वेळाने वाचा अशी ही सुबक लेखमालिका आहे. एक एक फूल तोडा, त्याचे सौंदर्य न्याहाळा, नंतरचे फूल तोडायचं तेव्हा तोडा! पण मंडळी अशी वेळ बहुदा यायची नाही, कारण एकदा का पहिल्या चॅप्टरमधल्या मोनालिसाच्या ‘त्या’ गूढ स्मितात तुम्ही हरवलात की पुस्तकातच हरवून जाल याची फुल ग्यारंटी! हे लेख वाचून एका जगन्मोहिनीची आठवण आल्याशिवाय राहात नाही! देवांना ऑन प्रायॉरीटी अमृतकलशातून रसपान प्राप्त करून देणारी मोहिनी अर्थात श्री विष्णूंचे मोहिनी रूप! प्रत्यक्ष शंकराला तिचा मोह पडतो! इथे तर आम्ही पडलो सामान्य वाचक!
मोहिनी यांच्या या लेखांतून मला जे तात्काळ सदुपयोगी पडले ते पुस्तक परीक्षण. या व्यतिरिक्त एक रसिक म्हणून कलेचा आस्वाद कसा घ्यायचा हे त्यांनी त्यांना आवडलेली नाटके, सिनेमे, पुस्तके, मान्यवरांची भाषणे, निसर्गाची रूपे, गाणी, संत साहित्य, रामायण, महाभारत अन पुराणकाळातली व्यक्तिचित्रे आणि बरंच कांही….. यांच्या सर्वंकष अनुभवातून वाचकांशी शेअर केले आहे. गंमत म्हणजे त्यांना कुठल्याही विषयाचे वावडे नाही. आपण असे प्रसंग अनुभवतो, पण त्यांचे लिखाणात परिवर्तन करण्याची कल्पनातीत किमया मोहिनी यांचीच असू शकते! एकच उदाहरण देते. आता बघा ना ‘माझे आवडते विद्यापीठ’ या चिंतनीय विषयावर संपूर्ण लेख अगदी उत्कंठा ताणणारा, अन शेवटी ते विद्यापीठ कोणते तर ‘व्हॅट्सऍप’ निघते. ‘ह्यॅ त्यात काय मोठेसे?’ असा प्रश्न देखील मनात येऊ देऊ नका मंडळी, कारण दिवसरात्र व्हाट्स ऍप वरच मुशाफिरी करणारे आपण, पण त्याला ‘विद्यापीठाचा’ दर्जा देणारी ही लेखिका म्हंजी मोहिनीच असू शकतात बरं कां! धन्य त्या लेखणी कळा म्हणा अन पुढचा लेख घ्या वाचायला! यात ‘खरेदीची खुमारी’ सारखा गुटगुटीत लेख एका बाजूला अन ‘मनाचं उत्खनन’ सारखा भारदस्त मानसशास्त्रीय लेख दुसऱ्या बाजूला! या मालिकेत ‘बिग इज ब्युटीफुल’ मध्ये लठ्ठपणाकडे पाहण्याची ‘सकारात्मक दृष्टी’ आहे तसेच ‘काळरेषा’ मधील शहारून टाकणारा गूढरम्य अनुभव देखील आहे.
मंडळी, या पुस्तकाद्वारे तुम्ही मनसोक्त ‘आहार विहार’ करू शकता. गोवर्धन पर्वत सात दिवस एका करंगळीवर धारण करणाऱ्या कृष्णाला नंतर सपाटून भूक लागली. गावकऱ्यांनी शिधा काय, अन्न काय, फळफळावळ काय, लोणची काय, त्याच्यासाठी सगळे गोळा केले! त्या गावजेवणाची आठवण म्हणून आज आपण ज्या गोपालकाल्याचा प्रसाद ग्रहण करतो ना, त्याची चव अमृताहून गोड! तसेच मोहिनी यांचे हे लेख आहेत. मी तर झपाटून गेल्यासारखे ते वाचले अन ‘chewed and digested them’. (याच पुस्तकातील ‘बुक शेल्फ’ नामक एका अप्रतिम लेखातून हे शब्द उधार घेतलेत.) वाचकांनी नाटक, सिनेमे, पुस्तके इत्यादींची ‘बकेट लिस्ट’ बनवायला या पुस्तकाची मदत घ्यावी, भाषणाची तयारी करायला यातील असंख्य उदाहरणे, उतारे, सुभाषिते इत्यादी उधार घ्यावीत. हे कांहीच करायचे नसेल तर स्वतःच्या मनात डोकावायला अन आत्मचिंतन करायला हे पुस्तक अवश्य वाचावे. कोरोना काळातील दारुण अनुभवांचे स्फूर्तिदायी सार हे या पुस्तकाचे सुंदर गमक!
मोहिनी, तुमचे लेखन एखाद्या अनाघ्रात कमोदिनीसारखे वाटते. तुमच्या व्यक्तिमत्वातील कित्येक कंगोरे या लेखनात दिसतात. रत्नांची खाण, सर्जनशील अशा बहुप्रसवा वसुंधरेसारखे तुमच्या मनाच्या तळ्यात असंख्य विषयांच्या विचारांचे मोहोळ दाटले आहे. तुमच्यातील वात्सल्य आणि प्रेम दर्शवणाऱ्या स्त्रीसुलभ भावना, कलासक्त आणि संवेदनशील हृदय, मिळेल त्या वाटेतील सौंदर्यसुमनांचे रसपान करणारी भ्रमर वृत्ती, प्रशासकीय अनुभवातून आलेली कर्तव्य कठोरता आणि सर्वात मुख्य म्हणजे ‘नवनवोन्मेषशालिनी’ सर्जनशीलता या पुस्तकात प्रतिबिंबित होते. आपण आपल्या नोकरीत लोकसेवेच्या व्रताचा वसा घेतला आहेच, त्याला अनुरूप असे आपले ‘जनमंगल’ साधणारे दर्जेदार लेख समाजमाध्यमातून आणि ई वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात आणि लोकप्रिय होतात याचे अजिबात अप्रूप वाटत नाही! अशाच नितांत सुंदर साहित्याची आपल्याकडून अपेक्षा आणि आशा आहे! आपण ती पूर्ण कराल याचा दृढ विश्वास आहेच!
मी तर निःशंक मनाने म्हणेन, आपण हे पुस्तक ‘वाचू अति आनंदे’! शिवाय इतरांना भेट देऊ, तेही प्रत्येक दृष्टीने सौंदर्यशाली असलेले हे पुस्तक वाचून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदे’ अशी अलौकिक आनंदी अवस्था झाल्यावर!
मोहिनी, आपण भविष्यात देखील सरस्वतीमातेची अशीच सेवा रुजू करा! त्याकरता माझ्या अंतर्यामी हृदयाच्या गाभाऱ्यातून मनःपूर्वक शुभेच्छा!
पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सीतायन – विद्रोह आणि वेदनेचे रसायन” – डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
सीतायन
डॉ. तारा भवाळकर
मनोविकास प्रकाशन
पृष्ठे – 188, मूल्य- २५०रु.
नुकतेच डॉ. तारा भावाळकर लिखित ‘सीतायन’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले. लहानपणापासूनच सीतेच्या व्यक्तिमत्वाने लेखिकेच्या मनाचा ठाव घेतला. आणि त्यांच्या मनात सजले ते सीतयन रामायण नव्हे. त्या लिहितात, ‘रामाविषयी,त्याच्या त्यागाविषयी, मातृ-पितृ- गुरू भ्क्तीविषयी, शौर्य- धैर्याविषयी लोकमानसात विलक्षण कौतुक, आदर आहे. पण त्याच वेळी सीतेविषयी विलक्षण सहानुभूती,, कळवळा, आदर, गरोदरपणी तिचा त्याग करणार्या रामाविषयी निषेध, अनादर, धि:कार दिसून येतो. ‘ विशेषत: स्त्रियांच्या लोकगीतात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी म्हंटलय,
राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा
‘रामायण ‘ हे भारतीय परंपरेतील अत्यंत प्रभावी असे मिथक (पुराणकथा) आहे. ही कथा अभिजनांच्या ग्रंथातून प्रवाहित होत आपल्यापर्यंत आली. तशीच मौखिक अशा लोकपरंपरेतूनही प्रवाहित झाली. लोक परंपरेतील विविध रामायणांचा, विविध भाषी रामायणांचा अभ्यास करून तारा भावाळकर यांनी ‘सीतयन’ हे पुस्तक सिद्ध केले. त्या लिहितात,’ गाव-गाड्यातील कामकरी- कष्टकरी स्त्रियांनी आपले कष्टाची कामे करताना सीतेविषयी भरभरून लिहिलय. सीतेशी या भूमीकन्यांचं आतड्याचं नातं असावं, अशा जिव्हाळ्याने त्यांनी सीतेबद्दल लिहिलय. त्या दळण-कांडण करणार्या कृषिकन्या सीतेमध्ये आपलं रूप बघतात. त्यांच्या ओव्यातून तीन तीन सासवा तिला सासुरवास करतात. तिला मोडक्या झाडूने अंगण झाडावं लागतं. ती वैतागते. तेव्हा सासू आणि चंगू नणंद रामाला चुगली करतात आणि राम सीतेकडून कधी रागावणार नाही, अशी शपथ घेतो.’ असा सगळा भाग त्यांच्या ओव्यातून येतो.
डॉ. तारा भवाळकर
सीता सुंदर, आज्ञाधारक सून आहे. मुलगी आहे. ती जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाते. अंकुशासाठी नवस बोलते. रामरायाची राणी असल्याने सुपाने सोनेही वाटते. वनवासात असताना ती सामान्य बाईसारखी ‘वल्ल्या धोतराचा पिळा खांद्यावर टाकून येते. रामाला पडसे –खोकला झाला, तर काढा देते. त्याचा घाम लुगड्याच्या घोळाने पुसते. अशा अनेक रमणीय सहजीवनाची चित्रे स्त्रियांनी आपल्या ओव्यातून रंगवली आहेत. या कष्टकरी बायकांनी सीतेत आपले रूप बघितले आहे.
सीतेचा सासुरवास भारतीय स्त्रीचं भागधेय म्हणून भारतभर चित्रित झालं आहे. समस्त भारतीय स्त्रीमनाने, सीतेमधे स्वत:ला अनुभवलं आहे. आहे. जणू सीतेने स्त्रियांना वेदनेचं वाण वाटलं आहे. सीतेला केसोकेसी झालेला सासुरवास तिने देशोदेशींच्या सयांना वाटला. तिला बहु बहु झालेला सासुरवास तिने गहू गहू सार्यांच्यात वाटला. सीतेला डोंगराएवढे झालेले दु:ख पाहिल्यावर बायकांना आपलं दु:ख, आपली उपेक्षा हलकी वाटते.
लोकमानसाने जुन्या परांपरिक कथेचं जतन तर केलंच, पण त्यात आपल्या अनुभवाची, कल्पनेची नवी भर घातली. त्यांचं जीवन सीतेच्या मूळ कथेशी एकजीव होत राहिलं. इथे स्थल-काळाचा विचार होत नाही. मूळ घटना आपल्या अंनुभवाशी जोडून घेत स्त्रियांनी ओव्या रचल्या आहेत. दुसर्या वनवासाच्या वेळी सीता बाळंतीण झाल्यानंतर बाळुती धुवायला, कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर आल्याचे वर्णन स्त्री-गीतातून येते.
राम-सीतेच्या वनवासाच्या निमित्ताने भारतभर विविध भागात अनेक दंतकथांचा पसारा निर्माण झाला आहे. अशा काही दंतकथा यात दिल्या आहेत. रामाच्या संसारात सीता दु:खी आहे. तिला अश्रू ढाळण्याशिवाय गत्यंतर नाही. ‘त्या अश्रूंनी डोंगरी पडला झरा’ किंवा ‘ डोंगरी झाली विहीर’ असं वर्णन येतं.
साताराजवळच्या कोरेगावजवळच्या डोंगरावर दर संक्रांतील केवळ बायकांची खास ‘सीतामाईची जत्रा’ भरते आणि तिथे, दिवसभर सीता वनवासाच्या ओव्या बायका गात असतात.
लोकसाहित्यात सीता कुठे रावणाची मुलगी असल्याचा उल्लेख आला आहे, तर एका आदिवासी कोरकू गीतात सीता रावणावर भाळल्याचेही म्हंटले आहे.
सीतेला रामाने पुन्हा वनात का पाठवले? आपल्या परिचित कथेपेक्षा लोकरामायणातील कथा वेगळं काही सांगते. इथे कैकयी रामाचे कान फुंकते, की सीतेच्या मनात अजून रावण आहे. ती कट कारस्थान रचते. सीतेला रावणाचे चित्र काढायचा आग्रह करते. सीता म्हणते, ‘मी फक्त त्याच्या डाव्या पायाचा अंगठा बघितला.’ कैकेयी तेवढाच काढायला सांगते. त्याच्या आधारे ती रावणाचे चित्र पूर्ण करते व सीतेने ते काढल्याचे सांगते. राम संतापतो आणि लक्ष्मणाला सीतेला वनात नेऊन वधायची आज्ञा करतो. ‘अंकुश पुराण’ या प्रकरणात, लेखिकेने विस्ताराने ही कथा मांडली आहे. तिला माहेरी पोचवतो, असं सांगून लक्ष्मण घेऊन जातो, पण तिला वेगळा रस्ता असल्याचे लक्षात येते. ती म्हणते, माझ्या माहेरच्या वाटेवर दाट केळीचं बन आहे. या रस्त्यावर तर काटेरी बोरी-बाभळी आहेत.
सीताबाई म्हणे, नव्हं माहेराची वाट
तिथं केळीचं बन इथे वन आचाट
पुढे लक्ष्मण तिला वध करायला रामाने सांगितल्याचे सांगतो. सीता तयार होते. पण लक्ष्मण तिचा वध करत नाही. ती आटंग्या वनात राहू लागते. तिथे धाई धाई रडणार्या सीतेची, बोरी-बाभळी (बायका) समजूत घालतात. ‘वधायला नेली नार’ या चरणाने सुरू होणार्या अनेक ओव्या स्त्री-गीत सांभारात असल्याचे लेखिका सागते.
लोकमानसातील ‘रामायणात’ नव्हे ‘सीतायनात’ पुढे सीतेला वाल्मिकी ऋषी भेटत नाहीत, तर भेटतो, तातोबा, कुण्या गावातला जेष्ठ, समजूतदार, कनवाळू , वयस्क कारभारी. तातोबा ही खास लोकप्रतिभेची निर्मिती आहे, असं डॉ. तारा भावाळकर म्हणतात.
पुढे राम-लक्ष्मण, लावांकुश यांची भेट कशी होते? आपल्या परिचित कथेपेक्षा लोकपरंपरेतून आलेली कथा वेगळी आहे. इथे रामाचा राजसूय यज्ञ किंवा श्यामकर्णी घोडा नाही.
तातोबासाठी कमळे आणायला अंकुश तळ्यावर जातो. रामाचे शिपाई तिथे लक्ष्मणासह सहस्त्र कमळे न्यायला आलेले असतात. ते अंकुशाला चोर म्हणून पकडून ठेवतात. अंकुश आला नाही, म्हणून त्याला शोधत लव तिथे येतो. अंकुशाला सोडवतो. त्यांचे सैन्याशी युद्ध होते. मुलांचे युद्धकौशल्य पाहून राम विस्मित होतो. मुलांना धनुर्विद्या तातोबांनी शिकवलेली असते. मुलांना राम-लक्ष्मण, कुल- शील विचारतात. मुले म्हणतात,
‘सीतामाई आमची माता लक्ष्मण आमचा काका
जनक आमचा आजा नाही पित्याची वळख ‘
नाही पित्याची वळख ‘ असं म्हणणार्या, जात्यावर दळणार्या बायकांनी रामाशी केलेला तो विद्रोह आहे, असं लेखिकेला वाटतं.
पुढे नारद येतात. सगळा खुलासा करतात. मग राम रथात घालून लव- अंकुश, सीतेबरोबर आयोध्येकडे यायला निघतो. लोकांच्यात उत्साह आहे.
‘समस्त नगरीचे लोक जानकीस भेटाया येती ‘. त्याच वेळी कैकयी पुढे येते. ती सीतेला विचारते,
‘कैकयी विचारते, सीतामाई सावळीला
अंकुश रामाचा लहू कोणाचा आणीला.?’
लहू लव्हाळ्याचा केलेला सगळ्यांना माहीत आहे. सीता म्हणते,
‘सीता बोले आता काय सांगू सासूबाई । तुझ्या पोटामध्ये वाट दे ग धरणी आई’
कुठे हाच प्रश्न रामाने विचारला आहे. धारणी दुभंगली. तिने सीतेला पोटात घेतली. लक्ष्मणाला सीतेचे सत्व माहीत होते. तो संतापला. त्याने काकेयीचे सात पाट काढून, म्हणजे तिला विद्रूप करून रेड्यावर बसवून नगराबाहेर हाकलली. कपटी, कारस्थानी कैकेयीला शिक्षा देऊन अंकुश पुराण संपते. लोकसमूहात ते गाऊन दाखवलं जाई. त्याच्या कर्त्याबद्दलही लेखिकेने विस्ताराने लिहिले आहे.
‘चित्रपट रामायण ‘ अशी दोन प्रकरणे यात आहेत. त्यात पहिले प्रकरण कन्नड आहे. दुसरे कन्नडच्या हिन्दी रूपांतरणाचे आहे. मूळ कन्नड लेखन हेळवणकट्टे गिरीअम्मा यांचे आहे. नाव वाचताना वाटलं होतं, एखाद्या चित्रपटाचे हे विवेचन असेल, पण वाचताना लक्षात आले, ते तसे नाही. चित्रपट म्हणजे चित्र. ते कुणाचे? तर रावणाचे. राम- सीता रावणावध करून अयोध्येला परतल्यावर, शूर्पणखा म्हणजे चंद्रनखी सीतेची बालमैत्रीण असल्याची बतावणी करत येते. सीतेशी गप्पा मारता मारता तिच्याकडून रावणाचे चित्र काढून घेते. सीतेच्या नकळत चित्रात डोळे चितारते आणि चित्र साजिवंत होते. पुढे रावण चित्राच्या चौकटीच्या बाहेर येतो. सीतेने चित्र काढले. म्हणजे रावण निर्माण केला, तेव्हा तो तिचा पुत्र झाला. राम मात्र पुन्हा रावणाशी युद्ध करायला तयार होतो. पिता-पुत्राचे युद्ध ही कल्पना सहन न होऊन सीता घरणीच्या पोटात सामावते. असडे हे चित्रपट रामायण. रावणाचे चित्र सीतेने काढण्याची कल्पना, कन्नड, हिन्दी, बंगाली, इये. अनेक भाषातील रामकथांमधून आली आहे.
यापुढील प्रकरणात ‘च्ंद्रावती रामायण’ या बंगाली रामायणाच ऊहापोह केलेला आहे. मौखिक गीत-गायनाच्या प्रथेतून या रामायणाचे पिढ्या न् पिढ्या जतन झाले आहे. यात सांगितल्या गेलेल्या रामकथेचे संहितीकरण ‘चंद्रावती’ने केले, असे लेखिकेचे संशोधन आहे. ही संहिता पूर्णपणे लेखिकेला उपलब्ध झाली नाही. उपलब्ध संहितेचा श्री. जयंत सेनगुप्ता यांच्या सहाय्याने लेखिकेने मराठी अनुवाद केला आहे व तोही परिशिष्टमध्ये दिला आहे. यात राम आणि सीता जन्माच्या अद्भूत कथा आहेत. रावणवध करून आल्यावर कैकेयीची मुलगी कुकवा सीतेच्या मागे लागते व रावणाचे चित्र काढ असा आग्रह धरते. सीता वारा घ्यायच्या ताडाच्या पंख्यावर रावणाचे चित्र काढते. परिश्रमाने तिला झोप येते. कुकवा तो पंखा सीतेच्या छातीवर ठेवते आणि रामाला चुगली करते की अजूनही सीतेच्या मनात रावणच आहे. राम संतापतो. त्यापुढे संहिता उपलब्ध नाही. चंद्रावतीचे भाष्य आहे. ती म्हणते, ‘आग पेटवली कुकवाने आणि त्यात जळून जाणार आहेत राम, सीता आणि अयोध्या नगरीही. अयोध्येतील लक्ष्मी नष्ट होईल, जाळून जाईल.’ पुढे ती समारोपादाखल म्हणते, ‘आपली बुद्धी न चालवता दुसर्याचे ऐकून विश्वास ठेवणार्याचा असाच सर्वनाश होतो.’ अयोध्येच्या सर्वनाशाचे कारण खुद्द रामंच असल्याचे चंद्रावती सांगते.
बौद्धधर्मियांच्या जातक कथांपैकी रामायणाशी संबंधित दशरथ जातक आणि आदिवासींचे ‘सीतायन’ यांचाही परामर्श लेखिकेने पुस्तकात घेतला आहे..
तर असा विविध लोकांचा रामायण कथेकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन विषद करत त्या पार्श्वभूमीवर, सीतेकडे त्यांनी कसे बघितले, याची मांडणी या पुस्तकात केली आहे. भारतीय परंपरेने राम आणि सीता ही आदर्श दैवते मानली. त्यांच्याविषयी खूप काही नवीन माहिती या पुस्तकात मिळते. ती विचार करायलाही प्रवृत्त करते.
डॉ. तारा भवाळकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक संशोधन करून हे पुस्तक सिद्ध केले आहे. हे महत्वपूर्ण पुस्तक तितक्याच नेटकेपणाने मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. चंद्र्मोहन कुलकर्णी यांचे अन्वर्थक आणि आकर्षक मुखपृष्ठ आहे. एकंदरीने ‘ सीतायन’ पुस्तकाचे मोल अनमोल आहे, असेच म्हणावे लागेल.
पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈