मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “समर्थशिष्य कल्याण” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “समर्थशिष्य कल्याण” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

पुस्तक – समर्थशिष्य कल्याण (लघु कादंबरी)

लेखिका – सुश्री अनुराधा फाटक 

प्रकाशक – रावा प्रकाशन 

पृष्ठ संख्या – 108

किंमत – 210 रु

परिचय – मंजिरी येडूरकर. 

अनुराधा फाटक यांचं एक नवीन पुस्तक ‘समर्थ शिष्य कल्याण’. ही लघु कादंबरी रावा प्रकाशनने प्रकाशित केली आहे. मुखपृष्ठ प्रतिकात्मक असून सुद्धा आपण काय वाचणार आहोत, हे सांगण्यास  समर्थ आहे. हा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणण्याइतका मोठ्ठा नसला तरी त्याचं साहित्यिक मूल्य ग्रंथाइतकंच आहे. 

श्रीमती अनुराधा फाटक

आपल्याला कल्याणस्वामी हे समर्थांचे शिष्य एवढंच माहीत आहे. समर्थांच्या बरोबर असताना त्यांचं एवढं अफाट साहित्य लिहून देण्याचं, त्याच्या प्रती काढण्याचं काम त्यांच्या या शिष्याने केले आहे. गुरूचा लाडका शिष्य होणे किती अवघड आहे, किती खडतर तपस्या आहे याची जाणीव होते. समर्थांच्या पश्चात कल्याणस्वामींनी त्यांचं कार्य सुरू ठेवलं, मोठ्ठा शिष्यवर्ग निर्माण केला. ब्रह्मप्राप्ती, आत्मानंद, सोलीव सुख या सर्व स्थितींचा अनुभव कल्याणस्वामींनी घेतला. त्यांचं स्वतःचं साहित्य सुद्धा इतकं समृद्ध आहे की वाचणारा थक्क होऊन जातो. आणि वाईट वाटतं की यातलं एक शतांश सुद्धा ह्या पिढीला माहीत नाही.

स्वामी तो आठवे मनी|

नित्य बोलता चालता जनी|

स्वप्न सुषुप्ती जागृती मौनी|

खंड नाहीच अखंड ध्यानी||

या पुस्तकात कल्याण स्वामींची शिष्यपरंपरा सविस्तर दिली आहे. त्यांचे कार्य, त्यांचे साहित्य, त्यांची शिष्यपरंपरा याचा सखोल अभ्यास अनुराधाताईंनी केलेला जाणवतो. असं हे माहितीपर पुस्तक बुक रॅक मध्ये हवंच!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “सूर्य गिळणारी मी” – लेखिका – सुश्री अरुणा सबाने ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सूर्य गिळणारी मी” – लेखिका – सुश्री अरुणा सबाने ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

पुस्तकाचे नाव… सूर्य गिळणारी मी

लेखिका…  सुश्री अरुणा सबाने

मनोविकास प्रकाशन

पृष्ठ संख्या…496

आपण वाचतो आपल्याला आवडेल आपल्याला रुचेल, पचतील अशी पुस्तकं आपण वाचनासाठी निवडतो.. पण काही वेळा काही पुस्तकं आपल्याला सतत खुणावत राहतात, आकर्षित करत राहतात अशाच काही पुस्तकांमधील एक पुस्तकं एक आत्मचरित्र म्हणजे अरुणा सबाने ह्याचं सूर्य गिळणारी मी हे पुस्तकं.. काही महिन्यांपूर्वी लोकसत्ता मध्ये ह्या पुस्तकाविषयी वाचलं होतं आणि तेंव्हा पासूनच हे पुस्तकं मला खुणावत होतं.. आणि योगायोग असा की काहीच दिवसात  भावार्थ व्हॅन मध्ये मला हे पुस्तकं दिसलं मग काय लगेचच घेतलं आणि आज त्या पुस्तकाविषयी लिहिण्याच धाडस करते आहे..

सूर्य गिळणारी मी वाचायला घेतलं आणि एका सुशिक्षित, हुशार, आत्मविश्वास ही लाजेल अशा एका कर्तबगार स्त्रिच्या जीवनाचे पैलू वाचताना अनेकदा डोळे पाणावले, नकळत कधी सुखावले, कधी लग्न टिकविण्यासाठी धडपडणाऱ्या अरुणाचा राग ही आला.. पण तरीही ह्या पुस्तकातील अरुणाची जिद्द, आत्मविश्वास आपल्याला पुस्तकं खाली ठेवू देत नाही.. आता ह्या पुस्तकाची थोडक्यात गोष्ट सांगते.. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील निमगाव(साबने ) ह्या छोट्या गावातील एका सधन, सुशिक्षित, समृध्द अशा शेतकरी पाटील घराण्यातील ही मुलगी… नाव अरुणा.. लहानपणापासूनच वाचनाची आवड असणारी, हुशार, चुणचुणीत, स्वतंत्र विचारांची अरुणा.. शाळेत नेहमी पहिला नंबर मिळवणारी, विविध स्पर्धांमधून आपलं वर्चस्व गाजवणारी, हुशार तरीही स्वभावाने शांत असणारी अरुणा.. आपल्या भावंडांबरोबर वाचनाच्या गप्पा गोष्टी करणारी, नवनवीन पुस्तकं मिळवून सतत वाचणारी ही हुशार अरुणा.. मोठ्या भावाचे खेळातील प्राविण्य, राजकारणातील दबदबा ह्याचं नितांत कौतुक असणारी अरुणा.. बाई म्हणजे आईची लाडकी अरुणा.. आणेजी म्हणजे आजोबांची लाडकी नात अरुणा.. मनोहर, किर्लोस्कर या सारखी मासिकं  वाचत लाडाकोडात वाढलेली अरुणा सगळ्यांची लाडकी होती..लहान वयात बापू म्हणजे बाबा गेल्यानंतर आई आणि भावंडांच्या मायेच्या छत्राखाली वाढलेली अरुणा.. अरुणाची अशी अनेक रूपं तिच्या समृध्द बालपणाच दर्शन घडवतात.. बाबा, राजू हे तिचे मोठे भाऊ, दोन बहिणी.. पण बहिणींची लग्नं लवकर झाल्यामुळे राजू शी तिची छान गट्टी जमली.. ती आयुष्यभर.. दोघांना ही वाचनाची आवड असल्यामुळे हे नातं अजूनच पक्क बनलं..अगदी लहानपणापासून  डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी अरुणा त्या दृष्टीनेच अभ्यास करणारी आणि जिद्दीने तो पूर्ण करणारी अशी.. पुढे दहावीनंतर शहरात पुढच्या शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेते.. आणि घरचे ही तिच्या ह्या निर्णयाचं स्वागत करून तिला पाठिंबा देतात..त्या काळी तिच्यासाठी हॉस्टेल बघून तिच्या पुढच्या वाटचालीसाठी सर्व ते प्रयत्न करतात.. राजू आधीच शहरात असल्यामुळे तिच्यासाठी हॉस्टेल वर राहणं फार सोप्प होऊन जातं.. हॉस्टेल वर आल्यानंतर तिच्या मोठ्या भावाच्या मित्रांची, राजूची फार मदत होते.. हॉस्टेल वरच्या अनेक गमतीजमती ही खूप छान मांडल्या आहेत पुस्तकात..बारावीत असताना अशाच एका मैत्रिणी सोबत सिनेमाला गेलेली असताना तिची प्रभाकर पावडे ह्या मुलाशी ओळख होते..प्रभाकर पावडे हा आंबेडकर चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो.. दोघांची वाचनाची आवड, वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा ह्यातून त्यांची मैत्री होते पुढे प्रेम होतं आणि इथेच अरुणाच्या आयुष्याला कलाटणी मिळते.. प्रभाकर हा आर्ट्स चा विद्यार्थी आणि अरुणा सायन्स ची..त्यामुळे प्रभाकर शी लग्न करायचं तर डॉक्टर होण्याचं स्वप्न बाजूला ठेवावं लागेल हे अरुणाला लवकरच कळून चुकत आणि ती प्रभाकर च्या प्रेमासाठी त्याच्याशी लग्न करण्यासाठी लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाला बाजूला करते आणि इथेच अरुणा फसते.. मग हे प्रेम प्रकरण राजू पर्यंत पोहचत, पुढे घरी कळतं आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता अरुणा प्रभाकर शी लग्न करते.. शिक्षण सुटतं..स्वप्न मागे पडतात.. प्रभाकर च्या प्रेमात आकंठ बुडालेली अरुणा सगळं विसरून विवाहबद्ध होते.. बाई चा तसा विरोधच असतो तरीही अरुणाच्या सुखासाठी ती हे लग्न मान्य करते आणि इथे अरुणाच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होतो.. नव्याचे नऊ दिवस संपतात आणि प्रभाकर चा खरा चेहरा समोर येतो.. स्त्रियांचा आदर करणारा, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा प्रभाकर बायकोला दहा मिनिटं उशीर झाला म्हणून तिच्यावर हात उचलतो.. नवरेगिरी गाजविण्याची एकही संधी सोडत नाही..बायको म्हणजे उपभोगाची वस्तू आणि रांधा वाढा एवढाच काय तो तिचा उपयोग असा वागू लागतो.. अरुणा हे सगळं पाहून कोलमडून जाते..  सासर किंवा तिथल्या कुठल्याच माणसांकडून तिला कसलीच सहानुभूती किंवा प्रेम मिळत नाही.. नवरा हा असाच असतो हेच तिच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न होतो..हे सगळं सहन करत.. माहेरच्या माणसांना आपलं दुःख दिसणार नाही ह्याची काळजी घेत ती संसार करण्याचा प्रयत्न करत राहते.. अशातच तिला दिवस गेल्याची बातमी कळते आणि ती सुखावून जाते.. पण मैत्रिणींनो तिचा हा आनंद फार काळ टिकत नाही.. प्रभाकरच्या वागण्याने ती प्रचंड दुखावते.. तिच्या पहिल्या डिलिव्हरी ची कहाणी वाचताना तर आपण अश्रू थांबवूच शकत नाही.. माहेरी लाडाकोडात वाढलेली अरुणा डिलिव्हरी च्या वेळी एका भिकारी महिलेकडून कशीबशी मदत मिळवून एका सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल होते.. हा प्रसंग वाचताना अंगावर शहारे येतात..पहिला मुलगा पिंटू( स्वप्निल) त्याच्या जन्मा नंतर ही परिस्थीती फारशी बदलत नाही.. एक वर्षाच्या पिंटू साठी औषध सुद्धा घेण्या इतके पैसे नसणारी हतबल अरुणा पाहून ते प्रसंग वाचून आपण पुन्हा रडतो.. प्रभाकर च वागणं दिवसागणिक अजून विचित्र होतं जातं..मारझोड तर सुरूच असते.. आपल्या मित्रांना घेऊन येणं, त्यांच्यासाठी मांसाहारी जेवण करायला लावणं, त्यांच्यासमोर वाट्टेल त्या शिव्या देणं, सतत अपमान करणं , दोनशे रुपये सुद्धा कमावण्याची अक्कल नाही असा सतत पाणउतारा करणं हे अगदी रोजचं झालेलं होत.. आणि अरुणा हे निमुटपणे सहन करते हे पाहून अशा वेळी आपल्याला भयंकर राग येतो..अशातच पुन्हा प्रेगनन्सी आणि ते ही जुळी अरुणा ह्या सगळ्या त्रासाने खचून जाते.. पण दोन मुलींचा जन्म होतो आणि आत्ता तरी दिवस बदलतील ही वेडी आशा घेऊन जगत राहते.. ह्या दरम्यान प्रभाकर च पिणं अजून वाढतं.. रोजची भांडणं, आरडाओरडा, शिवीगाळ करणं हे सुरूच राहतं..ह्या मधल्या परिस्थितीत घडलेले अनेक प्रसंग सतत डोळ्यात पाणी आणत राहतात.. मुलांच्या शिक्षणासाठी अरुणाची धडपड, दोन पैसे कमावण्यासाठी शाली करून विकणं अशी छोटी मोठी काम करत राहणं, ह्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा अरुणा लिहीत असते.. तिचे अनेक लेख पेपरमध्ये वाचून तिचं कौतुक होत असतं.. ह्या सगळ्यात तब्बल सतरा वर्षांचा काळ जातो आणि एक दिवस जेंव्हा अरुणाच्या जीवावर बेततं तेंव्हा अरुणा रात्री घर सोडते.. हा प्रसंग वाचताना हुंदके आवरता येणं शक्यच नाही.. कशी बशी स्वतःची सुटका करून घेऊन मिळेल तिथे रात्र काढल्यानंतर मात्र अरुणाचा निश्चय ठाम होतो आणि आपल्या दोन्ही मुलींना घेऊन ती एका छोट्याशा झोपडी वजा घरात आपला संसार सुरू करते.. तिचा हा संघर्ष, मुलींसाठी ची धडपड पाहून आपण कासावीस होऊन जातो.. छोटी मोठी नोकरी करून तिघींच पोट भरणं आणि आपल्या मुलींना त्या प्रभाकर पासून दूर ठेवणं ह्या साठीची अरुणाची चाललेली धावपळ पाहून बऱ्याच वेळा तिचा अभिमान ही वाटतो.. अशातच एक मुलगा त्याच्या जवळ आहे हे दुःख आणि मुलींची जबाबदारी अशा दुहेरी संकटात अडकून सुद्धा अरुणा कुठेही निराश किंवा हतबल न होता लढत राहते..स्वतः च्या मुलींना बरबाद करण्याच्या धमक्या प्रभाकर देतो त्या  वेळी ही धीराने सांभाळणाऱ्या अरुणाच कौतुक वाटतं… पुढे अरुणा स्वतः मध्ये जी प्रगती करते किंवा अनेक छोटे मोठे व्यवसाय करता करता एक दिवस हॉस्टेल आकांक्षा सुरू करते आणि तिथून पुन्हा एकदा अरुणाचा नव्याने जन्म होतो आणि तिच्या आयुष्यात एक वेगळं वळण येतं.. हॉस्टेल चालविण्यासाठी चे प्रयत्न, त्याची जाहिरात, हॉस्टेल साठी मुली मिळवणं अशा अनेक प्रसंगातून रोज नव्याने शिकत अरुणा आपला जम बसवते.. मुलांचं शिक्षण, हॉस्टेल साठी घेतलेलं लोन, प्रभाकर च विचित्र वागणं, फोन करून धमक्या देत राहणं ह्या सगळ्याला धीराने तोंड देत अरुणा एक यशस्वी उद्योजिका होते.. हळूहळू तिच्या लिखाणाची चर्चा सुरू होते, जल संवर्धन चळवळ असो, स्त्रियांचे प्रश्न असोत अरुणा सगळ्यांसाठी सतत काहीना काही करत राहते.. आकांक्षाचा व्याप दिवसेंदिवस वाढत जातो.. तिथूनच एक नवी सुरुवात म्हणून ती आकांक्षा हे मासिक सुरू करते आणि पुन्हा एकदा नव्या व्यवसायाचा श्री गणेशा होतो…मासिकाच्या यशानंतर आणि जल संवर्धन, हॉस्टेल हा सगळा व्याप सांभाळून पुन्हा एकदा अरुणा नव्या व्यवसायात उतरते आणि तो व्यवसाय म्हणजे पुस्तकं प्रकाशन… विदर्भातील मोठमोठ्या लेखकांच्या पुस्तकाचं यशस्वी प्रकाशन करून संपादक म्हणून नवी वाटचाल सुरू होते.. त्या आधीच विमुक्ता कादंबरीने अरुणा सर्व परिचित एक उत्तम लेखिका म्हणून प्रसिद्धीस येते..आणि या प्रकाशन व्यवसायात ही कडू गोड आठवणींची तिची कहाणी वाचताना आपण मंत्रमुग्ध होतो.. दोनशे रुपये कमवायची अक्कल नसणारी असा अपमान सहन करणारी अरुणा लाखोंचे व्यवहार लिलया सांभाळताना पाहून तिच्या विषयीचा अभिमान अजून वाढतो.. दरम्यान मुलींची शिक्षण त्यांची लग्न, मुलाचं लग्न त्याच्यासाठी त्याच्या व्यवसायासाठी अरुणाची मदत, विविध पुरस्कार, भाषणं, स्त्रियांसाठी चे कार्य, परदेश प्रवास, अशा विविध प्रसंगातून अरुणाची कहाणी अजूनच रंगत जाते.. तिच्या प्रत्येक निर्णयात आपण स्वतः ला सोबती मानत तिचा प्रवास वाचून थक्क होतो.. त्यानंतर पाठोपाठ होणारे जिवलग व्यक्तींचे मृत्यू, बाईचं अचानक आलेला मृत्यू ह्या सगळ्यांनी अरुणा खचून जाते.. पण काही काळ च.. त्यानंतर पुन्हा स्वतः ला सावरून तिची इतरांसाठी जगण्याची धडपड एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते.. हे पुस्तकं वाचताना अनेक कडू गोड आठवणी अर्थात कडू आठवणीच जास्त आहेत त्या वाचताना कुठेही अरुणा हरलीय, खचून गेलीय, उदास झालीय असं वाटतं नाही.. उलट अठरा अठरा तास काम करणारी अरुणा, सदैव आपली जिद्द आणि मेहनतीने परिस्थिती वर मात करणारी अरुणा, आपल्या लेकरांसाठी सतत झगडत राहणारी अरुणा, कोणत्या ही प्रसंगात धीराने सामोरी जाणारी अरुणा, बेधडकपणें गाडी चालवणारी अरुणा, समाजातल्या गरजू स्त्रिंयांसाठी लढणारी त्यांना न्याय मिळवून देणारी अरुणा आपली कधी मैत्रीण बनून जाते कळतं ही नाही.. मी तर ह्या अरुणाच्या प्रेमातच पडले.. इतके कठीण दुःखद प्रसंग येऊन ही न डगमगता न घाबरता त्या प्रसंगाशी चार हात करणारी लढवय्यी अरुणा आपल्याला जास्त भावते.. आज अरुणा सबाने हे नाव आदराने घेतले जाते.. विविध पुरस्काराने सन्मानित झालेली ही अरुणा ह्या प्रसंगातून इथवर पोहचली आहे त्या प्रसंगांची ही कहाणी म्हणजे हे सूर्य गिळणारी मी हे पुस्तक आपल्याला जगणं आणि त्या साठी संघर्ष करून जिंकण शिकवत.. हे पुस्तकं वाचताना आपण खूपदा रडतो पण ते अश्रू अरुणाच्या कष्टाची तिच्या जिद्दीची कहाणी वाचताना येतात.. कुठेही तिच्याबद्दल सहानुभूती किंवा दयाभाव आपल्या मनात येत नाही.. मला वाटतं हेच या पुस्तकाचं यश आहे… ह्या पुस्तकाबद्दल कितीही लिहू शकत असेल तरी ही अरुणाची कहाणी ज्याने त्याने वाचूनच समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे इथेच थांबते.. आणि हो मी पुस्तकातील पाच टक्के पण इथे मांडलेले नाही.. त्यामुळे हे पुस्तकं वाचणं मस्ट आहे बरं का! आणि मला खात्री आहे मी इतकं लिहिल्यानंतर आपण सगळ्या हे पुस्तकं नक्की वाचाल… हे पुस्तकं म्हणजे स्त्रियांसाठी मार्गदर्शक तर आहेच आहे पण निर्णय चुकले तरी न डगमगता कसं लढावं हे शिकवणारे जास्त आहे असं मला वाटतं..अरुणा ताईच्या जिद्दीला, तिच्या मेहनतीला आणि तिने लढलेल्या प्रत्येक लढाईचे अगदी करावे  तितके कौतुक कमीच आहे पण अरुणा ताई तुझी ही जीवन संघर्ष कहाणी अनेक स्त्रियांसाठी यशाचा मार्ग दाखविणारी मार्गदर्शिका आहे हे मात्र नक्की…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “समाजभूषण २” – लेखिका – सौ. रश्मी उल्हास हेडे ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “समाजभूषण २” – लेखिका – सौ. रश्मी उल्हास हेडे ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

समाजभूषण २ (व्यक्ती परिचय)

लेखिका :सौ. रश्मी उल्हास हेडे

प्रकाशक: सौ. अलका देवेंद्र भुजबळ(न्यूज स्टोरी टुडे)

पृष्ठे:१६८

सामान्यातलं  असामान्यत्व म्हणजे काय असतं याची प्रचिती मला समाजभूषण २ हे  सौ.रश्मी हेडे यांचे पुस्तक वाचताना आली. समाजभूषण १  हे पुस्तक मी वाचलेले होते. त्यावर लिहिलेही  होते.  त्यामुळे अर्थातच समाजभूषण २  हाही लेखसंग्रह वाचण्याची खूपच उत्सुकता होती. प्रकाशक  सौ. अलका देवेंद्र भुजबळ( न्यूज स्टोरी टुडे) यांनी हे पुस्तक प्रकाशित करून खरोखरच समाजापुढे यशाची व्याख्या, यशाचे मार्ग आणि यश मिळवण्यासाठी असावी लागणारी मानसिकता याचा एक सुंदर वस्तू पाठच सादर केला आहे.

या पुस्तकात ३७  जणांच्या जीवनकथा आहेत.  प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन रश्मी हेडे यांनी त्यांच्या जीवनातले नेमके मर्म ओळखून हा लेखन प्रपंच केलेला आहे.  आणि तोही एक निश्चित सकारात्मक दृष्टिकोन ठेवून.

कासार समाजाला भूषण ठरलेली ही सर्वच मंडळी म्हणजे तेजोमय रत्नासारखीच आहेत.  प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास जरी वेगवेगळा असला तरी या सर्व व्यक्तींमध्ये गुणात्मक साम्य आहे.  साधारणपणे ४० ते ६० वयोगटातल्या या व्यक्ती आहेत.  एखाद दुसरा अपवाद सोडल्यास याच वयोगटातली ही उल्लेखनीय मंडळी आहेत. शिवाय  हे पुस्तक वाचताना आणखी एक लक्षात येते की सर्वसाधारण आर्थिक स्तरातल्या या व्यक्ती आहेत.  कोणीही मुखात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत.  अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी जीवनाचे यशाकडे नेणारे मार्ग खणून काढले आहेत. कुणाचे जन्मस्थान, कुणाचे आई-वडिलांचे छत्र लहान वयातच हरवलेले, रितभात, परंपरा  श्रद्धा, अंधश्रद्धा यात अडकलेला कुणाचा परिवार, शिक्षणाविषयीची अनास्था, नाही तर पुरेशी शिक्षण व्यवस्थाच नसलेल्या ठिकाणचे वास्तव्य, अशा अनेक नकारात्मक वातावरणात शोधक वृत्तीने जगणारी ही माणसं आहेत. यांनी यशाचे शिखर कसे गाठले याच्या अक्षरशः थक्क करून सोडणाऱ्या आणि मनाला खिळवून टाकणाऱ्या या व्यक्तिकथा आहेत.

यांच्यात प्रामुख्याने आढळणारे गुण म्हणजे दृढ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे मनोबल, आधुनिक विचारधारा, धाडसी निर्णय क्षमता आणि त्याचबरोबर प्रचंड मेहनत करण्याची तयारी अन् सदैव बाळगलेला नम्रपणा हे दुर्मिळ गुण या सर्वच ३७ जणांच्या ठायी आढळून येतात.  म्हणूनच उंच भरारी घेऊनही  यांचे चरण भूमीवर आहेत.आणखी एक म्हणजे कोणत्याही यशाने ते हुरळून गेलेले नाहीत. जगताना सामाजिक बांधीलकी,समाजाचे ॠण याचे भान त्यांनी  ठेवलेले आहे. सामाजिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी,अधिक समृद्ध, सुखदायी ,प्रगत करण्यासाठी त्यांची धडपड आहे.”आधी केले मग सांगितले,” किंवा “ केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे ” ही वृत्तीही आहे.

हे केवळ पुस्तक नाही ही यशाची गाथा आहे.  एक प्रेरणादायी दरवाजा आहे.  विविध क्षेत्रांमध्ये डौलाने वावरणारी ही यशस्वी माणसे वाचताना उर अभिमानाने भरून जातो.  जगी अशक्य काही नाही याचाच अनुभव येतो.  इम्पॉसिबल हा शब्दच या व्यक्तींच्या शब्दकोशात नाही.

…. “ जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, 

तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे “ …(ऋतुजा इंदापुरे)

 ….” मनुष्याची खरी ओळख त्याच्या नावावरून नव्हे तर त्याच्या कामावरून होते ” …(कर्नल महेंद्र सासवडे)

…. “ आयुष्यातील संघर्षमय परिस्थिती आपल्याला कणखर बनवते, शिकवून जाते. शिवाय एकमेकांच्या गुणांचा आदर करणारी नाती महत्त्वाची असतात.”….( प्रांजली बारस्कर)

…. ” मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है

पंख से कुछ नही होता, हौसलों से उडान होती है “…( मोहित कोकीळ)

…. ” जसा काळ तशी वेळ व त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून जो पुढे जातो तोच जिंकतो.  ज्या समाजात युवकांचा मोठा सहभाग असतो तेथे समाजाची प्रगती होते, कामाला गती मिळते.”    ( प्रकाश तवटे)

…. ” प्रत्येकाने आपले कुटुंब, समाज, जिल्हा व्यसनमुक्त ठेवावा म्हणजे कुटुंब उध्वस्त होणार नाही.  समाज आनंदी राहील.”…( ज्योत्स्ना शेटे )

…. “परमेश्वर त्यांनाच संकटे देतो ज्यांच्यात संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य असते. ते कष्टांना घाबरत नाहीत, त्यांच्यासाठी कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते.”… (निशिकांत धुमाळ)

….  “मोठे झाड लगेच दृष्टीस पडते, मात्र त्याचे प्रथम बी रुजावे लागते, खत पाणी द्यावे लागते, तेव्हा त्याचे एक सुंदर झाडात रूपांतर होते.  मूळ घट्ट रोवलेले असेल तर वादळातही झाड मोडत नाही, तुटत नाही “ …..( रवींद्र सासवडे)

…. ” हळद खाऊन केशर खात असल्याचा आव आणणारी आनंदी, सदा हसतमुख  अशी माझी नणंद माझा आदर्श आहे.”…( सुरेखा तिवाटणे)

…. ” हरलो तरी थांबायचे नसते, खिलाडू वृत्तीने अपयशही पचवायचे असते.।…( हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे)

…. ” लढा, पुढे चला व जिंकून दाखवा. अशक्य काहीच नाही.” (डॉक्टर सुनील अंदुरे )

…. ” जोडीदार निवडताना श्रीमंत— गरीब, शिक्षित —उच्चशिक्षित या तफावती बघू नका. स्वकर्तुत्वावर यशस्वी वाटचाल करा,” ( सुभाष साळवी)

…. ” शिक्षणाला संस्काराची जोड असली तर चमत्कार होतात.”…( डॉक्टर ज्ञानदेव कासार)

असे अनेक अनमोल संदेश या पुस्तकातून या व्यक्तींकडून, त्यांच्या जीवन कहाण्या वाचताना वाचकाला मिळतात. हे नुसतेच संदेश अथवा सुविचार नव्हेत तर त्या जगण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स आहेत.  वाचकाला त्या प्रेरणा देतातच.  मार्ग दाखवतात, दिलासा देतात, आशावादी बनवतात, मरगळ उतरवतात आणि तमाकडून प्रकाशाकडे नेतात.

ही अशी पुस्तके एकदाच वाचायची नसतात.  ती पोथीसारखी मनाच्या देव्हाऱ्यात जपायची असतात.  त्यांची पारायणं करायची असतात.

हे पुस्तक वाचताना मनात आणखी एक विचार येतो की यश म्हणजे काय? यशाची व्याख्या काय? पैसा,गाडी, बंगला ही भौतिकता की अजून काही वेगळे? यश म्हणजे स्वप्नपूर्ती. यश म्हणजे जीवनातले रचनात्मक बदल, ही सर्व उत्तरे या पुस्तकात मिळतात. यशाची वेगवेगळी परिमाणे इथे अनुभवायला मिळतात.

कोण हो ही माणसं?  ज्यांचं नाव माहीत नाही, ज्यांना झगमगीत वलय नाही, ज्यांचे फोटो नाहीत, बातम्या नाहीत पण तरीही वाचनीय, आदर्शवत ,प्रेरणादायी अशी ही माणसे !  कोळशातले हिरे, चिखलातली कमळं ! समाज यांच्यामुळे घडतो, सावरतो.

या पुस्तकात जरी एका विशिष्ट समाजातल्या व्यक्तींच्या यशाचा विचार केलेला असला तरी हे पुस्तक जातीयवादी नाही, तर ते प्रातिनिधिक स्वरूपात लिहिलं गेलं आहे हे विशेष.

 ” रश्मीताई ! तुमच्या अप्रतिम कामगिरीला माझा मानाचा मुजरा ! यातल्या काही व्यक्तींविषयींचे, श्री देवेंद्र भुजबळ यांनी संपादन केलेले आहे त्यांनाही दंडवत ! आणि अलकाताई, तुम्ही या लेखन प्रपंचाची दखल घेतली म्हणून तुम्हालाही सलाम ! अशीच दर्जेदार, समाजाला घडवणारी, समाजभूषण पुस्तके आपण प्रकाशित करावीत… त्यासाठी खूप खूप शुभेच्छा !” 

जाता जाता एक अजून सांगावसं वाटतं ते या पुस्तकाच्या मलपृष्ठाच्या अगोदरच्या पानाविषयी. त्यावरचं चित्र मला अतिशय बोलकं वाटलं.  शिखरावर पोहोचलेली एक व्यक्ती प्रयत्नपूर्वक चढाव चढणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे करते …  वाह ! क्या बात है ! कृष्णधवल छटांमधल्या  या दोन सावल्या जीवनाचं मर्मच सांगून जातात…

….  एकमेका सहाय्य करू।

      अवघे धरू सुपंथ।।

परिचयकर्त्या : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक – ‘अष्टदीप’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – ३०० पाने

पुस्तकाचे मूल्य – ४२५ रुपये

पुस्तक परीक्षण- सुश्री विभावरी कुलकर्णी

अष्टदीप पुस्तकाविषयी

या पुस्तकात भारतरत्न मिळालेल्या आठ व्यक्तींची चरित्रे लेखकाने रेखाटली आहेत.   महर्षी कर्वे, जे आर डी टाटा, सर विश्वेश्वरय्या, लता मंगेशकर, लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, सरदार पटेल आणि ए पी जे अब्दुल कलाम. या सर्वांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि त्यांचे कर्तृत्व रसाळ आणि सोप्या भाषेत वर्णन केले आहे. दीपस्तंभाप्रमाणेच ‘ अष्टदीप ‘ हे पुस्तक तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.यातील व्यक्ती भिन्न परिस्थितीतून असलेल्या आहेत.पण सर्वांनी काम मात्र देशासाठीच केले.आणि त्या साठी   या सर्वांच्या नावा आधी असलेली विशेषणे त्यांचे कार्य सांगून जातात.या सर्वांनीच अतिशय खडतर प्रवास केला आहे.आणि तोच या पुस्तकात वाचायला मिळतो.

निश्चयाचा महामेरू महर्षी धोंडो केशव कर्वे

नाव वाचताच लक्षात येते खूप प्रतिकूल परिस्थितीत अचल महामेरू प्रमाणे ठाम ध्येय डोळ्या समोर ठेवून निश्चयाने काम केले आहे.त्यांचे विधवांचे पुनरुत्थान आणि स्त्री शिक्षण याने जगातील स्त्रियांना वेगळेच स्थान मिळवून दिले आहे.प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली छोटी संस्था आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे.आणि कित्येक महिलांचे कल्याण झाले आहे.

द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया

पाणी, कालवे, बंधारे यावर त्यांनी केलेले संशोधन व प्रयोग आजही उपयुक्त ठरत आहेत. किंवा त्याला पर्यायच नाहीत. त्यांना आधुनिक विश्वकर्मा म्हणतात.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

द्रष्टा उद्योगपती जे.आर.डी.टाटा

कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय साली मुंबईत सुरू केले

लाल बहादूर शास्त्री

अतिशय साधी रहाणी व देशा साठी केलेले कार्य यांच्या वरील जी भाषणे ऐकतो त्या पेक्षा वेगळी व सखोल माहिती या पुस्तकात मिळते.

अशीच माहिती आठही रत्नांची मिळते.

यातील लता मंगेशकर यांचे छोटी लता ते महान गायिका लता मंगेशकर असा जीवन पट वाचायला मिळतो.आणि सध्या त्यावरील एका सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद पण आपण घेत आहोत.

ठळक वैशिष्ट्ये

आठ भारतरत्न प्राप्त व्यक्तींचा आदर्श हे पुस्तक आपल्या समोर ठेवते.

मूल्यविहीन तडजोड, भ्रष्टाचार इ च्या पार्श्वभूमीवर या भारतरत्न प्राप्त व्यक्तींचे जीवन म्हणजे जणू आपल्यासमोर धरलेला आरसा आहे.

देशासाठी बांधिलकी, त्याग करणे, कठीण परिस्थितीत खचून न जाता तिला धैर्याने तोंड देणे या गोष्टी हे पुस्तक नकळतपणे शिकवून जाते.

मूल्य – 425/- प्रकाशन – जुलै 2022

श्री विश्वास विष्णु देशपांडे

लेखकाविषयी

विश्वास देशपांडे हे लोकप्रिय लेखक असून त्यांची यापूर्वीची पुस्तके वाचकांकडून गौरवण्यात आली आहेत. ललित लेखन हा त्यांचा आवडता प्रांत आहे. सकारात्मक आणि आनंद देणारे लेखन हे त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य आहे.

कवडसे सोनेरी अंतरीचे व आकाशझुला ही दोन्ही पुस्तके शासनमान्य पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत.आणि बेसटसेलर पुस्तकात या पुस्तकांच्या बरोबर अष्टदीप याचाही समावेश आहे.

आत्ता पर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.आणि नवीन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत.

अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन पण सोप्या सुटसुटीत शब्दात वाचकांच्या समोर आणणे हे लेखन वैशिष्ट्य आहे. त्या मुळे आपल्याच मनातील भावना व्यक्त होत आहेत असे वाटते.लेखकांची निरीक्षण शक्ती पण खूप दांडगी आहे.आणि शांत, गंभीर, सुस्पष्ट आवाजातील निवेदन या मुळे रेडिओ विश्वास वरील कार्यक्रम (आठवड्यातून तीन दिवस प्रसारित होणारे) अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,लेखकांची सर्वच पुस्तके संग्रही ठेवावी व भेट म्हणून द्यावीत.

या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचा राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, प्रेरणादायी व्यक्तिकथा हा पुरस्कार  ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्राप्त झाला आहे.पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन!

पुढील साहित्य निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा!

पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “मागे वळून पाहताना” – डॉ. पी. डी. सोनवणे ☆ परिचय – सौ. सुनंदा शिवाजी कदम ☆

सौ. सुनंदा शिवाजी कदम

परिचय 

 मिस्टरांना बिझनेस मध्ये मदत करते.

वाचन लिखाणाची आवड. वाचनाच्या आवडी पोटी  आम्ही मैत्रीणींनी मिळून चालू केले वाचनप्रेमी वाचनालय. वाचन संस्कृती  वृद्धिंगत होण्यासाठी दर रविवारी मुलांसाठी वाचन कट्टा घेते.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मागे वळून पाहताना” – डॉ. पी. डी. सोनवणे ☆ परिचय – सौ. सुनंदा शिवाजी कदम

पुस्तकाचे नाव_   मागे वळून पाहताना

लेखक_              डॉ. पी. डी. सोनवणे

प्रकाशन_            शिवस्पर्श प्रकाशन

पृष्ठसंख्या_          407

मूल्य_                 500/

पुस्तक अभिप्राय…

आयुष्यात कुठेतरी थांबावं लागतं. लेखक आयुष्याच्या एका वळणावर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून थांबायचे ठरवतात. तेव्हा आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना, त्यांनी अनुभवलेल्या आठवणी कागदावर उतरतात, आणि जन्म होतो …मागे वळून पाहताना…या पुस्तकाचा.. त्यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्राचा..

लेखकाचा जन्म खेड्यातला,  पण सधन कुटुंबातला. आजोबांची इच्छा नातवाने डॉक्टर होण्याची. फक्त इच्छा नाही तर त्यांच्या प्रयत्नांनाही सलाम करावासा वाटतो. चौथीपर्यंत लेखकांना त्यांचे आजोबा  खांद्यावरून शाळेत सोडत. अभ्यासात गोडी लागण्यासाठी शिक्षकांना स्वतःच बक्षीस देत व उत्तर बरोबर आले कि ते आपल्या नातवाला देण्यास सांगत.

आजोबांच्या कष्टाचे चीज करत, लेखक नेहमी वर्गात पहिले येत असत. एकेक पायरी पुढे चढत पुण्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळतो. मेडिकल मध्ये असतानाच, त्यांचं लग्न, पहिल्या मुलाचा जन्म असे सुखद धक्के तर वडील व आजोबांचे छत्र हरवते असे दुःखद धक्के सहन करत, पी डी सोनवणे डॉक्टर होतात. …

कोकणापासून सुरुवात केलेली सरकारी नोकरी शेवटपर्यंत कोणताही डाग न लागू देता निवृत्त होणे खूपच अवघड गोष्ट. पण लेखकांनी ती साध्य केली. आपल्या सेवेला डाग तर सोडा त्यांच्या शिरपेचात अनेक मानाची तुरे खोवले गेले. शासकीय सेवे सोबत रोटरी क्लब,लायन अशा सामाजिक संस्था शी निगडित त्यांनी अनेक समाजकार्य केली. रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम  अशा उपक्रमात त्यांनी नेहमीच योगदान दिले.

कामाच्या व्यापातून आपली गाण्याची ,सूत्रसंचालनाची आवड लेखकांनी आजतागायत  जपली आहे. जुन्या परंपरा जोपासत नव्याचा स्वीकार करणारे लेखकांचे विचार मनाला स्पर्शून जातात.

आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर साथ देणारी आपली पत्नी सौ भारती चा उल्लेख नेहमी ते आदराने करतात. आपल्या यशाचे सर्व श्रेय ते आपल्या पत्नीला देतात.

लेखकांची सुसंस्कारित मुले, सुना, नातवंडे यांनी जणू घराचं गोकुळच फुलले आहे.

लेखकांच्या समाजकार्याचे अनुकरण करत त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर अभिजीत सोनवणे हे डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून काम करतात.  भिक्षेकर्यांचे डॉक्टर म्हणून त्यांना ओळखतात. डॉक्टर अभिजीत सरांनी  आपल आयुष्य   भिक्षेकर्यासाठी वाहून घेतल आहे.

आपला नातू डॉक्टर व्हावा हे आजोबांनी पाहिलेलं स्वप्न लेखकाने प्रत्यक्षात उतरवलंच, शिवाय स्वतःच्या नातवाला सोहमला प्रत्यक्ष डॉक्टर होताना पाहण्याचं भाग्य ही लेखकाला लाभल आहे.

सामान्यातील असामान्य डॉक्टर पी डी सोनवणे यांचे आत्मचरित्र खरंच आजच्या  पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

पुस्तक विक्रीतून मिळणारे सहयोग मूल्य डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या सोहम ट्रस्ट ला भिक्षेकर्यांच्या सेवेसाठी दिले जाणार आहे. पुस्तक विक्रीतूनही समाजकार्य .

संवादिनी : सौ. सुनंदा शिवाजी कदम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “प्रेम रंगे, ऋतूसंगे” – कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

प्रेम रंगे, ऋतू संगे

कवी: सुहास रघुनाथ पंडित

प्रकाशक: अक्षरदीप प्रकाशन आणि वितरण

प्रथम आवृत्ती:१ मे २०२३

श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रेम रंगे ऋतूसंगे हा नुकताच प्रकाशित झाला. या संग्रहातल्या कविता वाचताना प्रेम या सुंदर भावनेचा एक विस्तृत, नैसर्गिक आणि शिवाय अतिशय सुंदर शब्दात व्यक्त झालेला भाव अनुभवायला मिळाला. 

श्री सुहास रघुनाथ पंडित 

पुस्तक हातात घेतल्यानंतर माझं पहिलं लक्ष गेलं ते अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अशा मुखपृष्ठावर.  हिरव्या धरणीच्या पार्श्वभूमीवर सुंदर बहरलेला लाल गुलमोहर आणि एक मानवी हात ज्यावरचे तर्जनी आणि अंगठा यातलं अंतर हे फारच बोलकं आहे.  कुठलाही चित्रकार जेव्हा समोरच्या दृश्याचं चित्र कागदावर रेखाटतो तेव्हा रेखाटण्यापूर्वी तर्जनी आणि अंगठा उघडून त्या अंतरातून एक माप घेत असतो. ते समोरचं  दृश्य त्याला त्या तेवढ्या स्केलमध्ये चितारायचं असतं.  कवी हा ही चित्रकारच असतो नाही का?  फक्त त्याच्यासाठी रंग, रेषा हे शब्दांच्या रूपात असतात आणि जे जे अवतीभवती घडत असते, दिसत असते ते सारे तो मनाच्या एका स्केलमध्ये टिपत असतो.  मुखपृष्ठावरचा हात आणि ही दोन बोटे अशी रूपकात्मक आहेत.  अवाढव्य पसरलेल्या निसर्गाच्या नजराण्याला मनाच्या कागदावर टिपणारं माप.  खरोखरच सुंदर, अर्थपूर्ण, बोलकं असं हे मुखपृष्ठ!

या काव्यसंग्रहाला लाभलेली डॉक्टर विष्णू वासमकर यांची प्रस्तावनाही अतिशय सुंदर, काव्याभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय आहे.  प्रस्तावनेत काव्यशास्त्र, त्याची सहा प्रयोजने, काव्याचे लक्षण, स्वरूप, तसेच काव्यशरीर या संकल्पनेत शब्द, अर्थ, रसोत्पत्ती, अलंकार, वक्रोक्ती, व्युत्पत्ती यांचे महत्त्वाचे स्थान याविषयीचे मुद्दे सुलभपणे उलगडले आहेत.  काव्यशास्त्रातील अलंकार, रस ,वृत्त ही काव्य कारणे किती महत्त्वाची आहेत हे या प्रस्तावनेत सूचकपणे सांगितलेले आहे.  सुरुवातीलाच ही प्रस्तावना वाचताना पुढच्या काव्य वाचनाला मग एक दिशा मिळते.  चांगल्या काव्याची ओळख होण्यास मदत होते. आणि जेव्हा मी पंडितांच्या  प्रेमरंगे ऋतुसंगे काव्यसंग्रहातील एकेक कविता वाचत गेले तेव्हा कवितेतला अभिजात दर्जा, त्यातले अलंकार, रस, वृत्त, छंद त्याचबरोबर प्रतिभा आणि अभ्यास या काव्य कारणांचा ही नितांत सुंदर असा अनुभव आला.  अत्यंत परिपक्व अशा या कविता आहेत.  उच्च कोटीची शब्दकळा यात आहे. काव्य म्हणजे नेमकं काय याचाच या कविता वाचताना खरा अर्थ कळतो.

या संग्रहात एकूण ६६ कविता आहेत. या सर्व कवितांमध्ये प्रेम हा स्थायीभाव आहे.  प्रेमाचे अनंत रंग यातून उलगडलेले आहेत. पंडितांनी त्यांच्या मनोगतात म्हटले आहे की ‘ प्रेम, निसर्ग आणि माणूस यांना एकमेकापासून कसे वगळता येईल?’ आणि हे किती खरे आहे याची जाणीव त्यांच्या या निसर्ग कविता वाचताना होते.

“प्रेमरंगे ऋतुसंगे”  या शीर्षकातच निसर्गाच्या बदलणाऱ्या ऋतुंसोबत उलगडणार्‍या प्रेम भावनेचे अनेक सूक्ष्म पदर दडलेले आहेत. सर्वच कवितांमध्ये गीतात्मकता, भावात्मकता, रसात्मकता आहे.  पंडितांची प्रतिभा, प्रज्ञा, अभ्यास वाचकाला थक्क करून सोडतो.  कवितांना दिलेली सुंदर आणि चपखल शीर्षके हे आणखी एक वैशिष्ट्य.

 प्रत्येक कवितेत प्रेमाचा मंत्र मिळतो, संदेश मिळतो.

       पाण्यामधली अवखळ झुळझुळ

       करात बिलवर करती खळखळ …

 

      शब्द होतील पक्षी आणि गातील गाणी तव दारी..

      लाटेवरती लाटा झेलत तूही आणिक मीही आलो

 

     खूप जाहले खपणे आता

     जपणे आता परस्परांना 

     खूप जाहला प्रवास आता

     गाठू विश्रांतीचा पार जुना.

…  अशा गेयता असलेल्या अनेक सुरेख काव्यपंक्ती पुन्हा पुन्हा वाचाव्यात असेच वाटते.

  उष्ण रश्मीचे सडे,

  कुरळे कुरळे मेघ .

  गर्भिताच्या गुहेतून अर्थवाही काजवे… यासारख्या शब्दरचना किती संपन्न, समृद्ध आहेत तेही जाणवते.

या काव्यसंग्रहातल्या ६६ही  कवितांवर खूप काही लिहिण्यासारखे आहे.  एकेक कवितेचे रसग्रहण करावे इतक्या त्या विलोभनीय आहेत, ताकदीच्या आहेत. मात्र “रात्र काळी संपली…” या एकाच कवितेबद्दल मी जरा सविस्तरपणे लिहायचं ठरवलेलं आहे.  अतिशय सुंदर, मला आवडलेली ही कविता आहे.  पण लिहिण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की कवी, कविता, वाचक यांचं नातं जुळत असताना कवीच्या मनातले अर्थ आणि वाचकाच्या मनात उलगडलेले अर्थ भिन्न असू शकतात.  विचारांची फारकत होऊ शकते. 

“रात्रकाळी संपली”  हे गीतात्मक काव्य आहे. 

       आसमंती सूर येता नूर सारा पालटे

       रात्र काळी संपली किरण किरण सांगते ।।धृ 

 

      चांदण्याचे नुपूर लेऊन निघून गेली निशा 

      केशराचे वस्त्र ल्यायलेली  अंबरी आली उषा

      पाठशिवणीचा खेळ तयाचा वसुधा पाहते 

      रात्र काळी संपली..

 

      हिरवे दवही तांबूस झाले स्पर्शून जाता रविकिरणे 

      शेपूट हलवीत सुरू जाहले मुक्या जीवांचे बागडणे

      घरट्यामधुनी उडून जाता पहा पाखरू चिवचिवते

     रात्र काळी संपली…

 

     पूर्व दिशेला विझून गेल्या नक्षत्रांच्या ज्योती

     रांगोळीपरी फुले उमलली झाडां-वेलींवरती 

     तबकासम हे गगन सजले हळद कुंकवाने

     रात्र काळी संपली…

 

     गिरणीमधुनी,  रस्त्यामधुनी चक्र गरगरा फिरे

     जागी झाली गुरे वासरे जागी झाली घरे

     क्षणाक्षणाने काळाचेही पाऊल पुढे पडते

     रात्र काळी संपली किरण किरण सांगते …

तसे हे वर्णनात्मक गीत आहे.  “घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला”  या भूपाळीची आठवण ही कविता वाचताना होते. 

.. रात्रकाळी संपलेली आहे आणि सुंदर सकाळ उगवत आहे हा या गीतामधला एक आकृतीबंध.  अतिशय सुंदर, चपखल उपमा आणि उत्प्रेक्षांनी परिपूर्ण असलेलं हे काव्य.

.. चांदण्यांचे नपुर घातलेली निशा, केशराचे वस्त्र ल्यायलेली उषा आणि उषा निशाचा पाठशिवणीचा खेळ पाहणारी वसुंधरा.. पहिल्या कडव्यातले  हे वर्णन म्हणजे शब्दरूपी कुंचल्याने रेखाटलेलं  सकाळचे वास्तविक चित्र.

दुसऱ्या कडव्यातले रविकिरणाच्या स्पर्शाने तांबूस झालेले दव, बागडणारे  मुके प्राणी आणि घरट्यातून उडून जाणारे पाखरू…हे वर्णन पृथ्वीवरची जागी होणारी पहाट अलगद उतरवते.

.. पूर्व दिशा उजळते आणि नक्षत्रांच्या ज्योती विझत आहेत, झाडांवर वेलींवर फुलांची रांगोळी सजली आहे आणि गगन कसे तर तबकासारखे आणि रविकिरणांच्या तांबूस पिवळ्या प्रकाशास हळद-कुंकवाची उपमा देऊन जणू हळद कुंकवाचे हे आकाशरुपी तबक उषेचं स्वागत करत आहे.  या तिसऱ्या कडव्यातलं हे कल्पना दृश्य कसं सजीवपणे शब्दांतून आकारले आहे. या संपूर्ण गीतात हळूहळू उलगडणारी ही सकाळ अतिशय मनभावन आहे.

शेवटच्या आणि चौथ्या कडव्यात जागं झालेलं मानवी जीवन, घरे दारे,गुरे, वासरे यांचं वाहतं वर्णन वास्तव घेऊन उतरतं. आणि शेवटच्या दोन ओळी…

..  क्षणाक्षणांनी काळाचेही पाऊल पुढती पडते

    रात्र काळी संपली किरण सांगते…

या ओळी वाचल्यानंतर या संपूर्ण वर्णनात्मक गीतातला गर्भित आत्माच उघडतो.  संपूर्ण गीताला वेगळ्याच अर्थाची कलाटणी मिळते.  मग मला हे गीत रूपकात्मक वाटले. रात्र काळी संपली हे शब्द आश्वासक  भासले. निसर्गचक्रामध्ये जे अव्याहत, नित्यनेमे घडत असते त्याचा मानवी जीवनाशी, भावविश्वाशी संदर्भ असतो. रोजच येणाऱ्या आणि जाणाऱ्या उषा आणि निशा या माणसाच्या जीवनातल्या सुखदुःखाशी रूपक साधतात.  काळ म्हणजे आलेली परिस्थिती आणि किरण म्हणजे मार्गदर्शक गुरु किंवा आशावाद.  काळाचे पाऊल पुढती पडते म्हणजेच आजची परिस्थिती उद्या नसणार आहे हे सत्य. स्थित्यंतर हे नैसर्गिकच आहे.  त्यामुळे संकटाची, दुःखाची, नैराश्याची काळी रात्र संपून केशराची वस्त्रे लेऊन सकाळ होणार आहे. ही केशरी वस्त्रे म्हणजे आनंदाची प्रतीके. नवा दिवस,नवी स्वप्ने. तमाकडून प्रकाशाकडे होणारी वाटचाल.

ज्यावेळी या अर्थाने मी हे गीतात्मक काव्य वाचले तेव्हा मला शब्दाशब्दामध्ये दडलेलं एक सकारात्मक तत्व सापडलं आणि मग हे गीत केवळ वर्णनात्मक न राहता जीवनाला खूप मोठा रचनात्मक संदेश देणारं ठरतं.  एक लक्षात आलं की या सर्वच सहासष्ट कवितांमध्ये निसर्ग आणि मानवाचं एक अतूट भावात्मक नातं शब्दांनी रंगवलेलं आहे.

खरोखरच पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा या कविता देव्हाऱ्यातली एखादी पोथी वाचताना जी प्रसन्नता आणि ऊर्जा मिळते तद्वतच या कविता वाचताना मन प्रफुल्लित होते.  वाचकांनी या काव्यवाचनाचा जरूर आनंद घ्यावा हे मी आवर्जून सांगते.

सुहास पंडितांनी त्यांच्या अर्पण पत्रिकेत म्हटलं आहे,

       रसिका तुझ्याचसाठी हे शब्द वेचले मी 

       रसिका तुझ्याचसाठी हे गीत गुंफले मी..

कवी आणि वाचकाचं नातं हे किती महत्त्वाचं असतं याची जाण त्यांच्या या शब्दातून व्यक्त होते.  या सुंदर काव्यरचनांबद्दल मी  श्री सुहास पंडित यांचे मनापासून अभिनंदन आणि वाचकांना दिलेल्या या सुंदर भेटीबद्दल धन्यवाद देऊन  त्यांच्या या सुरेल  काव्यप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते.

परिचयकर्त्या : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘एक उलट एक सुलट’ – लेखिका – सुश्री अमृता सुभाष ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘एक उलट एक सुलट’ – लेखिका – सुश्री अमृता सुभाष ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

पुस्तकाचे नाव – एक उलट एक सुलट

लेखिका – अमृता सुभाष

प्रकाशन – राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या – 178

किंमत – 225

वाचनालयात पुस्तके चाळताना माझी नजर एका पुस्तकावर गेली. त्यावर अमृता सुभाष चा फोटो होता आणि लेखिका देखिल अमृता सुभाषच.

पटकन हे पुस्तक मी निवडलं.हे पुस्तक निवडण्याचे मुळ कारण म्हणजे  अमृता सुभाषचं खूप वर्षापूर्वी ती फुलराणी नाटक पाहीले होते. तेव्हा पासून तिने माझ्या मनावर अधिराज्य केले. तिचं ते “तुला शिकवीन चांगलाच धडा “काही केल्या डोळ्यासमोरून हटत नाही.त्यामुळे हे पुस्तक वाचायची प्रबळ इच्छा झाली.

सुरवातीपासूनच हे पुस्तक खिळवून ठेवतं आणि तिच्या प्रेमात पडायला लावतं. लोकसत्ता चतुरंग पुरवणीतील लेखिकेच्या एकत्रित लेखांचाच हा लेखसंग्रह आहे.

प्रस्तावनेपासूनच लेखिकेच्या लेखनाचे अक्षरशः गारुड पडते. प्रस्तावनेमध्ये तिने तिच्या नातेवाईकांचा आणि लिखाणाचा परस्पर संबंध कसा आहे यावर भाष्य केलेले आहे.

पहिला लेख तिने तिचे “अमृता सुभाष ” हे पडद्यावरिल नाव  कसे ठरविले याबाबत उहापोह केला आहे. तिने जाणून बुजून स्वतःचं आडनाव लावले नाही कारण “जात “ही बाब तिच्यासाठी गौण आहे. त्यांच्या घराण्यात बरेच आंतरजातीय विवाह झाले असून त्या बाबतीत त्यांच्या घरात खूप पुढारलेला दृष्टीकोन आहे. गरज संपल्यावर माणसाची शेपूट गळून पडली तशी जातही गळून पडायला हवी असे तिचे ठाम मत आहे.हे मला खूप आवडले.

दुसऱ्या लेखामध्ये मन मनास उमगत नाही यावर लिहीले आहे या लेखामध्ये कोणालाही मानसोपचार तज्ञांची  मदत लागू शकते व मानसोपचार घेणे म्हणजे एखादयाला तुझ्यात काहीतरी कमी आहे असे सांगणं न्हवे तर आय केअर फॉर यू असे सांगणे आहे शहाणं आणि वेडं मधे भानासकट उतू जाणे नावाचा प्रदेश असतो. तेव्हा आपणाला सावरू शकण्याची मुभा असते तेच काम मानसोपचार करते असे लेखिकेचे मत खूप विस्तृत पणे लिहीलेले आहे.

पुढे मग तिची आई नटी असल्याने तिचे बालपण कसे होते हे ” नटी आई” व आई-वडीलांचे गुण दोष ” वारसा ” या लेखामध्ये मांडले आहेत.

तसे या लेख संग्रहातील सर्वच लेख अप्रतिम आहेत पण गिंको बिलोबा हा लेख खूप भावला. जपान नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला गेला आणि ही दोन्ही शहर पूर्ण बेचिराख झाली. सगळे काही नष्ट झालेले असतानाही त्या राखेतील फक्त सहा जीवांनी जगणे निवडलं ते होते.ती ही सहा झाडे. ती झाडे अजूनही आहेत. आजही त्या झाडांना आशेचे प्रतिक म्हणून मानतात. या झाडाची प्रेरणा घेऊन जपान्यांनी टोकियो येथे एक फार सुंदर रस्ता तयार केला आणि दोन्ही बाजूला भरघोस पिवळ्या रंगाची पाने फुले असलेली गिंको बिलोबाची झाडे वाढवण्यात आली.या रोडचे  पाहात रहावे असे अतिशय सुंदर फोटो इंटरनेटवर पहायला  मिळतात. सगळ्या मोडतोडी नंतर जिवंत रहाणाऱ्या झाडांचे  तेथील लोकानी कौतुक वाटण्यासारखे संवर्धन केले आहे.हे वाचताना नकारात्मक वातावरणात देखील सकारात्मकतेचे स्फुरण चढते.

ऋतूपर्ण  या लेखामध्ये समलिंगी व्यक्तीबददल समाजाची खूप क्लेशदायक वर्तणूक या बद्दल लिहीले आहे. कितीही निष्णात असले तरी अशा व्यक्तींना समाजातून मिळालेल्या हीन वर्तणुकीवर या कथेत लेखिकेने पोटतिडकीने लिहीले आहे ते वाचून अंगावर शहारे येतात.

वेगळा या लेखामध्ये स्पेशल चाईल्ड बद्दल लिहीले आहे ते चटका लावून जाते मनाला. अशा मुलां बद्दल आपल्याला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी  आपल्याला कुठेतरी खूप आतमध्ये हलवून सोडतात.धन्य ते माता-पिता जे अशा मुलांना वाढवतात. हा लेख हतबलता अधोरेखित करतो.

हिरवं तळं आणि गाभारा. हा लेखही अतिशय विलक्षण लेख.नैनिताल येथील एक तळं आहे.जेव्हा त्याचा रंग हिरवा होतो तेव्हा तेथे कोणालाही जाण्याची परवानगी नसते. कारण ते तळं पाहणाऱ्याना स्वत:कडे आकर्षित करतं.जसे नायगारा धबधबा प्रत्यक्ष पाहिल्यावर कित्येकांना त्यात उडी घ्यावीशी वाटते व काहींनी ती घेतली सुद्धा आहे.

निसर्गाचं सौंदर्य एखाद्याला स्वतः कडे इतकं आकर्षित करू शकतं की त्यामुळे एखाद्याचा जीव देखिल जाऊ शकतो ते का व कसं हे या लेखामध्ये विस्तृत पणे या मांडलं आहे.

त्यानंतरच्या अस्तु, एकलव्य, टोकियो स्टोरी-मुंबई स्टोरी हे  लेखही भाव भावनाचे विविध कंगोरे अधोरेखित करतात. एक वेगळे पण सच्चे विश्व जणू उलगडत जाते.

अभिनयाबरोबर लिखाणानेही दिल जित लिया अमृता तुमने😘💞 असंच म्हणाव असं पुस्तक.

आयुष्याचे विविध पैलू अगदी सहज अलवार उघडून अनेक विध भावभावनांचा सुंदर आविष्कार घडवला आहे  तिच्या लेखणीने. जियो अमृता मस्तच लेख संग्रह😍💕

या पुस्तकातील आवडलेली वाक्ये – Beautiful young people are accident of nature, but beautiful old people are works of art.

ट्रँजिक फ्लॉ म्हणजे कोणाच्याही अंगी असा एखादा गुण विशेष असतो जो स्वतःचाच घात व्हायला कारणीभूत असतो.

निवडीचा क्षण – एकदा का आयुष्याला निवडलं की पुढचं सगळं आयुष्य बदलते

अगदी पुस्तकाच्या कव्हरवरील अमृताचा फोटो ते मलपृष्ठावरील कविता सारं काही लाजवाब. अविस्मरणीय अनुभव. संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक. 

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

26-07-2023

सांगली – मो.नं 9552298887

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती – अनुवाद – प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण ☆

सौ.मनिषा विजय चव्हाण

अल्प स्वपरिचय

मी सौ.मनिषा विजय चव्हाण फार्मासिस्ट म्हणून मेडिकल मध्ये रूजू आहे. वाचनाची आवड आहे,पुस्तके वाचून अभिप्राय लिहिते. कविता लिहिते. 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अस्तित्व’ – सुश्री सुधा मूर्ती – अनुवाद – प्रा ए आर यार्दी ☆ संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण ☆

पुस्तक – अस्तित्व 

लेखिका  – सुश्री सुधा मूर्ती 

अनुवाद – प्रा ए आर यार्दी

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे 

पृष्ठसंख्या – १०४   पाने

पुस्तकाचे मूल्य – ११0  रुपये

संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण

मुकेश उर्फ मुन्ना याच्या जिवनपटावर आधारीत कादंबरी ‘अस्तित्व’.स्वतःचे अस्तित्व किती महत्वाचे आहे.अस्तित्व असणे ,ते जपणे म्हणजे जणू लढाईच.स्वतःचे अस्तित्व हरविलेल्या माणसाची अवस्था अतिशय दयनीय होते .

हिच गोष्ट आपणास ‘अस्तित्व’ कादंबरी वाचल्यावर कळते.

मुन्नाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो.

मग माझी आई कोण?तिने मला का टाकले? तिच्यावर अशी कोणती वेळ आली कि तिने मला दुस-याच्या स्वाधीन केले? हे शोधण्यासाठीचा त्याचा प्रवास,त्याने केलेला संपत्तीचा त्याग.आईवडिलांवरील त्याची श्रद्धा,प्रेम,त्याच्या स्वभावातील खरेपणा.सत्य स्विकारण्याची त्याची मानसिकता.सर्व काही ह्रदयाला भिडते.

स्त्रीचे  परमपावन स्वरूप म्हणजे ‘आई’.

त्या आईची तीन रूपे यात अनुभवायला मिळतात.

जन्म देणारी आई, दूध पाजणारी आई.

पाळणारी, घडवणारी,संस्कारक्षम पूर्ण माणूस बनवणारी आई.

महान अश्या थोर मनाच्या माता यात दिसतात.दोघीही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत.दिला शब्द पाळताना,वचन निभावताना,सगळ्या गोष्टींसाठी झगडताना

करावा लागलेला त्याग, मनाचा मोठेपणा, विश्वास दिसून येतो.

आणखी एक म्हणजे जन्म कोणत्याही कुळात,गोत्रात ,देशात होऊ देत.माणूस घडतो तो फक्त आणि फक्त त्याच्यावर केल्या गेलेल्या योग्य संस्कारांमुळे हे या कादंबरी मध्ये प्रकर्षाने जाणवते.

रावसाहेबांच्या रूपात एक सच्चा दिलदार माणूस,खरेपणा जपणारा प्रेमळ बाप दिसतो.रक्ताचा नसताना,पोटी जन्म न झालेला, ज्याला आपला मानला तो आपलाच.तसेच अतिशय व्यवहारकुशल माणूस.

आपण म्हणतो भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका पण इथे भावनेला प्राधान्य देऊनच रावसाहेबांनी संपत्तीचे वाटे केले.ही संपत्ती माझी नसून मी याचा मालक नाही.ही सारी संपत्ती मुन्नाची आहे,तोच या सा-या संपत्तीचा एकमेव मालक आहे.ही त्यांची भावना,हा विचार उद्दात्त आहे.सत्यप्रिय,निष्ठावान,असेच त्यांचे व्यक्तित्व आहे.

संपत्तीचा मोहन बाळगता ती स्वतःहून दुस-याच्या स्वाधीन करणारा त्यांचा मुलगा मुकेश उर्फ मुन्ना पाळलेला नसून त्यांचा सख्खा मुलगाच शोभतो ना?

यापेक्षा नात्यातील गोडवा अजून काय असू शकतो?

आजच्या काळात अश्या संस्कारांची अतिशय गरज आहे अतिशय सोप्या भाषेत मांडणी…

वाचताना भावनाविवश व्हायला होते….

खूपच सुंदर आणि वाचनिय…

खरचं सगळ्यांनी वाचायला हवेच….

संवादिनी – सौ. मनिषा विजय चव्हाण

सांगली, मो. नंबर….9767090659

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आनंदाच्या गावा जावे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

डॉ मीना श्रीवास्तव

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदाच्या गावा जावे’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆

पुस्तक – ‘आनंदाच्या गावा जावे’

लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव

प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या – १६३  पाने

पुस्तकाचे मूल्य – १६१ रुपये

पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे

विश्वास सरांच्या विविधरंगी लेखणीतून साकारलेले त्यांचे जुलै २०२२ मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक वाचले. त्यांच्या लेखणीला असे विविधरंग प्राप्त होण्याचे कारण, त्यांचे विविध विषयांवरील अफाट वाचन, गहन चिंतन आणि अनवरत मनन असावे, असा मला विश्वास आहे! बरे, नुसते वाचन करतील ते विश्वास सर कसले? कारण त्यांची जबरदस्त निरीक्षणशक्ती, जी, हे जेथे जातात तेथे यांच्या सांगाती असतेच असते. मी हे ‘निरीक्षण’ यासाठी नोंदवीत आहे, की या बहुल-विषय सामग्रीने सुसज्जित पुस्तकात असलेले विषय! पुस्तकातील समग्र ३९ लेख वाचले, अन पुस्तक वाचल्यावर मी माझ्या अल्पमतीने त्यांना कांही श्रेणींमध्ये विभागले अन ते-ते विषय परत चाळले. ते लेख असे (कंसात लेखांची संख्या दिली आहे): प्रेरणादायी व्यक्तिचित्रे (११), शिक्षण आणि तत्वज्ञान (११), भक्तिरसपूर्ण लेख (५), समाजबोध (४), संगीत (३), आरोग्य (२), कविता (२) आणि साहित्यिक विनोद (१). अर्थात या श्रेणी ढोबळ मानानेच विभागल्या आहेत. या माहितीचा हेतू इतकाच की, लेखकाने या पुस्तकात हाताळलेले बहुरंगी आणि बहुढंगी विषय आपल्यापर्यंत पोचावेत.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

यावरून हे लक्षात येते की प्रत्येक जाणत्या अन नेणत्या, तसेच प्रत्येक वयोगटातील वाचकासाठी या पुस्तकात कांही ना कांही आहे, इतकंच काय, ज्यांना विविध विषयांवर ललित साहित्य वाचायची आवड आहे, त्या वाचकांसाठी तर ही अत्यंत पौष्टिक तसेच रुचकर साहित्यिक मेजवानीच समजावी. अर्थात आभासी मेजवानीचे महत्व आपण जाणतोच, विचारांना खाद्य (food for thought) पुरवायचे असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही असेच मी म्हणेन. आता यातील सर्वाधिक लेख असलेले विषय बघू या. लेखकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहेच, याचा अनुभव त्यांनी आजवर लिहिलेल्या पुस्तकांतून, लेखमालांमधून, रेडिओवरील आणि प्रत्यक्ष भाषणांतून आपल्याला येतच असतो. त्याच अनुभवाचे संपन्न रूप या ११ लेखातून प्रकर्षाने जाणवते. मोजकी उदाहरणे द्यायची तर यांत आदर्श व प्रसिद्ध व्यक्ती (अंधत्वावर मात करून कर्तृत्वाने आकाशदीप झालले राहुल देशमुख, बहुआयामी शिक्षणाच्या धनी डॉक्टर शारदा बापट, आपल्या हृदयसिंहासनावर सदैव अधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी) आहेतच. परंतू आधी अप्रसिद्ध असून देखील लेखकाच्या सानिध्याने आणि या पुस्तकाच्या पानांवर आता अधिष्ठित होऊन प्रसिद्ध झालेल्या व्यक्ती अधिक आहेत. त्यांच्या हरहुन्नरी आणि विशेष कर्तृत्वाची दखल घेऊन लेखकाने त्यांचा यथोचित सन्मान केलाय, याबद्दल मी सरांचे आणि त्या व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन करते. यात लेखकाची चोखंदळ अभिरुची दिसते. कारण या व्यक्ती विविध क्षेत्रातील आहेत. उदाहरण द्यायचे तर आधुनिक रामदास, हे सामान्य असूनही असामान्य सामाजिक कार्य करणारे! आणि माळे गुरुजी. अशाच इतरही व्यक्तींचा मनोज्ञ वेध लेखकाने घेतलाय! सजीव व्यक्तिचित्रण तर सरांचे बलस्थान. म्हणूनच त्या सर्वांना जणू भेटण्याचे समाधानच लाभावे इतक्या त्या सरांनी आपल्या सहज सुंदर ओघवत्या लेखनातून जिवंत केल्या आहेत. या पुस्तकाचे मला तरी हेच सर्वोच्य आनंदाचे निधान वाटले.

आता अन्य श्रेणीकडे वळू या. शैक्षणिक विषय आणि तत्वज्ञान हे तर सरांचे त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक अनुभवाचे लाडके विषय! यामुळे ते लिहितांना लेखकाला अन वाचतांना वाचकांना आनंदाचे डोही आनंदतरंग असा अनुभव आला नाही तरच नवल! अशिक्षित कोण (उदा.बहिणाबाई), उन्नयन विचारांचे अन भावनांचे, कौशल्यासुत (हा राम नाही, पण कौशल्य नसेल तर कधी-कधी जीवनात राम नाही हा सरांचा एकदम अनवट विचार!) कोण कुणाजवळून शिकले ही मला अत्यंत भावलेली भावस्पर्शी गोष्ट, (पाश्चात्त्य असूनही आपल्या हृदयाचा संपूर्णपणे ठाव घेणारी) एका शिक्षिकेची अन तिच्या टेडी या विद्यार्थ्याच्या हृदयंगम नात्याची. मंडळी, आपण शिक्षक असा किंवा विद्यार्थी, या संपूर्ण कथेचे वाचन हा दैवी अनुभव हे आणखी एका अश्रूभरल्या आनंदाचे पान!

मंडळी, आता ज्या प्रकरणाचा उल्लेख करते ते शेवटचे आणि अतिशय वाचनीय, कारण संपूर्ण पुस्तकातील सर्वात अधिक पानांचे म्हणून नव्हे, तर ध्येयनिश्चितीच्या मार्गावरील पायऱ्या, खाचाखळगे आणि मळलेल्या वाट सोडून देखील मार्गक्रमण कसे करता येईल याचे विस्तृत, सुनियोजित, परखड आणि अनुभवपूर्ण, तरीही पायरी-पायरीने वृद्धिंगत होणारे रोमांचकारी विवेचन. कारण प्रत्येक पायरीच्या पुढे काय विचार असेल याची उत्सुकता! हे शीर्षक वाचून हे समस्त प्रकार विद्यार्थ्यांकरिता राखीव असावेत असे मला (उगीच) वाटले, मात्र, मित्रांनो मला यात मला पहिला धडा हाच मिळाला की बाह्यरंगावर (शीर्षक) जाऊ नका, अंतरंगात जाऊन बघाल तर या परीस आनंदाचे क्षण नोहे! विश्वास सर, या शेवटच्या भागात आपण आनंदाचेच नव्हे तर आपल्या लेखनकौशल्याचे देखील शिखर गाठलेत बरं का!

आता इतर भागांविषयी लिहिणे म्हणजे डुप्लिकेट पुस्तक छापल्यासारखे होणार. शिवाय आपल्याला पुस्तक वाचायला प्रवृत्त करणे हा माझा प्रमुख उद्देश आहे.

सरांची लालित्यपूर्ण भाषा म्हणजे त्यांच्यासारखीच साधी, सुलभ आणि सर्वांना आपलीशी वाटणारी. क्लिष्ट शब्दांचे आणि अवजड कल्पनांचे जाळे नसल्याने या सुगम आणि नितांतसुंदर साहित्याचा आस्वाद प्रत्येक जण घेऊ शकेल. अभिजात लेखन वजनदार असलेच पाहिजे असे नाही. शिक्षकी बाणा जपत त्यांनी हे ललित लेखन असे केले आहे की मागील बाकावर बसलेल्या मस्तीखोर किंवा ढ विद्यार्थ्याला देखील याचे आकलन होईल. किंबहुना हाडाच्या शिक्षकाचे टार्गेट बहुदा हेच विद्यार्थी असतात. साहित्याच्या बाबतीत मी पण बॅकबेंचर होते. म्हणूनच या पुस्तकाबद्दल मला विशेष प्रेम निर्माण झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, आपण कोठेही बसा मित्रांनो, मल्टिप्लेक्समधील मेगास्क्रीनप्रमाणे हे सर्व लेख तुमच्या डोळ्यांचे अन हृदयाचे पारणे फेडणार यात मला कुठलीच शंका नाही.

या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी माझे मत मांडते. यात आनंदाच्या वाटाच वाटा आढळतील. कुठलेही पान उघडा, ३-४ पानांत आनंदाचे दार उघडलेलं दिसणार. आपण फक्त चालायचे काम करा (चालण्यावर देखील एक धडा हाय! चालतंय की म्हणून, न चालणाऱ्यांसाठी खास आहेर!) आणि सरांच्या ऋजू व्यक्तिमत्वासमान मृदू, मुलायम भाषेत सूचना आहेत. (त्यांचा आवाज ऐकायला मिळाला असता तर तलत सारख्या असे म्हटले असते) योग, व्यायाम, सामाजिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि बरंच कांही!

आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, तसेच या पुस्तकातील व्यक्तिरेखांनी त्यांच्या प्रेरणादायक आयुष्यात आनंद शोधलाय. काहींच्या जीवनात अपार दारिद्र्य, हाल, कष्ट, मेहनत, या सर्वांत देखील आनंद असतो हे या पुस्तकाच्या वाचनातून कळले. मला तर हे पुस्तक वाचतांना असे वाटले की आपण एका अत्यंत रमणीय अशा उपवनात विहार करतोय! त्यात दिसलेत काटेरी विविधरंगी गुलाब, जाई-जुई या जुळ्या बहिणी, रंगीबेरंगी शेवंती, नाजूक पारिजातक, धुंद गंध असलेला सोनचाफा, कमलिनी आणि कुमुदिनी वगैरे वगैरे, एक विसरले: बकुळीची नाजूक फुले देखील दृष्टीस पडली की! यांच्या मनमोहक रंगांचा अन मनोवेधक गंधांचा किती अन कसा आस्वाद घ्यावा हा प्रश्नच होता. पण एकदा उपवनाची मालकी मिळाली की, कधीही अन कितीही वेळा हे अवर्णनीय सुख अनुभवता येईल याचा आनंद आहे. अन शेवटी जाता जाता आठवले ते निराळेच, या उपवनाची हिरवीजर्द वाट चाळीगावावरून सुरु झाली, दूर-दूर गेली आणि परत मुक्काम पोस्ट, आनंदाचे गाव, म्हणजे चाळीसगावातच येऊन थांबली की!

विश्वकर्मा पब्लिकेशन्सनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक विकत घ्या, वाचा आणि दुसऱ्यांना भेट द्या, हेच आजच्या दिनाचं आनंदवनभुवन समजा!

धन्यवाद!

पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गुजगोष्टी शतशब्दांच्या… सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ गुजगोष्टी शतशब्दांच्या… सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

पुस्तक – गुजगोष्टी शतशब्दांच्या

लेखिका – वीणा रारावीकर

प्रकाशक – सृजनसंवाद प्रकाशन

पृष्ठ संख्या – ११५

 किंमत – २२५ /-

वीणा रारावीकर या पदार्थविज्ञान,संगणक तंत्रज्ञान व्यवस्थापन या विषयातील उच्चशिक्षित पदवीधर आहेत.लोकप्रिय  ललित लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.अनेक प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित आहेत.त्यांचा नावीन्यपूर्ण ” गुजगोष्टी शतशब्दांच्या “  हा लघुकथा संग्रह नुकताच वाचण्यात आला. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे शंभर शब्दांच्या शंभर लघुकथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुस्तकाच्या नावात गंमत आहे. आपण जवळच्या माणसांशी हितगुज करत असतो. आपल्या खोल मनाच्या कप्प्यात दडलेलं त्यांना  सांगून मन मोकळं होतो. आपल्यात एक विश्वासाचे नाते तयार होते. मला वाटते त्याच अधिकाराने लेखिकेने या लघुकथातून वाचकांशी संवाद साधला आहे. एखादी गोष्ट पाल्हाळ लावून सांगणे एक वेळ सोपे, पण नेमक्या शब्दात मांडणं अवघड आहे. ते अवघड  काम लेखिकेने या पुस्तकात नेमके साधले आहे.

सुश्री वीणा रारावीकर

वाचनाची आवड तर आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ काढणे मोठी गोष्ट झाली आहे. अशा वेळी खूप मोठी गोष्ट वाचत बसायला वेळ नसतो. तसेही आजच्या नव्या पिढीला सगळं कसं झटपट हवं असतं. त्यांची ही वाचण्याची भूक भागवण्याचा प्रयत्न लेखिका वीणा रारावीकर यांनी ” गुजगोष्टी शतशब्दांच्या ” या लघुकथा संग्रहातून केली आहे. शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी ही आपल्याला सोपी गोष्ट वाटू शकते..पण प्रत्यक्षात ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कथेचे मूल्य हरवू न देता आशय संपन्न कथा मर्यादित शब्दात लिहिणे म्हणजे कसोटीचे काम आहे. हे लघुकथा लेखनाचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. लघुकथा लिहिण्याचा एक प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.

लघुकथेतील  शंभर शब्दांच्या शंभर गोष्टी– यातली प्रत्येक गोष्ट नेटकी झाली आहे. कथेची मांडणी उत्तम आहे. नेमक्या शब्दात कथा मांडायची असल्याने शब्दांचा फाफटपसारा कुठे दिसत नाही. प्रत्येक शब्द विचार करून लिहिला आहे. तरीही कोणतीही कथा ओढूनताणून झाली आहे असे वाटत नाही. कथा प्रवाही आहेत. पटपट वाचून होतात.

लघुकथेतील विषय रोजच्या दैनंदिन जीवनातील असल्याने वाचकाला प्रसंग आपले वाटतात. वाचक कथेचा विषय आपल्या अनुभवाशी जोडून बघतो. कोणत्याच विषयाचे लेखिकेला वावडे नाही. आई, सासू, सून, नणंद भावजय, मुलगी, फिटनेस, ऑनलाईन शिक्षण,अपंगत्व, माणुसकी, वयोवृद्ध लोकांच्या समस्या,पदर,यासारख्या अनेक विषयांवर गोष्टी लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आहे. 

लघुकथेची मांडणी प्रसंगाला धरून आहेत. लघुकथेचे काही विषय हलकेफुलके आहेत तर काही विषय विचार करायला भाग पाडणारे आहेत, तर काही विषय नवी शिकवण देणारे आहेत. तर काही विषय  प्रबोधन करणारे आहेत. लघुकथेतून समाजाचे, व्यक्तीच्या स्वभावाचे, मनोवृत्तीचे निरिक्षण नेमक्या शब्दात लेखिकेने शब्दबद्ध केले आहे.

समाजात पावलोपावली पैश्याचे महत्व वाढताना दिसत आहे. आज पैश्यापुढे नात्यांची किंमत शून्य होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज नाती सोयीनुसार आठवतात, हे ‘ निर्मळ नाती ‘ या कथेतून स्पष्ट झाले आहे. गरज निर्माण झाली की विसरलेली नाती  आठवतात. मनात तर असते पण आपण  काही कारणाने दुरावतो. पण एखादा प्रसंग असा येतो  जेव्हा आपल्याला  कुणाच्या तरी आधाराची गरज निर्माण होते . जिथे नाती निर्मळ असतात  तिथे कसलीच अडचण येत नाही.

आईचं प्रेम शाश्वत असतं. ते कोणत्याही कारणानं कमी किंवा जास्त होत नाही. आईचं प्रेम व्यक्त करण्यापलीकडेचे असते. सूनेने बोलणे तोडले, संबंध तोडले तरी आईच्या प्रेमावर याचा परिणाम होत नाही. आपलं मुल संकटात आहे म्हटल्यावर आई आपलं सर्वस्व पणाला लावते, हे “अहो आई” या लघुकथेतून अधोरेखित होते. आताच्या नव्या पिढीचे विचार,आचार, जीवनशैली वेगळी आहे.तरी त्यांच्यात प्रामाणिकपणा जिवंत आहे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नव्या पिढीत आहे, हेच लेखिकेने ‘ पत्रास कारण की’ आणि ‘ पत्रास उत्तर की ‘ या लघुकथेतून मांडले आहे.

गरिबीनी गांजलेल्या मुलांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे भरणारी श्यामल ” फुगे घ्या फुगे ” 

या लघुकथेतून दिसते. पदर, निर्णय, हळदी कुंकू अशा अनेक गोष्टी मनात घर करून राहतात.

जीवनात अनेक समस्यांना समोरे जावे लागते. हेच खरं जगणं आहे. गुजगोष्टीतील लघुकथा हेच सांगतात. गोष्टी खूप मोठ्या नाहीत, प्रसंग साधेच आहेत. पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा हवा. म्हणजे जगणं वेगळं, सोपं आणि सुंदर होते. प्रत्येकांने * गुजगोष्टी शतशब्दांच्या* हे पुस्तक जरूर वाचावे. या गोष्टीचा आनंद घ्यावा. जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलावा.

लेखिकेला पुढील लिखाणासाठी, साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares