☆ बाल साहित्य – “कुछ समझे बच्चमजी ?” – लेखिका : सुश्री वर्षा चौगुले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक कुछ समझे बच्चमजी ?
लेखिका वर्षा चौगुले
प्रकाशक अक्षरदीप प्रकाशन
पृष्ठे 72
मूल्य 70/
वर्षा चौगुले यांचं ‘ कुछ समझे बच्चमजी ‘ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पुस्तकाच्या नावावरूनच लक्षात येईल की हे पुस्तक बालगोपालांसाठी आहे. वर्षा चौगुले यांनी विपुल बाल साहित्य लिहिले आहे. तसेच बाल साहित्य चळवळीतही त्या सक्रिय असतात.त्यामुळे मुलामुलींशी संवाद साधणे त्यांना छान जमते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक !
जिज्ञासा हे बालमनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना सतत कसले ना कसले प्रश्न पडलेले असतात. हे असंच का, ते तसंच का, असे प्रश्न त्यांची पाठ सोडत नाहीत. शिवाय आपण लहान असलो तरी आपण ‘तितके काही’ लहान नाही असा एक समज असतो. त्यामुळे ती सारखी स्वतःची तुलना मोठ्यांबरोबर करत असतात. त्यामुळे त्यांना काही सांगायला जावं तर पटेलच याची खात्री नसते. शिवाय त्यांच्या वयाचे असे काही खास प्रश्न किंवा समस्या असतात. काही सांगायला जावं तर फारच उपदेश करताहेत असं वाटतं. काही सांगू नये म्हटलं तर त्यांच्या चुका कशा सुधारणार ? त्यांना चांगल्या सवयी कशा लावणार ? त्यामुळे बालक आणि पालक या दोघांमध्ये सुसंवाद कसा साधायचा हा एक प्रश्नच असतो. पण या प्रश्नाचं उत्तर हे पुस्तक वाचल्यावर मिळतं. मुलांना समजून घेऊन, त्यांच्याच भाषेत, कधी गोड बोलून, कधी एखादी गोष्ट सांगून, तर कधी एखादे उदाहरण देऊन त्यांना समजावून सांगितले तर ते त्यांनाही पटते. मग त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर होतात. हे सगळं पटवून देणारं हे पुस्तक !
मुलांना अभ्यासाचा कंटाळा तर येतोच. पण अन्य काही वाचा म्हटलं तर तेही नको असतं. खाण्याच्या बाबतीत आवडीनिवडी असतात. स्वच्छता, टापटीप, शिस्त हे सगळे नावडते विषय. शिवाय मोठ्यांच्या गरजा, फॅशन्स यावरही त्यांचं लक्ष असतं. पाठांतर टाळणे, टीव्ही बघणे ,चांगलं वाईट यातला फरक न कळणे, यासारखेही प्रश्न असतातच. ते सोडवायचे असतील तर त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, संवाद साधला पाहिजे. तो कसा साधावा ते हे पुस्तक वाचल्यानंतर पालकांना समजू शकेल. तसेच मुलांच्या मनातील गैरसमज हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच दूर होतील. अशाप्रकारे पालक व पाल्य असे दोघांनाही उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
मुलांना समजावून सांगत असतानाच नकळतपणे संस्कार होत असतात. संस्कारक्षम वयातील ‘बच्चमजी’ सहज समजू शकतील असे हे पुस्तक त्यांनी अवश्य वाचावे असे आहे. हातात छडी न घेता वर्षा चौगुले यांनी शिक्षिकेची भूमिका उत्तमपणे पार पाडली आहे.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आद्य शंकराचार्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे .दक्षिणेतील कालाटी या ठिकाणी शंकराचार्यांचा जन्म झाला. पूर्णा नदीच्या काठी असणारे हे छोटेसे गाव होते. काहींच्या मते तो काळ इसवीसन पूर्व आहे तर काहींच्या मते तो इसवी सन 812 आहे. ‘ परंतु जन्मतिथी बद्दल वाद घालण्यापेक्षा शंकराचार्यांनी सनातन वैदिक धर्मातील केलेले कार्य महत्त्वाचे आहे.’ असे लेखिका म्हणते. सनातन हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी शंकराचार्यांनी अफाट श्रम घेतले. या कादंबरीत त्यांनी केलेला प्रवास, आचार्यांची स्तोत्र, त्यांचे मराठी अर्थ उद्धृत केलेले आहेत.
प्रासादिक संतवाड्मयीन चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिण्यात लीला गोळे या अग्रस्थानी आहेत. त्यांचे लिखाण प्रवाही आहे आणि त्यांनी शंकराचार्य यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य स्थान देऊ केलेले आहे.
शंकराचार्य यांचा जीवन प्रवाह उलगडताना कालाटीच्या निसर्गाचे वर्णन मनोहारी आहे. त्यांचे वडील बालपणीच गेले. पण त्यांच्या आईने त्यांना खंबीरपणे पण प्रेमाने वाढवले. त्यांची आईवर खूप निष्ठा होती. शंकराचार्यांची कुशाग्र बुध्दी लहान वयातच दिसून आली. त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी घराबाहेर पडायचे होते,
पण आईचा त्यांना विरोध होता. या सर्व गोष्टी चांगल्या रंगवल्या आहेत. एक दिवस लहानग्या शंकरने मनाशी निश्चय केला की काहीतरी करून आपण इथून बाहेर पडायचे.
एकदा ते नेहमीप्रमाणे पूर्णा नदीवर आंघोळीला गेले होते. त्या नदीत काही मगरीही होत्या. त्यांनी मगरीने पाय पकडला अशी ओरड केली. सगळे घाबरून त्यांच्या आईला घेऊन नदीवर आले. तेव्हा ‘ तू जर मला ज्ञानार्जनासाठी बाहेर पडू दिलेस तरच ही मगर माझा पाय सोडेल ‘,असे सांगितले. आईने आपल्या मुलाला मगरीने सोडावे म्हणून ‘ तुला मी जाऊ देईन ‘असे मान्य केले.आणि मगच शंकर पाण्याबाहेर आले. आईचा आशीर्वाद घेऊन ज्ञानाच्या शोधार्थ शंकर घराबाहेर पडतो आणि मोठ्या युक्तीने ‘ तू मला संन्यास घेण्याची परवानगी दे ‘ ही गोष्ट आईला सांगतो.
पुढे धर्मयात्रेच्या निमित्ताने त्यांनी देशभरात प्रवास करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांचा एक मित्र त्यांच्या बरोबर होता, पण शंकरने त्याला तू माझ्याबरोबर नको येऊस, माझा मार्ग खडतर आहे, असे सांगून दूर केले. ते ओंकारेश्वरापर्यत गेले. तिथे त्यांना एक साधू भेटले. त्यांनी त्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.
या सर्व प्रवासात शंकराचार्य भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करत होते.
त्या काळात आपला वैदिक धर्म रूढीवादी कर्मकांड व नास्तिकवादी जडवादाच्या गर्तेत सापडला होता.
बौद्ध धर्माचा निष्क्रिय वाद सगळीकडे बोकाळला होता. कर्म करण्यापेक्षा निष्क्रियतेने कफनी घालून फिरणे, स्त्रियांना ही धर्मासाठी भिक्षुणि करणे आणि त्यातूनच काही वाईट गोष्टी घडत होत्या हे त्यांनी पाहिले. त्यामुळे शंकराचार्यांनी पहिली गोष्ट काय केली तर हिंदू धर्माचा प्रसार अधिक प्रमाणावर सुरू केला. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार लोकांनी करू नये यासाठी प्रयत्न केला. वेगवेगळ्या क्षेत्री जाऊन तेथील
धर्माविषयी वादविवाद आणि चर्चा सुरू केल्या. धर्म जागृतीचे महत्वाचे काम शंकराचार्यांनी सुरू केले.हिंदू धर्माचे मूलभूत तत्वज्ञान सांगण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशभ्रमण करत असताना त्यांचा जुना मित्र ही त्यांना येऊन मिळाला. देशात ही जागृती करण्यासाठी देशाच्या चारही बाजूंना हिंदू शक्तिपीठे स्थापण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि चारही दिशांना चार शक्तीपीठ स्थापन केली…. द्वारका, जगन्नाथ पुरी, कालाडी, काश्मीर, आणि काशी…. हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण देशात जागृती निर्माण केली. या प्रत्येक ठिकाणी मठपती नेमले. ह्या मठपतीनी कसे वागावे ह्याबाबत आचार संहिता तयार केली. या मठपतींच्या हाताखाली काही स्थानिक लोकांची नेमणूक केली, ज्यायोगे तेथील काम अधिक चांगले होईल. त्यामुळे हिंदू धर्माचा लौकिक दूरवर पसरण्यास मदत झाली…… लेखिकेने हा सर्व तपशील या कादंबरीत खूप छान प्रकारे आणि ओघवत्या भाषेत सांगितला आहे.
शंकराचार्यांचे आईवर अपरंपार प्रेम होते. त्यांनी तिला शब्द दिला होता की तुझ्या अंत्यक्षणी मी नक्की परत येईन. त्याप्रमाणे ते परत आले होते . त्यांची लहानपणापासूनची शेजारी आणि भक्त असलेली गौरम्मा हिने शेवटपर्यंत आईची सेवा केली. आणि संन्यस्त बनून तेथे राहिली.
शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी केलेले कार्य अफाट आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे, श्लोक लिहिले. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा समन्वय साधला. भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय शंकराचार्यांकडे जाते.
आपले जीवित कार्य संपल्यावर हे कैवल्याचे लेणे कैवल्याशी एकरूप झाले !
या कादंबरीची भाषा फार ओघवती, प्रासादिक आहे.. कादंबरी खूप छान आणि नवीन माहिती देणारी आहे.
मला कादंबरी वाचनीय वाटली … सर्वांनी अवश्य वाचावी अशी !
परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ काव्य संग्रह “समईच्या वाती” – कवी : सुभाष कवडे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काव्यसंग्रह : समईच्या वाती
कवी : श्री.सुभाष कवडे
प्रकाशक : शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे : 72
मूल्य : 80/_
सांगली जिल्ह्य़ातील भिलवडी येथील ज्येष्ठ साहित्यिक श्री.सुभाष कवडे यांचा ‘ समईच्या वाती ‘ हा पाचवा काव्यसंग्रह. काव्यसंग्रह संपूर्ण वाचल्यानंतर समजते की या संग्रहाचे नाव किती सार्थ आहे ! समईच्या मंदपणे तेवणा-या वातीत प्रखर दिव्याचं सामर्थ्य नसत.पण या वातींत संस्कारांशी नातं जोडून शांतपणे तेवत राहण्याचं सात्विक तेज आहे.या संग्रहातील कविता म्हणजे काव्यरुपी समईची एक एक वातच आहे.प्रत्येक पानावरील एक कविता म्हणजे मनाचा एक एक कोपरा उजळून टाकणारी वातच आहे . ते ही अगदी सहजपणे.दाहकता नाही पण तेज आहे.भडकत नाही पण विचारांचा वन्ही चेतवते.सात्विक ,संयमी आणि समर्पक शब्दांमुळे तिचे सामर्थ्य अधिकच वाढलेले दिसते.कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सौम्य शब्दात पण अचूकपणे केलेली कानउघाडणी श्री.कवडे यांच्यातील जातिवंत शिक्षकाचे दर्शन घडवते.
या संग्रहातील कवितांमध्ये विषयांची विविधता आहे.इथे निसर्गाच्या निरनिराळ्या रुपांच दर्शन होते.ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या संस्कृती पहायला मिळतात.इथे उपदेश आहे पण बोचरी टीका नाही.इथे कानउघाडणी आहे पण कुत्सित निंदा नाही.इथे मातीशी इमान आहे आणि बेईमानीला थारा नाही.इथे सात्विकतेला मुजरा आहे पण दांभिकतेवर प्रहारही आहे.शब्दांचे अवडंबर नाही पण ह्रदयाला घातलेली साद आहे.सु विचारांची पेरणी करत संस्कारांचे मळे फुलवणारी श्री.कवडे यांची कविता मनाला सात्विक आनंद देऊन जाते,जी सात्विकता फक्त समईच्या वातीतच असू शकते.समईची जागा देवघरात असते.या संग्रहातील कविता प्रत्येक रसिकाच्या मनाच्या घरात वास करून राहील याबद्दल शंकाच नाही.आधुनिकतेच्या नावाखाली छानछोकीने नटलेल्या गर्दीत,एखाद्या स्त्रीने पारंपारिक वेषात प्रवेश करावा तशी श्री.सुभाष कवडे यांची कविता अवतरते.समईला साजेल अशा अभंगस्वरुप रचना मनाच्या गाभा-यात विचारांचा घंटानाद केल्याशिवाय रहात नाहीत.म्हणूनच …..
“आरती शब्दांची
वाटे आनंदाची
मजला सुखाची
नित्य नवी “
असं ते म्हणतात ते योग्यच वाटते..
मनातील भाव व्यक्त करताना सर्वप्रथम त्यांना आठवण होते ती माणसांची.ते म्हणतात
” माझीया मनात
माणूस उरात
आवाज कानात
माणसांचा “
हाच माणूस जेव्हा चुकीच्या मार्गाने जाताना दिसतो तेव्हा ते हळहळतात आणि लिहून जातात
” दिवस धनाचे
नाहीत घामाचे
जगणे फुकाचे
हवे हवे
गुणांचा पाचोळा
बघवेना डोळा
आपसात खेळा
खेळ नवे “
अशा दिखाऊ जगात म्हणून तर ….
” माणूस वाचावा
अंतरी जाणावा
शब्द पारखावा
येता जाता”
असा इशाराही ते देतात.
” कसे दिस आले
गाभारे सजले
विठूचेही शेले
पळविले ”
हे खरे असले तरी आपण मात्र
” दीप असे व्हावे
जग उजळावे
उरी मिरवावे
माणसांनी “
जगण्याचे सार हरवत चाललेले असताना निसर्गानेही साथ देऊ नये यासारखे संकट अन्य कोणते असणार ? दुष्काळाची तीव्रता,पाण्याचा अभाव,त्यामुळे सोन्यासारख्या मातीतून अंकूर फुटू शकत नाही .हे दुःख कुणाला सांगावे.?
” मातीवरी पाय
करपली साय
सांगू कुणा काय
बोलवेना “
अशा अवस्थेत
” मेघांचा सोहळा
मातीचा उमाळा
तुझा कळवळा
प्रकटावा “
एवढीच कविची प्रार्थना आहे.ती ऐकून कधी मेघ बरसतो आणि मग करप्या मातीलाही साज चढू लागतो.
“जग आता सारे
आनंदाचे वारे
श्रीरंग भरे
अंतरात “
अशा या माणसाच्या सुखदुःखाशी समरस होणा-या कविता.माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते उलगडून दाखवणा-या.संकटातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करणा-या.निसर्गाची रुपे रंगवणा-या.आणि शब्द हेच कविचे खरे धन आहे हे सांगणा-या.
“शब्द माझे धन
दिधला सन्मान
आनंद निधान
जीवनात ”
…. असे कवी निःसंदिग्ध पणे म्हणत आहे.
प्राचार्य डाॅ.सयाजीराव मोकाशी यांची लाभलेली प्रस्तावना ही सुद्धा अत्यंत वाचनीय आहे.या निमित्ताने त्यांनी मराठी कवितेचा परामर्ष घेत घेत अत्यंत काव्यात्म शब्दांत संग्रहातील कवितांची बलस्थाने दाखवली आहेत.’ कल्पकतेने काव्याची कोवळीक कलापूर्ण बनली की कवितारुपी केवड्याचे कणीस कौतुकास पात्र ठरते.’ यासारख्या काव्यात्मक वाक्यातून दिसणारे शब्दलालीत्य अनुभवल्यावर ‘प्रस्तावना’ विषयीच्या कल्पनाच बदलून जातात.अशा प्रस्तावनेमुळे काव्यसमईच्या वाती अधिकच लखलखीत झाल्या आहेत.अंतरंगाप्रमाणेच श्री.अविनाश कुंभार यांनी सौम्य रंगसंगतीतील रेखाटलेले मुखपृष्ठ मन शांत करणारे आहे.
या वातींच्या प्रकाशात श्री.सुभाष कवडे यांचा लेखनप्रवास अखंडपणे चालू राहो , ही सदिच्छा !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मोहिनी हेडाऊ यांनी लिहिलेलं ‘मनातलं’ हे पुस्तक नुकतंच वाचलं! नुसते वाचून बाजूला सारण्यासारखे हे पुस्तक नाही हे पहिला लेख वाचल्यावरच लक्षात आले. मोहिनीयांचा जनसंपर्क खूप अफाट आणि अनुभवाचा आवाक्या त्याहून अवाढव्य. हे या पुस्तकातील विविधरंगी, विविधविषयी लेख वाचल्यावर लगेच कळते. इतके लेख लिहूनही या चिरंतन शाश्वत विश्वाची, अनोख्या अंतराळाची, असंख्य पुस्तकांची अन अमोप आत्मचिंतनाची त्यांची तृष्णा वाढता वाढता वाढे असे वाटते. पुस्तकातील लेखांची संख्या ६५! एखादा कॅलिडोस्कोप (बहुरूपदर्शक) फिरवतांना उमटणारे बहुरंगी भूमितीय आकार बघून जसे डोळे दिपतात आणि निवतात तसे हे पुस्तक वाचल्यावर झाले. डिझाइनर साडीसारखे एक डिझाईन एकदाच दिसते, एक आकार एक रंग आणि एक गंध परत येत नाही, तसेच त्यांच्या लेखांचे कुठलेही विषय रिपीट होत नाहीत. त्यांना इंद्रधनुषी रंग म्हणता येणार नाहीत कारण त्याच्या सप्तरंगाला सीमा असते! मात्र या पुस्तकाचे लेखनरंग अनवट मिश्रण घेऊन येतात.
पुस्तकाचा बाह्यरंगी प्रारंभच मनाला सुखद अन शीतल आनंद देणाऱ्या मुखपृष्ठापासून होतो. लेखिकेच्या ‘मनोगतामध्ये’ मध्ये तिचे प्रसन्न मनमोहिनी रूपच नव्हे तर तिचे स्वतंत्र विचार ल्यायलेले मन उलगडायला सुरुवात होते. आल्या आल्या सिक्सर मारून आपले नैपुण्य सिद्ध करणाऱ्या फलंदाजासम पहिल्या चार लेखांतच लेखिकेची लेखणीवरची मजबूत पकड जाणवते. एका जगप्रसिद्ध बहुमुखी व्यक्तित्वाची ओळख होते, ‘लिओनार्दो द विंची’ आणि त्याच्या तितक्याच जगन्मान्य चित्रनायिकेची, ‘मोनालिसा’ हिची! यातूनच चित्रनायिका आणि चित्रकार यांची एकमेकांना पत्रे. ही कल्पनाच भन्नाट! बहुदा विचार रवंथ चालू असतो या चित्राच्या निर्मितीवर वा या चित्राच्या ‘चोरीवर’!
मोहिनी यांचे, मळलेल्या वाटा सोडून केलेले हे ‘लॅटरल थिंकिंग पॅटर्न’ चे प्रयोग लय भारी! ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ असा या पुस्तकाचा टवटवीतपणा पहिल्या ते शेवटच्या पानापर्यंत अनुभवास येतो. प्रत्येक लेखागणिक लेखिकेच्या मनातले विचारतरंग एकामागून एक जिवंत होतात. पारदर्शक तरंगांचे रंग, गंध आणि स्पर्श लगेच जवळून जाणवतात! शब्दांचा अन अर्थाचा कुठलाही फापटपसारा नाही, धारदार बुद्धिमत्ता असूनही तिचे अवास्तव प्रदर्शन नाही, लेखांची लांबी (कधी अर्धेमुर्धे पान तर कधी ३-४ पाने (यापेक्षा जास्त नाही) अशी की विषय आत्मसात तर होईल, पण वाचकाला अंतर्मुख करेल आणि त्याला विचारमंथन करायला भाग पाडेल. एक लेख वाचला की तो विषय आटोपला, म्हणजे तुम्ही आरामात बुक मार्कर ठेवा अन नंतरचा लेख थोड्या वेळाने वाचा अशी ही सुबक लेखमालिका आहे. एक एक फूल तोडा, त्याचे सौंदर्य न्याहाळा, नंतरचे फूल तोडायचं तेव्हा तोडा! पण मंडळी अशी वेळ बहुदा यायची नाही, कारण एकदा का पहिल्या चॅप्टरमधल्या मोनालिसाच्या ‘त्या’ गूढ स्मितात तुम्ही हरवलात की पुस्तकातच हरवून जाल याची फुल ग्यारंटी! हे लेख वाचून एका जगन्मोहिनीची आठवण आल्याशिवाय राहात नाही! देवांना ऑन प्रायॉरीटी अमृतकलशातून रसपान प्राप्त करून देणारी मोहिनी अर्थात श्री विष्णूंचे मोहिनी रूप! प्रत्यक्ष शंकराला तिचा मोह पडतो! इथे तर आम्ही पडलो सामान्य वाचक!
मोहिनी यांच्या या लेखांतून मला जे तात्काळ सदुपयोगी पडले ते पुस्तक परीक्षण. या व्यतिरिक्त एक रसिक म्हणून कलेचा आस्वाद कसा घ्यायचा हे त्यांनी त्यांना आवडलेली नाटके, सिनेमे, पुस्तके, मान्यवरांची भाषणे, निसर्गाची रूपे, गाणी, संत साहित्य, रामायण, महाभारत अन पुराणकाळातली व्यक्तिचित्रे आणि बरंच कांही….. यांच्या सर्वंकष अनुभवातून वाचकांशी शेअर केले आहे. गंमत म्हणजे त्यांना कुठल्याही विषयाचे वावडे नाही. आपण असे प्रसंग अनुभवतो, पण त्यांचे लिखाणात परिवर्तन करण्याची कल्पनातीत किमया मोहिनी यांचीच असू शकते! एकच उदाहरण देते. आता बघा ना ‘माझे आवडते विद्यापीठ’ या चिंतनीय विषयावर संपूर्ण लेख अगदी उत्कंठा ताणणारा, अन शेवटी ते विद्यापीठ कोणते तर ‘व्हॅट्सऍप’ निघते. ‘ह्यॅ त्यात काय मोठेसे?’ असा प्रश्न देखील मनात येऊ देऊ नका मंडळी, कारण दिवसरात्र व्हाट्स ऍप वरच मुशाफिरी करणारे आपण, पण त्याला ‘विद्यापीठाचा’ दर्जा देणारी ही लेखिका म्हंजी मोहिनीच असू शकतात बरं कां! धन्य त्या लेखणी कळा म्हणा अन पुढचा लेख घ्या वाचायला! यात ‘खरेदीची खुमारी’ सारखा गुटगुटीत लेख एका बाजूला अन ‘मनाचं उत्खनन’ सारखा भारदस्त मानसशास्त्रीय लेख दुसऱ्या बाजूला! या मालिकेत ‘बिग इज ब्युटीफुल’ मध्ये लठ्ठपणाकडे पाहण्याची ‘सकारात्मक दृष्टी’ आहे तसेच ‘काळरेषा’ मधील शहारून टाकणारा गूढरम्य अनुभव देखील आहे.
मंडळी, या पुस्तकाद्वारे तुम्ही मनसोक्त ‘आहार विहार’ करू शकता. गोवर्धन पर्वत सात दिवस एका करंगळीवर धारण करणाऱ्या कृष्णाला नंतर सपाटून भूक लागली. गावकऱ्यांनी शिधा काय, अन्न काय, फळफळावळ काय, लोणची काय, त्याच्यासाठी सगळे गोळा केले! त्या गावजेवणाची आठवण म्हणून आज आपण ज्या गोपालकाल्याचा प्रसाद ग्रहण करतो ना, त्याची चव अमृताहून गोड! तसेच मोहिनी यांचे हे लेख आहेत. मी तर झपाटून गेल्यासारखे ते वाचले अन ‘chewed and digested them’. (याच पुस्तकातील ‘बुक शेल्फ’ नामक एका अप्रतिम लेखातून हे शब्द उधार घेतलेत.) वाचकांनी नाटक, सिनेमे, पुस्तके इत्यादींची ‘बकेट लिस्ट’ बनवायला या पुस्तकाची मदत घ्यावी, भाषणाची तयारी करायला यातील असंख्य उदाहरणे, उतारे, सुभाषिते इत्यादी उधार घ्यावीत. हे कांहीच करायचे नसेल तर स्वतःच्या मनात डोकावायला अन आत्मचिंतन करायला हे पुस्तक अवश्य वाचावे. कोरोना काळातील दारुण अनुभवांचे स्फूर्तिदायी सार हे या पुस्तकाचे सुंदर गमक!
मोहिनी, तुमचे लेखन एखाद्या अनाघ्रात कमोदिनीसारखे वाटते. तुमच्या व्यक्तिमत्वातील कित्येक कंगोरे या लेखनात दिसतात. रत्नांची खाण, सर्जनशील अशा बहुप्रसवा वसुंधरेसारखे तुमच्या मनाच्या तळ्यात असंख्य विषयांच्या विचारांचे मोहोळ दाटले आहे. तुमच्यातील वात्सल्य आणि प्रेम दर्शवणाऱ्या स्त्रीसुलभ भावना, कलासक्त आणि संवेदनशील हृदय, मिळेल त्या वाटेतील सौंदर्यसुमनांचे रसपान करणारी भ्रमर वृत्ती, प्रशासकीय अनुभवातून आलेली कर्तव्य कठोरता आणि सर्वात मुख्य म्हणजे ‘नवनवोन्मेषशालिनी’ सर्जनशीलता या पुस्तकात प्रतिबिंबित होते. आपण आपल्या नोकरीत लोकसेवेच्या व्रताचा वसा घेतला आहेच, त्याला अनुरूप असे आपले ‘जनमंगल’ साधणारे दर्जेदार लेख समाजमाध्यमातून आणि ई वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात आणि लोकप्रिय होतात याचे अजिबात अप्रूप वाटत नाही! अशाच नितांत सुंदर साहित्याची आपल्याकडून अपेक्षा आणि आशा आहे! आपण ती पूर्ण कराल याचा दृढ विश्वास आहेच!
मी तर निःशंक मनाने म्हणेन, आपण हे पुस्तक ‘वाचू अति आनंदे’! शिवाय इतरांना भेट देऊ, तेही प्रत्येक दृष्टीने सौंदर्यशाली असलेले हे पुस्तक वाचून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदे’ अशी अलौकिक आनंदी अवस्था झाल्यावर!
मोहिनी, आपण भविष्यात देखील सरस्वतीमातेची अशीच सेवा रुजू करा! त्याकरता माझ्या अंतर्यामी हृदयाच्या गाभाऱ्यातून मनःपूर्वक शुभेच्छा!
पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सीतायन – विद्रोह आणि वेदनेचे रसायन” – डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
सीतायन
डॉ. तारा भवाळकर
मनोविकास प्रकाशन
पृष्ठे – 188, मूल्य- २५०रु.
नुकतेच डॉ. तारा भावाळकर लिखित ‘सीतायन’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले. लहानपणापासूनच सीतेच्या व्यक्तिमत्वाने लेखिकेच्या मनाचा ठाव घेतला. आणि त्यांच्या मनात सजले ते सीतयन रामायण नव्हे. त्या लिहितात, ‘रामाविषयी,त्याच्या त्यागाविषयी, मातृ-पितृ- गुरू भ्क्तीविषयी, शौर्य- धैर्याविषयी लोकमानसात विलक्षण कौतुक, आदर आहे. पण त्याच वेळी सीतेविषयी विलक्षण सहानुभूती,, कळवळा, आदर, गरोदरपणी तिचा त्याग करणार्या रामाविषयी निषेध, अनादर, धि:कार दिसून येतो. ‘ विशेषत: स्त्रियांच्या लोकगीतात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी म्हंटलय,
राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा
‘रामायण ‘ हे भारतीय परंपरेतील अत्यंत प्रभावी असे मिथक (पुराणकथा) आहे. ही कथा अभिजनांच्या ग्रंथातून प्रवाहित होत आपल्यापर्यंत आली. तशीच मौखिक अशा लोकपरंपरेतूनही प्रवाहित झाली. लोक परंपरेतील विविध रामायणांचा, विविध भाषी रामायणांचा अभ्यास करून तारा भावाळकर यांनी ‘सीतयन’ हे पुस्तक सिद्ध केले. त्या लिहितात,’ गाव-गाड्यातील कामकरी- कष्टकरी स्त्रियांनी आपले कष्टाची कामे करताना सीतेविषयी भरभरून लिहिलय. सीतेशी या भूमीकन्यांचं आतड्याचं नातं असावं, अशा जिव्हाळ्याने त्यांनी सीतेबद्दल लिहिलय. त्या दळण-कांडण करणार्या कृषिकन्या सीतेमध्ये आपलं रूप बघतात. त्यांच्या ओव्यातून तीन तीन सासवा तिला सासुरवास करतात. तिला मोडक्या झाडूने अंगण झाडावं लागतं. ती वैतागते. तेव्हा सासू आणि चंगू नणंद रामाला चुगली करतात आणि राम सीतेकडून कधी रागावणार नाही, अशी शपथ घेतो.’ असा सगळा भाग त्यांच्या ओव्यातून येतो.
डॉ. तारा भवाळकर
सीता सुंदर, आज्ञाधारक सून आहे. मुलगी आहे. ती जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाते. अंकुशासाठी नवस बोलते. रामरायाची राणी असल्याने सुपाने सोनेही वाटते. वनवासात असताना ती सामान्य बाईसारखी ‘वल्ल्या धोतराचा पिळा खांद्यावर टाकून येते. रामाला पडसे –खोकला झाला, तर काढा देते. त्याचा घाम लुगड्याच्या घोळाने पुसते. अशा अनेक रमणीय सहजीवनाची चित्रे स्त्रियांनी आपल्या ओव्यातून रंगवली आहेत. या कष्टकरी बायकांनी सीतेत आपले रूप बघितले आहे.
सीतेचा सासुरवास भारतीय स्त्रीचं भागधेय म्हणून भारतभर चित्रित झालं आहे. समस्त भारतीय स्त्रीमनाने, सीतेमधे स्वत:ला अनुभवलं आहे. आहे. जणू सीतेने स्त्रियांना वेदनेचं वाण वाटलं आहे. सीतेला केसोकेसी झालेला सासुरवास तिने देशोदेशींच्या सयांना वाटला. तिला बहु बहु झालेला सासुरवास तिने गहू गहू सार्यांच्यात वाटला. सीतेला डोंगराएवढे झालेले दु:ख पाहिल्यावर बायकांना आपलं दु:ख, आपली उपेक्षा हलकी वाटते.
लोकमानसाने जुन्या परांपरिक कथेचं जतन तर केलंच, पण त्यात आपल्या अनुभवाची, कल्पनेची नवी भर घातली. त्यांचं जीवन सीतेच्या मूळ कथेशी एकजीव होत राहिलं. इथे स्थल-काळाचा विचार होत नाही. मूळ घटना आपल्या अंनुभवाशी जोडून घेत स्त्रियांनी ओव्या रचल्या आहेत. दुसर्या वनवासाच्या वेळी सीता बाळंतीण झाल्यानंतर बाळुती धुवायला, कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर आल्याचे वर्णन स्त्री-गीतातून येते.
राम-सीतेच्या वनवासाच्या निमित्ताने भारतभर विविध भागात अनेक दंतकथांचा पसारा निर्माण झाला आहे. अशा काही दंतकथा यात दिल्या आहेत. रामाच्या संसारात सीता दु:खी आहे. तिला अश्रू ढाळण्याशिवाय गत्यंतर नाही. ‘त्या अश्रूंनी डोंगरी पडला झरा’ किंवा ‘ डोंगरी झाली विहीर’ असं वर्णन येतं.
साताराजवळच्या कोरेगावजवळच्या डोंगरावर दर संक्रांतील केवळ बायकांची खास ‘सीतामाईची जत्रा’ भरते आणि तिथे, दिवसभर सीता वनवासाच्या ओव्या बायका गात असतात.
लोकसाहित्यात सीता कुठे रावणाची मुलगी असल्याचा उल्लेख आला आहे, तर एका आदिवासी कोरकू गीतात सीता रावणावर भाळल्याचेही म्हंटले आहे.
सीतेला रामाने पुन्हा वनात का पाठवले? आपल्या परिचित कथेपेक्षा लोकरामायणातील कथा वेगळं काही सांगते. इथे कैकयी रामाचे कान फुंकते, की सीतेच्या मनात अजून रावण आहे. ती कट कारस्थान रचते. सीतेला रावणाचे चित्र काढायचा आग्रह करते. सीता म्हणते, ‘मी फक्त त्याच्या डाव्या पायाचा अंगठा बघितला.’ कैकेयी तेवढाच काढायला सांगते. त्याच्या आधारे ती रावणाचे चित्र पूर्ण करते व सीतेने ते काढल्याचे सांगते. राम संतापतो आणि लक्ष्मणाला सीतेला वनात नेऊन वधायची आज्ञा करतो. ‘अंकुश पुराण’ या प्रकरणात, लेखिकेने विस्ताराने ही कथा मांडली आहे. तिला माहेरी पोचवतो, असं सांगून लक्ष्मण घेऊन जातो, पण तिला वेगळा रस्ता असल्याचे लक्षात येते. ती म्हणते, माझ्या माहेरच्या वाटेवर दाट केळीचं बन आहे. या रस्त्यावर तर काटेरी बोरी-बाभळी आहेत.
सीताबाई म्हणे, नव्हं माहेराची वाट
तिथं केळीचं बन इथे वन आचाट
पुढे लक्ष्मण तिला वध करायला रामाने सांगितल्याचे सांगतो. सीता तयार होते. पण लक्ष्मण तिचा वध करत नाही. ती आटंग्या वनात राहू लागते. तिथे धाई धाई रडणार्या सीतेची, बोरी-बाभळी (बायका) समजूत घालतात. ‘वधायला नेली नार’ या चरणाने सुरू होणार्या अनेक ओव्या स्त्री-गीत सांभारात असल्याचे लेखिका सागते.
लोकमानसातील ‘रामायणात’ नव्हे ‘सीतायनात’ पुढे सीतेला वाल्मिकी ऋषी भेटत नाहीत, तर भेटतो, तातोबा, कुण्या गावातला जेष्ठ, समजूतदार, कनवाळू , वयस्क कारभारी. तातोबा ही खास लोकप्रतिभेची निर्मिती आहे, असं डॉ. तारा भावाळकर म्हणतात.
पुढे राम-लक्ष्मण, लावांकुश यांची भेट कशी होते? आपल्या परिचित कथेपेक्षा लोकपरंपरेतून आलेली कथा वेगळी आहे. इथे रामाचा राजसूय यज्ञ किंवा श्यामकर्णी घोडा नाही.
तातोबासाठी कमळे आणायला अंकुश तळ्यावर जातो. रामाचे शिपाई तिथे लक्ष्मणासह सहस्त्र कमळे न्यायला आलेले असतात. ते अंकुशाला चोर म्हणून पकडून ठेवतात. अंकुश आला नाही, म्हणून त्याला शोधत लव तिथे येतो. अंकुशाला सोडवतो. त्यांचे सैन्याशी युद्ध होते. मुलांचे युद्धकौशल्य पाहून राम विस्मित होतो. मुलांना धनुर्विद्या तातोबांनी शिकवलेली असते. मुलांना राम-लक्ष्मण, कुल- शील विचारतात. मुले म्हणतात,
‘सीतामाई आमची माता लक्ष्मण आमचा काका
जनक आमचा आजा नाही पित्याची वळख ‘
नाही पित्याची वळख ‘ असं म्हणणार्या, जात्यावर दळणार्या बायकांनी रामाशी केलेला तो विद्रोह आहे, असं लेखिकेला वाटतं.
पुढे नारद येतात. सगळा खुलासा करतात. मग राम रथात घालून लव- अंकुश, सीतेबरोबर आयोध्येकडे यायला निघतो. लोकांच्यात उत्साह आहे.
‘समस्त नगरीचे लोक जानकीस भेटाया येती ‘. त्याच वेळी कैकयी पुढे येते. ती सीतेला विचारते,
‘कैकयी विचारते, सीतामाई सावळीला
अंकुश रामाचा लहू कोणाचा आणीला.?’
लहू लव्हाळ्याचा केलेला सगळ्यांना माहीत आहे. सीता म्हणते,
‘सीता बोले आता काय सांगू सासूबाई । तुझ्या पोटामध्ये वाट दे ग धरणी आई’
कुठे हाच प्रश्न रामाने विचारला आहे. धारणी दुभंगली. तिने सीतेला पोटात घेतली. लक्ष्मणाला सीतेचे सत्व माहीत होते. तो संतापला. त्याने काकेयीचे सात पाट काढून, म्हणजे तिला विद्रूप करून रेड्यावर बसवून नगराबाहेर हाकलली. कपटी, कारस्थानी कैकेयीला शिक्षा देऊन अंकुश पुराण संपते. लोकसमूहात ते गाऊन दाखवलं जाई. त्याच्या कर्त्याबद्दलही लेखिकेने विस्ताराने लिहिले आहे.
‘चित्रपट रामायण ‘ अशी दोन प्रकरणे यात आहेत. त्यात पहिले प्रकरण कन्नड आहे. दुसरे कन्नडच्या हिन्दी रूपांतरणाचे आहे. मूळ कन्नड लेखन हेळवणकट्टे गिरीअम्मा यांचे आहे. नाव वाचताना वाटलं होतं, एखाद्या चित्रपटाचे हे विवेचन असेल, पण वाचताना लक्षात आले, ते तसे नाही. चित्रपट म्हणजे चित्र. ते कुणाचे? तर रावणाचे. राम- सीता रावणावध करून अयोध्येला परतल्यावर, शूर्पणखा म्हणजे चंद्रनखी सीतेची बालमैत्रीण असल्याची बतावणी करत येते. सीतेशी गप्पा मारता मारता तिच्याकडून रावणाचे चित्र काढून घेते. सीतेच्या नकळत चित्रात डोळे चितारते आणि चित्र साजिवंत होते. पुढे रावण चित्राच्या चौकटीच्या बाहेर येतो. सीतेने चित्र काढले. म्हणजे रावण निर्माण केला, तेव्हा तो तिचा पुत्र झाला. राम मात्र पुन्हा रावणाशी युद्ध करायला तयार होतो. पिता-पुत्राचे युद्ध ही कल्पना सहन न होऊन सीता घरणीच्या पोटात सामावते. असडे हे चित्रपट रामायण. रावणाचे चित्र सीतेने काढण्याची कल्पना, कन्नड, हिन्दी, बंगाली, इये. अनेक भाषातील रामकथांमधून आली आहे.
यापुढील प्रकरणात ‘च्ंद्रावती रामायण’ या बंगाली रामायणाच ऊहापोह केलेला आहे. मौखिक गीत-गायनाच्या प्रथेतून या रामायणाचे पिढ्या न् पिढ्या जतन झाले आहे. यात सांगितल्या गेलेल्या रामकथेचे संहितीकरण ‘चंद्रावती’ने केले, असे लेखिकेचे संशोधन आहे. ही संहिता पूर्णपणे लेखिकेला उपलब्ध झाली नाही. उपलब्ध संहितेचा श्री. जयंत सेनगुप्ता यांच्या सहाय्याने लेखिकेने मराठी अनुवाद केला आहे व तोही परिशिष्टमध्ये दिला आहे. यात राम आणि सीता जन्माच्या अद्भूत कथा आहेत. रावणवध करून आल्यावर कैकेयीची मुलगी कुकवा सीतेच्या मागे लागते व रावणाचे चित्र काढ असा आग्रह धरते. सीता वारा घ्यायच्या ताडाच्या पंख्यावर रावणाचे चित्र काढते. परिश्रमाने तिला झोप येते. कुकवा तो पंखा सीतेच्या छातीवर ठेवते आणि रामाला चुगली करते की अजूनही सीतेच्या मनात रावणच आहे. राम संतापतो. त्यापुढे संहिता उपलब्ध नाही. चंद्रावतीचे भाष्य आहे. ती म्हणते, ‘आग पेटवली कुकवाने आणि त्यात जळून जाणार आहेत राम, सीता आणि अयोध्या नगरीही. अयोध्येतील लक्ष्मी नष्ट होईल, जाळून जाईल.’ पुढे ती समारोपादाखल म्हणते, ‘आपली बुद्धी न चालवता दुसर्याचे ऐकून विश्वास ठेवणार्याचा असाच सर्वनाश होतो.’ अयोध्येच्या सर्वनाशाचे कारण खुद्द रामंच असल्याचे चंद्रावती सांगते.
बौद्धधर्मियांच्या जातक कथांपैकी रामायणाशी संबंधित दशरथ जातक आणि आदिवासींचे ‘सीतायन’ यांचाही परामर्श लेखिकेने पुस्तकात घेतला आहे..
तर असा विविध लोकांचा रामायण कथेकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन विषद करत त्या पार्श्वभूमीवर, सीतेकडे त्यांनी कसे बघितले, याची मांडणी या पुस्तकात केली आहे. भारतीय परंपरेने राम आणि सीता ही आदर्श दैवते मानली. त्यांच्याविषयी खूप काही नवीन माहिती या पुस्तकात मिळते. ती विचार करायलाही प्रवृत्त करते.
डॉ. तारा भवाळकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक संशोधन करून हे पुस्तक सिद्ध केले आहे. हे महत्वपूर्ण पुस्तक तितक्याच नेटकेपणाने मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. चंद्र्मोहन कुलकर्णी यांचे अन्वर्थक आणि आकर्षक मुखपृष्ठ आहे. एकंदरीने ‘ सीतायन’ पुस्तकाचे मोल अनमोल आहे, असेच म्हणावे लागेल.
पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अनुराधा फाटक यांचं एक नवीन पुस्तक ‘समर्थ शिष्य कल्याण’. ही लघु कादंबरी रावा प्रकाशनने प्रकाशित केली आहे. मुखपृष्ठ प्रतिकात्मक असून सुद्धा आपण काय वाचणार आहोत, हे सांगण्यास समर्थ आहे. हा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. ग्रंथ म्हणण्याइतका मोठ्ठा नसला तरी त्याचं साहित्यिक मूल्य ग्रंथाइतकंच आहे.
श्रीमती अनुराधा फाटक
आपल्याला कल्याणस्वामी हे समर्थांचे शिष्य एवढंच माहीत आहे. समर्थांच्या बरोबर असताना त्यांचं एवढं अफाट साहित्य लिहून देण्याचं, त्याच्या प्रती काढण्याचं काम त्यांच्या या शिष्याने केले आहे. गुरूचा लाडका शिष्य होणे किती अवघड आहे, किती खडतर तपस्या आहे याची जाणीव होते. समर्थांच्या पश्चात कल्याणस्वामींनी त्यांचं कार्य सुरू ठेवलं, मोठ्ठा शिष्यवर्ग निर्माण केला. ब्रह्मप्राप्ती, आत्मानंद, सोलीव सुख या सर्व स्थितींचा अनुभव कल्याणस्वामींनी घेतला. त्यांचं स्वतःचं साहित्य सुद्धा इतकं समृद्ध आहे की वाचणारा थक्क होऊन जातो. आणि वाईट वाटतं की यातलं एक शतांश सुद्धा ह्या पिढीला माहीत नाही.
स्वामी तो आठवे मनी|
नित्य बोलता चालता जनी|
स्वप्न सुषुप्ती जागृती मौनी|
खंड नाहीच अखंड ध्यानी||
या पुस्तकात कल्याण स्वामींची शिष्यपरंपरा सविस्तर दिली आहे. त्यांचे कार्य, त्यांचे साहित्य, त्यांची शिष्यपरंपरा याचा सखोल अभ्यास अनुराधाताईंनी केलेला जाणवतो. असं हे माहितीपर पुस्तक बुक रॅक मध्ये हवंच!
आपण वाचतो आपल्याला आवडेल आपल्याला रुचेल, पचतील अशी पुस्तकं आपण वाचनासाठी निवडतो.. पण काही वेळा काही पुस्तकं आपल्याला सतत खुणावत राहतात, आकर्षित करत राहतात अशाच काही पुस्तकांमधील एक पुस्तकं एक आत्मचरित्र म्हणजे अरुणा सबाने ह्याचं सूर्य गिळणारी मी हे पुस्तकं.. काही महिन्यांपूर्वी लोकसत्ता मध्ये ह्या पुस्तकाविषयी वाचलं होतं आणि तेंव्हा पासूनच हे पुस्तकं मला खुणावत होतं.. आणि योगायोग असा की काहीच दिवसात भावार्थ व्हॅन मध्ये मला हे पुस्तकं दिसलं मग काय लगेचच घेतलं आणि आज त्या पुस्तकाविषयी लिहिण्याच धाडस करते आहे..
सूर्य गिळणारी मी वाचायला घेतलं आणि एका सुशिक्षित, हुशार, आत्मविश्वास ही लाजेल अशा एका कर्तबगार स्त्रिच्या जीवनाचे पैलू वाचताना अनेकदा डोळे पाणावले, नकळत कधी सुखावले, कधी लग्न टिकविण्यासाठी धडपडणाऱ्या अरुणाचा राग ही आला.. पण तरीही ह्या पुस्तकातील अरुणाची जिद्द, आत्मविश्वास आपल्याला पुस्तकं खाली ठेवू देत नाही.. आता ह्या पुस्तकाची थोडक्यात गोष्ट सांगते.. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील निमगाव(साबने ) ह्या छोट्या गावातील एका सधन, सुशिक्षित, समृध्द अशा शेतकरी पाटील घराण्यातील ही मुलगी… नाव अरुणा.. लहानपणापासूनच वाचनाची आवड असणारी, हुशार, चुणचुणीत, स्वतंत्र विचारांची अरुणा.. शाळेत नेहमी पहिला नंबर मिळवणारी, विविध स्पर्धांमधून आपलं वर्चस्व गाजवणारी, हुशार तरीही स्वभावाने शांत असणारी अरुणा.. आपल्या भावंडांबरोबर वाचनाच्या गप्पा गोष्टी करणारी, नवनवीन पुस्तकं मिळवून सतत वाचणारी ही हुशार अरुणा.. मोठ्या भावाचे खेळातील प्राविण्य, राजकारणातील दबदबा ह्याचं नितांत कौतुक असणारी अरुणा.. बाई म्हणजे आईची लाडकी अरुणा.. आणेजी म्हणजे आजोबांची लाडकी नात अरुणा.. मनोहर, किर्लोस्कर या सारखी मासिकं वाचत लाडाकोडात वाढलेली अरुणा सगळ्यांची लाडकी होती..लहान वयात बापू म्हणजे बाबा गेल्यानंतर आई आणि भावंडांच्या मायेच्या छत्राखाली वाढलेली अरुणा.. अरुणाची अशी अनेक रूपं तिच्या समृध्द बालपणाच दर्शन घडवतात.. बाबा, राजू हे तिचे मोठे भाऊ, दोन बहिणी.. पण बहिणींची लग्नं लवकर झाल्यामुळे राजू शी तिची छान गट्टी जमली.. ती आयुष्यभर.. दोघांना ही वाचनाची आवड असल्यामुळे हे नातं अजूनच पक्क बनलं..अगदी लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी अरुणा त्या दृष्टीनेच अभ्यास करणारी आणि जिद्दीने तो पूर्ण करणारी अशी.. पुढे दहावीनंतर शहरात पुढच्या शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेते.. आणि घरचे ही तिच्या ह्या निर्णयाचं स्वागत करून तिला पाठिंबा देतात..त्या काळी तिच्यासाठी हॉस्टेल बघून तिच्या पुढच्या वाटचालीसाठी सर्व ते प्रयत्न करतात.. राजू आधीच शहरात असल्यामुळे तिच्यासाठी हॉस्टेल वर राहणं फार सोप्प होऊन जातं.. हॉस्टेल वर आल्यानंतर तिच्या मोठ्या भावाच्या मित्रांची, राजूची फार मदत होते.. हॉस्टेल वरच्या अनेक गमतीजमती ही खूप छान मांडल्या आहेत पुस्तकात..बारावीत असताना अशाच एका मैत्रिणी सोबत सिनेमाला गेलेली असताना तिची प्रभाकर पावडे ह्या मुलाशी ओळख होते..प्रभाकर पावडे हा आंबेडकर चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो.. दोघांची वाचनाची आवड, वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा ह्यातून त्यांची मैत्री होते पुढे प्रेम होतं आणि इथेच अरुणाच्या आयुष्याला कलाटणी मिळते.. प्रभाकर हा आर्ट्स चा विद्यार्थी आणि अरुणा सायन्स ची..त्यामुळे प्रभाकर शी लग्न करायचं तर डॉक्टर होण्याचं स्वप्न बाजूला ठेवावं लागेल हे अरुणाला लवकरच कळून चुकत आणि ती प्रभाकर च्या प्रेमासाठी त्याच्याशी लग्न करण्यासाठी लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाला बाजूला करते आणि इथेच अरुणा फसते.. मग हे प्रेम प्रकरण राजू पर्यंत पोहचत, पुढे घरी कळतं आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता अरुणा प्रभाकर शी लग्न करते.. शिक्षण सुटतं..स्वप्न मागे पडतात.. प्रभाकर च्या प्रेमात आकंठ बुडालेली अरुणा सगळं विसरून विवाहबद्ध होते.. बाई चा तसा विरोधच असतो तरीही अरुणाच्या सुखासाठी ती हे लग्न मान्य करते आणि इथे अरुणाच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होतो.. नव्याचे नऊ दिवस संपतात आणि प्रभाकर चा खरा चेहरा समोर येतो.. स्त्रियांचा आदर करणारा, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा प्रभाकर बायकोला दहा मिनिटं उशीर झाला म्हणून तिच्यावर हात उचलतो.. नवरेगिरी गाजविण्याची एकही संधी सोडत नाही..बायको म्हणजे उपभोगाची वस्तू आणि रांधा वाढा एवढाच काय तो तिचा उपयोग असा वागू लागतो.. अरुणा हे सगळं पाहून कोलमडून जाते.. सासर किंवा तिथल्या कुठल्याच माणसांकडून तिला कसलीच सहानुभूती किंवा प्रेम मिळत नाही.. नवरा हा असाच असतो हेच तिच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न होतो..हे सगळं सहन करत.. माहेरच्या माणसांना आपलं दुःख दिसणार नाही ह्याची काळजी घेत ती संसार करण्याचा प्रयत्न करत राहते.. अशातच तिला दिवस गेल्याची बातमी कळते आणि ती सुखावून जाते.. पण मैत्रिणींनो तिचा हा आनंद फार काळ टिकत नाही.. प्रभाकरच्या वागण्याने ती प्रचंड दुखावते.. तिच्या पहिल्या डिलिव्हरी ची कहाणी वाचताना तर आपण अश्रू थांबवूच शकत नाही.. माहेरी लाडाकोडात वाढलेली अरुणा डिलिव्हरी च्या वेळी एका भिकारी महिलेकडून कशीबशी मदत मिळवून एका सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल होते.. हा प्रसंग वाचताना अंगावर शहारे येतात..पहिला मुलगा पिंटू( स्वप्निल) त्याच्या जन्मा नंतर ही परिस्थीती फारशी बदलत नाही.. एक वर्षाच्या पिंटू साठी औषध सुद्धा घेण्या इतके पैसे नसणारी हतबल अरुणा पाहून ते प्रसंग वाचून आपण पुन्हा रडतो.. प्रभाकर च वागणं दिवसागणिक अजून विचित्र होतं जातं..मारझोड तर सुरूच असते.. आपल्या मित्रांना घेऊन येणं, त्यांच्यासाठी मांसाहारी जेवण करायला लावणं, त्यांच्यासमोर वाट्टेल त्या शिव्या देणं, सतत अपमान करणं , दोनशे रुपये सुद्धा कमावण्याची अक्कल नाही असा सतत पाणउतारा करणं हे अगदी रोजचं झालेलं होत.. आणि अरुणा हे निमुटपणे सहन करते हे पाहून अशा वेळी आपल्याला भयंकर राग येतो..अशातच पुन्हा प्रेगनन्सी आणि ते ही जुळी अरुणा ह्या सगळ्या त्रासाने खचून जाते.. पण दोन मुलींचा जन्म होतो आणि आत्ता तरी दिवस बदलतील ही वेडी आशा घेऊन जगत राहते.. ह्या दरम्यान प्रभाकर च पिणं अजून वाढतं.. रोजची भांडणं, आरडाओरडा, शिवीगाळ करणं हे सुरूच राहतं..ह्या मधल्या परिस्थितीत घडलेले अनेक प्रसंग सतत डोळ्यात पाणी आणत राहतात.. मुलांच्या शिक्षणासाठी अरुणाची धडपड, दोन पैसे कमावण्यासाठी शाली करून विकणं अशी छोटी मोठी काम करत राहणं, ह्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा अरुणा लिहीत असते.. तिचे अनेक लेख पेपरमध्ये वाचून तिचं कौतुक होत असतं.. ह्या सगळ्यात तब्बल सतरा वर्षांचा काळ जातो आणि एक दिवस जेंव्हा अरुणाच्या जीवावर बेततं तेंव्हा अरुणा रात्री घर सोडते.. हा प्रसंग वाचताना हुंदके आवरता येणं शक्यच नाही.. कशी बशी स्वतःची सुटका करून घेऊन मिळेल तिथे रात्र काढल्यानंतर मात्र अरुणाचा निश्चय ठाम होतो आणि आपल्या दोन्ही मुलींना घेऊन ती एका छोट्याशा झोपडी वजा घरात आपला संसार सुरू करते.. तिचा हा संघर्ष, मुलींसाठी ची धडपड पाहून आपण कासावीस होऊन जातो.. छोटी मोठी नोकरी करून तिघींच पोट भरणं आणि आपल्या मुलींना त्या प्रभाकर पासून दूर ठेवणं ह्या साठीची अरुणाची चाललेली धावपळ पाहून बऱ्याच वेळा तिचा अभिमान ही वाटतो.. अशातच एक मुलगा त्याच्या जवळ आहे हे दुःख आणि मुलींची जबाबदारी अशा दुहेरी संकटात अडकून सुद्धा अरुणा कुठेही निराश किंवा हतबल न होता लढत राहते..स्वतः च्या मुलींना बरबाद करण्याच्या धमक्या प्रभाकर देतो त्या वेळी ही धीराने सांभाळणाऱ्या अरुणाच कौतुक वाटतं… पुढे अरुणा स्वतः मध्ये जी प्रगती करते किंवा अनेक छोटे मोठे व्यवसाय करता करता एक दिवस हॉस्टेल आकांक्षा सुरू करते आणि तिथून पुन्हा एकदा अरुणाचा नव्याने जन्म होतो आणि तिच्या आयुष्यात एक वेगळं वळण येतं.. हॉस्टेल चालविण्यासाठी चे प्रयत्न, त्याची जाहिरात, हॉस्टेल साठी मुली मिळवणं अशा अनेक प्रसंगातून रोज नव्याने शिकत अरुणा आपला जम बसवते.. मुलांचं शिक्षण, हॉस्टेल साठी घेतलेलं लोन, प्रभाकर च विचित्र वागणं, फोन करून धमक्या देत राहणं ह्या सगळ्याला धीराने तोंड देत अरुणा एक यशस्वी उद्योजिका होते.. हळूहळू तिच्या लिखाणाची चर्चा सुरू होते, जल संवर्धन चळवळ असो, स्त्रियांचे प्रश्न असोत अरुणा सगळ्यांसाठी सतत काहीना काही करत राहते.. आकांक्षाचा व्याप दिवसेंदिवस वाढत जातो.. तिथूनच एक नवी सुरुवात म्हणून ती आकांक्षा हे मासिक सुरू करते आणि पुन्हा एकदा नव्या व्यवसायाचा श्री गणेशा होतो…मासिकाच्या यशानंतर आणि जल संवर्धन, हॉस्टेल हा सगळा व्याप सांभाळून पुन्हा एकदा अरुणा नव्या व्यवसायात उतरते आणि तो व्यवसाय म्हणजे पुस्तकं प्रकाशन… विदर्भातील मोठमोठ्या लेखकांच्या पुस्तकाचं यशस्वी प्रकाशन करून संपादक म्हणून नवी वाटचाल सुरू होते.. त्या आधीच विमुक्ता कादंबरीने अरुणा सर्व परिचित एक उत्तम लेखिका म्हणून प्रसिद्धीस येते..आणि या प्रकाशन व्यवसायात ही कडू गोड आठवणींची तिची कहाणी वाचताना आपण मंत्रमुग्ध होतो.. दोनशे रुपये कमवायची अक्कल नसणारी असा अपमान सहन करणारी अरुणा लाखोंचे व्यवहार लिलया सांभाळताना पाहून तिच्या विषयीचा अभिमान अजून वाढतो.. दरम्यान मुलींची शिक्षण त्यांची लग्न, मुलाचं लग्न त्याच्यासाठी त्याच्या व्यवसायासाठी अरुणाची मदत, विविध पुरस्कार, भाषणं, स्त्रियांसाठी चे कार्य, परदेश प्रवास, अशा विविध प्रसंगातून अरुणाची कहाणी अजूनच रंगत जाते.. तिच्या प्रत्येक निर्णयात आपण स्वतः ला सोबती मानत तिचा प्रवास वाचून थक्क होतो.. त्यानंतर पाठोपाठ होणारे जिवलग व्यक्तींचे मृत्यू, बाईचं अचानक आलेला मृत्यू ह्या सगळ्यांनी अरुणा खचून जाते.. पण काही काळ च.. त्यानंतर पुन्हा स्वतः ला सावरून तिची इतरांसाठी जगण्याची धडपड एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते.. हे पुस्तकं वाचताना अनेक कडू गोड आठवणी अर्थात कडू आठवणीच जास्त आहेत त्या वाचताना कुठेही अरुणा हरलीय, खचून गेलीय, उदास झालीय असं वाटतं नाही.. उलट अठरा अठरा तास काम करणारी अरुणा, सदैव आपली जिद्द आणि मेहनतीने परिस्थिती वर मात करणारी अरुणा, आपल्या लेकरांसाठी सतत झगडत राहणारी अरुणा, कोणत्या ही प्रसंगात धीराने सामोरी जाणारी अरुणा, बेधडकपणें गाडी चालवणारी अरुणा, समाजातल्या गरजू स्त्रिंयांसाठी लढणारी त्यांना न्याय मिळवून देणारी अरुणा आपली कधी मैत्रीण बनून जाते कळतं ही नाही.. मी तर ह्या अरुणाच्या प्रेमातच पडले.. इतके कठीण दुःखद प्रसंग येऊन ही न डगमगता न घाबरता त्या प्रसंगाशी चार हात करणारी लढवय्यी अरुणा आपल्याला जास्त भावते.. आज अरुणा सबाने हे नाव आदराने घेतले जाते.. विविध पुरस्काराने सन्मानित झालेली ही अरुणा ह्या प्रसंगातून इथवर पोहचली आहे त्या प्रसंगांची ही कहाणी म्हणजे हे सूर्य गिळणारी मी हे पुस्तक आपल्याला जगणं आणि त्या साठी संघर्ष करून जिंकण शिकवत.. हे पुस्तकं वाचताना आपण खूपदा रडतो पण ते अश्रू अरुणाच्या कष्टाची तिच्या जिद्दीची कहाणी वाचताना येतात.. कुठेही तिच्याबद्दल सहानुभूती किंवा दयाभाव आपल्या मनात येत नाही.. मला वाटतं हेच या पुस्तकाचं यश आहे… ह्या पुस्तकाबद्दल कितीही लिहू शकत असेल तरी ही अरुणाची कहाणी ज्याने त्याने वाचूनच समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे इथेच थांबते.. आणि हो मी पुस्तकातील पाच टक्के पण इथे मांडलेले नाही.. त्यामुळे हे पुस्तकं वाचणं मस्ट आहे बरं का! आणि मला खात्री आहे मी इतकं लिहिल्यानंतर आपण सगळ्या हे पुस्तकं नक्की वाचाल… हे पुस्तकं म्हणजे स्त्रियांसाठी मार्गदर्शक तर आहेच आहे पण निर्णय चुकले तरी न डगमगता कसं लढावं हे शिकवणारे जास्त आहे असं मला वाटतं..अरुणा ताईच्या जिद्दीला, तिच्या मेहनतीला आणि तिने लढलेल्या प्रत्येक लढाईचे अगदी करावे तितके कौतुक कमीच आहे पण अरुणा ताई तुझी ही जीवन संघर्ष कहाणी अनेक स्त्रियांसाठी यशाचा मार्ग दाखविणारी मार्गदर्शिका आहे हे मात्र नक्की…
सामान्यातलं असामान्यत्व म्हणजे काय असतं याची प्रचिती मला समाजभूषण २ हे सौ.रश्मी हेडे यांचे पुस्तक वाचताना आली. समाजभूषण १ हे पुस्तक मी वाचलेले होते. त्यावर लिहिलेही होते. त्यामुळे अर्थातच समाजभूषण २ हाही लेखसंग्रह वाचण्याची खूपच उत्सुकता होती. प्रकाशक सौ. अलका देवेंद्र भुजबळ( न्यूज स्टोरी टुडे) यांनी हे पुस्तक प्रकाशित करून खरोखरच समाजापुढे यशाची व्याख्या, यशाचे मार्ग आणि यश मिळवण्यासाठी असावी लागणारी मानसिकता याचा एक सुंदर वस्तू पाठच सादर केला आहे.
या पुस्तकात ३७ जणांच्या जीवनकथा आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन रश्मी हेडे यांनी त्यांच्या जीवनातले नेमके मर्म ओळखून हा लेखन प्रपंच केलेला आहे. आणि तोही एक निश्चित सकारात्मक दृष्टिकोन ठेवून.
कासार समाजाला भूषण ठरलेली ही सर्वच मंडळी म्हणजे तेजोमय रत्नासारखीच आहेत. प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास जरी वेगवेगळा असला तरी या सर्व व्यक्तींमध्ये गुणात्मक साम्य आहे. साधारणपणे ४० ते ६० वयोगटातल्या या व्यक्ती आहेत. एखाद दुसरा अपवाद सोडल्यास याच वयोगटातली ही उल्लेखनीय मंडळी आहेत. शिवाय हे पुस्तक वाचताना आणखी एक लक्षात येते की सर्वसाधारण आर्थिक स्तरातल्या या व्यक्ती आहेत. कोणीही मुखात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी जीवनाचे यशाकडे नेणारे मार्ग खणून काढले आहेत. कुणाचे जन्मस्थान, कुणाचे आई-वडिलांचे छत्र लहान वयातच हरवलेले, रितभात, परंपरा श्रद्धा, अंधश्रद्धा यात अडकलेला कुणाचा परिवार, शिक्षणाविषयीची अनास्था, नाही तर पुरेशी शिक्षण व्यवस्थाच नसलेल्या ठिकाणचे वास्तव्य, अशा अनेक नकारात्मक वातावरणात शोधक वृत्तीने जगणारी ही माणसं आहेत. यांनी यशाचे शिखर कसे गाठले याच्या अक्षरशः थक्क करून सोडणाऱ्या आणि मनाला खिळवून टाकणाऱ्या या व्यक्तिकथा आहेत.
यांच्यात प्रामुख्याने आढळणारे गुण म्हणजे दृढ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे मनोबल, आधुनिक विचारधारा, धाडसी निर्णय क्षमता आणि त्याचबरोबर प्रचंड मेहनत करण्याची तयारी अन् सदैव बाळगलेला नम्रपणा हे दुर्मिळ गुण या सर्वच ३७ जणांच्या ठायी आढळून येतात. म्हणूनच उंच भरारी घेऊनही यांचे चरण भूमीवर आहेत.आणखी एक म्हणजे कोणत्याही यशाने ते हुरळून गेलेले नाहीत. जगताना सामाजिक बांधीलकी,समाजाचे ॠण याचे भान त्यांनी ठेवलेले आहे. सामाजिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी,अधिक समृद्ध, सुखदायी ,प्रगत करण्यासाठी त्यांची धडपड आहे.”आधी केले मग सांगितले,” किंवा “ केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे ” ही वृत्तीही आहे.
हे केवळ पुस्तक नाही ही यशाची गाथा आहे. एक प्रेरणादायी दरवाजा आहे. विविध क्षेत्रांमध्ये डौलाने वावरणारी ही यशस्वी माणसे वाचताना उर अभिमानाने भरून जातो. जगी अशक्य काही नाही याचाच अनुभव येतो. इम्पॉसिबल हा शब्दच या व्यक्तींच्या शब्दकोशात नाही.
…. “ जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे “ …(ऋतुजा इंदापुरे)
….” मनुष्याची खरी ओळख त्याच्या नावावरून नव्हे तर त्याच्या कामावरून होते ” …(कर्नल महेंद्र सासवडे)
…. “ आयुष्यातील संघर्षमय परिस्थिती आपल्याला कणखर बनवते, शिकवून जाते. शिवाय एकमेकांच्या गुणांचा आदर करणारी नाती महत्त्वाची असतात.”….( प्रांजली बारस्कर)
…. ” मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है
पंख से कुछ नही होता, हौसलों से उडान होती है “…( मोहित कोकीळ)
…. ” जसा काळ तशी वेळ व त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून जो पुढे जातो तोच जिंकतो. ज्या समाजात युवकांचा मोठा सहभाग असतो तेथे समाजाची प्रगती होते, कामाला गती मिळते.” ( प्रकाश तवटे)
…. ” प्रत्येकाने आपले कुटुंब, समाज, जिल्हा व्यसनमुक्त ठेवावा म्हणजे कुटुंब उध्वस्त होणार नाही. समाज आनंदी राहील.”…( ज्योत्स्ना शेटे )
…. “परमेश्वर त्यांनाच संकटे देतो ज्यांच्यात संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य असते. ते कष्टांना घाबरत नाहीत, त्यांच्यासाठी कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते.”… (निशिकांत धुमाळ)
…. “मोठे झाड लगेच दृष्टीस पडते, मात्र त्याचे प्रथम बी रुजावे लागते, खत पाणी द्यावे लागते, तेव्हा त्याचे एक सुंदर झाडात रूपांतर होते. मूळ घट्ट रोवलेले असेल तर वादळातही झाड मोडत नाही, तुटत नाही “ …..( रवींद्र सासवडे)
…. ” हळद खाऊन केशर खात असल्याचा आव आणणारी आनंदी, सदा हसतमुख अशी माझी नणंद माझा आदर्श आहे.”…( सुरेखा तिवाटणे)
…. ” लढा, पुढे चला व जिंकून दाखवा. अशक्य काहीच नाही.” (डॉक्टर सुनील अंदुरे )
…. ” जोडीदार निवडताना श्रीमंत— गरीब, शिक्षित —उच्चशिक्षित या तफावती बघू नका. स्वकर्तुत्वावर यशस्वी वाटचाल करा,” ( सुभाष साळवी)
…. ” शिक्षणाला संस्काराची जोड असली तर चमत्कार होतात.”…( डॉक्टर ज्ञानदेव कासार)
असे अनेक अनमोल संदेश या पुस्तकातून या व्यक्तींकडून, त्यांच्या जीवन कहाण्या वाचताना वाचकाला मिळतात. हे नुसतेच संदेश अथवा सुविचार नव्हेत तर त्या जगण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स आहेत. वाचकाला त्या प्रेरणा देतातच. मार्ग दाखवतात, दिलासा देतात, आशावादी बनवतात, मरगळ उतरवतात आणि तमाकडून प्रकाशाकडे नेतात.
ही अशी पुस्तके एकदाच वाचायची नसतात. ती पोथीसारखी मनाच्या देव्हाऱ्यात जपायची असतात. त्यांची पारायणं करायची असतात.
हे पुस्तक वाचताना मनात आणखी एक विचार येतो की यश म्हणजे काय? यशाची व्याख्या काय? पैसा,गाडी, बंगला ही भौतिकता की अजून काही वेगळे? यश म्हणजे स्वप्नपूर्ती. यश म्हणजे जीवनातले रचनात्मक बदल, ही सर्व उत्तरे या पुस्तकात मिळतात. यशाची वेगवेगळी परिमाणे इथे अनुभवायला मिळतात.
कोण हो ही माणसं? ज्यांचं नाव माहीत नाही, ज्यांना झगमगीत वलय नाही, ज्यांचे फोटो नाहीत, बातम्या नाहीत पण तरीही वाचनीय, आदर्शवत ,प्रेरणादायी अशी ही माणसे ! कोळशातले हिरे, चिखलातली कमळं ! समाज यांच्यामुळे घडतो, सावरतो.
या पुस्तकात जरी एका विशिष्ट समाजातल्या व्यक्तींच्या यशाचा विचार केलेला असला तरी हे पुस्तक जातीयवादी नाही, तर ते प्रातिनिधिक स्वरूपात लिहिलं गेलं आहे हे विशेष.
” रश्मीताई ! तुमच्या अप्रतिम कामगिरीला माझा मानाचा मुजरा ! यातल्या काही व्यक्तींविषयींचे, श्री देवेंद्र भुजबळ यांनी संपादन केलेले आहे त्यांनाही दंडवत ! आणि अलकाताई, तुम्ही या लेखन प्रपंचाची दखल घेतली म्हणून तुम्हालाही सलाम ! अशीच दर्जेदार, समाजाला घडवणारी, समाजभूषण पुस्तके आपण प्रकाशित करावीत… त्यासाठी खूप खूप शुभेच्छा !”
जाता जाता एक अजून सांगावसं वाटतं ते या पुस्तकाच्या मलपृष्ठाच्या अगोदरच्या पानाविषयी. त्यावरचं चित्र मला अतिशय बोलकं वाटलं. शिखरावर पोहोचलेली एक व्यक्ती प्रयत्नपूर्वक चढाव चढणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे करते … वाह ! क्या बात है ! कृष्णधवल छटांमधल्या या दोन सावल्या जीवनाचं मर्मच सांगून जातात…
…. एकमेका सहाय्य करू।
अवघे धरू सुपंथ।।
परिचयकर्त्या : सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अष्टदीप’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक – ‘अष्टदीप’
लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या – ३०० पाने
पुस्तकाचे मूल्य – ४२५ रुपये
पुस्तक परीक्षण- सुश्री विभावरी कुलकर्णी
अष्टदीप पुस्तकाविषयी
या पुस्तकात भारतरत्न मिळालेल्या आठ व्यक्तींची चरित्रे लेखकाने रेखाटली आहेत. महर्षी कर्वे, जे आर डी टाटा, सर विश्वेश्वरय्या, लता मंगेशकर, लाल बहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, सरदार पटेल आणि ए पी जे अब्दुल कलाम. या सर्वांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि त्यांचे कर्तृत्व रसाळ आणि सोप्या भाषेत वर्णन केले आहे. दीपस्तंभाप्रमाणेच ‘ अष्टदीप ‘ हे पुस्तक तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही.यातील व्यक्ती भिन्न परिस्थितीतून असलेल्या आहेत.पण सर्वांनी काम मात्र देशासाठीच केले.आणि त्या साठी या सर्वांच्या नावा आधी असलेली विशेषणे त्यांचे कार्य सांगून जातात.या सर्वांनीच अतिशय खडतर प्रवास केला आहे.आणि तोच या पुस्तकात वाचायला मिळतो.
निश्चयाचा महामेरू महर्षी धोंडो केशव कर्वे
नाव वाचताच लक्षात येते खूप प्रतिकूल परिस्थितीत अचल महामेरू प्रमाणे ठाम ध्येय डोळ्या समोर ठेवून निश्चयाने काम केले आहे.त्यांचे विधवांचे पुनरुत्थान आणि स्त्री शिक्षण याने जगातील स्त्रियांना वेगळेच स्थान मिळवून दिले आहे.प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली छोटी संस्था आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरीत झाली आहे.आणि कित्येक महिलांचे कल्याण झाले आहे.
द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरैया
पाणी, कालवे, बंधारे यावर त्यांनी केलेले संशोधन व प्रयोग आजही उपयुक्त ठरत आहेत. किंवा त्याला पर्यायच नाहीत. त्यांना आधुनिक विश्वकर्मा म्हणतात.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
द्रष्टा उद्योगपती जे.आर.डी.टाटा
कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ‘दिवसातून आठ तास काम’, ‘मोफत आरोग्यसेवा’, ‘भविष्य निर्वाह निधी’ आणि ‘अपघात विमा योजना’ अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.
टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय साली मुंबईत सुरू केले
लाल बहादूर शास्त्री
अतिशय साधी रहाणी व देशा साठी केलेले कार्य यांच्या वरील जी भाषणे ऐकतो त्या पेक्षा वेगळी व सखोल माहिती या पुस्तकात मिळते.
अशीच माहिती आठही रत्नांची मिळते.
यातील लता मंगेशकर यांचे छोटी लता ते महान गायिका लता मंगेशकर असा जीवन पट वाचायला मिळतो.आणि सध्या त्यावरील एका सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद पण आपण घेत आहोत.
ठळक वैशिष्ट्ये
आठ भारतरत्न प्राप्त व्यक्तींचा आदर्श हे पुस्तक आपल्या समोर ठेवते.
मूल्यविहीन तडजोड, भ्रष्टाचार इ च्या पार्श्वभूमीवर या भारतरत्न प्राप्त व्यक्तींचे जीवन म्हणजे जणू आपल्यासमोर धरलेला आरसा आहे.
देशासाठी बांधिलकी, त्याग करणे, कठीण परिस्थितीत खचून न जाता तिला धैर्याने तोंड देणे या गोष्टी हे पुस्तक नकळतपणे शिकवून जाते.
मूल्य – 425/- प्रकाशन – जुलै 2022
श्री विश्वास विष्णु देशपांडे
लेखकाविषयी
विश्वास देशपांडे हे लोकप्रिय लेखक असून त्यांची यापूर्वीची पुस्तके वाचकांकडून गौरवण्यात आली आहेत. ललित लेखन हा त्यांचा आवडता प्रांत आहे. सकारात्मक आणि आनंद देणारे लेखन हे त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य आहे.
कवडसे सोनेरी अंतरीचे व आकाशझुला ही दोन्ही पुस्तके शासनमान्य पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत.आणि बेसटसेलर पुस्तकात या पुस्तकांच्या बरोबर अष्टदीप याचाही समावेश आहे.
आत्ता पर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.आणि नवीन पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहेत.
अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन पण सोप्या सुटसुटीत शब्दात वाचकांच्या समोर आणणे हे लेखन वैशिष्ट्य आहे. त्या मुळे आपल्याच मनातील भावना व्यक्त होत आहेत असे वाटते.लेखकांची निरीक्षण शक्ती पण खूप दांडगी आहे.आणि शांत, गंभीर, सुस्पष्ट आवाजातील निवेदन या मुळे रेडिओ विश्वास वरील कार्यक्रम (आठवड्यातून तीन दिवस प्रसारित होणारे) अतिशय लोकप्रिय झाले आहेत.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते,लेखकांची सर्वच पुस्तके संग्रही ठेवावी व भेट म्हणून द्यावीत.
या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांचा राष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, प्रेरणादायी व्यक्तिकथा हा पुरस्कार ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्राप्त झाला आहे.पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन!
पुढील साहित्य निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा!
पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वाचन लिखाणाची आवड. वाचनाच्या आवडी पोटी आम्ही मैत्रीणींनी मिळून चालू केले वाचनप्रेमी वाचनालय. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी दर रविवारी मुलांसाठी वाचन कट्टा घेते.
पुस्तकावर बोलू काही
☆ “मागे वळून पाहताना” – डॉ. पी. डी. सोनवणे ☆ परिचय – सौ. सुनंदा शिवाजी कदम ☆
पुस्तकाचे नाव_ मागे वळून पाहताना
लेखक_ डॉ. पी. डी. सोनवणे
प्रकाशन_ शिवस्पर्श प्रकाशन
पृष्ठसंख्या_ 407
मूल्य_ 500/
पुस्तक अभिप्राय…
आयुष्यात कुठेतरी थांबावं लागतं. लेखक आयुष्याच्या एका वळणावर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून थांबायचे ठरवतात. तेव्हा आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना, त्यांनी अनुभवलेल्या आठवणी कागदावर उतरतात, आणि जन्म होतो …मागे वळून पाहताना…या पुस्तकाचा.. त्यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्राचा..
लेखकाचा जन्म खेड्यातला, पण सधन कुटुंबातला. आजोबांची इच्छा नातवाने डॉक्टर होण्याची. फक्त इच्छा नाही तर त्यांच्या प्रयत्नांनाही सलाम करावासा वाटतो. चौथीपर्यंत लेखकांना त्यांचे आजोबा खांद्यावरून शाळेत सोडत. अभ्यासात गोडी लागण्यासाठी शिक्षकांना स्वतःच बक्षीस देत व उत्तर बरोबर आले कि ते आपल्या नातवाला देण्यास सांगत.
आजोबांच्या कष्टाचे चीज करत, लेखक नेहमी वर्गात पहिले येत असत. एकेक पायरी पुढे चढत पुण्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळतो. मेडिकल मध्ये असतानाच, त्यांचं लग्न, पहिल्या मुलाचा जन्म असे सुखद धक्के तर वडील व आजोबांचे छत्र हरवते असे दुःखद धक्के सहन करत, पी डी सोनवणे डॉक्टर होतात. …
कोकणापासून सुरुवात केलेली सरकारी नोकरी शेवटपर्यंत कोणताही डाग न लागू देता निवृत्त होणे खूपच अवघड गोष्ट. पण लेखकांनी ती साध्य केली. आपल्या सेवेला डाग तर सोडा त्यांच्या शिरपेचात अनेक मानाची तुरे खोवले गेले. शासकीय सेवे सोबत रोटरी क्लब,लायन अशा सामाजिक संस्था शी निगडित त्यांनी अनेक समाजकार्य केली. रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमात त्यांनी नेहमीच योगदान दिले.
कामाच्या व्यापातून आपली गाण्याची ,सूत्रसंचालनाची आवड लेखकांनी आजतागायत जपली आहे. जुन्या परंपरा जोपासत नव्याचा स्वीकार करणारे लेखकांचे विचार मनाला स्पर्शून जातात.
आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर साथ देणारी आपली पत्नी सौ भारती चा उल्लेख नेहमी ते आदराने करतात. आपल्या यशाचे सर्व श्रेय ते आपल्या पत्नीला देतात.
लेखकांची सुसंस्कारित मुले, सुना, नातवंडे यांनी जणू घराचं गोकुळच फुलले आहे.
लेखकांच्या समाजकार्याचे अनुकरण करत त्यांचे मोठे चिरंजीव डॉक्टर अभिजीत सोनवणे हे डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून काम करतात. भिक्षेकर्यांचे डॉक्टर म्हणून त्यांना ओळखतात. डॉक्टर अभिजीत सरांनी आपल आयुष्य भिक्षेकर्यासाठी वाहून घेतल आहे.
आपला नातू डॉक्टर व्हावा हे आजोबांनी पाहिलेलं स्वप्न लेखकाने प्रत्यक्षात उतरवलंच, शिवाय स्वतःच्या नातवाला सोहमला प्रत्यक्ष डॉक्टर होताना पाहण्याचं भाग्य ही लेखकाला लाभल आहे.
सामान्यातील असामान्य डॉक्टर पी डी सोनवणे यांचे आत्मचरित्र खरंच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
पुस्तक विक्रीतून मिळणारे सहयोग मूल्य डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या सोहम ट्रस्ट ला भिक्षेकर्यांच्या सेवेसाठी दिले जाणार आहे. पुस्तक विक्रीतूनही समाजकार्य .
संवादिनी : सौ. सुनंदा शिवाजी कदम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈