सौ. वीणा आशुतोष रारावीकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆
☆ क्लिक ट्रिक – अर्चना देशपांडे जोशी ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆
लेखिका : अर्चना देशपांडे जोशी.
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : १२६
किंमत : रु. १७५/-
सध्याच्या मोबाईलच्या जगात सर्वच जण फोटो काढत असतात आणि लाईक मिळवत असतात. “फोटो काढणे” हा एक खेळ झाला आहे. अशावेळी मनात शंका येते, “फोटोग्राफी” ही कला म्हणून आता अस्तित्वात आहे का? याचे उत्तर आपल्याला अर्चना देशपांडे जोशी यांच्या ‘क्लिक ट्रिक’ या पुस्तकात मिळते. खरी फोटोग्राफी, मोबाईल फोटोग्राफी आणि आपले आयुष्य यांचा मेळ घालत, बत्तीस ललित लेखांची मालिका असलेले हे पुस्तक. ‘छायाचित्र कलेवरच सोप्पं भाष्य’ असे सांगत प्रस्तावनेलाच सुधीर गाडगीळसरांनी पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. तर विनायक पुराणिक सरांनी या पुस्तकाचे योग्य शब्दात वर्णन केले आहे. फोटो काढण्याची एक वेगळी नजर या पुस्तकातून मिळते, असे ते सांगतात. तर यापुढे जाऊन मला वाटते, फक्त फोटोच नाही, तर जीवनातील विविध प्रसंगाना वेगळ्या नजरेने बघण्याची दृष्टी यातून मिळते. ‘मनाला मुग्ध करणाऱ्या फोटोंचे मंत्र’ सांगतानाच लेखिकेने ‘आपल्या लक्षात न येणारे सध्याच्या मोबाईल फोटोग्राफीचे तोटे’ यावरही खरपूस भाष्य केले आहे.
हल्ली क्लिक करणे खूप सोप्पे झाले आहे. हवे तेवढे, हवे तसे दशसहस्र क्लिक सारेच सतत करत असतात. पण त्यातील उत्तम क्लिक कोणता झाला? या एका क्लिकचे महत्व आणि तो कसा घ्यायचा, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे .. प्रत्येक लेखातून याचा परिचय होत जातो.
सावली, प्रतिछाया, आपली प्रतिमा. एकच शब्द. अनेक वळणे घेत आपल्या समोर येतो. ‘आधीच उल्हास’ या लेखात फोटोच्या विषयाएवढेच, त्याच्या सीमारेखेचे महत्व सांगितले आहे. फोटोत जिवंतपणा आणण्यासाठी गरज असते थोडा विचार करण्याची आणि शोधक नजरेची. फोटो कंपोझीशनप्रमाणेच त्याच्या बॅकग्राऊंडचा देखील विचार केला पाहिजे. ट्रॅंगल कंपोझिशनची युक्ती स्टील लाईफ फोटोग्राफीप्रमाणे फूड फोटोग्राफीत देखील वापरली जाते. ‘झाले मोकळे आकाश’ या लेखातून वाईल्ड आणि टेली लेन्स मधला फरक सांगताना, लेखिका चिवड्याचे गंमतीशीर उदाहरण देते. कॅमेरा हा कॅनव्हास आणि लेन्स हा ब्रश आहे, हे जर लक्षात आले तर आपले आपणच कलात्मक, सुबक देखणे फोटो काढू शकतो. फोटो एकतर चांगला असतो किंवा नसतो. हल्ली बऱ्यापैकी फोटो सगळेच काढत असतात. फोटो तिथे आधीपासून असतो. तो काढण्यासाठी नजरेबरोबर आपल्या बुध्दीला श्रम घ्यावे लागतात. म्हणजे नेमका फोटो काढल्याचा आनंद आपल्याला मिळतो, असे ‘तो तिथे आहे’ यामधून समजते. ‘जाड्या-रड्या’ तून फोटोग्राफीमधील वेट बॅलन्स म्हणजे काय? हे लेखिकेने नमूद केले आहे. निसर्गात चौकट जागोजागी असते. त्याचा योग्य उपयोग फोटोची चौकट ठरवताना केला पाहिजे. ‘प्रत्येक फोटो काढताना आधी विचार करावा लागतो. हल्ली फोटो काढून झाल्यावर विचार करत बसतात.’ ‘आखीव रेखीव’ मधील लेखिकेचे हे वाक्य आपल्याला विचार करायला लावते. नियम बनवावे लागतात कारण कोणीतरी नियमबाह्य वर्तन केलेले असते म्हणून. ब्रेकींग रूल्स फक्त कुठे आणि किती करायचे असतात, हे सत्य फक्त फोटोग्राफीत नाही तर जीवनात देखील शिकणे आवश्यक आहे. याची जाणीव ‘नियमातील अनियम’ यातून होते. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथला गृहपाठ करणे जरुरीचे आहे. आपल्याला ट्रिपला जायचे असेल तर हे जितके आवश्यक, तितकेच फोटोप्रवासासाठी कोणती सावधगिरी बाळगायाची हे लक्षात घेतले पाहिजे. पावसाळयात फोटोग्राफी करताना कोणती काळजी घ्यायची, याबद्दल लेखिकेने टिप्स दिल्या आहेत. स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे घटनेपलिकडे बघण्याची दृष्टि. ॲग्रीकल्चरल, आर्किटेक्चर आणि इंटीरीयर, मॉडेल, कल्चरल फोटोग्राफी आणि टुरिझम, ऐतिहासिक वास्तू, शिल्प व जंगल असे फोटोग्राफीतील विविध प्रकार आहेत. फोटोक्राफ्ट व कॅन्डीड फोटोग्राफी वाचून आपल्याला आश्चर्य वाटते.
फोटो येण्यासाठी प्रकाशयोजना, कंपोझीशन, ॲंगल, लेन्स, उत्तम गृहपाठ, आपली बुध्दी, विचार, कल्पनाशक्ती आणि नशीबाची साथ लागते. तरीही सर्वोत्तम फोटोसाठी उत्तम कॅमेरा हाच फोटोग्राफरचा उजवा हात असतो, असे लेखिका नमूद करते.
काळ नेहमी पुढे धावत असतो, पण फोटोग्राफीच्या कलेमध्ये काळाला पकडून ठेवायची कला आहे. कलेने ‘आपल्याला श्रीमंत व्हायचे आहे की समृध्द’ असा विचार आपल्याला करायला लावत, लेखिका समेवर येते. प्रत्येक कलेचा मान राखायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे.
मोबईलला ठेवलेले फोटोबाईल हे नाव, योग्यच वाटते. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात कलेतील सौंदर्य लोप पावत आहे, याची खंत लेखिकेला आहे. यासाठी तिने कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंसाठी ‘फोटोफ्राय’ स्पर्धा सुरू केलेली आहे.
एखाद्या विस्तृत कुरणावर ससा मनसोक्त बागडत असतो तशी लेखिका आपल्या लेखात सर्वत्र पळताना दिसते. प्रत्येक लेखात एकेका शब्दांचे अर्थ लिहिताना अनेक अर्थ सहजपणे उलगडले आहेत. आणि त्यातून लेखिका अगदी नकळतपणे आयुष्यातील सत्य सांगून जाते. म्हणूनच फक्त फोटोग्राफी शिकणाऱ्या लोकांनी नव्हे तर आपण सर्व जण हे पुस्तक वाचू शकतो.
फोटोग्राफी इतकाच लेखिकेचा मराठी कविता, चित्रकला याविषयांवर भरपूर अभ्यास झालेला दिसतो.
© सौ. वीणा आशुतोष रारावीकर
लोअर परेल, मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈