☆ महर्षी वाल्मिकी… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
निखळ वाचनाचा आनंद घ्या…
महर्षी वाल्मिकी….
लेखक : विश्वास देशपांडे.
प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे.
अचानक “महर्षी वाल्मिकी“ हे विश्वास देशपांडे लिखित पुस्तक हातात पडले. एखादे पुस्तक पाहताक्षणीच आवडून जाते आणि मनाची पकड घेते. तसंच या पुस्तकाच्या बाबतीत झाले.
आकर्षक मुखपृष्ठ, छोटेखानी पण वेगळेपण नावापासूनच जपणारे, व आत्तापर्यंत माहिती नसलेले आगळे वेगळे पुस्तक. पुस्तकाची रचना अतिशय उत्कृष्ट व उत्सुकता वाढवणारी आहे. सुरुवातीच्या पानावर लेखक परिचय व त्यांची साहित्य संपदा या विषयी माहिती आहे. त्या नंतर पुस्तकाविषयी लेखकांचे मनोगत पुस्तकाची थोडक्यात माहिती देणारे व उत्सुकता वाढवणारे आहे. त्यात भर घालणारी श्री.प्रमोद कुलकर्णी यांची सुंदर प्रस्तावना! मनोगत व प्रस्तावना वाचून कधी ते पुस्तक वाचते आहे असे होऊन गेले.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
विशेष म्हणजे दहा लेख असून अनुक्रमणिका नाही. त्यामुळे एकच गोष्ट वाचत आहोत असे वाटते आणि सलग वाचन केल्याशिवाय राहवत नाही. पुस्तक वाचताना त्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. निसर्ग, ऋषींचा आश्रम, शिष्यगण, नदी, पक्षी, या सर्वांचा आपण एक भाग आहोत असे वाटते.
क्रौंच पक्ष्याच्या हत्येमुळे पूर्वाश्रमीच्या आठवणींच्या रूपात त्यांचा जीवनपट उलगडत जातो. जी गोष्ट शालेय जीवनात ७/८ ओळीत संपत होती तीच गोष्ट पुढच्या तीन लेखात अतिशय बारकाव्यासहित वाचायला मिळते.
वाटमारी करणाऱ्या रत्नाकरचा पश्चाताप, व रामनामाच्या तपश्चर्येमुळे झालेला अनाकलनीय बदल – म्हणजे वाल्मिकी ऋषींमध्ये झालेले रूपांतर फारच रंजक व वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. रामनाम, मनापासून झालेला पश्चाताप व स्वतः मध्ये बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी.
मला असे माहिती होते की नारद मुनींच्या सांगण्यानुसार वाल्मिकींनी तप सुरु केले. पण तेही सत्य समजले व नारदांकडून पुढील कार्याची प्रेरणा मिळाली हेही समजले. देवर्षी व ब्रह्मदेव यांच्या भेटीचा वृत्तांत अतिशय रोचक व अध्यात्मिक उंचीवर घेऊन जातो. विशेषतः मनुष्य आपल्या कर्माने भाग्यरेषा बदलू शकतो– हे मनुष्याच्या हातात आहे– हे विशेष महत्वाचे वाटले.
त्यांनी रामकथा कशी लिहिली? याचे उत्तर मिळाले. खरोखरच दिव्य शक्तींच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. रामकथा त्यांच्या डोळ्यासमोर कशी साकारली हेही समजले.—- वाल्मिकी ऋषींनी रामायण काव्यात समाजाला उपयोगी व चिरंतन तत्वे रंजक रीतीने मांडली आहेत. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आदर्श आजही उपयुक्त आहेत. मानवी भावभावना अतिशय उत्तम रीतीने साकारल्या आहेत. त्यातून आदर्श राजा, समाज याची चिरकाल टिकणारी शिकवण मिळते.
हे पुस्तक खूप अभ्यासपूर्वक आपल्या समोर आले ( माझ्या माहिती प्रमाणे हे एकमेव असावे ), आणि बरीच माहिती मिळाली. गैरसमज दूर झाले. वाल्मिकी खरंच महान होते. इतके चिरकालीन टिकणारे महाकाव्य लिहून ठेवले, मात्र स्वतःची माहिती कुठेच ठेवली नाही.
आपल्यापर्यंत महर्षी वाल्मिकी यांचा जीवनपट आपल्या लिखाणातून पोहोचवणाऱ्या देशपांडे सरांचे मनापासून आभार ! कितीही आभार मानले तरी कमीच आहेत.
परिचय – विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“जीजी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच दि.२६ मार्च २०२३ रोजी गुणवंतांच्या उपस्थितीत सुरेख पद्धतीने संपन्न झाला.
अवघ्या ८८ पृष्ठांचे हे पुस्तक जसजशी वाचत गेले तसतशी त्यांत मनाने पार डुंबून गेले,शेवटचे पान वाचेपर्यंत एका जागेवर या पुस्तकाने खिळवून ठेवले.एका आजीची ही कहाणी अत्यंत ह्रदयद्रावक आणि कुठेतरी भेदून जाणारी…!जीजीचे संपूर्ण चरित्र यात रेखाटले असले तरी ते आत्मचरित्र नाही,किंवा चरित्र या साहित्यप्रकारातही मोडणारे नाही असे मला वाटते.
हे पुस्तक म्हणजे जीजीने स्वतः लिहीलेली तिची कहाणी वाचताना लेखिकेच्या भावनांचा
झालेला हा कल्लोळ आहे.त्यामुळे पुस्तकातील एकेक शब्द,एकेक ओळ वाचकाच्या ह्रदयाला जाऊन भिडते.
अत्यंत सुस्थितीत वाढलेली,सधन कुटुंबात विवाह होऊन आलेल्या जीजीला तिच्या पुढील आयुष्यात नशीबाने अल्पवयात वैधव्य आल्याने,तिने समाजाशी धीराने आणि आत्मविश्वासाने कसा लढा दिला,तिच्या एकमेव पुत्राला उत्तम प्रकारे कसे घडविले हे वाचताना डोळ्यातील आसवे थांबत नाहीत.
अतिशय प्रभावी शब्दांकन…..!अगदी तिर्हाईत,अपरिचित वाचकाच्या
नजरेसमोरही ही जीजी उभी रहाते.
सुरवातीलाच राधिकाताई लिहितात,”एक व्यक्ती म्हणून तिला वाचायचं होतं,तिचा शोध घ्यायचा होता.तिच्यातलं स्त्रीत्व जाणायचं होतं.तिच्यातली शक्ती जाणायची होती.आमच्या व्यतिरिक्त तिच्या शब्दातून बघायचं होतं.”
“खरंच बोराच्या झाडासारखंच होतं ना तिचं आयुष्य! काटेरी रक्तबंबाळ करणारं!पण तिने मात्र रुतलेल्या काट्याचा विचार न करता गोड बोरांचाच आनंद उपभोगला.”
ह्या अशाप्रकारच्या लेखनाने जीजी वाचायची वाचकांची उत्सुकता ताणते.त्यामुळे पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही.
जीजीची कहाणी सांगत असताना राधिकाताईंचा जीजीसोबतचा वास आणि घेतलेले अनुभव ह्यामुळे वर्तमान काळात वावरल्यासारखे वाटते.आजही जीजी सोबत आहे असा विचार मनात येऊन काहीतरी आत्मीक बळ आल्यासारखे वाटते.
जीजीचे तिच्या पाचही नातींवरचे नितांत प्रेम हे लेखिकेने स्वानुभवावरून फार समर्थ शब्दात प्रदर्शीत केले आहे.प्रत्येकच वाचकाला जीजी वाचत असताना स्वतःची आजी कोणत्या ना कोणत्या रूपात दिसल्याशिवाय रहाणार नाही हे निश्चित!त्यामुळे ह्या पुस्तकाविषयी कुठेतरी आत्मीयता वाटते.
१०० वर्षापूर्वीच्या काळातील जीजी आणि तिने दिलेले आधुनिक संस्कार या विषयी राधिकाताई सांगतात,”मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरे?असा पळपुटा,मळकट,कडू संस्कार मात्र तिने आमच्यावर कधीही केला नाही.आयुष्यात अनेक चढउतार आले,रस्ते काही नेहमीच गुळगुळीत नव्हते,दगड,खडे,काटे सारे टोचले.अपरंपार अश्रू गाळले पण कणा नाही मोडला,”जीजीने तिच्या कुटुंबाला(मुलगा/सून आणि पाच नाती) समर्थ बनविले.
राधिकाताईंच्या प्रभावी लेखनशैलीमुळे जीजी प्रत्येकाला आपली वाटते हेच या व्यक्तीचित्रणाचे यश आहे.
सर्वांनी वाचावे आणि जीवनात सकारात्मकतेचा बोध घ्यावा असे हे पुस्तक जीजी.
पुस्तकाच्या मुखपृष्ठासंबंधी थोडेसे~ मुखपृष्ठावर ज्या काही ओळी छापलेल्या दिसतात ते जीजीचे हस्ताक्षर आहे आणि तिच्या फोटोचे स्केच तिची सगळ्यात
धाकटी नात,जिचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाले ती उषा ढगे हिने केले आहे.
जीजीच्या बाकीच्या चार नातींनीही त्यांच्या व जीजीच्या एकत्रीत सहवासाचे विविध अनुभव लिहीले आहेत.
राधिकाताईंची ही वाटचाल अशीच सतत चालत राहो आणि त्यांची विविध विषयावरील पुस्तके झपाट्याने प्रकाशित होवोत ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा!
पुस्तक परिचय – सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रकाशक – मिलिंद राजाज्ञा, नवदुर्गा प्रकाशन, कोल्हापूर.
पृष्ठे – २८०
किंमत – ५१० रु .
☆ मनोगत – सौ. नीला देवल ☆
माझी अग्निशिखा ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित झाली आहे त्यात तिचे हे मनोगत.
गुजरात मधील राजकुमारी आणि देवगिरीच्या शंकर देवांची राणी देवल देवी हिचे काळजाला भिडणारे चरित्र यामध्ये आहे.
इतिहासातील अज्ञात अनेक वीरांगणा पैकी ही एक देवल देवी जी अनंत आपदा संकटे अंगावर झेलते. प्रचंड स्व धर्माभिमानी, राष्ट्राभिमानी, मुच्छद्दी, धोरणी अशी स्त्री अल्पकाळ का होईना भारताची सम्राज्ञी म्हणून दिल्ली सिंहासनाधिष्ठित होते. अखंड भारताचे स्वप्न साकारते. अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वप्नांचा चक्काचूर करून.
अशा शूरवीर, धुरंदर स्त्रिया ज्या अज्ञात इतिहासातील पानापानात दडलेल्या. आहेत. पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी नारी शक्तींची ही चरित्रे जी भारतीय ना अज्ञात आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देवल देवीची ही कथा नक्कीच प्रेरणादायी होऊन अनेक लेखिका अशा ऐतिहासिक स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्युक्त होतील. तेच या कादंबरीचे यश होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकातील देवल देवी व खुशरूकान या वरच्या स्वतंत्र प्रकरणावरून प्रेरणा मिळवून केवळ त्या प्रकरणाचा विस्तारित भाग म्हणजे ही कादंबरी आहे. स्वदेशासाठी जोहार करणाऱ्या रजपूत स्त्रिया इतकी प्राणपणाने स्वधर्म व स्वदेश राष्ट्र रक्षणारी राजकारणी, मुच्छद्दी आदर्श आशा स्त्रीचे चरित्र म्हणजे ही कादंबरी आहे.1857
सारखेच खुशरूकान व देवलदेवीने केलेले हे स्वातंत्र्य समरच आहे.
☆ एका रानवेड्याची शोधयात्रा… श्री कृष्णमेघ कुंटे ☆ परिचय – सौ. उज्वला केळकर ☆
एका रानवेड्याची शोधयात्रा
लेखक – कृष्णमेघ कुंटे
राजहंस प्रकाशन
पृष्ठे – १६९ मूल्य – १२५ रु.
परिचय उज्वला केळकर
कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले. त्यांनी तिथे जगलेलं जीवन, घेतलेले अनुभव म्हणजे एका रानवेड्याची शोधयात्रा’. तिथे ते घामानं थबथबेपर्यंत, पोटर्या लटपटेपर्यंत, बूट फाटेपर्यंत, मांड्या दुखेपर्यंत, पाठीचा कणा मोडेपर्यंत हिंडले. नादावल्यासारखे परत परत झाडीमाध्ये फिरत गेले. जंगलातील सर्व ऋतूंमधीलरूप, रंग, नाद, स्पर्श अनुभवले. त्यामधला रस घेतला आणि तितक्याच रसिलेपणाने, शब्दांमधून तो अनुभव वाचकांपर्यंत पोचवला.
पहिल्या प्रकरणात लेखकाने आपण मदुमलाईच्या जंगलात का व कधी गेलो, ते सांगितलय. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ते रसायनशास्त्रात नापास झाले. दुसर्या वर्षाचे सर्व विषय सुटले होते, पण रसायनशास्त्रात पास झाल्याशिवाय पुढे जाता येणार नव्हते. मग वर्षभर काय करायचं? याबद्दल विचार चालू असतानाच, त्यांचे सर मिलिंद वाटवे यांनी विचारणा केली की मदुमलाईच्या जंगलात अभ्यासाठी जातोस का? त्यांना रानकुत्र्यांचा काही अभ्यास करायचा होता. त्यांच्या अभ्यासाचा पाठपुरावा कृष्णमेघांनी करावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. तिथला त्यांचा सगळा खर्च ते करणार होते. जंगल भ्रमंतीचं वेड असणार्या आणि वन्य प्राण्यांबद्दल कुतूहल असणार्या कृष्णमेघांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. ते ६ वीत असताना ‘फ्रेंडस ऑफ अॅनिमल्स’ या संस्थेने अंदमान येथे घेतलेल्या शिबिराला हजर राहिल्यापासून त्यांना वन्य जीवनाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. मदुमलाईच्या जंगलात राहून ते मिलिंद वाटवे यांच्यासाठी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करणार होते.
त्यानंतर लेखकाने मदुमलाईचे जंगल आणि त्यांच्या पंचक्रोशीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलय, ‘अन्य जंगलांप्रमाणे हे एकांडं जंगल नाही. तामीळनाडू, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यात पसरलेल्या भल्या मोठ्या अरण्याचा, मदुमलाईचे जंगल हा एक भाग आहे. नीलगिरी पर्वतरांगेत हे जंगल येते.’ पुस्तकाच्या शेवटी मदुमलाईच्या जंगलाचा नकाशाही दिलेला आहे. ते म्हणतात, मदुमलाईचा गाभा बघायचा असेल, तर म्हैसूर-उटीचा डांबरी रस्ता सोडून उजवीकडे आत शिरलं पाहिजे. तिथून पुढे फक्त झाडा-झुडपांचं, दाट गवताचं, हत्ती –अस्वलांचं, केताचं ( कृष्णमेघ यांचा आदिवासी वाटाड्या) आणि त्याच्यासारख्या जंगलात रमणार्यांचं साम्राज्य. आपण त्यात प्रामाणिकपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडा-फार यशस्वी झाला, असं ते म्हणतात. त्यांनी लिहिलय, ‘मी मदुमलाईला आलो आणि कक्कनल्लापासून थोरापळ्ळीपर्यन्त आणि मासिनागुडीपासून गेम हटपर्यन्त, साधारण देडशे- दोनशे चौ. की. मीटरचं जंगल मला उंडारायला मिळालं.’
मदुमलाईला आल्यावर प्रथम ते मासिनागुडीत राहिले. इथे त्यांचे स्वतंत्र घर होते. इथे ५-६ घरातून रहाणार्या शेजारी संशोधकांची थोडी माहिती ते देतात. चार-दोन लेखणीच्या फटकार्याने बोम्मा या त्यांच्या स्वयंपाक्याचे आणि कोता या त्यांच्या आदिवासी वाटाड्याचे दर्शन ते घडवतात. इथून आपल्या आनंदी प्रवासाची सुरुवात झाल्याचे ते सांगतात.
ते ज्या प्रदेशात फिरले, तिथली झाडे-झुडुपे, पक्षी-प्राणी, नद्या-ओढे, उंचवटे-टेकड्या या सार्यांचं वर्णन अगदी चित्रमय शैलीत झाले आहे. आनईकट्टी येथील वर्णन उदाहरण म्हणून बघता येईल. ‘या भागाचं रूपही वेगळं आहे. इथे उंच डोंगर नाही की सपाट जंगल नाही. आहेत त्या अगदी दाटीवाटीने उभ्या असलेल्या, एकमेकांच्या पोटात शिरणार्या छोट्या छोट्या टेकड्या आणि त्यांच्यामधून वाहणारे उन्हाळ्यात रोडावणारे सडपातळ ओढे. पाऊस कमी, त्यामुळे आभाळाला हात लावणार्या पण एकमेकांपासून अलिप्त रहाणार्या उंच झाडांऐवजी इथे एकमेकांच्या हातात हात आणि गळ्यात गळे घतलेल्या , नसती गर्दी करून राहणार्या बुटक्या झाडांची आणि झुडुपांची रेलचेल आहे. आनईकट्टीत बाभळी, ईखळ, धावडा, खैर, पांगारा, चंदन, निवडुंगाचं साम्राज्य.. इथल्या धसमुसळ्या, बाकदार काटेरी जाळ्यांच्या प्रेमळपणापासून, काट्यात कपडे धरून ठेवण्याच्या हट्टापासून थोडं जपूनच राहिलेलं बरं. इथलं रहाणीमान पाठीचा कणा मोडणारं आणि हिंडणं पायाचे तुकडे पाडणारं, पण इतकं रोमांचकारी की इथून पाय लवकर हलत नाही.’
आपल्या भटकंतीतील प्रदेशाप्रमाणे इथले प्राणी, पक्षी, कीटक इ. चे वर्णनही त्यांनी सविस्तर केले आहे. त्यांच्या दिसण्याप्रमाणेच, त्यांचे स्वभाव, सवयी याबद्दल लिहिले आहे. काही निरीक्षणे, अभ्यास नोंदवला आहे. हत्तींमध्ये नराला दात असतात. माद्यांना नसतात. . त्यांना आपल्या कळपाजवळ कुणी इतर प्राणी आलेला चालत नाही. ते लगेच त्याला हुसकावून लावतात. पाणी जसं ते आपल्या अंगावर घालून घेतात, तसंच पाण्याकाठची मातीही सोंडेने आपल्या अंगावर घालून घेतात. उन्हापासून आणि एक प्रकारच्या रक्तपिपासू माशांपासून आपला बचाव करण्यासाठी ते आपल्याला मातीने माखून घेतात. आपल्या विष्ठेचा वास सहन न झाल्यामुळे किंवा आसपासचे गवत जून निबर झाल्याने, कोवळ्या लुसलुशीत गवताच्या शोधात हत्ती स्थलांतर करतात. डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्ती आईनकट्टीला येतात. हा भाग हत्तींच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. इथे शिकार करणार्या वीरप्पनसह आणखी तीन टोळ्या आहेत. हस्तीदंतासाठी शिकार होते. एकदा या भागात गेलेले नर पुन्हा दिसत नाहीत. शिकार्याच्या गोळीला बळी पडतत, असं आदिवासी सांगतात.
रानकुत्री ही बुटकी असतात. ती भुंकत नाहीत. इतर प्राण्यात नर, तर या कुत्र्यांमध्ये मादी ही टोळीची राणी असते. तीच तेवढी नवी पिले जन्माला घालू शकते इतर माद्या नवी पिल्ले जन्माला घालत नाहीत. त्या नवीन जन्मलेल्या पिल्लांना वाढवायला मदत करतात. राणी म्हातारी झाली किंवा मेली की दुसरी मादी राणी होते. रानकुत्री भुंकत नाहीत. एकमेकांशी संपर्क करण्यासाठी शीळ घालात. अशी अनेक प्राण्यांबद्दलची निरीक्षणे त्यांनी इथे नोंदवली आहेत. रानकुत्र्यांच्या पोटातील परजीवी आणि चितळांच्या पोटातील परजीवी यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी लेखक तिथे गेला होता. हा संबंध असायचं कारण म्हणजे चितळ हे रानकुत्र्यांचं भक्ष. तसाच हातींचाही अभ्यास त्यांना करायचा होता.
जंगल भ्रमंतीत अनेक थरारक प्रसंगांचे अनुभव त्यांनी घेतले. अगदी जीवघेणे प्रसंगही आले. ते वाचताना त्याचा थरार वाचकांनाही जाणवतो. मग प्रत्यक्ष अनुभवलेल्यांची त्यावेळी कशी स्थिती झाली असेल? हे सारं वर्णन इतक्या चांगल्या शब्दात झालय की आपण वाचत नसून व्हिडिओ बघतोय असं वाटतं. खरं तर या पुस्तकावर उत्तम माहितीपट होऊ शकेल.
एकदा आईनकट्टीला असताना ते व केता, त्यांचा मागकाढया , दुपारी एका ओढ्याकाठी जेवायला बसले होते. पाठीमागे गच्च जाळी. ओढ्याच्या पलीकडे झुडुपांमध्ये जोरात खसखस सुरू झाली. चित्कार, आरोळ्या यांनी जमीन हादरू लागली. हत्तींचा एक कळप जवळ जवळ पळतच त्यांच्या दिशेने येत होता. ओढा उथळ असल्याने हत्तींना सहज ओलांडता येणार होता. पाठीमागच्या जाळीमुळे त्यांना पळून जाणंही शक्य नव्हतं. पण सुदैवाने हत्ती ओढा ओलांडून, त्याला समांतर चालत राहिले. ते त्यांच्या दिशेने आले असते तर…
एकदा रानकुत्र्यांच्या गुहेच्या शोधात ते मोयार गॉर्जपाशी आले. खाली खोल दरी. तिथे उतरायला वाट नव्हती. शेवटी त्यांच्यापासून ४-५ फुटांवर असलेल्या झाडावरून त्यांनी खाली उतरायचं ठरवलं. झाडावर त्यांनी उडी मारली. तो अंदाज बरोबर ठरला. नाही तर त्यांचा कपाळमोक्षच झाला असता. इथे रानकुत्र्यांची गुहा शोधताना त्यांना अजगर दिसला. मगरी दिसल्या. अस्वल, वाघ, पाणमांजरे यांच्या गुहा दिसल्या. हे सगळं वाचता वाचताही आपल्याला धडकी भरते.
कारगुडीला एकदा कुत्र्याच्या टोळीचं निरीक्षण करत कृष्णमेघ आणि अरुण बसले होते. थोड्या वेळाने कुत्री अस्वस्थ झाल्यासारखी वाटू लागली. त्यांनी आवाज केला. त्या आवाजात धोक्याची सूचना होती. जीवाचा आकांत होता. ती कुत्री बघत होती, त्यामागे एक उंचवट्याचा उतार होता. त्यापलीकडे ओढा. ओढ्याभोवती दाट झाडी होती. तिथून गोलसर चेहर्याचा पिवळ्या रंगाचा, अंगावर काले पट्टे असलेला वाघ बाहेर आला आणि चालत त्यांच्याच दिशेने पुढे आला. उंचवट्यावर आल्यावर तो क्षणभर थांबला. वाटेतल्या कुत्र्याच्या अंगावर तो धावला. पण कृष्णमेघ लिहितात, ‘आम्हाला बघून तो बुजला असावा. कुत्र्याचा पाठलाग सोडून तो वळला आणि एक मोठी डरकाळी फोडून तो उंचवट्यामागे गायब झाला. एकदा हत्तींणीने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पळता भुई थोडी झाली. असे अनेक थरारक प्रसंग यात लेखकाने दिले आहेत.
विरप्पन प्रकरणात त्यांनी, आदिवासींच्या काही समस्यांबद्दल, त्यांच्या स्थिती-गतीबद्दल लिहिले आहे.
पुस्तकात जागोजागी, जंगल, हत्ती, गवे, वाघ, कुत्री, पक्षी इ.ची छायाचित्रे वर्णनाला अधीक मूर्त स्वरूप देतात. ऋतुचक्र हे यातलं शेवटचं प्रकरण. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूतील जंगलाच्या बदलत्या रंगरूपाचं वर्णन यात केलं आहे. यात पक्षी, कीटक, कीडे-मकोडे यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या जीवनसंघर्षाबद्दल लिहिलय. जंगल त्यांच्या देहाच्या कणाकणात मुरलय. सरत्या वर्षाबरोबर, म्हणजे, जुलै ९५ मधे त्यांची शोधायात्रा तात्पुरती थांबली. पण संधी मिळताच ती पुन्हा सुरू होईल, यात संदेह नाही.
ज्यांना रानं-वनं- जंगल, प्राणी-पक्षी, झाडं – झुडुपं, नद्या-टेकड्या याविषयी कुतुहल असेल, त्यांनी ‘एका रानवेड्याच्या शोधायात्रे’त जरूर सामील व्हावं आणि आनंद मिळवावा.
जन्मापासून, २१ ऑक्टोबर १९५१ ते ३० सप्टेंबर २००९ होईपर्यंत नागपूर येथे वास्तव्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १९६९ ला ऍडमिशन घेतली. येथून MBBS (१९७४) आणि फार्माकॉलॉजी (औषध शास्त्र) या विषयात MD (१९७९) केले. १९९९ पर्यंत तिथे नोकरी केली, मग इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे (१९९९ते ३० सप्टेंबर २००९) नोकरी केली. फार्माकॉलॉजी विभागात प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. नंतर ४ प्रायव्हेट मेडिकल कॉलेज (चेन्नई, कोईम्बतूर, मथुरा आणि इस्लामपूर) मध्ये जॉब केला. (शेवटचा इस्लामपूर इथे) ऑक्टोबर २१ ला ७० वर्षाचे होऊन रिटायर झाले.
मॅनेजमेंटचे तीन डिप्लोमा आणि समाजशास्त्र या विषयात एम ए केले आहे.
नोकरीच्या काळात लिहीत होते, रेडिओ टॉक (वैद्यकीय विषयांवर) देत होते.
लहानपणापासून पेंटिंगची आवड होती अन आहे, बरेच शिकले.
मराठी, हिंदी, इंग्रजी लिहायची अन वाचायची नितांत आवड होती अन आहे. व्यस्त नोकरी आणि घरच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर पूर्ण वेळ लेखन करावे असे वाटले. समाजमाध्यमांवर आणि फेसबुकवर लिहिते. मी ब्लॉगर आहे. माझे स्वतःचे ब्लॉगर.कॉम अन वर्डप्रेस या दोन साईटवर ब्लॉग असतात. मार्च २०२२ पासून मराठी आणि हिंदी भाषांत नियमितपणे ब्लॉग लिहीत असते. महिन्यातून २ ते ४ ब्लॉग असतात.
मला नाट्यसंगीत आणि जुने चित्रपटसंगीत अतिशय प्रिय आहे. तसेच निसर्गरम्य जागी प्रवास करायला अतिशय आवडते.
सध्या ठाण्यात वास्तव्य आहे. अधूनमधून पुणे येथे जाते.
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – डॉ मीना श्रीवास्तव ☆
पुस्तक – रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष
लेखक- श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव
पुस्तकाचे प्रकाशक-सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन
पृष्ठसंख्या-१३० पाने
पुस्तकाचे मूल्य- १५० रुपये
पुस्तक परीक्षण- डॉ. मीना श्रीवास्तव, ठाणे
देशपांडे सरांनी लिहिलेले “रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष” हे आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक वाचले. रामायणाच्या असंख्य आवृत्त्या आहेत, वाल्मिकी रामायण, तुलसीरामायण, प्रादेशिक वाङ्मय, इतर देशातील रामायणाच्या आवृत्त्या, यांत आणखी भर कशाला हा विचार लेखकाने केला नाही, याचा मला फार आनंद होतोय. त्यांनी या पुस्तकाची रचना विशिष्ट हेतूने केलीत असे मला वाटते. आजकालच्या पिढीला आधुनिकतेचे आवरण असलेली अभिजात कथानकाची पुस्तके फार भावतात, त्यांत मूळ रामायण न वाचता ह्या नवीन संकल्पना वाचून रामायणाविषयी त्यांचे मत फार वेगळे होऊ शकते. उदाहरण द्यायचे तर रावणासारख्या खलनायकाचे उदात्तीकरण करणारी आधुनिक लेखकांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पुरोगामी वाचकांना त्यांची नव्या ढंगाने लिहिण्याची पद्धत भुरळ पाडते, ही नक्कीच चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे श्रीरामाच्या चरित्रातील कांही प्रसंगांच्या निमित्त्याने वादग्रस्त मजकुराचे समर्थन आणि प्रसारण करीत, श्रीरामाच्या उज्ज्वल चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे कार्य देखील कांही मंडळी करीत असतात, यामुळे नवीन पिढीचे भ्रमित होणे देखील साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते असे मला वाटते. ‘वाल्मिकी रामायण’ हे सदाहरित असा साहित्यप्रकार आहे! मात्र लेखकाने रामायणाच्या कैक आवृत्त्यांचा गाढ अभ्यास केला आहे, हे जाणवते. ही रामभक्ती अन प्रीती डोळस आहे, म्हणूनच पारंपरिक रामायणाची कथा यात नाही, ती येते स्वाभाविकपणे खळाळत्या निर्झराच्या प्रवाहासारखी!
श्री विश्वास विष्णु देशपांडे
हे पुस्तक सर्वधर्मियांसाठी आहे, कारण यातील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे यातील प्रत्येक पात्र. वाल्मिकींनी जणू काही त्या व्यक्तिविशेष आदर्शाच्या परिसीमा म्हणूनच निर्माण केल्यात. लेखकाने पुरुषोत्तम रामाचे गुणविशेष तीन भागात अत्यंत विचारपूर्वक अन सुंदररित्या मांडले आहेत. राम हा अलौकिक पुरुषोत्तम आहे, त्याचे गुण गातांना वैखरी मुग्ध होते, शब्दभांडार रिते होते, उरते केवळ मनात त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्व, इतके की सूर्य आपले तेज, हिमालय आपली उंची, सागर आपली खोली अन चंद्र आपल्या सोळा कला रामाच्या तुलनेत आपण बसतो तरी का, हे तपासून बघतील! ही तीन प्रकरणे मूळ पुस्तकातच वाचावी! उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला राम हा आदर्शाचा मेरुमणी, पुत्र, पती, बंधू, सखा, राजा, शिष्य, योद्धा आणि कळस म्हणजे शत्रू देखील! लेखकाने रामाचे चरित्र कायमच एक सर्वगुणसंपन्न मानव म्हणूनच रंगवले आहे, त्याला देव्हाऱ्यात बसवले नाही! मात्र एक सामान्य मानव किती अशक्यप्राय गोष्टी करू शकतो अन त्या मुळेच देवत्व चरणांपाशी नमते, हे माझ्या मते या तीन भागांचे सार आहे!
रामाच्या सोबत त्याची संगिनी, अर्धांगिनी अन अनुगामिनी सीता आलीच! खरे पाहिले तर ही जोडी अभिन्नच, “जेथे राघव तेथे सीता”! आदर्श कन्या, सून, भगिनी, माता, पत्नी, पण याहून अधिक आपले स्वतंत्र व्यक्तित्व जपणारी आदर्श स्त्री. चंद्राला जशी रोहिणी, तशी रामचंद्राला शोभेल अशी पावित्र्याची अन पातिव्रत्याची परिसीमा, अर्थात सर्वगुणसंपन्न अशी ही सीता! सर्वप्रथम एका मनोहर उपवनात रामाला बघूनच त्याला आपले हृदय अर्पण करणारी, स्वयंवरात “वरमाला घेऊन अधीर होऊनि सौख्याचे मंदिर गाठणारी” अन त्याच सुकुमार चरणांनी रान तुडवणारी, रामाजवळ सुवर्णमृगासाठी हट्ट करणारी, रावणाला “कोल्हा” म्हणून रामाची तुलना सिंहाशी अन स्वतःची तुलना एका सिंहीणीशी करणारी अनुपमेय मैथिली! विश्वास सरांनी आपल्या लेखणीतून सीतेचे व्यक्तिमत्व इतक्या अलौकिक रित्या साकार झाले आहे की, क्या कहने! शिवाय तिच्यावर रामाने केलेल्या “कथित अन्यायाचा” संवेदनशील भाग फार संयमाने आणि निष्पक्ष रित्या हाताळला गेल्या आहे. अशी अनुपमेय जोडी आजच्या “आज ब्याह कल शायद तलाक” अश्या काळात स्वप्नवत वाटते ना!
या पुस्तकात रामायणातील इतर व्यक्तिरेखा अतिशय चोखंदळपणे निवडलेल्या दिसतात. आजच्या काळात आपल्यासमोर आदर्श, अनुकरणीय व वंदनीय असावीत, अशीच ही पात्रे! लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, उर्मिला, मंदोदरी, बिभीषण, यांचे गुणविशेष त्या त्या प्रकरणात नेमकेपणाने सादर झाले आहेत. विशेष म्हणजे परमभक्त हनुमान याच्यावरील दोन प्रकरणे फारच वाचनीय आहेत.
वणासारख्या खलनायकाचे व्यक्तित्व लेखकाने निष्पक्षपणे हाताळलेले आहे. यातून रावण आजही अस्तित्वात आहे, हे जाणवले. तो आपल्यात किती आहे, हे अनुभवण्यासाठी हे प्रकरण वाचावे! याच अनुषंगाने आपण “राम आणि रावण” यांच्या प्रवृत्तीतील भिन्नता(अनुक्रमे विश्वात्मक विचार अन व्यक्तिवाद), व नैसर्गिक अशी “रावण वृत्ती” अन संस्कारातून साकार झालेली “रामवृत्ती” याचे केलेले विवेचन फार विचारणीय आहे. यामुळे आजच्या घडीला युवा तसेच बालकांमध्ये रामवृत्ती निर्माण होण्यासाठी पालक, शिक्षक अन समाजाला काय करता येईल याचे भान यावे ही अपॆक्षा आहे! आजच्या घडीला रामायणावरील या पुस्तकाच्या दीपस्तंभाची समाजाला गरज आहे. आणखी एका नकारात्मक व्यक्ती म्हणजे कैकेयी! काळे कपडे घातलेली, कोपभवनातील खलनायिका हे तिचे चित्र जनमानसात फिट्ट बसले आहे लेखकाने त्याला पूर्णपणे छेद देत तिचे मनोविश्लेषणात्मक चित्रण केलय! वाईटातून चांगले (रावणाचा नाश) होण्यास कैकेयी कारणीभूत ठरली, हे महत्वाचे आहे! तिच्यविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा फार महत्वाचा प्रयत्न या तपशीलात दिसतो.
रामायणकालीन शिक्षणात राजसत्ता आणि गुरुसत्ता यांचा सुंदर समन्वय दाखवलाय! विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधून त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारे ते शिक्षण कुठे अन आजचे भष्टाचारयुक्त शिक्षण कुठे! हे प्रकरण लेखकाने शिक्षक या अनुभवातून अतिशय मुद्देसूदपणे लिहिले आहे! हीच गोष्ट रामायणकालीन समाजाची! रामराज्याचे हे वर्णन अप्रतिम, अयोध्येच्या आनंदवनभुवनाची आपण आता फक्त कल्पनाच करायची! प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारे आणखी एक प्रकरण म्हणजे रामायणकालीन शासन व्यवस्था. तीन स्तरांवर कार्यान्वित, अष्टप्रधान, ऋषिमंडळ आणि खुद्द राजा! आपल्या कल्पनाशक्तीची हद्द तिथवर पोचणे अशक्य! तशीच कुटुंबसंस्था, कुठे आजचे न्यायालयीन खटले अन कुठे या रामायणातील आदर्श भावकी! आजच्या काळाला अनुरूप अशी “रामकथेचे महत्व” ही दोन सर्वांगसुंदर प्रकरणे मुळातूनच वाचनीय! रामायणातील काही ज्ञात/अज्ञात गोष्टींमध्ये लक्ष्मणरेषेचे आज अभिप्रेत असलेले महत्व, वालीवध, रामाने सीतेचा केलेला त्याग, इत्यादी संवेदनशील आणि वादग्रस्त बाबी लेखकाने फार संयमाने लिहिल्या आहेत. संपूर्ण पुस्तकाचा समारोप करणारा भाग अद्वितीय! भावनांचा कल्लोळ हाच याचा गाभा!
रुचकर जेवणाच्या शेवटी “गोडाचा घास” असलेले शेवटचे प्रकरण, या पुस्तकाचे वेगळेपण जपणारे! रामाची “रामगाणी” अन तीही गीतरामायण विरहित, रामाच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग साकारणारी! (अपवाद “पराधीन आहे जगती”)! यात लेखकाची संगीताची गहिरी जाण आलेखित झाली आहे! या अनोख्या, अवीट अन आकर्षक अंतिम भागासाठी देशपांडे सरांचे खास अभिनंदन!
या पुस्तकाची मला भावलेली सर्वंकष गुणवत्ता म्हणजे याची “नवनवोन्मेषशालिनी” संकल्पना! लेखकाचे भिडस्त आणि नम्र व्यक्तिमत्व या पुस्तकात पदोपदी जाणवते! त्यांनी राजहंसासारखे नेमके मोती वेचून हे अमूल्य साहित्य निर्मित केले आहे! आजच्या काळाला अन पिढीला अनुरूप असे हे रामायणाचे लेखन आहे! भाषा अत्यंत साधी, सोपी अन सरळ! या पुस्तकाचा स्थायी भाव आहे लेखकाची रामावरील प्रगाढ श्रद्धा, भक्ती अन प्रीती!
श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव. आ. बं. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. आजवर त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाजमाध्यमांवर उगवतीचे रंग, प्रभात पुष्प, थोडं मनातलं, ही त्यांची सदरे वाचकप्रिय आहेत. रेडिओ विश्वासवर ‘आनंदघन लता’, ‘या सुखांनो या’ आणि ‘राम कथेवर बोलू कांही’ या कार्यक्रमांच्या मालिका अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे स्वतंत्र यू ट्यूब चॅनल देखील आहे.
सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन द्वारा प्रकाशित या पुस्तकाचे वाचन, मनन, चिंतन आणि त्यानुसार आचरण करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे मला प्रकर्षाने वाटते! भक्ती अन ज्ञानाने समृद्ध असे हे पुस्तक प्रत्येकाने वारंवार वाचावे आणि संग्रही ठेवावे इतके सर्वांगसुंदर आहे!
पुस्तक परीक्षण – डॉ. मीना श्रीवास्तव
दिनांक- २७-३-२३
ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रेमाची परिभाषा…प्रेम , विरह, वेड आणि युद्ध यांची एक अतिशय हृदयस्पर्शी कहाणी..” द कोड ऑफ लव्ह ” या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मेघना जोशी यांनी सहज सोप्या हळूवार शब्दांमध्ये आणला आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक अँड्रो लिंकलेटर यांनी ही सत्यकथा अतिशय कौशल्याने आणि संवेदनशीलतेने लिहिली आहे. असे हे पुस्तक माझ्या वाचनात आले..
1939 सालचा वसंत ऋतू…सुंदर तरुणी पामेला किराज व देखणा पायलट डोनाल्ड हिल याला भेटते व पाहताच क्षणी कलिजा खलास झाला या उक्तीनुसार ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण दुस-या महायुद्धामुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडतो. आनंद, दुःख, नैराश्य, चैतन्य अश्या अनेक रूपांमधून तिने प्रेमाचा अनुभव घेतला. पण हे प्रेम मात्रं तिला सहजासहजी मिळाले नाही. पण तिच्या या प्रेमावरच्या एकनिष्ठेनेच त्या एकमेव बंधनाला एक खोली आणि उत्कटता प्राप्त करून दिली. महायुद्धाने त्यांना परस्परांपासून वेगळे केले. त्यांचे युद्धा नंतर परत येणे हेच एवढे वेगळे होते की नंतरच्या पिढीमध्ये अश्या प्रकारचा वेगळेपणा सापडणे केवळ अशक्यच होते. हे स्पष्ट पुस्तक वाचताना जाणवते.
डोनाल्डची नेमणूक हाँगकाँगला होते आणि तेथे भविष्यातला संभाव्य धोका लक्षात घेऊन तो डायरी लिहायला सुरुवात करतो. डायरी मधील सुरुवातीच्या शब्दांमध्येच त्याने स्पष्ट लिहिले आहे की त्याला त्या क्षणांपासून सर्व घटनांची नोंद का ठेवावीशी वाटली? पण त्याने त्यातला मजकूर मात्रं सांकेतिक भाषेत लिहिला आणि ती भाषा मात्र रहस्यमय आकड्यांची असते. डायरी मधील पहिल्याच ओळीमधून डायरी लिहिणा-याची दूरदृष्टी दिसून येते. डोनाल्डचा दृष्टीकोन मात्रं वेगळा होता. त्याच्या बाबतीत जे काही घडेल त्याच्या तो नोंदी ठेवायचा. त्याच्या स्वभावाची आणखी एक खासियत होती ती म्हणजे काही घटना गोष्टी लपवण्याकरता सांकेतिक भाषेची मदत घेतली होती. सुरूवातीला त्याने गुपिते लिहिण्याकरता शाॅर्टहँडचा वापर केला पण काहीच महिन्यानंतर त्याला आपला मजकूर वाचली जाण्याची भीती वाटू लागली तेव्हा त्याने त्यावर सांकेतिक शब्दांचे वेष्टण चढवले व मजकूरा भोवती एक गूढ वलयं निर्माण केलं त्यामुळे तो खूपच गुंतागुंतीचा बनला. फक्त त्याला एकट्यालाच तो वाचणे शक्य होते. पण त्याचे शेवटचे शब्द हे तिच्या नावाभोवतीच गुंफले होते…तर ती होती फक्त आणि फक्तच पामेला..!! ती डायरी म्हणजे त्याचे गुपित..
हाँगकाँगचे युद्ध अश्या प्रकारे सुरू झाले होते की ते फार काळापर्यंत टिकणारेही नव्हते. त्याचे दूरगामी परिणाम डोनाल्डच्या उभ्या आयुष्यावर कायमचे झाले. त्याला प्रत्यक्ष युद्धानंतर युद्ध कैद्यांच्या छावणी मध्ये नेण्यात आले. आणि हा माणूस सर्वच बाबतीत कायमचा आणि पूर्णपणेबदलून गेला. युद्धा पूर्वीचा आणि युद्धा नंतरचा डोनाल्ड यामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता तो म्हणजे त्याची ती डायरी आणि त्याचे पामेलावरचे प्रेम….या दोन गोष्टी मरेपर्यंत त्याच्या जवळ होत्या..
डोनाल्ड युद्धाहून परत येतो पण युद्ध कैदी असताना त्याचा अतोनात शारीरिक व मानसिक छळ झालेला असतो. त्याचा परिणाम त्याच्या मनावर व आयुष्यावरही होतो. त्या आठवणी आयुष्यभर त्याचा पिच्छा पुरवतात…पामेलाला मनापासून वाटते की डोनाल्डला समजून घेण्यासाठी त्याच्या डायरीतील रहस्ये समजून घेतली पाहिजे. हे रहस्यमय आकडे पामेलाला उलगडता येतील? त्याची सांकेतिक भाषा तिला जाणून घेता येईल?..
आपल्या प्रेमाला जाणून घेण्याची एका शोधाची ही सत्यकथा…त्याच्या या डायरीचे रहस्य त्याच्या मृत्युनंतरही काही वर्षे तसेच होते…!!
“आयुष्य फार सुंदर आहे. आयुष्य जगताना प्रत्येकाने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला, तर सर्व मानव जातीला ही दुनिया सुखमय भासेल.”
” सुख आणि दुःख ही जीवन पुस्तकाची दोन पाने आहेत. दुःख सहन करता आलं पाहिजे आणि सुख निर्माण करता आलं पाहिजे. पण या दोन्ही भावनांची आपण अनुभूती घेतली पाहिजे.”
” कितीही वाटलं तरी, मानवाच्या भावनांचे नाजूक असे स्वाभिमानाचे आवरण कुठे ना कुठे विरतेच. मग ते स्वाभिमानाचे आवरण कसं जपायचं, कसं वापरायचं नि कसं टिकवायचं हे आपणच ठरवायचं असतं .”
— अशी आणि अशाच प्रकारची सुंदर, जीवनाचे धडे देणारी भाष्ये, सौ वर्षा महेंद्र भाबळ यांच्या
‘ जीवन प्रवास ‘ या आत्मकथनपर पुस्तकात वाचायला मिळतात.
वर्षा ताईंचे जीवन प्रवास हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात प्रथम विचार आला तो असा की ,आजपर्यंत आत्मवृत्तपर पुस्तके ही सर्वसाधारणपणे प्रसिद्धी मिळवलेले, विशेषतः कलाकार, नावाजलेले लेखक, राजकीय नेते, चित्रपट क्षेत्राशी संबंधित, किंवा उद्योजक थोडक्यात जे सेलिब्रिटी असतात त्यांचीच वाचली जातात. पण जीवन प्रवास हे पुस्तक वाचल्यानंतर या विचारांना फाटा फुटतो. हा गैरसमज दूर होतो.
लाखो— करोडो स्त्री पुरुषांसारखं वर्तुळातलं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीलाही जर प्रातिनिधिक स्वरूपात
‘जगणं ‘ या संज्ञेचा विशिष्ट अर्थ सापडला असेल, तर त्याने का लिहू नये? वर्षाताईंनी चाकोरीतल आयुष्य जगत असताना, जे टिपलं, जे अनुभवलं, आणि त्यातूनच जगण्याच्या अर्थाचा जो प्रामाणिक, अत्यंत बोलका, डोळस शोध घेतला आहे.. त्याचंच प्रतिपादन त्यांनी त्यांच्या आत्मकथनात इतकं सुंदरपणे केलं आहे की, वाचणारा त्यांच्या जीवनाशी त्या संदर्भांशी अगदी सहजपणे बांधला जातो.
माणूस कुठल्या कुटुंबात, कुठल्या जातीत, समाजात, गावात , जन्माला आलाय हे महत्त्वाचं नसतंच. तो कसा जगला आणि त्याने आपल्या जगण्यातून इतरांना काय दिले हेच महत्त्वाचे. सामान्य— असामान्य, प्रसिद्ध— अप्रसिद्ध, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब— श्रीमंत हे सर्व शब्द संदीग्ध आहेत. प्रत्येकाच्या निरनिराळ्या दृष्टिकोनातून या प्रस्थापित शब्दांचे रूढार्थच बदलू शकतात, याची जाणीव जीवन प्रवास हे पुस्तक वाचताना पावलोपावली होते.
प्रथम तुमच्यामध्ये जीवनाविषयीची प्रचंड ओढ असायला हवी. तुमच्या ठायी सुप्तपणे असलेल्या अनेक गुणांची तुम्हाला योग्य वेळी ओळख झाली पाहिजे. आणि सुसह्य जीवनासाठी या गुणांचा कसा वापर करता येईल हेही उमजले पाहिजे. आणि हे ज्याला जमतं तो वाळवंटातही हिरवळ निर्माण करू शकतो. रुक्ष पाषाणातूनही एखादा शितल पाण्याचा झरा जन्माला येऊ शकतो, याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.
.. नव्हे ! तशी मनाची खात्रीच पटते.
वर्षाताईंच्या सामान्य जगण्यातलं असामान्यत्व असं सुरेख दवबिंदू सारखं मनावर घरंगळतं.
जवळजवळ २५ लहान लहान भागातून वर्षाताईंनी त्यांच्या जीवनसफरीतून वेचलेले मोती वाचकाच्या ओंजळीत घातले आहेत. त्यांचे बालपण, त्यांचे गाव, आई-वडील, भावंडे ,गणगोत,शिक्षण, प्रेमविवाह, वैवाहिक जीवनातले अटीतटीचे प्रसंग, नोकरी, मुलांचे संगोपन नातेसंबंध, समाजाने दिलेली भलीबुरी वागणूक, जोडीदारासोबत चालवलेले अभ्यास वर्ग, विद्यार्थ्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाती, स्वतःचे छंद, भेटलेले गुरु, आदर्शवत व्यक्ती, या सर्वांविषयी वर्षाताईंनी यात भरभरून आणि मनापासून लिहिले आहे. आणि ते वाचत असताना एका अत्यंत संवेदनशील, कोमल, मृदू तरीही कणखर जबरदस्त टक्कर देणारी, सर्वांना सांभाळून सोबत घेऊन जगणारी आणि केवळ स्वतःपुरतेच न बघता सतत एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून विश्वासाने,चौकस बुद्धीने, कृतज्ञतेने, दिमाखाने जगणाऱ्या व्यक्तीचेच दर्शन होत राहते. यात कुठलाही अतिरेक नाही. पोकळ शब्दांचा… केवळ ग्लोरी फाय करण्याचा कुठलाही हेतू नाही. हे सारं मनापासून वाटलं म्हणूनच लिहिलं.
आवारातल्या नारळाच्या झाडाची आठवण देतानाही वर्षाताई एकीकडे सहज म्हणतात,
” देवांना अर्पण केले जाणारे फळ म्हणजे श्रीफळ! कल्पतरूला आपल्या धर्मात खूप महत्त्व आहे. माडाचा प्रत्येक अवयव उपयोगात येणारा आहे. अर्थात् गुणसंपन्न! त्या तरूचे गुण आमच्यात रुजावेत, अशी मनी सुप्त इच्छा ठेवून या वृक्षासोबत आमच्या नव्या पर्वाला आम्ही सुरुवात केली.!”
— वा वर्षाताई!! तुमच्या या सोन्यासारख्या विचार प्रवाहाला माझा मानाचा मुजरा!
अध्यात्म तत्त्वज्ञान हे वाचून रुजत नाही, तर त्याची बीजं अंतरंगातच असावी लागतात हे तुम्ही सिद्ध केलंत.
एखाद्या नोकरीच्या ठिकाणीही कामाव्यतिरिक्त पारिवारिक, सांस्कृतिक, नात्यानात्यातला आगळावेगळा जिव्हाळा…ईर्षा, प्रसिद्धी, चढाओढ, द्वेष मत्सर यांच्या पलीकडे जाऊन कसा निर्माण होऊ शकतो आणि कामातला आनंद कसा गुणित करू शकतो याचा सुंदर वस्तूपाठच, वर्षाताईंच्या अडतीस वर्षाचे एमटीएनएल मधले नोकरी विषयक किस्से वाचताना मिळतो.
सर्वांग सुंदर असेच हे पुस्तक आहे. वाचकाला खूप काही देणारं आहे ! संदेशात्मक, सकारात्मक आणि कुठलाही अभिनिवेश, अहंकार नसणारं हे नम्र लेखन आहे.
हे पुस्तक वाचताना मला असे वाटले की सर्वसाधारणपणे आपण एखादा पडलेला दगड पाहतो, एखादा चुरगळलेला कागद दिसतो, एखादं साचलेलं पाणी पाहतो… पण आपल्या मनात येतं का या दगडातून एकेदिवशी सुंदर शिल्प निर्माण होऊ शकतं, हा चुरगळलेला कागद थोडा उलगडला तर आपण एखादा सुविचार त्यावर लिहू शकतो, या साचलेल्या पाण्यावरही कमळ फुलवू शकतो.? नसण्यातून असण्याला जन्म देणं हीच महानता ! आणि या महानतेचं दर्शन सौ.वर्षा भाबळ यांच्या “जीवन प्रवास” या पुस्तकातून अगदी सहजपणे होतं.
सुंदर भाषा, सुंदर विचार आणि सुंदर मन यांचं सुरेख मिश्रण म्हणजे जीवन प्रवास हे पुस्तक !
सौ अलका भुजबळ यांनी हे पुस्तक देखण्या स्वरुपात प्रकाशित करून फार मोलाची कामगिरी केली आहे रसिक वाचकांसाठी ! त्याबद्दल मी समस्त मराठी भाषा प्रेमिकांतर्फे आणि वाचकांतर्फे आपले आभार मानते ! मा. देवेंद्रजी भुजबळ यांनी सुरेख प्रस्तावना लिहून पुस्तकाचा यथोचित गौरव केला आहे.
वर्षाताई ! प्रथम आपणास मानाचा मुजरा करते. आणि नंतर अभिनंदन आणि आपल्या उर्वरित जीवनप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! धन्यवाद !
कारण खरंच स्त्रीला संसाराच्या पाशात इतकं गुरफटवून ठेवलं आहे आपण की, ती ‘मुक्तीसाठी अधिकारी असू शकते’, संसाराच्या पाशातून मुक्त होणं हे तिचं ‘स्वप्न’ असू शकतं असा आपण विचारदेखील करत नाही.
वास्तविक पाहता स्त्री इतकं सहज डिटॅचेबल होणं पुरुषाला जमणं जरा अवघडच.
अख्खं बालपण म्हणजे वयाची पंधरा-वीस वर्षें वडिलांच्या घराला आपलं घर मानून काढल्यानंतर परत पतीच्या घरात जाऊन तिथे आपलं स्थान निर्माण करणं, नऊ महिने पोटात जपलेल्या जीवाला जन्माला घातल्यानंतर देखील क्षणार्धात त्याची नाळ आपल्यापासून तोडून त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. स्वतःला रुजवणं तिथून बाहेर पडणं आणि परत दुसऱ्या ठिकाणी रुजवणं, फुलणं यामध्ये तिच्या सगळ्या स्त्रीत्वाचा, व्यक्तित्वाचा कस पणाला लागतो. पण या प्रत्येक वेळी ती अत्यंत सहजतेने या सर्व प्रसंगांना सामोरी जाते. आणि संसारातला सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडते.
अशी स्त्री आसक्ती, पाश, मोह यात खरंच गुंतून राहू शकते? खरंच फक्त हेच तिचं अस्तित्व असू शकतं?
किती मर्यादित करून ठेवलं आहे आपण ‘स्त्रीत्वा’ला…
पण ज्या वेळेला अरुणा ढेरे यांचं ‘भगव्या वाटा’सारखं पुस्तक हाती येतं तेव्हा स्त्रीत्व म्हणजे काय? स्त्री म्हणजे काय? हे जास्त चांगलं समजतं. स्त्रीत्वाचा आत्तापर्यंत अप्रकाशित राहिलेला विरक्तीचा पैलू मोठ्या ताकदीने आपल्यासमोर येतो आणि अक्षरशः अचंबित करतो.
भारतीय इतिहासाला संत परंपरेचं प्रदीर्घकाळाचं वरदान लाभलेलं आहे. या संत परंपरेत पुरुषांइतकंच अनेक स्त्रियांचं देखील योगदान आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहित आहे? काही ठराविक संत स्त्रिया सोडल्या तर बाकी अन्य संत स्त्रिया, वैराग्य पत्करणाऱ्या स्त्रिया यांबाबत आपण तसे अनभिज्ञच आहोत. याचं कारण म्हणजे आपल्याला या स्त्रियांची माहिती सहजासहजी सापडत नाही. स्त्रियांच्या या पैलूबाबत विचार करावा, शोध घ्यावा, चर्चा करावी असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झालेला दिसत नाही. पण याचा अर्थ तशा स्त्रिया झाल्याच नाहीत, असा होत नाही. इतिहासामध्ये अशा स्त्रियांची नोंद मोठ्या प्रमाणात लक्षात येण्याजोग्या रीतीने केलेली नसली तरी थोड्याफार प्रमाणात का होईना केलेली आहे.
गौतम बुद्धांच्या काळात अशा कितीतरी स्त्रिया बौद्ध भिक्षुणी झालेल्या आहेत. त्यात अगदी सामान्य स्त्रियांपासून ते राजघराण्यातील स्त्रियांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर केवळ उतारवयातल्याच नव्हे तर तरुण वयातल्या स्त्रियादेखील बुद्धाच्या सांगण्याने प्रभावित होऊन मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी आनंदाने भिक्षुणी झालेल्या आढळतात.
अशा स्त्रियांच्या कथा थेरी गाथा, या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. थेरी गाथा म्हणजे स्थविरींच्या गाथा. स्थविरी म्हणजे बौद्ध भिक्षुणी. एकूण ३७ जणींच्या गाथा यात आपल्याला वाचायला मिळतात. या गाथांमध्ये त्या त्या बौद्ध भिक्षुणींचा पूर्वेतिहास आणि त्यांचा बौद्ध भिक्षुणी होण्याचा प्रवास आणि त्या प्रवासाची पुढील वाटचाल अगदी थोडक्यात पण अतिशय उत्कंठावर्धक रीतीने दिलेली आहे.
मुक्ती म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते? त्यासाठी काय मर्यादा असतात? त्याची बलस्थानं काय असतात? हे देखील आपल्याला या गाथांमधून समजतं. एकेका भिक्षुणीची कथा वाचताना आपण रंगून जातो. विषय वैराग्य असला तरी वाचताना किंचितही कंटाळा येत नाही. एखाद्या आजीने आपल्या मांडीवरील नातवंडांना गोष्ट सांगावी अशा पद्धतीने अतिशय आपुलकीने, सहज-सोप्या शब्दांत या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.
यातला मला भावलेल्या काही कथांचा उल्लेख : वासिष्ठी आणि सुजात, एका रूप गर्वितेची कथा, अक्कमहादेवी, प्रणयशरण शिवसुंदर, तिलकवती, भयचकित नमावे तुज रमणी, लल्लेश्वरी, धर्म रक्षति रक्षित:, विद्रोहाची शोकांन्तिका, भद्रा कुंडलकेशा, महादाईसा इ. आहेत.
आज जागतिक महिला दिन साजरा करताना निरनिराळ्या कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी मारणाऱ्या महिलांचे कौतुक केलं जातं, त्यांचे दाखले दिले जातात. त्याबरोबरच मुक्ती आणि वैराग्य यासारख्या विषयांमध्ये देखील स्त्रियांचं कर्तृत्व काही कमी नाही हे सांगणार हे पुस्तक सर्वांनीच आवर्जून एकदा तरी वाचायला हवं. त्यानिमित्ताने भारतीय परंपरेमध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या मुक्ततेचा विचार कृतीत अमलात आणणाऱ्या स्त्रीशक्तीची दखल घेतली जाईल.
पुणे महानगर पालिकेच्या शाळेत ३७ वर्षे प्राथमिक शिक्षिका व मुख्याध्यापक पदावरून २०२१ साली सेवा निवृत्त. सेवेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना अमलात आणल्या. विविध प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.
रेकी मास्टर असून मेडिटेशन व समुपदेशन करीत असते.
कलश मासिकात लेख व कविता प्रसिद्ध झाले आहेत.
विविध माध्यमातून समाजकार्य सुरू असते.
पुस्तकावर बोलू काही
☆ आकाशझुला… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
निखळ वाचनाचा आनंद घ्या…
विश्वकर्मा प्रकाशन, पुणे यांनी विश्वास देशपांडे यांचं ‘आकाशझुला’ हे पुस्तक प्रकाशित केलंय . या पुस्तकात विश्वास देशपांडे यांनी विविध विषयावर हलक्याफुलक्या भाषेत केलेलं ललित लेखन असलेले एकूण ५३ विविध लेख वाचायला मिळतात. सगळे लेख मनाला आनंद देणारे असे विविध विषयांवरचे आहेत. लेखकाची भाषा ओघवती, साधी सोपी आहे. कुठेही भाषेचं किंवा शब्दांचं अवडंबर नाही. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो. प्रत्येक लेख अगदी दीड ते दोन पानांचा. साधारणपणे तीन मिनिटात वाचून होणारा. हे सरांचे दुसरे पुस्तक आहे. आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या पुस्तकातील कोणतेही पान काढून आपण वाचू शकतो.
सरांचे अनुभव विश्व समृद्ध आहे हे वाचताना विशेष जाणवते. जोडीला तरल निरीक्षणशक्ती आहे. आणि समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारी लेखनशैली आहे. निसर्ग हा त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळयाचा विषय आहे. त्यांच्या पुस्तकातील आकाश के उस पार भी … या पहिल्याच लेखातील ही काही वाक्ये पहा
‘हिवाळा संपण्याच्या उंबरठ्यावर आणि उन्हाळा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत होता. असा हा काळ. छानपैकी वारा सुटला होता. वाऱ्याच्या झुळकीत हिवाळ्याचा सुखद गारवा होता. अंगाला मुलायम, रेशमी मोरपिसाचा स्पर्श व्हावा, तसा तो अंगाला स्पर्शून जात होता. काही न करता येथे असंच बसून राहावं आणि हे सुखद वारं अंगावर घ्यावं असं वाटत होतं .’ जीवनातील विविध प्रसंग, घटना त्यांच्या मनाला स्पर्शून जातात. आणि त्यातील चिंतनातून उमटत राहते, ती विविध प्रकारची तरल संवेदना.
या पुस्तकातील सगळे लेख वाचकाला सकारात्मक दृष्टिकोन देणारे आहेत. सरांना संगीताची सुद्धा विशेष आवड आहे आणि या पुस्तकातील काही लेख त्याची प्रचिती आपल्याला देतात. या गाण्यांच्याच आधारे जीवनातील सत्यावर मार्मिक भाष्य वाचायला मिळते. जीवन चलने का नाम यातून संकटावर मात करून दिव्यांग असून स्वयंदीप झालेल्या मुलीची प्रेरणादायी गोष्ट सांगितली आहे.
गाण्यातून संदेश देता देता लाख मोलाचा सूर्यप्रकाश,पाय जमिनीवर आहेत का? यातून आरोग्य कसे जपावे हा संदेश मिळतो.
निसर्ग नियमानुसार की निसर्गनियमा विरुद्ध यातून प्यारीबाई,प्रल्हाद जानी असे संत कित्येक वर्षे ईश्वर भक्तीत तल्लीन होऊन अन्ना वाचून जिवंत राहू शकतात ही अनोखी महती कळते.
मारुतीराया,रामराया यांचे भक्ती,श्रद्धा सांगणारे त्याच प्रमाणे संत रामदास,संत एकनाथ,गजानन महाराज,आद्य शंकरचार्य यांची संत वचने वाचू शकतो.
तर ज्ञानेश्वर माऊलींची माऊली, राष्ट्रमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, भगिनी निवेदिता, किरण बेदी, मेरी कोम, मलाला युसूफझाई या महिलांची माहिती म्हणजे जणू स्त्री शक्तीला लेखकाने केलेले वंदन आहे !
या पुस्तकात जसा निसर्गावर प्रेम करणारा लेखक दिसतो, तसाच तो विविध विषयांवर सामाजिक बांधिलकीतून भाष्य करणारा एक जबाबदार नागरिक आपल्याला दिसतो. काही लेखातून पालक आणि शिक्षकांना आपल्या अनुभवाचे दोन शब्द सांगणारा अनुभवी शिक्षक दिसतो. या पुस्तकात काही व्यक्तीचित्रेही आहेत.
सखे सोबती हा लेख … झाडे बोलत नाही असे आपल्याला वाटते हे काही खरे नाही कारण जेव्हा तुम्ही झाडांशी बोलता तेव्हा ते देखील बोलतात वेगळ्या प्रकारे..
गांधी तीर्थ आणि अजिंठा लेणी ह्या लेखात व्यक्त केलेली खंत योग्यच आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छ्ता ह्याचे महत्त्व आपल्या समाजात आणि प्रशासनात देखील अजून रुजले नाही हेच खरं.. मॉल स्वच्छ पण रेल्वे स्टेशन अस्वच्छ,गजानन महाराज मंदिर आणि तिथली स्वच्छ्ता इतर अनेक मंदिरात का नसते ? सामाजिक भान आणि तळमळीने कार्य करण्याची इच्छा शक्ती हे बदल करू शकतील.असो…
आणि आकाश झुला या लेखाचे शब्दांकन अप्रतिम, नितांत सुंदर. सुख, दुःख, संकटे हे सर्व आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना अतिशय सकारात्मकेने सामोरी जाणाऱ्या सौ.सारिका ची वृत्ती नक्कीच प्रेरणा देणारी आहे.तसेच हार न मानता जिद्दीने आपले लक्ष्य साध्य करणे हे देखील कौतुकास्पद आहे. आपल्या पाशी असलेले संस्कार आणि सुसंस्कृतता हे देखील तिच्या जिद्दी आणि ध्येयनिष्ठ स्वभावाचे कारण आहे असे वाटते.
असे विविध विषयांना स्पर्श करणारे पुस्तक आपल्या संग्रही असावेच.तसेच स्नेही जनांना पुस्तकरूपी उत्तम भेट देऊ शकतो.
या पुस्तकांचे मला जाणवलेले एक वैशिष्ठ्य असे आहे पुस्तकांचे आभावलाय ( ऑरा ) खूप उत्तम आहे. त्यातून नेहेमी सकारात्मक लहरी बाहेर पडतात.ज्या वेळी लेखक अत्यंत उत्तम,आनंदी व सकारात्मकतेने लेख लिहितो त्याच लहरी वाचक अनुभवतात.
त्या मुळे लेख वाचताना सुद्धा आपण ट्रान्स मध्ये जातो.
सर्वांनी हा अनुभव घ्यायलाच हवा. असे मी आग्रहाने सांगेन.
या आणि त्यांच्या इतर पुस्तकातील लेखांचे सादरीकरण दर मंगळवारी व शुक्रवारी रेडिओ विश्वास वर या सुखांनो या या कार्यक्रमात स्वतः लेखक करतात.ते ऐकणे ही एक पर्वणी असते.
परिचय – विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ नाती वांझ होताना… कवयित्री मनिषा पाटील ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
कविता संग्रह –नाती वांझ होताना
कवयित्री—मनीषा पाटील- हरोलीकर
प्रकाशक–संस्कृती प्रकाशन. पुणे
पृष्ठ संख्या–९५
किंमत–१५० रू
‘अस्वस्थ नात्यांचा आरसाःनाती वांझ होताना’
“नाती वांझ होताना” हा मनीषा पाटील-हरोलीकर यांचा कविता संग्रह हाती आला.कविता संग्रहाच्या शीर्षकाने मनाला आधीच गोठवून टाकले.किती समर्पक नाव!!!खरं तर मानवी जीवन समृध्द करण्याचा महामार्ग म्हणजे नात्यांची गुंफण.नात्यातला ओलावा जगायला शिकवतो.पण आज मात्र याच नात्यांचा ओलावा आटत जाताना दिसत आहे. सर्वत्र नात्यांत वांझोटेपण येताना दिसत आहे.कोरडेपणाचे एक वादळ सर्वत्र घोंगावत आहे.म्हणूनच कवयित्री मनीषा या अस्वस्थ होत आहेत.ग्रामीण भागातील बाई आज ही मोकळेपणाने वागू शकत नाही.बोलू शकत नाही .तिची नेहमी घुसमट होते.हे सारे कवयित्रीने जवळून अनुभवले आहे.बदलत जाणारे ग्रामीण जीवन ही अस्वस्थ करणारे आहे.हे सगळे भाव कवयित्रीने कवितेतून व्यक्त केले आहेत.नाती वांझ होताना या कविता संग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे एक शब्द शिल्प आहे.शब्द लेणं आहे.पुन्हा पुन्हा कविता वाचली की नवा आशय सापडतो.नवा भाव सापडतो.प्रत्येक कविता बाईच्या मनाचा एक एक भावपदर उलगडून दाखवते.प्रत्येक कविता बाईच्या मनाचा आरसा आहे,असे मला वाटते.बाईचं सोसणं,घडणं, असणं,दिसणं, सारं या कवितेतून व्यक्त होतं.सगळ्याच कविता मनात विचाराचं वादळ उठवून जातात.आजच्या वर्तमानाला चेहरा नाही.कोणता मार्ग सापडत नाही तेव्हा कवयित्री म्हणते,
कोणतेच प्रहर नसलेले
हे कसले वर्तमान
जगतेय मी
बाईचं विश्व घर असते.घर तिचा श्वास असतो. आज घडीला तिच्या श्वासावर कुऱ्हाड घातली जात आहे. तिचं जगणंच हिरावून घेतलं जातं आहे. तेव्हा ‘मी बंद केलेय ‘या कवितेत कणखरपणे कवयित्री म्हणते,
माझ्या वाळवंटात वारा बनून ही येऊ नकोस मी बंद केलेय आता नात्यांचे वृक्षारोपण खोट्या सहानुभूती ची तिला आता गरज नाही.
किती संकटे आली, तरी बाई हिंमत सोडत नाही. तेवढी ती चिकट,चिवट असते.पण सहनशीलतेला ही मर्यादा असते.सहनशीलतेचा कडेलोट होतो तेव्हा बाई विहीर जवळ करते.त्या विहीरीची कणव कवयित्रीला येते.तिला विहीर शापित आई वाटते. गावातल्या किती लेकी -बाळींची दुःखे तिने पाहिली. त्यांना पदरात घेता घेता या आईचा पदर शापित झाला.ही भावना ‘शापित आईपण ‘या कवितेत त्यांनी मांडली
ज्यांच्यासाठी भूमी
दुभंगलीच नाही
अशा किती सीतांना
घेतले असेल सामावून
या विहिरींनी
आणि थंडावली असेल
तडफड
त्यांच्या रोजच्या मरणाची
आज ही विधवा बाईला समाजात मान नाही.प्रत्येक वेळी शरीरानेच सती कशाला जायला पाहिजे?बाईच्या जगण्याचा अधिकारच नवऱ्या मागे काढून घेतला जातो. तिचे जगणे उध्वस्त होऊन जाते. ‘आज ही बाई सती जातेच की’ या कवितेत कवयित्री समाजाचा एक विद्रुप चेहरा समोर आणतात.
पांढऱ्या कपाळाच्या बाईला
कुठे असतो अधिकार
मनासारखे जगण्याचा
देहावर इंद्रधनू सजविण्याचा
आज गाव आपला चेहरा बदलत आहे.नात्यात निबरपणा वाढला आहे.कोणाचे सोयरसुतक कोणाला नाही. हा आशय ‘काय झालंय माझ्या गावाला?’ या कवितेत मांडला आहे.
कुणी पेटता ठेवलाय
ज्याच्या त्याच्या मनात
हा द्वेषाचा अंगार
एकाच बांधावरच्या बोरी- बाभळी
फाडत सुटल्यात
प्रत्येक फांदीचं पानन् पान
त्याच कवितेत कवयित्री म्हणते,
कोरड्या विहिरीसारखा
विद्रुप झालाय गावाचा चेहरा
मलाही, सांभाळावेत ऋतू, बायका टाळतात बायकांना,शोधायला हवे,बायका प्रत्येक कविता मनात ठसणारी, विचार मांडणारी आहे.
‘हवाय नवा जन्म’ मधून नवी आशा,स्वप्न,नवी उमेद व्यक्त केली आहे.तिला वनवास संपवून फुलपाखरू व्हायचंय.तिला आपल्या वाटणीचा सूर्यप्रकाश हवा आहे.ही आशा कवितेतून मांडली आहे.
कवितेतून कवयित्री संवाद साधते आपलं मन मोकळं करते.कवयित्रीचे अनुभव विश्व संपन्न आहे.निरीक्षण उत्तम आहे हे कवितेतून आलेल्या प्रतिमा आणि प्रतिभेतून कळते. मनिषाच्या कविता मला खूप आवडतात.ती माझी मैत्रीण आहे.तिचा कवितासंग्रह अतिशय देखणा झाला आहे.या पुढे ही तिच्या हातून उत्तम साहित्य सेवा घडावी.तिला अनेक शुभेच्छा.