सौ. माधुरी समाधान पोरे
(सौ. माधुरी समाधान पोरे आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)
अल्प परिचय
शिक्षण- बी. ए. आवड- वाचन, लेखन छंद- वारली पेंटिंग, शिवणकाम.
पुस्तकावर बोलू काही
☆ सागरात हिमशिखरे… सुश्री मेधा आलकरी ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆
पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – सागरात हिमशिखरे (अकरा देशांचा सफरनामा)
लेखिका – मेधा आलकरी
जगण्याची ओढ अशी उडण्याचे वेड असे
घरट्याच्या लोभातही गगनाचे भव्य पिसे
अशी मनःस्थिती झाली नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्यच. घर हवं नि भटकणंही, हेच जीवन जगण्याचं मर्म असतं. मेधा अलकरींच्या कुंडलीत भटकण्याचे ग्रह उच्चस्थानी, आणि जोडीदारही साजेसा मग कायं सोने पे सुहागा….
उपजत आवड आणि फोटोंची योग्य निवड यामुळे पुस्तकाला जिवंतपणा आला.पुस्तकातील फोटोंचं पूर्ण श्रेय त्यांच्या पतींचे.
मेधाताईंनी देशविदेशात, सप्तखंडांत मनापासून भटकंती केली. किती वैविध्यपूर्ण प्रदेशातून त्या वाचकांना हिंडवून आणतात ते नुसतं लेखांची शीर्षक वाचलं तरी ध्यानात येतं.अनेक खंडात फिरण्याचे अनुभव, समुद्राचे नाना रंग, ज्वालामुखीचे ढंग, पुरातन संस्कृतीचे अवशेष आणि वैभव, तर दुसरीकडे जंगलजीवनाचा थरार, यामधे फुलांचे सोहळे असे चितारले आहेत की जणू वाचक शब्दातून त्यांच सौंदर्य जाणवू शकतो. हे सामर्थ्य आहे लेखनाचं.
सागरात हिमशिखरे हा लेख समुद्राचे बहुविध मूड दाखवतो. अंटार्क्टिका हे पृथ्वीचं दक्षिण टोक. तिथे निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला,अनुभवायला मिळतात. या प्रवासाची आखणी खूप आधीपासून करावी लागते. इथला अंदाज वर्तवणं अशक्य. इथले रहिवासी पेंग्विन. आर्क्टिकचा राजा हा मान आहे पेंग्विनचा, मानवसदृश हावभाव न्याहाळणं हा अद्वितीय अनुभव आहे. त्यांची परेड म्हणजे पर्यटकांच्या नयनांना मेजवानीच. सील माशाचं जगणं, अल्ब्राट्रास ह्या मोठया पक्ष्याचं विहरणं हे वाचताना देहभान हरपतं. हिमनगाच्या जन्माची कहाणी त्याचा जन्म रोमांचकारी अनुभव आहे. निसर्गमातेची ही किमयाचं! चिंचोळया समुद्रमार्गातून जाताना बसणारे हेलकावे, हिमनदी, उंच बर्फाचे कडे, शांत समुद्र, त्यात पडलेले पर्वताचे प्रतिबिंब, कयाकमधून हिमनदयांच्या पोकळयातून वल्हवणं यामुळे सर्वांच जवळून दर्शन होतं. इथे अनेक पथक संशोधनासाठी येतात. आपल्या भारताचंही पथक इथं आहे ही अभिमानाची बाब आहे. खरंच शुभ्र शिल्पांनी नटलेल्या या महासागराची, द्वीपकल्प ची सफर एकमेवाद्वितीय!
यातील पेरूची फोड तर फारच गोड पेरू हा प्राचीन संस्कृतीचा, भव्यतेचा आणि अनोख्या सौंदर्याचा देश. शाकाहारी मंडळींना विदेशात फिरताना येणारा शाकाहाराचा अर्थ किती वेगळा भेटतो हे जाणवतं. बर्याचदा ब्रेड-बटरवरच गुजराण करावी लागते. तेथील सण, समारंभ, यात्रा, जत्रा, रंगबेरंगी पोषाखातील स्री-पुरूष, असे अनेक सोहळे पाहायला मिळतात. अनेक भूमितीय आकृत्या, प्राणी, पक्ष्यांच्या आकृत्या, नाझका लाइन्सची चित्रं पाहून कोकणातील कातळशिल्प आठवतात. ही कुणी व का काढली असतील हे वैज्ञानिकांनाही गूढच आहे. माचूपिचू हे प्रगत संस्कृतीची देखणी स्थानं. म्युझियम, सूर्योपासकांचं सूर्यमंदिर, दगडी बांधकामाच्या जुन्या भक्कम वास्तू असा सारा समृद्ध इतिहास कवेत घेऊन हे शहर वसलं आहे. खरंच हा दीर्घ लेख वाचावा- आनंद घ्यावा असाच आहे.
समुद्रज्वाला हा बिग आयलंडमधील जागृत ज्वालामुखी या लाव्हांचे वर्णन या लेखात आहे. 1983 पासून किलुआ ज्वालामुखी जागृत आहे. 2013 मधे त्याचा उद्रेक होऊन पाचशेएकर जमीन निर्माण झाली. आजही तो खदखदतोय. हे रौद्र रूप, गडद केसरी लाव्हा हे दृश्य खूपच विलोभनीय. हा नेत्रदीपक, अनुपम निसर्गसोहळा डोळयांनी पाहताना खूप छान वाटते. या लव्हांचा कधी चर्र, कधी सापाच्या फुत्कारासारखा, तर कधी लाह्या फुटल्यासारखा आवाज असतो.
लेखिकेला मोहात टाकणारा फुलांचा बहर त्यांनी मनभरून वर्णन केलाय फूल खिले है गुलशन गुलशन! या लेखात. बत्तीस हेक्टरचा प्रचंड मोठा परिसर, वेगवेगळया आकाराची रंग आणि गंध यांची उधळण करणारी असंख्य फुलं! खरंखुरं नंदनवन! एप्रिल आणि मे महिन्यात आठ लाख पर्यटक हजेरी लावून जातात. हाॅलंडची आन-बान-शान असलेला ट्युलिप हे हाॅलंडचं राष्ट्रीय पुष्प! या बागेत फिरताना मनात मात्र एक गाणे सतत रूंजी घालत होते…..’दूर तक निगाहमे हैं गुल खिले हुए’.
लाजवाब लिस्बन या लेखात लिस्बन या शहराचे वर्णन केले आहे. हे सात टेकड्यांवर वसलेले शहर आहे. सेंट जॉर्ज किल्ला उभा आहे. या किल्ल्यांचे अठरा बुरूज प्राचीन ऐश्वर्याची साक्ष देतात. तटबंदीवरून शहराचा मनोरम देखावा दिसतो. गौरवशाली इतिहास, निसर्गसौंदर्य, स्वप्ननगरीतल्या राजवाड्यांचा तसेच भरभक्कम गडकिल्ल्यांचा आणि खवय्यांचा हा लिस्बन खरोखरच लाजवाब!
हाऊस ऑफ बांबूज या लेखात गोरिलाभेटीचा छान अनुभव मांडला आहे. हा मर्कटजातीतील अनोखा प्राणी, याचे अस्तित्व पूर्व अफ्रिकेतील उत्तर रंवाडा, युगांडा व कांगो या तीन सीमा प्रदेशात आहे. हा कुटुंबवत्सल प्राणी आहे. पण त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेला धोका आहे अशी शंका आली तर तो काहीही करू शकतो. त्याच्यासमोर शिंकायचे नाही, मनुष्याच्या शिंकेतू न त्याला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. घनदाट जंगल, नयनमनोहर सरोवर आणि वन्यजीवांना मुक्त संचार करता यावा अशी अभयारण्यं, एक निसर्ग श्रीमंत देश! रवांडाच्या हस्तकलेचा एक वेगळाच बाज आहे.
आलो सिंहाच्या घरी या मसाई माराच्या जंगलसफारीवर लिहलेला लेख वाचताना लक्षात येत की, प्राणी दिसण्याची अनिश्चितता नेहमीच असते. प्राणी दिसले तरी शिकारीचा थरार दिसेल याचा नेम नाही. पण विविधतेनं नटलेलं जंगल पाहण्याचा, तेथील सुर्योदय-सूर्यास्त अनुभवण्याचा, तंबूत राहण्याचा आणि मसाई या अदिवासी जमातीची संस्कृती जवळून पाहण्याचा अनुभव आपल्या कक्षा रुंदावतो.
भव्य मंदिराच्या रंजक आख्यायिका या लेखात जपानमधील पर्यटनात मंदिराचा वाटा मोठा आहे. तिथला परिसर, स्वच्छता, शांतता सारचं अलौकिक. परंपरा जपणारे भाविक नवीन वर्षाच स्वागत सकाळी लवकर उठून मंदिरात जातात. खरंच ‘उगवत्या सूर्याचा देश’ हे जपानचं नाव अगदी सार्थक आहे असे वाटते.
चीन देशाच्या रापुन्झेल ह्या लेखात लांब केसांच्या एका तरुणीच्या जर्मन परीकथेचा उल्लेख येतो. पायापर्यंत लांब केसांच्या असलेल्या ‘रेड याओ’ जमातीतील स्त्रीयांच्या लांब केसाच्या मजेदार कथा आहेत. केस हा स्त्रीयांचा आवडता श्रृंगार. तिथल्या केसांबद्दल काय रूढी आहेत याच्या गमतीदार कहाण्या वाचायला मिळतात.
प्रवास माणसाला, आयुष्याला अनुभवसमृद्ध करतो. आपण गेलो नसलो तरी त्यांच वर्णन वाचून आपलं निसर्गाबद्दलचं आणि संस्कृतीच ज्ञान वाढतं. मेधाताईंच हे पुस्तक वाचकाला निखळ आनंद देईल अशा ऐवजाने भरलेले आहे.
सागरात हिमशिखरे हा अकरा देशांचा सफरनामा वाचत असताना खरोखरं सफर करून आल्यासारखं वाटंल!!
संवादिनी – सौ. माधुरी समाधान पोरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈