मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कवितासंग्रह : “नाही उमगत ‘ती’ अजूनही“ – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆ परिचय – डाॅ.स्वाती  पाटील ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆कवितासंग्रह : “नाही उमगत ‘ती’ अजूनही“ – डाॅ. सोनिया कस्तुरे ☆ परिचय – डाॅ.स्वाती  पाटील ☆ 

कवयित्री – डॉक्टर सोनिया कस्तुरे

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, पुणे. 

पृष्ठसंख्या – १६०

किंमत – रु. ३००/-

अतिशय सुंदर मुखपृष्ठ, ,,’ती ‘च्या स्वप्तरंगी मनोविश्वाचे जणु प्रतीकच, तिच्या भरारीच्या अपेक्षेत असणारे आभाळ आणि झेप घेणारी पाखरे, तिच्या मनात असणारे पंख लावून केव्हाच ती आकाशात स्वैर प्रवाहित होत आहे परंतु त्याचवेळी जमिनीवरील घट्ट बांधून ठेवणाऱ्या साखळ्या आणि पर्यायाने बेडीमध्येही तिने ‘ती’ चं अस्तित्व टिकवून ठेवले आहे. अतिशय अर्थवाही असं हे या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ असून संग्रहाच्या नावाप्रमाणेच सखोल आणि विचार प्रवृत्त करायला लावणारे आहे.

अतिशय संवेदनशीलतेने  लिहिलेल्या या संग्रहाला प्रस्तावना ही तेवढीच वस्तुनिष्ठपणे, तरलतेने, आणि अतिशय अभ्यासपूर्ण व डोळसपणे लिहिलेली आहे ती प्राध्यापक आर्डे सरांनी.

डॉ सोनिया कस्तुरे

मनोगतामध्येच कवयित्री डॉक्टर सोनिया यांनी या कवितांची जडणघडण कशी झाली आहे हे सांगितले आहे. अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे सामाजिक मूल्य असणाऱ्या या कविता लिहिताना त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांचा, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा, तात्कालीक घटनांचा खूप उपयोग झाला आहे. तरीही कवयित्रीची मूळ संवेदनशील वृत्ती, समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आणि केवळ स्त्री म्हणून नाही तर एकूणच माणसांकडे पाहण्याची समदृष्टी ही जागोजागी आपल्याला ठळकपणे जाणवते. म्हणूनच केवळ स्त्रीवादी लाटांमध्ये आलेले आणखी एक साहित्य असे याचे स्वरूप न राहता यापेक्षा अतिशय दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण, उच्च सामाजिक मूल्य व अभिरुचीपूर्ण असा हा वेगळा कवितासंग्रह आहे. 

हा कवितासंग्रह जरी पहिला असला तरी तो पहिला वाटत नाही. प्रत्येक कवितेमागे असणारी विचारधारा ही गेली अनेक वर्ष मनात, विचारात ,असणारी वाटते. सजगतेचे भान प्रत्येकच कवितेला आहे, म्हणूनच त्यांच्यामध्ये फार अलंकारिकता नाही परंतु जिवंतपणा 100% आहे. या कविता वाचणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रियांना ती आपली वाटणारी आहे. कारण या सर्वच जणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत , ठरत आहेत आणि ही विषमता दूर झाली पाहिजे, समाजव्यवस्था बदलली पाहिजे, याचं भान जवळपास प्रत्येक कवितेत आहे. स्त्री आणि पुरुष यापलीकडे जाऊन व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघण्याची किती गरज आहे, हे हा कवितासंग्रह जाणवून देतो. स्त्रीवादी म्हणाव्या अशा या कविताच नाही, तर त्या आहेत एक उत्तम समाजव्यवस्था कशी असली पाहिजे. त्यामध्ये माणूस हा माणसाप्रमाणे वागला पाहिजे न की रुढी परंपरा, लिंगभिन्नता, दुय्यमतेच्या ओझ्याखाली वाकलेल्या, जातीपाती, धर्म अधर्म, सुंदर कुरुपतेच्या  स्वनिर्मित काचामध्ये अडकून स्वतःचे आणि इतरांचे जीवन असह्य बनवलेल्या  राक्षसाप्रमाणे– सुंदर कोण या कवितेत या सगळ्या जीवन मूल्यांचा त्यांनी मागोवा घेतला आहे. अतिशय सोप्या, सुबोध आणि छोट्या शब्दांमध्ये सुंदर या शब्दाचा अर्थ सांगताना सध्या समाजात जे समज झाले आहेत सुंदरतेचे, त्यावर त्यांनी अचूकपणे भाष्य केले आहे आणि ते अगदी आपल्याला तंतोतंत पटतेही .

‘मिरवू लागले’, या कवितेत ‘पुरोगामी’ या आजकाल प्रत्येकाने स्वतःला लावून घेतलेल्या बिरुदाचा फोलपणा दर्शवून दिला आहे. प्रत्येक स्वतःला विसरलेल्या बाईने वाचलाच पाहिजे असा हा संग्रह आहे. ‘ती’च्या उपजत निसर्गदत्त शक्तीचे यथायोग्य वर्णन कोणत्या न कोणत्या स्वरूपात प्रत्येक कवितेत वाचायला मिळते. उदाहरणार्थ :-

एक वाट सुटली तिची तरी

दुसरी तिला मिळत राहते

तिच्या उपजत कौशल्याने

ती वळण घेईल नव्याने जिकडे

नवी वाट तयार होते तिकडे…!

समतेचे धडे शिकवण्याची तीव्र गरज या कविता व्यक्त करतात. ते ही अतिशय सौम्य शब्दात. स्त्री पुरुष समानता या विषयावर कोणीही हल्ली उठून सवंग लिहीत असतो परंतु मुळात हा विषय समजून एक उत्तम सहजीवन कसं असावं आणि त्यामध्ये पुरुषांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे ही शिकवणारी कविता म्हणजे,’ शब्दाबाहेर’ अर्थात ती तुम्ही स्वतःच वाचली पाहिजे. याबरोबरच तडजोड आणि स्वतःत बदल या दोन गोष्टीचे महत्त्व ही  ‘प्रपंच ‘ नावाच्या कवितेत व्यक्त करून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व त्या निर्विवादपणे स्वीकारतात. तिची आय. क्यु. टेस्ट कराल का? ही कविता तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय वाचून पूर्ण होतच नाही. कारण आपल्या भारतातली प्रत्येक बाई यातल्या कोणत्या आणि कोणत्या ओळीत स्वतःला पाहतेच. यापेक्षा अधिक संवेदनशीलता काय असते ?’आरसा ‘ही कविता तर सर्वांनाच डोळ्यात अंजन घालणारी आहे. समान हक्क आणि वागणूक न देता, सन्मानांच्या हाराखाली जखडून ठेवणारी ही समाजव्यवस्था कधी कधी ‘ती’च्याही लक्षात येत नाही आणि हे स्वभान जागवण्याचं काम ही कविता करते. म्हणूनच ‘माणूस ती’ या कवितेत त्या म्हणतात :–

लक्ष्मी ना सरस्वती। ना अन्नपूर्णा।

सावित्रीची लेक। माणूस ती ।

दुर्गा अंबिका। कालिका चंडिका।

देव्हारा नको। माणुस ती…

सावित्रीचे ऋणही त्यांनी अगदी चपखल शब्दात फेडले आहे. जनावरांपेक्षा हीन,दीन लाचार होतो माणूस, आम्ही झालो माई तुझ्यामुळे । –या शब्दांची ओळख करून देणाऱ्या माईला शब्दफुलांच्या ओंजळीने कृतज्ञता वाहिली आहे, आपल्या सर्वांच्याच वतीने.

‘जोडीदार’ या कवितेत तर प्रत्येक स्त्रीला हा माझ्याच मनातला सहचर आहे असे वाटावे इतपत हे वर्णन जमले आहे आणि शेवटी या कल्पनाविलासातून बाहेर येत  ‘हे सत्यात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत राहतो तो खरा जोडीदार’ असे सांगून एक आशादायक वास्तव शेवटी आपल्यापुढे मांडतात.

तर एका लेकीच्या नजरेत बाप कसा असावा हे बाप माणूस– हे तर मुळातूनच वाचण्यासारखं. अशी ही कवयित्री विठ्ठलाला सुद्धा जाब विचारायला घाबरत नाही. सर्व जनांचा, भक्तांचा कैवारी पण त्याला तरी जोडीदाराची खबर आहे का? खरंतर रूपकात्मकच ही कविता. ज्याने त्याने जाणून घ्यावी अशी. ‘मैत्री जोडीदाराशी’  या कवितेत सुद्धा एक खूप आशादायी चित्र त्या निर्माण करतात, जे खूप अशक्य नाही . क्षणाची पत्नी ही अनंत काळची मैत्रीण तसेच क्षणाचा नवरा हा अनंत काळचा मित्र झाला तर नाती शोधायला घराबाहेर जाण्याची गरजच पडणार नाही असं आदर्श सहजीवन त्या उभं करतात. आणि शेवटी अतिशय समर्पक असा शेवट करताना कवयित्री म्हणते—-

‘तिचं शिक्षण बुद्धिमत्ता शक्ती युक्तीचीच गाळ करून चुलीत कोंबले नसते ….

लग्नानंतर त्याच्या इतकं तिच्या करिअरचा विचार झाला असता…. वांझ म्हणून हिणवलं नसतं, विधवा म्हणून हेटाळलं नसतं… तिच्या योनीपावित्र्याचा बाऊ झाला नसता… तर कदाचित  मी कविता केली नसती.

हा कदाचित खरोखर अस्तित्वात येण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचे योगदान येथे गरजेचे आहे .आपल्या बरोबरीने जगणाऱ्या एका माणसाला केवळ समाजव्यवस्था म्हणून रूढी परंपरा, जाती व्यवस्था, इत्यादी विषमतेच्या जोखडाखाली चिरडून टाकून ‘पुरोगामी’ म्हणून शिक्का मारून घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. किमान याचे भान जरी समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये अल्प प्रमाणात का होईना जागे करण्याचे बळ या संग्रहामध्ये आहे. त्याबरोबरच जिच्या पंखांना ताकद देण्याची गरज आहे , जिच्या पंखावरचे जड ओझे भिरकावून द्यायची गरज आहे, अशा सर्व ‘ती’ ना आणि  सर्व जगातल्या  ‘ती’च्यावर आईपण व बाईपण याचे ओझे वाटू देणाऱ्या व्यवस्थेवर लेखणीने प्रहार करणारा हा कविता संग्रह निश्चितच समाजमन जागे करणारा आणि मानवतेच्या सर्व मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देणारा आहे, असे थोडक्यात याचे वर्णन करता येईल. बऱ्याच दिवसातून काही आशयसंपन्न वाचल्याचे समाधान देणारा कवितासंग्रह.

मी अभिनंदन करते कवयित्रीच्या शब्दभानाचे,  सौम्यवृत्तीचे, माणूसपण जपणाऱ्या भावनेचे आणि विवेकपूर्ण संयमी विचाराचे.

© डॉ.स्वाती पाटील

सांगली

मो.  9503628150

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘सृजनवलय’ –  श्री अशोक भांबुरे ☆ परिचय – सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर ☆

सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘सृजनवलय’ –  श्री अशोक भांबुरे ☆ परिचय – सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर ☆ 

(हिन्दी राष्ट्रभाषा पंडित, उर्दू भाषा अभ्यासक, प्रोफेशनल फोटोग्राफर किंचित कवयित्री अशी स्वतःची ओळख देणाऱ्या सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर यांनी ‘सृजनवलय’ या पुस्तकाचा परिचय खालीलप्रमाणे करून दिला आहे.)

पुस्तक – सृजनवलय

भाषा – मराठी

लेखक – कवि अशोक भांबुरे

प्रकाशक – संवेदना प्रकाशन

किंमत – रु.150

पृष्ठसंख्या – 96

पुस्तक परिचय- सुश्री कांचन पाडळकर

कवी अशोक भांबुरे हे माझ्या साहित्यिक ग्रुपचे सदस्य आहेत. तसेच अनेक काव्य संमेलनांमध्ये मी त्यांच्या कविता आणि गझल ऐकत असते. त्यांच्या कविता आणि गझल ह्या नेहमीच मनाला भावतात. नुकताच प्रकाशित झालेला त्यांचा तिसरा काव्यसंग्रह “सृजनवलय” वाचला आणि अपेक्षेप्रमाणे या काव्यसंग्रहाने काव्यरसाची तहान ही पूर्णतः भागवली.

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

कवी अशोक भांबुरे यांची कविता निसर्ग, प्रेम,  सामाजिक-राजकीय दरी,  सामाजिक रूढी, स्त्री,  जाती-धर्माच्या भिंती यावर भावनिक भाष्य करते. पुस्तकाचं पहिलं पान उलटलं आणि  त्यांची पहिली गझल आवडली.

वेदना सांभाळते माझी गझल

अन  व्यथा कुरवाळते माझी गझल

*

कोण कुठला जात नाही माहिती

माणसांवर भाळते माझी गझल

स्त्री स्वतः विषयी, तिच्या दुःखाविषयी, वेदने विषयी लिहिते. पण कवी किंवा लेखकाने जेव्हा स्त्रीची वेदना अधोरेखित  केलेली असते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या कवीने, त्या लेखकाने आपल्या भावनिक पातळीवर त्या गोष्टींची अनुभूती घेतलेली असते.

या काळया बुरख्यामागे मी किती दडविले अश्रू

पुरुषांची मक्तेदारी  नडताही आहे आले नाही

स्त्री आयुष्यभर आपल्या घरादारासाठी संसारासाठी झटत असते. समर्पणाची भावना निसर्गाने स्त्रीला  जन्मताःच बहाल केलेली आहे. स्त्री घराबाहेर पडते, नोकरी करते, संसार सांभाळते. पण हल्ली नोकरी न करणाऱ्या स्त्रीबद्दल, ” ती काय घरीच असते”  अशी सामान्य विचारधारा समाजाची काही ठिकाणी दिसून येते.  तिचं घरासाठी, मुलांसाठी दिवसभर कामात बिझी असणं  याकडे कोणी लक्ष देत नाही. यावर भाष्य करणारे काही  काही शेर सुंदरपणे मांडले आहे…..

कामाला ती जात कुठेही नाही बहुदा

सातत्याने घरी स्वतःची हाडे दळते

*

 वेदनेतुनी प्रकाश देते कुणा कळेना

समई मधली वात जळावी तशीच जळते

कवीने स्त्री विषयी फक्त व्यथाच मांडलेली नाही,तर आशावादही व्यक्त केला आहे…

काळासोबत झुंजायाला तयार नारी

लेक लाडकी पुढे पुढे ही जावी म्हणतो

जाती-धर्माच्या भिंती आणि समाजातील रूढी, प्रथा, परंपरा  यावर लक्ष केंद्रित करणारे ही काही शेर आहेत.जसे…..

धर्माचे छप्पर होते, जातीच्या विशाल भिंती

मज सागरात प्रीतीच्या बुडता ही आले नाही

*

सारे पसंत तरीही फुटली न का सुपारी

नाकारताच हुंडा सारे उठून गेले

समाजात वावरणाऱ्या माणसाची वृत्ती आणि विरोधाभास यावरचा पुढील शेर वाचला आणि मला  अचानक काही लोकांची आठवण झाली.

ढोंगीपणा करूनी आयुष्य भोगतो जो

त्याचे म्हणे घराणे गावात थोर आहे

कवीचे मन फक्त माणूस आणि त्याच्या भावना इतकच फक्त सीमित नसतं. तर त्यामध्ये असते संवेदना. ती मग फुलांविषयी असेल, झाडांविषयी असेल, पक्षी-प्राण्यांविषयी असेल. हल्ली खरी   जंगलं नष्ट होऊन माणसाने जे सिमेंटची जंगलं उभारली आहेत  त्याचा वन्य जीवनावर  झालेल्या परिणामाबद्दल कवी  म्हणतात…

वस्तीत श्वापदांच्या वस्ती उभारतो अन्

मिळते जनावरांना शिक्षा कठोर आहे

या पुस्तकातली खूप आवडलेली एक  गझल, त्यातले काही शेर आपल्यासमोर मांडते…..

देखणेपणास गंध, शाप हाच वाटतो

फास देऊनी फुलास, माळतात माणसे

*

बाण लागला उरात, जखम चिघळली अशी

मीठ नेमके तिथेच चोळतात माणसे

*

घातपात, खून हेच कर्म मानतात जे

साळसुद ही स्वतःस समजतात माणसे

*

द्रौपदी पणास लाव डाव थांबवू नको

हा जुगार रोजचाच खेळतात माणसे

समाजात वावरणाऱ्या मानवरुपी दानवाचा विनाश होण्याची प्रार्थना ही कवी करतात. कवी म्हणतात की….

नटराजा तू पुन्हा एकदा कर रे तांडव

टाक चिरडूनी धरती वरचे सारे दानव

कवी अशोक भांबुरे यांची कविता प्रेरणेने भरलेली आहे. सामाजिक वैयक्तिक जीवनाचे दुःखच फक्त कुरवाळत न बसता  स्वतःच्या वर्तनाचा, कष्टाचा माणसाने वेध घ्यावा. आपला दृष्टिकोन विधायक असावा या विचाराचा कवी  आग्रह करताना दिसून येतं….

घमेंड नाही जीत ठेवली होती त्याने

ससा हरला आणि जिंकले येथे कासव

*

कष्टात राम आहे त्याला कसे कळावे

हा राम राम म्हणतो नुसताच खाटल्यावर

*

दगडात सावळ्या तू दिसतो जरी मनोहर

माहित हे मला ही तू सोसलेस रे घण

ईश्वराच्या सुंदर मूर्तीलाही पूजनीय होण्यासाठी अनेक घाव सोसून आकारलला यावं लागतं. तेव्हाच मूर्ती समोर सगळे नतमस्तक होतात.

वादळातही दोर प्रीतीचा तुटला नाही

भिरभिरणारा पतंग माझा कटला नाही

 प्रेमाचा प्रांत ही कवीने खूप सुंदररित्या रेखाटला आहे. सृजनवलया काव्यसंग्रहात एकूण 95  कविता आहेत. मुक्तछंदातल्या कविता गझल लावणी, गोंधळ जोगवा तसेच शिवराय आणि जिजाऊंच्या कर्तुत्वावर  केलेल्या रचनाही सुंदर आहेत. पुस्तकाला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना आहे.

साहित्याने पोट भरत नसतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काहीवेळा साहित्यिकाला येत असतात. व्यक्त होणे ही माणसात असलेली नैसर्गिक बाब आहे. साहित्याने पोट भरत नसलं तरी एका सुज्ञ आणि रसिक माणसाला साहित्यिक भूक असते. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याद्वारे विधायक बदल आपल्या जीवनात आणि समाजात व्हावे ही साहित्यिकाची अपेक्षा असते. असे विचार कवी अशोक भामरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे. काही शेर….

या तापसी युगाचा आता करूच अंत

हृदयात एक एक जागा करून संत

*

 देऊ प्रकाश स्वप्ने बदलून टाकू सर्व

 इतकेच स्वप्न माझे व्हावे इथे दिगंत

या पुस्तकातील सर्वच काव्य प्रकार छान आहेत. पण यातल्या गझल  मला विशेषतः खूप जास्त भावल्या.

ते माझं गजले वर मनस्वी प्रेम असल्यामुळे असेल बहुदा.

सुचल्या न चार ओळी हे रक्त आटल्यावर

आली बघा गझल ही काळीज फाटल्यावर

बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला उत्तम लेखक वावरत असतात, उत्तम कवी वावरत असतात पण आपल लक्ष फारसं त्यांच्याकडे जात नाही. प्रसिद्ध होण्याची हातोटी त्यांच्याकडे नसावी बहुतेक, अन् ना ही प्रसिद्धीची हाव असावी. तर  बऱ्याचदा काहींचं लिखाण मात्र जिमतेम असूनही प्रसिद्ध कसं व्हावं यांची कला अवगत असल्यामुळे ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतात. आपल्या आजूबाजूला जी माणसं साधी सरळ आहेत. ते लिखाणातनं व्यक्त होत असतात. लिखाणही उत्तम असतं.त्यांना कोणत्याही काही अपेक्षा नसतात  तरी ते रसिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे साहित्याची जाण असणाऱ्या आपण सर्व आणि साहित्यिकाची कदर करणारे आपण सर्व परिचित नसलेल्या पण चांगल्या साहित्यिकाची ओळख करून द्यावी म्हणून हा पुस्तक परिचय आपणापर्यंत पोहोचवते. चांगली माणसं चांगल्या माणसांपर्यंत पोहोचवावी आणि जुळावी असं मला मनापासून वाटतं.

© सुश्री कांचन हृषिकेश पाडळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वप्नांचे पंख’ – सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

 

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘स्वप्नांचे पंख’ – सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी ☆ परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

लेखिका :  सुश्री शुभदा भास्कर कुलकर्णी

प्रकाशक: अरिहंत पब्लिकेशन, पुणे

पृष्ठसंख्या: १९२

किंमत: रू. 290/-

परिचय – सुश्री गायत्री हेर्लेकर.

साहित्यप्रेमींचा तसेच साहित्यिकांचा आवडता, नव्हे काहीसा जिव्हाळ्याचा साहित्यप्रकार म्हणजे कथा.

छोट्यामोठ्या,वेगवेगळ्या विषयावरच्या कथा वाचकांनाही आवडतात.

अशाच कथांचा समावेश असलेला कथासंग्रह म्हणुन स्वप्नांचे पंख या कथासंग्रहाचा उल्लेख करता येईल..

लेखिका आहेत कोथरुड,पुणे येथील शुभदा भास्कर कुलकर्णी.

त्यांचा भावफुले हा काव्यसंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर हा कथासंग्रह.

या कथासंग्रहात लेखिकेने नुसतीच स्वप्ने दाखवली नाहीत तर त्यांची परिपूर्ती होण्यासाठी –उत्तुंग आकाशातून भरारी घेण्यासाठी  त्यांना पंखांचे बळ दिले. हे स्वप्नांचे पंख या नावावरुन दिसुन येते.

निळ्या प्रसन्न रंगातली मुखपृष्ठ आकर्षक आणि शिर्षकाला साजेसे आहे.

नाव, आशय-विषय, प्रसंग, व्यक्ती, स्थळ, काळ, भाषा या सर्वांची सहजसुंदर, मोहक गुंफण असेल तर कथा मनोवेधक होऊन वाचनाचा आनंद मिळतोच पण त्यातुन जीवनोपयोगी बोधपर संदेश मिळत असेल तर दर्जा अधिक उंचावतो.

या संग्रहातील शुभदाताईंच्या  कथा या कसोटीवर पुरेपुर उतरल्या आहेत हे आवर्जुन नमुद करावेसे वाटते ..अनेक कथा बक्षीसपात्र ठरल्या आहेत हाच त्याचा पुरावा म्हणता येईल.तरीही पुष्ट्यर्थ काही दाखले निश्चितच  देता येतील.

“स्वप्नांचे पंख”ही पहिलीच शिर्षक कथा आहे.,”एक कळी– फुलतांना”,सुवर्णमध्य”,सुखदुःख”,

“सोनेरी वळण”,”फुललेले चांदणे”

“स्मृतीगंध””,”ऊषःकाल”

अशी ही कथांची नांवे नुसतीच आकर्षक नाहीत तर कथेचा आशय -विषय प्रतित करणारी—जणु काही कथांचे आरसेच आहेत.

कथांचे प्रसंगही तसे साधेसुधे, अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातले.

जसे—तारुण्यसुलभ प्रेम, लग्न, मुलांचे शिक्षण, पुढील  शिक्षणासाठी परदेशगमन, प्रवास, मुलींची छेड, मृत्यु, ई. पण शुभदाताईंनी कथेतुन ते वेगवेगळ्याप्रकारे मांडले आहेत.

त्यातुन  त्यांची चिकित्सक दृष्टी दिसते.

शांता, ईंदिरा, रमा, मुक्ता, माया, चारु, दीपा, राजश्री, मीता, श्रीराम, श्रीकांत, महेश, अनंत, आनंद, सुमित, अमित अशी नवीजुनी नावे असलेल्या वेगवेगळ्या कथेतील अनेक नव्हे सर्वच व्यक्तिरेखा आपल्याभोवती वावरणाऱ्या आहेत.असेच वाचतांना वाटते.

नव्हे आपणही त्यातलेच आहोत असेही वाटते.”स्वप्नांचे पंखमधील” –आई–मानसीचा मनातील धास्ती आपणही अनुभवलेली जाणवते. तर “गोफ–आयुष्याचा” मधील “मुलांकडे जावे की इथेच रहावे” हा निर्णय घेतांना गोंधळलेल्या आईच्या जागी कितीतरी जणी स्वतःलाच पहातील.”

“रंगबावरी” सारखी प्रेमकथा मनाला स्पर्श करुन जाते.

काही कथातुन आलेल्या, मामंजी, सासुबाई, माई, दी, आत्या अशा संबोधनांमुळे आपुलकीचे नाते निर्माण होते.

कथांची पार्श्वभुमी वेगवेगळ्या काळातील आहे. लाल आलवणाचा पदराचा बोळा तोंडात कोंबून हुंदका देणारी आत्या “स्मृतीगंध” मध्ये आपल्या डोळ्यातुन पाणी आणते. तर “सुवर्णमध्य”मधे लग्नाला ठामपणे नकार देणारी, नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतली  मीता सुखावून जाते. काही कथातुन शुभदाताईंनी. आजीआजोबा.

आईबाबा, नातवंडे अशा तीन पिढ्यांची, केलेली गुंफण मनाला भावते. पण त्याचबरोबर झालेले बदल ही  योग्य प्रकारे टिपले आहेत. “घराचे जुने चिरे एक एक करुन ढासळले पण नव्याने नविन उभे राहिले.” अशा शब्दात केलेले बदलांचे समर्थन मनाला पटते. शुभदाताईंचा समृध्द अनुभवही यातुन दिसतो.

शहरातील कथा नेमक्या पध्दतीने सांगणारी शुभदाताईंची लेखणी गावाकडचे —तिथल्या स्थळांचे वर्णन करतांना जास्त खुलते. शिंगणापूर, बेलापूर अशी गावे. तिथली हिरवीगार शेती, तिथले पाण्याचे तळे, थंडगार पाण्याचा पाट, घुंगरांची गाडी, एस.टी. स्टँड, गणपती, शंभु-महादेवाची देवळे, चौसोपी वाडा, दिंडी दरवाजा, दगडी चौथरा, दारावरची पितळी फुले आणि इतके बारीकसारीक वर्णन वाचतांना ती स्थळे, दृश्य डोळ्यापुढे उभे रहातात. शुभदाताईंचे सुक्ष्म निरीक्षण आणि समर्पक शब्दांतून केलेले वर्णन —दाद देण्यासारखेच आहे.

कथांची एकंदरित बैठक घरगुती असल्यामुळे साध्या सोप्या बोली भाषेचा वापर संयुक्तिक आहे. तरीही अनेक ठिकाणी शब्दसामर्थ्य दाखवणारी वाक्येही आहेत.

“आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्तच रुजलाय हा मनात, -अन् मनाच्या गाभाऱ्यातुन हुंकार आला.” -सुवर्णमध्य.

“आयुष्याचे एक एक पदर सांभाळता ,सांभाळता हा एक धागा हातातुन निसटला”.

मध्यमवर्गीयांच्या जीवनात नित्य येणाऱ्या काही अडचणी, समस्या —कथांचा केंद्रबिंदू असल्याने काही कथा नकळत का होईना  थोडाफार संदेश देतात. “संपलं, —संपलं म्हणायच नाही”.

“आपल्या जगण्याचे निर्णय आपण इतरांमार्फत का घ्यायचे?”.

एक खास वैशिष्ठ्य म्हणुन सांगता येईल —

“सकारात्मकता हा सर्वच कथांचा स्थायीभाव आहे. मतभेद, विचारात फरक आहेत, जरुर आहेत. पण वैमनस्य, विरोधामुळे टोकाच्या भुमिका नाहीत, सामंजस्य, आणि परिस्थिती स्विकारुन पुढे आयुष्य जगणे हा महत्वाचा संदेश मिळतो.. आणि तोच सद्यपरिस्थितीत ऊपयुक्त आहे.

कौटुंबिक, सामाजिक, –सर्वच ठिकाणी अनुभवाला येणारी अस्थिरता, असमाधान, यामुळे नैराश्य आणि नकारात्मक भावना. अशावेळी सकारात्मक कथा निश्चितच भावतात. मनाला आनंदित करतात. जगण्याचा दृष्टीकोन बदलतात. म्हणुनच वाचकांच्या पसंतीस उतरेल. 

असा सुंदर कथासंग्रह वाचकांच्या हाती दिल्याबद्दल —-लेखिकेचे मनःपुर्वक अभिनंदन—

एकुण १८ कथा असलेल्या या कथासंग्रहाची पृष्ठसंख्या १९२ असुन किंमत २९०रु.आहे.अरिहंत पब्लिकेशन,*पुणे * यांनी हे पुस्तक जानेवारी २०२२ मध्ये प्रकाशित केले.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे – 411038 

दुरध्वनी – 9403862565, 9209301430 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

Image result for पुत्रकामेष्टि अनिल बर्वे

पुस्तकाचे नाव – पुत्रकामेष्टी (नाटक)

लेखक – श्री अनिल बर्वे

पॉप्युलर प्रकाशन

पृष्ठे – ८०

मूल्य – १२ रुपये

अमेज़न लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

फ्लिपकार्ट लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

 

पुत्रकामेष्टी (नाटक) – (एक आस्वादन)

पुत्रकामेष्टी हे अनिल बर्वे यांचं भन्नाट नाटक. मर्मस्पर्शी. मर्मस्पर्शी की मर्मभेदी ? बी.के. मोठ्या इंडस्ट्रीचा मालक. आहे. त्याचं आपल्या पत्नीवर, उर्मिलावर निरातीशय प्रेम आहे. पैशाने विकत घेता येणारी सारी सुखे त्यांच्यापुढे हात जोडून उभी आहेत. पैशाने विकत घेता न येणारे सुख म्हणजे आपत्यप्राप्ती. ते मात्र त्यांच्याकडे नाही. त्यासाठी उर्मिला वेडी-पिशी झालेली आहे. मूल न होण्याचं कारण? हनीमूनच्या वेळी त्यांच्या गाडीला झालेला अपघात आणि त्याचा परिणाम म्हणजे उर्मिलाचं गर्भाशय काढावं लागणं. ती बी.के.च्या मागे लागते की त्याने घटस्फोट घ्यावा आणि दुसरं लग्नं करावं. बी.के.ला ते मान्य नाही. तो उपाय सुचवतो, आंनाथश्रमातून मूल दत्तक घ्यावं, पण ते उर्मिलाला मान्य नाही. तिला बी.के.चं स्वत:चं मूल हवय. त्यासाठी उर्मिला उपाय सुचवते, एखाद्या वेश्येचा उपयोग करायचा. म्हणजे आपत्यप्राप्ती  हेही सुख पैशाने मिळवता येईल, याबद्दल तिला खात्री आहे. ती म्हणते, ‘थोड्याशा पैशासाठी वेश्या रात्रीपुरतं शरीर भाड्याने देते. आपण दीड-दोन वर्षांसाठी तिला भाड्याने घ्यायचं. ह्युमन इनक्युबेटर. तिच्या गर्भाशयात आपलं मूल वाढवायचं.’ ती मागेल तेवढे पैसे तिला द्यायचे. हा सौदा झाला. आपल्या इच्छेने ते तिच्या गर्भाशयात वाढेल.

बी. के. ला अर्थातच हे मान्य नाही. पण राजा युक्तिवाद करत, बी. के. ला हे मान्य करायला लावतो. राजा हा बी. के. इंडस्ट्रीचा लीगल अॅकडव्हायझर. त्या दोघांचा मित्र. उर्मिलाचा मानलेला भाऊ. तो एखाद्या अस्तरासारखा त्यांच्या आयुष्याला चिकटून आहे. नाटकात त्याची भूमिका बी. के.च्या पर्सनल अॅथडव्हायझरची. राजा आणि बी. के. अशा वेश्येचा शोध घेतात. तिथे त्यांची गाठ पडते. छंदिता… छंदाशी आणि इथे त्रिकोणाचा तिसरा बिंदू अवतीर्ण होतो.

छंदिताशी बोलण्यातून पुढे कळत जातं, ती मुरळी आहे. दहाव्या वर्षीच तिच्या आई-वडलांनी तिचे खंडोबाशी लग्नं लावून दिले आहे आणि तेव्हापासून तिला धंद्याला लावले आहे. बी. के. तिला स्पष्टच सांगतो, त्याला तिच्यापासून मूल हवे आहे. त्यासाठी तो वाटेल तितके पैसे तिला द्यायला तयार आहे, पण तिने मुलावर कोणताच हक्क सांगता कामा नये. दोन लाख रुपयांच्या बदल्यात ती हे काम करायला खुशीने तयार होते.

बी.के.आणि राजा छंदिताला घेऊन पाचगणीला येतात. इथे पाहुणीच्या सोबतीसाठी आणि लक्ष ठेवायला बहाद्दूर आणि माळीण आहे. उर्मीलाही इथेच येऊन रहाते. बी.के. ला झालेलं मूल उर्मिलाचं आहे, असं जगाला भासवायचय म्हणून तो तिचं  बाळंतपण स्वित्झर्लंडला करायचं ठरवतो. छंदाला सहा महीने होतात. बाळ पोटात गडबड करू लागतं आणि छंदाचं ममत्व एकदम जागं होतं. तिच्या स्वभावात , विचारात बदल होतो. बी. के. च्या इच्छेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे ती केवळ मानवी इनक्युबेटर रहात नाही. तिच्या भावना, तिचं वात्सल्य जागृत होतं. बाळ दोन माहिन्याचं होतं. बी.के. तिला हाकलून देतो. बाळाचा ताबा मिळवण्यासाठी ती कोर्टात जाते. एरवी बी.के.ची सतत पाठराखण करणारा राजा इथे मात्र वकील म्हणून छंदीताच्या बाजूने उभा आहे. प्रेक्षकच न्यायाधीश आहेत. निकाल छंदाच्या बाजूने लागतो. ती मुलाला घेऊन जाऊ लागते. म्हातार्यान माळिणीला मात्र वाटतं, असे गुंते कोर्टात सुटत नाहीत. एका झाडाचं कलम दुसर्याा झाडावर करायचं, तर ते हलक्या हाताने, मायेने करायला हवं. ती छंदिताशी बोलते. तिच्या बोलण्यातून छंदिताला जाणवतं, बाळाला चांगल्या रीतीने वाढवणं, त्याचं नीट पालन-पोषण करणं कसं अवघड आहे, नव्हे अशक्य आहे. ती बाळाला ठेवून जाते. उर्मिलाने दिलेले दोन लाख रुपयेही ठेवून जाते. बी.के. शक्तिपात झाल्यासारखा कोचावर बसतो आणि ओक्साबोक्षी रडू लागतो. नाटक संपते.

नाटक शोकांत आहे, पण यात रूढार्थाने कुणी खलनायक वा खलनायिका नाही. असलीच तर नियती खलनायिका आहे. सार्या  शोकांतिकेचे मूळ उर्मिलेच्या मुलाविषयीच्या असोशीतव आहे. तिला मूल हवाय, पण ते अनाथाश्रमातलं नकोय. त्याचे कारणही तिच्या बालपणीच्या आठवणीत आहे. राजा तिला सख्खा भाऊ वाटत असतो, पीएन राजाला जेव्हा कळतं की तो आश्रित आहे. तेव्हा त्याचं वागणं एकदम बदलतं आणि तो ‘मानलेला’ भाऊ होतो. तिला वाटतं दत्तक मुलाला मोठा झाल्यावर वस्तूशिती कळली आणि तोही असाच बदलला तर? म्हणून तिला ते नकोय. ती आग्रह धरते, कुणा वेश्येचा यासाठी वापर करावा. ह्युमन इनक्यूबेटर. त्याप्रमाणे छंदीता ही वेश्या दोन लाख रुपयाच्या मोबदल्यातत्या घराण्याला वारस द्यायचं कबूल करते. पुढे तिला दिवस रहातात.

एकदा घरातली वयस्क माळीण, उर्मिला आणि छंदीता बोलत असतात. बोलता बोलता माळीण म्हणते,’ निपुत्रिक होता म्हणून राजा दशरथाने ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ केला… तुम्हीदेखील असाच यज्ञ करताय ग… अग यज्ञ करायचा झाला, म्हणजे हवन करावं लागतं. बळी द्यावा लागतो. … तुम्ही तिघंही गुणी लेकरं ग. … तुमच्यापैकी कुणाचा बळी जाणार, काळजी वाटते. भीती वाटते मनाला.’ तिचं बोलणं म्हणजे भविष्यातील घटनेचं सूचनाच आहे.

यातील व्यक्तिरेखा लेखकाने अतिशय कुशलतेने विकसित केल्या आहेत. बी. के. मोठा उद्योगपती. धांनवंत. यशवंत. त्याचे उर्मिलेवर हिरातीशय प्रेमाहे. तो व्यवहारीही आहे. उर्मिला मुलासाठी वेदी-पिशी झालेली आहे. ती वेद लागण्याची सीमा गाठू शकते, हे जेव्हा त्याला कळतं, तेव्हा तो तिचा अव्यवहार्य हट्ट पुरवतो. छंदिताला तो मानवी इनक्यूबेटर मानतो. त्याला तिच्याबद्दल सहानुभूती आहे, कणव आहे, हे त्याच्या वेळोवेळी बोलण्यातून जाणवतं, पण त्याला तिची भावनिक गुंतवणूक नकोय. ती मुलाचा ताबा द्यायला नकार देते, तेव्हा तो तिच्याबद्दल अतिशय जहरी उद्गार काढतो. रांड, बाजारबसवी, हरामजाडी… वगैरे.. वगैरे… जेव्हा त्याला कळतं, ती मुलाला ठेवून गेलीय, पैसेही न घेता गेलीय, तेव्हा तो पराभूत होतो. कोचावर बसतो आणि ओक्साबोक्शी रडू लागतो.

उर्मिलेचे बी. के. वर अतिशय प्रेम आहे. ती सरळ स्वभावाची आहे. छंदिताशी ती माणुसकीने, मायेने वागते. राजा कंपनीचा लीगल अॅहडव्हायजर. तो बी.के. आणि उर्मिलेच्या जीवनाला अस्तरासारखा चिकटलेला आहे. वृद्धा माळीणीने जग पाहिलाय. ती शहाणपणाचं बोलते.

नाटकातले संवाद मोठे रेखीव आणि नेटके आहे. जी ती पात्रे आपापल्या भाषेत बोलतात, लेखकाच्या भाषेत नाही.   छंदिताला मुलाचा ताबा मिळालाय आणि ती घर सोडून निघालीय.  आता माळीणाबाई आणि तिच्यातला संवाद बघा-

माळीण- छंदा पोरी, चांगलं झाला हो…तुला तुझं बाळ मिळालं. पण बाळाचं घर गेलं ग…   बाळाचं घर गेलं. कुठं जाणार तू आता? … पुन्हा कोठयात?

छंदा- नाय

माळीण- नकोच जाऊस हो. नकोच जाऊस. कोणत्याही पोराला ‘रांडेचा’ म्हटलेलं आवडायचं नाही. … मग जाणार कुठे तू आता?

छंदा – देवाच्या जगात कुठेही.

माळीण- जग देवाचंच ग .. पण देव दगडाचा … उखाण्यात सांगायला गोड वाटतं… आभाळाचं  छ्प्पर! पण त्याच्याखाली राहाता येत नाही हो. राहाता येत असतं, तर टिनाची छपरं कशाला बांधली असती माणसांनी? ( छंदा निरुत्तर ) कामधंदा काय करणार?

छंदा – कुठं तरी मोलमजुरी

माळीण- चांगली हो. घामाची कष्टाची भाकरी खूप चांगली. पण छंदा पोरी… घाम गाळून  पोटापुरती भाकरी भाकरी मिळेल, बाळापुरतं दूध नाही मिळणार. … दूध खूप महाग असतं. तू असं कर. … भाताची पेज देत जा त्याला….

छंदा – अं?

माळीण- आता भाताच्या पेजेत दुधाचं बाळसं कुठलं असायला? बाळ हडकेल जरासा. .. पण जीवंत राहील हो. जीवंत राहील.

राजाने कोर्टात केलेले भाषण म्हणजे तर मास्टर पीस म्हणावा लागेल. भावी काळात निर्माण होऊ शकणार्यान समस्येकडे तो संकेत करतो. छंदीताने 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात मानवी टेस्ट ट्यूब म्हणून काम कारायचे, बी. के. च्या मुलाला जन्म द्यायचे कबूल केलेले असते. पण नंतर ती त्या मुळावर हक्क सांगते. राजा म्हणतो, ‘भावी काळात टेस्ट ट्यूबचा प्रयोग यशस्वी झाला, तर निर्जीव टेस्टट्यूबज तुमच्यापुढे तुमच्यापुढे येणार नाहीत. मग?

मग न्यायाधीश महाराज त्या टेस्टट्यूबजचा वापर फक्त बी.के. ऊर्मिला सारखी निपुत्रिक जोडपीच वात्सल्यपूर्तीसाथी करणार नाहीत…. तर प्रत्येक चांगल्या शोधाचा स्वार्थासाठी दुरुपयोग करणार्याा दुष्टशक्तींचाही वापर करतील स्मगलर, गुंड, व्यापारी, सावकार, जमीनदार… तरुण मुला-मुलींकडून रक्त विकत घेतल्याप्रमाणे त्यांची बीजं विकत घेतील. टेस्टट्यूबमधून मुलं काढतील… ज्या मुलांना नसेल आई.. नसेल बाप… असेल फक्त मालक! गुलामांच्या पिढ्यांच्या पिढ्या तयार होतील.’

भावी अनर्थाचे अंगावर शहारा उमटवणारे भीषण चित्र तो पुढे उभे करतो.

तो म्हणतो, ‘मूल विकत घेतलं काय आणि मुलाला जन्म देणारी आई भाड्याने घेतली काय, या व्यवहारात खरदी-विक्री अंतर्भूत आहेच.’

न्यायाधीशाने कोणताही निर्णय दिला तरी तो क्रूरच असणार आहे. राजा म्हणतो, ‘तरीपण असा क्रूर निर्णय द्या – फक्त यांच्याताला कोणीही बळी जावो… पुढल्या पिढ्या बळी जाणार नाहीत…. समाजाचं भवितव्य धोक्यात येणार नाही.’

निर्णय होतो. मुलाचा ताबा छंदाला मिळतो. वैयक्तिक समस्येपासून सुरू झालेलं नाटक एका अनर्थ करू शकणार्यार विलक्षण आशा सामाजिक समस्येचं सूचन करतं. प्रेक्षक – वाचक यात गुंतत जातो. 

अगदी आवर्जून बघावं निदान वाचावं असं आहे ‘पुत्रकामेष्टी’ नाटक.

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “देह झाला चंदनाचा” — ले. राजेंद्र खेर ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “देह झाला चंदनाचा” — ले. राजेंद्र खेर ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

Deha Jhala Chandanacha (देह झाला चंदनाचा : स्वाध्यायाप्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित काद

लेखक -राजेंद्र खेर

प्रकाशक- विहंग प्रकाशन, पुणे  

पृष्ठ संख्या – 501

स्वाध्याय प्रणेते पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील ही सत्याधिष्ठीत कादंबरी…

पांडुरंग शास्त्री आठवले यांची ओळख “ स्वाध्याय “ या त्यांच्या कामामुळे माहीत होती. परंतू त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. ही कादंबरी जेव्हा वाचली तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला.

कादंबरीची सुरुवात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या, ते जपान भेटीला गेले असताना टोकियो विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या झालेल्या प्रतिक्रियेने होते.

जपानी लोकांची जलद हालचाल, आदर्श वागणं, आणि सतत कामात असणं, त्यांना भावलं होतं ! पुढे पांडुरंगशास्त्रींच्या जीवनाचा आलेख उलगडत जातो.

रोह्यासारख्या लहान गावात त्यांचे बालपणीचे दिवस गेले. आजोबांच्या सहवासात हिंदू धर्माचे प्रेम वाढीस लागले. परदेशात राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. प्रभू-कार्यालाच वाहून घेण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. श्रीकृष्ण हा त्यांचा आदर्श होता. दीनदुबळ्यांना मदत करण्याची इच्छा होती. आजोळचे लक्ष्मणशास्त्री आठवले हे त्यांचे आजोबा. त्यांचा प्रभाव पांडुरंगशास्त्रींवर होता.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचे शिष्यगण वसई, गुजरात बॉर्डर, या भागात अधिक होते. त्यांच्या सकाळच्या फेरीमध्ये त्यांचे शिष्यगण लोकांना ईश्वराचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत. कोळी समाजातील लोकांत त्यांचा वावर अधिक होता. खालच्या समाजातील बरेच लोक दारूच्या आहारी जातात. त्या दारूच्या आकर्षणापासून त्यांना मुक्त करण्याकडे त्यांचा कल होता. त्यासाठी या समाजातील लोकांच्या वस्तीत त्यांचे लोक भक्ती-फेरी काढत असत. श्रीकृष्ण हा सर्वांसाठी आदर्श देव आहे असे ते मानत. आपल्या आश्रमाच्या जागेवर त्यांनी कृष्ण मंदिर उभारले होते. तिथे लोक एकत्र येत असत. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. जेव्हा लोक एकत्र येत असत तेव्हा ते त्यांना देवपूजेबरोबरच कामाचे महत्त्व पटवून देत असत. पांडुरंगशास्त्री यांच्या अनुयायांमध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होता. विशेष करून आगरी, कोळी लोकांच्या समाजात त्यांनी कार्य केले.

या कादंबरीतून पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनाचा चांगला परिचय होतो. एक सच्चा हिंदू धर्माचा प्रेमी, सर्व जगात आपल्या धर्माचे महत्त्व पटवून देणारी व्यक्ती, म्हणून त्यांचा गौरव होतो. समाजातील सर्व स्तरात त्यांचा वावर होता. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत….. परंतू त्यांनी स्वतःच्या आश्रमासाठी श्रीमंतांकडून अजिबात पैसा घेतला नाही. अतिशय निरपेक्षपणे काम केले आणि लोकांमध्ये जागृती केली. त्यांच्या या सर्व कामात त्यांच्या पत्नीची तसेच त्यांच्या मुलीची त्यांना चांगली साथ मिळाली. आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक चांगल्या व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांच्यामुळे हिंदू धर्माची व्याप्ती आणि महत्त्व सर्वांना समजले.

ही कादंबरी मला आवडली कारण साधी, सोपी ओघवती भाषा, आणि आवडीचा विषय ‘ हिंदू धर्म! ’. आपला हिंदू धर्म सर्वसमावेशक, तसेच सनातन असा आहे. हिंदू धर्मात सर्वांचा आदर केला जातो.  हिंदू धर्माची शिकवण या कादंबरीत चांगल्या प्रकारे विशद केली आहे. तसेच पांडुरंगशास्त्री यांचे व्यक्तिमत्त्वही  या कादंबरीतून चांगले कळून येते..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सरमिसळ… श्री प्रमोद वामन वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ सरमिसळ… श्री प्रमोद वामन वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

पुस्तकाचे नाव—– सरमिसळ

लेखक—- प्रमोद वामन वर्तक

मुद्रक— सुविधा एंटरप्राइजेस ठाणे

मूल्य—- सप्रेम भेट

प्रकाशन – ग्रंथाली

श्री प्रमोद वर्तक यांच्या ‘सरमिसळ’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ठाणे येथे संपन्न झाले. रिझर्व बँकेचे हाऊस मॅगझिन ‘विदाऊट रिझर्व’ मधून त्यांचा साहित्य प्रवास सुरू झाला.  तेथील मराठी साहित्य मंडळाच्या भित्ती पत्रकात लिहिलेले त्यांचे ताज्या घडामोडींवरील  खुसखुशीत लेख वाचकांच्या पसंतीला उतरू लागले. तसेच त्यांनी बँकेच्या स्पोर्ट्स क्लबने आयोजिलेल्या एकांकिका स्पर्धेत दुसरे बक्षीसही पटकावले.

सातत्य हा प्रमोद वर्तक यांच्या लेखनाचा स्थायीभाव आहे. सिंगापूर मुक्कामी त्यांच्या साहित्यकलेला बहर आला. कविता, चारोळ्या, ललित लेखन, विनोदी प्रहसने अशा वाङ्मयाच्या अनेक शाखांमधून त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. सिंगापूरच्या मराठी मंडळातही बाजी मारली. मंडळांने आयोजिलेल्या कविता स्पर्धेत मधुराणी प्रभुलकर यांनी प्रमोद यांच्या  कवितेची निवड केली आणि सिंगापूर मराठी मंडळाच्या वेब सिरीज मध्ये ती कविता सादर करून प्रमोद यांनी मानाचे पान पटकावले.

आपल्या समूहावरील लेखनामधून त्यांच्या सर्वस्पर्शी लिखाणाचा परिचय आपल्याला झाला आहे. विविध दिवाळी अंकातून त्यांच्या कथा, कविता, ललित लेख आपल्याला भेटतात आणि दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतात.

‘सरमिसळ’ पुस्तकाच्या तीन भागांपैकी पहिल्या भागात त्यांनी सर्वसाधारणपणे एक शब्द घेऊन त्याचा विस्तार केला आहे. हे वाचताना आपण आपलेच अनुभव वाचीत आहोत असे वाटते.  जेव्हा लेखकाच्या लेखणीतून आपल्यापर्यंत ते अनुभव पोहोचतात तेव्हा वेगळीच गंमत आणतात. या दृष्टीने यातील चिमटा, वजन ,पायरी, प्रश्न असे अनेक लेख वाचण्यासारखे आहेत.

श्री प्रमोद वामन वर्तक

सिंगापूरच्या वास्तव्यामध्ये त्यांच्या लेखणीला अधिक बहर आला. मोरू आणि पंत यांच्यातील चाळीच्या पार्श्वभूमीवरील खुसखुशीत संवाद, त्यांची मजेशीर प्रश्नोत्तरे  आपल्याला अगदी जवळची वाटतात. तसेच पती- पत्नीमधील कौटुंबिक रुसवे फुगवे, खटकेबाज संवाद आणि गोड शेवट  संवाद रूपाने आपल्या मनात रेंगाळत राहतात. पुस्तकाचा  तिसरा भाग कवितांचा आहे. कविता म्हणजे काय? ती कशी सुचते? कशी व्यक्त होते? मनातल्या आणि जगातल्या अनेक विषयांवर त्यांची कविता सहज शब्द रूपाने भेटते. या दृष्टीने पाठमोरी, राधेचा शेला, आभाळाची तीट, रंग महाल, मन पाखरू पाखरू अशा कविता आवर्जून वाचण्यासारख्या आहेत. विविध दिवाळी अंकातून त्यांचे लेख ,कविता आपल्याला भेटतात आणि दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतात.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. मुंबईला दादरच्या ‘अहमद सेलर’  बिल्डिंगमध्ये त्यांच्या आयुष्याचा बराच काळ गेला. त्या चाळीच्या  चित्राची झलक मुखपृष्ठावर आहे. ही चाळीची पार्श्वभूमी त्यांच्या लेखांमधूनही आपल्याला दिसते. एक चित्र अर्थातच रिझर्व बँकेचे! जिथे त्यांच्या आयुष्याला स्थैर्य मिळाले आणि लेखन प्रवास सुरू झाला ती आदरणीय रिझर्व बँक! तिसरे  लेकीकडील सिंगापूरचे वास्तव्य दर्शविणारे. तेथील  वेगळ्या वातावरणात निवांतपणे त्यांना अनेक अनुभवांना शब्दरूप  देता आले आणि मुखपृष्ठावरील चौथे गावाकडचं घर दिसते ते आवास-अलिबाग येतील बहिणीचे घर. या साऱ्यांनी त्यांचे जीवन व्यापलेले आहे. त्यामुळे कस्तुरी सप्रे यांनी कल्पकतेने काढलेले हे मुखपृष्ठ आपल्याला आवडते.  पुस्तकाची छपाई बरीचशी निर्दोष आहे. ‘सरमिसळ’  मधील सर म्हणजे उच्च  प्रतीचे तर मिसळ ही नेहमीच चविष्ट असते पण आपल्याला मिसळीची एक डिश अपुरीच वाटते आणि आपण दुसऱ्या डिशची प्रतीक्षा करतो. प्रमोद वर्तक यांच्या अशाच खमंग ,चविष्ट, रसदार मिसळीच्या दुसऱ्या डिशची आपण सर्वजण  वाट बघूया.

पुस्तक परिचय –  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘अल्याड-पल्याड’ —अलक संग्रह… म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे) ☆ परिचय – परिचयकर्ता — प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘अल्याड-पल्याड’ —अलक संग्रह… म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे) ☆ परिचय – परिचयकर्ता — प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ ☆

पुस्तकाचे नाव —अलक -संग्रह ” अल्याड- पल्याड ” 

लेखक –- म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे )

प्रकाशक –-परीस पब्लिकेशन – सासवड , जि. पुणे.

पृष्ठ संख्या– ११२.

मूल्य- रु.८०/-,

मयुरेश देशपांडे यांनी लिहिलेला ‘अल्याड पल्याड’ हा अलक कथासंग्रह आज वाचून संपवला. एका बैठकीत नाही. कारण त्यातील प्रत्येक कथा आकाराने लहान असली तरी मानवी जीवनातील काही विदारक तर काही सुखांत सत्त्ये  पानोपानी आढळून येतात. म्हणून बारकाईने सगळ्या अलक वाचल्यावर माझी मतं लिहितो.

‘ आजकाल वाचन कमी होत आहे,वाचनसंस्कृती वाढायला पाहिजे,वाचणं हीच माणसाची खरी ओळख आहे…’ वगैरे वगैरे कितीही म्हटलं तरी एक सत्य आहे -आज माणसांना मिळणारा फावला वेळ कमी असतो, त्यातही आपले प्राधान्यक्रम हेही या तक्रारीमागचं एक मोठं कारण आहे. मला आठवतं, पूर्वी गावात वर्तमानपत्रं फक्त ग्रामपंचायतीत येत. तेही सायंकाळी ती वाचणं हा माझा रोजचा काही तासांचा दैनंदिन उपक्रम असायचा. क्वचित मिळणारी नियतकालिकंही पुरवून पुरवून म्हणजे एकच मजकूर मी अनेकदा वाचून काढी. पुस्तकातल्या कविताच नव्हे तर  काहो धडेही  माझे पाठ होते. आज हे थांबलं ही शोकांतिका असली तरी खरं आहे. आज भेट मिळालेलीच काय अगदी विकत घेतलेली पुस्तकं, अगदी नामवंत लेखकांचीही असली तरी आपण पूर्ण वाचत नाही. समाजमाध्यमं इतकं साहित्य उपलब्ध करून देतात की, काय वाचू आणि कधी हेच ठरवता येत नाही. या पार्श्वभूमीवर  ‘अल्याड पल्याड’  हे पुस्तक अपवाद ठरते. यातील पहिलीच अलक लेखकाने भारतीय समाजात  वंचितांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  यांच्याविषयी लिहून औचित्य साधले आहे. सगळ्याच अलक कथा या  अर्थपूर्ण आहेत. अनेक लेखक मराठीच्या आत्यंतिक प्रेमापोटी अनाकलनीय मराठी शब्दांचा प्रयोग करून लिखाण हे बोजड करतात. इथे लेखकाने ते जाणीवपूर्वक टाळले आहे. लेटमार्क,बेस कॅम्प असे शब्द हे दर्शवतात. अनेक अलकमधून  स्थानिक बोलीभाषेची योग्य रचनाही दिसते. समाजातील विदारक सत्ये दाखवताना अनेक विसंगत बाबीही परिणामकारकपणे मांडल्या आहेत.  ‘ वडापाव ‘ या आशयाच्या कथेतून स्त्री सक्षमीकरण, पत्नीची कुटुंबातील महत्त्वाची भूमिका जाणवते. वैद्यकीय उपचारांसाठी घरातल्या बायकोच्या राहिलेल्या मंगळसूत्राकडे पहाणा-या नवऱ्याची अगतिकता प्रभावीपणे एका अलकमधून  उलगडते. भंगार गोळा करणारी स्त्रीही आपले सौंदर्य फुटक्या आरशात पहाते, ही अलक आपल्या समाजातील आजचे एक सत्त्य सांगते. मात्र केवळ दु:ख उगाळत बसणारा हा लेखक नाही, तर ‘ दु:ख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही ‘ हा बाबा आमटे यांचा  आशावादही इथे ठायीठायी दिसून येतो. सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. 

माणूस हा श्रेष्ठ आहे याच भूमिकेतून लिहीत असलेले साहित्यिक मयुरेश देशपांडे यांच्या साहित्यप्रवासाला मनापासून शुभेच्छा.

परिचय – प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

मो ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ दुसरं वादळ… श्री शरद पोंक्षे – परिचय सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ दुसरं वादळ… श्री शरद पोंक्षे – परिचय – सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर ☆

एखादा दुर्धर रोग अचानक उद्भवल्यानंतर, जीवनाची आता काही शाश्वती नाही हे दाहक सत्य अगदी एका क्षणात अंगावर आल्यानंतरची माणसांची प्रतिक्रिया ही त्या त्या व्यक्तीच्या मनःशक्तीवर अवलंबून असते. धक्का सगळ्यांनाच बसतो, पण काही माणसे त्या धक्क्यामुळे कोलमडून जातात तर काही व्यक्ती जिद्दीने जमिनीत पाय गाडून उभे राहतात आणि त्या रोगावर मात करून दाखवतात. प्रसिद्ध अभिनेते, सावरकर भक्त आणि विचारांनी प्रखर  हिंदुत्ववादी असलेले शरद माधव पोंक्षे शरद माधव पोंक्षे हे ह्यांपैकी दुसऱ्या गटात मोडणारे.

Hodgkins Lymphoma हा कर्करोगाचा एक प्रकार समजला जाणारा दुर्धर रोग शरद पोंक्षेंना झाला आणि एकाच दिवसात त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचंही आयुष्य बदलून गेलं. एक वर्ष सर्व कामधंदा सोडुन पोंक्षेंना घरी बसावं लागलं, १२ किमो साईकल्स आणि त्यांचे शरीरावर होणारे भयानक दुष्परिणाम, वर्षभर काम बंद असल्यामुळे येणारी आर्थिक असुरक्षिता आणि त्यामुळे भेडसावणारी अनिश्चितता, कुटुंबाला सतावणारी भीती आणि जीवघेणी वेदना ह्या सर्वांवर मात करून शरद पोंक्षे यशस्वीपणे या वादळातून बाहेर पडले. त्या अनुभवाची गोष्ट म्हणजेच ‘दुसरे वादळ.’ साध्या, सोप्या, ‘बोलले तसे लिहिले’ ह्या भाषेत लिहिलेले पुस्तक मी काल एका बैठकीत वाचून संपवले आणि शरद पोंक्षे ह्यांच्याबद्दल असलेला माझा आदर अजूनच वाढला.

कर्करोग, किडनी विकार किंवा हृदयविकार ह्यासारख्या दुर्धर रोगांशी लढा दिलेल्या लोकांची आत्मकथने ह्यापूर्वीही मराठीत पुस्तकरूपाने आलेली आहेत. अभय बंग ह्यांचे ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’, पद्मजा फाटक यांचे ‘हसरी किडनी’ ह्यांसारखी पुस्तके तर व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी झालेली आहेत, मग ह्या पुस्तकात नवीन काय आहे? ह्या पुस्तकात नवीन आहे ती शरद पोंक्षेंची रोगाकडे बघायची दृष्टी, आणि त्यांची सावरकर विचारांवर असलेली अपार डोळस श्रद्धा, ज्या श्रद्धेने त्यांना ह्या रोगाकडे झगडण्याचे बळ दिले.

ह्याबद्दल लिहिताना पोंक्षे म्हणतात, ‘मानसिक धैर्य सुदृढ कसं करायचं हा प्रश्न पडला. त्यावर एकच उपाय. सावरकर. विचार मनात येताक्षणी कपाट उघडलं आणि माझी जन्मठेप चौथ्यांदा वाचायला सुरवात केली. ११ वर्षे ७ बाय ११ च्या खोलीत कसे राहिले असतील तात्याराव? गळ्यात, पायात साखळदंड, अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न, तात्याराव कसे राहिला असाल तुम्ही? ते देशासाठी ११ वर्षे राहू शकतात, मला अकराच महिने काढायचे आहेत, तेही स्वतःसाठी! हा विचार मनात आला आणि सगळी मरगळ निघून गेली’.

पोंक्षेनी ह्या पुस्तकात अतिशय प्रांजळपणे आपल्याला आलेले अनुभव मांडलेले आहेत. त्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली, मग ते शिवसेनेचे आदेश बांदेकर असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, त्या लोकांचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. त्यांच्यासाठी म्हणून जे लोक कामासाठी थांबले त्यांचाही उल्लेख योग्य रीतीने पुस्तकात झालेला आहे. त्यांना काही डॉक्टरांचे आलेले वाईट अनुभवही पोंक्षेनी तितक्याच स्पष्टपणे लिहिलेले आहेत तसेच आयुर्वेद, होमियोपथी आदी उपचार पद्धतींचाही त्यांना चांगला फायदा कसा झाला हेही त्यांनी लिहिलेले आहे.

पुस्तक खरोखरच वाचनीय आहे. सर्व वयाच्या लोकांना सहजपणे वाचता यावे म्हणून अक्षरे जाणून बुजून मोठी ठेवलेली आहेत. एखाद्या दुर्धर रोगाशी लढणाऱ्या कुणालाही बळ देईल असेच हे पुस्तक आहे. नथुरामची व्यक्तिरेखा साकारताना पोंक्षेना सोसावा लागलेला विरोध हे शरद पोंक्षेंच्या आयुष्यातले पहिले वादळ आणि कर्करोगाशी दिलेला लढा हे दुसरे वादळ. मला विशेष आवडले ते हे की ह्या दोन्ही वादळांशी लढताना शरद पोंक्षेनी आपल्या तत्वांशी कसलीच तडजोड कुठेही केलेली नाही.

एक अभिनेते म्हणून शरद पोंक्षे मोठे आहेतच पण एक माणूस म्हणून ते किती जेन्यूईन आहेत हे ह्या पुस्तकाच्या पानापानातून जाणवतं. अभिनयासारख्या बेभरवश्याच्या क्षेत्रात वावरताना व्यावसायिक हितसंबंध जपायचे म्हणून माणसं क्वचितच रोखठोक, प्रांजळ व्यक्त होतात. पण शरद पोंक्षे ह्याला अपवाद आहेत. एका सच्च्या माणसाने लिहिलेले हे एक सच्चे पुस्तक आहे. अवघड परिस्थितीशी झगडावे कसे हे ह्या पुस्तकातून शिकण्यासारखे आहे. पार्थ बावस्करच्या शब्दामृत प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. Parth Bawaskar – पार्थ बावस्कर

– श्री शरद पोंक्षे

परिचय – सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती- सुश्री सुनीता डबीर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आफ्रिकी आतषबाजी… श्री उमेश कदम ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ आफ्रिकी आतषबाजी… श्री उमेश कदम ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव- आफ्रिकी आतषबाजी

लेखक – उमेश कदम

पृष्ठे – २१४

मूल्य – २५० रु.

प्रकाशन – ग्रंथाली

‘आफ्रिकी आतषबाजी’ हा उमेश कदम यांच्या खुसखुशीत कथांचा अतिशय वाचनीय असा संग्रह आहे. उमेश कदम हे सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार बाबा कदम यांचे चिरंजीव. आपल्या वडलांच्या लेखनाचा वसा त्यांनी जपला, जोपासला आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर १९९८पासून ते  आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसमध्ये वरिष्ठ कायदा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २००९पासून ते नोहेंबर २०१५पर्यन्त ते नोकरीनिमित्त आफ्रिकेत राहिले. इथल्या वास्तव्याच्या आणि प्रवासाच्या दरम्यान, तिथल्या लोकांशी बोलताना, त्यांची जीवनशैली अनुभवताना त्यांना आलेल्या अनुभवावर त्यांनी,’ दूरची माती जवळची नाती’, ‘केवळ मैत्रीसाठी’, ‘एक होता मित्र’, ‘शापित भूमी’, ‘दृष्टीपलीकडची सृष्टी इ. कथासंग्रह लिहिले. या कथासंग्रह मालिकेतला ‘आफ्रिकी आतषबाजी’ हा आणखी एक कथासंग्रह.

आफ्रिका हा वेगळा प्रदेश. इथलं भैगोलिक- संस्कृतिक वातावरण वेगळं, विचार-आचार-चालीरिती, श्रद्धा- अंधश्रद्धा वेगळ्या. तिथे घेतलेले प्रत्यक्ष अनुभव, तिथल्या लोकांशी झालेल्या बोलण्यातून उमजलेलं त्यांचं जीवन आणि त्याला दिलेली कल्पनेची जोड यातून ‘आफ्रिकी आतषबाजी’मधील कथा सिद्ध झाल्या आहेत. यातील नविन्यामुळे या कथा अतिशय मनोरंजक झाल्या आहेत.

या संग्रहातील सुरुवातीच्या तीन कथा वगळता, कथांचा निवेदक मी आहे, मात्र काही ठिकाणीच तो कथांचा नायक आहे. सर्वच कथांचा नायक तो नाही. इतरत्र तो साक्षीदाराच्या भूमिकेतून निवेदन करतो.

‘आफ्रिकी आतषबाजी’ म्हणजे दिवाळी, ख्रिसमस च्या वेळेला होणारी नयनरम्य आतषबाजी नव्हे. आफ्रिकेमध्ये टोळीयुद्ध ही नित्यश: घडणारी घटना. एकदा लेखक जुबामध्ये असताना अचानक टोळीयुद्ध सुरू होतं. मग लेखक मनसुबे रचू लागतो. ‘आता आपल्याला बंडखोर ओलीस ठेवतील, मग धमाल येईल. टी. व्ही, बातम्या, सर्व प्रसार माध्यमातून प्रसिद्धी मिळेल. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरून आपल्या सुटकेचे प्रयत्न होतील. कुटुंबियांच्या मुलाखती घेतल्या जातील. मित्र, आपण सुटकेसाठी पाठीशी असल्याचं सांगतील. एकदम आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळेल.’ प्रसंग खरं तर अतिशय गंभीर पण लेखकाने त्याला मोठं गमतीदार वळण दिलय. त्याचे मनोराज्य अर्थातच पूर्ण होत नाही. पण त्यामुळे तिथे अडकून पाडलेल्या, अन्य देशातल्या जुजबी ओळख असलेल्या व्यक्तींशी कसे जिव्हाळ्याचे नाते जडले, आयुष्यात कसा निवांतपणा अनुभवता आला, याचेही वर्णन शेवटी येते. अखेर जखमींना जबाला आणणार असल्याचे कळते, तेव्हा लेखकाला जाणीव होते, जी आतषबाजी पहाण्याचा आपण हव्यास धरला होता, त्यामुळे देशात केवढा हाहा:कार उडाला आहे. हे युद्ध थांबायलाच हवे. अखेर युद्ध थांबते आणि नियोजित स्थळी जाण्यासाठी लेखकाला विमानात बसण्याची वेळ येते, इथे कथा संपते. इथे कथासंग्रहाचं नाव याच कथेशी निगडीत आणि मुखपृष्ठही वर रोखलेली वेपन्स, मशीनगन्स असे आहे.

यातली पहिली कथा ‘बबलू, बबी आणि बबून.’ ही बबलू आणि बबी या काटकसरी जोडप्यावरची आहे. काटकसरी काय, कंजूषच म्हणता येईल. हे दंपत्य ‘व्हिक्टोरिया फॉल’ बघायला जातं. बाहेर जेवणा-खाणाचा खर्च होऊ नये, म्हणून घरातून काही पदार्थ करून घेऊन ते जातात. ‘व्हिक्टोरिया फॉल’च्या प्रवेश द्वाराशी पार्कमध्ये जाताना चौकशी होते. बॅगेत खाद्यपदार्थ नाहीत ना? बबलू ‘नाहीत’, असं बिनदिक्कत खोटं बोलतो. त्यात फक्त पासपोर्ट आणि पाण्याची बाटली असल्याचे सांगतो. आतमध्ये गेल्यावर बॅगेतील खाद्यपदार्थांचा वास एका बाबून जातीच्या धिप्पाड मकडाला लागतो. ते त्यांची बॅग पळवते. मग ती बॅग मिळवण्यासाठी दोघांची कशी पळापळ होते, याचे मोठे रंजक वर्णन यात येते. बबून खाऊ खाऊन बॅग नदीत टाकून देते. त्याबरोबर पासपोर्टही जातात. मग पुन्हा पासपोर्ट मिळवण्यासाठी तिथे रहाणं, या सगळ्यासाठी मित्राकडून पैसे मागवणं, पासपोर्ट मिळवण्यासाठी करावी लागलेली यातायात, या सगळ्यामुळे ही ट्रीप किती तरी जास्त खर्चिक, ३४५३ डॉलर्स म्हणजे २ लाख, ७ हजाराच्या वर कशी जाते, याचं मोठं खुसखुशीत वर्णन यात येतं.

आफ्रिकन राष्ट्रांची संघटना स्थापन व्हावी, यासाठी बोलणी करण्यासाठी, ३२ राष्ट्रांची इथिओपियात एक शिखर परिषद होते. संघटना स्थापन करण्याचे निश्चित होते. या संघटनेचे मुख्यालय आदिस आबाब इथे व्हावे, ही इथिओपियन सम्राटाची इच्छा, तर सोयी-सुविधांचा विचार करता ते नैरोबीत व्हावे, असे अनेक राष्ट्रप्रमुखांचे म्हणणे. त्यांना आपले मत बदलायला लावण्यासाठी इथिओपियन सम्राट आणि परराष्ट्र मंत्री काय युक्ती लढवतात त्याचा अफलातून किस्सा ‘आफ्रिकी युती ( की युक्ती)’ या कथेत नेहमीच्याच खुसखुशीत शैलीत येतो. परराष्ट्र मंत्री सांगतात, येथील हमेर आदिवासीत अशी प्रथा आहे की टोळीचा प्रमुख टोळीतील तरुणींना अतिथींसोबत शय्यासोबत करण्याची आज्ञा देतो, कारण या बाबतीत जिचा अनुभव जास्त, ती तरुणी अधीक विवाहयोग्य. शिखर परिषदेसाठी जमलेल्या राष्ट्रप्रमुखांना इच्छा असल्यास हे आतिथ्य स्वीकारण्याची व्यवस्था करता येईल, असेही ते सांगतात. बहुतेक

राष्ट्रप्रमुख हे आतिथ्य स्वीकारतात. दुसर्याह दिवशी परराष्ट्र मंत्री साळसूदपणे म्हणतात, ‘ इथे संघटनेचे मुख्यालय झाले असते, तर असा अनोखा अनुभव, मिटींगच्या निमिताने आला असताना वारंवार घेता आला असता पण हरकत नाही. नैरोबीत मुख्यालय व्हायला आमची काहीच हरकत नाही. दुसर्यात दिवशी मतदान होते, तेव्हा २४ राष्ट्रप्रमुखांनी आदिस आबाबला मुख्यालय व्हावे, या बाजूने मतदान केलेले असते.

‘अपहरण (होऊ घातलेल्या) बायकोचे!’ या कथेचा नायक बिर्हानू इथिओपियन आहे. अतिशय बुद्धिमान आहे. लंडनला तो सूक्ष्मजीवशास्त्रात एम. ए. सी. करायला येतो. तिथे त्याचं दिसणं, वागणं, इंग्रजी उच्चार यामुळे तो टिंगल टवाळीचा विषय बनतो. त्याची बुद्धीमत्ता, अभ्यासू वृत्ती, संशोधन यामुळे तो प्राध्यापकांच्या मात्र कौतुकाचा विषय बनला आहे. त्याच्या वर्गातील स्टेफी मात्र त्याच्याकडे, सहानुभूतीने, कौतुकाच्या आणि मित्रत्वाच्या भावनेने पहाते. हा पठ्ठ्या मात्र तिचे आपल्यावर प्रेम आहे, असे गृहीत धरून चालतो आणि आपल्या आफ्रिकन जमातीतील प्रथेप्रमाणे तिचे अपहरण करतो. आता तिच्या आई-वडलांनी लग्नाला संमती दिल्याशिवाय तिची सुटका नसते. ती आई-वडलांना फोन लावते. आई – वडील लग्नाला संमती देण्यासाठी येत आहेत, असं त्याला सांगते. आई – वडील पोलिसांना घेऊन येतात. तिची सुटका होते. त्याला अटक होते. त्याने अपहरण केलं, असं तिने सांगितलं असतं, तर त्याचं सारं भविष्यच काळवंडून गेलं असतं. ती खोटा जबाब देते . म्हणते, आपल्याला दारू जास्त झाल्यामुळे आपण घरी जाणे शक्य नसल्याने आपणहून त्याच्याकडे राहिलो. त्याची सुटका होते. आता तो कानाला खडा लावतो. मान मोडून अभ्यास करतो. संशोधन करतो. त्यावर आधारित लेख लिहितो. परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होतो. ब्रिटिश बोटॅनिकल सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात त्याचा प्रिन्स चार्लसच्या हस्ते सत्कार होतो. यावेळी त्याला स्टेफीची तीव्रतेने आठवण येते. त्या प्रित्यर्थ दिलेल्या मेजवानीला तो स्टेफीला बोलावतो, पण ती येत नाही. बिर्हानू इथिओपियाला जायला निघतो. विमानतळावर स्टेफी त्याला दिसते. त्याला आश्चर्य वाटते. ती म्हणते, ‘बिर्हानू कृपा करून मला इथिओपियाला पळवून ने ना! मी इथे आल्याचे कुणाला ठाऊक नाही. मी आदिस आबाबचं तिकीट काढलं आहे. मग करशील ना माझं अपहरण? ‘ गोष्ट इथे संपते.

सिंह आणि बकरी या कथेची सुरुवातच अफलातून आहे. राजा म्हणतो, ‘चल राणी, तयार हो. बेन नव्या गि-हाईकाला घेऊन येतोय.’ राणी निषेधाच्या सुरात म्हणते, ‘ते जवळ येतील . माझ्या सौंदर्याची स्तुती करतील. अंगाशी चाळे करतील. कधी कधी वाटतं, आशा लोकांना कडकडून चावावं. त्यांना नखांनी ओरबाडून त्यांचं रक्त काढावं… या बंदिवासातून कधी सुटका होणार कुणास ठाऊक? ‘ हा संवाद वाचताना वाटतं, कुणा स्त्रीला बंदिवासात ठेवून तिचं शोषण चाललय. इथेही शोषणच आहे, पण ते स्त्रीचं नव्हे, तर सिंहिणीचं. राजा-राणी या सिंह-सिंहीणीच्यामधील हा संवाद आहे. त्यांना अगदी लहानपणीच त्यांच्या नैसर्गिक परिवेशातून बाहेर काढून माणसाळवलं जातं. अगदी जवळ गेलं, त्यांना थोपटलं, अंगावरून हात फिरवला तरी ते काही करणार नाहीत, याचं शिक्षण दिलं जातं. असं एक केंद्र मार्था चालवते. जगभरचे पर्यावरणवादी जनावरांच्या अशा शोषणाला विरोध करतात. मार्था राजा-राणीला सोडून द्यायचं ठरवते. पण ती जगणार कशी? मग ती त्यांच्या पिंजर्याात बकरीला सोडते. पण शिकारीची सवय नसलेली राणी, तिला पाठीवर घेऊन ‘कोकरू घ्या कोकरू’ म्हणत फिरते. आता त्यांच्या बछड्यांना बंदिवासात किळसवाणं जीवन जगावं लागणार नसतं. मग राजा राणीला सूचकपणे म्हणतो, ‘चल, आता घाणेरीच्या झुडुपामागे जाऊ.’

यातील प्रत्येक कथेवर लिहिण्यासारखं आहे, पण ते शक्य नाही. यातील प्रत्येक कथेचा रंग वेगळा. पोत वेगळा. नक्षीकाम वेगळे, पण सगळ्याच कथा चित्ताकर्षक. ज्यांना नवीन काही वाचण्याची, समजून घेण्याची आवड आहे, त्यांनी आवर्जून वाचायला हवे, आफ्रिकी आतषबाजी

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नाते लडाखशी… सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ नाते लडाखशी… सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव – नाते लडाखशी

लेखिका – सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित

प्रकाशक – राजहंस प्रकाशन प्रा. ली.

मूल्य – १६० रु.

अमेज़न लिंक >> नाते लडाखशी – सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित

नाते लडाखशी  (एक आस्वादन)

अरुंधती दीक्षित या लडाख इथे दोन वर्षं वास्तव्यास होत्या. तिथली वेगळी भौगोलिक परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली वेगळी जीवनशैली , तिथले वेगळे अनुभव, याचं यथातथ्य मनोज्ञ दर्शन म्हणजे त्यांनी लिहिलेलं पुस्तक नाते लडाखशी.

प्रवीण दीक्षित हे भारतीय पोलीस सेवेत ऑफिसर आहेत. लडाखला निवडणुका घ्यायचे निष्चित झाल्यावर त्यांची लडाखला बदली झाली आणि ते सपरिवार लडाखला दाखल झाले.

हा काळ ८९- ९० च. त्या काळात, इंटरनेट, गुगल सर्च, सेल फोन, मोबाईल, कॉम्प्युटर, इ मेल हे शब्दही ऐकिवात नव्हते. त्यांचं आधीचं वास्तव्य मुंबईतलं. अरुंधती म्हणते, ‘मुंबई आणि लडाख यात जमीन आस्मानाचं अंतर आहे, हे अनुभवायला मिळालं.’ ( यापुढे लेखामधे लेखिका असा शब्द न वापरता, अरुंधती हे तिचे नावच वापरेन. )

चंदिगडहून विमान लेहला पोचलं. विमानाची चाके जमिनीला टेकली आणि आतील प्रवाशांनी आनंदोत्सव साजरा करत टाळ्या वाजवल्या. यात एवढं आनंदीत होण्यासारखं काय आहे, अरुंधतीला प्रश्न पडला. शेजारचा म्हणाला, ‘मॅडम, ले (लेह) का मोसम बंबईकी फॅशन . सुबह एक शाम को चेंज!’ नंतर कळलं, गेले पंध्रा दिवस वाईट हवामानामुळे इथे विमान उतरूच शकले नाही. स्वत:ला नशीबवान समजत सगळे बाहेर आले. बाहेर येताक्षणी अरुंधतीला लडाखचं पहिलं दर्शन झालं, ते असं – ‘विस्तीर्ण पिवळं पठार…. वर निळं… निळंशार आकाश… आभाळाशी स्पर्धा करणारे, बर्फामधे डोकी बुचकाळून आलेले अती अती उंच उंच डोंगर!… चमचमणारा सोन्याचा सूर्य. अंगाला जाणवणारा सुखद गारवा.’

लडाख हे  ९८००० स्क्वे. कि. मी. क्षेत्र असलेले विस्तीर्ण पठार आहे. याचे दोन जिल्हे. कारागील आणि लेह. लेह जिल्ह्यातील लेह गावात त्यांचे वास्तव्य असणार होतं. हे अतिशय उंचीवरचं थंड गाव.  पण तिथे लेह न म्हणता त्याला ‘ले’ म्हणतात. ले म्हणजे लडाखी भाषेत खिंडींनीयुक्त. तिथे खरडुंगला , झोजीला, तगलाकला, चांगला अशा अनेक खिंडी आहेत. पुढे लडाखचं सौंदर्य, भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण याचे वर्णन करणारे, ‘लडाख: मुगुटातील हिरकणी’ असं एक स्वतंत्र प्रकरणही आहे.

हळू हळू मंडळी ‘ले’ला रुळू लागली आणि बघता बघता त्यांची ‘ले’ शी दोस्तीही झाली. सकाळी सकाळी पाणीतुकडा बाहेरून आत आणायचा. पाणीतुकडा म्हणजे बाहेरच्या हौदातला बर्फाचा खडा आत आणायचा. तो स्टोवर वितळवून पाणी तयार करायचं, मग स्वैपाकाला सुरुवात. मिळणार्या  आर्मी रेशनमधून चविष्ट जेवण बनवण्याची कला अरुंधतीला त्यांच्या कुकनेच शिकवली. बहुतेक भाज्या डबाबंद यायच्या. गजराच्या भाजीचं तिखट, मीठ, मसाला पाण्यानं धुवून त्यात साखर आणि मिल्क पावडर मिसळली, वर सुकामेवा पसरला की झाला गाजर हलवा तयार. अंड्याच्या पांढर्याा भागात मिल्कपावडर मिसळून त्याचे छोटे, छोटे, गोळे तयार करून वाफवले आणि मिल्कमेडमध्ये घातले की झाली तयार रसमलाई. आशा किती तरी युक्त्या ती कुककडून शिकली. जेवणानंतर बडीशेपेसह सी व्हिटॅमीन आणि मल्टी व्हीटॅमीनच्या गोळ्या आवश्यकच. सार्याक व्हिटॅमीनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या घ्याव्या लागतातच. इथला प्रसिद्ध गुरगुर नमकीन चहा भरपूर अमूल बटर घालून पण साखर आणि दुधाशिवाय केला जातो.

लडाखमध्ये पेपर नाही पण रेडिओ केंद्र आहे. त्यावरच्या बातम्या, एवढाच बाहेरच्या जगाशी संपर्क. फौजी जवानांसासाठी यावरून गाणी सादर केली जात. इथे भिकारी नाही, याचीही आवर्जून नोंद केलेली आहे. इथे ‘जुले जुले’ म्हणत अभिवादन करायची पद्धत आहे. ‘जुले’ म्हणजे नमस्कार.

मिल्ट्री ऑफिसरपैकी अनेकांची कुटुंबे त्यांच्या त्यांच्या गावी होती. ते सगळे ऑफिसर हळू हळू यांच्या परिवारात सामील झाले आणि यांचा परिवार वाढला.

लेहयेथील थंडीत आलेल्या अनुभवाचे मोठे खुमासदार वर्णन अरुंधतीने केले आहे. पुस्तकांची बाईंडिंग निघून ती खिळखिळी होतात. टिच् आवाज करत ग्लास, बोनचायनाच्या  प्लेट्स तडकतात. दुधाच्या पातेल्याला स्कार्फ गुंडाळून ठेवला नाही, तर सकाळी त्यात शंकराची पिंड तयार होते. एक दिवस कपडे आत आणायचे राहिले, तर सूर्यास्त झाल्यावर त्यांची पाठ आणि पोट चिकटून त्याचं बर्फ तयार झालं होतं. अशीच एक भाकरीची गमतीदार आठवण दिली आहे. त्यांच्या दोस्ताच्या फर्माईशीवरून भाकरी-भाजीचा बेत ठरला. भाकरीचं पीठ आणि वांगी येऊन पडली. १५-२० जण तरी जेवायला येणार. ४० भाकरी तरी हव्या होत्या. मग लक्षात आलं, तूप लोणी काहीच सांगितलं नाही. तशी तिने ठरवलं, अमूल बटर वितळवून भाकरी झाली की लगेच लावून ठेवायचं. त्याप्रमाणे ४० भाकर्यां ची अमूल बटर लावून थप्पी रचली. जेवताना डबा उघडला, तर काय भाकरीच्या थप्पीचा दगड झालेला. भाकरीला लावलेलं बटर घट्ट झालेलं होतं. छिन्नी-पटाशीच्या मदतीने जमतील तसे भाकर्यां चे तुकडे करून ते  मग ओव्हनमध्ये गरम केले. तर असा तिथला हिवाळा.

‘ले’च्या थंडीप्रमाणेच इथल्या वसंत ऋतूचेही मोठे मोहक वर्णन अरुंधतीने केले आहे. हिवाळ्यात गोठलेल्या मृतप्राय जीवनावर, वसंत ऋतू चैतन्याची फुंकर घालतो आणि आळोखे पिळोखे देत  सृष्टी जागी होऊ लागते. अरुंधती लिहिते, ‘ ‘ले’च्या ध्यानस्थ बसलेल्या, निसर्गगरूप शंकराला महापराक्रमी मदनानं फुलांचा सुवासिक बाण मारून ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’ म्हणत खडबडून जागं केलं. इथली पानं, फुलं, जर्दाळू, सफरचंदसारखी फळं  या सार्यानचंच मोठं समरसून वर्णन केलय. हाच सीझन पाहुण्यांनी ‘ले’ल भेट देण्याचा. आपल्या ५० पाहुण्यांची व्यवस्था आपण कशी केली, याचीही गमतीदार हकीकत ती सांगते.  

अरुंधती ‘ले’ला आल्यावर तिथल्या लॅमडॉनयेथील शाळेत शिकवायला जायला लागली. ‘मॅडमले जुले’ म्हणत नमस्कार करणारी तिथली, लाल, गुलाबी गालाची, गुलाबाचे ताटवेच आहेत, असे वाटणारी मुले, त्यांचा उत्साह, त्यांचं वागणं, शाळेची ट्रीप, ट्रीपमधील गमती-जमती, यांचं मोठं मनोज्ञ वर्णन तिने केलं आहे. त्याचबरोबर तिथं शिकवताना येणार्याा अडचणींचंही वर्णन केलं आहे. कधीच न पाहिलेल्या, समुद्र आणि जहाज याबद्दल मुलांना कसं सांगायचं? न पाहिलेल्या, झुरळ, बेडूक, साप यांची शरीर रचना कशी समजून द्यायची? असे अनेक प्रश्न तिला पडत. आपल्याला वाचतानाही प्रश्न पडतो, तिने हे आव्हान कसे पेलले असेल?

सियाचीनयेथील सर्वात उंचीवरचे ‘कैद’ हे ठाणे जिंकून ‘गड आला आणि सिंहही परत आला’, असा हा सिंह, परमवीरचक्राचा मानकरी बाणासिंह, याची स्फूर्तिप्रद, प्रेरणादायी कहाणी यात येते. तशीच मेजर सैतानसिंहाचीही येते. खबीर नेतृत्वगुण असलेला आणि रिझांगलाच्या कुशीत आपला देह ठेवणार्याा, मरणोत्तर परमवीरचक्र लाभलेल्या मेजर सैतानसिंहाच्या पराक्रमाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन तिने केले आहे.

‘लडाखच्या अंतरंगात’मध्ये तिथली भौगोलिक स्थिती, जमीन, वातावरण, पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगरवाटा, खिंडी, घळया, वन्यजीवन, पशू- पक्षी इ. चं सविस्तर वर्णन येतं. एके ठिकाणी तिने एक लक्षणीय अनुभव दिलाय. तलावाच्या, पाण्याच्या बिलोरी आरशात, मागच्या पिवळट, मातकट पर्वतांचं असं काही प्रतिबिंब पडलं होतं की तो तलाव न वाटता जमीनच वाटत होती. पर्यटकांना दाखवल्या जाणार्याह ठिकाणांचंही वर्णन इथे येतं. हेमीस, आल्या, मूनलॅंड आणी लामायूरू, हे गोंपा (मठ), ‘शे’चा राजवाडा इ च्या वर्णनाबरोबरच हॉल ऑफ फेम ( जिथे तेथील युद्धासंबंधीची माहिती व फोटो जतन केलेले आहेत त्याबद्दल), तसेच सुप्रसिद्ध बोफोर्स तोफ पाहून कसं धन्य झालं, तेही तिने संगीतलय.

होता होता ‘ले’चं वास्तव्य संपलं. शाळेचे मुख्याध्यापक,  सहाशिक्षिका आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी केलेल्या निरोप समारंभाचे आतिषय हृद्य आणि काव्यमय वर्णन अरुंधतीने केले आहे. ती म्हणते की आता मनाच्या पुस्तकात इथल्या आठवणींचे मोरपीस ती ठेवेल आणि अधून मधून ते उघडून ती तिथल्या आठवणीत रमून जाईल.                                                                                                                                

लडाखशी नाते जोडत, त्या उंचीवर, थंड हवेत, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत, विरळ, प्राणवायू असलेल्या जागी लोक राहातात, कसे रहातात, आनंदाने कसे राहतात, हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवे, ‘नाते लडाखशी’ आणि आपणही  शब्दातून जोडायला हवे, ‘नाते लडाखशी’

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares