मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सुनृत” – लेखिका सुश्री ऊषा ढगे ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सुनृत” – लेखिका सुश्री ऊषा ढगे ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव… सुनृत

कवीयत्री… सुश्री ऊषा ढगे.

प्रकाशक… यशोदीप प्रकाशन

प्रथम आवृत्ती… १२सप्टेंबर २०२१

पृष्ठे.. ६४

मूल्य.. रु.१३०/—

परिचय… राधिका भांडारकर.

सुश्री उषा ढगे

सुनृत हा उषा ढगे यांचा दुसरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्यांच्या  पहिल्या  “पोटनाळ” या काव्यसंग्रहातला काव्यानंद घेतल्यानंतर! हा दुसरा संग्रहही वाचण्याची उत्सुकता  वाढलेलीच होती.

या संग्रहात त्यांच्या चाळीस कविता आहेत.

मला नेहमी असं वाटतं,कविता ही कुठला ठराविक विषय घेउन निर्माण होत नसते.

जेव्हां भवताल आणि मन यांचं कुठेतरी नकळत नातं जुळतं आणि त्या स्पंदनातून शब्द अवतरतात तेव्हां कवितेचा जन्म होतो.शब्दांनंतर विषय ऊमटतो.उषाताईंच्या या कविता वाचताना हे प्रकर्षाने जाणवतं.त्यांच्या प्रत्येक कवितेत टिपणं आहे. वेचणं आहे. स्पंदनं आहेत. हास्य आहे, हुंकार आहेत. उपहास आहे, तशी स्वीकृतीही आहे. प्रश्न आहेत अन् उत्तरंही आहेत.

वास्तविक उषाताई यांचा मूळ पिंड चित्रकाराचां.

मुंबईच्या प्रसिद्ध, नामांकित कला महाविद्यालयात (J J School of Arts) त्यांनी कलाशिक्षण घेउन पदवी प्राप्त केली.

रंग रेषेत रमणार्‍या उषाताई,शब्द प्रवाहातही सहजपणे विहार करु लागल्या. रंग रेषा आणि शब्द यांची एक लयबद्धता ,त्यांच्या प्रत्येक कवितेत जाणवते.चित्रकार हा अंतस्थ कवी असतो हे उषाताईंनीसिद्ध केले आहे.

काव्य हे, हलकं फुलकं तरलच असतं,असं नव्हे.

ते भेदकही असतं .बोचणारंही असतं.

निसर्गातील तरलता टिपतानाच, उषाताईंच्या काव्यात कधीकधी भेदकताही जाणवते. जसा गारवा, तसा तप्तपणाही जाणवतो. आणि या दोन्ही स्तरांवर उषाताईंचं काव्य हे, अस्सल वाटतं. खरं वाटतं.

परिमळ ही या संग्रहातील पहिलीच कविता.

रंगी बेरंगी, सुगंधी फुलांची ओंजळ भरलेली आहे.मन तृषार्त आहे. पण तरीही शेवटच्या चार पंक्तीत ,त्यांनी सहजपणे ,एक प्रकारची व्याकुळता व्यक्त केली आहे.त्या  म्हणतात,

शब्दातीत होते सारे।

मग मन होई विव्हळ।

सुगंधामधूनी पाठव ना रे।

एक संदेश स्नेहाळ।।

याओळींत असलेली कसलीतरी अनामिक प्रतीक्षा मनाला भिडते….जाणवते.

पृच्छा या कवितेत एक प्रश्न ,एक सहज शंका आहे.काट्याकुट्यात जगणारे ,फाटक्या  ,तोकड्या ,अपुर्‍या कपड्यातले भटके भिल्ल ,अपुर्‍या कपड्यात ,फॅशनच्या नावाखाली हिंडणारी शहरी मुले पाहून अचंबीत होतात.आणि सहजपणे म्हणतात,

शोभा दावूनी लाजशरम

अशी बाजूस ठेवूनी

वावरती विचीत्र वंगाळ

भलतेच लेउनी…..

पहाडातले ,जंगलातले आदीवासी आणि शहरातली ही सो काॅल्ड फॅशनेबल माणसे…

दोघंही अपुर्‍या वस्त्रांत..पण एक नैसर्गिक आणि दुसरे मात्र बाजारी…हे वास्तव काव्यरचनेत चपखल मांडलंय…

त्यांच्या कवितेत ,हिरवी धरती आहे.हसरा नाचरा श्रावण आहे.मृद्गंध आहे.मिस्कील पाउस आहे.गाणारे पक्षी आहेत.बागडणारी फुलपांखरे आहेत.आणि या सर्वांमधे वाहणारं एक सुंदर कवीमन आहे.

कधी कधी त्यांच्या  काव्यात आत्म संवाद जाणवतो.त्यांना सतावणारे अनेक प्रश्न त्या सहजपणे काव्यरुपात मांडतात.

वास्तव सत्यात की

असत्य जगात

कां बरं अशी मी

व्याज संभ्रमात….

कधी म्हणतात,

आज असे मुक्त मी

निवृत्त मी निवृत्त मी

माझ्याच जीवनाचे

वाचेन एक मोठे

वृत्त मी….

तर कधी त्या बेफिकीर ,कलंदर होतात..उपहासाने म्हणतात,

काय घडेल ..होईल काय उद्याला

माहीत नाही ..मग फिकीर कशाला….??

खुशीत आपुला ,माझा मीच भला…

सुनृत या शीर्षक कवितेत निसर्गाची भावलहर आहे.लाजणं आहे .शृंगार आहे.आणि निर्मीतीचं सत्यही आहे.

पर्णपाचू पालवी ही

भारावून गेली

उन्मुक्त भावनांना

तरुण वेल सुखावली…

पाने ती ऋतुगान गाती…

सुमन उरी गोंजारुन घेई,,.

गाली निर्झर हसली…

अशा काव्यपंक्ती वाचकाला काव्यानंद देतात…

सुंदर प्रपाताखाली नहावतात…

काही कवितांमधे सहज दिलेले संदेशही आहेत…

कशास रे उणे दुणे

देउनी सकळास दूषणे

नको करुस हेवादावा

मत्सर अन् दुस्वास….

कोल्ड वाॅर सारखी हलकी फुलकी हसवणारी घराघरातील कविताही त्या अगदी सहजपणे सादर करतात…

बायकोला हवा असतो

नवानवा नेटका संसार

नवरा म्हणतो

कुठून देउ सारं

अजुन झालाच नाही

बघ की गं माझा पगार…

शेवटच्या बिंबीतया कवितेत,त्या म्हणतात,

सदृष्य सारं समेटलेलं

यादगारीचा दर्पण

प्रांजल संवेदनेचे प्रतिबिंब

चिंब उर्मीचे अंतरंग..

अशा विवीध भावनांच्या,रंगांच्या,नादाच्या,लयीच्या शब्दरेषांच्या काव्यपंक्ती वाचताना,सहजच कवीयत्रीच्या आयुष्याचा एक पथ सहज उलगडून जातो.ज्या पथावर त्या थिरकल्या, चालल्या ,थबकल्या,कधी ऐटीत,कधी कोसळत, कधी मोडत पण जगण्याचा एक सकारात्मक धागा पकडत….म्हणूनच या कविता मनात उलगडत  तात…डुबवतात.भारावून टाकतात.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वत: उषा ढगे यांनीच चित्रीत केले आहे.आणि ते अतिशय बोलके आहे.उंच चढणारी वेल,विखुरलेली फुले पाने आणि एक थेंब..हा थेंब जीवनाचे प्रतीक आहे.

तो पाण्याचाही आहे..दंवाचा आहे..आणि अश्रुंचाही आहे..

सुनृत हे शीर्षक एक नवा, अप्रचलीत शब्द नवा अर्थ घेउन येतो. मनाच्या डोहातून वाहत आलेलं सत्य, सुंदर शब्दांतून हलकेच अनावृत केलं… सुरेख!!! कवीयत्रीच्या कल्पकतेला मनापासून दाद  द्यावीशी वाटते..

या चाळीस कविता वाचताना मला दिसलं ते एक पाखरु.. त्यानं आकाशातून धरती टिपली ,अन् धरतीवरुन आकाशही कवेत घेतलं….

कवीवर्य अरुण पुराणिक यांची प्रस्तावना लाभलेला,यशोदीप प्रकाशनाने सौंदर्य जपत सादर केतेला हा उषा ढगे यांचा सुनृत हा काव्यसंग्रह केवळ आनंद देणारा,रिझवणारा आणि तितकाच विचार करायला लावणारा…

उषाताई मनापासून अभिनंदन आणि पुढील काव्य प्रवासा साठी शुभेच्छा!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ 23 जानेवारी – ‘जीवनरंग’ –  सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ एक आस्वादन – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ 23 जानेवारी – ‘जीवनरंग’ –  सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ एक आस्वादन – श्रीमती उज्ज्वला केळकर

 

सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई 

23 जानेवारी – जीवनरंग   (एक आस्वादन)

आज सौ. पुष्पा प्रभुदेसाई यांच्या जीवनरंग या ललित, वैचारिक लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. यातील काही लेख वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने लिहिले गेले आहेत. त्या त्या लेखांखाली तसा तपशील लेखिकेने नोंदविलेला आहे. यापैकी बरेच लेख यापूर्वी ई-अभिव्यक्तीवरही प्रसारीत झाले आहेत. आता हे सगळे लेखन एकत्रितपणे बघताना लेखिकेइतकाच वाचकालाही आनंद होत आहे.

कोणत्याही ‘शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी’  गणेशाचे स्मरण, स्तवन, पूजन करण्याची आपली परंपरा आहे. इथेही लेखिकेने पहिला लेख श्री गणेशावरच लिहिला आहे, ‘मला भावलेला गणेश.

गणेशाच्या सूक्ष्म रूपाविषयी त्या लिहितात, ‘निसर्गाची नियमबद्धता टिकवणारा नियंता,  तोच गणेश. पंचमहाभूतांची शक्ती म्हणजे गणेश. गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता, ती शक्ती म्हणजे गणेश. ‘त्वं मूलाधारो स्थितोसी नित्यम’ असं संस्कृत अवतरणही त्या देतात.  उत्पत्ती, स्थिती, लय या सगळ्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे गणेश.

हे झालं, गणेशाचं सूक्ष्म रूप. गणेशोत्सवाचे वेळी आपण  गणपती आणून पूजा-अर्चा करतो, ते याचं स्थूल रूप आहे. या पार्थीव गणपतीची पूजा करताना, निसर्गाचा र्‍हास होऊ नये, म्हणून काळाजी घ्यायला हवी असं त्या सांगतात आपल्याला गणेशाचं सूक्ष्म रूपच भावतं असंही सांगत त्या लेख संपवतात.

पुष्पाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की त्या त्या विषयाची अद्ययावत माहिती त्या लेखात देतात. पर्यावरणआणि मी  असा शब्द उच्चारताना  पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते त्यांच्या मनापुढे आहेत. यात सातत्याने प्रदूषण होत चाललाय, याची त्यांना खंत आहे. या प्रदूषणापुढे जाऊन त्या म्हणतात, अंतराळात, याने, रॉकेटस यांच्या स्फोटातून येणारी धूळ, धूर, वाफ, आवाज सगळं  भयावह होत चाललय.. प्रदूषणावर उपाय योजना सांगताना, त्या म्हणतात, ‘वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. यासंबंधी त्या आणखी लिहितात, सोमवल्लीसारखी प्रचंड ऊर्जा देणारी वनस्पती आज केरळ आणि हिमालयातच फक्त 50 किलो . उरली आहे. प्रदूषणाचा विचार करताना, त्या पुढे लिहितात, या पंच महाशक्तींबरोबर माणसाचा मन ,बुद्धी, अहंकार हेही प्रदूषित होत चालले आहेत.

वटवृक्षाची सावली या पुढच्या लेखात त्या लिहितात, कीटक, पक्षी, प्राणी, माणसं यांना आधार देणार्‍या, शांत, गार सावली देणार्‍या वटवृक्षाचं जतन करायला हवं. मग ती आज या वृक्षाचं जतन केलेली ठिकाणे  सांगते. ‘शिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली इथे अडीच एकरात वटवृक्ष पसरला आहे. कोलकत्याला ‘शिवफूट बोटनिकल गार्डन’ मधल्या वटवृक्षाचा पसारा एवढा आहे की त्याच्या छायेत चार ते पाच हजार लोक बसू शकतात.त्याचे वय 350 वर्षे आहे.  असे वृक्ष जपायला हवे. ज्यांनी ते जपले, त्यांना त्याचे श्रेय द्यायला हवे.

अखंड सावधपण हे लेखाचे नाव वाचल्यावर वाटतं, माणसाने अखंड सावध का असाव? कसं असावं  याबद्दल  लेखिकेला काही सांगायचं असावं, पण तसं आजिबात नाही, अगदी लहान लहान कीटकांपासून मोठ-मोठे पशू जगताना सावधगिरी कशी बाळगतात, याचे वर्णन आहे. सहवासातुनी जीवन घडते, या लेखातही, त्यांच्या घरातल्या कोंबड्या, बोके, कुत्री , पोपट इत्यादींच्या सहवासाविषयी लिहिले आहे. त्यांच्या आठवणींविषयी लिहिले आहे, ‘’माणुसकीचे व्रत या लेखात त्यांनी म्हंटले आहे, ‘जीवसेवा हीच ईश्वर सेवा’ हे तत्व लक्षात घेऊन अनेक संस्था सेवा करीत आहेत. त्या संस्थांना तीर्थक्षेत्र, स्वयंसेवकाला तीर्थरूप आणि त्यांच्या हातून घडणारी सेवा हे तीर्थकर्म असं म्हणायला काय हरकत आहे? असं म्हणत, बेवारशी प्राणी, पक्षी  यांची काळजी घेणार्‍या ब्लू क्रॉस’, मुंबईची S. P. C.M. (सोसायटी फॉर प्रिव्हेंशान ऑफ कृएल्टी टू अ‍ॅनिमल), इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटी, राहत या संस्थांची महिती दिलीय. व काही काही प्राण्यांची माहिती देऊन, त्यांना तिथे कसा आसरा मिळाला, ते संगीतलय. प्रारब्ध’मधे मिल्ट्रीमध्ये सामान वाहणार्‍या पेडोंगी खेचराची माहिती येते. पाकिस्तानने या खेचरासहित काही खेचरांना पळवून नेलं. संधी मिळताच ते खेचर पाठीवरच्या सामनासहित, ज्यात बॉंबगोळे, माशिनगन  इ. साहित्य होतं, त्याच्यासकट भारतीय हद्दीत आलं. त्याचा सत्कार होऊन त्याचं नाव गिनीज बुकामध्ये नोंदलं गेलं. ही सगळी माहिती दिल्यावर आपणही एका जखमी, लंगडणार्‍या गाढवावर कसे उपचार केले. हे सांगते. दत्तक विधान या लेखातही बंड्या आणि गुंडी या कुत्र्याच्या पिलांचे दत्तक विधान कसे झाले, ही माहिती येते ‘ लेखिकेला कुत्रा, मंजर, घोडा, गाढव इ. प्राण्यांबद्दल ,लळा, आपुलकी असल्याने, त्यांच्यावरचे अनेक लेख पुस्तकात आहेत.

सामाजिक समरसताया लेखात टेलिफोन बुथ असल्यामुळे  फोन करायला येणार्‍यांशी थोडं-फार बोलून त्यांची सुखदु:ख  समजून घेऊन, त्यांना सहानुभूती दाखवल्यामुळे, तसंच त्यांच्या. आनंदात सहभागी झाल्यामुळे सामाजिक समरसतेचा सुंदर अनुभव कसा आला, त्याचे वर्णन केले आहे.

वनौषधी संरक्षण: एक आव्हान आणि उपाय या लेखात एक पुराणकथा येते. एक ऋषी आपल्या विद्यार्थ्यांना निरुपयोगी वनस्पती आणायाला सांगतात. एक जण कुठलीच वनस्पती आणत नाही. ऋषी त्यालाच शाबासकी देतात आणि सांगतात, जगात निरुपयोगी अशी एकही वनस्पती नाही. आहेत त्या वनौषधींचं जतन केलं पाहिजे व वेगवेगळ्या वनौषधींची लागवड करायला प्रोत्साहनही दिलं पाहिजे.

याशिवाय नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे , विवेकानंद स्थापित रामकृष्ण  मिशनचे ऐतिहासिक कार्य, मराठीच बोलू कौतुके इ. लेखही अगदी वाचनीय झाले आहेत.

सर्वांनी एकदा तरी वाचून बघावे, असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्याने लेखिकेबद्दलेच्या अपेक्षा अधीक उंचावल्या आहेत. 

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “शोध” – मूळ लेखिका सुश्री मधु कांकरिया – अनुवाद – सुश्री उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “शोध” – मूळ लेखिका सुश्री मधु कांकरिया – अनुवाद – सुश्री उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव…. शोध

मूळ लेखिका .. सुश्री.मधु कांकरिया

अनुवाद    ..    सुश्री. उज्ज्वला केळकर

प्रकाशक         मिलींद राजाज्ञा

किंमत………..रु.३८०/—

 

सौ. उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेला सुश्री मधु कांकरिया यांचा मूळ हिंदीत असलेला ‘शोध‘ हा कथासंग्रह नुकताच वाचला आणि त्यावर मनापासून लिहावेसे वाटले.

या कथासंग्रहात एकूण १४ कथा आहेत. सर्वच कथा विषय, भाषा, मांडणी या अनुषंगाने दर्जेदार आहेत.विविध विषयांवरच्या आणि जीवनाचे अंतरंग उलगडणार्‍या या कथा आहेत. एकेक कथा वाचताना मनाला धक्के बसतात.वार होतात. मात्र प्रत्येक कथेत दडलेलं एक सूक्ष्म वास्तव मनाच्या जाणीवा रुंद करते.

या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे ,उज्ज्वलाताईंच्या भाषेचा प्रचंड प्रभाव. अत्यंत तेजस्वी लयदार भाषा. आपण वाचतो ती मूळकथा नसून अनुवाद आहे हे विसरायला लावणारी आणि कथेच्या मूळ गाभ्यापर्यंत सहज घेऊन जाणारी…अत्यंत समर्थ,  ताकदवान भाषा…. यात थोडीही अतिशयोक्ती नाही आणि अतिरिक्त प्रशंसाही नाही. खरं म्हणजे उज्ज्वलाताईंच्या प्रत्येक अनुवादित लेखनात हे सामर्थ्य जाणवते. आणि त्यामुळेच इतर भाषेतलं उत्तम साहित्य त्याच रंगरुपात वाचायला मिळते.हे उज्ज्वलाताईंच्या लेखणीचे यश आहे…

हे पुस्तक वाचताना माझी मनोवस्था ही ,प्रत्येक कथेच्या वाचनानंतर काहीशी स्तब्ध झाली. कथा सर्वार्थाने पचनी पडायला, उमजायला,त्याचा गाभा शोधताना काही क्षण लागले.. वाक्यावाक्यापाशी मन रेंगाळले.

या संग्रहातील पहिलीच कथा अन्वेषण. मॅथ्यु नावाच्या फादरच्या मानसिकतेची ही कथा आहे. एक आदर्श संचालक, शाळेचा  कर्तव्यदक्ष, प्रामाणिक संचालक, विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीचे नाते असणारा, सन्यस्त, वितरागी, धर्मपरायण. पण एका तरुणीच्या प्रेमपत्राने त्यांची ही आंतरिक सत्ता पार हादरून जाते. मन अशांत होते. एक वासनांची तृष्णा जाणवते. तेव्हांच ते निर्णय घेतात. पाद्रीत्वाचा त्याग करायचा. आपला कॅसाॅक उतरुन एक सामान्य माणूस बनायचे…हा या कथेचा मूळ भाग. अप्रतीम कथा वाचल्याचा अनुभव वाचकाला मिळतो.

“..ऐक वत्सा* ही कथा तर काळीज पिळवटून टाकते. या कथेत एक बाप आपल्या तरुण मुलाला, त्याच्या आईच्या ममत्वाचे एकेक कंगोरे उघडून दाखवतो. जे, परदेशी वास्तव्य असणार्‍या, स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या अवास्तव कल्पना बाळगणार्‍या अहंकारी मुलाच्या डोक्यातही उतरत नाहीत. नुकतंच आजीपण मिळाल्याने त्या आनंदात पूर्णपणे डुंबलेली एक आई, मात्र या मऊ ,कोमल  स्त्रीमनाचा लेकाकडून अपमान, पाणउतारा होत असतो. ते पाहून  बाप आपल्या मुलाला म्हणतो, ”अरे ! मेल्यानंतर तिची चिरफाड केली तर तिने नातवासाठी जपलेली  अंगाई गीते तिच्या कंठातून फुटून बाहेर पडतील..”. हे वाक्यं वाचल्यावर अंगावर सरसरून काटा उभा राहिला.

या संग्रहातील शीर्षक कथा “शोध“  ही एका शोधाचीच कथा आहे.

प्रणीता नावाची एक अनाथ मुलगी.. एका सरकारी हॉस्पिटलमधे जन्मलेली.. . तिची आई ती दहा दिवसाची असतानाच, तिला बास्केटमधे ठेवून, एका चाईल्ड केअरमधे सोडते. बास्केटमधे तिचा जन्मदाखला ठेवते. त्यांत आईचे सूर्यबाला हे नाव असते. मात्र वडीलांचे नाव नसते. तिथून तिची पाठवणी बालआनंद आश्रमात होते. तिथून फर्नांडीस नावाचं डच दांपत्य तिला युरोपमधे घेऊन जातात. अत्यंत प्रेमाने वाढवतात. मोठी झाल्यावर तिच्या रंगरुपामुळे, हेच काआपले आईवडील-या विचाराने ती साशंक होते. व्याकूळ होते. जेव्हां तिला तिच्या भारतीयत्वाचं सत्य कळतं, तेव्हां ती अंतर्बाह्य खवळते. आक्रोश आणि कडवटपणाने ती भरुन जाते. आणि मग एकेका प्रश्नाच्या उत्तरासाठी बेचैन होते. तिचा जन्माचा शोध सुरु होतो. त्यासाठी ती भारतात येते .बालआनंद आश्रमातील मुलांना भेटत राहते. आणि तिच्या शोधाची सुरुवात या आश्रमातूनच होते… या शोधाचा एक धक्कादायक आणि थरारक प्रवास वाचताना मन पिळवटून जातं .. ही कथा वाचकाच्या अंत:प्रवाहाला ढवळून टाकते. कथानक वजनदार आहे, तसाच उज्ज्वलाताईंच्या अनुवादाचीही जबरदस्त पकड आहे. यातले संवाद, संवादातून झिरपणारी तत्वं, त्यातला खरेपणा आणि वास्तविकतेची जाण देतात—” ती जर माझी आई नव्हती तर ती इतकी घाबरली का मला पाहून.. कदाचित मी तिची मुलगी नव्हते. तिची लज्जा होते. घृणा होते…..”  हे प्रणीताच्या मनातले  बोल काळजावर ओरखडे ओढतात. जे संवेदनशील आहेत, ज्यांच्या जाणीवा टोकदार आहेत त्यांच्यासाठी हा कथासंग्रह म्हणजे भरण पोषण आहे. यात  कल्पनेतला उदात्तपणा नसून व्यावहारिक सत्याचा आरसा आहे….

प्रत्येक कथेवर भाष्य करुन वाचकांची उत्सुकता, आनंद कमी करण्याचा माझा मानस नाही…

प्रत्येक कथेतील विषय आणि उत्कृष्ट मांडणी हे या पुस्तकाचं वैशिष्ट आहे.

यात दहशतवाद, मिलीटरी आणि आतल्या माणसाचे दर्शन घडवणारी कथा आहे.

विधवा भावजयीने वाचलेली, तिच्या शहीद पतीच्या भावाची, मनातलं सांगणारी डायरी आहे…

पहाडावर जीवनाचा अर्थ शोधत, अनवाणी फिरणारे महावीर आणि कष्टदायी अस्थिर जीवन जगणारे डोलीवाले आहेत… निसर्ग आणि कायद्याने पिचलेले हाडामासाचे देह आहेत…

एका वास्तविक जीवनगंगेतून प्रवास केल्याचाच अनुभव आहे हा…

वाचताना वेचून ठेवावीत अशी बरीच वाक्येही त्यात आहेत. थोडक्यात, एक हँगओव्हर येतो.एक कथा वाचल्यानंतर दुसर्‍या कथेत नाही शिरु शकत… जीवनाची अनेक अंगाने दाखवलेली एक अप्रतिम फिल्म.. म्हणजे “शोध“ हा कथासंग्रह..

कथेच्या पलीकडे काहीतरी असतं. माणसांच्या अंतरंगातील आंदोलनं  वाचताना मनात वादळे घोंघावतात—एकेक शब्द, एकेक संवाद, या वादळांना कवेत घेतो — कथा सरकत राहते.. आणि वाचक त्यांत पूर्णपणे डुबून जातो, हे या पुस्तकाचे फलित आहे.

उज्ज्वलाताईंनी अनुवादासाठी केलेल्या हिंदी कथांची निवड, त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, वैचारिक सामर्थ्य आणि अभिरुचीसंपन्नताच स्पष्ट करते. मराठी वाचकांपर्यंत या कथा पोहचविण्याची त्यांची तळमळ प्रशंसनीय आहे..!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विंचू चावला हो SSS व इतर कथा” …आश्लेषा महाजन☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “विंचू चावला हो SSS व इतर कथा” …आश्लेषा महाजन☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी 

पुस्तकाचे नाव : “ विंचू चावला हो SSS व इतर कथा “ 

लेखिका  : आश्लेषा महाजन 

 प्रकाशक : छात्र प्रबोधन प्रकाशन 

किंमत : रु. १३०/-

(स्वत्वाचा विंचू चावतो तेव्हा…) 

नुकताच आश्लेषा महाजन लिखित ‘विंचू चावला हो व इतर कथा’ हा कुमार मुलांसाठी लिहिलेला कथा संग्रह वाचण्यात आला.

कुमारवयीन मुलांसाठीच्या पुस्तकाला विंचू चावला हे शीर्षक का दिलं असेल अशी मनात उत्सुकता होती. त्यामुळे कथा संग्रह वाचताना या विंचवाचा शोध घेण्याचा प्रयत्न नकळतच झाला. आणि जाणवलं की या कथांमधला विंचू म्हणजे बालपण संपून कुमारवयाकडे वाटचाल करताना जो ‘स्व’चा उगम होतो तो आहे.

कुमारवयात होणारी ‘मी कुणीतरी आहे’ ही जाणीव संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची आहे. चांगलं व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी ‘स्व’ची ओळख योग्यप्रकारे होणं आणि त्याच बरोबर आपल्या समवयस्कांचा तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या ‘स्व’चाही आदर करता येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्व-जाणीवेचा असा हा प्रवास सुखकर होण्यासाठी ती कशाप्रकारे जोपासता येऊ शकेल, त्यात काय काय अडथळे येऊ शकतात हे सांगणाऱ्या या गंमतीदार कथा आहेत. यात स्पर्धा आहे, इर्षा आहे, राग आहे आणि प्रेम, आपुलकीही…

कुमारवय हा असा काळ की सर्व नैसर्गिक भावनांना खूप प्रकर्षानं व्यक्त करणं गरजेचं असतं किंबहुना त्या व्यक्त होतातच. या भावनांना समाजात वावरताना आवश्यक असणाऱ्या धूर्तपणानं हाताळण्याची समज या वयात पूर्णपणे आलेली नसते. त्यामुळे चूक आणि बरोबर, शिक्षा आणि बक्षीस अशा दोन टोकांमध्ये निर्णय न देता मधला पर्यायी मार्ग काढून ‘स्व’ची जडणघडण करावी लागते. ती कशी करता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे या कथा. वयात येणे (मुलांचे / मुलींचे…), मैत्रीतले आनंद व ताण, शाळा, स्पर्धा, पिढीतले अंतर, शहरी व ग्रामीण कुमार यांच्यातले अंतर, श्रीमंत व गरीब कुमारांचे भावविश्व, त्यांची मनोवृत्ती, चोरी, विनोद, भंकस… करणे, फजिती होणे, फसवणूक करणे-होणे, व्यसने… अशा अनेक गोष्टी यांत वाचायला मिळतात.

केवळ कुमारांनीच नव्हे तर मोठ्यांनीही त्या वाचाव्यात, कारण एक तर त्या आपल्याला आपल्या कुमारवयात घेऊन जातात. त्या काळात आपल्या हातून घडलेल्या चुका, गमतीजमती यांची आठवण करून देतात. शिवाय काही गोष्टी पुन्हा नव्याने दाखवतात.

यात पुस्तकाची आणखीन वैशिष्ट्ये म्हणजे खुद्द लेखिका आश्लेषा महाजन यांनी काही कथा वाचल्या आहेत. कथेखाली दिलेला क्यूआरकोड स्कॅनकरून त्या थेट ऐकण्याचा आनंद घेता येतो. शिवाय काही कथा मुलांनी वाचून पाठवण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. त्यातल्या निवडक कथांना क्यूआरकोडही देण्यात येणार आहे. मानसी वैद्य या नुकतंच कुमारवय ओलांडलेल्या विद्यार्थीनीची प्रस्तावना वाचनीय आहे. वाचकवीरांसाठी पुस्तकात दिलेली प्रश्नमंजुषा आणि प्रसंगोचित चित्रं या जमेच्या बाजू आहेतच.

खरेतर आपल्याकडे असे कुमार साहित्य खूपच दुर्लक्षित राहिले आहे. विशेषतः मराठीत. त्यामानाने पाश्चात्य व अन्य परदेशी साहित्यात कुमारांसाठी खूप काम केले जाते. बहरत्या, संवेदनशील कुमारवयीन मुलांसाठी आवर्जून लेखन होणे महत्त्वाचे. त्या दृष्टीने असे प्रयोगशील कथासंग्रह आणखीन यायला हवेत.

पुस्तकाला खुप खुप शुभेच्छा !

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “समाजभूषण” – देवेंद्र भुजबळ  ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “समाजभूषण” – देवेंद्र भुजबळ  ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नांव : समाजभूषण

लेखक आणि संकलक : देवेंद्र भुजबळ

प्रकाशक:–  लता गुठे {भरारी प्रकाशन}

प्रथम आवृत्ती : ५ सप्टेंबर २०२१

मूल्य :  रुपये २००/—

“…दैनंदिन जीवनात व व्यापार उद्योगात काम करत असताना ,आपण वास्तववादी,  विज्ञाननिष्ठ, 

अध्यात्मवादी असणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कष्टाला प्रामाणिकपणाची जोड द्या .चिकित्सक रहा.व नवीन कौशल्य आत्मसात करा. तात्पुरता विचार न करता, दीर्घकालीन विचार करा.व व्यसनांपासून लांब रहाल तर तुमचे यश निश्चित आहे….”

.”..स्वत:साठी जगत असताना इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केल्यास, सर्व समाज सुखी झाल्याशिवाय रहाणार नाही…”.

“…महिला ही केवळ कुटुंबच एकत्र करते असे नाही, तर समाजदेखील एकत्र करण्यात तिचा मोलाचा वाटा असतो. महिलांनी कौटुंबिक जबाबदारीबरोबर समाजासाठी देखील वेळ देऊन आपले अस्तित्व निर्माण करावे.नवीन ओळखी निर्माण कराव्यात. समाजाला एकत्त्रित करुन समाजाची प्रगती साधावी. कारण जेव्हां समाज एकत्र येतो, तेव्हां सर्वांची प्रगती होत असते….”.

“….मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. मुलांना शिकवता शिकवता त्यांच्याकडून देखील अनेक गोष्टी शिकत असतो. मुलं म्हणजे देवाघरची फुलं..ती निरागस ,प्रेमळ, निस्वार्थी, निर्मळ मनाची असतात. मुलांमधील सकारात्मक गुण, त्यांच्यातील उर्जा, आपल्याला सदैव प्रसन्न ठेवते…”

—–असे लाखमोलाचे संदेश मा. देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेल्या समाजभूषण या पुस्तकातून मिळाले. या पुस्तकात जवळजवळ पस्तीस लोकांच्या, जे स्वत:बरोबर समाजाच्या ऊन्नतीसाठी प्रयत्नशील, प्रयोगशील राहिले, त्यांच्या यशकथा आहेत. सोमवंशीय क्षत्रीय कासार समाजातले हे मोती देवेंद्रजींनी वेचले आणि ते या पुस्तकरुपाने वाचकांसमोर ठेवून, जीवनाविषयीचा दृष्टीकोनच तेजाळून टाकला…

एक जाणवतं, की ही सारी कर्तुत्ववान माणसं एका विशिष्ट समाजातलीच असली, तरी देवेंद्रजींचा उद्देश व्यापक आहे. सर्वसमावेशक आहे…अशा अनेक व्यक्ती असतील ज्यांच्या यशोगाथा प्रेरक आहेत. त्या सर्वांप्रती पोहचविण्याचं एक सुवर्ण मोलाचं काम करुन, अपयशी, निराश, भरकटलेल्या दिशाहीन लोकांना उमेद मिळावी या सद्हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहीले हे नक्कीच—

मराठी माणसं स्वयंसिद्ध नसतात. उद्योगापेक्षा त्यांना नोकरी सुरक्षित वाटते. पाउलवाट बदलण्याची त्यांची मानसिकता नसते —या सर्व विचारांना छेद देणार्‍या कहाण्या या पस्तीस लोकांच्या आयुष्यात डोकावतांना वाचायला मिळतात.

बहुतांशी या सार्‍या व्यक्ती सर्वसाधारण ,सामान्य पार्श्वभूमी असलेल्या  कुटुंबात,जन्माला आलेल्या.   पण जगताना स्वप्नं उराशी बाळगून जगल्या. यात भेटलेल्या नायक नायिकेचा सामाईक गुण म्हणजे ते बदलत्या काळानुसार बदलले. त्यांनी शिक्षणाची कास धरली. धडाडीने नवे मार्ग निवडले. संघर्ष केला .काटे टोचले. मन आणि शरीर  रक्तबंबाळ झाले .पण बिकट वाट सोडली नाही. न्यूनगंड येऊ दिला नाही.आत्मविश्वास तुटू दिला नाही. वेळेचं उत्तम नियोजन, कामातील शिस्त, प्रामाणिकपणा, आधुनिकता, प्रचंड मेहनत, चिकाटी व नैतिकता, व्यवसायातल्या बारकाव्यांचा सखोल अभ्यास हे विशेष गुण असल्याने ते यशाचे शिखर गाठू शकले…

शिवाय यांना समाजभूषण कां म्हणायचं..तर ही सारी मंडळी स्वत:तच रमली नाहीत .आपण आपल्या समाजाचे प्रथम देणेकरी आहोत या भावनेने ते प्रेरित होते..समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपलं यश वाटलं—-

हे पुस्तक वाचताना आणखी एक जाणवलं, की आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनंत क्षेत्रं आपल्यापुढे आव्हान घेऊन उभी आहेत. फक्त त्यात उडी मारण्याची मानसिकता हवी. आणि व्यापक दृष्टीकोन हवा. कुठलंही काम कमीपणाचं नसतं. स्वावलंबी ,स्वाभिमानी असणं महत्वाचं आहे…

या पुस्तकातील ही पस्तीस माणसं, त्यांच्या कार्याने, विचारप्रणालीने, मनाच्या गाभार्‍यात दैवत्वरुपाने वास करतात—

शिवाय विविध क्षेत्रात नेत्रदीपक कर्तुत्व गाजवणार्‍या या पस्तीस लोकांबद्दल वेचक तेव्हढंच लिहीलं आहे. एकही लेख पाल्हाळीक नाही. हे सर्व श्रेय,मा. देवेंद्र भुजबळ, रश्मी हेडे, डॉ.स्मिता होटे, दीपक जावकर ,प्रसन्न कासार, या लेखकांच्या शब्द कौशल्याला आहे.

अत्यंत सकारात्मक, प्रेरणादायी, ऊर्जा देणारं,,फक्त युवापिढीसाठीच नव्हे तर ज्येष्ठांसाठी सुद्धा —-असं हे सुंदर पुस्तक.संग्रही असावं असंच—

देवेंद्रजी आपले अभिनंदन तर करतेच.  पण माझ्यासारख्या वाचनवेडीला पौष्टिक खुराक दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! आणि मन:पूर्वक शुभेच्छा !!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ – डाॅ. विजयकुमार माने ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ – डाॅ. विजयकुमार माने ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव : काळजातल्या जाणिवांची सोनोग्राफी

कवी:              : डाॅ. विजयकुमार माने

प्रकाशक         : अक्षरदीप प्रकाशन

मूल्य               : रू.150/.

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना ,डोळ्यांना किंवा कोणत्याही उपकरणाना न दिसणा-या मनातील जाणीवांचा शोध घेऊन त्या शब्दबद्ध करणा-या डाॅ. विजयकुमार माने यांचा ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.भोवतालचा समाज,निसर्ग,वास्तव या सगळ्याचे भान ठेवून त्याच्या नोंदी मनात करता करता त्याना शब्दामध्ये उतरवून आपल्यासमोर ठेवताना विजयकुमार माने यांच्यातील एक डाॅक्टर आणि संवेदनशील माणूस या दोघांचेही दर्शन होते.हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.काव्यक्षेत्रातील त्यांचे हे दुसरे पाऊल अधिक दमदारपणे पडले आहे यात शंकाच नाही.

विषयांची विविधता हे या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.समाज, देश, निसर्ग, प्रेम, स्त्री, अशा विविध विषयांवर कविता आहेतच पण त्याशिवाय अभंग, गझल, देशभक्ती, वैचारिक, लावणी असे विविध प्रकारही त्यांच्या काव्यातून वाचायला मिळतात. अशा या  विविधांगी संग्रहाचा थोडासा परिचय.

कविता संग्रहातील पहिली कविता काळजातल्या जाणीवा व पुढे आलेल्या मूळ,बाप किंवा गुरू या कविता श्री.माने यांना गझल रचनेची वाट सापडली आहे हे दाखवून देतात.पहिल्या कवितेच्या शेवटी ते म्हणतात”माणसाला वाचण्याचा,लेखणीला वाव आहे”. म्हणूनच त्यांच्या लेखणीला कसा वाव मिळत गेला हे पाहण्याची उत्सुकता निर्माण होते आणि आपण संग्रह पुढे वाचत जातो.

आस, गुरुकृपा आणि रमाई माऊली या कविता मध्ये अभंग रचनेचा प्रयोग केला आहे व तो यशस्वी झाला आहे. पांडुरंग, गुरू, आणि रमामाता आंबेडकर या तिघांविषयी  त्यांना असलेला आदर व प्रेम  या काव्यातून व्यक्त होतो.

गृहिणीची कैफियत, साऊ, स्वतःशी बोल या त्यांच्या कविता स्त्री प्रश्नांना वाचा फोडणा-या आहेत.

विशेषतः ‘स्वतःशी बोल ‘ या कवितेत त्यांनी  स्त्रीला तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करून दिली आहे हे विशेष महत्त्वाचे.

अशाच त्यांच्या काही आशावादी विचार मांडणा-या कवितांचा विचार करता येईल.नैराश्य,आशा,लढा शत्रूंशी या कवितांतील आशावाद जगण्याची उमेद देणारा आहे.

त्याच वेळेला परस्पर प्रेम, नातेसंबंध, बंधुभाव यांची जपणूक करणा-या कविताही वाचायला मिळतांत. विशेषतः प्रेम, राख, ती, कधी कळणार तुला, पाऊस खेळत होता, भरलेला रिकामा वाडा, प्रेमानं जपलयं या कविता वाचनीय आहेत.

या भावनांबरोबरच कविने वैचारिक किंवा काही संदेश देणा- या रचना ही लिहील्या आहेत.दान या कवितेतून त्यानी नेत्रदान,अवयवदान,देहदान यांचे महत्त्व पटवून देऊन आपल्या व्यवसायाशी असलेली बांधिलकी दाखवून दिली आहे.आभाळमाया,माणूस व्हायचं ठरलयं,अस्तित्वाचा शोध,तुरुंग या कविता यासाठी वाचल्या पाहिजेत.’माणसं वाचता वाचता माणूस व्हायचं ठरलयं’ आणि पुढे देवमाणूस व्हायचं ठरलयं अस ते म्हणतात.त्यानी हे जे ठरवलंय ते आजच्या  काळात खरोखरच लाख मोलाचं आहे.

वास्तवाची जाणीव असणं हे तर साहित्यिकाचं मुख्य लक्षण! ही जाणीव माने यांच्या कवितेतूनही दिसून येते.महापुराची त्यांनी घेतलेली नोंद,भाडोत्री आई ही सेरोगेट मदर या विषयावरील कविता,मानवी दुग्धपेढी,चिमणी,गणपती पुरातला ,सैनिक,समाज आणि एकता या सर्वच कविता आजच्या समस्या आणि वास्तव याची नोंद घेणा-या आहेत.महापुरात सांगली नगर वाचनालयवर आलेल्या  संकटाने ते अस्वस्थ होतात आणि त्याच्या पुनर्उभारणीचे चित्र ही ते रंगवतात.

नोकरी, देवाची क्षमा मागून, कवायत, पानगळ, पायवाट, या त्यांच्या कवितांतून वेगळा विचार मांडलेला दिसतो, तर तिरंगा, बापू, बाबासाहेब या कविता त्यांच्या मनातील आदरभाव व्यक्त करणा-या आहेत. मी पाऊस,नदीच्या काठावर यासारख्या कवितांतून निसर्गाचे विलोभनीय दर्शन घडते. कंबर, शेकोटी, नजरेचा बाण, झाडावरचे पोळे अशा कवितांच्या निमित्ताने ते आपल्या शृंगारीक कल्पनांचे पोळे आपल्यासमोर रिकामे करतात. याच्या जोडीलाच हास्यधन, शर्विलक या कविता हसत हसत 

मानवी गुणदोषांविषयी बोलून जातात.

त्यांच्या काही काव्यपंक्तिंचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.

    सूर माझा कोकिळेचा, अंतराला छेडणारा

    गोडबोल्या पोपटांना,आज येथे भाव आहे. किंवा

                       *

    आज चिमण्या शोधतो आहे

    उद्या झाडे शोधावी लागतील

    काॅन्क्रीटच्या जंगलात घरटी

    प्लॅस्टिकचीच बांधावी लागतील.

                       *

    सापडेना राम कोठे वानप्रस्थी शोधताना

    मारलेल्या श्रावणाच्या कावडीचा शाप आहे .

                       *

    कल्पनेच्या लेखणीत, प्रपाताची शाई

    काळ्या धरतीवर, लिहिते ही वनराई

    शब्दांचा सुटला वारा, कविराजा तू डोल

यासारख्या अनेक ओळींचा उल्लेख करावासा वाटतो.पण शब्दमर्यादा लक्षात घेता ते शक्य होत नाही.

वेगवेगळ्या औषधांची मात्रा देऊन डाॅक्टरने  पेशंटला ठणठणीत बरे करावे  त्याप्रमाणे 

डाॅ.विजयकुमार माने यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या काव्यरचना करून वाचकाचे मन निरोगी व प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी अशा पद्धतीची सोनोग्राफी करून आम्हाला ‘ट्रीटमेंट’ देत रहावे , एवढीच अपेक्षा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.      

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सुश्री मंजुषा सुनीत मुळे ?

?अ भि नं द न ?

ई–अभिव्यक्तीच्या संपादिका, लेखिका व कवयत्री मंजुषा मुळे यांचं नवीन अनुवादीत पुस्तक वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर   अलीकडेच प्रकाशित झाले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.  हे त्यांचे 12 वे पुस्तक आहे.  ई – अभिव्यक्तीच्या अंकात वाचा, या ‘पुस्तकाबद्दल बोलू काही‘

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकाबद्दल बोलू काही ☆ वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर

? पुस्तकाबद्दल बोलू काही  ?

☆ वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

लेखक : Damien Brown
मराठी अनुवाद : मंजुषा मुळे 
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस 
पृष्ठ संख्या : 462
मूल्य : 595 रु  
ISBN13: 9789392482458

नववर्षाच्या आगमनाबरोबरच एक सुवार्ता ऐकायला मिळाली. ई- भिव्यक्तीच्या संपादिका मंजुषा मुळे यांचे नवे पुस्तक, वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर हे पुस्तक प्रकाशित झाले. हा एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असून पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केले आहे. मंजुषा मुळे यांचे हे बारावे पुस्तक. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर डॅमियन ब्राऊन यांच्या ‘Band-Aid For A broken Leg ’ या पुस्तकाचा हा अनुवाद. हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मकथन आहे. पण हे काही परिपूर्ण आत्मकथन नाही. जीवनाचा एक तुकडा इथे प्रकाशीत  झालाय. मेडिसिन्स सान्स फ्रॉंटिअर्स या सेवाभावी सस्थेमार्फत डॅमियन ब्राऊन हा ऑस्ट्रेलियन डॉक्टर स्वयंसेवक म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने आफ्रिकेत पोचतो. त्याची नेमणूक एका दूर, चहूबाजूंनी भू-सुरुंग पेरलेल्या, सर्वत्र निव्वळ मातीच्या झोपड्या असलेल्या शहरात, माविंगा येथे झालेली असते. या नव्या डॉक्टरांसाठी सगळीच परिस्थिती अपरिचित असते. अंगोलन वॉरचा प्रत्यक्ष अनुभव असणारे, त्याच्या दुप्पट वयाचे, इंग्लिश बोलू न शकणारे आणि पाहिल्याच दिवसापासून वितंडवाड घालणारे आरोग्यसेवक त्याच्या सोबत असतात.

श्रीमती उज्ज्वला केळकर

डॅमियन तिथल्या सर्व आव्हानांना तोंड देतो. तीन स्वयंसेवकांच्या मदतीने तिथल्या समाजातला असमंजस, तर्कविसंगतता अशा गोष्टींशी लढत राहतो. कधी चित्त्याच्या  हल्ल्यात जखमी होणारी माणसं, कधी भू – सुरुगाचा स्फोट, तर कधी चुलीवर हत्यारं उकळून कराव्या लागणार्‍या शस्त्रक्रिया  अशी आव्हाने सतत त्याच्या पुढ्यात असतात. तरी स्थानिकांशी मैत्री जुळवत तो परिस्थितीवर मात करतो. तिथली परिस्थिती आणि तिथले अनुभव एवढ्यापुरतेच हे आत्मकथन आहे.

 अंगोला, मोझॅंबिक आणि दक्षिण सुदान इथल्या वैद्यकीय दुरावस्थेवर प्रकाश टाकणारे प्रभावशाली असे हे पुस्तक आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील मानवहितवादी गट आणि त्यांच्यासाठी काम करणारी विक्षिप्त, पण असामान्य अशी माणसं, यांच्याबद्दलची प्रामाणिक मते लेखकाने  इथे मांडली आहेत.

लेखकाच्या आठवणी आणि अनुभव यावर हे पुस्तक आधारेले आहे. लेखक म्हणतो, ’अतिशय कठीण परिस्थिती आणि त्या परिस्थितीत राहणारे लोक याबद्दल लोकांना माहिती व्हावी, एवढाच हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे. ‘

लेखन करणारा आणि अनुभव सांगणारा डॉक्टरच आहे. म्हणून पुस्तकाचे शीर्षक वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर  हे काही योग्य वाटत नाही. त्या ऐवजी वेगळ्या वाटेने चालताना हे शीर्षक अधीक समर्पक वाटलं असतं. वेगळ्या वाटेने चालताना आलेले अनुभव आणि आठवणी डॉक्टरांनी कथन केल्या आहेत. कुणी तिसर्‍या व्यक्तीने त्यांच्याबद्दल लिहिले असते, तर हे शीर्षक योग्य ठरले असते.

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पुनर्जन्म” …डाॅ.प.वि.वर्तक☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “पुनर्जन्म” …डाॅ.प.वि.वर्तक☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी 

पुस्तकाचे नाव : पुनर्जन्म 

लेखक – डॉक्टर प. वि. वर्तक

प्रकाशक : डॉ. प.वि.वर्तक 

पुनर्जन्म असं म्हटलं की लगेच अंधश्रद्धा, अज्ञान, अडाणीपणा अशा दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि याला कारण आहे ते पुनर्जन्म या संकल्पनेची आतापर्यंत करण्यात आलेली मांडणी. चित्रपट, नाटक किंवा आणखीन कोणत्याही साहित्यकृती असोत या सगळ्यांमध्ये पुनर्जन्म हा विषय मांडला गेला आहे‌ तो पूर्णतः काल्पनिक आणि अशास्त्रीय दृष्टिकोनातून. त्यामुळे या संकल्पनेची हेटाळणीच जास्त प्रमाणात झाली. पाश्चात्यानुकरण करणाऱ्यांनी तर या संकल्पनेला उडवूनच लावले. निरनिराळ्या साधुसंतांनी सांगितलं असूनसुद्धा या संकल्पनेची साधी दखल घ्यावी असंही आपल्या समाजाला वाटू नये यासारखी खेदाची गोष्ट नाही, अशी खंत डॉक्टर वर्तक यांनी व्यक्त केली आहे.

ज्यावेळी पाश्चात्य लोकांना या कल्पनेत काहीतरी तथ्यता जाणवली, त्यांनी अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याकडच्या लोकांना त्यामध्ये खरोखरच तथ्य आहे असं दिसू लागलं. 

तत्पूर्वी पुनर्जन्म या सिद्धांताचा व्यवस्थित अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिकदृष्ट्या करून डॉक्टर वर्तक यांनी बरंच कार्य केलं. त्यांच्यापाशी सांगण्याजोगे अनेक अनुभव जमा झाले.  आणि लिहिण्याएवढा अभ्यास झाल्यावर, अधिकार प्राप्त झाल्यावर डॉक्टर वर्तकांनी हे पुस्तक लिहिलं.

या पुस्तकाच्या मनोगतातच ‘ पुनर्जन्मासारख्या विषयावर मी का लिहितो आहे? ‘ हा हेतू डॉक्टरांनी स्पष्ट केला आहे. 42 वर्षं वैद्यकीयक्षेत्रात असल्यामुळे जन्म आणि मृत्यू या घटना अगदी जवळूनच त्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे पुनर्जन्म संकल्पनेसाठी आवश्यक गोष्टी म्हणजे जन्म आणि मृत्यू हे त्यांच्या नित्याच्या अभ्यासाचेच विषय होते. आणि त्यामुळेच या संकल्पनेची सत्यासत्यता पडताळून बघताना जन्म म्हणजे नेमकं काय आणि मृत्यू म्हणजे नेमकं काय याचाही ऊहापोह या पुस्तकात केला आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून या घटना कशा घडतात ते सर्वसामान्य माणसाला समजेल, उमजेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत आणि क्रमवार सांगितलेले आहे. 

पुनर्जन्म ही संकल्पना मानणारे आपल्याकडील संतमहंत, विचारवंत, काही शास्त्रज्ञ यांचे दाखले दिले आहेत. तसंच आता काही पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनीदेखील या संकल्पनेचा अभ्यास करून ही संकल्पना खरी असल्याचं मान्य केलं आहे. 

अति विज्ञाननिष्ठ आणि अश्रद्ध माणसांना कदाचित या गोष्टी तरीही पटणार नाहीत, त्या न पटोत. पण या संकल्पनेचा प्रभावी उपयोग माणसाच्या सद्यस्थितीतल्या वर्तनावर कसा होऊ शकतो हे मात्र विचार करण्याजोगं आहे. या पुस्तकातला हा विचार मला जास्त महत्त्वाचा वाटला. 

असं अनेकदा घडतं की एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याशी वाईट वर्तन करते किंवा संकट प्रसंगी आपोआप आपल्याला मदत करते. अशा दोन्ही वेळी जर आपण तटस्थपणे या गोष्टींचा विचार केला तर जाणवतं, की या व्यक्तीशी माझा पूर्वी कधीही संबंध आला नसताना तिने माझ्याशी असं वर्तन करण्यामागे नक्की काय कारण असावं आणि आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कर्माचा सिद्धांत म्हणजेच पुनर्जन्म देऊ शकतं.

घडून गेलेल्या अनेक घटनांचा कार्यकारणभाव आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं, तर पुनर्जन्म ही संकल्पना अधिकाधिक पटत जाते. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानदेखील कोणतीही गोष्ट कार्यकारणभाव असल्याशिवाय घडत नाही, या गोष्टीला अनुमती देते. 

फक्त एक गोष्ट ठराविक प्रयोग करून सर्वसामान्यांसाठी सिद्ध करता येते… तर दुसरी गोष्ट ही एका विशिष्ट पातळीवरील ज्ञान प्राप्त झाल्यावर अनुभवास येते. बहिणाबाईंनी मरतेसमयी आपल्या बारा पुनर्जन्मांचं कथन केलेलं आहे. अकबराचा पुनर्जन्म आणि त्याचं वर्तन, बिरबलाचा पुनर्जन्म आणि त्याचं वर्तन… याच प्रमाणे पांडव, ज्ञानेश्वर भावंडं, सावरकर बंधू या सगळ्यांचे पुनर्जन्म यात सांगितले आहेत. आणि त्यात त्या जन्मात त्यांनी केलेली कार्यं यांचा सविस्तर अभ्यास करून ही सत्यता मांडली आहे. 

मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाने जर आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम, मग तो चांगला असो वा वाईट, आपल्याला भोगावा लागणार आहे हे जर जाणलं तर त्याच्या कर्मामध्ये आपोआपच शुद्धता आणि सत्यता येईल. वाईट कर्म करण्याची त्याची प्रवृत्ती ही आपोआपच नियंत्रित होईल. आणि ज्याचा फायदा समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी नक्कीच होईल. हे कसं घडेल यासाठी सर्वसामान्य व्यक्तींच्या पुनर्जन्माची काही उदाहरणं आणि त्यांची कर्मफलं आणि त्यातून त्यांना मिळणारे परिणाम हे लेखकांनी सोदाहरण स्पष्ट केलं आहे. 

अल्पवयात अचाट, अफाट पराक्रम करणारी मुलं असोत, किंवा विशिष्ट व्यंग घेऊन जन्माला आलेली बालकं असोत– ही सारी उदाहरणे विज्ञानाच्या पातळीवर पूर्णतः सिद्ध होत नाहीत. फार फार तर यातील व्यंगाचे कारण समजू शकते.  परंतु ते घडण्यामागचे कार्यकारण भाव मात्र विज्ञानही स्पष्ट करू शकत नाही आणि त्याच्यावर पूर्णतः उपचारही शोधू शकत नाही. गुणांच्या बाबतीतही, अचंबित होण्यापलीकडे विज्ञान त्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असं असताना पुनर्जन्म ही संकल्पना नाकारण्यामागे केवळ हटवादीपणा तर नाही ना, हे सगळ्यांनी पडताळून पाहायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून या संकल्पनेचा अधिकाधिक अभ्यास व्हायला हवा हे या पुस्तकानं अधोरेखित केलं आहे.

किमान एकदा तरी वाचावं असं‌ पुस्तक.

 

तळटीप – पुस्तकात याव्यतिरिक्तही खूप काही आहे पण ते वाचूनच समजून घ्यावं. 

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “लिंकन ऑफ लिडरशीप”…अनुवाद गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “लिंकन ऑन लीडरशिप” – अनुवाद गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक  ☆ 

पुस्तकाचे नाव:  लिंकन ऑन  लीडरशिप

मूळ लेखक : डॉनल्ड टी. फिलिप्स

मराठी अनुवाद : सौ गौरी गाडेकर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठे       :160

किंमत :रु.220/-फक्त

  

सौ गौरी गाडेकर

‘लिंकन ऑन लीडरशिप’ हे पुस्तक डॉनल्ड टी.फिलिप्स यांचे असून त्याचा मराठी अनुवाद  सौ. गौरी गाडेकर यांनी आपल्या मराठी बांधवांसाठी त्यांच्या सोप्या, सुटसुटीत, मनोरंजक भाषेत केलेला आहे.

हल्लीच्या पिढीला काय वाचावं हा मोठा प्रश्न. म्हणून असं नक्की म्हणावसं वाटतं की गाडेकरांचं हे सोप्या ,सुटसुटीत मराठी भाषेतील पुस्तक म्हणजे मेजवानीच आहे. 

ह्या पुस्तकाचा विषय खूप उपयोगी, महत्वाचा पण किचकट आहे. ‘खडतर काळासाठी एक्झिक्यूटिव्ह  डावपेच ‘ म्हणजे मनोरंजनासाठी वाचण्यासारखे  हे पुस्तक आहे का?–असे कोणालाही वाटेल. पण गाडेकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने इतका छान अनुवाद केलेला 

आहे ! एकदा हे पुस्तक वाचायला घेतले की पुढे पुढे वाचतच रहावेसे वाटते. ज्याप्रमाणे लहान मुलांना हसत खेळत गणित, भाषा, त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचताना वाटते. आणि म्हणूनच लिंकन ह्यांची तत्वे आपल्याला  वाचताना पटतात. कंटाळवाणे होत नाही.

हे पुस्तक म्हणजे 1860 च्या काळातले  ‘ एक्झिक्यूटिव्ह डावपेच ‘ असले, तरी आजच्या काळात पण ते तितकेच उपयोगी,मार्गदर्शक आहेत.

लिंकन ह्यांचा नेतृत्व हा गुण खूपच वाखाणण्यासारखा होता. 1861 मध्ये त्यांचा शपथविधी झाला होता. बिघडलेल्या परिस्थितीत अल्पसंख्यांकांच्या लोकप्रिय मतांनी निवडून आलेल्या लिंकनना,   नेतृत्वाचा अनुभव नसलेला, अडाणी, खेडवळ वकील, असे त्यांचे सल्लागारच समजत होते.  तेच लिंकन पुढे आदरणीय, पूज्य राष्ट्राध्यक्ष कसे बनले, हेच ह्या पुस्तकात सांगितले आहे. एखादे राज्य, संस्था चालवायला आजच्या पिढीला हे मार्गदर्शक ठरणार आहे. सर्वाना प्रेरणादायक आहे.

वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबतीत लिंकन आपल्या हाताखालच्या माणसांवर विश्वास दाखवायचे. कोण, किती, कशात प्रवीण आहे, कोणाचीआपल्या कामावर किती निष्ठा आहे,  कोण किती कार्यक्षम आहे, हे ओळखून त्याच्यावर  जबाबदारी टाकत. त्यांनी ती पूर्ण केली तर त्यांची वाहवा, योग्य मोबदला देत आणि जर तसे केले नाही तर योग्य वेळ बघून त्यांना पदावरून दूर करीत. कारण लिंकनना हाताखालची  माणसे आणि राष्ट्र दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. त्यांना यशस्वीरित्या नेतृत्व करायचे होते. आपल्या बरोबरच सगळ्यांना पुढे घेऊन जायचे होते आणि  ते पण  त्यांची मने  जिंकूनच. आपली मते कोणावर लादायला त्यांना आवडत नसे. ती मते  त्यांना पटवून देण्यावर  त्यांचा भर होता. तसेच समोरच्याच्या चुका त्याला दर्शवून अपमान करण्यापेक्षा,  छोट्या उदाहरणाने, चुटक्यांनी चूक त्याच्या निदर्शनास आणीत. हुकूम सोडण्यापेक्षा विनंती करण्याचे मोल लिंकन जाणून होते.

मानवाच्या स्वभावाची उपजत जाण नसेल तर त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. कर्मचारी ही संस्थेची मालमत्ता असते.  त्यांची मते, समस्या जाणून, त्याच्यावर थोडा वेळ, पैसा,  खर्च केला पाहिजे. यशस्वी स्नेहसंबंध निर्माण केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं–  ‘दुभंगलेल्या पायावर घर कधीच उभे राहू शकत नाही. तसेच प्रामाणिकपणा, सचोटी नसेल तर संस्थेची इमारत कोसळू शकते.’ असे त्यांचे मत होते. 

असे नेतृत्वाला गरजेचे आणि रोजच्या दिनक्रमाला पदोपदी उपयोगी  पडणारे लिंकन यांचे मार्गदर्शक गुण या पुस्तकात वाचायला मिळतात.

अशीच बोधप्रद,मनोरंजक पुस्तके, अनुवाद करून गौरी गाडेकरांनी आमच्यापर्यंत पोचवावीत.

ह्याच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा.

 

  –  सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print