मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णस्पर्श  (कथासंग्रह)” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णस्पर्श  (कथासंग्रह)” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक             — कृष्णस्पर्श  (कथासंग्रह) 

लेखिका…….      उज्ज्वला केळकर

प्रकाशक …..      अजब पब्लिकेशन्स   (कोल्हापूर)

पृष्ठे                        १९२

किंमत                   १९०/—

कृष्णस्पर्श “ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या या सर्वच कथा वाचनीय आहेत. त्या जितक्या मनोरंजक आहेत तितक्याच वेगळ्या जाणीवांची ओळख करुन देणार्‍या आहेत..उज्ज्वलाताईंच्या लेखनाची मी तर चाहतीच आहे. त्यांची भाषाशैली खूप प्रभावी आहे. घडणार्‍या साध्या घटनांचा कथांमधून मागोवा घेत असताना त्यांच्या निरीक्षणात्मक

बारकाव्यांचा अनुभव तर येतोच, शिवाय त्यांचा वैचारिक स्तर किती उंच आहे हेही जाणवते. कथेतल्या पात्रांचा मनोवेध त्या अचूक घेतात. शिवाय प्रसंगाकडे अथवा कॅरॅक्टरकडे जसंआहे तसंच बघण्याची एक तटस्थ वृत्ती त्यांच्या लेखनात जाणवते. कशाचंही उदात्तीकरण नाही,

समर्थन नाही किंवा अपारंपारीक  म्हणून विरोधही नाही. वाचकासमोर जसं आहे तसं मांडलं जातं, म्हणून या कथा अत्यंत परिणामकारक ठरतात, वास्तविक वाटतात. काही कथा धक्के देतात. काही कथा बधीर करतात. परीक्षणांत ,कथेतल्या कथानकांविषयी सांगणे म्हणजे वाचकाच्या स्वमग्न वाचनातील आनंद ,गोडवा कमी करणे असे वाटल्यामुळे, काही कथांविषयीच लिहीते.

पहिलीच शीर्षक कथा, कृष्णस्पर्श.” –या कथेत माई आणि  कुसुम नावाच्या कुरुप ओंगळ ,

आत्मविश्वास हरवलेल्या मुलीची गोष्ट आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासुन माई कीर्तन करत. अत्यंत सुरेल गायन, सुस्पष्ट निरुपण आणि प्रभावी वक्तृत्वामुळे.,श्रोते भारावून जातात. माईंच्या विस्कटलेल्या वैवाहिक जीवनामुळे कीर्तन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनते. कालांतराने त्यांच्या आयुष्यात कुसुम नावाचं गबाळं ध्यान आश्रित म्हणून येतं. सुरवातीला माईंच्या मनात तिच्याविषयी कुठल्याच ओल्या भावना नसतात.उलट रागच असतो. पण एक दिवस त्या तिला गाताना ऐकतात आणि तिच्यातल्या कलाकाराची त्यांना ओळख होते. मग कुसुम माईंना कीर्तनात साथ देउ लागते  गाणारी कुसुम वेगळी भासते. मात्र गाण्यातून बाहेर आलेल्या कुसुमचा पुन्हापुन्हा सुरवंटच होतो. मात्र एक दिवस, कृष्ण आणि कुब्जा भेटीचं गुणगान कीर्तनात गात असतांना कुसुम बेभान होते. ती गातच राहते आणि तेव्हां माईंना जाणवतो तो कृष्णस्पर्श—-माई ठरवतात, कुसुमला पूर्ण कीर्तन शिकवायचे. तिला स्वावलंबी,स्वयंपूर्ण बनवायचं….माईंच्या विचारांनाही कृष्णस्पर्शच होतो जणु—-

आंदोलन “ या कथेतलं कथानक काहीसं अतर्क्य आहे. लहानपणी एकत्र असलेल्या दोघांचं वडीलधार्‍यांच्या इच्छेनेच लग्र होतं.  दोघांची व्यक्तिमत्व भिन्न. विचार वेगळे. तो मातीत रुजलेला शेतकरी आणि ही एक उत्तम यशस्वी डाॅक्टर. त्याच्या पत्नीविषयीच्या पारंपारिक कल्पना, आणि 

हिचं व्यावसायिक जीवन यांची सांगड बसत नाही. दोन मुलंही होतात. पण सहजीवनातला अर्थ हरवलेलाच—-करीअरच्या पाठीमागे असणार्‍यांनी मूळातच लग्नबंधनात पडूच नये–या विषयावर बोचणारे वाद होतात–मात्र एक दिवस, ब्रेन हॅमरेजसारख्या घातक दुखण्यातून बाहेर पडल्यावर या यशस्वी व्यावसायिकतेतून ती बॅकआउट होते आणि एका सामान्य गृहिणीरुपात ती उतरते–

म्हणजे थोडक्यात त्याच्या कल्पनेतली–.पण या पद्धतीने–? नको.  हे बोचरंआहे—आता त्याला ते वेदनादायी वाटतं—ही सर्व मानसिक आंदोलनं उज्ज्वलाताईंनी इतकी सहज टिपली आहेत की कथेतल्या पात्रांच्या भावनांच्या अगदी  जवळ जाउन पोहचतो आपण—-

डेथ डे  ही कथा अंगावर दरदरुन काटा फुलवते. एका वेश्येच्या, एका विकृत राजकारण्याशी असलेल्या संबंधाची ही कथा आहे. पैसा, छानछोकी, ऐट, रुबाब याच्या बदल्यात

तिला जे करावं लागतं— त्यातलं ओंगळ कारुण्य वाचताना मन मातकटून जातं..

परक्याचं पोर—ही कथाही चटका लावणारी. एका जोडप्यांनं अनाथाश्रमातून एक मुलगा दत्तक घेतलेला. पुढे त्यांना त्यांचं स्वत:चं मुल होतं. इथून खरी कथा सुरु होते. वडीलांचं दत्तक मुलगा ,पिंटुशी बदललेलं वागणं.,नातेवाईक आणि सवंगड्याकडून पिंटुला उमजणारं ,त्याच्या आईवडीलांविषयी कळलेलं सत्य , हे सगळं त्याला गोंधळात टाकत असतं. त्याचं बालमन खचत जातं. मग त्याला शिक्षणासाठी अखेर वसतीगृहात ठेवण्याचा निर्णय होतो. आणि या सर्व  घटनांमुळे होरपळलेली, पिळवटून गेलेली आईची मनोवस्था वाचकालाही काळीज फाडणारी वाटते—-. 

चोरट्या वाटेनं, विवाहानंतरही  प्रियकराची मनात केलेली जपणूक एका कथेत आहे..

काही कथांमधे प्रेमाच्या त्रिकोणातून जन्मलेला आणि दुष्कर्म करणारा मत्सर आहे, समाजाने केलेली फसवणुक आहे, दुनियादारी आहे, बलात्कारासारखीही घटना आहे…

पण कथेची इमारत बांधतांना ती सतत ओळंब्यात असलेली जाणवते…उगीच विस्तारत नाही. पसरत नाही.

काही कथा मात्र चटकन् संपल्यासारख्या वाटतात—अजुन पुढे काय, असे वाटत असतानाच संपतात—पण तरीही त्या abrupt वाटत नाहीत….

थोडक्यात इतकंच म्हणेन, एक जाणीव देणारा, कधी सौम्य, कधी उग्र वाटणारा भावाविष्कार व्यक्त करणारा, कधी अतर्क्य वाटणारा, तर कधी वस्त्रहीन वास्तव समोर मांडणारा ,विविध घटनांचा,  विविध आशयांचा एक कथास्पर्श….”.कृष्णस्पर्श!! “ 

सुंदर वाचनीय.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “न्यायदानाच्या खुर्चीवरून” – जस्टिस रमेश माधव बापट ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “न्यायदानाच्या खुर्चीवरून” – जस्टिस रमेश माधव बापट ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक ~ न्यायदानाच्या खुर्चीवरून

लेखक ~ जस्टिस रमेश माधव बापट

प्रकाशक ~ इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे ३०

पृष्ठसंख्या ~ २४०

मूल्य ~ ₹२००/—

~~~~~

हे पुस्तक कथा,कादंबरी किंवा चरित्र या कोणत्याच वाङ्मय प्रकारात मोडणारे नाही.

एका न्यायाधिशाने त्यांच्या चोवीस वर्षांच्या कारकिर्दीत निकाला त काढलेल्या विविधरंगी खटल्यांचे व अनुभवांचे शब्दांकित रेखाटन असे या पुस्तकाविषयी थोडक्यात म्हणता येईल.

प्रस्तूत पुस्तकाचे लेखक श्री.रमेश माधव बापट, मुळचे कर्नाटकातले, वकीलीची पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर स्वतंत्रपणे वकीली करण्यासाठी पुण्यात स्थायीक झाले. बॅरिस्टर सी. बी अगरवाल आणि एडवोकेट सी.एन्.भालेराव ह्या प्रथितयश व अनुभवी वकिलांकडे ज्यूनियर वकील म्हणून काम करत करत कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त करून यश संपादन केले. सर्वसाधारणपणे असा समज आहे की वकिली म्हणजे लबाडी, पण “सचोटी, व्यासंग आणि चारित्र्य यांच्या बळावर कोणत्याही व्यवसायात यश व प्रतिष्ठा मिळू शकते”  हे या लेखकाकडे पाहून समजते.

श्री.बापटांनी त्यांच्या या व्यवसायात,अर्थात आधी वकीली आणि नंतर न्यायदान सांभाळताना ज्ञानसाधना हा महत्वाचा घटक कटाक्षाने सांभाळला आहे. त्यामुळे कोर्टापुढील त्यांचे निवेदन अत्यंत प्रभावी, परिणामकारक व पटण्यासारखे होत असे. पुणे, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, नागपूर, परभणी, आंध्रप्रदेश अशा अनेक ठिकाणी रजिस्ट्रार,न्यायाधीश ही पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या कोर्टापुढे जे विविध खटले गाजले व त्यांनी न्यायदान केले असे अनेक खटले या पुस्तकात उद्धृत केले आहेत. त्यावरून जस्टिस बापटांचा मानवतावाद हा त्यांच्या व्यक्तित्वाचा मोठा घटक आहे असे म्हणावे लागेल. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे गरीब व गुणी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सगळी हुषारी पणास लावली आहे, याच्या खुणा पुस्तकात जागोजागी सापडतात. 

एका क्रिमिनल खटल्याविषयी ते लिहितात……

“खुनाची केस होती. दोन आरोपी होते. सेशन्स कोर्टात खुनाचा आरोप सिद्ध होऊन दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आरोपीने हायकोर्टात अपील केले, परंतु दुसर्‍याने आर्थिक परिस्थिति अनुकूल नसल्याने अपील केले नाही. अपील माझ्या बेंचसमोर आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद व पुरावे वाचून झाल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झालेलाच नाही.  याचाच अर्थ असा की ज्याने अपील केले नाही त्याच्यावरचाही गुन्हा सिद्ध होत नाही. केवळ आर्थिक स्थिति ठीक नाही म्हणून गुन्हा शाबीत झाला नसताना दुसर्‍या आरोपीने जन्मठेप भोगावी हे मनास पटेना. सरकारी मदत देऊन दुसर्‍या आरोपीस अपील करण्यास सांगावे अशी सूचना वकीलांनी मला दिली, परंतु अपिलाची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत दोन एक महीने तरी लागतील, तेव्हा त्याने तेवढा वेळ तरी जेलमध्ये का काढावा? त्यापेक्षा पहिल्या आरोपीच्या अपील निकालात सर्व गोष्टी नमूद करून दोन्ही आरोपींच्या सुटकेचा एकत्र हुकूम काढतो.”  अशाप्रकारे बापटसाहेबांनी दोघांनाही वाचविले.

न्यायमूर्ति बापटांचे मुंबईतील family कोर्टात पोस्टिंग झाले असता त्यांना तर्‍हतर्‍हेची विचित्र माणसे पहावयास मिळाली. या पुस्तकात घटस्फोटाच्या कित्येक नमुनेदार केसेस त्यांनी वाचकांसमोर मांडल्या आहेत. न्यायदान करताना आठवीत शिकलेला एक शेर श्री.बापटांना कसा सहाय्यभूत ठरला त्याविषयी ते लिहितात….

” एका शिक्षिकेने घटस्फोटासाठी दावा दाखल केला.दोघेही तरूण, नवर्‍याला चांगली नोकरी–

काय भूत संचारले,अचानक नोकरी सोडून नवरा घरी बसला. रिकामटेकडा वेळ घालविण्यासाठी व्यसनाची संगत—स्वतःचे पैसे संपल्यावर बायकोकडे मागणी–तिने नकार दिल्यावर मारझोड….अखेर घटस्फोटाचा निर्णय.. पुढे बायकोकडे पोटगीची मागणी—

शिकलेला धडधाकट नवरा बायकोकडे पोटगी मागतो हे मला पटेना..त्याला सरळ करण्यासाठी मी एक गोष्ट लक्षात घेतली की प्रत्येक माणसाला ईगो असतो आणि प्रत्येकाचा काहीतरी विक पाॅइंट असतो– त्याचा ईगो न दुखावता मी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. “ तू स्वतः कमव आणि स्वकमाईचे खा “– असे म्हटल्यावर “ बायकोने कमवावे आणि नवर्‍याने घरी बसून खाऊ नये असा कुठे कायदा आहे का?“ असा प्रतिप्रश्न त्याने मला केला.

तेव्हा मी  त्याला सांगितले “ ठीक आहे, मी पोटगीच्या अर्जावर सही करतो, पण एका अटीवर–उद्या येताना या लांब मिशा तू उतरवून ये. असे म्हणताच मला पाहिजे तो परिणाम झाला. त्याचा अहंकार दुखावला, त्याने पोटगीचा अर्ज मागे घेतला.”

*कर दिया कर्झन ने जन, मर्दों की सूरत देखिये,

आबरू चेहेरे की सब, फॅशन बनाकर पौंछ दी!* असा तो शेर होता—

लाॅर्ड कर्झन गव्हर्नर जनरल असताना हिंदुस्थानातील पुरूष मोठ्या मिशा ठेवीत असत, पण कर्झनने त्यांना बाई बनविले. मिशा उतरविणे म्हणजे अब्रू जाणे. फार मोठा अपमान समजला जातो. 

कोर्टात केसच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदाराची साक्ष काढताना वादी आणि प्रतिवादीचे वकील जो युक्तिवाद करतात, त्याचेही बरेच नमूने ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात.

श्री.बापट बॅरिस्टर अगरवालांच्या हाताखाली काम करत असतानाचा एक अनुभव त्यांनी नमूद केला आहे—बॅरिस्टरांचे एक तत्व होते.  “go along with prosecution and then take diversion”

–केस होती ‘under essential commodity act.’ पुणे जिल्ह्यात कलेक्टरनी गव्हाच्या विक्रीची किंमत २ रुपये किलो ठरवली होती. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार आरोपीने गहू २॥ रूपये किलो भावाने विकला होता. कोर्टापुढे तसे साक्षी पुरावेही त्यांनी सादर केले. साक्षीदाराकडे अगोदरच नंबर लिहून, पंचनामा करून दहा रूपयांची नोट देऊन ठेवली होती. दुकान उघडताच एक बोगस गिर्‍हाईक नोट घेऊन दुकानात शिरला व त्याने चार किलो गहू मागितले.आरोपीने गहू वजन करून दिल्यावर पोलीस व अधिकारी दुकानात शिरले आणि साक्षीदाराची झडती घेतली. उरलेले दोन रुपये त्याच्याकडे सापडले नाहीत. याचा अर्थ आरोपीने २॥रुपये भावाने त्याला ४किलो गहू दिले. आरोपीचे वकील होते श्री.बापट. त्यांनी साक्षीदारास एकच प्रश्न विचारला..”जे गहू आरोपीने विकले त्याचे वजन करून पंचनामा केला होता का ?”

उत्तर नकारात्मक मिळाले. वकिलांच्या प्रश्नाचा रोख कोणालाही कळला नव्हता. वकिलांनी आरोपीला अशी जबानी देण्यास सांगितले की,सकाळची वेळ होती,गल्ल्यात सुटे पैसे नव्हते  म्हणून ‘ ४ किलोऐवजी ५किलो गहू देतो असे सांगितले.’ त्यामुळे २ रुपये परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोजून ५ किलो गहू दिले, गहू २ रुपये भावानेच विकले. तेव्हा कोणताही गुन्हा केला नाही.

कोर्टाला हा बचाव मान्य करावाच लागला आणि आरोपी निर्दोष सुटला.

हे पुस्तक म्हणजे अशा मनोरंजक कहाण्यांची रेलचेल आणि त्यांतून घडणारे मानव जातीचे दर्शन! 

कायद्याच्या कक्षेत राहून अक्कलहुषारीने न्यायदान करणे हे काम सोपे नाही. 

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ विश्वस्त…वसंत वसंत लिमये ☆ परिक्षण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ विश्वस्त…वसंत वसंत लिमये ☆ परिक्षण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

लेखक – वसंत वसंत लिमये 

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे 

किंमत : रु. ५५०/- 

इतिहास म्हणजे मनुष्याला कधीही टाळता न येणारा आणि बदलताही न येणारा असा काळाचा एक अवशेष होय. हा अवशेष वर्तमान आणि भविष्याशी कुठंतरी अदृश्यपणे बांधलेला असतो. त्यामुळे तो कधी अभिमानाचा विषय समजला जातो तर कधी अवमानाचाही. याचाच प्रत्यय ‘विश्वस्त’ ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी वाचल्यावर प्रकर्षानं येतो. 

लेखक वसंत वसंत लिमये हे मूलतः आयआयटी इंजिनियर आणि उत्तम गिर्यारोहक आहेत. अनेक अवघड, अनवट अशा डोंगरदऱ्यांवर, गड-किल्ल्यांवर भ्रमंती करणं हा त्यांचा छंद आहे. या छंदातूनच त्यांची इतिहासाशीही घट्ट नाळ जोडली गेली असल्याचं या कादंबरीतून प्रतीत होतं. 

ही कादंबरी म्हणजे इतिहासातील काही अज्ञात घटना आणि वर्तमानातील वास्तव घटना तसंच सत्य आणि कल्पना यांचा मेळ साधणारी एक रहस्यमय, गुंतागुंतीची रचना आहे. या कादंबरीत उत्पत्ती-स्थिती-लय या चक्रात फिरत असलेली ही ज्ञात-अज्ञात सृष्टी अजूनही ‘संभवामि युगे युगे’ म्हणणाऱ्या विश्वस्ताच्या प्रतिक्षेत असल्याचं दर्शविलं आहे. यातील विश्वस्ताची भूमिका म्हणजे सत्पात्री आणि निर्मोही अशा वारसदाराला बिकट परिस्थतीत आधार देणारा, मार्गदर्शक अशी आहे. यात महाभारताच्या शेवटच्या काळात श्रीकृष्णानं विश्वस्ताची भूमिका बजावली तर उद्धवनं सत्पात्र आणि निर्मोही वारसदाराची. परंतु हीच भूमिका पुढील युगात साकारण्यासाठी विस्मृतीत गेलेल्या या आगळ्यावेगळ्या परंपरेचं जतन करताना, काळाच्या तडाख्यात सापडलेल्या विश्वस्ताची आणि वारसांची खडतर पण आश्वासक वाटचाल हा या कथानकाचा गाभा आहे. 

या कादंबरीची अनेक वैशिष्ट्यं आहेत. मुख्यतः कादंबरीचा विषय आणि पट यांची नाविन्यपूर्ण मांडणी आहे. ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा जेएफके नावाच्या पुण्यातल्या कलंदर ग्रुपला गडावरच्या एका भटकंतीत एक ऐतिहासिक ताम्रपट मिळतो. त्या ताम्रपटावरच्या संदेशातून इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीनं शोध चालू होतो. हाच शोध पुढे एका गुप्त खजिन्याच्या अनामिक वळणार येतो. आणि मग सुरु होतो एक थरार… अनेक चढ-उतार असलेलं हे वळण राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय घटनांतून विस्तारत जातं. यात जेएफके टीमच्या काही सदस्यांना प्राणही गमवावे लागतात.

इतिहासाच्या प्रेमापोटी कुठल्याही प्रकारची अभिलाषा मनात न बाळगता या गुप्तधनाचा शोध करताना जेएफके टीमला दोन संघटनांच्या प्रचंड विरोधाला तोंड द्यावं लागतं. फॉक्स इन्कार्पॉरेटेड ही ऑईल एक्सप्लोरेशन करणारी बलाढ्य अमेरिकन कंपनी आणि अच्युतानंद आश्रमातला अवधूत संप्रदाय. या दोन्ही संस्थाचे वैयक्तिक स्वार्थ जेएफके टीमच्या संशोधनामुळे धोक्यात येत असतात. त्यात या टीमचा एक सदस्य मारला जातो. नेमका त्यावेळेसच वासुदेवजी या राजकीय सत्ताधाऱ्याचा वरदहस्त जेएफके टीमला मिळतो तोही या गुप्त धनाच्या इच्छ्नेच. संभ्रमात सापडलेल्या जेएफके टीमला संशोधनापेक्षाही निर्मोही आणि सत्पात्र वारसदार आजही उपलब्ध नसल्याचं जाणवतं आणि या संशोधनाचा  शेवट अगदी अकल्पनीय होतो.        

.कादंबरीचा पट पाहता युगांच्या या वाटचालीत विश्वस्ताची आणि वारसांचीही बदलणारी विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात. ती विविध रूपं आपल्याला महाभारतातला उत्तरकाळ, मध्ययुगीन काळ आणि सध्याचा वर्तमानकाळ अशी भ्रमंतीही घडवून आणतात. यातून काळाच्या प्रभावात बदलणारी मूल्यं आणि काळावर मात करणारी स्थिर मूल्यं यांचं ही दर्शन वाचकाला होतं.

कालानुरूप भाषाशैलीचा वापर हेही एक वैशिष्ट्य आहे. घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा संबंध भूत आणि भविष्य यांच्याशी कसा नकळतपणे जोडला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कादंबरी आहे. इतिहासातील सत्य आणि वर्तमानातील वास्तव यांचा मेळ साधण्यासाठी कल्पनेचा केलेला तर्कसुसंगत वापर हे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला गुंगवून ठेवणारी, विचारप्रवृत्त करणारी ही कादंबरी आहे. 

विश्वस्ताची ही संकल्पना समजून घेणे हे आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहे. ही संकल्पना देश, भाषा या साऱ्यां चौकटीपलीकडची आहे. त्यामुळे या संकल्पनेची माहिती इतर भाषांतून आणि माध्यमांतून होणे हे आवश्यक आहे. 

परिक्षक- सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “मातृव्यथा” (कथा संग्रह) – डॉ.पुष्पा तायडे ☆ परिचय – डॉ.वर्षा गंगणे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “मातृव्यथा” (कथा संग्रह) – डॉ.पुष्पा तायडे ☆ परिचय – डॉ.वर्षा गंगणे  

पुस्तक – मातृव्यथा (कथासंग्रह)

लेखिका : डॉ. पुष्पा तायडे 

प्रकाशक : गौरी प्रकाशन, वर्धा 

परीक्षक -डॉ.वर्षा गंगणे

“मातृव्यथा“ हा सामाजिक आशयप्रधान ,सभोवतीच्या परिस्थितीतील अनेक घटनांवर प्रकाश टाकणारा डॉ.पुष्पा तायडे     लिखित कथासंग्रह नुकताच 12 मार्च 2021 रोजी प्रकाशित झाला.अत्यंत देखणे,बोलके तसेच साजेसे मुखपृष्ठ, संग्रह वाचायला भाग पाडणारे आहे.त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे मुखपृष्ठावरील चित्र हे लेखिकेच्या आईचे आहे.आणि म्हणून ते उत्तम आहेच,याबाबत दुमत नाही.लेखिका डॉ.पुष्पा तायडे या लोक महाविद्यालय वर्धा येथे प्राचार्य पदावर कार्यरत असून त्या उत्कृष्ट लेखिका तसेच वाचक आहेत. अनेक पुस्तकांचे तसेच ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे.

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्यांनी लिहिलेल्या कथा ‘मातृव्यथा’ या कथासंग्रहातून वाचकांच्या भेटीला आल्या आहेत.यातील प्रत्येक कथा म्हणजे आपलाच अनुभव आहे असे वाटते.प्रत्येक कथा अनुभवावर आधारित आहे.या कथासंग्रहाला डॉ.किशोर सानप यांची दिर्घ प्रस्तावना लाभली आहे.त्यावरून कथांचा सविस्तर परिचय होतो.अत्यंत साध्या,सोप्या व लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेली ही प्रस्तावना प्रत्यक्षात मातृव्यथा या कथासंग्रहांच्या वाचनाची इच्छा निर्माण करते.

या कथासंग्रहातील सर्वच कथा अत्यंत वाचनीय असून घटनेचे बारीक-सारीक वर्णन करणाऱ्या तसेच तपशीलवार वर्णन करणाऱ्या आहेत.

मातृव्यथा हा कथासंग्रह गौरी प्रकाशन ,वर्धा यांनी प्रकाशित केला असून लेखिकेची ही पहिलीच आवृत्ती असल्याची छाप कुठेच दिसत नाही.यातील कमलिनी ही कथा मला खूप आवडली.शालेय जीवनातील अल्लडपणा,बारकावे, शब्दांची जुळवणी मनाला स्पर्श करून जाते.प्राचार्य पदाचा कार्यभाग सांभाळून पुस्तक प्रकाशित करणे हे काही सोपे काम नाही.पण,लेखिकेने अथक परिश्रमाने ते करून दाखवले.क्रांतिरत्न महात्मा फुले  या समग्र ग्रंथाचे संपादन करतांना एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे जिकरीचे कार्य आहे. यावरून त्यांचा साहित्यातील व्यासंग आणि रुची दिसून येते.मी मॅडमची पीएच डी. ची विद्यार्थिनी असून मला याचा सार्थ अभिमान आहे.

या कथासंग्रहातील दर्गा ही कथा हृदय पिळवटणारी आहे.आईला आलेले अनेक अनुभव,जीवनातील चटका लावणारे प्रसंग ,परिसर व त्यातील घटना उघडया डोळ्यांनी वाचण्याचे कसब यामुळे सगळ्याच घटनांनी कथेतून जीवंत रूप घेतलं आहे.विविध नाती, सृष्टी, माणसं व भावनांमध्ये रमणारा हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.

मातृव्यथा या कथासंग्रहातील सर्वच कथा लेखिकेच्या सभोवताली घडलेल्या घटनांशी संबंधित असून वास्तवाचे उत्कट दर्शन घडविणाऱ्या आहेत. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर अनुभवांच्या  बीजाला तावून- सुलाखून योग्य त्या आकारात सालंकृत करून शब्दांची बांधणी लेखिकेने केली आहे. व्यवहारातील शब्द आणि सहज प्रसावणारी भाषा यांची सांगड घालत प्रत्येक कथा लेखिकेने फुलवत नेली आहे.त्यामुळे वाचकाला ती आपलीच असल्याचे आभास होतात.हेच या संग्रहाचे  बलस्थान आहे.लेखिकेच्या सशक्त लेखणीचा परिचय आहे.

मातृव्यथा या कथासंग्रहातून वाचकांना समाधान तसेच आनंद मिळेल याबाबत दुमत नाही.

परीक्षक -डॉ. वर्षा गंगणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “लव्हाळी” – सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “लव्हाळी” – सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

 पुस्तक ~  लव्हाळी

लेखिका ~ राधिका भांडारकर

प्रकाशिका ~ डाॅ.स्नेहसुधा अ. कुलकर्णी,  निहार प्रकाशन, पुणे 

मुखपृष्ठ ~ उषा ढगे

मुल्य ₹.२००/—

~~~~~~

आपल्या ई अभिव्यक्ति आॅन लाईन अंकाच्या लेखिका/कवियत्री सौ. राधिका भांडारकर यांचा “ लव्हाळी “ हा स्फुटलेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन करते. हे त्यांचे चार कथासंग्रहानंतरचे पांचवे पुस्तक ! त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनाशी निगडित विविध विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या एकावन लेखांचा हा संग्रह आहे. 

वंशाचा दिवा हा पहिलाच लेख!

समाजातील एक जळजळीत विषय.

काळ कितीही पुढे गेला तरी वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवाच असा  हट्ट अजूनही आपल्याला दिसतो. या त्यांच्या लेखात बहीण व भाऊ या दोघात भावाला स्वतःलाच तो सर्वतोपरि बहीणीपेक्षा कमी असल्याचे जाणवते.या ठिकाणी राधिकाताई लिहितात,”दिवा काय? मी पणतीपण नाही.तिच्यातच मी पहातो खरा वंशाचा दिवा!

तीच आहे माझ्या आभाळीचा तेजोमय गोल..

मी उरलोय फक्त रीतीपुरता वंशाचा दिवा…!”

अतिशय प्रभावी शब्दात राधिकाताईंनी मुलीचे महत्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

एकेक लेख वाचत असता वाचकाला जाणवते ती लेखिकेची संवेदनक्षमवृत्ति, कल्पकबुद्धि, विविध विषयावरील अभ्यास तसेच त्यांच्या स्वभावाचे अनेकविध पैलू. 

एक सुटी, एक निरोप या लेखात स्थित्यंतर हा निसर्गनियम आहे, तेव्हा प्रत्येकाने ते आनंदाने स्वीकारावे असा त्यांचा आग्रह आहे, वृद्धावस्था म्हणजे एकप्रकारचा निरोपसमारंभच हा त्यांचा विचार मनाला पटतोच!

राधिकाताईंच्या सकारात्मक वृत्तीची आपल्याला ओळख होते. 

लेखिका कावळ्याला पत्र लिहितात.

बर्‍याच दिवसात त्याने कठड्यावर बसून कावकाव केले नाही म्हणून त्या बेचैन होतात.कावळ्याच्या रुपात त्यांना विठोबा भेटतो,वाटीतली खीर खाल्ल्यावर त्यांना स्वतःला नाम्या झाल्यासारखे वाटते.लेखिकेची ही सह्रदयता आहे.कल्पकतातर आहेच. 

समाजातील भीषणतेचे चित्र अतिशय मनोरंजक पद्धतीने केस या लेखात चित्रित केले आहे.

त्यांनी स्वर्गातील चित्रगुप्ताचे कोर्ट वाचकांपुढे उभे करून धरणीवर होत असलेल्या अत्याचाराचा खटला मांडला आहे आणि कोव्हीड १९ आणि लाॅकडाऊन ही न्यायाधिशाने सुनावलेली शिक्षा आहे.

शेवटी त्या लिहितात,पृथ्वी हसली. पक्षी किलबिलले!मोर थुईथुई नाचले! वृक्ष गहिवरले!फुलं नवे रंग ल्यायले! सृष्टी मुक्त झाली! आभाळ मोकळे झाले! पृथ्वी जिंकली!”

हे वाचून आपलेही उद्विग्न मन आनंदून जाते. 

या लेखसंग्रहात “चुकली दिशा तरीही” ह्या विंदांच्या कवितेचे आणि संजीवनी बोकील यांच्या “निःसंग” या दोन कवितांचे रसग्रहण केले आहे.

राधिकाताई वाचनात रंगून जातात.

वाचता वाचता लेखक/कवीला त्यांच्या लिखाणांतून नेमके काय सांगायचे आहे याचा विचार त्यांच्या मनात चालू असतो आणि त्यामुळेच विंदांची कविता वैचारिक प्रतिभेची बैठक असलेली,पुरोगामी विचाराची आणि सच्चेपणाने लिहिलेली अशी दाद त्या देऊ शकतात. 

निःसंग या कवितेत कवियत्रीला नेमके काय सांगायचे आहे हे राधिकाताई त्यांच्या शब्दांत सांगतात. “ना जमिनीची भीति ना आकाशाचा मोह!निःसंग जगण्याची शिकवण अशी निसर्गातूनच मिळते.जगणं महत्वाचं!जगण्यातली स्वीकृती महत्वाची…”

त्यांची अभ्यासू वृत्ती आपल्याला दिसून येते. 

ऊंच माझा झोका या लेखात राधिकाताईंना तळागाळातील स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची तळमळ,सैनिका तुझ्याचसाठी ह्या लेखांतून त्यांची दिसून येणारी देशभक्ति, गुरूंप्रति त्यांचा आदर!गुरु हे केवळ मोठेच नसून लहानांकडूनहि कित्येक गोष्टी आपण शिकत असतो,तेव्हा त्या बाबतीत लहांनानाही आपण गुरू मानले पाहीजे यातून दिसून येणारे त्यांचे उदात्त विचार. 

त्यांनी बालपणीच्या गाभुळलेल्या आठवणीसांगितल्या आहेत.त्यांच्या शालेय/काॅलेज जीवनाविषयीही लिहिले आहे आणि वयाची साठी गाठल्यानंतरही त्यांचे अनुभव लिहिले आहेत.

यावरून त्यांची बंडखोर,कलंदर पण मिस्कील वृत्ती, स्वतःची ठाम मते, असे त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब  वाचकांना त्यांच्या लेखांत दिसते. 

सर्व एकावन लेखांविषयी लिहिणे शक्य नाही,पण इतकेच सांगावेसे वाटते की संपन्न लेखणीतून उतरलेले  हे लेख वाचकांनी अवश्य वाचावेत. 

पुस्तकाचे लव्हाळी हे शिर्षकही अगदी सार्थ आहे. “वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळी वाचती.” उभ्या आयुष्यात नाना बर्‍या वाईट प्रसंगांना आपण सामोरे जाऊन पुढे पुढे जात असतो,त्याचवेळी काही क्षण हे मात्र मनःपटलावर कायमचे कोरले जातात. हे लव्हाळी म्हणजे असेच लेखिकेच्या आयुष्यात कायम स्वरूपी उमटलेले क्षण आहेत. 

शिर्षकाला समर्पक असेच मुखपृष्ठ उषा ढगे यांनी तयार केले आहे.त्यांचेही मी अभिनंदन करते. 

राधिकाताईंच्या या पुस्तकाला भरघोस यश मिळावे अशा मी शुभेच्छा देते. 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “नात्यांचे सर्व्हिसिंग” – श्री विश्वास जयदेव ठाकूर ☆ परिचय  – सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “नात्यांचे सर्व्हिसिंग” – श्री विश्वास जयदेव ठाकूर ☆ परिचय  – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆ 

 

पुस्तक – नात्यांचे सर्व्हिसिंग

लेखक –  श्री विश्वास जयदेव ठाकूर

पुस्तकाचे नाव : ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’

लेखक : श्री विश्वास जयदेव ठाकूर

प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन

किंमत : ९९ रुपये

पुस्तकाची पाने : १३९

‘कामा पुरता मामा’ ही म्हण आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपण जसं जसे मोठे होत जातो, तेव्हा अशाप्रकारचे कडू अनुभव कधी कधी घेत असतो. ऐन अडचणीच्या वेळी एखादा जवळचा नातेवाईक किंवा  मित्र आपल्याकडून पैसे उसने घेऊन जातो आणि नंतर सहजपणे आपल्याला विसरून जातो. अशावेळी आपले पैसे गेल्यापेक्षा आपण फसवलो गेलो याचे दुःख आपल्याला जास्त होते. समाजाप्रती भान ठेवून चांगल काम करणारी जशी निस्वर्थी माणसं असतात, तशीच कधी कधी कळत-नकळतपणे आपल्याच लोकांना त्रास देणारी माणसं असतात. तो कधी द्रव्यरूपाने असेल, तर कधी भावनिक.

लेखक विश्वास जयदेव ठाकूर यांना त्यांच्या व्यवसायामुळे अशा सर्व प्रकारची असंख्य माणसे भेटली. पण ‘शक्य असेल तितकी नाती जपली पाहिजेत, आपल्याकडून ती टिकवली गेली पाहिजेत’ हे लेखकाचे  तत्व. नाते कोणतेही असो, “नात्यात सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे असते” हे लेखकाने आपल्या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या पहिल्याच पुस्तकात सांगितले आहे.

पंचवीस वेगवेगळी लोकं. त्यांचे पंचवीस प्रश्न. केंद्रबिंदू विश्वास ठाकूर. या लोकांचे प्रश्न सोडवतानां आलेल्या प्रसंगातून मांडलेल्या या पंचवीस लघुकथा. नात्यांमध्ये कर्ज न येतां, त्यांच्या मधील भावनांचे व्याज कसे वाढविता येईल, यावर लेखकाने भर दिला आहे. भेटलेल्या व्यक्तिंच्या अनुभवातून सिध्द झालेले हे पुस्तक.

कोणताही व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे. हे सांगणारी दोन भावामधील कथा. तर फ्लॅटचा मोह न आवरल्याने मैत्रीणीची फसवणूक करायला जाणारी कथा. राग नेहमीच आपली उर्जा कमी करत असतो. निदान ‘एकाचा राग दुसऱ्यावर काढू नये’ एवढी किमान अपेक्षा आपण पाळली पाहिजे. हे ‘चित्रपटाचा फ्लॅशबॅक’ या कथेतून पटवून दिले आहे. ‘गरज सरो वैद्य मरो’ हे सांगणारी प्रकशची कथा. शेवटच्या प्रकरणात मात्र स्वतःकडून राहून गेलेल्या नात्याच्या सर्व्हिसिंग बद्दल लेखक प्रांजळपणे कबूली देतात.

माणसांचे असे अतर्क्य, अगम्य, अनाकलनीय वागणे या सर्व कथा प्रसंगातून प्रकट होतात. वेळोवेळी नात्यांना उजाळा दिला नाही की मग आपल्याला प्रश्न पडतो की ‘हा माणूस असा का वागला?’. हे जर टाळायचे असेल तर माणसांनी संवाद, मैत्री, आदर, कृतज्ञता, सह्रदयता यांचे वंगण वेळोवेळी नात्यांमधे घातले पाहिजे. थोडक्यात ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ करत राहिले पाहिजे. म्हणजे नात्यांमधील व्यावहारिक हिशोब आपोआप कमी होऊन, नात्यांचे भावनिक बंध चालू राहतील. आयुष्याचा हिशोब मांडताना, जमा आणि खर्च याचा  ताळेबंद जुळवायचा असेल, तर नात्यात हिशोब न आणता, फक्त आणि फक्त प्रेमाचा विचार केला पाहिजे, हा मुद्दा लेखकाने मांडला आहे.

मधु मंगेश कर्णिक आणि वसंत डहाके अशा दोन थोर साहित्यिकांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक. मधु मंगेश कर्णिक प्रस्तावनेमध्ये लिहितात, “हे पुस्तक तुम्हाला सहजपणे सहवासी घडवते” तर वसंत डहाके सांगतात, “माणसांकडे पाहताना आपली दृष्टी कशी असावी याची सूचना हे पुस्तक करते”. या दोन्हींचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो.

फक्त एकेशे ऐकोणचाळीस पानांचे हे पुस्तक एका बैठकीत सहज वाचून होते आणि नकळतपणे आपणही विचार करू लागतो, आपल्याकडून कोणाचे असे नात्यांचे सर्व्हिसिंग करायचे राहून गेले आहे का?

लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘शुभास्ते पंथानः’ या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे वाचक देखील विश्वास ठाकूर यांच्याकडून पुढील कथा संग्रहाची वाट बघतील, याची मला नक्की खात्री आहे.

©️ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘कोरडा भवताल’ – श्री आनंदहरी ☆ परिचय – श्री रमेश नागेश सावंत ☆ 

कवितासंग्रह – कोरडा भवताल

लेखक : आनंदहरी 

प्रकाशक : प्रभा प्रकाशन, कणकवली

पृष्ठसंख्या : ८४

कोरडा भवताल —- जगण्याच्या मुळाशी भिडणारी कविता

कवी आनंदहरी यांच्या ‘ कोरडा भवताल’ या नव्या कवितासंग्रहातील कविता भवतालात घडणा-या घटितांवर लक्ष्यवेधी भाष्य करतात. आनंदहरी यांच्या संवेदनशील दृष्टीला जाणवलेले जगण्याचे भान त्यांच्या कवितांतून संयत भाषेत व्यक्त झाले असले तरी या कविता वाचकाच्या संवेदनशील मनाच्या तळाचा ठाव घेणा-या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांनी त्यांच्या विश्लेषक प्रस्तावनेत नमूद केले आहे की कवी आनंदहरी समकाळाची स्पंदने टिपण्यात यशस्वी झाले आहेत. आपला भवताल कोरडा असल्याची कवीची जाणीव ही अभावाची आहे आणि त्यामुळे त्यांच्या कवितेतून जगण्यातील अर्थशून्यता निदर्शनास येते. म्हणूनच सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाचा वेध घेणारी ही कविता वर्तमान काळाचा अवकाश व्यापून टाकणारी आहे. कवी आत्मनिष्ठ कवितेच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्या कवितेचा सूर सामाजिक निष्ठेकडे वळलेला दिसून येतो. ‘मी साधेच शब्द लिहिले’ या पहिल्याच कवितेत अव्यक्त राहिलेल्या माणसांबद्दल कविला वाटणा-या सहसंवेदनेची ही जाणीव तीव्रतेने प्रकट झाली आहे.

“फक्त लागावा असा लळा

की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यासाठीच

माझ्या कवितेचे शब्द बोलत राहावेत

आयु्ष्यभर”

समकालीन मराठी कवितेत रुजलेला सामाजिक जाणिवेचा स्वर कवी आनंदहरी यांच्या कवितेतूनही प्रखरतेने उमटतो. ‘दिशा ‘ या कवितेत कविच्या सामाजिक अनुभूतीचे व्यामिश्र रंग उमटले आहेत.

भिरभिरलो दाहीदिशी आणि उतरलो धरेवर

सारा आसमंत कवेत घेऊन

आणखी कुणाच्याही दिशा

हरवून जाऊ नयेत म्हणून

कवीला त्याच्या आसपास दिसणा-या ‘ कोरड्या भवताला’ बद्दल वाटणारी संवेदना ‘आजचा काळ’, ‘वेदनेचे उठत राहतात तरंग’, ‘उपासमार’, ‘वासुदेव’, ‘मला माणूस म्हणू्न जगयाचंय’ या कवितांतून प्रकट झाली आहे. ‘आजचा काळ’ या कवितेतून कवीने सध्याच्या काळात मानवजातीवर घोंघावत असलेल्या असहिष्णुतेच्या वादळावर अतिशय मार्मिक शब्दांत आघात केला आहे.

वादळ कधीच करत नाही भेद

पाहत नाही रंग झाडापेडांचा, घरादाराचा आणि माणसांचाही

आजचा काळ असाच तर आहे असहिष्णुतेचा !

कोणत्याही कवीला शब्दांचा, प्रतिमांचा आणि प्रतिकांच प्रचंड सोस असतो. परंतु अल्प शब्दांत नेमक्या प्रतिमा वापरून आशयघन कवितेचे बिंब तयार करण्याचे कसब कवी आनंदहरी यांना जमले आहे. ‘ उपासमार ‘ या कवितेतून त्यांच्या काव्यगत प्रतिभेचे प्रत्यंतर येते.

तरीही मी राखलंय बियाणं शब्दांचं

रूजवू पाहतोय मनाच्या शेतात

निदान उद्या तरी डवरतील

शब्दांची कणसं

साध्या आणि सरळ भाषेत व्यक्त होतानाही मोठा आशय मांडणारी ही कविता थेट वाचकांच्या काळजालाच हात घालते. ‘ बांद’ या बोली भाषेत लिहिलेल्या गावरान बाजातल्या कवितेत ग्रामीण जीवनाचे चित्र कवीने आत्मीयतेने साकारले आहे. या कवितेतील ‘ बाप ‘ आणि ‘ आजा ‘ वाचकांना भावूक करून आठवणी चाळवणारा आहे.

आनंदहरी यांच्या कवितेची भाषा जितकी सहज, स्वाभाविक तितकीच त्यांची काव्यशैली देखील चिंतनशील प्रवृत्तीची आहे. त्यांच्या कविता जगण्याच्या मुळाशी भिडणा-या असून कविच्या भावना हळुवार शब्दांतून व्यक्त करतात. ‘ ऊनही आताशा’ या कवितेत एकीकडे निराशा आणि कोरडेपणा यांचे चित्रण करताना कविचा सूर भरपूर आशादायी असल्याचे जाणवते.

आशेची पाखरं

अवचितच झेपावतात आकाशात

आकाश पंखात घेण्यासाठी

रणरणत्या टळटळीत दुपारीही!

‘मला माणूस म्हणून जगायचं आहे’ या कवितेतून समाजातील दांभिक प्रवृत्तींचा वेध घेताना कवीने असामाजिक तत्वांवर शाब्दिक कोरडे ओढले आहेत. कवीचा आंतरिक आक्रोश हा जनमानसाचा प्रातिनिधिक आक्रोश आहे. सांप्रत काळात समाजमनावर पडलेला धर्माचा अतिरेकी प्रभाव आणि धर्माचे बदलते स्वरूप याबाबत कविने ‘ धर्म ‘ या कवितेतून प्रश्न उपस्थित केले आहेत. मुक्त छंदातील अशा सामाजिक भान प्रकट करणा-या कवितांबरोबरच ‘ मन वारकरी झाले’ , ‘ माझ्या देहाचे रे झाड’, ‘जन्म तुझा होता बाई’ , या अष्टाक्षरी कविता तसेच ‘ सुने झाले गाव’, ‘ दाटते मनात भय’, ‘लखलाभ तुम्हाला’ या गजला कविच्या बहुपेडी प्रतिभेची जाणीव करून देतात.

या कवितांतून सामाजिक जाणीव व्यक्त करताना कवीने स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचे भानही जागृत ठेवले आहे. ‘ उसन्या अवसानाने ‘ आणि ‘ नि:शब्द कविता ‘ या कवितांतून पुरूषी अहंकाराची दासी झालेली आधुनिक स्त्री, ‘ ‘तोड’ या कवितेत दारि्द्यावर घाव घालणारी ग्रामीण स्त्री, आणि ‘ती म्हणाली, ‘ शेवटी तू ही पुरूषच’ , या कवितेतील मुक्तीसाठी आसुसलेली स्त्री, अशा स्त्रियांच्या नानाविध रूपांचे वेधक दर्शन कवी आनंदहरी यांनी घडविले आहे. या कवितासंग्रहातील कवितांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहता समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात कवी आनंदहरी यांच्या कवितेची योग्य दखल घेतली जाईल ही आशा बळावली आहे.

प्रस्तुति – श्री रमेश नागेश सावंत

मुंबई

संपर्क – 9821262767

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘प्रवाहाविरुद्ध पोहताना’ – डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘प्रवाहाविरुद्ध पोहताना’ – डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव : प्रवाहाविरुद्ध पोहताना. (आत्मकथन)

लेखिका……..    डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी

प्रकाशक..         दिलीपराज प्रकाशन

पहिली आवृत्ती   फेब्रुवारी २०१५

पृष्ठे                    २४३

किंमत                २८०/—

प्रवाहा विरुद्ध पोहताना–हे लेखिका डाॅ.स्नेहसुधा कुलकर्णी यांचे आत्मकथन आहे..

पुस्तकाच्या शीर्षकावरुनच लक्षात येते की एका संघर्षाची कहाणी आहे.जीवन जगताना विलक्षण जिद्दीने ,मनाशी स्वप्ने बाळगून संकटांना कणखरपणे तोंड देत जगलेल्या एका स्वप्नाळु मुलीची ही काळीज चिरणारी ,पण धडपडीची जीवनकहाणी आहे.एक लांबलचक हर्डल रेसच..

लहान वयातच पितृछत्र हरपले.अकरा भावंडांचं कुटुंब,

अठरा विश्व दारिद्र्य.ऊपासमार. आजारपण.समाजाकडून  झालेली उपेक्षा.अवहेलना.सगळ्याच  आघाडीवरची अस्थिरता.या सार्‍यांशी वेळोवेळी लढून मात करुन ही मुलगी टिकून राहिली.

शाळेची सलग तीन वर्षे आजारपणामुळे बुडाली.त्या आजारपणाचे वर्णन वाचताना  मन अक्षरश: पिळवटते.

खाटेला खिळलेली ,भविष्यात कधी पायावर उभं राहून चालता तरी येईल का हाही प्रश्न असताना ,तिची जगण्याची धडपड आश्चर्यकारक वाटते.त्याविषयी लिहीताना लेखिका म्हणतात,

“रात्री सगळ्यांची निजानीज झाल्यावर मी आईच्या आधाराने उभी राहू लागले.पंधरा दिवसांनी काॅटला धरुन दहा पंधरा पावले चालून झाली आणि आशेला पालवी फुटली…मी बरी होऊ शकते असा विश्वास मिळाला..”

एकीकडे त्या असंही म्हणतात,माझ्यासारखी सामान्य माणसे दूरदृष्टीने वागत नाहीत.भावनेत वारंवार गटांगळ्या खातात.श्रद्धेवर व भावनेवर जगतात.कधी दैवाचे अनुकुल दान पडले की मूठभर ज्वारीचे दाणेही सुवर्ण मोहरा वाटू लागतात….”

त्यांच्या आयुष्याची सारी जडण घडण त्यांच्या या लेखनातून वाचायला मिळते.आयुष्याचा टप्प्या टप्याने आढावा घेताना लेखनातील सुसूत्रता कुठेही तुटलेली नाही…

प्रवाहा विरुद्ध आयुष्य घडवत असताना,सुरवातीला त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या.आणि  शिक्षिका ,लेखिका ,कवयित्री ,प्रकाशिका ,विविध संस्थांवर पदाधिकारी …इतपर्यंतचे त्यांचे सविस्तर आणि अत्यंत प्रामाणिकपणे लिहीलेले हे लेखन उत्कंठावर्धक आणि वाचनीय आहे…वेळोवेळी थक्क करणारे आहे.

एक आगळंवेगळं ,शिस्तबद्ध,नीटनेटकं चोखंदळ व्यक्तीमत्व— याचीच ओळख यातून होते….

स्वप्नांची मोडतोड,अपेक्षाभंगांचे चटके ,वैवाहिक जीवनातले सुखदु:खांचे चढउतार,सहकार्याचे हात देणारेही नातलग,मित्रमंडळी यासोबत एक अडखळती पण यशाची वाट धरणारी अशी ही सकारात्मक दृष्टीकोणाची  संघर्ष कहाणी.

आयुष्यात कोणी गॉडफादर नाही ,कुणाचे प्रोत्साहन नाही तरीही शिक्षण आणि प्रकाशन व्यवसायात त्यांनी लक्षणीय यश मिळवलं…

पुण्यातले साहित्य वर्तुळात एका महिलेने चालवलेले “नीहारा “हे पहिलेच प्रकाशन असेल.!

लेखिका म्हणते,मी चारचौघींसारखीच धडपडणारी संसारी स्त्री आहे,पत्नी माता भगिनी या भूमिका वठवणारी सामान्य गृहिणी आहे.पण मी दुबळी नाही. मी बुद्धीने असामान्य,हजारात एक नाही पण मी अगदीच सर्वसाधारणही नाही. मी कुठे आहे,कशी आहे याचं नेमकं भान मला आहे. माझ्यात खूप उणीवा,कमतरता आहेत,पण प्रवाहपतित होउन  जगणं,मला मान्य नाही. तशी मी जगले नाही म्हणून माझं आयुष्य संघर्षमय झालं…..””

खरोखरच अजिबात रटाळ,पाल्हाळिक नसलेल्या आणि ओघवत्या शब्दशैलीतले हे डॉ.सुधाताई  कुलकर्णी यांचे आत्मकथन वाचताना,आयुष्यांतील संकटाशी,अडचणींशी झगडण्याची उमेद मिळते…हेच या लेखनाचे उद्दीष्ट्य सार्थ झाले असे म्हणायला हरकत नाही…..

 डॉ. स्नेहसुधाताईंना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मोठी तिची सावली – श्रीमती मीना मंगेशकर खडीकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ मोठी तिची सावली – श्रीमती मीना मंगेशकर खडीकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकावर बोलू काही 

पुस्तकाचे नाव –‘मोठी तिची सावली’

लेखिका- श्रीमती मीना मंगेशकर खडीक

शब्दांकन-प्रवीण जोशी

आवृत्ती पहिली- २८ सप्टेंबर २०१८.

‘मोठी तिची सावली’

श्रीमती मीना मंगेशकर खडीकर लिखित ‘मोठी तिची सावली’ हे लतादीदींवर लिहिलेले पुस्तक अप्रतिम आहे! लतादीदींनी विषयी आपल्या मनात आदर, कुतूहल, कौतुक अशा असंख्य भावना आहेत, त्यामुळे हे पुस्तक वाचताना त्यांचं बालपण, त्यांना पडलेले कष्ट, कुटुंबासाठी त्यांनी केलेला त्याग अशा सर्व गोष्टी समजू लागतात, तरीही मीना ताई म्हणतात त्याप्रमाणे’ दीदी समजणे अवघड आहे’ वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांची सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.

लतादीदींच्या गाणं कारकीर्दीविषयी आपण थोडाफार तरी ऐकलं वाचलं आहे पण मीनाताईनी लता दीदीं चे बालपण फार सुंदर रेखाटले आहे. डोळ्यासमोर खोडकर, खेळकर लतादीदी उभी करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. सांगलीमध्ये दीनानाथ मंगेशकर असताना या भावंडांचे बालपण अतिशय समृद्ध तेत गेले होते तिथे त्यांनी अनुभवलेला पहिला काळ आणि  ते वैभव गेल्यानंतर अनुभवलेले दिवस दोन्ही वाचताना खरोखरच भारावून जायला होते. प्रथम सांगली, नंतर पुणे, कोल्हापूर आणि मास्टर विनायक यांच्या कुटुंबाबरोबर मुंबई असे चार कालखंड या पुस्तकात वाचायला मिळतात.

वयाच्या तेराव्या वर्षी घराची जबाबदारी लतादीदींच्या अंगावर पडली पहिली मंगळागौर या चित्रपटाने लतादीदींनी भूमिका केली पण चेहऱ्याला रंग लावून सिनेमात काम करणे त्यांना आवडले नाही. 42 /43 च्या दरम्यान लतादीदी आणि मीनाताई प्रफुल्ल पिक्चर च्या लोकांबरोबर मुंबईला गेल्या. आणि त्यांच्या गायन कारकीर्दीला खरी सुरुवात ‘महल’ आणि ‘बरसात’या सिनेमातील पार्श्वसंगीतामुळे झाली. त्यानंतर दीदींनी मागे वळून पाहिलेच नाही. सर्व भावंडे एकमेकांना धरून ठेवण्यात दीदींचा मोठा वाटा होता. त्या खोडकर, मोकळ्या स्वभावाच्या, पत्ते खेळण्याची आवड असणाऱ्या, नकला करणाऱ्या, फोटोग्राफी आणि क्रिकेटमध्ये रस घेणाऱ्या

आहेत. या विविध पैलूंचे या पुस्तकातून आपल्याला दर्शन होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे स्थान अढळ आहे.तसेच कोळी गीते, भक्तीगीते, भावगीते आणि विविध प्रकारची गाणी यात दीदींचा स्वर आपल्या ला कायमच आनंद देतो.शांता शेळके यांची अनेक गाणी दीदींच्या स्वरात आहेत.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांना लतादीदींनी संगीत ही दिले आहे.संगितकार म्हणून ‘आनंदघन’ नावाने त्यांनी संगीत दिले.दिनानाथांच्या चीजांची वही

ही त्यांची खरी इस्टेट त्यांनी जतन केली आहे.

जिथे दु:ख भोगले त्याच सांगलीत मंगेशकर कुटुंबियांचा सत्कार केला तेव्हा  मागील सर्व दु:ख मागे सारून त्यांनी सांगलीकरांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करून मनाचा मोठेपणा दाखवला!

दिनानाथांच्या नावे पुण्यात मोठे हाॅस्पिटल सुरू केले.तसेच माई मंगेशकर हाॅस्पिटलही उभारले.

लंडन च्या अल्बर्ट हाॅलमध्ये त्यांनी परदेशात पहिला जाहीर कार्यक्रम केला.

या पुस्तकात लतादीदींविषयी खूप छान माहिती प्रत्यक्ष त्यांच्या बहिणीकडून मिळत आहे.

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘विविधा’ (अनुवादित कथासंग्रह) – सौ. उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘विविधा’ (अनुवादित कथासंग्रह) – सौ. उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव….   विविधा (अनुवादित कथासंग्रह)

अनुवादिका –         सौ. उज्ज्वला केळकर

प्रकाशक               श्री नवदुर्गा प्रकाशन.कोल्हापूर

प्रथम आवृत्ती         जानेवारी २०१८

पृष्ठे…….               २६४

किंमत                   ४००/—

विविधा हा सौ. उज्ज्वला केळकर यांचा कथासंग्रह प्रस्तुत करताना त्या त्यांच्या मनोगतात म्हणतात,—” हिंदीमधील कथासाहित्य वाचताना काही कथा खूप आवडून गेल्या. त्यांच्या वेगळेपणाने त्या मनात रेंगाळत राहिल्या. त्यांचा मराठी अनुवाद करुन, मराठी वाचकांपर्यंत त्यांचे रंग गंध पोहचवावे असे वाटले. आणि त्यातूनच साकारला हा “विविधा” कथासंग्रह.” 

यातील काही कथा हिंदी भाषेतून थेट घेतलेल्या आहेत.

काही अन्य भाषांतून हिंदीत अनुवादित आहेत आणि त्यांचा मराठी अनुवाद केलेला आहे.

विविध वातावरण, विविध भवताल, विविध संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या, विविध भावभावनांचा खेळ मांडणार्‍या अशा एकूण एकोणावीस कथा या संग्रहात आहेत…

या कथा वाचताना,  तुटलेली मने, तुटलेली स्वप्ने, विखुरलेली नाती यातून नकारात्मकता जाणवत असली तरी वास्तवतेपासून कथा दूर जात नाही. ती रेंगाळते. विचार करायला लावते. सीमारेषेवरील युद्धे,जाती धर्मामुळे झालेल्या दंगली, स्वार्थी मतलबी राजकीय खेळी, खोटेपणा, भ्रष्ट नीती या सर्वांचा सामान्य निरपराध जनमानसावर किती खोल आणि उध्वस्त करणारा परिणाम होतो याची जाणीव या कथांमधून बोचत राहते.

काही कथांमधे हळुवार प्रेमाचे, नात्यागोत्यांचे, पारिवारिक विषयही अतिशय वेगळेपणाने आणि विविध स्तरांवर हाताळले आहेत. म्हणून त्यात तोचतोचपणा नाही. ते नेहमीचेच न वाटता त्यातलं निराळेपण वाचकाला वेगळ्या जाणीवा देतात.

‘पुष्पदहन’ ही युरोपहून आॅस्ट्रेलियात अपहरण करुन अमानुष छळ झालेल्या एका मुलाच्या जीवनावरची कहाणी आहे. लेखकाची या एकाकी व्यक्तीशी, एक टॅक्सी ड्रायव्हर आणि गिर्‍हाईक या नात्यातून जवळीक होते. जिम त्याला त्याच्या फसवणुकीची कहाणी सांगतो. युद्धानंतर झालेली फरपट, जिमची आईशी झालेली फसवणुकीची  ताटातूट, हे सारं खूपच यातना देणार.!!

आॉस्ट्रेलियात तीन महिन्यासाठी संशोधनानिमीत्त आलेला लेखक जीममधे गुंततो. इंग्लंडमधे गेल्यावर “तुझ्या आईचा शोध घेईन..” असे वचन तो त्याला देतो. मात्र आई सापडत नाही. एका वादळात कोलमडलेल्या वृक्षाखाली सापडून जीमचाही मृत्यु होतो. याच वृक्षाशी जीमचे घट्ट नाते असते. हा वृक्ष आणि मी दोघेही एकाकी असे तो सांगायचा. वृक्ष कोलमडतो आणि जीमची जीवनयात्रा संपते…. ही शोकांतिका असली तरी धार्मिक, वांशिक क्रौर्याची वास्तववादी कथा आहे…. महेंद्र दवेसर हे या कथेचे मूळ लेखक.

‘कहाणी एका रात्रीची‘…. या कथेत पाकीस्तानात मागे राहिलेल्या अल्पसंख्याकांच्या शोचनीय स्थितीचे दर्शन होते. जबरदस्तीचे धर्मांतर, झालेल्या रश्मी चावलाचा रेश्मा कुरेशी बनून घडलेला दु:खदायक जीवनप्रवास वाचताना मन कळवळते… एका हिंसक, राजकारणी घटनेच्या बळीची ही कथा शोचनीय आणि वाचनीय आहे….

‘राक्षस‘ ही कथा वाचताना डोळे नकळत भिजून जातात. सुकांत गंगोपाध्याय यांची ही मूळ बंगाली कथा. राणू मुखर्जी यांनी या कथेचा हिंदी अनुवाद केला आणि उज्ज्वलाताईंनी ही ऊत्कृष्ट कथा मराठीत आणण्याचे मोलाचे कार्य केले.. अनाथाश्रमातून पळून आलेल्या, रेल्वेस्टेशन हेच घर मानलेल्या जबाची ही  कहाणी.. भटकी कलंदर मुक्त पण अतिशय कणखर मजबूत मनाची ही रांगडी राकट जबा—  शनवर घडत असलेल्या रितसर, बेकायदेशीर अगदी चोरीच्या कामातही यथाशक्ती हिरीरीने मदत करुन, मोबदला मिळवून गुजारा करणारी जबा– जांभळं, करवंदे निंबाची पाने विकून पैसे मिळवणारी जबा— स्टेशनवरचाच बलराम तिच्यावर लेकीप्रमाणे माया करतो… रोजचे प्रवासीही तिला करुणा माया दाखवतात. या जबाच्या ओसाड आयुष्यात बिसला नावाचा,चोरीच्या कोळसा खाणीत काम करणारा युवक प्रीतीचा मळा फुलवतो…जबा लग्न, संसार ,परिवाराची स्वप्नं पाहते…. लग्नाच्या अदल्या दिवशीच कोळशाच्या खाणीत झालेला अपघात आणि होरपळलेलं जबाचं स्वप्न वाचता वाचता डोळे वहात रहातात…ही कथा वाचताना रांगडी जबा, ते स्टेशन आजुबाजुचा परिसर, बलराम, बिसला ,या व्यक्ती सारंसारं अक्षरश: डोळ्यासमोर उभं राहतं…त्या वातावरणाचा एक भागच बनून जातो आपण…ती कथा नुसती वाचतच नाही तर ती उलगडणार्‍या शब्दांतून पहात जातो…

खरं म्हणजे प्रत्येकच कथा वाचताना मी हे अनुभवलं.!’

‘छब्बे पाजी‘ ही ही अशीच मुलांना सुरस कथा सांगणार्‍या साध्या सरळ पंजाबी माणसाची गोष्ट. हिंदु शीख दंगलीत विनाकारण आतंकवाद्याचा शिक्का बसून गुन्हेगारीच्या बेडीत अडकलेल्या निर्मळ मनाची कथा—-छब्बे पाजी जेव्हां म्हणतात,”आता माझ्या सगळ्या कहाण्या मेल्यात…कहाण्यांचा समुद्र पार सुकून गेलाय…”हे वाचताना आपल्याही मनातले अनंत प्रश्न ओले होतात….सुशांत सुप्रिय याच्या हिंदी कथेचा हा अनुवाद अप्रतिम!!!”

‘हॅलो १ २ ३ ४‘ ही संपूर्ण कथा म्हणजे एक फोनवरचा संवाद आहे. सुरवातीला निरर्थक वाटणारा मनोरंजक पण नंतर त्यातला  सखोल अर्थ जाणवत…वाचता वाचता एका एकाकी,नैराश्याने ग्रासलेल्या मनोरुग्णाचीच कथा उलगडत जाते…अतिशय धक्कादायक सुंदर वेगळ्याच विषयावरची ,निराळ्या पद्धतीने मांडलेली  कथा…मोहनलाल गुप्ता हे या कथेचे मूळ लेखक.

व्होल्गा यांची ‘ बहरे शिशीरात वसंत ‘ ही मूळ तेलगु कथा! आजारी वृद्ध आई आणि संसारी ,नोकरी करणारी लेक,यांच्या नात्याची विचीत्र वीण दाखवणारी कथा! या कथेत आई मुलीचा काहीसा गैरफायदा घेते ,तिला इमोशनल ब्लॅकमेल करते अशी भावना निर्माण होते.पण एक वास्तव म्हणून ते वाचकाला स्वीकारावही लागतं..

नीला प्रसाद यांची ‘ चंद्र माझ्या अंतरात ‘ ही एक विद्रोही कणखर विचारांची कथा अक्षरश:काळजावर चरे पाडते. यात विखुरलेल्या नात्यांचे तुकडे आहेत. प्रीतीची परिपक्वता आहे. निर्णयाची घालमेल आहे…एक सक्षम ठाम वैचारिक मानसिकता आहे. वैयक्तिक सुखाबरोबरच भोवतालच्या परिस्थितीचीही समंजस जाणीव आहे..या कथेतील काही वाक्ये थेट भिडतात—-

“दोन आत्मनिर्भर जीवांचं एकत्र जगणं,हे ह्रदयाचं नातं असतं. ते त्यांना एकत्र बांधून ठेवतं.  जर पतीचं मन इकडे तिकडे कुठे गुंतलेलंअसेल ,जाणूनबुजून तो आपल्या पत्नीचं मन तोडत असेल, तिचा मान ठेवत नसेल, तर विवाहाचं नातंच मृत होतं. पती जिवंत असूनही पत्नीच्या जाणीवेत ती विधवाच असते….!!!” अशी  विधाने प्रखर असली तरी ती नक्कीच विचार करायला लावतात…

सर्वच कथा सुंदर आहेत.मी काही कथांचाच आढावा घेतला कारण कथावाचनाचा आनंद स्वतंत्रपणे घेतला जावा ही भूमिका.

उज्ज्वलाताईंनी केलेले अनुवाद हे अस्सल आणि कथानकाचा गाभा,वातावरण ,संस्कृती चपखलपणे जपणारे आहेत..अनुवादात सहजता आहे..कुठेही कृत्रीमता ,ओढाताण लवलेशानेही नाही..उज्ज्वलाताईंची ही कला वादातीत आहे. प्रशंसनीय आहे.

थोडे शीर्षकाबद्दल—.विविध भाषेतील,विविध वातावरणातील,भिन्न संस्कृतीच्या निरनिराळ्या घडामोडींच्या या विविध कथा म्हणून “विविधा”…

हा संग्रह वाचतांना मन आनंदीत होत नाही मात्र सत्याच्या वास्तवतेच्या दर्शनाने एक प्रचंड हँगओव्हर येतो….कथांमधल्या नग्न नकारात्मकते पुढे वाचक भेलकांडून जातो…तसेच तो समृद्धही होतो.—–हे माझे मत—-

तुमचे मतही ऐकायला आवडेलच….

 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares