सौ. अलका ओमप्रकाश माळी
पुस्तकावर बोलू काही
☆ “गारंबीची राधा” – लेखक : श्री ना. पेंडसे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
पुस्तकाचे नाव… गारंबीची राधा
लेखक… श्री. ना. पेंडसे
मैत्रिणींनो यशोदा ह्या श्री. ना. च्या कादंबरीचं अभिवाचन मी काही दिवसांपूर्वी केलं होत.. त्यामुळे श्री. ना आणि त्यांचं कोकण प्रेम त्यांच्या लिखाणाची शैली आपल्या सगळ्यांना परिचयाची झाली आहे.. खर तर गारंबीची राधा मी खूप वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तकं आहे.. आज माझ्याकडे तर ते पुस्तक ही नाहीय.. कोणीतरी वाचायला नेलेले दिलेच नाही.. असो.. पण राधा ने अशी काही भुरळ घातली आहे की बरेच प्रसंग अगदी काल वाचल्या सारखे लख्ख आठवतायत त्याच जोरावर मी अभिप्राय लिहिते आहे.. तुम्ही समजून घ्याल च.. खरं तर कोकण प्रदेश त्यातले अनेक लेखक कवी नेहमीच आपल्याला त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे भुरळ घालतात आणि आपण अधाश्या सारखे हे साहित्य वाचतो.. पण ह्या सगळ्या लेखकांमध्ये जास्त आवडतात किंवा लाडके लेखक म्हणू हवं तर ते म्हणजे श्री. ना. पेंडसे.. ह्यांच्या अनेक कादंबऱ्या, कथा संग्रह मी अगदी पारायण केल्या सारखे वाचले आहेत.. कॉलेज लाईफ मध्ये.. श्री. ना. च पहिलं पुस्तकं हातात पडलं ते म्हणजे गारंबीची राधा…ही कादंबरी वाचली आणि मी अक्षरशः श्री. ना. च्या लिखाणाच्या प्रेमातच पडले.. मग काय एका मागून एक त्यांची पुस्तकं वाचली.. गारंबीचा बापू, रथचक्र, लव्हाळी, ऑक्टोपस, चक्रव्यूह, राजे मास्तर आणि सगळ्यात आवडलेली कादंबरी म्हणजे 1400 पानांची दोन खंडात आलेली कादंबरी तुंबाडचे खोत..
गारंबीची राधा आणि गारंबीचा बापू ह्या अगदी एकाच कथेचे दोन मोठे भाग असावेत असं वाटतं.. कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात गारंबी त्या खेड्याच नाव.. तिथे सुरू झालेली ही कहाणी आपल्याला पुन्हा नव्याने कोकणच्या प्रेमात पाडते.. ह्या कादंबरीत अनेक व्यक्ती चित्रण बघायला मिळतात.. मुख्य पात्र तर आहेतच त्यांच्या सोबतच अनेक स्वभावाची वेगवेगळी कोकणी माणसं आपल्याला इथे भेटतात.. कोकणचा प्रदेश, तिथली सामाजिक, आर्थिक परिस्थिती, तिथल्या प्रथा परंपरा, राहणीमान, खानपान ह्याचं अगदी जवळून दर्शन ह्या कादंबरी मध्ये होत.. पुलावरच्या एका बकाल म्हणता येईल अशा वस्तीत.. रावजी च्या हॉटेल मधे काम करणारी राधा एक सामान्य मध्यम वयीन स्त्री.. पण लेखक तिचं तिच्या रुपाच वर्णन करताना म्हणतात राधा म्हणजे पारिजातकाचं टवटवीत फुल. राधा दिसायला सुंदर आहे पण रोज तेलाच्या घाण्यासमोर बसून भजी तळून रापलेली तिची गोरी पान कांती अजूनच तिच्या सौंदर्यात भर घालते.. त्या छोट्याशा टपरी वजा हॉटेलमध्ये रावजी सोबत राधा दिवसभर काम करते, तिथेच तिला गारंबीचा बापू भेटतो. गारंबीमध्ये बापूची ओळख म्हणजे सर्वपित्री अमावस्येला जन्मलेलं एक बिघडलेलं कार्ट अशी आहे.. अशा ह्या उनाड बापू आणि राधाची प्रेम कहाणी ही जगावेगळी आहे.. बापूचा विचित्र स्वभाव आणि राधाचा स्पष्टवक्तेपणा राधेचं खंबीर धीर गंभीर रूप ह्या कादंबरीत वारंवार दिसून येते.. बापू सारखा मन मानेल तसं जगणारा प्रियकर आणि कोणाचाही आधार नसलेली ही राधा यांची प्रेम कहाणी आपल्याला वेड लावते.. प्रत्येक पानावर उत्सुकता अजूनच वाढत जाते…
यासोबत कोकणातील अंधश्रद्धा श्रीमंती थाट जमीनदारांचा मुजोरपणा आणि ह्या सगळ्याशी लढणारा उनाड बापू आपल्याला अधिकच जवळचा वाटू लागतो याच सोबत बापूवर निस्सीम प्रेम करणारी, कुठल्याही बंधनात न अडकलेली ही राधा आपल्या मनात घर करून जाते,… त्या काळी लग्नाशिवाय बापू सोबत एकाच घरात राहून संसार करणारी ती राधा त्या काळची एक आधुनिक विचारांची स्वतंत्र स्त्री या कादंबरीत भेटते,.. गावात असणारे अण्णा खोत, दिनकर भाऊजी ,विठोबा, आणि राधेचा नवरा रावजी ही अशी कित्येक पात्र या कादंबरीत भेटतात,.. रावजी म्हणजे राधाचा नवरा हा एक क्रूर विचारांचा स्त्री स्त्रीला एक भोगवस्तू समजणारा नवरा राधेला याचा तिरस्कार आहे.. राधेच्या सौंदर्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये गिराईक वाढतील या उद्देशाने हा रावजी राधेला हॉटेलमध्ये बसवत असे,..
अशाच एका क्षणी राधेला बापू भेटतो.. आणि रावजीसारख्या माणसाला तो आपल्या ताकतीने हरवू शकतो हे ती काही प्रसंगातून समजून चुकते… एक प्रकारचे सुप्त आकर्षण बापूबद्दल तिला आधीच वाटत असते त्यातूनच ती त्याला अनेक पदार्थ करून पाठवत असे आणि तेही रावजीच्या हातून.. कित्येक दिवसांनी रावजी मरून जातो आणि राधा पुन्हा एकदा एकटी पडते… पण समाजात आधीच गल्ल्यावर बसणारी म्हणून राधेची नाहक बदनामी झालेलीच असते, त्यातच आता तिला एकटेपणा येतो. या सगळ्यात बापूचा आधार तिला वाटतो,… आणि कोणतीही पर्वा न करता ती बापूसोबत राहायला लागते याचवरून गावात सगळीकडे राधेने बापूला ठेवला अशीच तिची बदनामी सुरू होते… पण बापूचा हळव्या निर्मळ प्रेमामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून राधा आणि बापूचा संसार सुरू होतो या सगळ्या परिस्थितीत राधेची मानसिक घालमेल सुरू असते… बापूचं कितीही प्रेम असलं तरी या प्रेमाला गावात मान्यता नाही… आपण फक्त एक रखेल म्हणूनच ओळखले जातो याची खंत राधेला नेहमी वाटत असते…
अशातच एक दिवस आप्पा दामले याची एन्ट्री या कादंबरीत होते… आणि राधा आणि बापूचं आयुष्य बदलून जातं..आप्पा दामले हे राधा आणि बापू विषयी ऐकून असतात आणि राधेच्या मनातील खंत ही त्यांना कळते तेंव्हा ते ह्यांना रजिस्टर लग्न करण्याचा सल्ला देतात.. अर्थात ह्या पुस्तकात दाखवलेला काळ म्हणजे केस ठेवलेला ब्राम्हण औषधाला ही सापडणार नाही इतका पूर्वीचा.. त्यात बापू सारखा उनाड कोकणी विक्षिप्त माणूस.. आधीच तो बदनाम मग हे लग्न कोण मान्य करणार असं बापू म्हणतो.. पण इथे हो राधाची हुशारी तिचं बुद्धी चातुर्य दिसुन येत.. गारंबी म्हणजे जग न्हवे.. म्हणत ती बापू सोबत लग्न करते…ह्या सगळ्या मध्ये बापू आणि राधेचा गांधर्व विवाह ही अगदी रोमँटिक आणि निखळ प्रेमाचं प्रतिक वाटतं… बापू भल्या पहाटे राधेला बागेत घेऊन जातो आणि एक अनंताच फुलं देऊन तिच्याशी लग्न करतो.. तो क्षण तो परिसर ते लिखाण सगळचं कस मोहवून टाकत… तो पर्यंत बापू सुपारी चा मोठा व्यापारी बनतो आणि ज्या गावाने अक्करमाशा म्हणून हिणवलं तेच गावं बापुच कौतुक करताना थकत नाही.. ह्या सगळ्या प्रवासात बापूला मिळालेली राधेची साथ राधेच्या अजूनच प्रेमात पाडते.. मध्येच बापू एका महाराजांना भेटतो आणि बुवा बनतो तेंव्हा ह्या त्याच्या भोंदू पणाला राधेचा विरोध तिच्यातल वेगळेपण दाखवून देतो.. व्याघ्रेश्वर त्याच्यावर असणारी श्रद्धा जेंव्हा अंधश्रद्धेचे रूप घेते तेव्हा राधा त्याला कडाडून विरोध करते.,. बाळाच्या जन्मानंतर राधेची एक वेगळीच ओळख आपल्यासमोर येते.. बापूचं विक्षिप्त वागणं, घर सोडून बाहेर राहणं, अस असलं तरी राधेचं बापू वरील प्रेम जराही कमी होत नाही.. काही दिवसांनी बापूलाही आपला भोंदूपणा कळतो मग तो तेव्हा तो राधेकडे परत येतो आणि पुन्हा एक नवी कहाणी सुरू होते.. सगळ्यात अजून बऱ्याच घटना घडवून जातात…. काय आहेत किती उत्कंठा वर्धक आहेत.. हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकीने किमान एकदा तरी गारंबीची राधा आणि गारंबीचा बापू वाचलंच पाहिजे…
जवळजवळ दहा ते बारा वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकावर मी आज अभिप्राय लिहिलाय त्यामुळे त्यात बऱ्याच चुकाही असतील,.. प्रसंग मागे पुढे झालेले असतील त्या तुम्ही सगळे पुस्तक वाचाल आणि दुरुस्त कराल याची खात्री आहे…
धन्यवाद..
लेखक : श्री ना. पेंडसे
परिचय : सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈