☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
देखणा दुर्ग ग्वाल्हेर
ग्वाल्हेर दुर्गाच्या हत्ती दरवाजासमोर ब्रिटिशांनी हॉस्पिटल व तुरुंग म्हणून उभारलेल्या बिल्डिंगमध्ये आता पुरातत्व खात्याने सुंदर म्युझियम उभारले आहे. ग्वाल्हेर आणि आजूबाजूच्या भिंड, मोरेना, शिवपुरी वगैरे परिसरात सापडलेल्या पुरातन मूर्ती येथे जतन केल्या आहेत. सप्तमातृका, पार्वती, ब्रम्हा, विष्णू, गंगा- यमुना, आदिनाथ, पार्श्वनाथ, अष्टदिक्पाल, नरसिंह, एक मुखी शिवलींग अशा असंख्य मूर्ती तिथे आहेत. एवढेच नव्हे तर इसवी सन पूर्व काळातील टेराकोटाची अश्वारूढ मूर्ती, मातीचे दागिने आहेत. मूर्तींची कमनीयता, उभे राहण्याची, बसण्याची, नेसण्याची ढब, वस्त्रे ,अलंकार, वराह, सिंह ,अश्व, पानाफुलांची नक्षी यातून त्या त्या कालखंडातील संपन्न सांस्कृतिक दर्शन घडते. दुर्दैवाने यातील बऱ्याच मूर्तींचे चेहरे मोगल काळात विद्रूप केले गेले आहेत. यातल्या काही चांगल्या मूर्ती देश-विदेशात प्रदर्शनासाठी नेल्या जातात.
राजा मानसिंग याने ‘मृगनयनी’साठी बांधलेला ‘गुजरी महाल’ किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. किल्ल्याच्या तटावरुन त्याचा रेखीवपणा नजरेत भरतो. तिथेही आता पुरातत्व खात्यातर्फे भग्न शिल्पांचे म्युझियम उभारले आहे. प्रवेशद्वारी शार्दुलांची जोडी आहे .हत्ती ,मोर ,गंधर्वांच्या मिरवणुका,ताड स्तंभ, बाळाला पुढ्यात घेऊन झोपलेली माता, कुबेर, इंद्राणी, सर्वांगावर कोरीव काम केलेली वराह मूर्ती अशी असंख्य शिल्पे आहेत ,ऐतिहासिक दस्ताऐवेजांमध्ये तात्या टोपे यांचा १८५७ चा हुकूमनामाआहे . नानासाहेब पेशवे यांची तसबीर आहे. पुरातन दगडी नाणी ,नृत्यशिल्पे ,लोककला यांचेही दर्शन त्यात होते .याशिवाय किल्ल्यावर कर्ण मंदिर, विक्रम मंदिर, जहांगिर महाल, शहाजहाॅ॑ महल अशा अनेक वास्तू आहेत. इंग्रजांकडून त्यांचा वापर सैन्याच्या बराकी, दारूगोळा साठविण्याच्या जागा असा केला गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सिंधिया म्हणजे शिंदे राजघराण्याचा जय विलास पॅलेस पहिला. त्यात प्रवेश करण्याआधीच त्याची भव्यता जाणवते. दुतर्फा डेरेदार वृक्षांनी, हिरवळीनी, फळाफुलांनी डवरलेल्या बागा, स्वच्छ रस्ते, त्यातील पुष्करणी, पूर्वजांचे पुतळे, तोफा, स्टेट रेल्वेगाडीचे छोटे ,सुंदर डबे व इंजिन, त्या काळातली मोटार गाडी असे सारे बघत आपण राजवाड्यापाशी पोहोचतो. या राजवाड्यातील ३५ दिवाणखान्यांचे ‘जिवाजीराव म्युझियम’ बनविण्यात आले आहे. उर्वरित भाग शिंदे यांच्या वारसदारांकडून वापरला जातो. साडे सहा- सात फूट लांबीचे, पेंढा भरलेले वाघ, इंग्रज अधिकाऱ्यांसह शिकारीची छायाचित्रे, शस्त्रास्त्रे, पालख्या मेणे, डोल्या, पोहोण्याचा तलाव, जुन्या हस्तलिखित पोथ्या, पंचांगे, हस्तिदंती कोरीव कामाच्या असंख्य लहान-मोठ्या वस्तू ,इंग्लंड, बेल्जियम,इटली अशा देशोदेशींच्या अगणित वस्तू, कलाकुसरीच्या चिनी सुरया ड्रॅगनचे दिवे, काचपात्रे, धूपदाण्या, पर्शियन गालिचे, बिलोरी आरसे, चांदीच्या समया, गणेश, लक्ष्मी व इतर अनेक मूर्ती गतवैभवाची झलक दाखवितात.
दरबार हॉलला जाताना मधल्या चौकात संपूर्ण काचेचे असलेले भव्य कारंजे आहे. दरबार हॉलला जाण्यासाठी डावी- उजवीकडे वर जाणारे दोन जिने आहेत. त्या जिन्यांचे एका बाजूचे सर्व खांब बेल्जियम काचेचे आहेत. जवळजवळ ६० फूट रुंद व १०० फूट लांब असलेल्या दरबार हॉलच्या छताला मध्ये आधार देणारा एकही खांब नाही. कडेच्या भिंतींवर सारे छप्पर तोलले आहे. कडेचे स्तंभ, भिंती सारे रंगविण्यासाठी १४ मण म्हणजे ५६० किलो सोने वापरले आहे. सर्वात आश्चर्य म्हणजे दरबार हॉलच्या छताला टांगलेली दोन अप्रतिम झुंबरं! प्रत्येकी साडेतीन टन वजन असलेली, २५० इलेक्ट्रिक दिव्यांनी सजलेली ही झुंबरं बेल्जियमहून तुकड्या- तुकड्यांनी आणून इथे जोडली आहेत. झुंबरं लावण्याआधी सात हजार किलो वजन पेलण्याएवढे छत मजबूत आहे ना ही परीक्षा कशी केली असेल? आठ पुष्ट हत्ती खास मार्ग उभारून एकाचवेळी छतावर उभे करण्यात आले. या कसोटीला ते छत उतरले तेव्हा बाकीचे बांधकाम केले गेले. अशी झुंबरे जगात कुठेही नाहीत. जमिनीवर घातलेला अखंड ,अप्रतिम रंगसंगती व डिझाईनचा गालीचा, ग्वाल्हेर तुरुंगातील कैद्यांनी तिथेच बसून विणलेला आहे. या कामासाठी बारा वर्षे लागली. एका कलंदर कलावंताने हे काम त्यांच्याकडून करवून घेतले आहे.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १५ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️
कार्तिकातल्या स्वच्छ निळ्या आकाशाच्या तळ्यात, अष्टमीच्या शुभ्र चंद्राची होडी विसावली होती. हवीहवीशी वाटणारी सुखद थंडी अंगावर शिरशिरी आणत होती. लांबरुंद, उतरत्या दगडी पायर्यांवर बसून आम्ही समोरचा, पाचशे वर्षांपूर्वीचा ग्वाल्हेरचा किल्ला निरखत होतो. तेवढ्यात दिवे मालवले गेले. त्या नीरव शांततेत सभोवतालच्या झाडीतून घोड्यांच्या टापा ऐकू येऊ लागल्या. धीर-गंभीर आवाजात, किल्ल्यावर आणि सभोवती टाकलेल्या प्रकाशझोतात इतिहासाची पाने आमच्यापुढे उलगडली जाऊ लागली.
राजा मानसिंह याने इसवीसन १४८६ ते १५१६ या काळात तांबूस घडीव दगडात या किल्ल्याचं बांधकाम केलं.( हा राजा मानसिंह, तोमर वंशातील आहे. रजपूत राजा मानसिंह, ज्याची बहीण अकबर बादशहाला दिली होती तो हा नव्हे). गुप्तकाळातील म्हणजे इसवी सन ५३० मधील शिलालेख येथे सापडला आहे. गुप्त, परमार, बुंदेले, तोमर, चौहान, लोधी, मोगल, मराठे, इंग्रज अशा अनेक राजवटी येथे होऊन गेल्या. तलवारींचे खणखणाट, सैन्याचे, हत्ती- घोड्यांचे आवाज, राजांचे आदेश, जखमींचे विव्हळणे, शत्रूपासून शीलरक्षणासाठी राण्यांनी केलेला जोहार असा सारा इतिहास ध्वनीप्रकाशाच्या सहाय्याने जिवंत होऊन आमच्यापुढे उभा राहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी हा किल्ला पाहताना काल पाहिलेला इतिहास आठवत होता. रुंद, चढणीचा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जवळ- जवळ तीन किलोमीटर लांब पसरलेल्या या किल्ल्याला ३५ फूट उंचीची मजबूत तटबंदी आहे. त्यात सहा अर्धगोलाकार बुरुज बांधलेले आहेत. बुलंद प्रवेशद्वारावर केळीची झाडे, बदकांची रांग, सुसरींची तोंडे, घोडे ,हत्ती अशा शिल्पाकृती आहेत. काही ठिकाणी निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगातील मीनायुक्त रंगकाम अजून टिकून आहे. किल्ल्याच्या आतील ‘मान मंदिर’ हा राजवाडा हिंदू स्थापत्यशैलीचा अजोड नमुना आहे. राजा मानसिंह याच्या कारकिर्दीमध्ये राजाश्रयामुळे गायन, वादन, नर्तन अशा सार्या कलांची भरभराट झाली. अशी कथा सांगतात, की राजा एकदा शिकारीला गेलेला असताना त्याने, दोन दांडग्या म्हशींची झुंज, नुसत्या हाताने सोडविणाऱ्या देखण्या गुजरीला पाहिले. राजा गुजरीच्या प्रेमात पडला. तिलाही राजा आवडला होता. गुजरीने विवाहासाठी तीन अटी घातल्या. एक म्हणजे ती पडदा पाळणार नाही. सदैव म्हणजे रणांगणावरसुद्धा राजाबरोबरच राहील आणि तिच्या माहेरच्या राई गावातील नदीचे पाणी ग्वाल्हेरमध्ये आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. राजाने गुजरीच्या या तीनही अटी मान्य करून तिच्याशी विवाह केला व तिचे नाव मृगनयनी ठेवले. मृगनयनीला संगीतात उत्तम गती होती. राजाही संगीताचा मर्मज्ञ होता. शास्त्रीय संगीतात सुप्रसिद्ध असलेलं ‘ग्वाल्हेर घराणं’ या राजाच्या काळात उदयाला आलं. गानसम्राट तानसेनही इथलाच! मानसिंहाने त्याला अकबराकडे भेट म्हणून पाठविले. तानसेनचे गुरू, स्वामी हरिदास यांच्या स्मरणार्थ अजूनही इथे दरवर्षी संगीत महोत्सव साजरा होतो .
‘मान मंदिर’ या राजवाड्यात गतवैभवाची साक्ष मिरविणारे चाळीस लांबरुंद दिवाणखाने आहेत. गायन कक्षातील गाणे शिकण्यासाठी, ऐकण्यासाठी भोवतालच्या माडीमध्ये राणी वंशाची सोय केली आहे. दरबार हॉल, शयनकक्ष,मसलतखाना, पाहुण्यांची जागा अशा निरनिराळ्या कामांसाठी हे हॉल वापरले जात. भिंतीवर काही ठिकाणी हिरव्या, निळ्या रंगातील लाद्या अजून दिसतात.मीना रंगातील नाजूक कलाकुसरीची जाळी दगडातून कोरली आहे हे सांगितल्यावरच समजते. महालातील भुलभुलैया या ठिकाणच्या दगडी, अंधाऱ्या पायऱ्या गाईडच्या मदतीने उतरून तळघरात गेलो. इथे पूर्वी राण्यांच्या शाही स्नानासाठी, केशराने सुगंधित केलेल्या पाण्याचा लांबरुंद हौद होता. वरच्या दगडी छतात राण्यांच्या झुल्यांसाठी लोखंडी कड्या टांगलेल्या आहेत. झरोक्यातून वायूवीजनाची सोय तसेच ताज्या, वाहत्या पाण्याचा प्रवाह येण्याची व्यवस्था आहे. तिथे असलेले दोन पोकळ पाईप दाखवून हा पूर्वीचा टेलिफोन (संदेशवहनाचा मार्ग) आहे असे गाईडने सांगितले. आता त्या स्नानाच्या हौदाचा बराचसा भाग लाद्यांनी आच्छादलेला आहे व फारच थोडा भाग जाळीच्या आवरणाखाली आहे.
कालचक्राची गती कशी फिरेल याचा नेम नाही. इसवीसन १५१६ मध्ये इब्राहीम लोदीने ग्वाल्हेरवर ताबा मिळविला. नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि या स्नानगृहाचा म्हणजे तळघराचा वापर चक्क अंधारकोठडी म्हणून करण्यात आला. झोपाळ्यांसाठी बसविलेल्या लोखंडी कड्यात राजकैद्यांसाठी बेड्या अडकविण्यात आल्या. औरंगजेबाचा भाऊ मुराद व मुलगा मोहम्मद, दाराचा मुलगा शिको अशा अनेकांसाठी हे मृत्युस्थान बनले. जहांगीर बादशहाने शिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांनाही इथे कैदेत ठेवले होते. नंतर दोन वर्षांनी त्यांची सुटका केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी स्वतःबरोबर कैदेत असलेल्या ५२ हिंदू राजांचीही सुटका करविली. गुरु हरगोविंद यांच्या स्मरणार्थ बांधलेला ‘दाता बंदी छोड’ या नावाचा एक भव्य गुरुद्वारा किल्ल्याजवळच आपल्याला बघायला मिळतो.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ४
भूतानच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे भूतानमध्ये अनोखे जैववैविध्य आहे. अनेक प्रकारच्या वनस्पती, बेंगाल टायगर, रेड पांडा, सुसरी- मगरी, रानटी म्हशी, अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी इथे आढळतात. रक्तवर्णी पिजंट, हिमालयीन कावळा म्हणजे रॅवन अशा अनेकांचे दर्शन आम्हाला म्युझियममधील शोकेसमध्ये झाले. या छोट्याशा देशाचा ६० टक्के भाग संरक्षित जंगलांनी व्यापलेला आहे. इथल्या निसर्ग आणि प्राणी संपदेचा अभ्यास करण्यासाठी जगभरचे पर्यावरणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ भूतानला आवर्जून भेट देतात.
बौद्ध हा प्रमुख धर्म असलेल्या भूतानमध्ये लोकशाही पद्धतीचे राज्य असले तरी अजूनही लोकांच्या मनात राजा व राजघराणे यांच्याविषयी कमालीचा आदर व श्रद्धा आहे. मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे सर्वत्र स्त्री राज्य आहे. प्रत्येक दुकानाच्या काउंटरवर, रेस्टॉरन्टच्या काउंटरवर स्त्रिया असतात. विणकाम, रंगकाम, साफ-सफाई सारी कामे स्त्रिया करतात. पारंपारिक पद्धतीनुसार जमिनीची मालकी कुटुंबातल्या स्त्रीकडे असते. लग्नानंतर पती, पत्नीच्या घरी राहायला येतो व तिला घरकामात मदत करतो. लग्नानंतर पटले नाही तर स्त्री सहजतेने नवऱ्याला घटस्फोट देऊ शकते. त्यामुळे अनेक लग्न, अनेक मुले अशी परिस्थिती असते. पण कुटुंब ,समाज म्हणून त्यांचे जीवन सुखी समाधानी असते. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींपासून ऑफिसला जाणाऱ्या स्त्री पुरुषांपर्यंत सर्वजण पारंपरिक पेहराव करतात. कमरेपासून पायापर्यंत येणारे, सुंदर उठावदार डिझाइन्स व उजळ रंग असणारे लुंगी सारखे वस्त्र व त्यावर लांब हाताचे जाकीट अशा स्त्रियांच्या पोशाखाला किरा असे म्हणतात. पुरुषांचा ‘घो’ हा पोशाख गुडघ्यापर्यंत असतो .ते कातडी तळव्यांचे गुडघ्याइतके उंच बूट वापरतात.
भूतानी लोक बिनदुधाचा, मीठ घातलेला चहा पितात. त्याला सुजा म्हणतात. एकूणच भूतानी लोकांचे सपक जेवण आपल्या पसंतीस उतरत नाही. लाल, जाडसर तांदुळाचा भात आणि याकचे चीज गुंडाळून तळलेल्या मिरच्या आमच्या फारशा पचनी पडल्या नाहीत. डेझर्ट या जेवणानंतरच्या प्रकाराला भूतानमध्ये स्थान नाही. इथे सर्वत्र धूम्रपान बंदी आहे. सार्वजनिक स्वच्छता काटेकोरपणे जपली जाते. सगळे रस्ते चकाचक असतात. परंपरा, कला आणि धर्म यांची जोपासना कटाक्षाने केली जाते. भारतीय प्रवाशांना वेगळा व्हिसा घ्यावा लागत नाही. आपले निवडणूक ओळखपत्र पुरेसे होते. नूलटूम हे त्यांचे चलन भारतीय रुपयाशी जोडलेले आहे. त्यामुळे आपले रुपये सहज स्वीकारले जातात. धनुर्विद्या इथला राष्ट्रीय खेळ आहे. फुटबाल लोकप्रिय आहे आणि आता हळूहळू क्रिकेटचे वेडही आले आहे. हिमालयीन नद्यांच्या सुपीक खोऱ्यात भात, सफरचंद, अननस, संत्री यांचे उत्पादन होते. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जिप्सम, वीज यांची निर्यात होते. पर्यटन व्यवसाय वाढत आहे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य आहे.
भूतान हा आनंदी, समाधानी लोकांचा देश समजला जातो. देशाची प्रगती ग्रास डोमेस्टिक प्रॉडक्टवर न मोजता ती ग्रास नॅशनल हॅपिनेसवर मोजायची असा निर्णय भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी घेतला. भौतिक सुविधा व आत्मिक समाधान यांची योग्य सांगड घातली तर लोक सुखी होतील, आधुनिक सुधारणा अमलात आणायच्या पण देशाचे पाश्र्चात्यीकरण करायचे नाही असे हे धोरण आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशी गेलेले तरुण मातृभूमीच्या ओढीने परत येतात. पण आता भूतान संथगतीने बदलत आहे. बाहेरच्या जगाची चव चाखलेली तरुणाई अनेक प्रश्न आणि मागण्या घेऊन उभी आहे. रात्री इथल्या डिस्कोथेकमध्ये, पबमध्ये तरुणाईचा आवाज घुमतो.कानठळ्या बसविणारे संगीत व पाश्चात्य वेशात नाचणारी तरुणाई असते. सिगारेटच्या धुराने ,मदिरेने डिस्कोथेक भरून जातात. ज्याप्रमाणे आपल्या तरुणाईला आता जुन्या काळात जगायला आवडणार नाही तसंच भुतानच्या तरुणाईला आचार, विचार, पोशाख यांचे आधुनिकीकरण हवे आहे. विकासाची गती अधिक हवी आहे. सर्वांचे ड्रेस सारखे असले तरी गरीब-श्रीमंत ही दरी तिथे आहेच! सारे जग प्रचंड गतीने बदलत असताना, फार काळ भूतान सुधारणांचे वारे पर्वतरांगाआड थोपवून धरू शकेल असं वाटत नाही.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ३ ✈️
एअरपोर्ट व्ह्यू पॉइंटवरून आमच्या गाड्या वळणावळणाच्या सुरेख गुळगुळीत रस्त्यावरून चेले-ला पास या १३ हजार फूट उंचीवरील खिंडीकडे निघाल्या. या ठिकाणाहून पूर्व हिमालयीन पर्वतरांगा व भूतानमधील झोमोलहरी हे नंबर दोनचे उंच शिखर यांचे दर्शन घ्यायचे होते.रस्त्यापलीकडील सफरचंदाच्या बागा पांढऱ्या स्वच्छ फुलांनी बहरलेल्या होत्या. देवदार, पाईन, स्प्रुस ,फर,ओक अशी घनदाट वृक्षराजी होती.होडोडेंड्रान वृक्षांवर गडद लाल, पिवळी, पांढरी फुले फुलली होती. भूतानचे वैशिष्ट्य असलेल्या रंगीबेरंगी आणि पांढऱ्या पताका इतक्या उंचीवरही लहरत होत्या. रानटी गुलाबाची रक्तवर्णी फुले झुपक्यांनी होती. जमिनीसरशी व्हायोलेट, पिवळे, पांढरे जांभळे फुलांचे ताटवे माना उंचावून बघत होते. खालच्या दरीत पोपटी- हिरवी भातशेती डोलत होती. अकस्मात दोन्ही बाजूंना बर्फाचा सडा पडलेला दिसला. आम्ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तिथे गेलो होतो. ड्रायव्हर म्हणाला,’ हा कालच्या पावसाचा परिणाम! खरं म्हणजे इथे ऑगस्ट सप्टेंबर पासून डिसेंबर जानेवारीपर्यंत बर्फ पडते. त्यावेळी हा रस्ता बंदच असतो.’
आम्ही जसजसे उंचावर जात होतो तसतसे बर्फाचे प्रमाण वाढत गेले. दुतर्फा झाडांच्या फांद्या, रस्त्याकडेचे उंची दर्शविणारे खुणेचे बांध सारे बर्फाने माखुन गेले. इतका ताजा, शुभ्र हलका बर्फ पहिल्यांदाच पाहिला. काश्मीर, स्वित्झर्लंड, अमेरिका सगळीकडला अनुभव जमेस होता. पण ही पांढऱ्या पिसांसारखी बर्फवृष्टी न्यारीच होती. दोन्ही बाजूच्या हिरव्या वृक्षांच्या फांद्यांचे हात गोऱ्या- गोऱ्या बर्फाने झाकले जात होते. जणू पांढरे फ्रीलचे फ्रॉक घालून हिमपऱ्या अवतरल्या होत्या. त्यांच्या टोप्यांवर लाल- गुलाबी, निळे- जांभळे फुलांचे तुरे होते. आणि पायात रंगीबेरंगी फुलांचे बूट होते. फांद्यांच्या हातांवरून ओघळणारी बर्फफुले आम्हाला दोन्ही हातांनी बोलावीत होती. त्यांचे आमंत्रण सहर्ष स्वीकारून बर्फात खेळायला उतरलो. इतके हलके, स्वच्छ पांढरे बर्फ होते की त्यावर रंगीत सरबत न घालताच बर्फाचा छोटा गोळा तोंडात सरकवला.१३००० फुटांवरील चेलेला पास पर्यंत पोहोचलो पण दरीतून वर येणारे धुक्याचे पांढरे ढग आणि बर्फवृष्टी यामुळे समोरील पर्वतरांगा अस्पष्ट झाल्या होत्या. एकमेकांवर बर्फ उडविण्यात, बर्फाशी खेळण्यात वेळेचे भान राहिले नव्हते पण ड्रायव्हर्सनी परतण्याची सूचना केली .त्यांची सूचना किती योग्य होती ते परतीच्या वाटेवर लक्षात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे बर्फ भराभर वाढत चालले होते. येताना दिसलेले उतरत्या छपराचे घर अर्धेअधिक बर्फात बुडाले होते. बर्फाच्या रांगोळीमुळे रस्ता झाकून गेला होता. थोड्यावेळाने बर्फ कडक होऊन गाडीचे टायर फसण्याची शक्यता होती. पण अगदी ‘जी भरके जीवनभरका बर्फीला माहोल लूट लिया.’
आनंदाने ओंजळी भरून गेल्या होत्या. सकाळी निसर्ग आणि मानव यांच्यातील चित्तथरारक जुगलबंदी अनुभवली. आता निसर्गाच्या हिमकांती सौंदर्याचा साक्षात्कार अनुभवला. आणि रात्री जेवणानंतर रसिल्या संगीताने मन तृप्त झाले. आमच्या ग्रुपमध्ये पुण्याच्या ‘छंद’ संस्थेचे कलाकार होते. त्यांनी जेवणानंतर शांताबाई शेळके आणि मंगेश पडगावकर यांच्या सकस काव्याची मैफल जमवली. गझला सादर केल्या. साथीला डायनिंग टेबलाच्या तबल्याचा ठेका होता. त्याला तोंडी पार्श्वसंगीताची, उत्कृष्ट निवेदनाची जोड होती. भू-तानमधील रात्र सुरेल तानांनी नादमयी झाली.
टकसंग मॉनेस्ट्रीला ‘टायगर्स नेस्ट’ असे म्हटले जाते. पारो व्हॅलीतली ही मॉनेस्ट्री साधारण तीन हजार फूट उंचीवर एका अवघड कड्यावर बांधलेली आहे. भूतानमधील एका दैत्याचा नाश करण्यासाठी आठव्या शतकात गुरू रिंपोचे वाघाच्या पाठीवर बसून उड्डाण करून इथे आले. दैत्य विनाशानंतर त्यांनी इथल्या गुहेत तीन महिने ध्यानधारणा केली अशी दंतकथा आहे. इसवी सन १६९२ मध्ये इथे मॉनेस्ट्री बांधण्यात आली. बुद्धाची विविध भावदर्शी शिल्पे येथे आहेत. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाचे दर्शन घेण्याची प्रत्येक भूतानी व्यक्तीची आकांक्षा असते. अनेक परदेशी प्रवासीही काठीच्या सहाय्याने हा अवघड ट्रेक पूर्ण करतात. टायगर नेस्टच्या पायथ्याशी उभे राहून, जाऊन- येऊन सहा तासांचा असलेला हा प्रवास आम्ही माना उंचावून पाहिला.
पारोच्या नॅशनल म्युझियममध्ये भूतानी संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज, समूहनृत्यासाठीचे विविध वेश यांचे जतन केले आहे. रेशमी कापडावरील थांका चित्रकला, वेगळ्या प्रकारच्या कागदावरील पेंटिंग्जचे स्क्रोल पहिले. धनुष्यबाण, शिरस्त्राण, पतंग याचबरोबर घोड्याचे शिंग व घोड्याचे अंडे अशा कधीही न ऐकलेल्या वस्तूही तिथे आहेत.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग २ ✈️
पुनाखा व्हॅली इथे जाताना दहा हजार फूट उंचीवरील दो_चुला पास (खिंड ) इथे उतरलो. इथले चार्टेन मेमोरियल म्हणजे छोटे गोलाकार १०८ स्तूप सैनिकांचे स्मारक म्हणून उभारलेले आहेत. इथून हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचे नयनमनोहर दर्शन होते. पुढे घाटातून उतरत जाणारा वळणावळणांचा रस्ता लागला. छोट्या छोट्या घरांचे पुंजके दरीभर विखुरलेले आहेत. पुनाखा ही १६३७ पासून १९३७ पर्यंत म्हणजे अडीचशे वर्षाहून अधिक काळ भूतानची राजधानी होती.फोचू आणि मोचू या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे सुरम्य स्थान आहे. इथे मोनेस्ट्री व त्याला जोडून लाकडी बांधणीचा कलाकुसरीने सजलेला देखणा राजवाडा आहे. अजूनही राजघराण्यातील विवाह इथे संपन्न होतात. इथली थांका म्हणजे रेशमी कापडावर धार्मिक रीतिरिवाजांचे चित्रण करणारी चित्रे अजूनही आपले रंग टिकवून आहेत. जपान, कोरिया, बँकॉक अशा अनेक देशातील प्रवासी बुद्ध दर्शनासाठी आले होते. छोटी मुले भिक्षू वेष परिधान करून बौद्ध धर्माचे शिक्षण घेत होती. नद्यांच्या संगमावर कलापूर्ण लाकडी पूल उभारला आहे.
पुनाखाहून पारो व्हॅलीला जाताना वाटेत अनेक ठिकाणी संत्री, लाल सोनेरी सफरचंद आणि याकचे चीज विक्रीला होते. या पारो व्हॅलीमध्ये भाताचे उत्तम पीक येते. जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. उंचावरील हॉटेलच्या पायऱ्या चढून गेलो. गरम- गरम जेवण मिळाले. सकाळी एका पक्ष्याच्या मधुर आवाजाने जाग आली. हिरवागार कोट आणि बर्फाची हॅट घातलेली पर्वत शिखरे कोवळ्या उन्हात चमकत होती. आवरून पारो एअरपोर्ट पॉईंटवर पोचलो. आम्ही उभे होतो त्या उंच कड्यावरून संपूर्ण एअरपोर्ट दिसत होता. कड्याखाली पारो-चू नदी खळाळत वाहत होती. नदीकाठाला समांतर सिमेंट कॉंक्रिटचा दहा फूट रुंद रस्ता होता. त्याला लागून असलेल्या हिरवळीच्या लांबट पट्ट्यावर एअरपोर्ट ऑफिसच्या दोन लहान इमारती होत्या. त्यांच्या पुढ्यात छोटासा रनवे. पलीकडील हिरव्या लांबट पट्ट्यावर असलेल्या दोन- तीन छोट्या इमारती, त्यांच्यामागच्या डोंगर उतरणीला टेकून उभ्या होत्या.
‘वो देखो, आ गया, आऽऽगया’ ड्रायव्हरने दाखविलेल्या दिशेने आमच्या नजरा वळल्या. उजवीकडील दोन डोंगरांच्या फटीतून प्रखर प्रकाशझोत टाकीत एक विमान एखाद्या पंख पसरलेल्या परीसारखे अवतीर्ण झाले आणि एका मिनिटात डावीकडील दोन डोंगरांच्या फटीत अदृश्य झाले. आश्चर्याने डोळे विस्फारलेले असतानाच, यू टर्न घेऊन ते विमान माघारी आले आणि पारो एअरपोर्टच्या छोट्याशा धावपट्टीवर अलगद टेकले. घरंगळत थोडेसे पुढे जाऊन विसावले. उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून आम्ही वैमानिकाच्या कौशल्याला दाद दिली. चारी बाजूंच्या हिरव्या- निळ्या डोंगररांगांच्या तळाशी विमान उतरले तेव्हा एखाद्या हिरव्या कमळावर पांढरेशुभ्र फुलपाखरू पंखावरील, पोटावरील लाल काळे ठिपके मिरवत डौलदारपणे बसल्यासारखे वाटले.
पारोच्या खोल दरीतील हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील सर्वात लहान विमानतळ आहे. प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ सर्व जगात आव्हानात्मक समजला जातो. एकच छोटा रनवे असलेल्या या विमानतळावर ‘ड्रक एअर’ या भूतानच्या मालकीच्या विमानकंपनीची दिवसभरात फक्त तीन ते चार विमाने बँकॉक, नेपाळ, कलकत्ता, मुंबई इथून येतात. सर्व उड्डाणे दिवसाउजेडीच करण्याचा नियम आहे. एअरपोर्ट ऑफिस दुपारी तीनला बंद होते. या विमानांचे पायलट विशेष प्रशिक्षित असतात. जवळजवळ आठ हजार फूट उंचीवर हा विमानतळ आहे. अठरा हजार फूट उंच पर्वतरांगातून विमान अलगद बाहेर काढून ते डोंगरांच्या तळाशी १९८० मीटर्स एवढ्याच लांबीच्या रनवेवर उतरविणे आणि तिथून उड्डाण करणे हे निःसंशय बुद्धीकौशल्याचं, धाडसाचं काम आहे.जगभरातील फक्त आठ-दहा पायलट्सना इथे विमान चालविण्याचा परवाना आहे. वर्षभरात साधारण तीस हजार प्रवाशांची वाहतूक होते आणि अर्थातच या सेक्टरचे विमान तिकिटही या साऱ्याला साजेसे महाग असते.
एक चित्तथरारक घटना चक्षूर्वैसत्यम अनुभवून आम्ही गाडीत बसण्यासाठी वळलो. विमान उतरत असतानाच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. तसा तो काल संध्याकाळपासून थांबून थांबून पडतच होता. पावसामुळे बोचरी थंडी वाढली होती. डोळे भरून समोरचे दृश्य मनात, कॅमेऱ्यात साठवून आम्ही गाडीत बसणार तो काय आश्चर्य, लागोपाठ दुसरे विमान आले. त्याचे स्वर्गावतरण होऊन ते हँगरला जाईपर्यंत तिसरे विमानसुद्धा आले. आनंदाश्चर्यात आम्ही बुडून गेलो.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग १
पूर्व हिमालयाच्या दक्षिण उतारावर तिबेट आणि भारत यांच्यामधील छोट्याशा जागेत वसलेला भूतान हा एक चिमुकला देश! चिमुकला म्हणजे किती? जेमतेम आठ लाख लोकवस्ती असलेल्या, लांबट- चौकोनी आकाराच्या भूतानचा विस्तार ४७००० चौरस किलोमीटर म्हणजे आपल्या केरळ राज्याएवढा आहे.
मुंबईहून बागडोगरा इथे विमानाने पोहोचलो. पश्चिम बंगालमधील बागडोगरा हे भारतीय लष्कराचे मोठे ठाणे आहे. बागडोगरापासून जयगावपर्यंतचा बसचा प्रवास सुरम्य होता. सुंदर गुळगुळीत रस्ते, दोन्ही बाजुला दाट झाडी, लांबवर पसरलेले काळपट- हिरवे चहाचे मळे, भातशेती, शेलाट्या, उंच सुपार्या असा हिरवागार देखणा परिसर आहे. जयगाव हे भारताच्या सीमेवरील शेवटचे गाव संपले की एका स्वागत कमानीतून फुन्तशोलींग या भूतानच्या सरहद्दीवरील गावात आपण प्रवेश करतो. या प्रवेशद्वारातून वाहनांची सतत ये-जा असते. भूतानी वेशातील गोऱ्या, गोल चेहऱ्याच्या, शांत, हसतमुख ललनांनी हॉटेलमध्ये स्वागत केलं. लिफ्ट बंद असल्याने त्या सडपातळ, सिंहकटी पण काटक ललनांनी आमच्या सर्वांच्या अवजड बॅगा तिसऱ्या मजल्यावर पटापट वाहून नेल्या.
भूतानची राजधानी ‘थिम्पू’ इथे निघालो होतो. स्क्रूसारखा वळणावळणांचा, संपूर्ण घाटरस्ता आहे. दुतर्फा साल, महोगनी, शिरीष अशी घनदाट वृक्षराजी आहे. मध्येमध्ये लाल, पिवळी ,पांढरी रानफुलं आणि खळाळणारे झरे आपले स्वागत करतात. घाटरस्त्यावरील वाहतूक अगदी शिस्तीत चालली होती. उंचावरच्या चुखा या गावात चहापाण्याला थांबलो. हॉटेलमधून स्वच्छ पाण्याची चुखाचाखू ही नदी दिसत होती. इथे हैड्रॉलिक पॉवर प्रोजेक्ट आहे. भूतानमध्ये हैड्रोइलेक्ट्रिक पॉवरची मोठ्या प्रमाणावर निर्मिती व निर्यात होते. ही वीज विकत घेण्यात भारताचा पहिला नंबर आहे.
दिव्यांनी उजळलेल्या राजधानीच्या शहरातील दुमजली उंचीएवढ्या बिल्डिंग्जवर लाकडी महिरपी उठावदार रंगाचे रंगविल्या आहेत. सरकारी नियमांप्रमाणे सर्व इमारती, राजवाडे, मॉनेस्ट्री यांचे बांधकाम पारंपरिक डिझाईन व स्थापत्यशास्त्रानुसार करावे लागते. भूतानमधील बहुतेक लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. सातव्या शतकात तिबेटमधून आलेल्या लामाने इथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. किंग जिगमे दोरजी वांगचुक यांच्या स्मरणार्थ १९७४ साली उभारलेले मेमोरिअल चार्टेन हा भुतानी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. या राजाने परंपरा आणि आधुनिकता यांची योग्य सांगड घातली. इतर देशांशी मैत्री जोडली. भूतानला जगाची दारे उघडी करून दिली. म्हणून या राजाबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे. स्मारकाच्या ठिकाणी बुद्धाचा खूप मोठा पुतळा आहे. त्याच्या पुढ्यात वाटीसारख्या आकाराची तुपाची निरांजने तेवत होती. भाविक लांबट- गोल तांब्याची धर्मचक्रे फिरवत होते. त्यावर काही अक्षरे लिहिलेली होती.
चीन ने भेट दिलेली १७० फूट उंचीची ब्राँझची बुद्धमूर्ती(चंचुप्रवेश?) थिम्पू मधील कुठल्याही ठिकाणांहून दिसते. एका उंच डोंगरावरील या मूर्तीभोवतालचे बांधकाम सुरू होते. तिथून दूरवरच्या हिमालयीन पर्वत रांगा दिसत होत्या.टकीन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. बकरीचे तोंड आणि गायीसारखे अंग असलेला हा प्राणी टकीन रिझर्वमध्ये जाऊन पाहिला. तिथेच हातमागावर विशिष्ट प्रकारे कापड विणण्याचे प्रात्यक्षिक पाहिले.या हँडीक्राफ्ट आवारात एक सुंदर शिल्प आहे. एका झाडाखाली उभ्या असलेल्या हत्तीच्या पाठीवर एक माकड बसलेले आहे. माकडाच्या पाठीवर ससा आणि त्याच्या पाठीवर एक पक्षी बसलेला आहे. जमिनीवरील बलाढ्य प्राणी, झाडांवरील प्राणी, बिळात राहणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी ही एकमेकांवर अवलंबून असलेली एक निसर्गसाखळी आहे. या सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने रहाणे, झाडावरील फळे मिळविणे असे जगण्याचे साधे ,सोपे, सरळ तत्वज्ञान यात दडलेले आहे. ही चित्राकृती पुढे अनेक शिल्प, भरतकाम, चित्रकला यात वारंवार दिसत होती. आणखी एक वेगळेपण म्हणजे पुरुष लिंगाचे(Phallus–फेलस) चित्र बिल्डींगच्या, हॉटेलच्या दर्शनी खांबांवर, मॉनेस्ट्रीच्या बाह्य भिंतींवर रेखाटलेले असते व ते शुभ मानले जाते. दुकानात अशी चित्रे,की-चेन्स विकायला असतात. निसर्गातील सृजनत्वाचे ते प्रतीक मानले जाते.
हँडीक्राफ्ट स्कूलमध्ये बुद्ध धर्माशी संबंधित अनेक वस्तू, पेंटिंग, १२ तोंडे आणि २४ हात असलेली देवीची मूर्ती होती. विद्यार्थी मूर्तीकाम शिकत होते. हातमागावर विणकाम चालू होते.थिम्पू हेरिटेज म्युझियम व मिनिस्ट्री हाऊस पाहून व्हयू पॉईंटवर गेलो. तिथून दरीतली छोटी घरं आणि छोटासा पिवळसर रंगाचा राजवाडा चित्रातल्यासारखा दिसत होता. थिम्पूचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे या सबंध शहरात कुठेही ट्रॅफिक लाईट्स ( सिग्नल्स) नाहीत. वाहतूक कमी असली तरी ती अतिशय शिस्तबद्ध असते. एकाच मध्यवर्ती जंक्शनवर थोड्या उंच ठिकाणी बसून, एक पोलीस हातवारे करून वाहतुकीचे नियंत्रण करताना दिसला. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की सगळीकडे सेन्सर्स बसविलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची वाहतुकीतील बेशिस्त, चुका ड्रायव्हर करीत नाहीत.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग ७ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग ३
या तीनही बेटांवर आम्हाला कावळे सोडून पक्षी दिसले नाहीत. फार थोड्या गाई व कोंबडे दिसले. समुद्रपक्ष्यांच्या एक-दोन जाती मनुष्य वस्ती नसलेल्या पिट्टी बेटावर आहेत असं कळलं. लक्षद्वीप बेटांपैकी बंगाराम,तिनकारा,अगत्ती अशी बेटे परकीय प्रवाशांसाठी राखीव आहेत. तिथे हेलिपॅडची सुविधा आहे. इथल्या गडद निळ्या, स्वच्छ जलाशयातील क्रीडांसाठी,कोरल्स व मासे पाहण्यासाठी परदेशी प्रवाशांचा वाढता ओघ भारताला परकीय चलन मिळवून देतो.
कोरल्स म्हणजे छोटे- छोटे आकारविहीन समुद्र जीव असतात. समुद्राच्या उथळ, समशीतोष्ण पाण्यात त्यांची निर्मिती होते. हजारो वर्षांपासूनचे असे जीव त्यांच्यातील कॅल्शिअम व एक प्रकारचा चिकट पदार्थ यामुळे कोरल रीफ तयार होतात. ही वाढ फारच मंद असते. या रिफस् मुळेच किनाऱ्यांचं संरक्षण होतं. संशोधकांच्या म्हण़़ण्याप्रमाणे जागतिक तापमानवाढीमुळे आर्टिक्ट व अंटार्टिक यावरील बर्फ वितळत असून त्यामुळे जगभरच्या समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटं समुद्रसपाटीपासून केवळ एक ते दोन मीटर उंच आहेत. त्यावर डोंगर /पर्वत नाहीत तर पुळणीची वाळू आहे. या द्वीपसमूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळबेटाचा एक मनुष्य वस्ती नसलेला भाग २०१७ मध्ये समुद्राने गिळंकृत केला. आपल्यासाठी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटविणारा हा धोक्याचा इशारा आहे.
प्रवासाच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता आमची बोट कोचीन बंदराला लागणार होती. थोडा निवांतपणा होता. रोजच्यासारखे लवकर आवरून छोट्या बोटीत जाण्याची घाई नव्हती. म्हणून सूर्योदयाची वेळ साधून डेकवर गेलो. राखाडी आकाशाला शेंदरी रंग चढत होता. सृष्टी देवीने हिरव्यागार नारळांचे काठ असलेलं गडद निळं वस्त्र परिधान केलं होतं . उसळणाऱ्या पाण्याच्या लांब निर्या करून त्याला पांढऱ्या फेसाची किनार त्या समद्रवसने देवीने लावली होती.पांढऱ्याशुभ्र वाळूतील शंख, खेकडे, समुद्रकिडे त्यांच्या छोट्या- छोट्या पायांनी सुबक, रेखीव रांगोळी काढत होते. छोट्या-छोट्या बेटांवर नारळीच्या झाडांचे फ्लाॅवरपॉट सजले होते .अनादि सृष्टीचक्रातील एका नव्या दिवसाची सुरुवात झाली. आभाळाच्या भाळावर सूर्याच्या केशरी गंधाचा टिळा लागला. या अनादिअनंत शाश्वत दृश्याला आम्ही अशाश्वतांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग ६ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग २
रात्रभर प्रवास करून बोट कालपेनी या कोचीनपासून २८७ किलोमीटर्सवरील बेटाजवळ आली. आठ किलोमीटरच्या या लांबट बेटावर नारळाची असंख्य झाडं झुलत होती. शहाळ्याचा आस्वाद घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील आरामखुर्च्यांवर बसून निळा, हिरवा आसमंत न्याहाळत होतो. एकाएकी आभाळ भरून आलं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत सारे मांडवात परतले. कोकणातल्यासारख्या नारळाच्या विणलेल्या झापांच्या त्या मोठ्या मांडवात टेबल खुर्च्यांची व्यवस्था होती. थोड्या वेळाने पाऊस थांबला पण आभाळ झाकोळलेलं राहीलं. त्यामुळे कडक उन्हाचा त्रास न होता सर्वांनी वॉटर स्पोर्ट्सची मजा अनुभवली. वॉटर स्पोर्टस्साठी समोरच्या दुसऱ्या बेटावर होडीतून जावं लागलं. समोरचं बेट आणि त्याच्या शेजारचं बेट यांच्यामध्ये शुभ्र फेसाच्या लाटा अडकुन राहिल्या आहेत किंवा तिथे बर्फाचा शुभ्र चुरा भुरभुरला आहे असं वाटत होतं. नंतर तिथल्या मदतनिसाकडून कळलं की तो पांढराशुभ्र मऊ,मुलायम वाळूचा बांध तयार झाला आहे. त्याचंच एक बेट तयार झालेलं आहे. त्यावर मनुष्यवस्ती नाही.गंमत म्हणजे त्या बेटाजवळील पाणी गडद निळं होतं आणि आमची छोटी बोट हिरव्या पाण्यातून जात होती. इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व निरनिराळ्या रंगांचे लहान-मोठे मासे, सी ककुंबर यांचं दर्शन झालं.
कालपिनी बेटावर परत येऊन जेवण व विश्रांती झाली. नंतर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी नाच करून दाखविला. लुंगीचा धोतरासारखा काचा मारला होता. एका हातात लांबट चौकोनी पत्रा व दुसऱ्या हातात लाकडी दंडुका होता. ‘भारत मेरा देश है’म्हणंत नाच चालू होता. गणपतीत आपल्याकडे कोकणातील बाल्ये लोक नाचतात तसा प्रकार होता. नंतर आम्हाला तिथल्या होजिअरी फॅक्टरीत नेलं. तिथे बनविलेले टीशर्ट तसेच शुद्ध खोबरेल तेल, नारळाचे लाडू , किसलेल्या नारळाचा वाळवलेला चुरा यांची खरेदी झाली.
आज बोटीवर परतल्यावर बोटीच्या डेकवर गेलो. अंधार होत आला होता. आकाश आणि आजूबाजूचा समुद्र राखाडी- काळसर झाला होता. शुक्राची चांदणी चमचमत होती. थंडगार शुद्ध हवेमुळे प्रसन्न वाटत होतं. थोड्याच वेळात वेगाने दौडणाऱ्या बोटीच्या पाळण्यातील हलक्या झोक्यांमुळे डोळ्यावर पेंग आली.
कोचिनपासून ४०१ किलोमीटर्स दूर असलेले ‘कवरत्ती’ हे बेट लक्षद्वीपची राजधानी आहे.( आमच्या बोटीचं नावही ‘कवरत्ती’ होतं.) इथे आम्हाला काचेचा तळ असलेल्या, छोट्या दहा जणांच्या बोटीतून समुद्रात नेलं. असंख्य कोरल्स, लहान-मोठे, काळे-पांढरे, निळे, पिवळे मासे, कासवं ,शंख- शिंपले, सी ककुंबर अशी विधात्याने निर्मिलेली वेगळीच जीवसृष्टी बघायला मिळाली. दुपारी जेवण झाल्यावर म्युझिअम बघायला गेलो. समुद्री जीवांचे सांगाडे, असंख्य प्रकारची, रंगांची कोरल्स, पूर्वीची मासेमारीची साधने, होड्या, स्थानिक वापरातील वस्तू तिथे होत्या. ॲक्वेरियममध्ये शार्कसह अनेक प्रकारचे रंगीत मासे पोहत होते .इथे ‘लक्षद्वीप डायव्हिंग ॲकाडमी’ आहे.
केरळचा चेराकुलातील शेवटचा राजा चेरामन पेरुमल याच्या कारकिर्दीमध्ये लक्षद्वीप बेटावर वसाहत करण्यास सुरुवात झाली असं समजलं जातं. प्रथम हिंदू व बौद्ध लोकांची वस्ती होती. सातव्या शतकात इथे इस्लामचा शिरकाव झाला. १७८७ मध्ये टिपू सुलतानाच्या ताब्यात इथल्या पाच बेटांचे प्रशासन होते. १७९९च्या श्रीरंगपट्टनमच्या लढाईनंतर ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या ताब्यात गेली. १८५४ मध्ये चिरक्कलच्या राजाने सारी बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये ‘युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप’ ची स्थापना झाली.
मुस्लिम बहुल असलेल्या या लक्षद्वीप बेटांवरील स्थानिकांचं आयुष्य तसं खडतरच आहे. नारळ भरपूर होतात. थोड्याफार केळी, टोमॅटो,आलं अशा भाज्या व कलिंगडासारखं फळं एवढेच उत्पन्न. साऱ्या जीवनावश्यक गोष्टी कोचीनहून येतात. बेटांवर बारावीपर्यंत शाळा आहेत. पुढील शिक्षणासाठी कोचीनला यावं लागतं. भारत सरकारतर्फे शिक्षण आणि आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जातात.बोटीवरील सुसज्ज हॉस्पिटल मध्ये त्यांच्या आजारांवर उपचार होतात. मोठ्या ऑपरेशनसाठी बोटीने कोचीनला नेण्यात येते. इथला ८० टक्के पुरुषवर्ग देशी-परदेशी बोटींवर काम करतो. लोक साधे, अतिशय तत्परतेने मदत करणारे आहेत स्त्रिया शिक्षित आहेत. बुरख्याची पद्धत नाही. लग्नाचा खर्च नवऱ्यामुलाला करावा लागतो. लग्नानंतर नवरामुलगा मुलीच्या घरी जातो.
बोटीवरचा स्टाफ आपली सर्वतोपरी काळजी घेतो. बोटीवरील प्रवाशांच्या केबिन्सना कुलूप लावण्याची पद्धत नाही. तसंच वॉटर स्पोर्ट्सला जाताना तुम्ही किनाऱ्यावर ठेवलेले पर्स, पाकिटं, मोबाईल यांना कसलाही धोका नाही.सारं सुरक्षित असतं. विश्वासाने कारभार चालतो.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १३ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग १
अथांग अरबी सागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डुलत होती. आता आमच्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडाना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता.( लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच)
लक्षद्वीप द्वीपसमूह हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला छत्तीस बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळमधील कोची (कोचिन /एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.
समुद्रावरील ताजा, मोकळा वारा भरभरून घेत मिनीकॉयवर उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट, लक्षद्वीप द्वीपसमूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. (आकाराने पहिला क्रमांक ऍड्रॉथ या बेटाचा लागतो.) नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५ साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून गेल्यावर अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं. तिथून रिसॉर्टला पोहोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबर्याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालत होता. सेफ्टी जॅकेट्स चढवून डुंबण्यासाठी सज्ज झालो. (समुद्रातील पोहणं, कयाकिंग, स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट व पायात रबरी बूट, चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्समुळे जखम होण्याची शक्यता असते.) समुद्रावर अनेक प्रशिक्षित ट्रेनर्स आपल्या मदतीसाठी सज्ज असतात.
किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला. पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन फतकल मारुन बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. आजूबाजूला हात घातला की तरतऱ्हेचे कोरल्स हातात येत .काहींचा आकार झाडांचा तर कांहींचा आकार फुलांचा, पानांचा, पक्ष्यांचा. कुणाला गणपती सुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या कोरल्सची संपत्ती ‘समुद्रार्पणमस्तु’ म्हणून समुद्रालाच परत केली.(कुठच्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून आणणं हा दंडनीय अपराध आहे.)
मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट, हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव खूप वेगळा होता. आकाशाच्या घुमटातून परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात उतरत होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगत शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. मदतनिसाने परतण्यासाठी कयाक वळविली तेव्हा भानावर आले.
मिनीकॉयपासून १०० किलोमीटर्सवर मालदीव बेट आहे. अर्थातच मालदीवला जाण्याची सोय किंवा परवानगी नाही. जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. ११००० लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी छोटी ११ गावे आहेत.मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा ठेवलेली असते. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे.चहा, समोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या.दर डिसेंबरमध्ये तिथे नॅशनल मिनिकॉय फेस्ट साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हव़त असतात. या बेटावर ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. इतर साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम् असली तरी या बेटावर ‘महल'(Mahl) नावाची भाषा बोलली जाते.
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ यात्रा संस्मरण ☆ पर्यटन दिवस विशेष – भारत दर्शन : सांस्कृतिक यात्रा ☆ श्री कमलेश भारतीय ☆
यात्राएं न केवल हमें बाहर ले जाती हैं बल्कि अपने अंदर झांकने का अवसर भी प्रदान करती है । यह प्रसिद्ध कथाकार निर्मल वर्मा का मानना है । उन्होंने कितने ही यात्रा वृतांत लिखे । मुझे अवसर मिला भारतीय रेल की ओर से चलाई जा रही भारत
दर्शन यात्रा में चंडीगढ से रामेश्वरम्, कन्याकुमारी, केरल व तिरूपति बालाजी की सांस्कृतिक यात्रा करने का । कहते हैं कि कश्मीर से कन्याकुमारी तक भारत एक हैं । मुझे कश्मीर की यात्रा का सुअवसर तो नहीं मिला लेकिन अंतिम छोर कन्याकुमारी तक छूने का अवसर जरूर मिल गया । मोहाली में मेरे छोटे भाई की पत्नी ने हमारे टिकट बुक करवा दिए और हमारी विवशता हो गई कि यह यात्रा करें । यह इसी वर्ष 17 मार्च की बात है । बस ,दिन रात दोनों बहनों में फोन पर यात्रा की तैयारियों को लेकर चर्चा होती रहती । खैर , हम 16 मार्च को मोहाली पहुंच गये । ताकि समय पर दूसरी सुबह भारत दर्शन की रेल में सवार हो सकें ।
अभी सुबह का अंधेरा था जब हमने भाई के पड़ोसी की कार में सामान ठूंसा और चंडीगढ रेलवे स्टेशन की ओर चल पडे । प्रातः सात बजकर दस मिनट पर भारत दर्शन छह सौ अस्सी लोगों को लेकर रामेश्वरम की ओर चल पड़ी । हम बारह लोग एक समूह के थे और ऐसे ही अगले बारह लोग मलोया व चंडीगढ़ से थे । मज़ेदार बात कि अपने पराए हो गये और पराए अपने हो गये । यह यात्रा में ही होता है । सहयात्री बदल जाते हैं ।
लगातार तीन दिन और तीन रात्रि रेल छुक छुक करती रही । कहीं आउटर पर खड़ी रही । इस बीच भारत दर्शन की ओर से रेल के डिब्बों में ही सुबह की फीकी मीठी चाय , गर्मागर्म परांठे, पोहा , पकौड़े और तीनों समय का खाना परोसा जाता रहा । असल में यह भारत दर्शन रेल यात्रा करवाने के साथ ही आपके बाहर ठहरने और गाड़ी के अंदर खाने की व्यवस्था करती है । इसमें एक व्यक्ति का टिकट 11, 340 है । इसी में ये सुविधाएं शामिल हैं । माइक से लगातार चेतावनियां और जानकारियां दी जाती रहीं । सोते समय मोबाइल चार्ज नहीं करना , बाहर कुछ नहीं फेंकना , एक दूसरे की मदद करना आदि । एक प्रकार से गाइड की तरह भी कि रामेश्वरम् उतरने पर सिर्फ पचास रुपए में ऑटो हो जाता है और मंदिर दर्शन के मात्र पच्चीस रुपए का टिकट है । रामेश्वरम् के आने से पहले रेल समंदर के लगभग बीच से गुजरती है । कोई रेलिंग भी नहीं । सिर्फ रेल लाइन और विशाल समंदर । दिल धक् सा रह जाता है । तीन दिन तीन रात की लगभग पैंतीस सौ किलोमीटर की यात्रा के बाद रेल से उतरने का मौका मिला ।
शाम को होटल में सोये । कुछ ने कपड़े धोने में ही फुर्सत पूरी कर ली । हम छोटे से बाज़ार में घूमने निकले । बाहर से मंदिर का भव्य द्वार देखा । माला मोती की दुकानें । फटाफट चाय की रेहड़ियां । लुंगी लगाए लोग । पानी खारा । नहाने पर बाल चिपचिपाते । शैंपू लगाकर भी चिपचिपाहट दूर नहीं हुई । होटल की तीसरी मंजिल से रात को समंदर साफ , रोशनियों में डूबा समंदर देखा । नावें । सुबह के लिए आराम जरूरी था । गाड़ी बर्थ से तीन बाद सही बैड पर नींद खूब आई ।
सुबह चले रामेश्वरम् मंदिर । टिकट ली और दर्शन किए । समंदर के किनारे भी गये और फिर मंदिर में बने बाइस पवित्र कुडों के स्नान के लिए एक ब्राह्मण देवता का सहारा लेना ही पड़ा । कुंड में से बाल्टी से पानी निकाल कर लगातार स्नान होता रहा और आखिर मंदिर में ही अपनी लुंगी का पल्ला उठाकर ब्राह्मण देवता ने दक्षिणा मांगते कहा : आप लोगों के चलते ही परिवार पलता है । मैंने जल्दी से पैसे दिए और सपरिवार बाहर निकल आया । ये बाइस कुंड देश के सभी तीर्थों का पवित्र जल लिए हुए हैं ।
बाहर निकलते ही एक ऑटो वाला चिपक गया तो बस चिपक ही गया । हमने कहा कि भई, अभी नाश्ता करेंगे , होटल में गीले कपड़े बदलेंगे पर वह तो टलने को तैयार ही नहीं था । लगभग डेढ़ घंटे बाद नाश्ता पानी लेकर ऑटो में सवार हुए । लगभग बीस किलोमीटर दूर धनुष कोटी गांव की ओर । जो गांव जरूर हैं पर वहां कोई मकान नहीं बना सकता । सिर्फ पुराने खंडहर हैं । सन् 1964 में समंदर ने इसे लील लिया था । उसके बाद से यहां आबादी नहीं है । सिर्फ रामसेतु देखने जाते हैं । चिलचिलाती धूप और गर्म रेत पर चल कर कुछ फोटो लिए । आइसक्रीम खाई और चल दिए । रास्ते में विभीषण मंदिर देखा । वहां जानकारी लिखी गयी हैं कि यहीं रामचंद्र ने विभीषण का राजतिलक किया था । बाहर निकल नारियल पानी का आनंद लिया और कच्ची गिरी भी खूब खाई । मात्र बीस रुपए का नारियल जो हिसार तक आते आते चालीस का हो जाता हैं ।
अंत में पूर्व राष्ट्रपति ए पी जे अब्दुल कलाम के आवास पर ऑटो रोका । बाहर बड़े बड़े बोर्ड लगे हैं । पहली मंजिल पर म्यूजियम है । दूसरी पर मोती माला व गिफ्ट्स का शोरूम । कलाम के बड़े भाई सबसे निचली मंजिल पर रहते हैं । मिलने की इच्छा थी पर वे आराम कर रहे थे । अधूरी इच्छा से लौट आए । फिर होटल और सामान उठा कर रेलवे स्टेशन की ओर भागे ।
रामेश्वरम से चल कर गाड़ी मदुरै की ओर बढ़ी । मीनाक्षी मंदिर के लिए । दूसरे दिन मदुरै में थे । फिर वही कतार । वही टिकट । वही इंतज़ार । मीनाक्षी मंदिर का शिल्प बहुत खूबसूरत है । पचास का टिकट लिया तब भीड़ से बाहर आए । कुछ खरीदारी । कुछ जानकारी । फिर प्लेटफॉर्म की ओर । यहां थोड़ी परेशानी उठानी पड़ी क्योंकि रेल को देरी हो रही थी और बच्चों को मच्छर काट रहे थे । यात्री शिकायत करने गये तब जाकर गाड़ी प्लेटफॉर्म पर लगी । यात्रा में कुछ परेशानी तो उठानी ही पड़ती है । इसके बिना भी यात्रा का क्या मज़ा ? सब मीठा मीठा थोड़े ही मिलेगा ?
तीसरा पड़ाव केरल का त्रिवेन्द्रम रहा । पहले आयुर्वेद का शान्तिगिरी आश्रम दिखाया । सफेद संगमरमर से खिलते हुए कमल की कल्पना साकार की गयी है । नाम के अनुरूप शांति । पर हमारे यात्री काजू देख कर तोड़े बिना नहीं रहे । अशांति कर ही दी ।
वहां से बीच पर ले जाया गया । समंदर की लहरें किनारे पर ठाठें मारती आतीं और लौट जातीं । किनारे कश्ती और सुरक्षा कर्मचारी । लोग फिर भी लहरों से अठखेलियां करने जाते ।
त्रिवेन्द्रम के पद्मनाभ मंदिर के नियमों के अनुसार सिर्फ लुंगी लगाकर ही दर्शन किए जा सकते हैं । बस से उतरते ही सब लुंगियां खरीदने में जुट गये । फिर धर्मशाला में स्नान और वही लंबी कतार । धक्के पे धक्का । जय जयकार । गर्मी । छोटे बच्चों के रोने के स्वर ।
पद्मनाभ मंदिर के बाहर पांचों पांडवों की प्रतिमाएं लगी हैं । काफी बड़ी बड़ी । इनका क्या संबंध है । किसी ने नहीं बताया । त्रिवेन्द्रम् से रेल चली कन्याकुमारी की ओर । देश के अंतिम छोर । उसके बाद सिर्फ समुद्र ही समुद्र । रात के समय थके हारे पहुंचे । सुबह-सुबह सूर्योदय देखना है । पर चार बजे से उठाना शुरू किया । परिवार नहीं जागा और सूर्योदय को होना था , सो हो गया । हम वंचित रह गये । होटल के गेट पर एक बूढ़ी महिला दही बेच रही थी । जिस दिन से घर से निकले दूध दही देखा ही नहीं । चटपट दो गिलास दही खरीदकर पीया । सभी दही पर टूट पडे । शायद एक घंटे के भीतर सारा दही बिक गया । नाश्ता किया और फिर निकले कन्याकुमारी के दर्शन करने । बाजार खूब सजा भरा । प्रोफेशनल फोटोग्राफर पिंड नहीं छोड़ते । पीछे लगा लेते हैं । हार कर कुछ फोटो उनसे भी करवाए । समंदर लहराता , लहरें चट्टानों से टकरातीं । विवेकानन्द स्मारक । गांधी स्मारक । पर कोई गांधी साहित्य बिक्री के लिए उपलब्ध नहीं । भारत माता की प्रतिमा भी लगी है बाहर लाॅन में । बच्चे हिम्मत करके वोट में चले गये विवेकानन्द स्मारक देखने । हम पति पत्नी हिम्मत नहीं जुटा पाए । शाम को बच्चों के साथ निकले सूर्यास्त देखने । खूब भीड़ । अलग अलग राज्यों के लोग । चाय की चुस्कियां और साथ में केले के पकौड़े । आखिर सूर्यास्त हुआ । धीरे-धीरे सूर्यदेव समुद्र में चले गये । डुबकी लगा कर । आराम कर दूसरी सुबह फिर तरोताज़ा होकर आएंगे । यही मनुष्य का कर्म है । चरैवेति चरैवेति ।
अब सिर्फ अंतिम पड़ाव तिरूपति बालाजी । देश का सबसे धनी मंदिर । दिव्य दर्शन के तीन सौ रुपये की टिकट । सर्वदर्शन के लिए लम्बी कतार । हाॅल में टीवी पर रामायण । लेकिन भाषा अलग । कहानी पता है तो समझ आ रही है । बीच में खिचड़ी का प्रसाद मिल जाता है । शाम छह बजे से हाॅल में और ग्यारह बजे बाद खुलते हैं द्वार । रेलिंग की भूल भूलैया में आखिरकार दर्शन । बाहर निकलते ही लड्डू का प्रसाद और हर 70 रुपए की टिकट पर चार चार बडे बडे लड्डू । हमारे पास एक दर्जन हो गये । चलो । अब बांट सकेंगे ।
अब वापसी । वही तीन रात दो दिन लम्बी यात्रा ।
चंडीगढ़ से चले थे तो पहले हरियाणा के स्टेशन आए । फिर दिल्ली । फिर हरियाणा , फिर राजस्थान, मध्यप्रदेश, फिर दक्षिण भारत । कितने राज्य और कितने दृश्य । कहीं सूखा । कहीं हरियाली । कहीं गेहूं कट चुकी , कहीं धान । नारियल के पेड़ , आम के फल , काजू , कटहल । कितना कुछ । कितनी बोलियां ? कितनी तरह के पहनावे । दक्षिण में फूलों की वेणी ही श्रृंगार है । उतर भारत में सोने का हार है । फूलों से मन भर जाए तो गहने किस काम के ?
हम बहुत सी भाषाएं नहीं जानते थे । सामने वाले भी नहीं समझते थे पर संकेत से सब समझ जाते । सच , दिल है हिंदुस्तानी । रामेश्वरम् हो या कन्याकुमारी या केरल सब कामचलाऊ हिंदी समझते हैं। पर्यटन ही कन्याकुमारी और रामेश्वरम् का मुख्य आय का साधन हैं । फिर हिंदी क्यों न समझें ? इसके बावजूद दक्षिण के किसी रेलवे स्टेशन पर हिन्दी समाचार पत्र नहीं मिला । कोई हिंदी पत्रिका भी नहीं मिली ।
यह भारत दर्शन एक प्रकार से सांस्कृतिक जीवन की झलक हैं । झांकी हैं हमारे हिंदुस्तान की । हमारी बोली न भी जाने , दिल की भाषा एक हैं हमारी । जब तक हमारे सांस्कृतिक रूप से जुड़े रहेंगे , तब तक भारत कश्मीर से कन्याकुमारी तक एक ही रहेगा । वापसी पर रेवाड़ी ही उतर लिए और वहां से सुबह की गाड़ी से 29 मार्च को हिसार पहुंच गये । फिर किसी यात्रा की उम्मीद में ।