सौ. पुष्पा चिंतामण जोशी
मी प्रवासीनी
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग✈️
पीटर्सबर्गजवळील पीटरहॉप हे एक अतिशय रम्य, भव्य आणि देखणे ठिकाण आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे इसवी सन १७०५ मध्ये पीटर दि ग्रेटने या जागेचा विकास करण्याचे ठरवले. दीडशे हेक्टरहून अधिक जागा व्यापलेल्या या भव्य परिसरामध्ये राजवाड्यासारख्या एक डझनाहून अधिक इमारती आहेत. ११ भव्य व सुंदर बगीचे झाडा फुलांनी, शेकडो सुंदर पुतळ्यांनी नटलेले आहेत. या बगिच्यातून २०० हून अधिक, तर्हेतर्हेची कारंजी आहेत. अप्पर गार्डन आणि लोअर पार्क यांच्या मध्यावर ग्रेट पॅलेसची वास्तु उभी आहे. पीटरहॉपपासून वीस किलोमीटर दूर असलेल्या उंच टेकड्यांवरील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी अप्पर गार्डनमधील तीन-चार मोठ्या तलावात साठविले आहे. तिथून पाईपलाईन बांधून लोअर पार्कमधील कारंज्यांमध्ये पाणी खेळविले आहे. अप्पर गार्डन लोअर पार्कपेक्षा साठ फूट अधिक उंचीवर आहे. सर्व कारंजी इलेक्ट्रिक पंपाशिवाय फक्त गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर चालतात. या वॉटर सिस्टिमचे सर्व डिझायनिंग पीटर दि ग्रेटने स्वतः केले होते. अप्पर गार्डन व लोअर पार्क यांच्या मध्यावरील ग्रेट पॅलेसच्या पुढ्यात अतिशय भव्य असा ‘ग्रेट कास्केड’ आहे. या ग्रेट कास्केडपर्यंत पोहोचण्यासाठी दोन बाजूंना उतरती हिरवळ आणि दोन्हीकडे सतरा पायऱ्यांची उतरण आहे . पायर्यांवरुन झुळझुळ पाणी वाहत असते. पायर्यांच्या कडेला अतिशय सुंदर अशा ४० शिल्पाकृती आहेत. दोन्हीकडील पायर्यांच्या मधोमध, एका मोठ्या पॉऺ॑डमध्ये, ग्रॅनाईटच्या खडकावर उंच उसळणाऱा पांढराशुभ्र जलस्तंभ आहे. त्याच्या मागे, तसेच उसळणारे पण थोडेसे लहान फवारे आहेत.ग्रॅनाइट खडकाच्या चारही बाजूला सिंह, घोडा यांच्या तोंडाच्या शिल्पाकृती आहेत .त्यातून पाण्याचे फवारे उडत असतात. पॉ॑डला जोडून असलेला कॅनाल,सी कॅनालने, गल्फ ऑफ फिनलॅ॑डला जोडलेला आहे.पॉ॑डमधून उतरत जाणाऱ्या कॅनालच्या दोन्ही बाजूंना गोलाकार दगडी बशांमधून कारंज्यांच्या अर्धकमानी उसळत असतात. ग्रेट पॅलेसच्या पुढ्यात उभे राहिले की कारंजी,बागा, पुतळे आणि गल्फ ऑफ फिनलॅ॑डपर्यंत गेलेला कॅनाल व त्यापुढे दिसणारा निळा समुद्र हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.
ग्रेट कॅस्केड’च्या उजव्या बाजूच्या भव्य बागेत एका किलवरसारख्या आकाराच्या पॉ॑डमध्ये, शक्तीचे प्रतीक असलेल्या सॅमसन याचा पिळदार अंगाचा सोनेरी उभा पुतळा आहे. सॅमसन हाताने सिंहाचा जबडा फाडत आहे व त्या सिंहमुखातुन वीस मीटर उंच, पांढरा स्वच्छ, मोठा फवारा वेगाने उसळत आहे हे दृश्य नजर खिळवून ठेवते. रशियाने स्वीडनवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा पुतळा उभारण्यात आला.
ग्रेट कास्केडच्या चौथऱ्यावरील व पायऱ्यांवरील सोनेरी पुतळे तसेच सॅमसन व सिंह यांचे सोनेरी पुतळे हे प्रथम शिशामध्ये बनविण्यात आले व नंतर त्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला.१८०१ मध्ये या सर्व पुतळ्यांचे जसेच्या तसे पुनर्निर्माण करण्यात आले. त्यावेळी ब्राँझवर सोन्याचा मुलामा देण्यात आला. बागांमधून व कारंज्यांजवळ असलेले संगमरवरी अपोलो, व्हिनस, नेपच्यून या देवतांचे पुतळे , तसेच स्नान करणाऱ्या स्त्रिया, पुरुष,मुले यांचे पुतळे अतिशय देखणे आहेत. जांभळ्या, पिवळ्या, लाल रंगाच्या फुलांनी नेटक्या राखलेल्या बागा व त्यामागील घनदाट वृक्षराजी या पार्श्वभूमीवर कारंजी, पुतळे अगदी शोभून दिसत होते.
गल्फच्या किनाऱ्यावर एका बाजूला एक मजली सुंदर पॅलेस आहे. राजवाड्याचा मधला भाग तंबूसारखा उंच तर दोन्ही बाजूला असलेल्या लांब गॅलऱ्या लहान-लहान विटांनी बांधलेल्या आहेत. पीटर दि ग्रेटची लायब्ररी व त्याने युरोपातून आणलेल्या पेंटिंग्जची आर्ट गॅलरी तिथे आहे. दुसऱ्या बाजूला अलेक्झांड्रिया इस्टेट ही गॉथिक शैलीतली छोटी सुबक इमारत आहे. या दोन्ही इमारतींच्या पुढील बाजूला पाच-सहा भव्य बागा आहेत. इथे ३०० प्रकारची ३०,००० लहान मोठी झाडे आहेत. रंगीत पानाफुलांची नेटकी कापलेली ही झाडे खूप सुंदर दिसतात. या बागांमधून हरतऱ्हेची कारंजी उडत असतात. त्यातील ‘सन’ हे कारंजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या मध्यावर ब्रांझचे दोन अर्धगोल एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्या कडांना असलेल्या बारीक छिद्रातून सूर्यकिरणांसारखे पाण्याचे फवारे उडतात. विशेष म्हणजे सूर्य जसा फिरेल तसे हे ब्राँझचे मध्यवर्ती गोल फिरतात.
५०५ उसळत्या धारा असलेले पिरॅमिडसारखे एक भव्य कारंजे एका पायऱ्या-पायऱ्यांच्या चौथऱ्यावर आहे.एके ठिकाणी चौथर्यावर रोमन शैलीतील फवारे असलेले कारंजे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. एके ठिकाणी हात पंख्याच्या आकाराच्या मोठ्या कमानीसारख्या जलधारा कोसळत होत्या. छत्रीच्या आकाराच्या एका कारंज्याभोवती अनेकांनी गर्दी केली होती. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी गोल खांबावर, छत्रीच्या आकाराचे छप्पर होते. त्याला कनातीसारखे लाल हिरवे डिझाईन होते. त्या छपराला असलेल्या लहान- लहान भोकातून पावसासारख्या अखंड धारा पडत होत्या. त्या पावसामध्ये भिजण्यासाठी गर्दी झाली होती.
या बागेत कारंज्यांचा एक सुंदर खेळ बघायला व अनुभवायला मिळाला. दुपारी दोन वाजण्याच्या आधी गाइडने सर्वांना दुतर्फा झाडी असलेल्या एका रस्त्यावर कडेला उभे राहायला सांगितले. बरोबर दोन वाजता त्या फुटपाथच्या कडेला असलेल्या भोकांतून पाण्याच्या कमानी उसळल्या.त्या रस्त्यावर पाण्याची एकमेकात गुंफलेल्या धारांची कमान झाली.जेमतेम तीन मिनिटांच्या या खेळात सर्वजण चिंब भिजून गेले.
उतरत्या छपरासारखेअसलेले एक कारंजे होते. त्याच्या गच्चीचा भाग हा बुद्धिबळाच्या पटासारखा काळ्यापांढर्या ग्रॅनाईटने बनविला आहे. त्यावरील झुळझुळत्या कारंज्याच्या कडेला सुंदर शिल्पाकृती आहेत. दोन्ही बाजूच्या सुंदर पायर्या चढून वरपर्यंत जाता येते. परतताना जवळच तीन वादक अत्यंत सुरेल अशा रचना झायलोफोनवर वाजवीत होते. सभोवताली रंगीबेरंगी फुले, पाण्याचा मंद आवाज आणि त्यामध्ये एकरूप झालेले हे सूर वेगळ्या जगात घेऊन गेले.
अप्पर गार्डन मध्ये मोठमोठे तलाव, वृक्ष व फळझाडे आहेत. अप्पर गार्डनमधील पाच रिझर्वायर्समधून लोअर गार्डनमधील सर्व कारंज्यांना पाणीपुरवठा होतो. अप्पर गार्डनच्या मध्यभागी उंच चौथऱ्यावर नेपच्यून फाउंटन आहे. नेपच्यूनचा ब्राँझचा पुतळा, त्याखालील चौथऱ्यावर स्त्री-पुरुषांची, लहान मुलांची शिल्पे आहेत. सिंह मुखातून, लहान मुलांच्या तोंडातून पाण्याचा फवारे उडतात. तिथेच कडेला नेपच्यूनचा ब्रांझमधील घोड्याचा रथ आहे.
हिरव्या नानाविध छटांच्या पार्श्वभूमीवर कल्पकतेने उभारलेली ही कारंजी म्हणजे अभिजात सौंदर्यदृष्टीचे अनुपम दर्शन होते. इतकी वैविध्यपूर्ण कारंजी( शिवाय सर्व चालू स्थितीत) पाहून शरीर आणि मन त्या कारंज्यांच्या तुषारांसारखेच प्रसन्न झाले.
भाग ४ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈