श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ३४ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “माय गॉड वुईल रिइम्बर्स माय लॉस इन वन वे आॅर अदर” हे सहजपणे बोलले गेलेले माझे शब्द असे शब्दशः खरे ठरलेले होते. याच्याइतकेच ते तसे ठरणार असल्याची पूर्वकल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या सूचक स्वप्नाद्वारे मला ध्वनित होणे हेही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे, आश्चर्यकारक आणि अलौकिकही होते!!”)
हे असे अनुभव जीवनप्रवासातील माझी वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याच्या मनोमन पटणाऱ्या अंतर्ज्ञानाच्या खूणाच असत माझ्यासाठी!अशा अनुभवांच्या आठवणी नंतरच्या वाटचालीत अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत किंवा अगदी अकल्पित अशा संकटांच्या वेळीही ‘तो’ आपल्यासोबत असल्याचा दिलासाही देत असत.
जन्म-मृत्यू, पुनर्जन्म या संकल्पना आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसाठीतरी अनाकलनीय, गूढच राहिल्या आहेत. त्यासंबंधीच्या परंपरेने चालत आलेल्या समजुतींच्या योग्य आकलनाअभावी या संकल्पनांवर नकळत गैरसमजुतींची पुटं चढत जातात आणि परिणामत: या संकल्पनांमधलं गूढ मात्र अधिकच गहिरं होत रहातं.
नवे नातेबंध निर्माण करणारे जन्म जितके आनंददायी तितकेच आपल्या प्रिय व्यक्तींचे मृत्यू आपलं भावविश्व उध्वस्त करणारे. या दोन्हींच्या संदर्भातले मी अनुभवलेले सुखदु:खांचे क्षण त्या त्या वेळी मला खूप कांही शिकवून गेलेले आहेत. त्या सगळ्याच अनुभवांच्या एकमेकात गुंतलेल्या धाग्यांचं आकलन जेव्हा अनेक वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर मला अकल्पितपणे झालं त्या क्षणांच्या मोहरा आजही मी माझ्या मनाच्या तिजोरीत आठवणींच्या रूपात जपून ठेवलेल्या आहेत!!
संपूर्ण जगाच्या चलनवलनामागे अदृश्य रुपात कार्यरत असलेल्या सुविहित व्यवस्थेच्या अस्तित्त्वाची जाणीव मला करुन दिलेले ते सगळेच अनुभव आणि त्यातल्या परस्परांमधील ऋणानुबंधांची मला झालेली उकल ही माझ्या मनातील त्या त्या क्षणांमधल्या अतीव दु:ख न् वेदनांवर ‘त्या’ने घातलेली हळूवार फुंकरच ठरलीय माझ्यासाठी! या संदर्भात माझ्या आठवणीत घर करून राहिल्यात त्या माझ्या अगदी जवळच्या अतिशय प्रिय अशा व्यक्तींच्या त्या त्या क्षणी मला उध्वस्त करणाऱ्या मृत्यूंच्या काळसावल्या!आणि तरीही पुढे कालांतराने या सावल्यांनीही जन्म आणि मृत्यू या दोन्हीमधील अतर्क्य अशा संलग्नतेची उकल करुन माझ्या मनात प्रदीर्घकाळ रुतून बसलेल्या दु:खाचं हळूवार सांत्वनही केलेलं आहे.
२६ सप्टेंबर १९७३ची ती काळरात्र मी अजूनही विसरलेलो नाहीय. मला मुंबईत युनियन बॅंकेत जॉईन होऊन जेमतेम दीड वर्ष झालेलं होतं. माझं वास्तव्य दादरला इस्माईल बिल्डिंगमधे माझ्या मोठ्या बहिणीच्या बि-हाडीच होतं. त्या रात्री जेवणं आवरुन साधारण दहाच्या सुमारास माझी ताई तिच्या छोट्या बाळाला थोपटून निजवत होती. माझे मेव्हणे आणि मी सर्वांची अंथरुणं घालून झोपायची तयारी करत होतो. तेवढ्यात शेजारच्या गोगटे आजोबांचा त्यांच्या लॅंडलाईनवर फोन आला असल्याचा निरोप आला. त्या काळी घरोघरी लँडलाईन फोनही दुर्मिळच असायचे. इस्माईल बिल्डिंगमधल्या पाच-सहा मजल्यांवरील चाळकऱ्यांपैकी फक्त दोन घरांमधे फोन होते. त्यातील एक असं हे गोगटे कुटुंबीयांचं घर बहिणीच्या शेजारीच होतं आणि ते माझ्या मेव्हण्यांचे लांबचे नातेवाईकही होते. मेव्हणे फोन घ्यायला धावले. इतक्या रात्री कुणाचा फोन असावा हाच विचार इकडे आमच्या डोक्यात. फोनवर बोलून मेव्हणे लगोलग परत आले ते तो अनपेक्षित धक्कादायक निरोप घेऊनच. फोन माझ्या मोठ्या भावाचा होता. माझ्या बाबांना डॉक्टरांच्या सांगण्यावरून इस्लामपूरहून हलवून पुण्याला सिव्हिल हॉस्पिटलमधे ऍडमिट केलेलं होतं. आणि आम्ही सर्वांनी तातडीने पुण्याला हाॅस्पिटलमधे लगोलग पोचावं असा तो निरोप होता! बाबांच्या काळजीने आम्ही सगळेच अस्वस्थ झालो होतो. बाबा आजारी होते, झोपून होते हे आम्हाला माहीत होतं पण तोवर येणाऱ्या खुशालीच्या पत्रांतून असं अचानक गंभीर कांही घडेल याची पुसटशी शक्यताही कधी जाणवली नव्हती. आता कां, कसं यात अडकून न पडता तातडीने निघणं आवश्यक होतं. इतक्या रात्री तातडीने निघून पुण्याला सिव्हिल हाॅस्पिटलला लवकरात लवकर पोचणं गरजेचं होतं. त्याकाळी प्रायव्हेट बसेस नव्हत्याच. इतक्या रात्रीचं एस्टीचं वेळापत्रकही माहित नव्हतं. रिझर्व्हेशन वगैरे असं शेवटच्या क्षणी शक्यही नव्हतं. त्यात बाळाला सोबत घेऊन जायचं दडपण होतं ते वेगळंच.
“तुम्ही तुमचे मोजके कपडे आणि बाळासाठी आवश्यक ते सगळं सामान घेऊन निघायची तयारी करा लगेच. ” मेव्हणे म्हणाले. “मी तुम्हाला रात्री १२ वाजता मु़ंबई-पुणे पॅसेंजर आहे त्यात दादरला बसवून देतो. आपल्या तिघांच्याही आॅफिसमधे रजेचे अर्ज देणं आवश्यक आहे. मी उद्या ते काम करुन मिळेल त्या ट्रेन किंवा बसने पुण्याला हाॅस्पिटलमधे पोचतो. ” मेव्हणे म्हणाले. त्या मन:स्थितीत मला हे सगळं सुचलंच नव्हतं. ताईच्या डोळ्यांना तर खळ नव्हता. ते पाहून कसंबसं स्वतःला सावरत मी माझी घुसमट लपवायचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.
“हे बघ, बाळ सोबत आहे आणि प्रवास रात्रीचा आहे. तरीही आता तूच धीर धरायला हवा. कारण माझ्यापेक्षा तुम्ही दोघांनी तिथं आधी पोचणं आवश्यक आहे. म्हणून तू लहान असूनही ही जबाबदारी तुझ्यावर सोपवावी लागतीय. “
“हो. बरोबर आहे तुमचं. आम्ही जाऊ. “
“सिव्हिल हॉस्पिटल स्टेशनच्या जवळच आहे. पहाटे पोचाल तेव्हा अंधार असेल. जपून जावा. “
“हो” मी म्हणालो.
‘बाबांना अचानक काय झालं असेल, त्यांना तातडीनं तिथं इस्लामपूरला दवाखान्यात न्यायचं, डॉक्टरांशी सल्ला मसलत, पुण्याला आणायचं, त्यासाठी वाहनाची सोय, पैशांची जुळवाजुळव सगळं माझ्या मोठ्या भावानं कसं निभावलं असेल? माझ्यापेक्षा फक्त दोनच वर्षांनी तर तो मोठा. त्या तुलनेत मला या क्षणी स्वीकारावी लागणारी ही जबाबदारी म्हणजे काहीच नाही’ या विचारानेच तोवर स्वतःला खूप लहान समजत असणारा मी त्या एका क्षणात खरंच खूप मोठा होऊन गेलो !!
बाबा माझ्यासाठी फक्त वडिलच नव्हते तर ते माझ्या मनात ‘तो’ रुजवायला, त्याची प्रतिष्ठापना करायला नकळत का असेना पण निमित्त ठरलेला कधीच विसरता न येणारा एक अतिशय मोलाचा असा दुवा होते! त्यांना काही होणं हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं! बाबांइतक्याच आईच्या आठवणीने तर मी अधिकच व्याकूळ होऊन गेलो. या सगळ्या दु:खापेक्षा आपलं अशा अवस्थेत तिच्याजवळ नसणंच मला त्रास देत राहिलं.
गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती. तरीही दोघांना कशीबशी बसायला जागा मिळाली. बाळाला आलटून पालटून मांडीवर घेत ताई न् मी अगदी आमच्या लहानपणापासूनच्या बाबांच्या असंख्य आठवणींबद्दलच रात्रभर बोलत राहिलो होतो.
रात्र सरली ती याच अस्वस्थतेत. भल्या पहाटे पुणे स्टेशनला गाडी थांबताच कसेबसे उतरलो तेव्हा भोवताली अजूनही मिट्ट काळोख होता. तेवढ्यात रात्रभर शांत झोप न झालेलं बाळ किरकिरु लागलं. त्याला सावरत, चुचकारत अंधारातून वाट शोधत कसेबसे सिव्हील हाॅस्पिटलच्या कॅम्पसमधे आलो तेव्हाच नेमके भुकेने व्याकूळ झालेल्या बाळाने भोकाड पसरुन रडायला सुरुवात केली. हॉस्पिटलचा मेन एंट्रन्स समोर बऱ्याच अंतरावर होता. नाईलाजाने मी त्या दोघांना घेऊन वाटेतच जवळच्या वडाच्या पारावर बसलो. ताईला इथं एकटीला सोडून उठण्याशिवाय पर्यायच नव्हता.
“ताई, तू याला दूध दे तोवर मी बाबांची रूम कुठे आहे ते पाहून येतो लगेच. चालेल?”
ती ‘बरं’ म्हणाली तसा मी उठलोच. तेवढ्यात मेन एंट्रन्स मधून एक नर्स लगबगीने बाहेर पडताना दिसली. मी तिच्याच दिशेने धावत जाऊन तिला थांबवलं.
“सिस्टर, एक काम होतं. प्लीज. “
मी पेशंटचं नाव, गाव, वर्णन सगळं सांगून त्यांना कालच इथं ऍडमिट केल्याचं सांगितलं. त्यांच्या रूमची कुठे चौकशी करायची ते विचारलं. आश्चर्य म्हणजे ती बाबांच्याच रूममधून नाईट ड्युटी संपवून दुसऱ्या नर्सला चार्ज देऊन आत्ताच बाहेर पडली होती.
“पेशंट खूप सिरीयस आहे. तुम्ही वेळ घालवू नका.. जा लगेच” ती म्हणाली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी मी पुढे धाव घेतली आणि… आणि
ताईची आठवण होताच थबकलो. तीही बाबांच्या ओढीने इथे आलेली होती. तिला तिथं तशी एकटीला सोडून स्वतः एकट्यानेच निघून जाणं योग्य नव्हतंच. मी तसाच मागे फिरलो. धावत तिच्याजवळ आलो. बाळाला उचलून घेतलं.
“ताई, चल लवकर. बाबांची रूम मिळालीय. आपल्याला लगेच जायला हवं.. चल.. ऊठ लवकर” म्हणत बाळाला घेऊन झपाझप चालूही लागलो.
आम्ही घाईघाईने रूम पर्यंत पोहोचणार एवढ्यांत माझा मोठा भाऊ दाराबाहेर डोकावून आमच्याच दिशेने पहात असल्याचं जाणवलं…
“तुमचीच वाट पहातोय, या लवकर… ” म्हणत तो धावत आत गेला पण…. पण… आम्ही बाबांजवळ पोचण्यापूर्वीच बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता… !! आम्ही त्यांच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरच उभे… तरीही त्यांच्यापासून लाखो योजने दूरसुध्दा…. !!
ही एका क्षणाची चुकामूक पुढे कितीतरी दिवस मला कासावीस करीत राहिली होती. दुःख बाबा गेल्याचं तर होतंच, पण ते साधी नजरभेटही न होता गेल्याचं दुःख जास्त होतं!
बाबांचं असं अनपेक्षित जाणं पुढे येणाऱ्या अतर्क्य अनुभवांना निमित्त ठरणार होतं. पण त्याबद्दल त्या दु:खात बुडून गेलेले आम्ही सर्वचजण त्याक्षणी तरी पूर्णत: अनभिज्ञच होतो एवढं खरं!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈