सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी)
आज १२ जून — “प्रत्येक रसिक मराठी मनावर आपला कायमस्वरूपी ठसा उमटवून गेलेले सर्वांचे लाडके आणि सर्वज्ञात व्यक्तिमत्व म्हणजे श्री. पु . ल. देशपांडे ”, हे विधान खरोखरच वादातीत आहे. आज त्यांचा स्मृतीदिन.
( ८/११/१९१९ – १२/६/२००० )
त्यांच्याविषयी काय काय आणि किती सांगावे ? – हा खरंच फार कठीण प्रश्न आहे. सर्वोत्तम विनोदी लेखक अशी जरी त्यांची प्रथमदर्शनी ओळख सांगितली जात असली तरी, चित्रपटकथा-लेखक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार , अभिनेता , हजरजवाबी वक्ता, उत्तम संवादिनी – वादक , संगीतातील दर्दी, एकपात्री नाट्यप्रयोग गाजवणारे श्रेष्ठ कलाकार, अशी स्वतःची अनेकांगी ओळख ज्यांनी स्वतःच्या चतुरस्त्र कलागुणांनी निर्माण केली होती असे “ आपले “ पु. ल. ऊर्फ भाई.
त्यांच्यासारखाच त्यांचा विनोदही चौफेर फटकेबाजी करणारा होता. तो विनोद सर्वसामान्यांना खळखळून हसवणारा तर होताच , पण योग्य तिथे अतिशय मार्मिक होता, खटकणाऱ्या गोष्टी आवर्जून अधोरेखित करणारा होता, समाजासाठी बाधक ठरू शकणाऱ्या गोष्टी नेमक्या हेरून त्याकडे लक्ष वेधायला लावणारा होता —- पण तो कायम फक्त निखळ स्वरूपाचाच असायचा, हे फार महत्वाचे, आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे. विनोदाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कुठलेही भाष्य कधी कुणाला थेट दुखवणारे नक्कीच नसायचे. पण ते जिथे पोहोचणे अपेक्षित असायचे तिथे नक्की पोहोचत असणार याची जाणकारांना मनोमन खात्री वाटायची. आणि पु. ल. यांच्या विनोदाचे, त्यांच्या विचारसमृद्धीचे, तसेच वाचा-समृद्धीचे हे खास वैशिष्ट्य होते असे नक्कीच म्हणावेसे वाटते.
आपल्या बहुतेक सर्व प्रकारच्या लिखाणातून त्यांनी वाचकांसाठी हसू आणि आनंद यांची मुक्तहस्ताने सतत उधळण केली, आणि यापुढेसुद्धा कुणीही जेव्हा केव्हा ते लिखाण वाचेल तेव्हा तेव्हा ती उधळण तशीच सतत होत राहील हे निश्चित. या लिखाणात त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा तर जणू इतक्या जिवंत आहेत की वाचतांना वाचक त्यांच्यामध्ये स्वतःलाही काही काळ विसरून जातो— ही त्यांच्या लिखाणाची ताकद आहे.
“इदं न मम“ या भावनेने जोपासलेला त्यांचा दानशूरपणाही आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे. आपण समाजाचे नक्कीच काही देणे लागतो हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी एक म्हणजे पु. ल., ही गोष्ट तर सर्वज्ञातच आहे. या हिऱ्याचा हा आणखी एक लकाकता पैलू.
त्यांनी लिहिलेले आणि प्रकाशित झालेले सर्वच साहित्य इतके सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले आहे, की त्याची यादी इथे देण्यात औचित्य यासाठी राहिलेले नाही की त्यांच्या बहुतेक सगळ्याच पुस्तकांची कित्येक रसिक वाचकांनी अक्षरशः पारायणे केली असतील. किंबहुना असा एकही मराठी रसिक वाचक नसेल, ज्याने त्त्यांचे कुठलेच लिखाण वाचलेले नाही . त्यांचे कुठलेही पुस्तक आधी वाचलेले असले तरी पुनः पुन्हा वाचावेसे वाटते, दरवेळी नव्याने वाचल्यासारखे वाटते आणि दरवेळी तितकेच उत्स्फूर्त हसवून वाचकाला फ्रेश करून टाकते.
अशा चिरस्मरणीय पद्मभूषण पु. ल. यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी अतिशय भावपूर्ण विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
“ भाषातज्ञ “ म्हणून ख्यातनाम झालेले श्री. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन.
( ५/१/१८९२ – १२/६/१९६४ )
एम.ए.बी.टी. झालेले श्री कुलकर्णी हे आधी अहमदाबाद येथे आणि नंतर मुंबईमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांनी प्राचार्य म्हणून शेवटपर्यंत काम केले. पण विशेष म्हणजे त्याच्या जोडीनेच त्यांनी मराठी भाषेसाठीही भरपूर काम केले. “ मराठी संशोधन मंडळाचे संचालक “, महाराष्ट्र सरकारच्या “ भाषा सल्लागार- मंडळा “चे अध्यक्ष , मराठी शुद्धलेखन समितीचे कार्यवाह, अशा वेगवेगळ्या पदांची जबाबदारी त्यांनी उत्तम तऱ्हेने सांभाळली होती.
१९५२ साली अंमळनेर इथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
त्यांचे वैविध्यपूर्ण प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे —-
ऐतिहासिक पत्रव्यवहार.
कृष्णाकाठची माती – आत्मचरित्र ,
पेशवे दप्तर — ४५ खंड. यासाठी सहसंपादक म्हणून काम .
भाषाशास्त्र व मराठी भाषा .
मराठी भाषा – उद्गम व विकास
मराठी व्याकरणाचे व्याकरण
मराठी व्युत्पत्तिकोश
महाराष्ट्र-गाथा — यासाठी श्री. प्र. के.अत्रे हे सहसंपादक होते .
मुकुंदराजाचा विवेकसिंधू— संपादन.
राजवाडे मराठी धातुकोष —- संपादन .
शब्द : उगम आणि विकास .
Sanskrit drama and dramatists — इंग्लिश पुस्तक.
धर्म : उद्गम आणि विकास – जी. एफ. म्यूर यांच्या “ दि बर्थ अँड ग्रोथ ऑफ रिलिजन “ या ग्रंथाचे भाषांतर.
श्री. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांना आजच्या स्मृतिदिनी मनापासून आदरांजली.
☆☆☆☆☆
संस्कृतचे प्रकांड पंडित असणारे डॉ. केशव रामराव जोशी यांचाही आज स्मृतिदिन.
( ७/३/१९२८ – १२/६/२०१२ )
संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करत असतांना, एकीकडे डॉ. जोशी यांनी ग्रंथलेखनाचेही खूप काम केले होते. काशीला राहून तिथल्या शास्त्री- पंडितांकडून त्यांनी प्राचीन व अर्वाचीन परंपरांचे अध्ययन केले होते. तसेच एम.ए. झाल्यानंतर संस्कृत विषयातच त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. पुढे नागपूर विद्यापीठात संस्कृत-विभाग प्रमुख, आणि विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. याव्यतिरिक्त, तत्वज्ञान, वेदाभ्यास, शास्त्राभ्यास, व्याकरण अशा विषयांचाही त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांना वेगवेगळ्या राज्यांमधून मिळालेल्या वेगवेगळ्या पदव्या हे त्यांच्या या ज्ञानसंपदेचे प्रतीक आहेत. त्या पदव्या अशा होत्या —
“काव्यतीर्थ“–कलकत्ता , “ साहित्याचार्य “– जयपूर , “ साहित्योत्तम “ – बडोदा , “ संपूर्ण दर्शन मध्यमा “ – वाराणसी . अनेकांना त्यांनी पी.एच.डी. साठी मार्गदर्शन केले होते.
ललित लेखनावरही त्यांचे प्रभुत्व होते. संस्कृत प्रचारिणी सभेतर्फे प्रकाशित होणाऱ्या “ संस्कृत भवितव्यं “ या मासिकाचे ते अनेक वर्षं संपादक होते. आपल्या संस्कृत साहित्यातून त्यांनी हुंड्यासारख्या सामाजिक समस्यांचाही उहापोह केला होता.
त्यांची साहित्य-संपदा अशी —
शारीरिक भाष्यावरील विश्लेषण – पुस्तक
“ नीळकंठविजयम‘आणि ‘रहस्यमयी “ या नाटिका.
“ गोष्टीरूप वेदान्त “
“ न्यायसिद्धान्त मुक्तावली “ – संगणक ज्या तर्कशास्त्रावर चालतो, त्या तर्कशास्त्रावर आधारित असलेले आणि खूपच गाजलेले पुस्तक
“ Post independence Sanskrit literature “ हा ग्रंथ
“ Problems of Sanskrit education in non- Hindi states.” हे पुस्तक.
नीलकंठ दीक्षित व त्यांची काव्यसंपदा .
“ संस्कृतत्रिदलम “ —- ललित लेख आणि प्रवासवर्णने .
“ अभिनव शास्त्र त्रिदलम “ – शोध-लेख संग्रह.
काव्यत्रिदलम – काव्यसंग्रह
“ तीरे संस्कृताची गहने “ – याच ओळीने सुरु होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरीतील एका श्लोकाच्या संदर्भाने लिहिलेला ग्रंथ.
डॉ. जोशी यांना अनेक मानाचे सन्मान प्राप्त झाले होते. —–
“ राष्ट्रपती पुरस्कार “.
“ Man of the year “ – २००५ साली अमेरिकेच्या बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने हा पुरस्कार त्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानपूर्वक दिला होता. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही अशी अभिमानास्पद दखल घेतली गेली होती.
“ संस्कृत पंडित “ हा महाराष्ट्र सरकारने दिलेला पुरस्कार.
याखेरीज, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, शृंगेरी पीठ , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, जयपूरची संस्कृत सेवा परिषद या सर्वांतर्फेही त्यांना गौरवपर पुरस्कार देण्यात आले होते.
डॉ. केशव रा. जोशी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈