ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दिवाकर कृष्ण केळकर:

मराठी लघुकथेचे शिल्पकार श्री. दिवाकर कृष्ण केळकर यांचा जन्म कर्नाटकातील गुंटकल येथे झाला.त्यांनी मुंबई,पुणे आणि सांगली येथे आपले शिक्षण पूर्ण केले.नंतर हैद्राबाद येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा मनोरंजन या मासिकातून 1922 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर तीन कथासंग्रह,दोन कादंब-या आणि एक नाटक त्यांनी लिहीले.पण    मराठीतील लघुकथा हेच त्यांचे प्रमुख लेखन म्हणावे लागेल.भावनाविष्कार हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या कथेमुळे मराठी कथेला मनोदर्शनाचे तिसरे परिमाण लाभले असे सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र फडके म्हणतात.

मुंबई येथे 1950 साली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनातील कथा संमेलनाचे ते अध्यक्ष होते.1954 मध्ये लातूर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .

श्री.केळकर यांची साहित्य संपदा:

कथासंग्रह—

समाधी व इतर सहा गोष्टी

रूपगर्विता व इतर  गोष्टी

महाराणी व इतर कथा

कादंबरी—

किशोरीचे ह्रदय

विद्या आणि वारूणी

नाटक—

तोड ही माळ

मराठीतील दीर्घ कथा लघुकथेकडे घेऊन जाणा-या दिवाकर कृष्ण यांचा आज स्मृतीदिन(1973)आहे.🙏

☆☆☆☆☆

माधव  यशवंत गडकरी

माधव गडकरी या नावाने प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार यांचा आज (2006)स्मृतीदिन.

सुमारे साठ वर्षे त्यांनी पत्रकारितेसाठी खर्च केली. विविध नियतकालिके,साप्ताहिके यामध्ये त्यांनी उपसंपादक,संपादक,स्तंभलेखन,वृतकलेखन अशा विविध जबाबदा-या समर्थपणे पेलल्या.त्यांची वृत्तपत्रीय कारकीर्द महाराष्ट्र टाईम्स,गोमांतक,मुंबई सकाळ,लोकसत्ता,सांज लोकसत्ता अशा नामवंत समुहातून झाली.निर्झर,क्षितीज,निर्धार ही त्यांची स्वतःची नियतकालिके.1992मध्ये ते लोकसत्ता प्रकाशन समुहातून निवृत्त झाले.परंतु त्यांचे विविध सदरांतील लेखन चालूच होते.याशिवाय 1955ते1962 या काळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीत नोकरीही केली.

पत्रकार या नात्याने त्यांनी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या व आपल्या लेखनातून वाचकांना जगातील अनेक घडामोडींचे दर्शन घडवले. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, पोर्तुगाल, माॅरिशस, क्यूबा, जपान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान अशा अनेक लहान मोठ्या देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या.

प्रकाशित साहित्य:—

अष्टपैलू आचार्य अत्रे

असा हा गमक

असा हा महाराष्ट्र ..दोन भाग

इंदिरा ते चंद्रशेखर

एक झलक पूर्वेची

गाजलेले अग्रलेख

गुलमोहराची पाने

चिरंतनाचे प्रवासी

प्रतिभेचे पंख लाभलेली माणसे

सत्ता आणि लेखणी

कुसुमाग्रज गौरव…इ.इ इ .

प्राप्त पुरस्कार   :—-

पद्मश्री, पुढारीकार जाधव पुरस्कार, अनंत हरी गद्रे पुरस्कार, भ्रमंती पुरस्कार, लोकश्री,आचार्य अत्रे, संवाद,भारतकार हेगडे देसाई पुरस्कार.

प्रतिभा सम्राट रा.ग.गडकरी पुस्तकासाठी व्ही.एच.कुलकर्णी पुरस्कार, गोवा अकॅडमीचा सोनार बांगला या पुस्तकासाठी पुरस्कार,

मराठी साहित्य परिषद पुरस्कार, याशिवाय महाराष्ट्र राज्य सरकारचे अनेक लेखन पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

डाॅ.मधुकर सु.पाटील

अत्यंत प्रतिकूल  परिस्थितीतही प्रथमपासून शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून श्री.म.सु.पाटील यांनी मराठी साहित्यात एक उत्तम काव्यसमीक्षक व वैचारिक लेखक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मनमाड महाविद्यालयात प्राध्यापक पद स्विकारले व तेथूनच प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.

त्यांची कवितेवरील समीक्षा ही विशेष उल्लेखनीय होतीच पण त्याबरोबरच त्यांचा संत साहित्य  व दलित साहित्य यांचाही सखोल अभ्यास होता.त्यांनी काही पुस्तके,अनुवादीतही केली होती.’स्मृतीभ्रंशानंतर’ या अनुवादित पुस्तकाला 2014 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध या पुस्तकाला 2018 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.2007मध्ये झालेल्या को.म.सा.परिषदेच्या उल्हासनगर येथील दहाव्या कोकण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनुष्टुभ हे मासिक चालू करून त्यांनी अनेकांना लिहीते केले.

साहित्य संपदा:—

इंदिरा यांचे काव्यविश्व

दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र

बदलते कविसंवेदन

सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध

ज्ञानेश्वरीचा काव्यबंध

ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध

लांबचा उगवे आगरी(आत्मचरित्र) इ.इ.

2019 साली वयाच्या 88व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन!🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : मराठी विश्वकोश, विकासपिडीया, विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश प्रभाकर प्रधान – ( २६ ऑगस्ट १९२२ – २९ मे २०१० )

ग. प्र. प्रधान हे समाजवादी विचारवंत, राजकरणी, मराठी भाषेचे लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते. २ वर्षे विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्र विधानसभेचे ते सभापतीही होते. त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले आहे.

साधना साप्ताहिकाचे ते मानद संपादक होते. सानेगुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग आसे.

त्यांनी एकूण १४ पुस्तके लिहिली. त्यापैकी मराठीत खालील पुस्तके लिहिली आहेत.

१. आगरकर लेखसंग्रह, २. डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात, ३. महाराष्ट्राचे शिल्पकार – ना.ग. गोरे ४. माझी वाटचाल, ५. सत्याग्रही गांधीजी, ६. साता उत्तराची कहाणी ७ ओकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक

याव्यतिरिक्त लेटर टू टॉलस्टॉय, लो. टिळक ए बायोग्राफी इ. इंग्रजीतूनही पुस्तके लिहिली.

‘साता उत्तराची कहाणी’ हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. ‘डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दात’ या पुस्तकाचे स्वरूप वेगळे आहे. एक तरुण पत्रकार डॉ. आंबेडकरांची मुलाखत घेतो, अशी कल्पना करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार – राज्यशासनाचा वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

समीर शिपूरकर यांनी ग. प्र. प्रधानांच्या जीवनकार्याचा आणि आणि समाजसेवेचा परिचय करून देणार्याश लघुपटाची निर्मिती केली आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

संजय व्यंकटेश संगवई  (२३ डिसेंबर १९५९ – २९ मे २००७ )

संजय संगवई  हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यम तज्ज्ञ , माध्यम चिकित्सक होते. ’अभिव्यक्ती’ या नाशिक इथून प्रकाशित होणार्यार माध्यंविषयक त्रैमासिकाचे ते संपादक होते. ‘माणूस’ साप्ताहिकात त्यांनी विविध सामाजिक, राजकीय विषयांवर तसेच शास्त्रीय संगितावर विपुल लेखन केले आहे. पर्यायी पत्रकारिता ही विकासाभिमुख पत्रकारिता असते, ही संकल्पना, संगवई यांनी आपल्या लेखनातून रुजवली. त्यांच्या मृत्यूनंतर काढलेल्या ‘अभिव्यक्ती’च्या अंकात, ‘सान्यासी माध्यमकर्मी’ असा त्यांचा गौरवास्प्द उल्लेख करण्यात आला आहे.

’नर्मदा बचाव आंदोलनाचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. त्यांना ह्रदयविकाराचा त्रास होता. त्यावरील उपचारासाठी ते केरळयेथील कोचीला गेले असता तिथेच त्यांचा अंत झाला. 

संजय संगवई यांची पुस्तके –

१. अस्मिता आणि अस्तित्व ( वैचारिक लेख ) २. उद्गार ( वैचारिक लेख ) ३. नद्या आणि जनजीवन – नर्मदा खोर्याैतील लोकांच्या संघर्षाचा ऐतिहासिक दस्तावेज ४. माध्यमवेध ५. कलंदर सुरांच्या स्मृतीची मैफल ( संगीतविषयक )       

संजय संगवई यांना मिळालेले पुरस्कार –

१.    राम आपटे प्रतिष्ठानचा सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार

२.    महाराष्ट्र फाऊंडेशनचा सामाजिक कार्यासाठी पुरस्कार

३.    पर्यायी पत्रकारितेसाठी महानगर पुरस्कार

४.    ४. श्री. ग. माजगावकर कृतीशीलता पुरस्कार

५.    समाज विज्ञान शिक्षण मंडल न्यास – मुंबई तर्फे अस्मिता आणि अस्तित्व या पुस्तकासाठी पुरस्कार

बालवाडी तालुका खानापूर, जि. सांगली येथे त्यांच्या स्मरणार्थ ‘संजय संगवई मंच’

हे चर्चापीठ स्थापन करण्यात आले आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

चारुता सागर. – (२१ नोहेंबर १९३०)

मोजक्याच कथा लिहूनही, मराठी कथाविश्व समृद्ध करणारे ग्रामीण लेखक म्हणून ज्यांच्याविषयी आदराने म्हंटलं जातं, ते चारुता सागर म्हणजे दिनकर दत्तात्रय भोसले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील, कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव इथे झाला. त्यांनी चारुता सागर या नावाने कथा लेखन केले, तर धोंडूबुवा या नावाने कीर्तने केली.

बंगालमध्ये भ्रमंती करताना त्यांनी शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबर्या् वाचल्या, त्यातील एका कादंबरीतील एका पात्राचे नाव होते, चारुता सागर. त्यांना हे नाव खूपच आवडले म्हणून त्यांनी कथालेखनासाठी हे नाव घेतले. 

१२व्या वर्षी आईच्या दु:खद निधनामुळे व्यथित होऊन त्यांनी घर सोडले. साधू, बैरागी, संन्यासी बनून, रामेश्वर, हरिद्वार, काशी असे फिरत राहिले. वयाच्या २६व्या वर्षी ते पुन्हा गावी परतले. लोणारवाडी या गावात कोंबड्या, बकर्यां च्या मागे फिरणार्याा मुलांसाठी त्यांनी शाळा काढली. पण ती शाळा बेकायदेशीर ठरवून सरकारने ताब्यात घेतली. पुढे त्यांनी लोणारवाडी हे गाव सोडले. नंतर त्यांनी मळणगावला प्राथमिक शिक्षकाची नोकरी केली.

लोणारवाडी या गावात कृष्णा नावाचा मुलगा होता. धुतला तर शर्ट फाटेल म्हणून त्याने अंगातला शर्ट कधी धुतलाच नाही. त्याच्यावर ‘न लिहिलेले पत्र’ ही कथा चारुता सागर यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली ती पहिलीच कथा सत्यकथा मासिकात छापून आली. पुढे त्यांच्या बहुतेक सगळ्या कथा सत्यकथेने छापल्या. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, हातकणंगलेकर अशी दिग्गज मंडळी त्यांच्या कथांची चाहती होती.  

चारुता सागर यांची पुस्तके –

१. नदीपार, २. नागीण – यात १६ कथा आहेत , ३. मामाचा वाडा – यात १४ कथा आहेत.

पुरस्कार –

१.    चारुता सागर यांच्या ‘नागीण’ या कथेला कॅ. गो.गं लिमये पुरस्कार १९७१ साली मिळाला.

२.    सर्वोत्कृष्ट लघुकथाकाराचा पुरस्कार त्यांना १९७७ साली मिळाला.

जोगवा या राष्ट्रीय विजेत्या चित्रपटाची कथा चारुता सागर यांच्या ’दर्शन’ या कथेवर आधारलेली आहे.

चारुता सागर यांच्या ‘नागीन’, ‘म्हस’ , ‘न लिहिलेले पत्र’, ‘मामाचा वाडा’, ‘पुंगी’, ‘पूल’, ‘दर्शन’, ‘वाट’, ‘नदीपार इ. अनेक कथांचा, श्री. चंद्रकांत पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला आहे.

सध्या ‘चारुता सागर प्रतिष्ठानतर्फे’ दरवर्षी कथास्पर्धा घेतली जाते आणि एका उत्कृष्ट कथेला परितोषिक दिले जाते.

आज, ग. प्र. प्रधान, संजय सांगवई, चारुता सागर यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने या तीनही प्रतिभावंतांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री  बाळाजी जोशी (27 जानेवारी 1901 – 27 मे 1994) हे थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक, पुरोगामी विचारांचे प्रकांड पंडित, सृजनशील साहित्यिक व चिकित्सक तत्त्वज्ञ होते.

प्रथम वडिलांकडून व नंतर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत त्यांनी अध्ययन केले. पुढील अध्ययनासाठी ते वाराणसीला गेले.कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली.

भारताच्या स्वातंत्र्यआंदोलनात, सन 1930-32च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला.

मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक’ पक्षाचे ते क्रियाशील सदस्य होते.

अनेक सामाजिक व धार्मिक सुधारणांना धर्मशास्त्रांचा आधार असल्याचे दाखवून आपल्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी परिवर्तनवादी शक्तींना पाठबळ मिळवून देण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी शंकराचार्य व इतर सनातनी मंडळींचा रोष ओढवून घेतला.

तर्कतीर्थांनी विपुल लेखन केले आहे. त्यापैकी महत्त्वाचे काही ग्रंथ : ‘शुद्धिसर्वस्वम’, ‘आनंदमीमांसा’, ‘हिंदू धर्माची समीक्षा’, ‘जडवाद’, ‘वैदिक संस्कृतीचा विकास’, ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा’ व ‘रससिद्धांत’ इत्यादी.

वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतर्फे करण्यात आलेल्या धर्मकोशाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले.

मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. सुमारे एक हजार पृष्ठांचा एक, असे चौदा खंड त्यांच्या संपादकत्वाखाली तयार झाले. यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट होते.

 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष या पदावरही त्यांनी बरीच वर्षे काम केले.

1954मध्ये दिल्लीला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाला साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.

1973 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ ही पदवी दिली . मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘एलएल.डी.’ ही पदवी दिली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

☆☆☆☆☆

रा. ग. जाधव

रावसाहेब गणपतराव जाधव (24 ऑगस्ट 1932 – 27 मे 2016) हे वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी व समीक्षक होते.

पुणे विद्यापीठातून एम.ए.झाल्यावर मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावतीचे विदर्भ महाविद्यालय, औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे त्यांनी 11 वर्षे मराठीचे अध्यापन केले. त्यापूर्वी ते एस.टी. मध्ये 10 वर्षे कार्यरत होते.

नंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पात दोन दशके काम करून जाधव यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. 2000ते 2002 या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक व मराठी विश्वकोश निर्मिती  मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनी कोशाच्या सतराव्या खंडापर्यंत काम केले. या खंडांतून त्यांनी साहित्यविषयक महत्त्वाचे लेखही लिहिले. त्याचप्रमाणे विश्वकोश आकर्षक होण्यासाठी त्यातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

ग. प्र. प्रधान यांच्यासमवेत जाधव यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांत संपादन केले.

‘निळी पहाट’, ‘ निळी क्षितिजे’ व ‘निळे पाणी’ या जाधवांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे  मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले. केवळ विद्रोहाचा डांगोरा पिटण्यापेक्षा विद्रोह समजून घेऊन त्याच्या पलीकडची दिशा पाहावी, असे त्यांचे म्हणणे होते.

याशिवाय जाधवांची ‘अश्वत्थाची सळसळ’, ‘आनंदाचा डोह’, ‘कला, साहित्य व संस्कृती’, ‘बापू’ (गांधीजींवरील 91 कवितांचा संग्रह), ‘कविता आणि रसिकता’, ‘काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे’, ‘ खेळीमेळी'(ललित), ‘निवडक समीक्षा’, ‘वाङ्मयीन प्रवृत्ती आणि प्रमेये ‘ वगैरे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

मराठी विश्वकोश व ‘साधना’चे खंड याव्यतिरिक्त जाधवांनी ‘आधुनिक मराठी कवयित्रींची कविता'(1980 ते 1995 या काळातील), ‘ निवडक साने गुरुजी’, तसेच मराठी साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 1950 ते 2000 या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या 4 खंडांचेही संपादन केले.

‘निवडक समीक्षा’ या जाधवांच्या पुस्तकाला टागोर वाङ्मय पुरस्कार मिळाला.

औरंगाबाद येथील 2004 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने विंदा करंदीकर यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

☆☆☆☆☆

प्रल्हाद नरहर देशपांडे

डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे (17सप्टेंबर 1936 – 27 मे 2007)हे लेखक, संपादक व इतिहास संशोधक होते.

पदवी व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादला पूर्ण करून तिथेच ते केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागात सर्वेक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी देवगिरी (दौलताबाद) या किल्ल्याचे सर्वेक्षण करताना ऐतिहासिक दृष्टिकोनातून किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, याचा वस्तुपाठ त्यांना मिळाला. पुढे जाऊन ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या विषयावर डॉ. अ. रा. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली.

नंतर ते धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात इतिहासाचे व्याख्याते म्हणून रुजू झाले.

त्या दरम्यानच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या मुख्य चिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली.मंडळातील ऐतिहासिक दस्तऐवज व इतर सामग्रीची जपणूक करणे, त्यात भर घालणे, त्यासाठी संग्रहालय उभे करणे, खानदेशातील ऐतिहासिक, पुरातात्त्विक सर्वेक्षण करणे,’थाळनेर’सारख्या ठिकाणी उत्खनन करणे, मंडळात येणाऱ्या  संशोधकांना मदत व मार्गदर्शन करणे ही कामे त्यांनी मनोभावे केली.

‘छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे’ व  ‘109 कलमी बखर’ हे दोन्ही ग्रंथ त्यांनी प्रस्तावनेसह संपादून प्रसिद्ध केले. राजगड व रायगड या छत्रपतींच्या दोन राजधान्यांवर स्वतंत्रपणे लिहिलेल्या पुस्तिका, ‘महाराष्ट्र संस्कृती – जडणघडण, मराठ्यांचा उदय व उत्कर्ष’ हे क्रमिक पुस्तक तसेच अनेक इतिहासविषयक संशोधन लेख त्यांच्या नावावर आहेत.

स. मा.गर्गे यांच्या मराठी रियासतीच्या पहिल्या खंडाच्या संपादनास त्यांनी हातभार लावला.

राजवाडे मंडळाच्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाचे त्यांनी 25 वर्षे संपादन केले.

राजवाडे संपादित ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या दुर्मिळ झालेल्या मालिकेचे त्यांनी पुनःसंपादन केले.

 डॉ. देशपांडे हे उत्तम संस्थापकही होते. ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद’, ‘खानदेश इतिहास परिषद’ इत्यादी संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कक्षेतील कागदपत्रे गोळा करणे, त्यांच्या आधारे शोधनिबंध लिहिणे यासाठी खानदेशातील तरुण संशोधकांना त्यामुळे प्रेरणा मिळाली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, तंजावर पेपर्स कमिटी, इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन, नवी दिल्ली इत्यादी मंडळावर त्यांची नियुक्ती झाली होती.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी मिळवली.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रा. ग.जाधव व प्रल्हाद नरहर देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या तिघांनाही आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी,  विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्रीपाद वामन काळे

श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१०चा. ते निबंधकार आणि अर्थतज्ज्ञ होते. अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे ते संपदक होते. ’पुढे पाऊल, तुमचे स्थान कोणते?, कौटुंबिक हितगुज, दाणे आणि खडे , नवे जीवन, नव्या जीवनाची छानदार घडी’ अशी त्यांची अनेक पुस्तके आहेत. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापक विचारसरणी, ओघवती भाषा, नाजुक, मार्मिक विनोदाची पखरण ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.

मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास त्यांनी लिहिला आहे.

आज त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

राजाराम भालचंद्र पाटणकर (पीएच. डी.)

राजाराम भालचंद्र पाटणकर(9 जानेवारी 1927 – 24 मे 2004) हे विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक होते.

ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे नातू होते. रा.भा. पाटणकरांचे वडील भा. ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.भा.ल.पाटणकरांनी  बालकवींच्या सर्व कवितांचे सर्वप्रथम संकलन केले.

रा. भा. पाटणकर हंसराज प्रागजी  महाविद्यालयातूनच एम. ए. झाले. नंतर त्यांनी 1960मध्ये ‘कम्युनिकेशन इन लिटरेचर’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी.  मिळवली.

ते भावनगर, अहमदाबाद, भुज, अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.1964साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर इंग्रजीचे विभागप्रमुख होऊन ते तिथूनच निवृत्त झाले.

तत्त्वज्ञान, आर्थिक इतिहास, इंग्रजी साहित्य यांत त्यांना विशेष रस होता.

‘पुन्हा एकदा एकच प्याला’ हा त्यांचा पहिला लेख 1951साली ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी ‘एरिअल’ या टोपणनावाने कथा, कविता लिहिल्या.

सौंदर्यशास्त्र हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता. ‘सौंदर्य मीमांसा’,  ‘क्रोचेचे सौंदर्यशास्त्र:एक भाष्य’, ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इत्यादी तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारलेला सिद्धांत पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केला आहे.

‘कमल देसाई यांचे कथाविश्व ‘, ‘मुक्तीबोधांचे साहित्य ‘, ‘कथाकार शांताराम ‘ या तिन्ही लेखकांच्या साहित्यावर पाटणकरांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावनांत त्यांनी मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट केल्या आहेत.’अपूर्ण क्रांती’ या त्यांच्या पुस्तकात सांस्कृतिक परिवर्तनाचा संदर्भ आला आहे.

त्यांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध व समीक्षाक्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.

‘इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया’ व ‘ड्युरिंग ब्रिटिश रूल ‘ही त्यांची पुस्तके अपूर्ण राहिली.

☆☆☆☆☆

अनंत रामचंद्र कुलकर्णी

 डॉ.अनंत रामचंद्र कुलकर्णी (19 एप्रिल 1925 – 24 मे 2009) हे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक, संशोधक, इतिहासकार होते.

ते बेळगाव, अहमदनगर, सोलापूर, मराठवाडा, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या महाविद्यालयात / विद्यापीठात प्राध्यापक होते.

1964मध्ये ‘Maharashtra in the Age of Shivaji’ हा प्रबंध सादर करून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली.

नंतर ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात व पुढे पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. नंतर ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले.

कुलकर्णीनी उपलब्ध साधनांचा समर्पक उपयोग करून शिवकालीन महाराष्ट्राचा सामाजिक व आर्थिक अंगाने विशेष अभ्यास केला व त्या कालखंडाची अधिक परिपूर्ण मांडणी केली.

‘Maharashtra in the Age of Shivaji’ (1969) व ‘शिवकालीन महाराष्ट्र ‘(1978) हे त्यांचे ग्रंथ अत्यंत वस्तुनिष्ठ व मौलिक ठरले.

ग्रॅण्ट डफ या इतिहासाकारावर त्यांनी सहा व्याख्याने दिली. ती व्याख्याने पुणे विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केली.त्यापूर्वी काही इतिहासकारांनी डफच्या इतिहासातील दोष दाखवले होते. कुलकर्णी यांनी, ज्या परिस्थितीत डफने इतिहासलेखन केले, त्याचा विचार केला पाहिजे, असे सैद्धांतिक विवेचन केले. त्याच्या इतिहासाची घडण कशी झाली, हे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रॅण्ट डफची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. कुलकर्णी यांचा पूर्वग्रहविरहित निकोप दृष्टिकोन हा इतिहास अभ्यासकांसाठी वस्तुपाठ आहे.

कुलकर्णी यांच्या ‘शिवकालीन महाराष्ट्र’, ‘पुण्याचे पेशवे’, ‘अशी होती शिवशाही’, ‘जेम्स कनिंगहॅम ग्रॅण्ट डफ’ वगैरे मराठी, तसेच ‘Maharashtra in the Age of Shivaji’, ‘Medieval   Maharashtra’,  ‘Maharashtra Society and Culture’, ‘Maratha Historiography’ इत्यादी इंग्रजी ग्रंथांमुळे मराठा इतिहासलेखनाचे क्षेत्र संपन्न झाले आहे.

राजाराम भालचंद्र पाटणकर व अनंत रामचंद्र कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी,  विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

विजय धोंडोपंत तेंडुलकर

साहित्याच्या विविध प्रांतात आपल्या लेखणीने विजय संपादन करणारे विजय तेंडुलकर यांचा आज स्मृतीदिन!तेंडुलकर म्हटले की आठवते ते घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर ही गाजलेली नाटके. पण त्यांची साहित्यिक कारकिर्द इतकी विस्तृत आहे की आजच्या दिवशी थोडीफार माहिती करून घेणे उचित ठरेल.

विजय तेंडुलकर यांचा जन्म मुंबईतला, पण त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे व कोल्हापूर येथे झाले. शिक्षणात व्यत्यय आला तरी घरातील वातावरण साहित्याला अनुकूल असे होते. कारण त्याचे वडील पुस्तक विक्रेते, प्रकाशक, हौशी नाट्य कलाकार व दिग्दर्शक होते. त्यामुळे मुद्रिते तपासणे, पुस्तके हाताळणे हे आपोआपच होऊ लागले. वाचनाची आवड व सवय लागली. वि. वा. बोकिल, दि. बा.

मोकाशी  आणि शिवराम वाशीकर यांच्या लेखनाचा आणि संवाद लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुणे आणि मुंबई येथे वास्तव्य झाले असले तरी ते दीर्घ काळ मुंबईतच होते. तेव्हा त्यांचा रंगायन, आविष्कार, अनिकेत,

इत्यादी नाट्यक्षेत्राशी संबंधित संस्थांशी संबंध आला. त्यांचे सुरूवातीचे लेखन हे वृत्तपत्रिय व नियतकालिकांच्या संपादनाचे होते. पण नंतर मात्र ते प्रामुख्याने नाटककार म्हणूनच नावारुपास आले.

श्री. गो. म. कुलकर्णी यांनी त्यांच्या विषयी लिहीताना म्हटले आहे की तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार होते. त्यानी कल्पनारम्यतेचा आश्रय केला तोही वास्तवाच्या बळकटीसाठीच. सर्वसामान्यांची सुखदुःखे विशेषतः दुःखेच त्यांच्या चिंतनाचे विषय होते. त्यांच्या लेखनात काव्य आणि कारूण्यही दिसून येते. तंत्रदृष्ट्या नवे प्रयोग हे त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. “

तेंडुलकर यांची साहित्य संपदा:

कथा

काचपात्रे, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे इ.

कादंबरी

कादंबरी एक, कादंबरी दोन, मसाज

बालनाट्ये

पाटलाच्या पोरीचं लगीन, चिमणा बांधतो बंगला, चांभारचौकशीचे नाटक   इ.

एकांकिका संग्रह

 रात्र आणि इतर एकांकिका, भेकड आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व.

अनुवादपर नाट्यलेखन

वासनाचक्र, आधेअधुरे, तुघलक

पटकथा

सामना, निशांत, शांतता कोर्ट चालू आहे

या तिनही पटकथाना पुरस्कार मिळाले आहेत.  शिवाय. .

अर्धसत्य, आक्रीत, आक्रोश,

उंबरठा, सिंहासन, कमला, गहराई, प्रार्थना, मंथन, शांतता कोर्ट चालू आहे, 22जून 1897

नाटक

श्रीमंत(1955पहिले नाटक)

माणूस नावाचे बेट, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, मी जिंकलो मी हरलो, कावळ्यांची शाळा, सरी गं सरी , अशी पाखरे येती, गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल आणि शांतता कोर्ट चालू आहे.

शांतता. . . . . . या नाटकानेच त्यांना राष्ट्रीय किर्ती मिळवून दिली. त्याला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक प्राप्त झाले होते.

अशा या चतुरस्त्र लेखकाला मानाचा मुजरा.   🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : मराठी विश्वकोश, विकासपिडीया, विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (6 जानेवारी 1812 –   18 मे 1846) हे मराठीतील आद्य पत्रकार होते. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून ते मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ठरले.

सुरुवातीला घरीच वडिलांकडे त्यांनी मराठी व संस्कृतचा अभ्यास आरंभला.1825 मध्ये मुंबईत येऊन ते बापू छत्रे व बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. शिवाय गणित व शास्त्र यातही त्यांनी प्रावीण्य मिळवले.’बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात ज्ञान कमवून 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून ते नियुक्त झाले.त्यांच्यात पांडित्य व अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता.

बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते.

गणित व ज्योतिष यांत पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नेमणूक झाली.

बाळशास्त्रींना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास या विषयांचे उत्तम ज्ञान होते. म्हणून तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली. या काळात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्या काळात पाठ्यपुस्तके तयार करण्याचे कठीण कामही त्यांनी केले.

बाळशास्त्रींनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांवर शोधनिबंध लिहिले.ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते.

मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हातात दिली.

त्यांनी मराठी भाषेत ‘शून्यलब्धी’ हे पहिले पुस्तक लिहिले.

पारतंत्र्य, तसेच अज्ञान, अंधश्रद्धा वगैरेंनी ग्रासलेल्या समाजाचे प्रबोधन करण्यासाठी गोविंद विठ्ठल कुंटे व भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्रात मराठी व इंग्रजी भाषेत मजकूर असायचा. 6 जानेवारी 1832 ते जुलै 1840 अशी साडेआठ वर्षे हे वृत्तपत्र चालले.

यासोबतच त्यांनी 1840 साली ‘दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना यांत मदत करीत. लोकांची आकलनक्षमता वाढवणाऱ्या या मासिकात ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, निसर्गविज्ञान, व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास वगैरे विषयांवर नकाशे, आकृत्यांसह लेख प्रकाशित करीत. त्यांनी 5वर्षे या मासिकाचे संपादन केले.

जांभेकरांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ची  स्थापना केली.

विधवांचा पुनर्विवाह व वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी त्यांनी विपुल लेखन केले.विधवाविवाहाचा शास्त्रीय आधार शोधून गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा ग्रंथ लिहून घेतला.

आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वी अपेक्षित होता. ते द्रष्टे समाजसुधारक होते.

त्यांनी ‘नेटिव्ह इम्प्रूव्हमेन्ट सोसायटी’ची स्थापना केली. त्यातून ‘स्टुडन्टस लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड वगैरे दिग्गज कार्यरत झाले.

ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची त्यांनी व्यवस्था केली.

फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता.

1840 मध्ये त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’करण्यात आले.

6जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. याच तारखेला त्यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करायला सुरुवात केली. म्हणून महाराष्ट्रात 6जानेवारी हा ‘पत्रकार दिवस’म्हणून साजरा केला जातो.

बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १७ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

कमल पाध्ये

कमल पाध्ये या वैचारिक लेखन करणार्याड मराठी लेखिका होत्या. त्या माहेरच्या गोठोसकर. मुंबईतील रामवाडीतील विनायक पांडुरंग गोठोसकर यांच्या त्या कन्या. १९४० साली पत्रकार प्रभाकर पाध्ये यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बंध- अनुबंध या त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राला अफाट लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास १८५८ ते १९४७ हे अनुवादीत पुस्तक लिहिले. मूळ पुस्तक ‘द इंडियन मुस्लीम’ हे असून  त्याचे मूळ लेखक आहेत, राम गोपाल. ‘भारतातील स्त्रीधर्माचा आदर्शवाद’ हेही पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 

कमल पाध्ये यांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

माधव मनोहर वैद्य 

समीक्षेतील फौजदार असा ज्यांचा दबदबा होता त्या माधव मनोहर यांनी कथा, कादंबरी, नाट्य अशा अन्य साहित्य प्रकारातही लेखन केले होते. इंग्रजी साहित्याचे वाचन केल्यावर त्या साहित्याने ते प्रभावित झाले व मराठी साहित्याची समीक्षा करावी असे वाटल्यामुळे  ते समीक्षेकडे वळले. केसरी, सोबत, नवशक्ती, रत्नाकर, रसरंग अशा विविध दैनिके व नियतकालिकांमधून त्यांनी ललित व समीक्षात्मक लेखन केले. कोणत्याही लेखकाच्या साहित्यातील गुणदोषांकडे ते समान वृत्तीने पहात असत. त्यामुळे त्यांच्या समीक्षेला महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या साहित्याची समीक्षा करावी असे साहित्यिकांना वाटत असे.

त्यांची काही  भाषांतरीत व रूपांतरीत नाटके :

आई,आजोबांच्या मुली,आपण सा-या दुर्गाबाई,चेटूक,प्रकाश देणारी माणसं,रामराज्य   इ.

अन्य साहित्य :

कथा व कादंबरी: आशा,मुलांची शाळा,अन्नदाता,एक आणि दोन,किल्ली  इ.

निवडक साहित्य: पंचमवेध

सन्मान:

विष्णूदास भावे सुवर्णपदक-1981, अ.भा.नाट्यसंमेलन अध्यक्ष, सातारा-1990

16मे 1994ला त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

माधव गोविंद काटकर 

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे जन्मलेले काटकर यांनी बी.ए.बी.टी.शिक्षण पूर्ण केले व शिक्षकी पेशा स्विकारला.त्यांनी कथा,कविता,बालसाहित्य विपुल प्रमाणात लिहीले आहे.

कादंबरी: पडक्या गढीचे गूढ

चरित्र: झुंजार लोकमान्य

कविता: जयजयवंती, मधुधारा,  मनमाधवी

बालकविता: मुलांची गाणी, आटपाट नगरात, गंमतगाणी, पिंपळ पाने, गाजराची पुंगी, चांदण्याचे घर, जमाडी गंमत इ.

बालकथासंग्रह: बोलक्या कथा, मंगल कथा, सुनीती कथा इ.

16 मे 2000 रोजी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, आधुनिक मराठी काव्यसंपदा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

संभाजी सोमा कदम

संभाजी सोमा कदम (5 नोव्हेंबर 1932 – 15 मे 1998) हे प्रतिभावंत व्यक्तिचित्रकार, आदर्श शिक्षक, कलासमीक्षक, कवी, सौंदर्यमीमांसक, संगीताचे अभ्यासक होते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्ट ही पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्याच संस्थेत प्रथम कलाशिक्षक, मग प्राध्यापक व नंतर अधिष्ठाता या पदावर त्यांनी काम केले.नंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन रहेजा कला शाळेत त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले.

व्यक्तिचित्रणामध्ये त्यांनी स्वतःची खास शैली निर्माण केली.व्यक्तिचित्र म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतरंगाला अधोरेखित करणारे चित्रण होय, ही व्याख्या त्यांनी रुजवली.

त्यांनी अनेक प्रदर्शने भरवली.

जे जे स्कूल ऑफ आर्टच्या ‘रूपभेद’ या अंकासाठी ते लेखन करत. काही काळ त्यांनी मराठी विश्वकोशासाठी लेखन व कलासंपादनाचे काम केले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रल्हाद अनंत धोंड यांनी सांगितलेल्या आठवणींचे ‘रापण’ या नावाने कदमांनी केलेले लेखन उल्लेखनीय आहे.

‘मौज’ या नियतकालिकातून ते ‘विरूपाक्ष’ या टोपणनावाने कलासमीक्षा लिहीत.नंतर ते ‘सत्यकथा’मधूनही समीक्षालेखन करू लागले.

‘पळसबन’ हा त्यांचा कवितासंग्रह. त्यातील त्यांच्या कविता खूप आत्मकेंद्रित आहेत.

संगीतातील सौंदर्यशास्त्र या विषयावरही त्यांनी लेखन केले आहे.

चिं. त्र्यं. खानोलकरलिखित ‘आरसा बोलतो’ हे एकपात्री नाटक त्यांनी दिग्दर्शित केले. यात अमोल पालेकर यांची भूमिका होती.

ते एकल हार्मोनियमवादनाचे प्रयोगही सादर करत असत.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, गोवा, नाशिक, खैरागड, म्हैसूर, उदयपूर येथील कलासंस्थांमध्ये त्यांची व्यक्तिचित्रे संग्रहित आहेत.

विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना ‘डॉली करसेटजी पारितोषिक’ मिळाले होते.

दिल्लीच्या आयफॅक्स या कलासंस्थेने त्यांना ‘व्हेटरन आर्टिस्ट’हा पुरस्कार देऊन गौरवले.

प्रा. कदम यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, मराठी विश्वकोश :सुपर्णा कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print