ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्रीपाद वामन काळे

श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१०चा. ते निबंधकार आणि अर्थतज्ज्ञ होते. अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे ते संपदक होते. ’पुढे पाऊल, तुमचे स्थान कोणते?, कौटुंबिक हितगुज, दाणे आणि खडे , नवे जीवन, नव्या जीवनाची छानदार घडी’ अशी त्यांची अनेक पुस्तके आहेत. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापक विचारसरणी, ओघवती भाषा, नाजुक, मार्मिक विनोदाची पखरण ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.

मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास त्यांनी लिहिला आहे.

आज त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

राजाराम भालचंद्र पाटणकर (पीएच. डी.)

राजाराम भालचंद्र पाटणकर(9 जानेवारी 1927 – 24 मे 2004) हे विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक होते.

ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे नातू होते. रा.भा. पाटणकरांचे वडील भा. ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.भा.ल.पाटणकरांनी  बालकवींच्या सर्व कवितांचे सर्वप्रथम संकलन केले.

रा. भा. पाटणकर हंसराज प्रागजी  महाविद्यालयातूनच एम. ए. झाले. नंतर त्यांनी 1960मध्ये ‘कम्युनिकेशन इन लिटरेचर’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी.  मिळवली.

ते भावनगर, अहमदाबाद, भुज, अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते.1964साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर इंग्रजीचे विभागप्रमुख होऊन ते तिथूनच निवृत्त झाले.

तत्त्वज्ञान, आर्थिक इतिहास, इंग्रजी साहित्य यांत त्यांना विशेष रस होता.

‘पुन्हा एकदा एकच प्याला’ हा त्यांचा पहिला लेख 1951साली ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी ‘एरिअल’ या टोपणनावाने कथा, कविता लिहिल्या.

सौंदर्यशास्त्र हा त्यांचा व्यासंगाचा विषय होता. ‘सौंदर्य मीमांसा’,  ‘क्रोचेचे सौंदर्यशास्त्र:एक भाष्य’, ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इत्यादी तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारलेला सिद्धांत पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केला आहे.

‘कमल देसाई यांचे कथाविश्व ‘, ‘मुक्तीबोधांचे साहित्य ‘, ‘कथाकार शांताराम ‘ या तिन्ही लेखकांच्या साहित्यावर पाटणकरांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रस्तावनांत त्यांनी मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट केल्या आहेत.’अपूर्ण क्रांती’ या त्यांच्या पुस्तकात सांस्कृतिक परिवर्तनाचा संदर्भ आला आहे.

त्यांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध व समीक्षाक्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.

‘इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया’ व ‘ड्युरिंग ब्रिटिश रूल ‘ही त्यांची पुस्तके अपूर्ण राहिली.

☆☆☆☆☆

अनंत रामचंद्र कुलकर्णी

 डॉ.अनंत रामचंद्र कुलकर्णी (19 एप्रिल 1925 – 24 मे 2009) हे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक, संशोधक, इतिहासकार होते.

ते बेळगाव, अहमदनगर, सोलापूर, मराठवाडा, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या महाविद्यालयात / विद्यापीठात प्राध्यापक होते.

1964मध्ये ‘Maharashtra in the Age of Shivaji’ हा प्रबंध सादर करून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली.

नंतर ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात व पुढे पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक होते. नंतर ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले.

कुलकर्णीनी उपलब्ध साधनांचा समर्पक उपयोग करून शिवकालीन महाराष्ट्राचा सामाजिक व आर्थिक अंगाने विशेष अभ्यास केला व त्या कालखंडाची अधिक परिपूर्ण मांडणी केली.

‘Maharashtra in the Age of Shivaji’ (1969) व ‘शिवकालीन महाराष्ट्र ‘(1978) हे त्यांचे ग्रंथ अत्यंत वस्तुनिष्ठ व मौलिक ठरले.

ग्रॅण्ट डफ या इतिहासाकारावर त्यांनी सहा व्याख्याने दिली. ती व्याख्याने पुणे विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केली.त्यापूर्वी काही इतिहासकारांनी डफच्या इतिहासातील दोष दाखवले होते. कुलकर्णी यांनी, ज्या परिस्थितीत डफने इतिहासलेखन केले, त्याचा विचार केला पाहिजे, असे सैद्धांतिक विवेचन केले. त्याच्या इतिहासाची घडण कशी झाली, हे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रॅण्ट डफची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. कुलकर्णी यांचा पूर्वग्रहविरहित निकोप दृष्टिकोन हा इतिहास अभ्यासकांसाठी वस्तुपाठ आहे.

कुलकर्णी यांच्या ‘शिवकालीन महाराष्ट्र’, ‘पुण्याचे पेशवे’, ‘अशी होती शिवशाही’, ‘जेम्स कनिंगहॅम ग्रॅण्ट डफ’ वगैरे मराठी, तसेच ‘Maharashtra in the Age of Shivaji’, ‘Medieval   Maharashtra’,  ‘Maharashtra Society and Culture’, ‘Maratha Historiography’ इत्यादी इंग्रजी ग्रंथांमुळे मराठा इतिहासलेखनाचे क्षेत्र संपन्न झाले आहे.

राजाराम भालचंद्र पाटणकर व अनंत रामचंद्र कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी,  विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

विजय धोंडोपंत तेंडुलकर

साहित्याच्या विविध प्रांतात आपल्या लेखणीने विजय संपादन करणारे विजय तेंडुलकर यांचा आज स्मृतीदिन!तेंडुलकर म्हटले की आठवते ते घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर ही गाजलेली नाटके. पण त्यांची साहित्यिक कारकिर्द इतकी विस्तृत आहे की आजच्या दिवशी थोडीफार माहिती करून घेणे उचित ठरेल.

विजय तेंडुलकर यांचा जन्म मुंबईतला, पण त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे व कोल्हापूर येथे झाले. शिक्षणात व्यत्यय आला तरी घरातील वातावरण साहित्याला अनुकूल असे होते. कारण त्याचे वडील पुस्तक विक्रेते, प्रकाशक, हौशी नाट्य कलाकार व दिग्दर्शक होते. त्यामुळे मुद्रिते तपासणे, पुस्तके हाताळणे हे आपोआपच होऊ लागले. वाचनाची आवड व सवय लागली. वि. वा. बोकिल, दि. बा.

मोकाशी  आणि शिवराम वाशीकर यांच्या लेखनाचा आणि संवाद लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुणे आणि मुंबई येथे वास्तव्य झाले असले तरी ते दीर्घ काळ मुंबईतच होते. तेव्हा त्यांचा रंगायन, आविष्कार, अनिकेत,

इत्यादी नाट्यक्षेत्राशी संबंधित संस्थांशी संबंध आला. त्यांचे सुरूवातीचे लेखन हे वृत्तपत्रिय व नियतकालिकांच्या संपादनाचे होते. पण नंतर मात्र ते प्रामुख्याने नाटककार म्हणूनच नावारुपास आले.

श्री. गो. म. कुलकर्णी यांनी त्यांच्या विषयी लिहीताना म्हटले आहे की तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार होते. त्यानी कल्पनारम्यतेचा आश्रय केला तोही वास्तवाच्या बळकटीसाठीच. सर्वसामान्यांची सुखदुःखे विशेषतः दुःखेच त्यांच्या चिंतनाचे विषय होते. त्यांच्या लेखनात काव्य आणि कारूण्यही दिसून येते. तंत्रदृष्ट्या नवे प्रयोग हे त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. “

तेंडुलकर यांची साहित्य संपदा:

कथा

काचपात्रे, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे इ.

कादंबरी

कादंबरी एक, कादंबरी दोन, मसाज

बालनाट्ये

पाटलाच्या पोरीचं लगीन, चिमणा बांधतो बंगला, चांभारचौकशीचे नाटक   इ.

एकांकिका संग्रह

 रात्र आणि इतर एकांकिका, भेकड आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व.

अनुवादपर नाट्यलेखन

वासनाचक्र, आधेअधुरे, तुघलक

पटकथा

सामना, निशांत, शांतता कोर्ट चालू आहे

या तिनही पटकथाना पुरस्कार मिळाले आहेत.  शिवाय. .

अर्धसत्य, आक्रीत, आक्रोश,

उंबरठा, सिंहासन, कमला, गहराई, प्रार्थना, मंथन, शांतता कोर्ट चालू आहे, 22जून 1897

नाटक

श्रीमंत(1955पहिले नाटक)

माणूस नावाचे बेट, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, मी जिंकलो मी हरलो, कावळ्यांची शाळा, सरी गं सरी , अशी पाखरे येती, गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल आणि शांतता कोर्ट चालू आहे.

शांतता. . . . . . या नाटकानेच त्यांना राष्ट्रीय किर्ती मिळवून दिली. त्याला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक प्राप्त झाले होते.

अशा या चतुरस्त्र लेखकाला मानाचा मुजरा.   🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : मराठी विश्वकोश, विकासपिडीया, विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (6 जानेवारी 1812 –   18 मे 1846) हे मराठीतील आद्य पत्रकार होते. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून ते मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ठरले.

सुरुवातीला घरीच वडिलांकडे त्यांनी मराठी व संस्कृतचा अभ्यास आरंभला.1825 मध्ये मुंबईत येऊन ते बापू छत्रे व बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. शिवाय गणित व शास्त्र यातही त्यांनी प्रावीण्य मिळवले.’बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात ज्ञान कमवून 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून ते नियुक्त झाले.त्यांच्यात पांडित्य व अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता.

बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते.

गणित व ज्योतिष यांत पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नेमणूक झाली.

बाळशास्त्रींना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास या विषयांचे उत्तम ज्ञान होते. म्हणून तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली. या काळात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्या काळात पाठ्यपुस्तके तयार करण्याचे कठीण कामही त्यांनी केले.

बाळशास्त्रींनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांवर शोधनिबंध लिहिले.ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते.

मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हातात दिली.

त्यांनी मराठी भाषेत ‘शून्यलब्धी’ हे पहिले पुस्तक लिहिले.

पारतंत्र्य, तसेच अज्ञान, अंधश्रद्धा वगैरेंनी ग्रासलेल्या समाजाचे प्रबोधन करण्यासाठी गोविंद विठ्ठल कुंटे व भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. या वृत्तपत्रात मराठी व इंग्रजी भाषेत मजकूर असायचा. 6 जानेवारी 1832 ते जुलै 1840 अशी साडेआठ वर्षे हे वृत्तपत्र चालले.

यासोबतच त्यांनी 1840 साली ‘दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना यांत मदत करीत. लोकांची आकलनक्षमता वाढवणाऱ्या या मासिकात ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, निसर्गविज्ञान, व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास वगैरे विषयांवर नकाशे, आकृत्यांसह लेख प्रकाशित करीत. त्यांनी 5वर्षे या मासिकाचे संपादन केले.

जांभेकरांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ची  स्थापना केली.

विधवांचा पुनर्विवाह व वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी त्यांनी विपुल लेखन केले.विधवाविवाहाचा शास्त्रीय आधार शोधून गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा ग्रंथ लिहून घेतला.

आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वी अपेक्षित होता. ते द्रष्टे समाजसुधारक होते.

त्यांनी ‘नेटिव्ह इम्प्रूव्हमेन्ट सोसायटी’ची स्थापना केली. त्यातून ‘स्टुडन्टस लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड वगैरे दिग्गज कार्यरत झाले.

ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची त्यांनी व्यवस्था केली.

फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता.

1840 मध्ये त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’करण्यात आले.

6जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. याच तारखेला त्यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करायला सुरुवात केली. म्हणून महाराष्ट्रात 6जानेवारी हा ‘पत्रकार दिवस’म्हणून साजरा केला जातो.

बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ १७ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

कमल पाध्ये

कमल पाध्ये या वैचारिक लेखन करणार्याड मराठी लेखिका होत्या. त्या माहेरच्या गोठोसकर. मुंबईतील रामवाडीतील विनायक पांडुरंग गोठोसकर यांच्या त्या कन्या. १९४० साली पत्रकार प्रभाकर पाध्ये यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बंध- अनुबंध या त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राला अफाट लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास १८५८ ते १९४७ हे अनुवादीत पुस्तक लिहिले. मूळ पुस्तक ‘द इंडियन मुस्लीम’ हे असून  त्याचे मूळ लेखक आहेत, राम गोपाल. ‘भारतातील स्त्रीधर्माचा आदर्शवाद’ हेही पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 

कमल पाध्ये यांचा आज स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

माधव मनोहर वैद्य 

समीक्षेतील फौजदार असा ज्यांचा दबदबा होता त्या माधव मनोहर यांनी कथा, कादंबरी, नाट्य अशा अन्य साहित्य प्रकारातही लेखन केले होते. इंग्रजी साहित्याचे वाचन केल्यावर त्या साहित्याने ते प्रभावित झाले व मराठी साहित्याची समीक्षा करावी असे वाटल्यामुळे  ते समीक्षेकडे वळले. केसरी, सोबत, नवशक्ती, रत्नाकर, रसरंग अशा विविध दैनिके व नियतकालिकांमधून त्यांनी ललित व समीक्षात्मक लेखन केले. कोणत्याही लेखकाच्या साहित्यातील गुणदोषांकडे ते समान वृत्तीने पहात असत. त्यामुळे त्यांच्या समीक्षेला महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या साहित्याची समीक्षा करावी असे साहित्यिकांना वाटत असे.

त्यांची काही  भाषांतरीत व रूपांतरीत नाटके :

आई,आजोबांच्या मुली,आपण सा-या दुर्गाबाई,चेटूक,प्रकाश देणारी माणसं,रामराज्य   इ.

अन्य साहित्य :

कथा व कादंबरी: आशा,मुलांची शाळा,अन्नदाता,एक आणि दोन,किल्ली  इ.

निवडक साहित्य: पंचमवेध

सन्मान:

विष्णूदास भावे सुवर्णपदक-1981, अ.भा.नाट्यसंमेलन अध्यक्ष, सातारा-1990

16मे 1994ला त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

माधव गोविंद काटकर 

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे जन्मलेले काटकर यांनी बी.ए.बी.टी.शिक्षण पूर्ण केले व शिक्षकी पेशा स्विकारला.त्यांनी कथा,कविता,बालसाहित्य विपुल प्रमाणात लिहीले आहे.

कादंबरी: पडक्या गढीचे गूढ

चरित्र: झुंजार लोकमान्य

कविता: जयजयवंती, मधुधारा,  मनमाधवी

बालकविता: मुलांची गाणी, आटपाट नगरात, गंमतगाणी, पिंपळ पाने, गाजराची पुंगी, चांदण्याचे घर, जमाडी गंमत इ.

बालकथासंग्रह: बोलक्या कथा, मंगल कथा, सुनीती कथा इ.

16 मे 2000 रोजी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, आधुनिक मराठी काव्यसंपदा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

संभाजी सोमा कदम

संभाजी सोमा कदम (5 नोव्हेंबर 1932 – 15 मे 1998) हे प्रतिभावंत व्यक्तिचित्रकार, आदर्श शिक्षक, कलासमीक्षक, कवी, सौंदर्यमीमांसक, संगीताचे अभ्यासक होते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्ट ही पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्याच संस्थेत प्रथम कलाशिक्षक, मग प्राध्यापक व नंतर अधिष्ठाता या पदावर त्यांनी काम केले.नंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन रहेजा कला शाळेत त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले.

व्यक्तिचित्रणामध्ये त्यांनी स्वतःची खास शैली निर्माण केली.व्यक्तिचित्र म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतरंगाला अधोरेखित करणारे चित्रण होय, ही व्याख्या त्यांनी रुजवली.

त्यांनी अनेक प्रदर्शने भरवली.

जे जे स्कूल ऑफ आर्टच्या ‘रूपभेद’ या अंकासाठी ते लेखन करत. काही काळ त्यांनी मराठी विश्वकोशासाठी लेखन व कलासंपादनाचे काम केले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रल्हाद अनंत धोंड यांनी सांगितलेल्या आठवणींचे ‘रापण’ या नावाने कदमांनी केलेले लेखन उल्लेखनीय आहे.

‘मौज’ या नियतकालिकातून ते ‘विरूपाक्ष’ या टोपणनावाने कलासमीक्षा लिहीत.नंतर ते ‘सत्यकथा’मधूनही समीक्षालेखन करू लागले.

‘पळसबन’ हा त्यांचा कवितासंग्रह. त्यातील त्यांच्या कविता खूप आत्मकेंद्रित आहेत.

संगीतातील सौंदर्यशास्त्र या विषयावरही त्यांनी लेखन केले आहे.

चिं. त्र्यं. खानोलकरलिखित ‘आरसा बोलतो’ हे एकपात्री नाटक त्यांनी दिग्दर्शित केले. यात अमोल पालेकर यांची भूमिका होती.

ते एकल हार्मोनियमवादनाचे प्रयोगही सादर करत असत.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, गोवा, नाशिक, खैरागड, म्हैसूर, उदयपूर येथील कलासंस्थांमध्ये त्यांची व्यक्तिचित्रे संग्रहित आहेत.

विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना ‘डॉली करसेटजी पारितोषिक’ मिळाले होते.

दिल्लीच्या आयफॅक्स या कलासंस्थेने त्यांना ‘व्हेटरन आर्टिस्ट’हा पुरस्कार देऊन गौरवले.

प्रा. कदम यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, मराठी विश्वकोश :सुपर्णा कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ मे – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

पां. वा. काणे

भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचा जन्म १८८० साली कोकणातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम इथे झाला. त्यांचं घराणंच वेदशास्त्र पारंगत आणि विद्वत्तेची मोठी परंपरा असलेलं होतं. ते कायदे पंडीत होते, त्याचप्रमाणे धर्मशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. त्यांचं शिक्षण एम. ए. एल.एल. एम. इतकं झालं. त्यांना मराठी, हिन्दी, इंग्रजी, सस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या. १९४७ ते १९४९ ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. ब्रिटीशांनी आपली सत्ता इथे बळकट करताना, इथली संस्कृती, विद्या, प्रथा, समाज इ. ची कुचेष्टा सुरू केली. काणे यामुळे व्यथित झाले. त्यांनी १९२६ साली व्यवहारमयूख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावेळी केलेला अभ्यास, जमवलेली कागदपत्रे व अन्य साधने, आजवरचे धर्माचे आणि कायद्याचे ज्ञान आशा भक्कम तयारीनिशी त्यांनी ’ भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास ‘ हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी हा इतिहास इंग्रजीत लिहिला. त्याचे ५ खंड आहेत. सुमारे ७००० पाने त्यांनी या संदर्भात लिहिली. हा इतिहास आजही जागतिक पातळीवर अचूक व प्रमाण मानला जातो. 

पां. वा. काणे यांची ग्रंथसंपदा –

प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास आणि सामाजिक अभिसरण या 2 अगदी वेगळ्या वाटणार्या् गोष्टींमधून  त्यांनी धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ या नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली प्राच्यविद्येवर ग्रंथ लिहिला. ‘भारतरामायणकालीन समजस्थिती (१९११), धर्मशास्त्राचा विचार (१९३५), हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स हेही त्यांचे महत्वाचे ग्रंथ. प्राचीन भाषा, वाङ्मय, कावी, महाकाव्य, अलंकारशास्त्र, यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरा यांची कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि आशा अनेक पैलूंचे विस्मयकारी मिश्रण त्यांच्या लेखनात झाले आहे. खगोल विद्या, सांख्य, योग,  तंत्र, पुराणे आणि मीमांसा यांचा सखोल अभ्यास करून त्यावर त्यांनी भाष्य लिहिले.

प्राचीन ज्योतिषशास्त्र,  खगोल विद्या, योगशास्त्र, पुराणे, टीका आणि मीमांसा, सांख्य तत्वज्ञान , महाराष्ट्राचा संस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास , नाट्यशास्त्र अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे ४० ग्रंथ, ११५ लेख , ४४ पुस्तक परिचय / परीक्षणे लिहिली यावरून त्यांच्या ज्ञानाचा आवाका केवढा विस्तारीत होता, हे लक्षात येते.

सन्मान आणि गौरव

१ पां. वा. काणे यांना १९४६ साली अलाहाबाद विद्यापीठाने , तर ६० साली पुणे विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली होती.

२. धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला, त्याबद्दल १९५२ साली त्यांना नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार मिळाला.

३. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले.

४. १९६३साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला.

५. ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथाच्या ५ खंडांपैकी ४थ्या खंडाला साहित्य अॅहकॅडमीचा पुरस्कार  १९६५ मध्ये मिळाला.

६. त्यांच्यावर टपाल तिकीट काढले गेले. त्यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त, राजभवन – महाराष्ट्र  इथे महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्या टपाल तिकीटाचे प्रकाशन झाले.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कवी अनिल

आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल  यांचा जन्म ११सप्टेंबर १९०१ मध्ये मूर्तीजापूर इथे झाला. शालेय शिक्षण मूर्तीजापूर इथे झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले. तिथे त्यांचा कुसुम जयवंत यांच्याशी परिचय झाला. त्याचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाची परिणिती विवाहात झाली. ६ ऑक्टोबर १९२९ला त्यांचा विवाह झाला. कुसुमावती स्वत:ही चांगल्या साहित्यिक होत्या. समीक्षक म्हणून त्या पुढे प्रसिद्ध झाल्या. त्यांचा कॉलेजमध्ये असताना झालेला पत्रव्यवहार पुढे ‘कुसुमानिल’ नावाने, त्या मानाने अलीकडे प्रकाशित झालेला आहे. त्यात अनिलांनी सुरूवातीला केलेल्या अनेक कविता वाचायला मिळतात. 

पदवी मिळाल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी ते कलकत्त्याला गेले. तिथे अवनिंद्रनाथ व नंदलाल बसू यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. विधी शाखेची पदवी घेऊन त्यांनी ३५ साली वकिली सुरू केली. ४८ साली मध्य प्रदेश सरकारतर्फे, सामाजिक शिक्षण संस्थेचे उप मुख्याधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ५६ साली दिल्लीच्या राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्राच्या मुख्याधिकारी पदावर व पुढे ६१ साली समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार पदावर त्याची नेमणूक झाली.

१९७९ साली त्यांना साहित्य अकॅडमीची फेलोशिप मिळाली.

कवी अनिल यांचे काव्यसंग्रह

१.  फुलवात – १९३२,  २. भग्नमूर्ती ( दीर्घ काव्य ) – १९३५, ३. निर्वासित चिनी मुलास      ( दीर्घ काव्य ) – १९४३  ४. पेर्ते व्हा – १९४७, ५. सांगाती – १९६१,  ६. दशपदी १९७६ ७. कवी अनिल यांची संपूर्ण कविता ( संपादक श्याम माधव धोंड). या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.

तसेच निर्वासित चिनी मुलास या संग्रहाचे कुसुमावतींनी इंग्रजीत भाषांतर केले आहे.

कवी अनिल यांची लोकप्रिय गाणी –

१. अजुनी रुसून आहे, २. आज अचानक गाठ पडे  ३. कुणी जाल का? संगाला का? ४ गगनी उगवला सायंतारा .

कवी अनिल आणि त्यांचे काव्य यावरील पुस्तके 

१.    कवी अनिल यांची संपूर्ण कविता (संपादक श्याम माधव धोंड).

२.    कवी अनिल यांची साहित्य दृष्टी (प्राचार्य पंडितराव पवार).  

१९५८साली मालवण येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पां .वा. काणे या अलौकिक बुद्धिवंताचा आणि कवी अनिल या प्रतिभावंतांना विनम्र श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ मे – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

विनायक महादेव कुलकर्णी :

विनायक महादेव तथा वि.म.कुलकर्णी यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी या गावात झाला.त्यांनी पुणे विद्यापीठात बी.ए.केले. तेव्हा तर्खडकर सुवर्णपदक प्राप्त केले. मुंबई विद्यापीठातून एम.ए.केले तेही चिपळूणकर पुरस्कार प्राप्त करून. त्यानंतर नाटककार खाडीलकर या विषयात डाॅक्टरेट संपादन केली. त्यांनी काही काळ बेळगाव येथे लिंगराज महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. नंतर सोलापूर येथील दयानंद महविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापन करून तेथूनच निवृत्त झाले. अशी त्यांची जीवनाची वाटचाल होती.

या वाटचालीत त्यांनी शब्दांची साथ सोडली नाही. गद्य, पद्य आणि बालसाहित्य यात ते रमून गेले. विशेषतः काव्य प्रांतातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. भाषेतील सौम्यता आणि अनुभवांची प्रामाणिकपणाने मांडणी ही त्यांच्या  काव्याची वैशिष्ट्ये आहेत. निसर्ग, प्रेमभावना आणि पारंपारिक संस्कृतीचे दर्शनही त्यांच्या काव्यातून दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकातून शिकायला मिळाल्या आहेत. आठवणीसाठी काही कविता अशा :

गाडी आली गाडी आली झुक झुक झुक, माझ्या मराठीची गोडी, लमाणांचा तांडा, ते अमर हुतात्मे झाले, आम्ही जवान देशाचे, माझा उजळ उंबरा, एक दिवस असा येतो … इत्यादी

प्रकाशित साहित्य

बालसाहित्य—

अंगतपंगत, गाडी आली गाडी आली, चंद्राची गाडी, छान छान गाणी, नवी स्फूर्तीगीते, फुलवेल    इ.

काव्यसंग्रह

अश्विनी, कमळवेल, प्रसाद रामायण, भाववीणा, मृगधारा, पाउलखुणा,विसर्जन  इ.

अन्य साहित्य

मला जगायचय..कादंबरी

न्याहरी..कथासंग्रह

गरिबांचे राज्य..चित्रपट कथा

पेशवे बखर,मराठी सुनीत,रामजोशी कृत लावण्या…संपादित…..इत्यादी

प्राप्त पुरस्कार

गदिमा पुरस्कार, भा.रा.तांबे पुरस्कार, दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार, उत्कृष्ट प्राध्यापक…राज्य शासन पुरस्कार

शब्दांची कमळवेल फुलवून भाववीणा छेडीत जाणारा हा कवी कवितांच्या पाऊलखूणा मागे सोडत तेरा मे दोन हजार दहा ला निधन पावला.त्यांच्या साहित्य प्रतिभेस आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, आधुनिक मराठी काव्यसंपदा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

धनंजय कीर

अनंत विठ्ठल ऊर्फ धनंजय कीर (23 एप्रिल 1913 – 12 मे 1984) हे नामांकित चरित्रकार होते.

त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला.

पुढे ते मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एज्युकेशन कमिटीत नोकरी करून लागले.

ते ‘फ्री हिंदुस्थान’मध्ये लिहू लागले.

त्यांनी प्रथम सावरकर व नंतर आंबेडकरांचे चरित्र लिहिले. पुढे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व महात्मा गांधी यांचीही चरित्रे लिहिली.

याशिवाय त्यांनी ‘लोकमान्य टिळक आणि राजश्री शाहू महाराज : एक मूल्यमापन’, ‘तीन महान सारस्वत’, ‘ ह्यांनी इतिहास घडविला’, ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ (आत्मचरित्र) वगैरे मराठी, तसेच ‘Dr. Ambedkar :Life and Mission’, ‘Lokmanya Tilak :Father of Indian Freedom Struggle’ वगैरे अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली.

1971मध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाने 1980 साली त्यांना ऑनररी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

रत्नागिरीमधील मंदिराचे बांधकाम चालू असताना कीरांना सावरकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

☆☆☆☆☆

अशोक पाटोळे

अशोक पाटोळे (5जून 1948 – 12 मे 2015) हे नाटककार, कथाकार, पटकथाकार वगैरे होते.

‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ ही त्यांची पहिली एकांकिका. नंतर त्यांनी विनोदी व हृदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करून नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. यानंतर त्यांनी  ‘आई रिटायर होते’, ‘एक चावट संध्याकाळ’, ‘जाऊबाई जोरात’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘श्यामची मम्मी’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘बा रिटायर थाय छे'(गुजराती) वगैरे 24 नाटके लिहिली. ती सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांची अनेक नाटके हिंदी, गुजरातीतही यशस्वी ठरली.

पाटोळेनी दूरचित्रवाणीसाठी लिहिलेल्या ‘अधांतर’, ‘अध्यात ना मध्यात’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘हद्दपार’, ‘ह्यांचा हसविण्याचा धंदा’ वगैरे मराठी मालिका, तसेच ‘चुनौती’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘ हसरते’ या हिंदी मालिका खूपच गाजल्या.

‘चौकट राजा’, ‘झपाटलेला’, ‘माझा पती करोडपती’, ‘शेजारी शेजारी’या गाजलेल्या चित्रपटांच्या  पटकथा आणि संवाद पाटोळेनीच लिहिले होते.

याव्यतिरिक्त त्यांनी ‘एक जन्म पुरला नाही'(आत्मचरित्र), ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'( कथासंग्रह) व ‘पाटोळ्यांच्या पाचोळ्या'( कवितासंग्रह) ही पुस्तकेही लिहिली.

अनुपम खेर यांच्या ‘कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखनही पाटोळेनीच केले होते.

याव्यतिरिक्त त्यांना चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही आवड होती.

त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार,कोणतेही धार्मिक अंत्यसंस्कार न करता त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले.

☆☆☆☆☆

तारा वनारसे

डॉ. तारा वनारसे (13 मे 1930 – 12 मे 2010) या निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ, कथाकार, कवयित्री, कादंबरीकार होत्या.

लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ ऑबस्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजी’ची फेलोशिप त्यांना मिळाली होती.

डॉ. बेनेडिक्ट रिचर्ड्स यांच्याशी लग्न करून त्या इंग्लंडला स्थायिक झाल्या. तिथल्याही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी योगदान दिलं होतं.

रामायणाच्या पार्श्वभूमीवरील व शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली त्यांची ‘श्यामिनी’ ही कादंबरी लक्षवेधी ठरली. शूर्पणखेच्या प्रेमकहाणीला एक उदात्त रूप देऊन आर्य-अनार्य संघर्षाला एक वेगळा अर्थ देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यात केला आहे.

वनारसेंची ‘पश्चिमकडा’, ‘कक्षा’, ‘केवल कांचन’, ‘गुप्त वरदान’, ‘तिळा तिळा दार उघड’, ‘सूर'(कादंबरी), ‘नर्सेस क्वार्टर्स’ (एकांकिका) वगैरे पुस्तके प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या ‘बारा वाऱ्यांवरचे घर’ या काव्यसंग्रहाला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला होता.

12 मे 2010ला हंपस्टीडमध्ये त्यांचे निधन झाले.

धनंजय कीर, अशोक पाटोळे तारा वनारसे यांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares