ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ एप्रिल – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्राचार्य विजय  प्रल्हाद देव   

प्राचार्य विजय  प्रल्हाद देव यांचा जन्म १९४१ साली झाला. राज्यशास्त्राचं त्यांनी ३५ वर्षे अध्यापन केलं. सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये ते दोन वेळा प्राचार्य झाले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र. इतिहास, दुर्गसंपदा इ. विषयांवर त्यांनी लेखन केलं.

गो.नि.दांडेकरांचे ते जावई, लेखिका वीणा देवचे पती व सुप्रसिद्ध मृणालिनी कुलकर्णींचे वडील.

विजय देव यांची काही पुस्तके 

१.आत्मानुभूती (आत्मचिंतान), २.आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत , ३. दुर्गचिंतन, ४. दुर्गयात्रा , ५ कौटिल्याच्या यथार्थ तूलनेत मॅकिव्हेली, ६ राज्यजिज्ञासा (स्पर्धा परीक्षेसाठी क्रमिक पुस्तक), ७.श्री शिवछत्रपती : एक स्मरण, ८ हृदयपालट ( कादंबरी)

आज विजय देव यांचा स्मृतीदिन ( ११एप्रील २०१९ ) त्यांच्या स्मृतीला सादर वंदन. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ९ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शंकरराव रामचंद्र खरात

शंकरराव रामचंद्र खरात(11 जुलै 1921 -,9 एप्रिल 2001) हे मराठी लेखक व इतिहासकार होते.

खरात हे आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते.

‘मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे,’असं ते म्हणत.

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांत ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र, ‘बारा बलुतेदार’, ‘मसालेदार गेस्ट हाऊस’, ‘आज इथे तर उद्या तिथे’, ‘टिटवीचा फेरा’ अशा अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह व ललितलेखसंग्रहाचा समावेश आहे.

‘शंकरराव खरातांचं कथाविश्व’ हे संदीप सांगळे यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

ते काही वर्षे ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकाचे संपादक होते.

1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

ते बँक ऑफ इंडियाचे संचालक  व ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन होते.

अशोकजी परांजपे

अशोक गणेश परांजपे (मृत्यू :9 एप्रिल 2009) हे मराठी गीतकार  व मुंबईमधील महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते.

ते मूळ सांगली जिल्ह्यातील हरीपूरचे.

त्यांनी भक्तीगीत, भावगीत, लावणी, गण-गवळण, नाट्यगीत या विविध प्रकारची गीते लिहिली.

इंडियन नॅशनल थिएटर रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या खेड्यांमध्ये जाऊन तेथील लोककलावंतांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. त्या संदर्भात त्यांनी 1986 मध्ये आनंदवन येथे महाराष्ट्र आदिवासी कलामहोत्सव व 1992मध्ये पंढरपूर भक्तीसंगीत महोत्सव आयोजित केले. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली व ऑस्ट्रियातल्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हिडीओग्राफी या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने परांजपेंना सभासदत्व दिले. त्यानंतर परांजपेंनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लँड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.

त्यांनी ‘संत कान्होपात्रा’,’बुद्ध इथे हरला आहे’ वगैरे चार नाटके लिहिली.

त्यांनी लिहिलेली ‘अवघे गर्जे पंढरपूर ‘, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘एकदाच यावे सखया ‘, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘नाविका रे ‘ वगैरे अनेक गीते लोकप्रिय झाली.

‘नाविका रे ‘या गीताला 1975 सालचा ‘बेस्ट सॉंग’ हा पुरस्कार मिळाला.

 

शंकरराव रामचंद्र खरात व अशोक जी परांजपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मुक्त ज्ञानकोश.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ७ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ७ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

एकाहून एक सरस आणि अर्थपूर्ण भावगीतांची देणगी मराठीला देऊन मराठी काव्य संपन्न करणारे कवी राजा नीळकंठ बढे यांचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरात झाले. पंजाब विद्यापिठातून मॅट्रीक झाल्यानंतर काही काळाने त्यांनी दै. सकाळ मध्ये उमेदवारी केली. पुन्हा नागपूरला  जाऊन दै. महाराष्ट्र मध्ये सहसंपादक म्हणून काम केले. तसेच बागेश्वरी मासिक व साप्ताहिक सावधान मध्ये संपादकीय कामकाज पाहिले. नंतर 1956 ते 1962 या काळात मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत निर्माता म्हणून काम केले.

राजा बढे यांची ग्रंथ संपदा:

अशी आहे गंमत, मंदिका, मखमल, माझिया माहेरा जा, योजनगंधा, रसलीना, लावण्यलळीत, वर्खाचा विडा, शृंगार श्रीरंग इ.

बढे यांची काही लोकप्रिय गीते :

चांदणे शिंपित जाशी, जय जय महाराष्ट्र माझा, घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला, माझिया माहेरा जा, सृजनहो परिसा रामकथा, हसतेस अशी का मनी, कळीदार कपूरी पान, तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग, त्या चित्तचोरट्याला का आपले म्हणू मी, मी जाया धर्ममया, हसले मनी चांदणे इ.

त्यांच्या लोकप्रियतेमुळेच मुंबई येथील एका चौकाला व महाल पेठ, नागपूर येथील एका चौकाला कवी राजा बढे चौक असे नाव देण्यात आले आहे.

रसिकांच्या मनावर आरूढ झालेले  राजा 07/04/1977 ला स्वर्गवासी झाले.

☆☆☆☆☆

डाॅ. सदाशिव शिवदे : 

डाॅ. सदाशिव सखाराम शिवदे हे व्यवसायाने पशूवैद्यक असले तरी इतिहासाच्या आवडीमुळे लेखनाकडे वळले. मराठी व इतिहास हे विषय घेऊन त्यांनी एम्. ए. केले. एकीकडे व्यवसाय व दुसरीकडे लेखन चालूच होते. त्यांनी इतिहास विषयक सुमारे सव्वीस पुस्तके लिहिली आहेत. त्यातील ज्वलज्वलनतेजस संभाजी राजा या पुस्तकास न. चि. केळकर ग्रंथालयाचा साहित्य साधना पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी सेनापती धनाजी जाधव, हंबीरराव मोहिते, कान्होजी आंग्रे, सईबाई, मोरोपंत पिंगळे इत्यादींची चरित्रे लिहीली आहेत. याशिवाय परमानंदकाव्यम् ‘ महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग 1 व 2 , मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था(अनुवादित), माझी गुरे, माझी माणसे  अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांना स्वामीनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

07/04/2018 रोजी त्यांचे निधन झाले.

कवीराज राजा बढे आणि इतिहासप्रेमी डाॅ. शिवदे यांच्या स्मृतीस अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ६ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गोपाळ गोविंद मुजुमदार

गोपाळ गोविंद मुजुमदार – पाटणकर (साधुदास) (1883 – 6एप्रिल 1948) हे कवी व कादंबरीकार होते.

त्यांचा जन्म व शालेय शिक्षण सांगलीत झाले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना शिक्षण अर्धवट सोडून ते सांगलीला परतले व नोकरी करू लागले.

‘साधुदास’ या नावाने त्यांनी काव्यरचना व अन्य लिखाण केले.

रामकथा चार भागात सांगण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘विहारे’ नावाची काव्यरचना केली. पण ते फक्त तीनच विहार  पूर्ण करू शकले.

त्यांच्या ‘पौर्णिमा’ या कादंबरीत शनिवारवाड्याचे यथातथ्य वर्णन आले आहे.

साधुदास यांनी लिहिलेली पुस्तके :

काव्ये : गृहविहार, रणविहार, वनविहार 

स्तोत्रे : कृष्णालहरी, भीमशती, रामशती, सद्गुरूशती, सीताशती

स्फुटकाव्ये : निर्माल्यसंग्रह भाग 1,2.   महायुद्धाचा पोवाडा

कादंबऱ्या : 1. पौर्णिमा -पूर्वरात्र

  1. पौर्णिमा -उत्तररात्र
  2. मराठेशाहीचा  वद्यपक्ष -प्रतिपदा -पूर्वरात्र व उत्तररात्र

      4.मराठेशाहीचा वद्यपक्ष – द्वितीया-  पूर्वरात्र व उत्तररात्र

अन्य पुस्तके : 1. मराठीची सावट भाग 1 व 2

  1. बुद्धिबळाचा मार्गदर्शक

पाठ्यपुस्तकातील मुलांच्या आवडत्या कविता :

  1. पडू आजारी मौज हीच वाटे भारी
  1. नाकेला अन गुलजार

साधुदासांच्या स्मृतिदिनी त्यांना सादर अभिवादन. 🙏🏻

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ४ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आत्माराम नीळकंठ उर्फ आनंद साधले.

महाभारत या ग्रंथाला अनुसरून अनेक भाषांमध्ये अनेक लेखकांनी लेखन केले आहे. पण युधिष्ठीर अर्थात धर्मराजाला खलनायक बनवण्याचे धाडस केले ते आनंद साधले यांनी. ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ या आपल्या कादंबरीतील त्यांनी युधिष्ठीराला खलनायक बनवल्यामुळे त्यांच्यावर सुरूवातीला भरपूर टीका झाली. पण नंतर त्यांचे रोखठोक विश्लेषण लोकांना पटू लागले व या कादंबरीने लोकप्रियता मिळवली. रोखठोक, स्पष्ट, मुद्देसूद मांडणी हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. ‘आनंदध्वजाच्या कथा’ या पुस्तकातही त्यांनी धीट भाषेत, शृंगाररससंपूर्ण    लेखन केले आहे. ‘मातीची चूल’ हे त्यांचे आत्मचरित्र देखील यामुळेच गाजले. याशिवाय त्यांनी गीतगोविंद, दहा उपनिषदे दोन भाग, महाराष्ट्र रामायण ही पुस्तके लिहीली आहेत. तसेच रुक्मिणी स्वयंवर हे नाटक व लहान मुलांसाठी इसापनीती व हितोपदेश यांचे लेखन केले आहे.

चार एप्रिल 1996 ला वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले.त्यांनी सुमारे साठ पुस्तकांचे लेखन केले आहे.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन! 🙏🏻

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ एप्रिल – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ३ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

वासुदेव विष्णू मिराशी

महामहोपाध्याय वासुदेव विष्णू मिराशी (13 मार्च 1893 -3 एप्रिल 1985) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ञ होते.

त्यांनी एमएपर्यंत प्रथम वर्ग पटकावला. पुढे त्यांनी एलएलबीही केले.

त्यांनी वेगवेगळ्या कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ ते नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर मानव्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळा’च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील संशोधन  मराठीत लिहून ते विदर्भ संशोधन मंडळाच्या नियतकालिकातून प्रकाशित केले.

प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य  ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. त्यांचा अभ्यास करून त्यांनी 1934मध्ये मांडलेल्या रामटेक म्हणजे मेघदूतातील रामगिरी ह्या सिद्धांताला 1980 साली वाकाटककालीन मंदिरात सापडलेला शिलालेख पूरक ठरला. अजिंठ्याच्या लेणे क्र.16 येथील वाकाटक लेखाचे वाचन करून त्यांनी वाकाटक वंशावळ निश्चित केली. त्यांच्या प्रदीर्घ, सखोल संशोधनाचा गौरव म्हणून त्यांना ‘वाकाटकांच्या इतिहासाचे अधिकारी’ म्हणण्यात येते.

अकोल्यातील नाणेनिधीचा अभ्यास करून त्यांनी तोपर्यंतच्या  साहित्यात उल्लेख नसलेल्या तीन नवीन सातवाहन राजांचा शोध लावला.

‘कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकॅरम’ या ग्रंथमालेचे मिराशी हे पहिले भारतीय संपादक होते. त्या नियतकालिकेतील परंपरेतूनच त्यांनी ‘कलचुरी नृपती  आणि त्यांचा काल ‘ इत्यादी प्राचीन राजवंशावरील अनेक ग्रंथ लिहिले.

त्यांनी प्रारंभी मराठीतून व नंतर इंग्रजीतून ग्रंथलेखन केले. त्यांचे सुमारे 38 ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनात्मक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या अनेक ग्रंथांची हिंदी, ओडिया, कन्नड वगैरे प्रादेशिक भाषांतून भाषांतरे झाली आहेत.

मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली. सागर, नागपूर, मुंबई, वाराणशी या विद्यापीठांची सन्माननीय डी. लिट. पदवी, तत्कालीन ब्रिटिश सरकारची ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद (1956) व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन (1961) यांच्या हस्ते ताम्रपट, व भारत सरकारतर्फे पद्मभूषण (1975) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले.

उद्धव शेळके

उद्धव ज. शेळके (8 ऑक्टोबर 1930 – 3एप्रिल 1992)हे कादंबरीकार होते. ते अमरावती जिल्ह्यातील होते.

वैदर्भीय ग्रामीण जीवनाचं आणि विविध जातीधर्मातल्या स्त्रियांचं व उपेक्षितांचं प्रत्ययकारी चित्रण हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं.

‘शिळान’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह.

ग्रामीण जीवनावरील ‘धग’, वारांगनांच्या आयुष्यावरील वैदर्भीय बोलीभाषेचा वापर असलेली ‘डाळींबाचे दाणे ‘, तसंच  ‘धुंदी’, ‘पुरुष’, ‘नांदतं घर’, ‘गोल्डन व्हिला’, ‘निर्माता’ वगैरे अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

काही काळ शेळकेनी ‘वैशिष्ट्य’ हे मासिक चालवलं.1971 पासून 5वर्षं ते पाठ्यपुस्तक मंडळाच्या ‘किशोर’या लोकप्रिय मासिकाचे संपादक होते.

‘धग’ या कादंबरीसाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तिचं ‘मैलाचा दगड’ असं कौतुक केलं गेलं.

म. म. वासुदेव विष्णू मिराशी व उद्धव ज.शेळके यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. 🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मराठी विश्वकोष,

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ एप्रिल – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

वसंत नारायण उर्फ राजा मंगळवेढेकर:

राजा मंगळवेढेकर हे प्रामुख्याने मराठीतील बालसाहित्यकार व चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.साने गुरुजींच्या सहवासामुळे ते बालसाहित्याकडे वळले.कथा,चरित्रे,कविता,विज्ञान ,पर्यावरण असे विविध प्रकारचे लेखन विपुल प्रमाणात केले आहे.

मंगळवेढेकर यांची साहित्य संपदा:

आपला भारत (पुस्तक मालिका)

कुमार संस्कार माला(पुस्तक मालिका)

आवडत्या गोष्टी

कथा आणि कथाकथन

करी मनोरंजन मुलांचे

कहाणी एका प्रयोगाची

तळ्याकाठची अप्सरा

तेनालीरामाच्या चातुर्यकथा

देशोदेशींच्या कथा

प्रियतम भारत इ.इ.इ.

इंदिरा गांधी,पंडित नेहरू,साने गुरुजी,बाबासाहेब आंबेडकर,म.गांधी,समर्थ रामदास,डाॅ.राधाकृष्णन्,गौतम बुद्ध इत्यादींची चरित्रे.

बिनभिंतीची उघडी शाळा(ललित)

वेडगाणी(कविता)

बालनाट्ये:

चतुराई,बनवाबनवी

गीते:

असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला

उर्मिले त्रिवार वंदन तुला

कोणास ठाऊक कसा पण शाळेत

सती तू दिव्यरूप मैथिली

प्राप्त पुरस्कार:

गदिमा पुरस्कार

जवाहरलाल नेहरू स्मृती पुरस्कार

बालसेवा पुरस्कार

बाल आनंद पुरस्कार

बाबुराव शिरोळे बालसाहित्य पुरस्कार

एक एप्रिल 2006 रोजी श्री.मंगळवेढेकर यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

विजया जहागिरदार :

मराठीतील प्रसिद्ध लेखिका,कवयित्री व बालसाहित्यकार विजया जहागिरदार या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.आपल्या लेखणीतून त्यानी  मनोरंजक भाषेतून विज्ञान समजावून सांगितले.त्यांच्या काही पुस्तकांचे आकाशवाणीवरून वाचन झाले आहे.विसाव्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.

कथासंग्रह::

अग्निक्षण,कालचक्र,केसरपक्षी,तिने काय करावे?,वेंधळी इ.

कादंबरी::

अर्धविराम,आत्मसाक्षी,नियंती,

मनगुंफा,रणयोगिनी,उद्रेक इ.

काव्यसंग्रह::

आकाश मोगरा,काव्य कोडी,शाकुंतल स्त्री नक्षत्र इ.

बालसाहित्य::

टिम टिम टिकली, निर्मळ कहाण्या,भिरभिरं इ.

बालकविता::

खडीसाखरेचे वेल,छुम छुम गाणी,जा बै आई,फजितवाडा इ.

पुरस्कार::

मध्य प्रदेश साहित्य अकादमीचा

भा.रा.तांबे पुरस्कार ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकास.

उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार..महाराष्ट्र राज्य ‘लपाछपी’या पुस्तकास

तसेच ‘हिरकण्या’ व ‘भिरभिरं’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

एक एप्रिल 2020 रोजी त्यांचे सोलापूर येथे निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

संजीवनी मराठे :

संजीवनी मराठे यांनी ललित लेखन,काव्य,बालसाहित्य  आणि गीत लेखन अशा अनेक प्रांतात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.काव्यलेखन तर त्यांनी शालेय जीवनापासूनच सुरू केले होते.कोल्हापूर येथे भरलेल्या साहित्यसंमेलनात 1932साली त्यांनी कविता सादर करून या क्षेत्रात प्रवेश केला.त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वतः काव्यगायन करून कविता सादर करत असत.त्यांच्या काव्यावर भा.रा.तांबे व रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव दिसून येतो.त्यांच्या बालगीतातून बालकांची निरागसता व्यक्त होते.त्यांच्या भावगीतांनी मराठी रसिकाला एके काळी मंत्रमुग्ध केले होते.त्यांच्या कविता आणि गीतांमुळे त्या आजही रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहेत.

संजीवनी मराठे यांचे साहित्य:

कवितासंग्रह–

काव्यसंजीवनी,राका,संसार,छायाचित्रा,चंद्रफूल, मी दिवाणी,आत्मीय इ.

बाल साहित्य—-

इच्छामणी आणि इतर गोष्टी, बरं का गं आई,माझाभारत,माणिकमोती, हसू बाई हसू  इ.

अन्य—

अंजू..संपादित पत्रसंग्रह

ट्युलिप्सच्या देशातून..संपादित पत्रसंग्रह.

मराठी साहित्य दर्शन…ललित लेखन दहा भाग.

ध्वनिमुद्रित गीते—-

विठ्ठला,आळविते मी तुला, सत्यात नाही आले, हसतिल मजला कबीर मीरा, शांत सागरी कशास उठविलीस वादळे, या गडे हासू या   इत्यादी

बरं का गं आई आणि हसू बाई हसू या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.

एक एप्रिल 2000 रोजी संजीवनी मराठे यांचे निधन झाले.

राजा मंगळवेढेकर,विजया जहागिरदार व संजीवनी मराठे या तिनही साहित्यिकांचे निधन वेग वेगळ्या   वर्षी पण एक

एप्रिललाच झाले आणि हे तिघेही बालसाहित्याशी निगडीत होते.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया. मराठीसृष्टी.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ३१ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दत्तात्रय बळवंत पारसनीस

रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस (27नोव्हेंबर 1870 -31मार्च 1926) हे इतिहाससंशोधक वं ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. त्यांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले होते.

जानेवारी 1887मध्ये त्यांनी ‘सुभाष्यचंद्रिका’ हे मासिक काढले. सहा अंक निघाल्यानंतर 1887मध्ये सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र कोकिळ’ या मासिकात ते समाविष्ट केले. त्या मासिकांतून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत असत.

‘भारतवर्ष’ आणि ‘इतिहास संग्रह’ नावाची नियतकालिके त्यांनी चालू केली. त्यांतून त्यांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.

त्यांच्या प्रेरणेने वं प्रयत्नांनी सातारा येथे ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. पुढे 1939 साली ते पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलवण्यात आले. त्यांच्या संग्रहात मराठेशाहीतील, विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अस्सल कागदपत्रे, जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोशाख-पेहेराव आदींचे नमुने, ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते वगैरे होते.

त्यांनी विपुल लेखन केले. ‘अयोध्येचे नबाब’, ‘ महादजी शिंदे याजकडील राजकारणे -5खंड’, ‘सवाई माधवराव पेशव्यांचा दरबार ‘वगैरे 12 मराठी पुस्तके, तसेच त्यांनी संपादित केलेली काही पुस्तके, त्याचप्रमाणे ‘दि सांगली स्टेट’ वगैरे विविध ऐतिहासिक स्थळविषयक माहिती देणारी 5इंग्रजी पुस्तके, ‘अ हिस्टरी ऑफ द मराठा पीपल – 3खंड (सहलेखक :सी. ए. किंकेड), ‘ट्रीटीज, एंगेजमेंटस अँड  सनदज, बॉम्बे’ (सहसंपादक :पी. व्ही. मावजी व जी. सी. लाड) हे इंग्रजी ग्रंथ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

पारसनीसांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मानाचा मुजरा.  🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया,

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ मार्च – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  २९ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी.

पां.गो.पारखी हे मागच्या शतकातील मराठीतील कवी व निबंधकार होते. त्यांनी पुणे येथे संस्कृत पाठशाळेत अध्ययन केले होते.

कालिदासाचे संस्कृत ॠतूसंहार वर आधारित त्यांनी षड़्ऋतूवर्णन हे पुस्तक लिहिले.तसेच अनेक ताम्रपट, शिलालेख, चिनी प्रवाशांचे ग्रंथ इत्यादीचा अभ्यास करून निबंधलेखन केले आहे.त्यांनी भावगुप्तपद्म या टोपणनावाने काव्य लेखनही केले आहे.

पांडुरंग शास्त्री यांची ग्रंथसंपदा:

बाणभट्ट याच्या संस्कृत ‘कादंबरी’चे भाषांतर.

काव्य– अलंकारार्पण, कृष्णकुमारी,बोधामृत, श्रीकृष्णलीला

कादंबरी– मंजुघोषा,मुक्तामाला,

निबंध– बाणभट

याशिवाय अनेक इंग्रजी ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे.

 29मार्च1911रोजी पांडुरंग गो. पारखी यांचे निधन झाले.

 

 डाॅ.पद्माकर विष्णू वर्तक:

श्री.वर्तक हे  व्यवसायाने डाॅक्टर होते. एम.बी.बी.एस.झाल्यानंतर त्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये एम.डी.केली.शल्यचिकित्सका अभ्यास केला. काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यावर त्यांनी रामायण आणि महाभारताचे संशोधन यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. ऋग्वेद,महाभारत यांचा अभ्यास करून रामायणाचा काळ ठरवला. त्यांनी अध्यात्म व योग यांच्या संशोधनेसाठी ‘अध्यात्म संशोधन मंदिर’ स्थापन केले. तसेच प्राचीन भारतीय विज्ञानाचा शोध घेण्यासाठी ‘वेद विज्ञान मंडळ’ स्थापन केले.

वर्तक यांची ग्रंथसंपदा:

वास्तव रामायण

स्वयंभू(महाभारतावर आधारित)

तेजस्विनी द्रौपदी

युगपुरूष श्रीकृष्ण

पातंजल योग

दास मारूती? नव्हे, वीर हनुमान

संगीत दमयंती परित्याग(नाटक) इत्यादी

29मार्च2019 ला श्री.वर्तक यांचे निधन झाले.

 

शंकर नारायण जोशी :

श्री.शंकर नारायण जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे झाला.त्यांचे शिक्षण  पाचवड,कुरंदवाड,जमखंडी येथे झाले.परंतु वडिलांच्या निधनामुळे त्यांना इंग्रजी तिसरीतच शिक्षण सोडावे लागले.नंतर पुणे येथे ज्ञानप्रकाश  व आर्यभूषण छापखान्यात त्यांना मुद्रित तपासणीचे काम मिळाले. या कामामुळेच त्यांना वाचनाची व विशेषतः इतिहास वाचनाची गोडी लागली.त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला.लोकमान्यांच्या दौ-याच्या वेळी ते लोकमान्यांचे स्वयंसेवक म्हणून काम करू लागले.1916 मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांना काम मिळाले व त्यांचा इतिहासाचा अभ्यास सुरू झाला.इतिहास विषयक सूची व शकावल्या तयार करण्याचे किचकट काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.मध्ययुगीन ग्रामव्यवस्था,वतनदार,

राज्यव्यवस्था याविषयी संशोधन करून शोधनिबंध सादर केले.याशिवाय शिवाजी महाराजांवर व अनेक थोर व्यक्तींवर त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली.

शं. ना. जोशी यांची ग्रंथसंपदा:

मुळशी पेट्यासंबंधी ऐतिहासिक माहिती

राजवाडे लेखसंग्रह(संपादन)

राजवाडे लेख संग्रह संकीर्ण निबंध भाग 1 व 2

शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड 3

शिवचरित्र साहित्य खंड 5

संभाजी कालीन पत्रसारसंग्रह

मराठेकालीन समाजदर्शन इ.इ.

 

कै.शं.ना.जोशी,पद्माकर वर्तक व पांढरा.गो.पारखी यांचा आज  स्मृतीदिन.या तीनही अभ्यासू,संशोधक साहित्यिकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ मार्च – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गंगाधर विठोबाजी पानतावणे

गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक होते. ते आंबेडकरी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य समेलन (आनंदवन  – वरोरा ), मराठवाडा साहित्य समेलन यांचेही अध्यक्ष होते. ते पद्मश्री पदवीचेही मानकरी होते.

पानतावणे हे वैचारिक साहित्याचे निर्माते होते. अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. अनेक लेखक-कवींच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बाबासाहेबांकडून बौद्ध धम्मची दीक्षा घेतली. बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर ‘पत्रकार बाबासाहेब आंबेडकर’ हा शोध प्रबंध लिहिला. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

दलित साहित्याने अंधार नाकारला आहे. कलंकित भूतकाळ नाकारला आहे.मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,’ अशा शब्दात दलित साहित्याची पाठराखण त्यांनी केली आहे.

दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या ‘अस्मितादर्श’ या वाङ्मयीन नियतकालिकाचे ते संस्थापक संपादक होते. ५० वर्षे त्यांनी हे काम केले. या नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक मराठी साहित्यविश्वाला दिले. त्यांनी दलित लेखक-वाचक मेळावेही भरवले होते.

साहित्य, समाज आणि संकृती या विषयावरील २० वैचारिक पुस्तके आणि संशोधनपर ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. याशिवाय १२ पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी शोधांनिबंध वाचले आहेत. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज,  यांच्या विचारधारेतून त्यांचे लेखन झाले आहे. वसंत व्याख्यानमाला व आणि विविध व्याख्यानमाला यातून त्यांनी अनेक व्याख्याने दिली.

गंगाधर पानतावणे यांची काही पुस्तके –

१. आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, २.  साहित्य निर्मिती चर्चा आणि चिकित्सा,    ३. साहित्य प्रकृती आणि प्रवृत्ती, ४. अर्थ आणि अन्वयार्थ (समीक्षा), ५. चैती, ६. दलित वैचारिक वाङ्मय( समीक्षा),  ८. लेणी व ९. स्मृतिशेष (व्यक्तिचित्रे), १०. वादळाचे वंशज ११. विद्रोहाचे पाणी पेटले

गंगाधर पानतावणे यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान –

१. मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार, २. आण्णाभाऊ साठे पुरस्कार, ३. आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार, ४. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय पुरस्कार ( लंडन) , ५ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार ६. अखिल भारतीय दलित अॅरकॅडमीचा बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, ७ किर्लोस्कर जन्मशताब्दी, कुसुमताई चव्हाण, दया पावार पंजाबराव देशमुख, फडकुले, इ. अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. ८. दलित साहित्य अॅाकॅडमीची गौरववृत्ती, फाय फाउंडेशन गौरववृत्ती त्यांना मिळाली आहे, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली होती. १०. रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७चा. त्यांना २६ जानेवारी २०१८ला पद्मश्री जाहीर झाली. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पदवीदान समारंभाला प्रत्यक्ष हजार राहू शकले नाहीत.

गंगाधर पानतावणे यांचे कार्य विपुल आणि विस्तृत होते, त्यामुळे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही लक्षणीय आहे.

☆☆☆☆☆

डॉ.मधुकर केशव ढवळीकर

डॉ.मधुकर केशव ढवळीकर यांचा जन्म १६ मे १९३०चा. हे पुरातत्व विभागात संशोधक होते. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरूवात केली. पुरातत्वशास्त्राच्या अध्यापनात संशोधनाला अतिशय महत्व आहे. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला येथे उत्खनन करण्यासाठी मुद्दाम पाठवले होते.

इनामगावाचा उत्खनन प्रकल्प, हे ढवळीकर यांचे नावाजलेले प्रमुख कार्य. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये संचालक म्हणून १९९० पर्यन्त ते कार्यरत होते.

डॉ.मधुकर ढवळीकर यांची काही पुस्तके-

१. आर्यांच्या शोधत, २. कोणे एके काळी हिंदू संस्कृती, ३. श्री गणेश आशियाचे आराध्य दैवत, ४. नाणकशास्त्र, ५. पर्यावरण आणि संस्कृती, ६. पुरातत्वविद्या.

त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकेही लिहिली.

ढवळीकर यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान –

१.    इंडियन आर्कियालॉजी सोसायटीच्या वाराणसीयेथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.

२.    इंडियन हिस्ट्री कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते.

३.    टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी. लिट. ही मानद पदवी त्यांना मिळाली होती.

४.    पंतप्रधानांचे सुवर्णपदक त्यांना मिळाले होते.

५.    त्यांना पद्मश्री ही पदवीही मिळाली होती.

गंगाधर पानतावणे आणि डॉ.मधुकर ढवळीकर या दोघाही आपापल्या क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या स्मृतिदिनी मन:पूर्वक मानवंदना.  ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print