यह ई-अभिव्यक्तिपरिवार ( ई- अभिव्यक्ति – हिन्दी/मराठी/अंग्रेजी) के परिश्रम एवं आपके भरपूर प्रतिसाद तथा स्नेह का फल है जो इन पंक्तियों के लिखे जाने तक आपकी अपनी वेबसाइट पर 5,43,755+ विजिटर्स अब तक विजिट कर चुके हैं।
संपादक की कलम से …. शुक्रिया 2023 श्री जयप्रकाश पाण्डेय
शुक्रिया उन लोगों का,
जो हमसे प्यार करते है..
क्योंकि
उन लोगों ने हमारा दिल,
बड़ा कर दिया..
शुक्रिया उन लोगों का,
जो हमारे लिए परेशान हुए..
क्योंकि
वो हमारा बहुत ख्याल रखते है..
शुक्रिया उन लोगों का,
जो हमारी जिंदगी में शामिल हुए,
और हमें ऐसा बना दिया,
जैसा हमने सोचा भी नही था..
जय प्रकाश पाण्डेय (संपादक – ई-अभिव्यक्ति – हिन्दी)
☆ युगांत – (हिन्दी भावानुवाद) – डॉ प्रतिभा मुदलियार (मूल मराठी लेखक – डॉ विनोद गायकवाड) ☆ हेमन्त बावनकर ☆
प्रिय मित्रो,
डॉ विनोद गायकवाड जी के शब्दों में – “महाभारत यानी कभी भी खतम न होनेवाली अक्षय सुवर्ण की खान! कोई भी उसमें से कितना भी सोना निकाल कर ले जाए पर यह खान कभी खतम नहीं होती। महाभारत के दो सर्वश्रेष्ठ व्यक्तित्व हैं ‘भीष्म पितामह’ और ‘श्रीकृष्ण’!!”
भीष्म पितामह के जीवन पर आधारित एवं डॉ विनोद गायकवाड़ जी द्वारा रचित ‘युगांत’एक अभूतपूर्व उपन्यास है। यह उपन्यास मराठी के अतिरिक्त तमिल में भी प्रकाशित हो चूका है।
डॉ प्रतिभा मुदलियार जी ने ‘युगांत’ का अत्यंत सजीव हिन्दी भावानुवाद किया। भावानुवाद की भाषा शैली पूर्णतः मौलिक एवं कालखंड के अनुरूप है जो इस उपन्यास को विश्वस्तरीय श्रेणी में अपना स्थान बनाने में पूर्णतः सफल है। आप इस उपन्यास की रोचकता का अनुमान इस बात से लगा सकते हैं कि – जब मैंने इस 460 पृष्ठ के उपन्यास को एक बार पढ़ना प्रारम्भ किया तो पूरा उपन्यास पढ़ कर ही विराम ले सका। मेरा पूर्ण विश्वास है कि- जब आप भी इस उपन्यास को पढ़ना प्रारम्भ करेंगे तो आपको मेरी बात में कोई अतिशयोक्ति नहीं लगेगी।
ई-अभिव्यक्ति में इस उपन्यास को 7 जुलाई 2020 से 7 ओक्टोबर 2020 तक धारावाहिक रूप इस 460 पृष्ठ के उपन्यास को 92 अंकों में सतत प्रकाशित किया था, जिसका प्रबुद्ध पाठकों से अत्यंत स्नेह एवं प्रतिसाद मिला।
पुस्तक को आपने धारावाहिक रूप में तो पढ़ा किन्तु, उसे डिजिटल पुस्तक (फ्लिपबुक)के रूप में पढ़ने का अनुभव अद्भुत होगा।
आपसे सस्नेह विनम्र अनुरोध है कि आप ‘युगांत’ पढ़ें और अपने मित्रों से सोशल मीडिया पर साझा करें।
आपके विचारों एवं सुझावों की हमें प्रतीक्षा रहेगी।
सस्नेह
हेमन्त बावनकर
पुणे (महाराष्ट्र)
28 फ़रवरी 2023
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
गंगाधर देवराव खानोलकर
गंगाधर देवराव खानोलकर (19 ऑगस्ट 1903 – 30 सप्टेंबर 1992) हे लेखक, चरित्रकार व पत्रकार होते.
त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खानोली गावात झाला.
खानोलकरांचे वडील ज्ञानपिपासू, ग्रंथप्रेमी व माणुसकी हा एकच धर्म मानणारे आणि आई स्वाभिमानी, स्वावलंबी व त्यागी होती. त्यांचे दृढ संस्कार खानोलकरांवर झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रथम घरीच, नंतर सावंतवाडी व मालवण येथे टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. असहकार चळवळीत सहभागी झाल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेला बसले नाहीत.
यानंतर खानोलकर रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतमध्ये वाङ्मयाचा विद्यार्थी म्हणून दाखल झाले.तेथे त्यांना थोर विद्वानांचे व रवींद्रनाथांचेही मार्गदर्शन लाभले. भरपूर वाचन, चिंतन, मनन वगैरे शैक्षणिक संस्कार त्यांना आयुष्यभर साहित्यसेवेची प्रेरणा देत राहिले.
त्यानंतर अंमळनेर तत्त्वज्ञान मंदिरात शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी दोन वर्षे तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.
काही काळ त्यांनी तळेगावच्या राष्ट्रीय विचाराच्या समर्थ विद्यालयात अध्यापन केले.
पुढे ते मुंबईत ‘लोकहित’, ‘विविधवृत्त’, ‘प्रगती’, ‘रणगर्जना साप्ताहिक’, ‘वैनतेय साप्ताहिक’ इत्यादी वृत्तपत्रांचे संपादक झाले.
खानोलकरांनी एकूण 22ग्रंथ लिहिले. अर्वाचीन वाङ्मय (खंड 1 ते 9), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र, माधव ज्यूलियन चरित्र,के. बी.ढवळे चरित्र इत्यादी ग्रंथांचा त्यात समावेश होतो.
स्वामी विवेकानंद समग्र वाङ्मय (खंड 1-21), पुणे शहराचे वर्णन, कोल्हटकर लेखसंग्रह, डॉ. केतकरांचे वाङ्मयविषयक लेख, शेजवलकर लेखसंग्रह, धनंजय कीर :व्यक्ती आणि चरित्रकार, सोन्याचे दिवस :बा. ग. ढवळे स्मृतिग्रंथ इत्यादी ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.
आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली!
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, आपलं महानगर, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २७ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
कविता महाजन
मराठी साहित्यात वैचारिक बंड करून स्वतःचे निशाण अल्पायुष्यात फडकवणा-या कविता महाजन यांनी काव्यलेखनाने प्रारंभ करून पुढे साहित्याच्या विविध प्रांतात लेखन केले. कविता, कादंबरी, कथा, बालसाहित्य व अनुवादित साहित्याची निर्मिती करून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य असे की त्यांनी ते लेखन, चित्रे, फोटोग्राफी, कॅलिग्राफी अशा विविध माध्यमातून सादर केले आहे. तसेच ‘भारतीय लेखिका ‘या पुस्तकातून त्यांनी अनेक भारतीय भाषांतील लेखिकांचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे मराठी साहित्यातील हे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणावे लागेल. त्यांनी आदिवासी प्रदेशात काम करून तेथील समाजजीवनाचा अभ्यास केला होता. त्यातूनच पुढे वारली आणि आदिवासी लोकगीतांचे संकलन त्यांच्या कडून पूर्ण झाले. आणखी एक वेगळा पैलू म्हणजे त्यांनी पाकशास्त्रासंबंधीही लेखन केले व तेही अत्यंत गांभीर्याने लिहीलेले आहे. ‘समुद्रच आहे एक विशाल जाळं’ या दीर्घकवितेने त्यांचे काव्यलेखन उच्च पातळीवर जाऊन पोहोचलो आहे.
‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या त्यांच्या दोन कादंब-यांनी त्यांना कादंबरी विश्वात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. ब्र ही कादंबरी महिला सरपंच व त्यांचे अनुभव विश्व या विषयावर आहे. भिन्न या कादंबरीतील त्यांनी एच्. आय. व्ही. बाधित व एडस् ग्रस्तांचे चित्रण केले आहे. अत्यंत वेगळ्या विषयावरील या दोन कादंब-यांमुळे एक बंडखोर लेखिका म्हणून त्या प्रकाशात आल्या.
या लेखना बरोबरच त्यांनी अन्य भाषांतील साहित्यही अनुवादित केले आहे. शिवाय संपादनाचे कामही केले आहे.
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
विद्याधर गोखले
विद्याधर संभाजीराव गोखले (4 जानेवारी 1924 – 26 सप्टेंबर 1996) हे पत्रकार व संगीत नाटककार होते.
प्रथम गोखले शिक्षक म्हणून काम करत होते.नंतर ते पत्रकार म्हणून ‘नवभारत’मध्ये व पुढे ‘लोकसत्ता’त गेले.त्यांनी ‘साप्ताहिक लोकसत्ते’ची पूर्ण जबाबदारी सांभाळली. पुढे ते ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक झाले.
अमरावतीत त्यांना ‘सावधान’ या वृत्तपत्राच्या वीर वामनराव जोशी यांचा सहवास लाभला. त्याबरोबरच गोखलेंनी न. चिं. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, शि. म. परांजपे यांच्या लेखनाचा खास अभ्यास केला. संपादकीय लेखनाचे धडे त्यांनी ह. रा. महाजनी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. त्यांनी विपुल प्रमाणात संपादकीय लेखन केले.
त्यांची शैली गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे झुकणारी होती. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यातील वचने व कल्पना ते आपल्या अग्रलेखात वापरत.संपादकाने प्रक्षोभक लिहिण्यापेक्षा मुद्यांकडे,भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांचे मत होते. त्यांचे लेखन सरळ, सुबोध असून त्यात विनोदाचा शिडकावा असे.
‘सं.जय जय गौरीशंकर’, ‘सं. पंडितराज जगन्नाथ’, ‘सं. मदनाची मंजिरी’, ‘सं. मंदारमाला’, ‘सं. सुवर्णतुला’, ‘सं.स्वरसम्राज्ञी’ वगैरे गोखलेंनी लिहिलेली नाटके रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी ‘झंझावात’ ही कादंबरीही लिहिली.
गोखलेंनी रंगशारदा प्रतिष्ठानची स्थापना केली.
ते 1989-1991 या काळात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई या संस्थेचे ते 1995-1996 दरम्यान अध्यक्ष होते.
1993मध्ये सातारा येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावाचे, संगीताचे व अभिनयाचे कार्यक्रम करणारे संगीत- नाट्य प्रतिष्ठान आहे.
मुंबईतील दादर येथील बाळ गोविंददास मार्ग व सेनापती बापट मार्ग हे दोन रस्ते एकमेकांना मिळून तयार झालेल्या चौकास नाटककार विद्याधर गोखले यांचे नाव दिले आहे.
मुंबई पत्रकार संघातर्फे दरवर्षी चांगल्या लेखक -पत्रकाराला विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देण्यात येतो.
विद्याधर गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली!
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २५ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
अरुण मार्तंडराव साधू (१७ जून १९४१- २५ सप्टेंबर१७ )
अरुण साधू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात परतवाडा इथे झाला. गणित व भौतिकशास्त्राचे ते पदवीधर होते पण त्यांनी कार्यक्षेत्र निवडले, ते मात्र पत्रकारिता आणि साहित्य लेखन. कादंबरी, कथासंग्रह, विज्ञान, सामाजिक, राजकीय इ. विषयांवर त्यांनी लेख लिहिले.
केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाईम्स ऑफ इंडिया इ. वर्तमानपत्रांसाठी त्यांनी वार्ताहर, विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. फ्री-प्रेस जर्नलचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. १९८९नंतर ते स्तंभलेखनाकडे वळले. त्यांचे स्तंभलेखनही गाजले.
त्यांनी विपुल साहित्य लेखन केले. कादंबरी, कथासंग्रह, विज्ञान, सामाजिक, राजकीय इ. विषयांवर त्यांनी लेख लिहिले. त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती सांगायच्या झाल्या, तर फिडेल चे आणि क्रांती, ड्रॅगन जागा झाला, तिसरी क्रांती- लेनिन, स्टॅलीन ते गोर्बाचेव्ह, झिपर्याइ, मुंबई दिनांक, सिंहासन इ. पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल.
डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ या ग्रंथाचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. आंबेडकर’ या चित्रपटासाठी त्यांनी संहिता लेखन केले.
‘सिंहासन’ हा अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ या कादंबरीवरील चित्रपट अतिशया लोकप्रिय ठरला. त्यांनी लिहीलेल्या, कथा, कादंबर्याि, नाटके, एकांकिका आणि स्तंभलेखन समकालीन इतिहासाचा मागोवा घेणारे आहे.
पुरस्कार – अरुण साधू यांना अकादमी, न.चिं. केळकर, भैरूरमण दामाणी, फाय फाउंडेशन इ. महत्वाचे पुरस्कार लाभले आहेत.
८० व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
☆ ☆ ☆ ☆ ☆
शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना (२१ नोहेंबर १९२७- २५ सप्टेंबर २०१३)
शं. ना. नवरे कथाकार, नाटककार, पटकथाकार, म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांनी स्तंभलेखनही केले. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव आणि भावविश्व त्यांनी आपल्या साहित्यातून रेखाटले. शहाणी सकाळ, मेणाचे पुतळे, कोवळी वर्षे इ. त्यांचे २७ कथासंग्रह आहेत.
जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवरून त्यांनी ‘गुंतता हृदय हे’, हे नाटक लिहिले. ते अतिशय गाजले. याशिवाय गहिरे रंग, खेळीमेळी, धुक्यात हरवली वाट, देवदास, दोघांमधले नाते, नवरा म्हणू नये आपला, पसंत आहे मुलगी, मन पाखरू पाखरू हीही त्यांची उत्तम नाटके आहेत. जनावर आणि दोन यमांचा फार्स या त्यांच्या एकांकिका प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या पटकथा असलेले सारेच चित्रपट अतिशय गाजले. कळत नकळत, कैवारी, घरकुल, तू तिथे मी, निवडुंग, सवत माझी लाडकी, बाजीरावचा बेटा या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या.
आनंदाचे झाड, दिवसेंदिवस, दिनमान या त्यांच्या कादंबर्या तर, झोपाळे आणि शन्नाडे ही त्यांच्या स्तंभलेखनावरची पुस्तके
नोहेंबर २००८मध्ये त्यांना ग.दी. माडगूळकर प्रतिष्ठानचा ग.दी.मा. पुरस्कार मिळाला, तर नोहेंबर २००९ मधे त्यांना डोंबिवली भूषण हा पुरस्कार मिळाला. शं. ना. नवरे यांच्यावर ‘गोष्टीवेल्हाळ शन्ना’ हा लघुपट निघाला आहे. काही जुन्या नाटकांचे दुर्मिळ चलत् चित्रण व जुन्या सहकाऱ्यांनी (डॉ. जब्बार पटेल, विक्रम गोखले, बाळ कुडतरकर, प्रदीप वेलणकर इ.) सांगितलेल्या शन्नांच्या रमणीय आठवणी या लघुपटात अनुभवायला मिळतात.
डोंबिवलीमधे २००३ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे त अध्यक्ष होते. त्यांना मिळणार्या् पैशाचा मोठा हिस्सा ते पडद्यामागील कलाकारांसाठी खर्च करत.
☆ ☆ ☆ ☆ ☆
अरुण बाळकृष्ण कोलटकर (१नोहेंबर १९३२- २५ सप्टेंबर २००४ )
अरुण बाळकृष्ण कोलटकर हे सुप्रसिद्ध कवी होते. कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.
अरुण कोलटकर यांचे प्रकाशित काव्यसंग्रह
अरुण कोलटकरच्या कविता (१९७७), चिरीमिरी (२००४), द्रोण (२००४), भिजकी वही (२००४), अरुण कोलट्करच्या चार कविता
मराठीप्रमाणेच त्यांनी हिन्दी व इंग्रजीमधूनही कविता लिहिल्या.
अरुण कोलटकर यांना लाभलेले पुरस्कार
१. २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार
२. कुसुमाग्रज पुरस्कार
३. २००५ चा बहिणाबाई पुरस्कार
४. १९७६ चा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार
इ. पुरस्कार त्यांना मिळाले.
अरुण कोलटकर हे ’शब्द’ या लघु नियतकालिकाचे रमेश समर्थ व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्याबरोबर सहसंपादक होते.
☆ ☆ ☆ ☆ ☆
कमलाकर सारंग (जून २९, इ.स. १९३४ – सप्टेंबर २५ इ.स. १९९८)
कमलाकर सारंग हे मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक होते. सखाराम बाइंडर व इतर अनेक नाटकांतील यांचा अभिनय विशेष नावाजला गेला. त्यांनी दिग्दर्शिलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर ही नाटकेही गाजली.
मराठी नाट्यअभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत.
प्रकाशित साहित्य
कमलाकर सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर “बाइंडरचे दिवस” नावाचे पुस्तक लिहिले.
कमलाकर सारंग यांच्यावर नाट्यप्रेमी कमलाकर सारंग हे पुस्तक अनुराधा औरंगाबादकर यांनी लिहिले आहे.
आज साहित्यिक अरुण साधू, शं. ना. नवरे, अरुण कोलटकर आणि नाटककार कमलाकर सारंग यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना आदरांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी , गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा आज स्मृतिदिन . ( कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२० – २४ सप्टेंबर, इ.स. २००२ )
जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला. महात्मा गांधींशी त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार होता.
कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथात अरबी, तुर्की, फारसी भाषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली, आणि हा व्युत्पत्तीकोश परिपूर्ण करण्याचे महत्वपूर्ण काम जोशींनी केले. ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये प्रकाशित झाली. श्री. जोशी यांनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी किमान सात पुस्तके महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होती, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतरही केले.
श्रीपाद रघुनाथ जोशी यांनी जी बरीच पुस्तके लिहिली. त्यातील काही पुस्तके अशी —–
अखेरचं पर्व / अनंंता काय रे केलंस हे? / आनंदी गोपाळ / उलगाउलग (१९८३) : श्रीपाद जोशींना त्यांचे उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश तयार करताना संबंधितांनी जो मनस्ताप दिला त्याची हकीकत सांगणारे पुस्तक / ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन / गांधीजी : एक झलक / उर्दूची नवरत्नें / कस्तुरीचे कण / ग्रामीण विकासाची वाटचाल / जिब्रानच्या नीतिकथा / रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र —- ही पुस्तके फक्त उदाहरणादाखल इथे नमूद केली आहेत.
श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले शब्दकोश——
—–मराठी हिंदुस्तानी कोश (१९४०) : याचे मुख्य संपादक वामनराव चोरघडे यांनी खरंतर फक्त मराठी शब्द निवडले होते आणि त्यांना हिंदुस्तानी प्रतिशब्द देण्याचे काम श्रीपाद जोशी आणि माधवराव सावंत यांनी केले होते.
—–मराठी हिन्दुस्तानी कोश (सुधारित, १९५२) :तुरुंगात बसल्याबसल्या श्रीपाद जोशींनी पहिल्या कोशाचा हा नवा सुधारित कोश तयार केला. या कोशात मराठी आणि हिंदुस्तानी या दोनही भाषांतील शब्दांचे व्याकरण दिले होते. मात्र मूळ मराठी शब्द कोणत्या भाषेतून आला त्याची माहिती नव्हती. हिंदी भाषकांना मराठी उच्चार कळावेत म्हणून च, छ, ज आणि झ खाली जरूर तेव्हा नुक्ते दिले होते. या कोशात १४,००० शब्द होते.
——विद्यार्थी हिंदी-मराठी कोश.
—– हिंदी-मराठी-गुजराती-इंग्रजी कोश : वोरा आणि कंपनीच्या नानूभाई व्होरा यांच्या आग्रहास्तव हाती घेतलेल्या या कोशाचे काम पूर्ण होऊ शकले नाही..
——अभिनव शब्दकोश : कोशाच्या पहिल्या भागात हिंदी शब्दांना मराठी व हिंदी प्रतिशब्द दिले होते, तर दुसऱ्या भागात मराठी शब्दांना हिंदी प्रतिशब्द दिले होते. या कोशात उर्दू (अरबी-फारसी) शब्दांचा चांगलाच भरणा होता. शिवाय हिंदी-मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि इतर उपयुक्त माहिती कोशात दिली होती. या कोशाच्या १९९६ सालापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या.
——उर्दू-मराठी शब्दकोश
——बृहत् हिंदी-मराठी शब्दकोश, तसेच बृहत् मराठी-हिंदी शब्दकोश : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही. सगळे काम जोशी यांनीच केले होते.
——उर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषिक कोश : (१९६२) : खरंतर हा संपूर्ण कोश श्रीपाद जोशी यांनी एकट्याने केला होता. पण अरबी-फारसीचे अर्धवट ज्ञान आणि मराठीबाबत पूर्ण अज्ञान असलेले तथाकथित विद्वान डॉ. निजामुद्दीन एस. गोरेकर या माणसाने कोशातल्या शब्दोच्चारांमध्ये, दुरुस्त करता टेंडर नाही इतकी ढवळाढवळ केली आणि कोशावर स्वतःचे नाव समीक्षक-संपादक म्हणून टाकले. श्रीपाद जोशींना हा कोश प्रकाशनानंतर सहा वर्षांनी पहायला मिळाला, तेव्हा त्यांना कोशातल्या या अक्षम्य चुका दिसल्या. मुद्रण प्रतीचे संपादन व प्रुफे तपासणाऱ्याचे नाव पुस्तकावर समीक्षक संपादक म्हणून छापल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. असे का केले हे विचारले असता, ‘पुण्याचा हिंदु-ब्राह्मण असलेल्या माणसाला’ काय उर्दू येणार ? असा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने कोशावर एका मुसलमानाचे समीक्षक संपादक म्हणून नाव टाकल्याचा खुलासा महामंडळाने केला ! या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली, त्यावेळी श्रीपाद जोशींनी सुचवलेल्या दुरुस्त्या धुडकावून लावून महामंडळाने त्याच जुन्या कोशाचे पुनर्मुद्रण केले.—- हा तपशील इथे आवर्जून नमूद करावासा वाटतो.
—-उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश : हा २०,००० शब्दांचा नवा शब्दकोश श्रीपाद जोशींनी बनवला होता.
इतकी पुस्तके आणि लेखकांसाठी अतिशय उपयुक्त आणि आवश्यक असणारे इतके सारे भाषा-कोश लिहिणाऱ्या श्री. श्रीपाद रघुनाथ जोशी यांना विनम्र आदरांजली .
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २३ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर:
विविध प्रकारचे लेखन करूनही प्रामुख्याने नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भा.वि.तथा मामा वरेरकर यांचा जन्म कोकणातील चिपळूण येथे झाला. मालवण, रत्नागिरी येथे शिक्षण झाले. कोकणातील प्रसिध्द अशी दशावतार ही नाट्यमय लोककला लहान वयातच पहायला मिळाली. त्यामुळे नाटकांविषयी गोडी निर्माण झाली. आपणही काहीतरी, नाटक लिहावे असे वाटू लागले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी ‘नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहीले. ते यशस्वी झाले नाही. पण आपण नाटक लिहू शकतो हा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. ते नाटक कंपन्या,नाटककार यांच्याशी संपर्क वाढवू लागले व पुढे नाट्य लेखनाचे आपले स्वप्न त्यांनी समर्थपणे साकार केले. मोठेपणी त्यांना टपाल खात्यात नोकरी मिळाली. पण लेखानाच्या प्रेमापोटी त्यांनी ती काही काळानंतर सोडून दिली व संपूर्ण काळ लेखन केले.
सुमारे सदतीस नाटके, सहा नाटिका कथा, कादंब-या, रहस्यकथा, बंगाली साहित्याचा अनुवाद, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. शिवाय ते सक्रीय राजकारणातही सहभागी होते.
1908 साली कुंजविहारी हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. पण ते फारसे गाजले नाही. नाटककार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली ती 1918 साली आलेल्या ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकाने. पुढील सुमारे तीस वर्षे त्यांचे नाट्यलेखन चालू होते.
चंद्रचकोरी, ती का गेली, पुन्हा गोकुळ, शुभमंगल इत्यादी. एकूण अकरा.
कादंबरी/दीर्घकथा :-
अनुपमेचे प्रेम, एकादशी, कुलदैवत, चिमणी, झुलत मनोरा, धावता धोटा, पेटते पाणी, विधवाकुमारी इत्यादी सुमारे चाळीस.
अनुवादित साहित्य:-
मराठी वाचकाला बंगाली साहित्याची ओळख करून देण्याचे श्रेय मामा वरेरकर यांनाच जाते. शरदचंद्र आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अनेक कादंब-या त्यांनी अनुवादित केल्या आहेत. तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘एकविंशती’या एकवीस कथाही अनुवादित केल्या आहेत. काही अनुवादित कथा, कादंबरी,नाट्य याप्रमाणे:
आघात(निवडक भाषणे व लेख), बंकिमचंद्र चट्टोपाध्याय(चरित्र), माझा नाटकी संसार(दोन खंडी आत्मचरित्र), माझ्या हिमालयातील यात्रा(प्रवासवर्णन) इत्यादी.
मामा वरेरकर यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल योग्य असे सन्मानही प्राप्त झाले आहेत. 1959 साली त्यांना पद्मभूषण या किताबाने गौरवण्यात आले. संगीत नाटक अकादमीची फेलोशीप त्यांना मिळाली होती. धुळे येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1938 साली पुणे येथे भरलेल्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार म्हणून राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली होती.
वयाच्या 81 व्या वर्षी 1964साली त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या लेखन कर्तृत्वास सलाम!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २१ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
सदानंद शांताराम रेगे (२१जून १९२३ – २१ सप्टेंबर १९८२)
सदानंद रेगे हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म कोकणात राजापूर येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. शालांत परीक्षेनंतर ते मुंबईत आले. चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश घेतला. त्यानंतर १९४२मध्ये ते एका मिलमध्ये डिझायनर म्हणून कामाला लागले. काही वर्षे त्यांनी रेल्वेत नोकरीही केली. कीर्ती कॉलेजमधून एम. ए. केल्यानंतर माटुंगायेथील रुईया कॉलेजमध्ये ते रुजू झाले.
सदानंद रेगे यांची प्रकाशित पुस्तके –
कथा संग्रह – १.जीवनाची वस्त्रे,२. काळोखाची पिसे , ३. चांदणे, ४. चंद्र सावली कोरतो, ५. मासा आणि इतर विलक्षण कथा
कविता संग्रह – १.अक्षरवेल, २. गंधर्व, ३. वेड्या कविता, ४. देवापुढचा दिवा, ५. बांक्रुशीचा पक्षी
अनुवादीत – १. जयकेतू ( ओडीपसचे रूपांतर ), २. राजा इडिपस (अनुवाद), ३.बादशहा, ४. ज्याचे होते प्राक्तन शापित, ५. ब्रांद, ६ गोची
बालगीते – १. चांदोबा चांदोबा, २. झोपाळ्याची बाग
अनुवादीत कविता – ब्लादिमिर मायक्रोव्हस्कीच्या कवितांचा अतिशय सुंदर अनुवाद ‘पॅंटघातलेला ढग म्हणून त्यांनी केला आहे.
त्यांच्या कविता तरल, हळुवार, संवेदनाशील आहेत. ‘अक्षरवेल’मधील कविता निसर्गाची विविध लावण्ये प्रगट करतात. ‘श्रावण’ कवितेत ते लिहितात, ‘आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन ऊन पावसाचे पक्षी आणी ओंजळीमधून ‘जाणीवेच्या पलीकडे नेणार्या मृत्यूच्या व आत्महत्येच्या अव्याहत भयाचा प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसून येतं. ख्रिस्ताच्या बलिदानावर ज्या जगभर अनेक कविता लिहिल्या गेल्या, त्यात सदानंद रेगे यांच्या ‘सोहळा’ कवितेचा समावेश आहे. कौस्तुभ आजगावकर लिहितात, रेगे कलासहित्यावर निष्ठेने प्रेम करत राहिले. स्वत:ची जाणीव गढूळ होऊ न देता व्यक्त होत राहिले.
एके वर्षी मुंबईमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ते कविसंमेलनाचे अध्यक्ष होते.
सदानंद रेगे यांच्यावर प्र.श्री. नेरूरकर यांनी लिहिलेले ‘अक्षरगंधर्व’ हे पुस्तक १९८७ साली प्रकाशित झाले.
आज या प्रतिभावंत कवी, लेखकाचा स्मृतिदिनआहे. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला प्रणाम.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी , गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक म्हणून ओळखले जाणारे श्री.अशोक रामचंद्र केळकर यांचा आज स्मृतीदिन.(२२ एप्रिल १९२९ – २० सप्टेंबर २०१४).
श्री. केळकर यांचा जन्म पुण्यातला. शिक्षणही पुण्यातच झाले . इंग्रजी भाषा व वाङ्मय हा मुख्य विषय आणि फ्रेंच हा उपविषय घेऊन त्यांनी पुणे विद्यापीठातून एम्. ए. भाषाविज्ञानाच्या अभ्यासासाठी रॉकफेलर प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती मिळवली आणि अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात संशोधन केले होते. १९५८ मध्ये याच विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी प्राप्त केली होती. याच वेळी त्यांना लिली प्रतिष्ठानतर्फे ’तौलनिक साहित्य व समीक्षा’ यासाठी अभ्यासवृत्ती मिळाली.भारतात परत आल्यानंतर आग्रा येथील के. एम्. इन्स्टिट्यूट ऑफ हिंदी स्टडीज अँड लिंग्विस्टिक्स या संस्थेत ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून ४ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर पुण्यात डेक्कन महाविद्यालयात प्रारंभी प्रपाठक व नंतर प्रोफेसर म्हणून त्यांनी अध्यापन केले. तेथील भाषाविज्ञानाच्या प्रगत अध्ययन केंद्राचे ७ वर्षे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तेथूनच १९८९ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांनी हिंदी, इंग्रजी व मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केले.भाषाविज्ञानाबरोबरच आस्वाद, समीक्षा आणि मीमांसा या तिन्ही दृष्टीने साहित्याचा सखोल विचार त्यांनी त्यांच्या लेखन – संशोधनातून केला आहे.
‘मराठी व्याकरणाची नवी दिशा’ हा त्यांचा मराठीतील पहिला लेख सत्यकथा मासिकात छापून आला (१९६५). मराठी भाषेत त्यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध आहेत: मराठी भाषेचा आर्थिक संसार (१९७८), प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा (१९७९),भेदविलोपन: एक आकलन (१९९५), वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार (१९९६) आणि रुजुवात. त्यांचा पीएच्.डी. साठी लिहिलेला मराठी भाषेसंबंधीचा ‘लँग्वेज इन सिमॅओटिक पर्स्पेक्टिव्ह: द आर्किटेक्चर ऑफ अ मराठी सेन्टेन्स’ हा प्रबंध इंग्रजीत प्रकाशित झाला आहे. त्यांच्या प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा या ग्रंथाचे हिंदी व गुजराती अनुवादही प्रकाशित झाले आहेत. स्टडीज इन हिंदी-उर्दू: इंट्रोडक्शन अँड वर्ड फोनोलॉजी (१९६८) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या हिंदीत लिहिलेल्या लेखांचा संग्रह त्रिवेणी: भाषा-साहित्य-संस्कृती (२००४) या नावाने प्रसिद्ध आहे.
त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील भाषाविषयक अनेक चर्चासत्रे, परिषदा यांत शोधनिबंधांचे वाचन तसेच त्यासाठीच्या समित्यांवर राहून मार्गदर्शन केले आहे. म्हैसूरच्या भारतीय भाषा संस्थान या संस्थेने त्यांचे सर्व लेखन इ-बुकच्या स्वरुपात प्रकाशित केले आहे. भारतीय भाषा संस्थान ही संस्था आणि महाराष्ट्रातील राज्य मराठी विकास संस्था यांच्या रूपरेखाही केळकरांनीच तयार केल्या होत्या. भाषा आणि जीवन या मराठीत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालेल्या त्रैमासिकाचे स्वरूप व धोरणे त्यांच्याच मार्गदर्शनातून आकाराला आलेली आहेत.त्यांनी या मासिकाचे संपादनही केले आहे.
त्यांच्या रुजुवात या ग्रंथालाही २०१० या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांच्या भाषाविज्ञान व साहित्य अनुवाद, कलासमीक्षा, तत्त्वज्ञान अशा क्षेत्रांमधील मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने २००२ मध्ये पद्मश्री हा किताब बहाल करून त्यांचा गौरव केला आहे.
श्री. अशोक केळकर यांना विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
श्री.शंकर पुरुषोत्तम जोशी (९ मार्च, इ.स. १८९४- २० सप्टेंबर, इ.स. १९४३)
मराठी इतिहास संशोधक श्री.शंकर पुरुषोत्तम जोशी यांचा आज स्मृतिदिन. श्री. जोशी यांचा जन्म पाली, जि.रायगड, इथे झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाली व महाड येथे झाले. नंतर औंध सातारा येथे ते इंग्रजी शाळेत शिकले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी पुरवठा खात्यात नोकरी केली. त्या निमित्ताने त्यांना क्वेट्टा, अरबस्तान, इराण येथे जायला मिळाले. अरबी, पुश्तू, रशियन आदी भाषा ते शिकले. ती नोकरी संपल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन जे कर्तृत्व गाजवले त्याची फारशी चिकित्सा झालेली नाही, हे ध्यानात घेऊन जोशींनी आपल्या साहित्यातून महाराष्ट्राबाहेरील राजकारणावर विशेष लक्ष दिले.
श्री. शंकर पु. जोशी यांची प्रकाशित पुस्तके :-
–पंजाबातील नामदेव (१९३९) : महाराष्ट्रातील नामदेव आणि पंजाबातील नामदेव एकच आहेत हे सिद्ध करणारा (पहिला) ग्रंथ
–भक्तराज – श्री नामदेव जी (हिंदी)
–भाऊंच्या वीरकथा (१९३४)
–मराठ्यांच्या सत्तेचा उत्तरेकडील विस्तार (१९३६)
–राजस्थान-महाराष्ट्र संघर्ष (१९४३) : या पुस्तकात उत्तरेकडे मुलुखगिरी करणारे मराठा सरदार आणि फुटीर वृत्तीचे राजस्थानी राजे यांच्यामधील संबंधांची चिकित्सा केली आहे.
–शीखांचा स्फूर्तिदायक इतिहास (१९३९) : शीखांचा इतिहास सांगणारा मराठीतील पहिला ग्रंथ.
आजच्या स्मृतिदिनी श्री. शंकर जोशी यांना सादर प्रणाम.
☆☆☆☆☆
महाराष्ट्रातहोऊन गेलेले एक संत वमराठीलेखक श्री गुलाबराव महाराज यांचाही आज स्मृतिदिन.
( ६ जुलै १८८१; – २० सप्टेंबर १९१५ ).
श्री गुलाबराव महाराज हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. त्यांना वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले होते. त्यांचा जन्म तथाकथित निम्नजातीत झाला होता. त्यांचे सगळे आयुष्य ग्रामीण भागात गेले. गुलाबराव महाराज यांनी बालपणीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता. ” भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही “– हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी सांगितले. ‘भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय, हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म, आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत’ अस एक वेगळाच पण महत्वाचा विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती.
आर्य हा वंश असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्समुल्लरचे व लोकमान्य टिळकांचे मत गुलाबराव महाराजांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धान्त – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत.
त्यांना जेमतेम फक्त चौतीस वर्षांचे आयुष्य लाभले होते, पण या अल्प काळात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करून त्यांनी तब्बल १३४ ग्रंथ लिहिले ही एक अपवादात्मक गोष्टच म्हटली जाते. मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते, आणि या तिन्ही भाषांमध्ये मिळून त्यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन केले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे अनेक वाङ्मयप्रकार हाताळत त्यांनी २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोक अशा अनेक रचना केल्या .‘मधुराद्वैत’ (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.
आठव्या महिन्यातच आजाराने डोळे गेले म्हणून आंधळेपणा आलेला. अशा स्थितीत महाराजांनी सर्व ज्ञान कसे प्राप्त केले, हा प्रश्न सामान्य माणसाला निश्चित पडतो. इंग्रजीतील आधुनिक विज्ञानावरचे, धर्म आणि अध्यात्म शास्त्र, संस्कृतातील गायनशास्त्रावरचे, वैद्यक शास्त्रावरचे, विविध कला विषयांचे, वेद-उपनिषदांसह सर्व ग्रंथांचे वाचन त्यांनी वयाच्या १२ ते १६ वर्षांच्या काळातच करून घेतले. प्रपंच किंवा परमार्थ यातला एकही विषय राहिला नाही की ज्यावर गुलाबराव महाराजांनी आपले स्वतंत्र विचार प्रगट केले नाहीत.
मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज एकदा मुंबईच्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत गेले. ग्रंथालयात विशिष्ट विषयांवरील कुठले ग्रंथ आहेत, याबाबत त्यांनी ग्रंथपालांना विचारणा केली. ग्रंथपाल महाराजांना ओळखत नव्हता. एक अंध व्यक्ती ग्रंथांची विचारपूस करते म्हणून त्या सर्वच लोकांना कुतूहल वाटले. ग्रंथपालाच्या सहकाऱ्याने महाराजांना ग्रंथांची नावे सांगणे सुरू केले. बहुतांश ग्रंथ महाराजांना माहीत होते. या ग्रंथांचा क्रम कसा लावावयास हवा, हे महाराज त्या-त्या ग्रंथातील सारांशाच्या आधारे त्या ग्रंथालयकर्मीला सांगत होते. ग्रंथपाल व आजूबाजूचे लोक महाराजांचे ज्ञान पाहून थक्क झाले. चौकशीअंती त्यांना समजले की अत्यंत सामान्य दिसणारी ही अंध व्यक्ती म्हणजे मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज आहेत…
गुलामगिरीच्या काळात सुशिक्षित भारतीयांना पाश्चात्त्य विचारांनी जखडले होते. भारतातील शास्त्रे, कला, साहित्य, जीवनपद्धती अशा सर्वच बाबी अशा लोकांना अर्थहीन वाटत होत्या. भारतीय संस्कृतीविषयी त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. याच काळात पाश्चात्त्य विचारसरणीतील उथळपणा आणि भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व केवळ बुद्धिवादाच्या आधारे विचारवंतांना पटवून देण्याचे आत्यंतिक मोलाचे कार्य गुलाबराव महाराजांनी केले.
मानभाव मत, डार्विन मत, स्पेन्सर, मायर्स यांच्या मतांवर आणि ग्रंथांवर महाराजांनी समीक्षा केली. जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा केली. मराठी, हिंदी, ब्रज, संस्कृत भाषेत लेखन केले. काव्य, योग, संगीत, धर्म, सांख्यशास्त्र, वेदान्त, छंदशास्त्र असे सर्व विषय हाताळले. हे अगाध ज्ञान महाराजांनी केव्हा व कसे प्राप्त केले असेल हा विषय आजही आपल्या विचारक्षमतेच्या बाहेरचाच आहे. महाराज जवळच्या लोकांकडून पुस्तके वाचून घेत असत. अगाध स्मरणशक्तीच्या आधारे एकदा ऐकताच त्यांच्या स्मरणात राहत असे. त्यांच्यासाठी पुस्तक वाचणारा कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. प्रत्येकाला दक्षिणा द्यायचे…… ज्वारी, गहू, हातातील चांदीचे कडे, घरातील मौल्यवान वस्तू…. महाराजांनी आपल्या आयुष्यात केवळ ज्ञानलालसेचा, अर्थातच ग्रंथांचा आणि पुस्तकांचा मोह बाळगला. !. जवळच्या मंडळींकडे त्यांनी कशाचा आग्रह धरला असेल तर तो म्हणजे फक्त पुस्तकांचा. गुलाबराव महाराजांनी दोन हजारहून अधिक ग्रंथ जवळ बाळगले. पुस्तकांच्या पेट्या डोक्यावर घेऊन कितीही मैलांचा प्रवास ते पती-पत्नी करीत.. ती दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आजही अमरावतीत सुरक्षित आहे.
छोट्या-मोठ्या प्रतिकूलतेमुळे आत्महत्येचा विचार मनात आणणाऱ्या तरुणांसाठी गुलाबराव महाराजांचे जीवन आणि त्यांची ग्रंथसंपदा अत्यंत प्रेरणादायी आहे. डॉ. राम पंडित यांनी पुढाकार घेऊन स्कंददास स्मारक न्यास व पंचलतिका ग्रंथ न्यास या प्रकाशन संस्था स्थापन करून सातत्याने गुलाबराव महाराजांचे ग्रंथ प्रकाशित केले. महाराजांच्या अनेक ग्रंथांचे त्यांनी हिंदी भाषेत अनुवाद करून प्रकाशन केले..
गुलाबराव महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके अशी —-
—अलौकिक व्याख्याने (इ.स. १९१२)
—धर्म समन्वय
—प्रेमनिकुंज (इ.स. १९१८)
—योगप्रभाव
—संप्रदाय सुरतरु (इ.स. १९१९)
—-साधुबोध (इ.स. १९१५)
गुलाबराव महाराज यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके –
प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ (बाळ राणे) / संत गुलाबराव महाराज (सुनीति आफळे) / संत श्री गुलाबराव महाराज (प्रा. विजय यंगलवार) / ज्ञानेश्वर कन्या-गुलाबराव महाराज (चरित्र, डॉ.सच्चिदानंद शेवडे) / आणि अगदी अलीकडे त्यांच्या भक्ती-संकल्पनेवर शुभदा मुळे यांनी लिहिलेले “ पंचलतिका “ हे पुस्तक.
महाराजांच्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. राम पंडित यांच्या कवितेच्या पुढील ओळी यासाठीच फार समर्पक वाटतात——
एक चक्षुहीन अनेक चक्षुहीन लोकांना चक्षु देऊन चक्षुंच्या पलीकडे गेला……
नंतर कळले तो तर चक्षुहीन नव्हता…….
खरे म्हणजे मोठ्या डोळ्याचे, साक्षर, आम्हीच आंधळे होतो……
आता आमच्यासारख्यांचे डोळे त्या चक्षुहीनाची वाट बघतात…….
त्यांच्या मार्गाने जाताजाता आम्ही पडतो, उठतो, परत चालतो… काय करावे… आम्हीच तर आंधळे!
आमच्या नेत्रात अश्रू आहेत …. नजर कदाचित धोका खाईल, पण हृदय नव्हे…..
गीता, वेद, पुराणांच्याप्रमाणे त्यांच्या त्या वाक्यावर आमचा अटळ विश्वास आहे जे त्यांनी आपले जीर्ण वस्त्र त्यागताना उच्चारले ….;
‘माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईन’.… होळीनंतर…
गुलाबराव स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी , आणि कृष्णाची पत्नी मानत असत, आणि काही स्त्रीचिन्हेही धारण करत असत.महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदायबाबाजी महाराज पंडितयांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला. खरे तर या अलौकिक संतांवर जितके लिहावे तितके कमीच आहे.
त्यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भक्तिपूर्वक शतशः वंदन.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈