ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १२ जानेवारी –  संपादकीय  ? 

नरहर विष्णु उर्फ काकासाहेब गाडगीळ

नरहर विष्णु उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म 10 जानेवारी 1896चा. हे राजकरणी, अर्थ शास्त्रज्ञ होते, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकही होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावास झाला. एकूण साडे पाच वर्षे त्यांना कारावासात राहावे लागले. त्यांचा जन्म राजस्थानात मल्हारगड इथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे, बडोदा, मुंबई इथे झाले. बी.ए., एल.एल. बी. झाल्यानंतर काही दिवस त्यांनी पुण्यात वकिली केली. १९२० मधे त्यांनी राजकरणात पदार्पण केले.

त्यांनी आणि मामा देवगिरीकर यांनी मिळून हिंदीचा प्रचार करणार्याज ‘;महाराष्ट्र राष्ट्रभाषा’ या संस्थेची १९४५ साली पुण्यात स्थापना केली. भारत सरकारमधे १९५८ ते १९६२ ते पंजाबचे राज्यपाल होते. १९६४ पासून ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.१९५४ ते१९६५ ते राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य होते. 

राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास यावरचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहेच, पण त्यांनी ललित लेखनही केले आहे. त्यांची २५ पेक्षा जास्त पुस्तके आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचे हिन्दी, इंग्रजी, कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र  हा आर्य चाणाक्याच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद ४३ साली प्रसिद्ध झाला. अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा हा ग्रंथ त्या काळी खूप गाजला.

त्यांचे काही प्रकाशित साहित्य 

१. अनगड मोती ( ललित लेख ) २. काही मोहरा काही मोती ( समकालीन राजकीय नेत्यांची शब्दचित्रे), ३. चॉकलेटची वडी  ४. पथिक (२भागातील आत्मचरित्र ) ५. माझा येळकोट (ललित लेख ) ६. मुठा ते मेन ( त्या काळाच्या जर्मनीचे दर्शन ) ७. लाल किल्ल्याच्या छायेत ८. साल गुदस्ता, ९. समग्र काका १०. महान व्यक्तींत्वे – १० भाग (बालवाङ्मय) 

गौरव

  1. पुण्यातील नदीवर न.वा. गाडगीळ नावाचा एक पूल आहे.
  2. . शनिवार वाड्याजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
  3. .मुंबईत दादर पश्चीम इथे  काका गाडगीळ मार्ग आहे.
  4. सातारा इथे १९६२साली झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  5. काका गाडगीळ प्रतिष्ठान आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी भाषणे आयोजित केली जातात. . एक मोफत वाचनालय चालवले जाते. काही पुरस्कारही दिले जातात. फ.मुं. शिंदे, श्रीपाल सबनीस यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

गाडगीळ यांच्यावरील पुस्तके 

  1. गाडगीळ यांच्या ८१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित ही स्मरणिका ७७ साली प्रकाशित झाली असून निळूभाऊ लिमये, प्रसन्नकुमार अभ्यंकर , गो. कृ पटवर्धन  हे या स्मरणिकेचे संपदक होते.
  2. अरुण साधू आणि व्ही.एस. आपटे यांनी त्यांच्यावर चरित्रे लिहिली.
  3. त्यांच्या जन्मशताब्दीच्या  निमित्तानेही ग्रंथ प्रकाशित झाला. संपादक –रविंद्रकुमार काकासाहेब गाडगीळांवर पोष्टाचे तिकिटही प्रसारित झाले आहे.

☆☆☆☆☆

श्रीराम रावसाहेब गुंडेकर

श्रीराम रावसाहेब गुंडेकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९५५ चा. सत्यशोधकी साहित्याचे ते अभ्यासक आणि संशोधक होते. मराठीतले ते ग्रामीण साहित्यिक आणि समीक्षक होते. ‘उचल आणि ‘लगाम’ हे त्यांचे कथासंग्रह.  तर ढगाची तहान, श्रेष्ठ कोण माणूस की मांजर हे कविता संग्रह आहेत.

त्यांच्या वैचारिक लखनात १. ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन, २. म. फुले विचार आणि वङ्मय३. सत्यशोधकी परंपरा आणि स्वरूप ४. म.फुले यांची अखंड रचना, ५. म. फुले साहित्य आणि साहित्य मूल्य, ६. रा.ना. चव्हाण यांचे विचारविश्व इ. पुस्तके आहेत. सत्यशोधकी साहित्याचा इतिहास हा लेखन प्रकल्प त्यांनी सुरू केला. यापैकी खंड १ ( प्रारंभ ते १९२० ), आणि खंड २ (इ.स. १९५०) हे दोन खंड प्रकाशित झाले. खंड३ व खंड ४ हे हस्तलिहित स्वरुपात आहेत.

श्रीराम रावसाहेब गुंडेकर यांना अनेक साहित्य पुरस्कार लाभलेले आहेत. १. ‘उचल’ या कथासंग्रहासाठी भी.ग. रोहमाने  पुरस्कार, २.  ’म. ज्योतिबा फुले  विचार आणि वाङ्मय’ या ग्रंथासाठी नरहर कुरूंदकर पुरस्कार !९९२), ३. ‘म. फुले विचार आणि वाङ्मय’ या पुस्तकासाठी  ( १९९२) , महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार’ ४. बाल वाङ्मयासाठी सुशील प्रधान, तसेच  म .सा.प.चा ‘ढगांची तहान’ या बालसंग्रहासाठी (१९९९)  त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.

२००३ मध्ये लातूर येथे सेवाभूमी साहित्य पुरस्कार एकूण सर्व लेखनाचा विचार करून मिळाला.

श्रीराम गुंदेकर हे अ. भा. सत्यशोधकी साहित्य , संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.

काकासाहेब गाडगीळ आणि श्रीराम गुंदेकर या दोघांही विद्वानांना आज त्यांच्या स्मृतिदिनाबद्दल विनम्र आदरांजली.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ११ जानेवारी –  संपादकीय  ?

यशवंत  दिनकर  फडके  :

य दि  या नावाने परिचित असलेले  श्री. फडके यांचा जन्म सोलापरचा.त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरात झाले.नंतर त्यांनी उच्च शिक्षण पुण्यात घेतले.बी.ए.व नंतर एम.ए या पदव्या संपादन केल्यानंतर  ते मुंबई विद्यापीठाचे पीएच.डी. वारकरी झाले.

त्यांनी प्रामुख्याने चरित्रलेखन व इतिहास संशोधन केले आहे.आगरकर, र.धों. कर्वे,

विष्णूशास्त्री चिपळूणकर,शाहू छत्रपती आणि लोकमान्य,सेनापती बापट,कहाणी सुभाषचंद्रांची,

शोध सावरकरांचा, इ.चरित्र पुस्तके त्यांनी लिहीली आहेत.याशिवाय लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक,राष्ट्रपती डाॅ.राजेंद्रप्रसाद ते प्रतिभाताई पाटील या पुस्तकांचाही उल्लेख करावा लागेल.

ऐतिहासिक पुस्तकांमध्ये डाॅ.आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह,स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान,विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड 1 ते 8 इ.पुस्तकांचा समावेश होतो.याशिवाय त्यांनी ललित,वैचारिक,माहितीपर लेखनही केले आहे.आजकालचे राजकारणी,नथुरामायण,मुंबईचे खरे मालक कोण,संसद:तेव्हा आणि आत्ता,व्यक्ती आणि विचार अशा अनेक पुस्तकांतून त्यांचे विविध प्रकारचे लेखन दिसून येते.

वाद प्रतिवाद हे वासंती फडके यांनी संपादित केलेले पुस्तक आहे.यामध्ये यदिं नी घातलेल्याा विविध वैचारिक वादांचे संकलन आहे.विविध क्षेत्रातील भिन्न भिन्न विचारसरणीच्या विविध व्यक्तींच्या विचारांचे दर्शन येथे होते.विचारांचा लढा विचारांनीच दिला पाहिजे या मताशी ठाम राहून खेळलेले हे वाद मराठी साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत.

अकरा  जानेवारी हा य.दि.फडके यांचा स्मृतिदिन.(2008). त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ६ जानेवारी –  संपादकीय  ? 

महामहोपाध्याय. विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव हे वैदिक साहित्याचे अभ्यासक होते. डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळात’ सहसंपदक म्हणून १९२१ मध्ये ते रुजू झाले. या कोशात वेदविद्या खंडाच्या संपादन कार्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.               

महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्यापनाचा त्यांनी पाया घातला. संपूर्ण ऋक्संहितेचे १९२८ मध्ये त्यांनी प्रथम भाषांतर केले. अथर्ववेदाचेही त्यांनी मराठीत भाषांतर केले. पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्य शब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायींचा व गणपाठाचा शब्दकोश हेही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. प्राचीन भारतीय स्थलकोशाचा प्रथम खंडही त्यांनी १९६९ मध्ये प्रकाशित केला. त्यांचे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे त्यांनी मराठीत चरित्र कोश संपादन केले. भारतीय चरित्रकोश मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्राचे ३ कोश संपादित करून प्रसिद्ध केले. (१९३२, १९३७ , १९४६) या चरित्रकोशाच्या सुधारलेल्या आवृत्तीस, १९३७ साली अहिंदी प्रांतात प्रकाशित झालेला  सर्वोत्कृष्ट हिन्दी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले.

पुरीच्या शंकराचार्यांनी  त्यांना महामहोपाध्याय ही उपाधी दिली, तर चिदंबरंच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘विद्यानिधी’ ही उपाधी दिली. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना १९६५ मध्ये संस्कृत सन्मानपत्र दिले गेले. त्यांच्या विद्वत कार्याच्या गौरवार्थ  ‘रिव्हू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह  इयर्स हा इंग्रजी ग्रंथ १९६७ मधे तयार झाला. राष्ट्रपतींच्या हस्तेच तो, त्यांना अर्पण करण्यात आला. पुणे विद्यापीठाने १९६९ मधे डी. लिट. ही सन्मान पदवी त्यांना बहाल केली, तर भारत सरकारने १९७१ साली ‘पद्मश्री’ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा जन्म १फेब्रुवारी १८८४चा तर त्यांचे निधन ६ जानेवारी १९८४ साली झाले.

या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र आदरांजली.   

 ☆☆☆☆☆

प्रा.प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील सुल्लाळी येथे १९४३ साली झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या माथ्यावरचे आई-वडलांचे छत्र हरवले. बहिणीने त्यांचा सांभाळ केला.  गुरे-ढोरे वळतच त्यांची शाळा सुरू झाली.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद इथे मिलिंद महाविद्यालयात झाले. मराठवाडा विद्यापीठातून, इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून त्यांनी एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. १९६६ मधे आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले पुढे उपप्राचार्य व प्राचार्य झाले. १९८८ मध्ये ते निवृत्त झाले.

‘अस्मितादर्श’मधून त्यांनी आपले लेखन सुरू केले. ‘आठवणींचे पक्षी’ हे त्यांचे आत्मचरित्र. याला साहित्य अ‍ॅकॅडमीचा १९८३ सालचा पुरस्कार जाहीर झाला होता.  या आत्मचरित्राचे ११ भारतीय भाषात अनुवाद झाले आहेत. याशिवाय ‘असं हे सगळं’, ‘पोत आणि पदर’ ही त्यांची आणखी २ पुस्तके .त्यांचा साहित्यिक व सामाजिक संस्थांशी जवळचा संबंध होता. एक सहृदयी, प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती.

ते अनेक संमेलनांचे अध्यक्ष किंवा स्वागताध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या  आखाडा बाळापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७९ मधे औरंगाबाद येथे झालेल्या तिसर्‍या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.  १९८१ मधे औरंगाबाद येथे झालेल्या इंडिया बुद्धिस्ट टीचर्स कॉन्फरन्सचे ते स्वागताध्यक्ष होते.  १९८२ मधे झालेल्या पहिल्या दलित नाट्यमहोत्सवाचेही ते स्वागताध्यक्ष होते. 

 त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. साहित्य अ‍ॅकॅदमीच्या मानाच्या पुरस्काराबरोबरच त्यांना राज्यशासनाचाही पुरस्कार मिळाला आहे. लातूर नगर परिषदेने त्यांचा ‘भूमिपूत्र’ म्हणून त्यांचा विशेष गौरव केला आहे. आंबेजोगाई इथे यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार त्यांना दिला गेला आहे. रयत शिक्षण मंडळाचाही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने  आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

आज त्यांचा स्मृतिदिन (६जानेवारी २०१०). या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याला विनम्र अभिवादन.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ५ जानेवारी –  संपादकीय  ?

दत्तात्रय गणेश गोडसे :

श्री.द.ग.गोडसे यांचा जन्म जळगावचा.पण त्यांचे शिक्षण नागपूर व मुंबई येथे झाले.तसेच लंडन विद्यापीठाचे ललितकला विषयीचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण  केले होते.

इतिहासकार,नाटककार,चित्रकार,नेपथ्यकार ,कलासमीक्षक अशा साहित्याच्या विविध प्रांतात त्यांनी कार्य केले आहे. शिवाजी, रामदास, मस्तानी चित्रकला, शिल्पकला, बुद्धकालीन स्थापत्य, हे त्यांच्या लेखनाचे विषय होते. वृत्तपत्रात वाद संवाद हे त्यांचे सदर खूप गाजले. यात साहित्यिक व सांस्कृतिक  घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी ई. वृत्ती प्रवृत्तीवर खुमासदार  लिहिले जायचे.

भारताचा सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार असा त्यांचा भारत सरकारने गौरव केला होता.

त्यांची काही पुस्तके व साहित्य : उर्जायन,काही कवडसे,गतिमानी,दफ्तानी,पोत,सोंग,मस्तानी,मातावळ,लोकधाटी,शक्तिसौष्ठव,संभाजीचे भूत, इ. काळगंगेच्या काठी(नाटक) नांगी असलेले फुलपाखरू हे कलावंतांचा सत्कार करणारे पुस्तक.

‘भारलेल्या जगातून आलेला अलौकिक माणूस’ हा दीनानाथ दलाल यांच्या वरील लेख खूप गाजला होता. 

आज त्यांचा स्मृतीदिन आहे.

☆☆☆☆☆

नारायण धोंडोपंत ताम्हनकर :

ना.धों.ताम्हनकर या नावाने सुपरिचित असलेले व ‘ गोट्या’ या लोकप्रिय पात्राचे जनक.

त्यांचे बालपण इचलकरंजीत गेले.लहान वयातच त्यानी इचलकरंजी संस्थानिकांकडे कारकून म्हणून नोकरी धरली.तेथे ब्रह्मर्षि नावाची  नाटिका लिहीली व सादर केली.त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजीच्या घोरपडे संस्थानिकानी त्यांच्या हातात सोन्याचे कडे घातले.

नंतर ते किर्लोस्करवाडीला गेले.तेथे किर्लोस्कर या मासिकाचे उपसंपादक या पदावर बरेच वर्षे काम केले.तेथून निवृत्त झाल्यावर  नाशिकच्या ‘गावकरी’ मध्ये त्यांनी लेखन सुरू केले.

त्यांची साहित्य संपदा : मणि,अविक्षित,दाजी,अंकुश,मालगाडी,शामराई,बहिणभाऊ,किशोरांसाठी गोट्या,चिंगी, नीलांगी,नारोमहादेव,रत्नाकर,खडकावरला अंकुर.

काव्य: तिची कहाणी.

गोट्या या पुस्तकावर आधारित दूरदर्शन मालिका सादर झाली होती व ती लोकप्रियही झाली होती. 

आज ना.धों. चा  स्मृतीदिन आहे.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३ जानेवारी –  संपादकीय  ? 

मराठीतील नावाजलेल्या लेखिका म्हणजे सरिता पदकी. पूर्वाश्रमीच्या त्या शांता  कुलकर्णी. १३ डिसेंबर १९२८ मधे ठाणे शहाराजवळ आगाशी येथे त्यांचा जन्म झाला. त्या संस्कृत विषय घेऊन पुणे विद्यापीठात एम.ए. ला पहिल्या आल्या. सत्यकथे लेखन करणारे, अर्थशास्त्रज्ञ मंगेश पदकी, हे त्यांचे पती. तेही उत्कृष्ट लेखक होते.

वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनास प्रारंभ केला. पुढे हयातभर त्यांची लेखनाशी जवळीक राहिली. महाविद्यालयात असताना त्यांचे सहाध्यायी पुरुषोत्तम पाटील स्वहस्ते त्यांचे लेखन उतरवून घेत. साहित्य,अभिरुची, सत्यकथा इ. दर्जेदार नियतकालिकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. त्यामुळे साहित्यिक वर्तुळात त्यांचे मानाचे स्थान निर्माण झाले. त्यांचे कवितावाचनही अतिशय प्रभावी असे.

सरिता पदकी यांचे लेखन चौफेर होते.  कविता, कथा, नाटके या त्रिविध प्रकारात त्यांनी लेखन केलेच पण इंग्रजीतील उत्तम साहित्याचाही त्यांनी मराठीत अनुवाद केला. मराठीत, मुलांसाठी निघत असलेल्या रानवारा या मासिकाच्या सल्लागार मंडळावर त्या होत्या. पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. किशोरमासिकात  ७०च्या दशकात त्यांनी जे लेखन केले, ते अतिशय लोकप्रीय झाले. 

सरिता पदकी यांची काही पुस्तके –

कविता संग्रह – चैत्रपुष्प, अंगणात माझ्या लगनगंधार

कथा संग्रह – घुम्मट, बारा रामाचे देऊळ

नाटक –सीता, बाधा

अनुवादीत – खून पहावा करून- मूळ इंग्रजी लेखक – नाटककार ऑर्थर वॅटकिन यांच्या ‘नॉट इन द बुक’ या नाटकाचा अनुवाद

पांथस्थ – यूजीन ओनील यांच्या नाटकाचा अनुवाद

काळोखाची लेक – ब्राझिलच्या झोपडपट्टीत रहाणार्‍या करोलिना मारीया डी जीझस यांच्या ‘चाइल्ड ऑफ डार्कनेस या आत्मनिवेदनाचा अनुवाद

संशोधक जादूगार – वेस्टिंग हाऊसच्या चरित्राचा अनुवाद सात रंगाची कमान माझ्या पापणीवर – जपानी कवितांचा अनुवाद

बालसाहित्य  – करंगळ्या, गुटर्र गूं, नाच पोरी नाच ( कविता) अक्कल घ्या अक्कल, जंमत टंपू टिल्लूची, छोटू हत्तीची गोष्ट, हसवणारे अत्तर ( कथा) सरिता पदकी यांचं बालसाहित्याही मुलांना खूप आवडतं या प्रतिभावंत लेखिकेचं निधन वृद्धापकाळाने ३जानेवारी २०१५ मधे अमेरिकेत झालं. 

☆☆☆☆☆

अमरेन्द्र गाडगीळ हे मराठी लेखक, विशेषत: बालसाहित्याचे लेखक आणि प्रकाशक, बाल-कुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक होते. त्यांनी दैवत कोश तयार केला, ही त्यांची महत्वाची कामगिरी. १९८१ साली इचलकरंजी येथे झालेल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

अमरेन्द्र गाडगीळ  जन्म २५ जून १९१९ साली झाला.

अमरेन्द्र गाडगीळ यांचे साहित्य – अज्ञाताची वचने, ईशावस्य केनोपनिषद (६ भाग) , उक्ति विशेष, जीवन संग्राम, महाभारत सर्वांगीण दर्शन, लोकसेवक चरित्र मालेतील ठक्करबाप्पा यांचे चरित्र, त्याचप्रमाणे रविशंकर महाराज चरित्र, महर्षी आईनस्टाईन, वंदे मातरम, वीर आणि परमवीर रामबंधू  त्याग सिंधू (कथा), शतकुमार कथा (५ भाग), देवदिकांच्या गोष्टी,  किशोर मित्रांनो, श्री गणेश कोश ( ६ खंड– १९६८ पाने) , श्री राम कोश ( वाल्मिकी रामायणाच्या  समग्र अनुवादासहित, ६ खंड– १९८१ पाने), श्री हनुमान कोश, साहित्य सरिता  इ. अनेक पुस्तके  त्यांनी लिहिली. दैवत कोशांची निर्मिती हे त्यांनी साहित्याला दिलेले विशेष योगदान मानले जाते.

☆☆☆☆☆

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी – हे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि थोर लेखक दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र. ते स्वातंत्र्य सैनिक होते. वकील होते. न्यायाधीश होते आणि लेखकही होते. मुंबईत उच्च न्यायालयाचे ते माजी मुख्य न्यायाधीश होते.

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म २०नोहेंबर १९२७ला झाला.

प्रकाशित साहित्य – अंतर्यात्रा, काळाची पाऊले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझील दूर राहिली, माणूसनामा, शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहू या.

 न्या. चंद्रशेखर धर्माधिकारीयांना २००४ला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

३ जानेवारी २०१९ल त्यांना देवाज्ञा झाली.

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अमरेन्द्र गाडगीळ, सरिता पदकी या तिघांच्या स्मृतिदिनी त्यांना हार्दिक श्रद्धांजली. .

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ जानेवारी २०२२ व नव वर्ष शुभेच्छा – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? संपादकीय व नव वर्ष शुभेच्छा ?

नववर्षाचा नवदिन आला, 

गतसालाचा निरोप घेऊन ।

नवविचार अन नवीन आशा, 

साजही मोहक किती हा लेवून —-

आजपासून सुरु होणाऱ्या नव्या वर्षाचे मनापासून स्वागत करतांना, आपल्या ई-अभिव्यक्ती समूहाच्या सर्व समृद्ध लेखक-लेखिका, कवी-कवयित्री, आणि सर्व रसिक वाचकांना नववर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा.

१-१-२२.…. किती मस्त, अगदी पाढे असतात तशी लयबद्ध वाटणारी तारीख आहे ना ही. 

आज सुरु होणारे हे वर्षही सर्वांसाठी असेच मस्त असू दे. आणि असणारच आहे. गेल्या वर्षभरात सगळे जगच एका अदृश्य दडपणाखाली जगत होते. पण आता परिस्थिती नक्कीच पूर्वपदावर यायला लागली आहे, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे आता आपल्या सर्वांच्याच लेखणीला नक्कीच आणखी सुंदर बहर येईल, याची मला आशा— नाही नाही, खात्रीच आहे. आणि त्यासाठीही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 

माझ्यापुरतं सांगायचं, तर गेलं वर्षही माझ्यासाठी खूप आनंददायीच  ठरलं होतं, आणि त्याला कारण आहे- “ ई-अभिव्यक्ती “ समूहाशी ‘ संपादक ‘ या नात्याने माझी नव्याने झालेली ओळख. यामुळे माझी अनेक साहित्यप्रेमींशी, आणि आपल्यासारख्या साहित्यिकांशी ओळख झाली आहे– होते आहे.  वेगवेगळे विचार मांडणारे- वेगवेगळ्या शैलीतले, आणि वेगवेगळ्या धाटणीचे– वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होणारे साहित्य रोज वाचायला मिळते आहे. आणि त्यामुळे आयुष्याला जी एक वेगळीच आणि हवीहवीशी वाटणारी समृद्धी प्राप्त व्हायला लागली आहे, त्याचे सर्व श्रेय आपणा सर्वांना आहे. 

आता या वर्षीही आपल्या समूहाला अशाच “ दर्जेदार लिहित्या हातांची “ आणि रसिक वाचकांची अधिकाधिक साथ मिळत राहो, —-

आणि सर्वांना हे नवे वर्ष उत्तम आरोग्याचे, —-

सर्वतोपरी सुख–समृद्धी–शांतीचे जावो, —– 

हीच श्री स्वामी समर्थचरणी मनःपूर्वक प्रार्थना. 

☆☆☆☆☆

१ जानेवारी २०२२ —

किर्लोस्कर “ या लोकप्रिय मराठी मासिकाचे संस्थापक-संपादक श्री. शंकरराव किर्लोस्कर यांचा आज स्मृतिदिन. ( ८/१०/१८९१ – १/१/१९७५ ). 

संपादक, लेखक आणि व्यंगचित्रकार म्हणून ‘ शंवाकि ‘ या नावाने ते सुपरिचित होते. शिक्षणानंतर त्यांच्या घरच्याच किर्लोस्कर कारखान्यातील जाहिरात विभाग ते सांभाळू लागले, आणि उद्योगाबरोबरच साहित्याशीही त्यांची चांगलीच गट्टी जमली. आपल्या उत्पादनाची जाहिरात, कारखान्यातील घडामोडी आणि गावातल्या लोकांच्या कथा-कविता अशी सदरे असणारी 

“ किर्लोस्कर खबर “ नावाची वृत्तपत्रिका त्यांनी १९२० साली सुरु केली होती. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूचनेवरून त्यांनी या पत्रिकेचे “ किर्लोस्कर “ या नावाने नियतकालिक काढण्यास सुरुवात केली. कालांतराने “ स्त्री ‘; ‘ मनोहर ‘ ही त्यांनी संपादित केलेली मासिकेही विशेष लोकप्रिय ठरली. 

आत्मप्रभाव, यशस्वी धंद्याचा मार्ग, व्यापाराचे व्याकरण, आणि यांत्रिक यात्रा हे विशेष गाजलेले पुस्तक, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. “ शंवाकिनी “ या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकातून महाराष्ट्रातले पाच दशकांचे सांस्कृतिक जीवन स्पष्टपणे समजून घेता येते. ‘ टाकाच्या फेकी ‘ हे त्याच्या चित्रांचे गाजलेले पुस्तक आहे. 

श्री. शंकरराव किर्लोस्कर यांना मनापासून आदरांजली.   

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ३१ डिसेंबर –  संपादकीय  ?  

.

गत वर्षाच्या

सरत्या क्षणांबरोबरच

विरून जाऊ दे

गूढ, उदास, मलिन धुके

कटु स्मृतींचे

येऊ दे सांगाती

सौरभ सुमधुर स्मृतींचा

जो सेतू होऊन राहील

भूत-भविष्याचा

 

आज २०२१ सालचा शेवटचा दिवस. वर्षभराचा मागोवा घेताना, अनेक बर्‍या वाईट आठवणी उसळून वर येताहेत. भविष्य काळात शांती मिळवायची असेल, तर दु:खद आठवणी विसरायला शिकायला हवं आणि सुखद आठवणी आठवता आठवता त्या जगन्नियंत्याचे आभार मानायला हवे, की त्याने असे सुखद, सुंदर क्षण आपल्या ओंजळीत टाकले.

माझ्या सुखद क्षणांबद्दल बोलायचं झालं, तर , ई-अभिव्यक्तीच्या संपादनाच्या निमित्ताने अनेक लिहिते हात माझ्या परिचयाचे झाले. लिहित्या हातांच्या धन्यांची ओळख झाली. हा अल्प परिचय अधीक दृढ होईल, मैत्रीत रूपांतरित होईल, अशी उमेद बाळगून नवं वर्षात पाऊल टाकायचे आहे. ई-अभिव्यक्तीवरून अधिकाधिक सकस साहित्य कसं देता येईल, याचा शोध, वाचक-लेखकांच्या सहाय्याने घ्यायचा आहे. सर्वांच्या सहाय्याने अधिकाधिक लेखक-वाचक मंडळी ई-अभिव्यक्तीशी जोडून घ्यायचीत. हे झाले, तर याचे श्रेयही आपणा सर्वांचे आहे. नवीन वर्षातला संकल्पच  म्हणा ना हा! आणि असे घडावे, म्हणून मीच मला बेस्ट लक देते आहे.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २९ डिसेम्बर –  संपादकीय  ?

मंगेश पाडगावकर:

झोपाळ्यावाचून झुलत झुलत ज्यांनी या जन्मावर शतदा प्रेम केले, ज्यांच्या दारात पहाटे पहाटे केशराचे मोर झुलत असतात आणि ज्यांच्या रात्री चांदण्याचे सुरेल गाणे गात येत असतात, आपल्या लाख चुकांची कबुली देऊनही मनातल्या मोरपिसांची शपथ घालत ते केली पण प्रीती हे ही मनापासून  जाहीर  करतात, शब्दांवाचूनही ज्यांना शब्दांच्या पलिकडलं कळलेलं असतं पण तरी शब्द शब्द जपून वेच असं जे सांगून जातात, अवघ्या जीवनाचे गाणे करून हासत जावे जाताना असा संदेश सहजपणे जे देतात ते कवीवर्य मंगेश पाडगावकर !त्यांचा आज स्मृतीदिन. पण आज स्मृतीदिन असे तरी कसे म्हणावे? कारण त्यांच्या शब्दांची पाखरं रोजच आपल्या आजुबाजूला स्मृती ठेवून जात असतात. त्यांमुळे प्रत्येक दिवस हा त्यांचा स्मृतीदिनच असतो.

सुमारे साठ वर्षे साहित्याची सेवा करणारे मंगेश पाडगावकर हे मूळचे सिंधू दुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे. कोकणातील निसर्ग बालमनाने टिपला आणि नंतर काव्यात उतरला. त्यांनी मुंबई विद्यापीठात मराठी व संस्कृत या विषयात एम्.  ए.  पूर्ण केले. काही काळ रूईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र त्यांचे लेखन कार्य अखंडपणे चालू होते.  

प्रामुख्याने काव्यनिर्मिती केली असली तरी त्यांनी साहित्याचा अनुवादही विपुल प्रमाणात केला आहे. 1957 साली त्यांनी थाॅमस पेनचे राजनैतिक संबंध हा  निबंध अनुवादित केला. 2009 मध्ये बायबल चा अनुवाद केला. कमला सुब्रह्मण्यम यांच्याा  मूळ इंग्रजी ग्रंथाचा कथारूप महाभारत या नावाने दोन खंडांत अनुवाद केला  आहे. याशिवाय मीरा, कबीर, सूरदास या संत कवींच्या निवडक पदांचाही अनुवाद ही केला आहे. या व्यतिरिक्त विविध विषयांवरील 25   पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला आहे.

मराठी साहित्यात कविता हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्यांचे काही कविता संग्रह असे: आनंदॠतू, आनंदाचे डोही, उदासबोध उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसांसाठी, काव्यदर्शन, गझल, गिरकी, चांदोमामा, चोरी, जिप्सी, तुझे गीत गाण्यासाठी, तृणपर्वे , त्रिवेणी, धारानृत्य, बोलगाणी, भोलानाथ, भटके पक्षी, सलाम, क्षणिका इत्यादी… त्यांची अनेक काव्ये लयबद्ध, गेय असल्याने त्यांची गीते झाली. शिवाय अनेक भावगीतेही त्यांनी लिहीली आहेत.

त्यांच्या साहित्य सेवेचा  वेळोवेळी गौरवही झाला आहे. 2010 साली झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे व विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . सलाम या त्यांच्या कविता संग्रहास 1980 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2008  साली महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. 2013 साली म. सा. प. चा सन्मान व त्याच वर्षी पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.

मुंबईतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे त्यांच्या नावाने भाषासंवर्धन पुरस्कारही दिला जातो.

“आयुष्य हे विध्यात्याच्या वहीतलं पान असतं

 रिकामं तर रिकामं , लिहीलं तर छान असतं”  

पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्याच्या राहिलेल्या पानावर काहीतरी छान लिहीत जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते.

☆☆☆☆☆

द. पं. जोशी:

द. पं. जोशी हे मूळचे परभणीचे. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते हैद्राबादला गेले. तेथे एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अभ्यासू वृत्ती, कुशाग्र बुद्धी, इतिहास व पूर्वसूरींबद्दल प्रेम यामुळे हैद्राबादेत ते सार्वजनिक कामात गुंतले. अनेक सार्वजनिक संस्था, मराठी साहित्य परिषद व मराठी महाविद्यालयांशी त्यांचा संबंध आला. 1959 ते 1992 या कालावधीत त्यांनी विवेक वर्धिनी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

त्यांचे स्वतंत्र, संपादित व अनुवादीत असे एकूण 15 ग्रंथ प्रकाशित आहेत. विविध नियतकालिकांमधून 100 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. शिवाय उर्दू व हिंदी भाषेतील अनेक कथा, लेख यांचा मराठीत अनुवाद त्यानी केला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते दोनदा उपाध्यक्ष होते. 1998 साली भरलेल्या परभणीचे जिल्हा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य परिषद, हैदराबाद या संस्थेचे ते 30 वर्षे कार्यवाह व 8 वर्षे अध्यक्ष होते. या संस्थेच्या पंचधारा या त्रैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले होते.

आज त्यांचा स्मृतीदिन! अमराठी प्रदेशात मराठीची सेवा करणा-या द. पं. जोशी याना अभिवादन.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया, तुझे गीत गाण्यासाठी

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २८ डिसेंबर –  संपादकीय  ?  

महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त असलेले मे.पुं. रेगे म्हणजेच मेघनाथ पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ साली झाला. मराठी आणि   ङ्ग्रजी या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल लेखन केले. मराठी भाषकांना त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. विश्वकोशात पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्ते यांच्या नोंदी त्यांनी केल्या.भारतीय देशने, ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान व इतर आनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये.

मार्च १९९६मधे मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी मराठी भाषा स्थिती आणि भवितव्य या विषयावर मार्मिक भाष्य केले. ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित होण्यात नेमका कोणता अडथळा आहे, यांची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात होती.

मे.पुं. रेगे  तर्कशास्त्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर १९८४ ब्ते २००० मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष झाले. ते नवभारत आणि न्यू क्वेस्ट या मासिकांचे संपादक होते. ‘मराठी तत्वज्ञान महाकोश या प्रकल्पाच्या संपदक मंडळात होते. त्यांनी गुजरात, औरंगाबाद, मुंबई इये. ठिकाणी अध्यापनाचे काम केले‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’चे संचालक होते. वाईतील धर्मकोशाचे ते उपाध्यक्ष-अध्यक्ष होते.

१९९५ मधे महाराष्ट्र फाउंडेशनच्या पहिल्या वैचारिक साहित्य पुरस्काराचे ते मानकरी होते.१९९६साली त्यांचा गौरव झाला आणि त्यांना  कोकण साहित्य भूषण म्हणून त्यांचा गौरव झाला आणि त्यांना गौरवचिन्ह दिले गेले. मर्मभेद, आधुनीक महाराष्ट्रातील प्रबोधन पर्व विज्ञान आणि श्रद्धा, स्वातंत्र्य आणि न्याय इ. त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक भाषांतरित पुस्तकेही लिहिली.

  ☆☆☆☆☆

रमेश सहस्त्रबुद्धे हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म १९३८चा. विज्ञानयुग म्हणून प्रसिद्ध होणार्‍या मासिकाच्या सल्लागार समितीवर ते होते. त्या अंकात ते लेखनही करत. दै. प्रभातच्या दिवाळी अंकात ते लेखन करत असत. प्रभातने चालवलेल्या ‘ऑल राऊंडर या उपक्रमातदेखील त्यांचा सहभाग असे. मराठी  विज्ञान परिषदेतर्फे काढल्या जाणार्‍या पत्रिकांसाठी त्यांनी लेखन केले. मासिकाच्या संपादकपदाची धूराही त्यांनी सांभाळली. ते लेखक होते, त्याचप्रमाणे आकाशवाणी आणि दूरदर्शन वरूनही त्यांची व्याख्याने प्रासारीत झाली आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ते पहिले मुख्य जंनसंपर्क आधिकारी होते.

रमेश सहस्त्रबुद्धे यांची ७६ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी काही खालील पुस्तके –

  • विज्ञान कुतूहल २.प्राणी-पक्षी निरीक्षण, ३.वैज्ञानिक आणि थोरांचे किस्से, ४.अजब दुनिया, ५. ऐतिहासिक नवलकथा, क्रांतिकारकांच्या कथा या बरोबरच त्यांनी मार्कोनी, जगदीशचंद्र बोस, दसगणू महाराज, राजकपूर, होमी भाभा यांच्यावर त्यांनी चरित्रे लिहिली.
  • टेलिव्हीजन आणि विज्ञान सागरातील दीपस्तंभ या विज्ञानविषयक पुस्तकांना  राज्यापुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या काही लेखांचा पाठ्यपुस्तकात व अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
  • रोहा येथे झालेल्या विज्ञानपरिषदेच्या संमेलनात मानपत्र देऊन गौरव झाला आहे.

रमेश सहस्त्रबुद्धे यांचा स्मृतीदिन २८ डिसेंबर२०१६ चा तर मे.पुं. रेगे  यांचा २८ डिसेंबर २०००चा. या दोघाही विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सादर अभिवादन. ?

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २६ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज २६ डिसेंबर हा मराठी गीतकार श्री. दत्ता वि. केसकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या गीतांबद्दल, किंवा इतर साहित्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध झाली नसली, तरी त्यांची ध्वनिमुद्रित झालेली जी दोनच भावगीते, रसिकांच्या मनात कायमची नोंदली गेलेली आहेत, त्याबद्दल सांगायलाच हवे. 

“घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे “, हे त्यातले एक भावगीत, आणि “ प्रतिमा उरी धरोनी , मी प्रीती गीत गाते “ –हे दुसरे भावगीत. लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या या  दोन्ही भावमधुर गीतांनी मराठी भावगीत-विश्वात कायमचे स्थान मिळवलेले आहे. 

श्री. द. वि. केसकर यांना आदरपूर्वक नमस्कार. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print