श्री सुहास रघुनाथ पंडित
१२ डिसेम्बर – संपादकीय
पं. महादेवशास्त्री जोशी.
वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र अशा विषयांचे पारंपारिक पद्धतीने अध्ययन करून शास्त्री ही पदवी संपादन करणारे पं. महादेवशास्त्री जोशी यांचा आज स्मृतीदिन! (1992)
गोव्यात जन्मलेले शास्त्रजी गोवा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप झाले होते. गोवा व सांगली येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गोव्यात सत्तरी शिक्षण संस्था स्थापन केली व शैक्षणिक कार्याला वाहून घेतले. चैतन्य या मासिकाचे संपादन करून लेखन चालू केले. ‘राण्यांचे बंड ‘ ही त्यांची पहिली कथा याच मासिकातून प्रकाशित झाली. वेलविस्तार हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर त्यांनी एकूण दहा कथासंग्रह लिहिले. कल्पवृक्ष, खडकातील पाझर, विराणी हे त्यापैकी काही. शिवाय भारतदर्शन प्रवासमाला, मुलांचा नित्यपाठ व आईच्या आठवणी हे बालसाहित्य, आत्मपुराण, आमचा वानप्रस्थाश्रम ही आत्मचरित्रे असे त्यांचे अन्य साहित्य आहे. त्यांनी भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड संपादित केले आहेत. तसेच मुलांच्या संस्कृती कोशाचे चार खंड
संपादित केले आहेत. त्यांच्या रसाळ, ओघवत्या भाषेतून गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडते.
त्यांच्या काही कथांवर चित्रपट निघाले असून ते लोकप्रिय झाले आहेत. कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा, थांब लक्ष्मी कुंकू लावते हे सर्व चित्रपट त्यांच्या, कथांवरील आहेत.
1980 साली गोवा येथे झालेल्या गोमंतकीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
निरंजन उजगरे.
सुप्रसिद्ध कवी, लेखक व अनुवादकार निरंजन उजगरे यांचाही आज स्मृतीदिन आहे. (2004)ते व्यवसायाने अभियंता होते. पण त्याचबरोबर त्याना लेखन कलेची देणगीच लाभली होती. सुरूवातीला ते ‘किरण’ या टोपणनावाने लिहीत असत. पुढचे लेखन मात्र त्यांनी निरंजन या नावानेच केले. इंग्रजी, रशियन, तेलगू, सिंधी, हिंदी, मराठी अशा विविध भाषा त्यांना अवगत होत्या.
काव्यपर्व, जायंटव्हील, परिच्छेद, फाळणीच्या कविता,
हिरोशिमाच्या कविता, दिनार, दिपवा, तत्कालीन, कवितांच्या गावा जावे ही त्यांची काही पुस्तके. कवितांच्या गावा जावे हा कार्यक्रमही त्यांनी लोकप्रिय केला होता.
सोविएट लॅन्डचा नेहरू पुरस्कार आणि कविवर्य ना. वा. टिळक हे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
1996 साली मालवण येथे झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1999 साली डोंबिवली येथील 32व्या काव्य रसिक मंडळाचे ते अध्यक्ष होते.
त्यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वास सलाम !
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया,विकासपिडीया.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈