श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “माझे दगडाचे हात” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री सुधाकर इनामदार ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : माझे दगडाचे हात (काव्यसंग्रह)
कवी : श्री सुधाकर इनामदार
संपर्क: 9421122017
मूल्य : रु. 200/_
प्रकाशक: तेजश्री प्रकाशन, कबनूर. 8275638396
परिचय : सुहास रघुनाथ पंडित
☆ माझे दगडाचे हात : दगडाच्या हातातून पाझरलेली काव्यगंगा ☆
… सांगली जिल्ह्य़ातील आटपाडी तालुका म्हणजे साहित्यिकांची खाणच ! याच तालुक्यातील गोमेवाडीचे कवी श्री. सुधाकर इनामदार यांचा ‘ माझे दगडाचे हात ‘ हा काव्य संग्रह काही महिन्यांपूर्वी सांगलीत प्रकाशित झाला. हा त्यांचा चौथा काव्य संग्रह. उत्तम गझलकार म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच. पण या काव्यसंग्रहामुळे त्यांचे गझलेतर काव्य प्रकाशात आले आणि काव्य रसिकांना एक नवे लेणे प्राप्त झाले. त्या लेण्याचे यथाशक्ती दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न !
कविता काय असते, कवितेची ताकद काय असते हे सांगताना ते पहिल्याच कवितेत म्हणतात की कविता ही विश्वाला व्यापून उरणारी असते. ती मौनाला फुटलेला अक्षरपान्हा असते. करुणा, वेदना, भूक, तृप्ती अशी कवितेची अनेक रुप त्यांना दिसतात. एवढेच नव्हे तर आत्महत्येच्या अविचारापासून परावृत्त करण्याचे सामर्थ्यही कवितेत आहे असा विश्वास त्यांना कवितेबद्दल आहे. त्यामुळेच कुटुंबातील वातावरण काव्य निर्मितीला पोषक नसतानाही त्यांनी कवितेला दूर लोटलं नाही. कारण ज्या कवितेने विठूलाही बांधून ठेवलं आहे तीच कविता आपल्या रक्तातून वाहते आहे, ती दूर करता येणारच नाही याची जाणीव त्यांना सुरुवातीपासूनच झाली आहे. मग हा प्रवास अव्याहतपणे चालू राहीला आणि कवितेच्या हव्यासाने लाभलेली फकिरी ही सुद्धा अमीरी वाटू लागली. कविता गझल, अभंग, ओवी होऊन ह्रृदयातून पाझरु लागली. कधी ती गवतासारखी मुलायम बनली तर कधी तलवारीची धार होऊन तळपू लागली. कवितेच्या सामर्थ्यामुळे कवी इतका सामर्थ्यवान बनला की तो आत्मविश्वासपूर्ण सांगू शकतो की
“अंथरुनिया समुद्र अवघा
घेऊन निजलो चंद्र उशाला
पांघरुनी आकाश घेतले
पायाशी बसवले तमाला “
कविचा कवितेविषयीचा हा दृष्टीकोन, विश्वास म्हणजे कवीच्या रक्तात कविता किती भिनली आहे याचे द्योतक आहे.
झाड, पारध, चिमणे यांसारख्या काही रुपकात्मक कवितांतूनही कवीच्या भावना व्यक्त होतात.
सुखासुखी जीवन जगणं कुणाला नको असतं ? पण राजमार्ग सोडून संकटांना सामोरं जाणं ज्याला जमतं त्यालाच जगणं समजतं. वादळवा-याशी टक्कर देत उभं असलेलं झाड म्हणून तर कविला आकर्षित करत नसेल ना ? कविला झाड व्हायचय. ते इतक सोप नसतं हे त्याला माहित आहे. पण तरीही त्याला झाड व्हायचंय. बहरणं असणार तशी पानगळही असणार. पाऊस बरसणार. विजा झेलाव्या लागणार. सावली देऊनही कु-हाडीचे घाव सोसावे लागणार. पण हे सगळ्याला त्याची तयारी आहे. कारण स्वतः मातीखाली मुजून दुस-यासाठी वर फुलून येण्यातली सार्थकता कविला अनुभवायची आहे. कवीचं मातीशी असलेलं नातं कधीच तुटणार नाही हेच यातून स्पष्ट होतय.
‘पारध’ ही कवितेतून कवीने गावरान वातावरण निर्माण करत एक मोलाच इशाराही देऊन ठेवला आहे. रानाची राखण करता करता आपली पारध होणार नाही याची काळजी घ्यायचा सल्ला देताना काळाच्या बेरकेपणाची जाणीव करुन देऊन सर्वांनाच सावध केलं आहे. तरारलेल्या रानाची राखण करताना खडा पहारा तर हवाच पण त्याच रानाची भुरळ पडू देऊ नकोस, गाफील राहू नकोस ही रुपकात्मक भाषा ‘ ऊसाला लागलं कोल्हा ‘ ची आठवण करुन देते. ‘चिमणे ‘ या कवितेतून कवीने चिमणीशी साधलेला संवाद हा सावधानतेचा इशारा देऊन स्त्रीचे बळ वाढवणाराच आहे.
त्यांच्या अनेक कवितांमधून विठूमाऊलीचा उल्लेख आढळतोच. पण काही कविता या भक्तिरसात न्हाऊन निघाल्या आहेत. ’ धाव रे विठ्ठला, तुझा कैवल्याचा मळा ‘ यासारख्या कविता आपल्याला त्यांच्या सश्रद्ध मनाचे दर्शन घडवतात. तरी सुद्धा…..
“ज्यांच्या तळहाती घट्टे
आणि भाळावर घाम
कसा आठवावा त्यांना
सांज सकाळचा राम “
हा प्रश्न त्यांना पडतोच. या विठुरायाचे गुणगान गाताना ते दुस-या देवाला- देशालाही- विसरत नाहीत.
संतांची, शूरांची भूमी असलेल्या या भूमीचा जयजयकार करुन ते थांबत नाहीत तर वास्तवाचे भान ठेवून सांगतात ” सावध ठेवा सीमा अपुल्या करेल शत्रू मारा “. ही सावधानता डोळस भक्तीची द्योतक आहे.
‘जख्ख दुपारी ‘…. ही कविता म्हणजे एक उत्तम शब्दचित्रच आहे. भर दुपारच्या रखरखराटाचे केलेले वर्णन वाचून कवीच्या निरीक्षण शक्तीचा अंदाज येतो. पोरकी पेठ, सुनामुका माळ, कळसाची सावली, पडलेला वारा यासारखे संदर्भ दुपारच्या तीव्रतेचे नेमके चित्रण करतात. दुपार किती ‘ जख्ख ‘ आहे ते डोळ्यासमोर येते.
कवितेवर प्रेम करणारा असा कोणताच कवी नसेल की ज्याने प्रेमकवीता लिहीली नाही. कवी सुधाकर हेही याला अपवाद नाहीत. तिची उडणारी बट, फडफडणारी ओढणी, तिच्या पैंजणांचा नाद कवीला आकृष्ट करुन घेतातच. पण तिच्या मनाच्या समुद्रात वादळ उठतेय आणि इकडे त्याची ओली सळसळ त्याच्या इंद्रियात होतेय. या सळसळीतून नकळत मुरलीचे सूर झरे लागतात. कृष्ण कृष्ण रहात नाही. राधा राधा रहात नाही. कारण
“मी कृष्ण सावळा होतो
तू शुभ्र पिठोरी राधा
मज डसते शुभ्रता आणिक
तूज डसते सावळबाधा “
अशा एकरुपतेनेच मग तिच्या परिस स्पर्शाने त्याचे लोखंडी ओठही सोन्याचे होऊन जातात. तर कधी तिच्या येण्यानेच डोळ्यांना भाषा सुचते आणि मौनाचे अक्षर होते. ही प्रेमाची किमया त्याची खात्री पटवून देते की तिचं चंद्रकोरी लेणं आपल्या मिठीत लाभलं की आपले दगडाचे हात सुद्धा मेणाचे बनून जातील.
कविता संग्रहातील अनेक कविता कवीच्या चिंतनशील मनाची साक्ष पटवतात. दुःखाकडे पाहण्याचा कविचा दृष्टिकोन काय आहे हे ‘दुःख ‘ या कवितेत व्यक्त झाले आहे. शेवटी कवी म्हणतो…
“पडझडत्या सुखांना
दुःख घालते लिंपण
दुःख म्हणजे सुखाच्या
नाकामधली वेसण “
कवीच्या दुःखाविषयीच्या चिंतनातून आलेले हे नेमके शब्द आपल्यालाही विचार करायला लावतात. म. वाल्मिकींच्या महाकाव्यापासून वाहत आलेली ही दुःख सरिता आजच्या काव्यातही जीवंत आहे. पण कवी या दुःखाला कवटाळून न बसता मशाल होऊन दाही दिशा उजळण्याची जिद्द बाळगतो. कवी म्हणतो
“माझ्यातच माझी बीजे
मी रोज पेरती करतो
मी काळीज नांगरणारा
ह्रृदयाची शेती करतो “
मग असेच कधीतरी
“परसामध्ये स्मृती पेरल्या
त्याचे होते झाड उगवले
सुखदुःखाच्या फुलाफळांनी
अंगोपांगी पूर्ण लगडले. “
तर कधी कवी अंतर्मुख होऊन पाहतो तेव्हा त्याला स्वतःतील (खरे तर आपल्या सर्वांतील) दोष, दुर्गुण दिसू लागतात आणि कशासाठी जगतोय आपण असे वाटावे इतकी उद्वीग्नता मनात निर्माण होते. मला डोहात नेऊन बुडवा आणि तरंगलो तरी वाचवू नका असे बजावणारी ‘ मला बुडवा डोहात…. ‘ ही कविता सर्वांनी आवर्जून वाचावी अशी आहे. या चिंतनशिलतेमुळेच कवी पुढे एका कवितेत म्हणतो,
“ह्या मौनातील शब्दांच्या
मी रोज ऐकतो हाका
श्र्वासांच्या हिंदोळ्यावर
मी रोजच घेतो झोका “
आपण कोण आहोत, कसे आहोत याची जाणीव कविला असल्यामुळेच कवी म्हणतो
“मी फक्त धुलीकण आहे
ह्या संतांच्या पायाचा “
याहून दुसरी थोरवी कविला नको आहे. त्याची इच्छा एवढीच आहे,
“त्या पावन मातीमध्ये
माझाही शेवट व्हावा
इतकेच वाटते माझा
जळण्यातच जन्म सरावा “
दुस-यासाठी जळण्याचे हे बळ संतांच्या, संतसाहित्याच्या शिकवणुकीतूनच मिळाले आहे. त्यामुळे देहाचा आणि आत्म्याचा संवाद चालू आहे असे कवी म्हणू शकतो. माणूस म्हणजे भरवसा नसलेल्या देहाचा दास आहे, त्याचा श्वासही त्याच्या ताब्यात नाही हे संतांनी सांगितलेले तत्वज्ञान कवी सोपे करुन आपल्याला सांगू शकतो ते चिंतनशीलतेमुळेच !
‘पाऊलखुणा ‘ आणि ‘ह्याच अंगणात ‘ या कविता भूतकाळात घेऊन जाणा-या आहेत. धुळीची वाट, आमराई, पाखरे, गायी, गुरे कविला अजूनही खुणावत आहेत. गावाची, घरातल्या अंगणाची आठवण मनात घर करुन बसली आहे. या मातीनेच आपल्याला घडवले आहे याची जाणीव कवीला आहे. तो कृतज्ञतापूर्वक म्हणतो,
“आज सोहळा शब्दांचा जो माझ्या ओठी आला
अंगणातल्या ह्याच मातीने जन्माला घातला “
संग्रहात काही अभंग रचनाही आहेत. तुकोबाची शेती, दळण, लोकोद्धार, जन्माची चाहूल यासारख्या अभंगांतून तुकोबांचे कार्य, प्रपंचाचे चित्रण, वर्तमान स्थिती असे विविध विषय हाताळले आहेत. तर वैरीण होते नीज, विराणी या कवितांतून समाजातील उपेक्षित स्त्रीयांचे दुःख प्रभावीपणे मांडले आहे.
या संग्रहातील कविता वाचताना विषयांची विविधता आहे हे लक्षात येते. तरीही सभोवतालचे जग, परिसर, वर्तमान परिस्थिती या सर्वांकडे कवीचे लक्ष असल्यामुळे सामाजिक आशयाच्या कविता संख्येने जास्त आहेत. जवळ जवळ निम्म्या कविता या सामाजिक जाणिवेतून जन्माला आल्या आहेत. असे असले तरीही प्रत्येक कवितेची मांडणी भिन्न भिन्न असल्यामुळे सर्वच कविता वाचनीय आहेत.
अशा सर्व कवितांचा उल्लेख करण्यापेक्षा काही काव्य पंक्ती पाहिल्या तर कवीच्या मनातील अस्वस्थतेची कल्पना येईल.
… समस्यांचा डोंगर पार करत जगणं हे मुश्किल होऊन गेलं आहे. त्याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. कवी म्हणतो,
“लाख समस्या लाख प्रश्न
त्याचं द्याल का उत्तर
स्वप्नांवरती आश्वासनांच
शिंपडू नका अत्तर “
तुटणारी नाती पाहून तो अस्वस्थ होतो….
” घरांस आले कुंपण आणिक
बंद जाहली दारे
चार भिंतीच्या विश्व आतले
आम्हा वाटे प्यारे “
माणसाचे माणूसपण संपत चालले आहे हे पाहून कवी लिहीतो,
“मज नख्या सुळे फुटल्याने
मी क्रूर भयानक झालो
मी मनुष्य असलेल्याचे
नुसतेच कथानक झालो. “
चांगुलपणाची होणारी अवहेलना पाहून कवी लिहितो……
“इथला प्रत्येक चांगला माणूस
मेल्यावरती संत झालाय “
”जितके झेंडे तितक्या जाती “
ही वस्तुस्थिती आहे.
” सत्तेमधुनी मिळतो पैसा
सत्तेवरती टोळ्या जगती
लाल फितीचे नाल ठोकले
फक्त कागदी घोडे झुलती “
किंवा
“जन्माच्या सगळ्या वाटा
मरणाने मिंध्या केल्या
हे दलाल आले ज्यांनी
मातीच्या चिंध्या केल्या “
हे शब्द दाहक सत्य प्रभावीपणे मांडत नाहीत काय ?
अशा अनेक काव्यपंक्ती उद्धृत करता येतील ज्यातून कवीने समाजाचे वास्तव चित्रण नेमकेपणाने केले आहे. असत्य, दांभिकपणा, नीतीहीनता, भ्रष्टाचार यांनी समाज पोखरून निघाला आहे. सत्ता आणि संपत्ती यांचे साटेलोटे असल्यामुळे मूल्यहीन जीवनपद्धती फोफावत चालली आहे. आपल्या कवितांमधून कवीने हे स्पष्टपणे मांडले आहे.
कोणतेही पुस्तक म्हटले की प्रस्तावना आलीच. पण या कवितासंग्रहात मात्र स्वतः कविनेच कवितेआधीचा संवाद साधला आहे. हा संवाद ‘ऐकल्याशिवाय ‘ म्हणजेच वाचल्याशिवाय पुढे जाणे योग्य ठरणार नाही. कारण कवितेकडे प्रथमपासूनच अत्यंत गंभीरपणे पाहिले असल्यामुळे कवीची कवितेविषयीची भूमिका काय आहे, कविता निर्मिती मागची प्रेरणा काय आहे या प्रश्नांची उत्तरे या संवादात मिळतात. त्यामुळे पुढे कवीच्या रचना वाचताना प्रत्येक कवितेमागची भावना समजून घेणे सोपे जाते. या संवादात कवीने स्वतःचे अंतरंग उघडे करताना अनेक ठिकाणी, नकळतपणे, काव्य निर्मितीविषयी प्रकट चिंतन केले आहे जे सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. स्वतःचा खरा चेहरा असणारी कविता कशी आकारत जाते हे समजू शकते किंवा कवितेच्या आकृतीबंधाचे त्यांनी केलेले विश्लेषण वाचनीय आहे. स्वतःच्या अनुभवातून लक्षात आलेल्या काव्य निर्मितीच्या प्रमुख जागा त्यांनी दाखवून दिल्या आहेत. काव्यगंगेच्या एवढे खोलीपर्यंत शिरुनही ते नम्रपणे म्हणतात मी काव्य-वारीचा एक साधा पाईक आहे. काव्याच्या पेशी रक्तात भिनलेल्या असल्यामुळेच ते म्हणतात
” ह्या नव्हेत नुसत्या कविता
आत्माचे लेणे आहे “
फत्तरांनी गीत गावं त्याप्रमाणे दगडाच्या हातांनी कोरलेलं हे आत्म्याचं काव्यलेणं डोळे भरुन पहायला नव्हे वाचायलाच हवं. अशीच दुर्मिळ काव्यलेणी यापुढेही त्यांच्या हातून कोरली जावोत हीच सदिच्छा !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈