असे अनेक शब्द आहेत ना, जे चुकीच्या जागी – चुकीच्या अर्थाने सर्रासपणे वापरले जातात ! एक म्हणजे अर्थ नीट माहीत नसतो किंवा चुकीचा शब्द वापरायची रूढी किंवा परंपरा असते.
वरीलपैकी पहिलाच शब्द बघा ना. थारेचा मूळ शब्द थारा म्हणजे जागा किंवा आश्रय. पालट म्हणजे बदलणे. जसे कायापालट, खांदेपालट. म्हणून थारेपालट हा योग्य शब्द. म्हणजे जागा बदलणे. पण थालेपारट हा शब्द सुद्धा अनेक ठिकाणी चुकीने वापरला जातो.
परोक्ष आणि अपरोक्ष मध्ये तर घोळ ठरलेलाच. परोक्ष म्हणजे नजरेआड आणि अपरोक्ष म्हणजे नजरेसमोर. पण सर्रासपणे हे शब्द उलट अर्थी वापरले जातात.
“मी कामात व्यस्त होतो. ” असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे. “मी कामांत व्यग्र होतो. ” हे बरोबर. अस्त-व्यस्त म्हणजे सुलट व उलट. त्याचे रूप बदलून नित्य वापराचा शब्द झाला अस्ताव्यस्त. म्हणजे पसरलेलं, बेशिस्त, पसारा. सम आणि व्यस्त हे विरोधाभासी शब्द तर आपण नेहमीच वापरतो. त्यामुळे “मी कामात व्यग्र आहे” हे बरोबर. तथापि व्यस्त या शब्दाला सुद्धा अलीकडे कामात गुंतलेला असणे, कामात बुडालेला असणे, हे अर्थ प्राप्त झाले आहेत आणि त्याला लोकमान्यता मिळाली आहे.
आपण चपल-अचपल हे शब्द चुकीच्या रुढीमुळे चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. “अचपल मन माझे नावरे आवरिता” चपल या अर्थाने अचपल हा शब्द श्री रामदास स्वामींनी देखील वापरला आहे.
महाविद्वान, बुद्धिवंत अशा व्यासमुनींनी ज्या आसनावर किंवा पीठावर बसून महाभारत सांगितले, त्या आसनाला व्यासपीठ असं म्हणतात. हे आसन किंवा पीठ पवित्र समजले जाते. आध्यात्मिक, धार्मिक ज्ञानप्रबोधनाची प्रवचने ज्या आसनावरून दिली जातात ते व्यासपीठ.
एक किंवा अनेक वक्ते ज्या स्थानावरून राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आधारलेली भाषणे देतात, त्या स्थानाला मंच असे म्हणतात.
ज्या स्थानावरून मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे – नाटके, गायन, नृत्य, तमाशा वगैरे सादरीकरण केले जाते, त्या स्थानाला रंगमंच असे म्हणतात. म्हणजेच व्यासपीठ, मंच व रंगमंच असे तीन प्रकार या स्थानांचे आहेत.
🌺
अशा स्वरूपाचे, चुकीच्या अर्थाने वापरले जाणारे, इतर अनेक शब्द सुद्धा प्रचलित आहेत.
रोजच्यासारखी सकाळी शारदा कामाला आली. आल्या आल्या म्हणाली,
“वहिनी हे बघा पैंजण.. शंभर रुपयांना घेतले. काल दारावर एक माणूस आला होता विकायला”
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लोभसवाणा होता… आज एकदम खुषीत होती.
“अगं किती छान आहेत.. थांब शारदा फोटो काढते.. “
“नको नको”.. ती लाजून म्हणाली
“अग तुझा नाही.. पैंजणाचा काढते मग तर झालं…. “
फोटो काढला… फोटो काढताना ती हसत होती.
पैंजणावरून प्रेमानी हात फिरवून शारदा कामाला लागली…
तिच्या पैंजणांचा छुमछुम नाद तिच्याबरोबर मलाही सुखावत होता…
दिवसभर अनेक घरात कामं करूनही ती नेहमी आनंदात असते…
माझ्याही दिवसाची छान सुरुवात झाली…
देवाची पूजा करताना बाप्पाला गुलाब अर्पण केला… सरूची आठवण आली…
काळी सावळी तरतरीत सरू मी गेले की ” या काकू” म्हणते. मी नेहमी तिच्याकडूनच देवासाठी फुलं घेते. काल फुलं घेतली तर एक टपोरा गुलाब देऊन म्हणाली
” काकू हा घ्या तुमच्या देवाला “
.. मनात आलं किती गोड निरागस मन आहे पोरीचं…. देवाला हात जोडले त्याला मनोमन प्रार्थना केली..
“ पहाटे पासून दिवसभर कष्ट करणाऱ्या सरूला सुखी आणि आनंदी ठेव बाबा.. “
साहिलच्या म्हणजे नातवाच्या शाळेत फन फेअर होतं. तिथे त्यांचा पाणीपुरीचा स्टॉल होता. तो बघायला निघाले होते. रिक्षा बघत उभी होते…
काल साहिलने सांगितले होते.. “आजी आम्ही” चीझ रगडापुरी” करणार आहोत”
“अरे पण असं कसं? रगडापुरी वर चीझ?…. असं कुठे कोणी कधी केलं नसेल… कशी चव लागेल रे “
“नसेल केलं… पण आमचं तसंच ठरलं आहे… आणि पाणीपुरीवर नेहमीचं चिंचेचे पाणी नाही तर आम्ही त्यात थम्सअप, फॅन्टा, किंवा स्प्राईट घालणार आहोत… त्याला आम्ही “पाणीपुरी शॉटस् “असं नाव दिले आहे”
मी म्हटलं, “अरे हे कसलं कॉम्बिनेशन? कोणी तरी खाईल का?”
“अगं टीचर म्हणाल्या तुम्हाला करावसं वाटतंय ना करून बघा…. शिवाय आम्ही चिंचेचं पाणी पण घेऊन जाणार आहोत. लोकांना नाही आवडलं तर ते घालून नेहमीची पाणीपुरी करणार. “
काय झालं असेल… मी विचार करत होते तेवढ्यात..
“नीता. “.. अशी हाक आली
मैत्रीण दुकानात आईस्क्रीम घेत होती. बाईसाहेबांनी स्वेटर घातला होता आणि घेत होती आईस्क्रीम…
विचारलं तर म्हणाली.. “थंडीतच आईस्क्रीम खायला मजा येते.. ही घे तुला एक कॅंन्डी जाताना खा”
” अग आत्ता.. नको नको. नातवाच्या शाळेत चालले आहे “
तर डोळा मारून म्हणाली, ” घे ग.. वन फाॅर द रोड…. एन्जॉय इट.. कोणी…. तुझ्याकडे बघत नाही…. “
.. आयुष्यात प्रथमच रिक्षात बसून आईस कँन्डी खाताना मला गंमत वाटत होती….
फन फेअरला शाळेत पोचले तर तिथे खूपच मज्जा चालली होती…
नातवाच्या स्टॉलवर गर्दी उसळली होती. लोक धमाल करत होते. पाणीपुरी शॉटस् हिट झाली होती…
आई, बाबा, आजी, आजोबा, पोरं… सगळे हसत होते. ट्राय करून बघत होते…
साहिलचे मित्र मैत्रिणी चीझ रगडा पुरी, पाणीपुरी शाॅटस बनवत होते. ते पण लोक आवडीने खात होते…
“कसली भारी आयडिया आहे ना… वाॅव….. मला अजून एक दे रे… एक्सलंट.. ए तु पण ट्राय कर रे… ” वगैरे चाललं होतं…
इतकी गर्दी होती की नातवाला आमच्याकडे बघायलाही वेळ नव्हता. काही वेळाने हे आणि सुनबाईचे आई-वडील पण आले. आम्ही चौघेही गप्पा मारत बसलो.
.. खूप वेळानंतर साहिल सांगायला आला,
” बघ आजी तुला काळजी वाटत होती ना पण… सगळ्यांना खूप आवडलं… आमचं एकुणएक सगळं संपलं. “
“हो रे.. आम्ही तुला बघीतलं तुमची गडबड चालली होती “
” अग पण तुम्हाला शॉट्स नाही मिळाले.. आता उद्या घरी करू.. तेव्हा तू ट्राय कर… “
“चालेल रे…. ” त्याला सांगितले.
पोरं अगदी खुष होती.
मनात म्हणाले…. “ नाही रे राजा…. उलट आज मला सुखांचे शॉट्स मिळाले.. ते कसे घ्यायचे हे समजले
.. त्याची चव दुय्यम होती.. मुलांचा आनंद महत्त्वाचा होता “
खरंच अशा छोट्या छोट्या शॉट्सनीच जीवनाची मजा घ्यायला शिकू… सारखं मोठं काहीतरी होईल मग मी सुखी.. आनंदी होईन असं म्हणत बसलं की हे छोटे शॉटस् हातातून निसटून जातात… हे समाधानाचे असे क्षण मनात भरून घ्यायचे… आणि मुख्य म्हणजे नेमके समाधान कशात मानायचे हे आपले आपण ठरवायचे मग असे क्षण सापडतात…
खरं म्हणजे ते असतातच आसपास… बघायचे ठरवले तर दिसतात..
बघायचे…. हळूहळू येईल ती दृष्टी…. मग दिसतील…. आपले आपले सुखांचे असे शॉटस्
मग ठरलं तर…
अशा शॉट्सची मजा घेत जगायचं.. आनंदाने… हसत हसत..
…. मग पुढचे दिवस, महिने आणि वर्षही नक्कीच आनंदात जातील.
☆ प्रसंगावधान… ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही.
आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग अॅप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे.
हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर “मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला. ” असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग अॅपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले.
तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे.
थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India अॅप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India अॅप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या अॅपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत अादिती साशंक होती.
एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India अॅपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.
गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तिला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.
अॅपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं.
तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला एेकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते.
आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले.
आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India अॅपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती.
आदितीने दोघा नराधमांविरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातारजवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले.
112India अॅप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. अॅपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर अॅप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.
भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.
पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप विकसित केलेले आहे. अॅपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत – पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते.
आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.
बर्याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमर्जन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे अॅप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे. एपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.
आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत हि स्टोरी तुम्हीच पोहचवा… शेअर करा..
माहिती संकलन व प्रस्तुती : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बीज हा शब्द माहित नसेल असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही वनस्पतीच्या बी ला बीज असे म्हटले जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं फार तर Seed अस म्हणतील, पण त्यामागील मर्म मात्र सर्वांना ठाऊक आहे.
आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वी “उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी” असे सूत्र समाजात प्रचलित होते. स्वाभाविकच शेती करणाऱ्याला समाजात खूप मोठा आणि खराखुरा मान होता. दुष्काळ काय सध्याच पडायला लागले असे नाही, ते याआधीही कमी अधिक प्रमाणात होतेच. त्याकाळात शेतकरी जरी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतकरी आपल्या बियाण्याची पुरेशी काळजी घेत असत. शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची, श्रद्धेनी केली जायची. रासायनिक शेती नव्हतीच. आपली शेती तेव्हा पूर्णपणे गोवंशावर आधारित होती. त्यामुळे तेव्हा जे काही कमी अधिक अन्नधान्य शेतकऱ्याला मिळायचं ते *’सकस’*असायचे, ते पचविण्यासाठी आणिक हाजमोला खाण्याची गरज पडत नव्हती. एका अर्थाने मागील पिढ्या धष्ठपुष्ट होत्या. शिवकाळातील कोणत्याही सरदाराचा पुतळा किंवा छायाचित्र बघितले तर ते आपल्या सहज लक्षात येईल.
कोणत्याही कर्माचे फळ हे त्या कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. शरीरावर शस्त्रक्रिया करणारा तज्ञ मनुष्याचे पोट फाडतो, आणि एखादा खुनी मनुष्यही पोट फाडतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना रुग्णास मृत्यू आला तर त्या तज्ञास शिक्षा होत नाही, पण खून करणाऱ्यास शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे शेतकरी धान्य फक्त स्वतःसाठी, अधिकाधिक फायद्यासाठी न पिकवता संपूर्ण गावासाठी पिकवायचा आणि तेही देवाचे स्मरण राखून. आपली समाज रचना धर्माधिष्ठित होती. इथे ‘धर्म’ हा धर्म आहे, आजचा ‘धर्म’ (religion) नाही. धर्म म्हणजे विहीत कर्तव्य. समाजातील प्रत्येक घटक आपापले काम ‘विहीत कर्तव्य’ म्हणून
करायचा. त्यामुळे त्याकाळी प्रत्येक काम चांगले व्हायचे कारण एका अर्थाने तिथे भगवंताचे अधिष्ठान असायचे.
मधल्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. विकासाची नविन परिमाणे अस्तित्वात आली आणि ती कायमची समाजमनात ठसली किंवा जाणीवपूर्वक ठसवली गेली. जूनं ते जुनं (टाकाऊ) आणि नवीन तितके चांगले असा समज समाजात जाणीवपूर्वक दृढ करण्यात आला. भारतीय विचार तेवढा मागासलेला आणि पाश्चिमात्य विचार मात्र पुरोगामी (प्रागतिक) असा विश्वास समाजात जागविला गेला. विकासाचा पाश्चात्य विचार स्वीकारल्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण कमीअधिक प्रमाणात अनुभवत आहोत. अधिकाधिक धान्य उत्पादन करण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आणि गोकेंद्रित शेती न करता आपण इंधन तेलावर आधारित परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करणारी ‘श्रीमंत’ शेती करू लागलो आणि वसुंधरेचे नुसते आपण नुसते दोहन केले नाही तर तिला ओरबाडून खायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पिढीला जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता आणि भूगर्भातील पाण्याचा तुटवडा अशा कितीतरी भयानक गोष्टी भेट म्हणून जन्मताच वारसाहक्काने दिल्या असे म्हटले तर वावगे होऊ नये. ह्यातून आज तरी कोणाची सुटका नाही.
ह्या सर्व गोंधळात आपण बीज टिकविण्याचे सोयीस्कररित्या विसरलो. जिथे बीजच खराब तिथे पीक चांगले येईल अशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरणार, नाही का? “शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी ।।” असे संतांनी सांगितले असताना आपण ते ‘संतांनी’ सांगितले आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि हीच आपली घोडचूक झाली असे म्हणता येईल. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. खराब झालेले बीज फक्त शेतातील बियाण्याचे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची प्रचिती येते.
समाजातील सज्जनशक्तीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की खूप शिक्षक पुष्कळ आहेत पण चांगला शिक्षक शोधावा लागतो, शाळा भरपूर आहेत पण चांगली शाळा शोधावी लागते, डॉक्टर भरपूर आहेत पण चांगला डॉक्टर शोधावा लागतोय, वकील पुष्कळ आहेत पण चांगला वकील शोधावा लागतोय, अभियंते भरपूर आहेत पण चांगला अभियंता शोधावा लागतोय. आज ही परिस्थिती समाजपुरुषाच्या प्रत्येक घटकास कमीअधिक प्रमाणात लागू आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे चित्र बदलण्याचे कार्य आज आपणा सर्वांना करायचे आहे. कारण संकट अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. हे सर्व ऐकायला, पहायला, स्वीकारायला कटू आहे पण सत्य आहे. आपण आपल्या घरात कोणते बीज जपून ठेवत आहोत किंवा घरात असलेले ‘बीज’ खरेचं सात्विक आहे की त्यावरील फक्त वेष्टन (टरफल) सात्विक आहे याचीही काळजी घेण्याची सध्या गरज आहे. वरवर दिसणारे साधे पाश्चात्य शिष्ठाचार आपल्या संस्कृतीचा बेमालूमपणे ऱ्हास करीत आहेत. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा आणि आपल्या घरात शिवाजीचा मावळा सुद्धा जन्मास येऊ नये असे जोपर्यंत आईला वाटेल तो पर्यंत यात काहीही फरक पडणार नाही.
संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील असेच अस्मानी आणि सुलतानी संकट होते. राष्ट्राचा विचार करताना दोनचारशे वर्षांचा काळ हा फार छोटा कालखंड ठरतो. माऊलींपासून सुरु झालेली भागवत धर्माची पर्यायाने समाज प्रबोधनाची चळवळ थेट संत तुकारामांपर्यंत चालू राहिली. ह्या सर्व पिढ्यानी सात्विकता आणि शक्तीचे बीज टिकवून ठेवले त्यामुळे त्यातूनच शिवाजी राजांसारखा हिंदू सिंहासन निर्माण करणारा स्वयंभू छत्रपती निर्माण झाला. “बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी।।” म्हणणारे तुकोबाराय सुद्धा हेच सूत्र (शुद्ध बीज टिकविले पाहिजे) वेगळ्या भाषेत समजावून सांगत आहेत. समर्थांच्या कुळातील मागील कित्येक पिढ्या रामाची उपासना करीत होत्या, म्हणून त्या पावनकुळात समर्थ जन्मास आले. कष्टाशिवाय फळ नाही, नुसते कष्ट नाही तर अखंड साधना, अविचल निष्ठा, तितिक्षा, संयम, धैर्य अशा विविध गुणांचा संचय करावा लागतो तेव्हा कुठे ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘सावरकर’, ‘भगतसिंग’, डॉ. हेडगेवार जन्मास येत असतात.
मृग नक्षत्र लागले की आपल्याकडे पाऊस सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरु होतो. शेतकऱ्यांची बियाणे पेरायची झुंबड उडते. शेतकरी आपले काम श्रद्धेनी आणि सेवावृत्तीने करीत असतात. आपणही त्यात आपला खारीचा वाटा घ्यायला हवा. आपल्याला देशभक्तीचे, माणुसकीचे, मांगल्याचे, पावित्र्याचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, सांस्कृतिक स्वातंत्र्याचे, तसेच समाजसेवेचे बीज पेरायला हवे आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करायची आहे.
विकासाच्या सर्व कल्पना मनुष्यकेंद्रीत आहेत आणि ती असावयासच हवी. पण सध्या फक्त बाह्यप्रगती किंवा भौतिक प्रगतीचा विचार केला जात आहे. पण जोपर्यंत मनुष्याचा आत्मिक विकास होणार नाही तोपर्यंत भौतिक विकासाचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. मागील शतकात लॉर्ड मेकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतात येऊन गेला. संपूर्ण भारतात तो फिरला. नंतर त्याने ब्रिटिश संसदेत आपला अहवाल सादर केला. त्यात तो स्वच्छपणे सांगतो की संपूर्ण भारतात मला एकही वेडा आणि भिकारी मनुष्य दिसला नाही. सर्व जनता सुखी आहे. आणि ह्याला एकच कारण आहे ते म्हणजे इथली विशिष्ठ कुटुंब रचना आणि कुटुंबातील जेष्ठांचा आदर करण्याची पद्धत (‘एकचालकानुवर्तीत्व’).
आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनच ते आपल्या लक्षात येईल. हे एक उदाहरण झाले. अश्या बऱ्याच गोष्टीत आपण पाश्चात्य लोकांस मागे टाकले आहे.
एक छान वाक्य आहे. “लहानपणी आपण मुलांना मंदिरात घेऊन गेलो तर तीच मुलं म्हातारपणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात”.
‘मुलं एखादवेळेस ऐकणार नाहीत पण अनुकरण मात्र नक्की करतील हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी अनुकरण करावे असे वातावरण आपण आपल्या नविन पिढीला देऊ शकलो तर हे खूप मोठे राष्ट्रीय कार्य होईल. त्यासाठी समाजात नवीन आदर्श प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील आणि असलेल्या आदर्शाना समाजासमोर प्रस्तुत करावे लागेल. आपल्या मुलांकडून माणुसकीची अपेक्षा करण्याआधी आपण त्यांना आपल्या आचरणातून माणुसकी शिकवावी लागेल. आपल्याकडे विवाहसंस्कार सुप्रजा निर्माण करण्यासाठी आहे. तो फक्त ‘सुख’ घेण्यासाठी नक्कीच नाही, पण याचा विचार विवाहप्रसंगी किती कुटुंबात केला जातो ?, मुख्य ‘संस्कार’ सोडून बाकी सर्व गोष्टी दिमाखात पार पाडल्या जातात, पण विवाह संस्था आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय हे कोणी सांगत नाही. ते शिकविणारी व्यवस्था आज नव्याने निर्माण करावी लागेल.
हिंदू संस्कृती पुरातन आहे. जशी आपली ‘गुणसूत्रे’ आपण आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करीत असतो तसेच ‘नीतीसूत्रे’ही पुढील पिढीस देण्याची निकड आहे. अर्थात नितीसुत्रे देताना मात्र आचरणातून अर्थात ‘आधी केले मग सांगितले’ या बोधवचनाचे स्मरण ठेऊन द्यावी लागतील आणि हा महान वारसा जपण्याची प्रेरणा सुद्धा. आपल्या पुढील पिढीला आपल्या वडिलांची कीर्ती सांगावीशी वाटेल असे आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. पाऊस पडल्यावर सर्व वसुंधरेस चैतन्य प्राप्त होते, बहुप्रसवा असलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरते, या सृजनातून सर्व प्राणीमात्रांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य प्राप्त होत असते. या आल्हाददायी वातावरणाचा मानवी मनावरदेखील सुखद परिणाम होत असतो.
या आल्हाददायी, मंगलमयी वातावरणामुळे आपल्या विचारांनासुद्धा नवसंजीवनी प्राप्त व्हावी आणि ‘सुसंस्कारांचे, सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुफलीत’ करण्याचे कार्य आपणा सर्वांकडून घडावे अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो.
आमच्या घरी रविवार हा विशेष दिवस असायचा. म्हणजे तसा तो सगळ्यांकडेच असावा कारण एकतर सुट्टीचा वार आणि सगळे घरात. थोडा निवांतपणा, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळा पण मला एक मात्र आठवतंय की, ” चला रविवार आहे म्हणून गादीत पांघरूण घेऊन उशिरापर्यंत लोळत राहूया. ” हे मात्र नव्हतं. या उलट कधीकधी तर पप्पा शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी सगळ्यांना सांगून ठेवायचे, ” उद्या प्रत्येकाने पहाटे चार वाजता उठायचे. आपल्याला कशेळीच्या पुलावर जायचे आहे आणि तिथून हजारो वर्षांनी प्रकटलेल्या एका धूमकेतूचे दर्शन घ्यायचे आहे. निसर्गातले दुर्लभ देखावे पाहण्यातली मजा काही औरच असते. ”
आणि आम्ही सारे पहाटेच्या अंधारात चालत कशेळीच्या पुलावर जात असू आणि तिथून आकाश दर्शनाचा महानंद घेत असू. अशा अनेक सुंदर पहाटा (पहाटचे अनेक वचन) आम्ही अनुभवलेल्या आहेत. निसर्गाच्या तत्त्वाशी झालेली तादात्म्यता किती सुखाची असते हे जरी तेव्हा कळत नसलं तरी जाणवलं होतं. मोकळ्या आभाळाखाली उभे राहून अंधारात चमचमणारं आकाश दर्शन किती सुंदर असतं हे केवळ शब्दांच्या पलिकडे आहे.
आज जेव्हा मी घराच्या गच्चीतून कधीतरी पहाटे आकाश निरखण्याचा प्रयत्न करते तेव्हा काहीसं गढुळ, धुरकट, बिनताऱ्यांचंं आकाश बघताना कुठेतरी मन द्रवतं. माणूस निसर्गापासून दूर जात चालला आहे का?” हा प्रश्न वेदनादायी वाटतो.
असो!
तर आमचे अनेक रविवार अशा रितीने सुरू व्हायचे. जेवणाच्या मेनू पासून सारंच विशेष असायचं. संध्याकाळी सेंट्रल मैदानात मस्त रमतगमत फिरायला जायचं. तिथल्या खुरट्या पण गारवा देणाऱ्या गवतावर रिंगण करून बसायचं. सोबत खाण्यासाठी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा किंवा ओवा, मीठ घालून उकळलेल्या चवळीच्या शेंगा नाहीतर वाफवलेल्या शिंगाड्यांचा आस्वाद घ्यायचा. पप्पांकडून अनेक गमतीदार किस्से ऐकायचे. एकेकांच्या मस्त नकला करून ते आम्हाला हसवायचे. काही गल्लीतले सवंगडीही बरोबर असायचे. मग त्यांच्यासोबत लंगडी, रिंग नाहीतर कांदाफोडी सारखे मजेदार खेळही रंगायचे. कधी गाणी तर कधी भेंड्या. मज्जाच मज्जा. त्यावेळी मॉल नव्हते. टाईम झोन सारखे ढॅण ढॅण, कानठळ्या बसणारे कर्कश्श नादमय बंदिस्त क्रीडा विभाग नसायचे. बर्गर, पास्ता, पिझ्झा यांची तोंडओळख ही नव्हती पण सेंट्रल मैदानातला रविवारचा तो हल्लाबोल मात्र विलक्षण असायचा. जडणघडणीतला एक महत्त्वाचा भाग होता तो! संध्याकाळ उलटल्यानंतर सोबतीला आकाशातली आकाशगंगा असायची. सप्तर्षी, व्याध, ध्रुवतारा, कृत्तिका, अनुराधा आमच्याबरोबर जणू काही फेर धरायच्या. आजही माझ्या नातींना मी आकाशात नथीच्या आकड्यासारखा दिसणारा कृत्तिकेचा तारकापुंज दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांना मजा वाटत नाही असे नाही पण त्या त्यात गुंतत नाहीत हे मात्र खरं. शिवाय आता त्यांच्यासाठी प्लॅनेटोरियम्स आहेतच. बायन्याक्युलर्स, टेलिस्कोप सारखी आधुनिक उपकरणे आहेत पण दोन डोळ्यांनी अथांग आभाळ पाहण्याचे सुख काय असतं हे त्यांना कसं सांगू?
रविवारची दुपार मात्र थोडी वेगळी असायची. तरीही त्या दुपारींना मी सुस्त दुपार असे विशेषण लावणार नाही. त्याचे कारण म्हणजे माझी आई. आई अतिशय व्यवस्थित. स्वच्छता, टापटीप याविषयी अत्यंत जागरूक, सतत आवराआवरी करणारी एक शिस्तप्रिय व्यक्ती होती. त्या बाबतीत पप्पा मात्र थोडे शिथिल होते म्हणजे ते व्यवस्थित नव्हते असं मी मुळीच म्हणणार नाही पण त्यांचा व्यवस्थितपणा आणि आईचा व्यवस्थितपणा यांच्या व्याख्याच वेगळ्या होत्या आणि त्या एकमेकांना छेद देणाऱ्या होत्या. पप्पांची पुस्तके, लेखनाचा पसारा म्हणजे कागद, पेन, पेन्सिली वगैरे …त्यांचे संदर्भ ग्रंथ, फाइल्स, वाचकांची पत्रे अशा अनेक गोष्टी घरभर पसरलेल्या असत. पप्पांची विद्वत्ता, त्यांचा लौकिक, लोकप्रियता, व्यासंग, अभ्यास हे सगळं मनोमन मान्य करूनही आईला हा सगळा पप्पांचा पसारा वाटायचा. ती अनेकदा तळमळीने तो आवरूनही ठेवायची. कशा पद्धतीने तो ठेवला गेला पाहिजे यावर पप्पांची शिकवणी घ्यायची. त्यावरून त्यांचे वादही व्हायचे. पप्पांचे एकच म्हणणे असायचे, ” मला हवी ती, हवी तेव्हा कुठलीही वस्तू या जंजाळातच सापडते. तू कशाला आवरतेस?”
आम्ही कुणीही कुणाचीच बाजू घ्यायचो नाही पण एखाद्या रविवारी दुपारी पप्पाच फर्मान काढायचे, ” चला ग पोरींनो! आज आपण हे भलं मोठं काचेचं पुस्तकांचं कपाट आवरूया. जरा नीटनेटकं लावूया. ”
हे कपाट आवरणं म्हणजे एक उपक्रम होता म्हणण्यापेक्षा एक महान सोहळाच होता असं मी म्हणेन. पप्पांचा पुस्तक संग्रह विशाल होता. कितीतरी जुनी क्लासिक मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेमधील अनेक विषयांची पुस्तके त्यात होती. एकेक पुस्तक हातात घेतल्यावर ते म्हणायचे, “पाहिलं? हे कालिदासाचे मेघदूत. काव्यानंद आणि काव्यभावाचा उच्चांक म्हणजेच हे मेघदूत. मग भर दुपारी आमच्या त्या अरुंद घरात साक्षात अलकापुरी अवतारायची. कुबेर, यक्ष आमच्या दारात उभे राहायचे. प्रेमिकेसाठी व्याकुळ झालेला यक्ष, आषाढातला पाऊस आणि त्या मेघदूताचे दर्शन आम्हाला तेव्हाच घडायचे. हातात कालिदासाचे मेघदूत आणि पप्पांच्या मुखातून आलेले सहजोद्गार..
नीत्वा मासान्कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श।।
आम्ही ऐकत बसायचो. कपाटातून एका मागून एक पुस्तकं निघायची. शाकुंतल, मालविकाग्नीमित्र, चक्रधर, भवभूती, मोरोपंत …एकेकांना पप्पा रांगेत अत्यंत मानाने जमिनीवर पसरलेल्या चादरीवर ठेवत. मध्येच मृच्छकटिक नाटकाची गोष्टही ते सांगायचे. आर्या वृत्तातल्या केकावल्या रंगायच्या.
।। सुश्लोक वामनाचा
अभंगवाणी तुकयाची
ओवी ज्ञानेशाची
आर्या मयुरपंतांची।।
मोरोपंतांचीच एक मिश्कील काव्यरचना त्यांनी आम्हाला वाचून दाखवली.
स्वस्त्री घरात नसता कंडु शमनार्थ रंडीरा खावी।
तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी।।
वाचकहो! हे फालतु काव्य नाही बरंका?
अहो मोरोपंतच ते.. त्यांचं काव्य अस्सलच.
कंडु म्हणजे घशातली खवखव.
रंडीरा म्हणजे खडीसाखर.
चिबुल्ली म्हणजे पडजीभ.
या ओळींचा अर्थ एव्हढाच की घरांत कुणी नसताना खोकल्याची उबळ आली तर खडीसाखर खावी, तीही नसेल तर मग स्वत:च्या हाताने पडजीभेवर दाब द्यावा.
पपांच्या तोंडून हे सारं ऐकताना आम्ही खरोखरच रमून जायचो.
मग कपाट आवरणं दूरच रहायचं.
पप्पा त्या कपाटातून बाहेर आलेल्या पुस्तकांच्या गराड्यातत पार रंगून गेलेले असायचे. एकेकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे. ” हे पहा! हे बर्नाड शॉचे पिग्मॅलियन नाटक. त्याची कल्पकता तर पहा! एका ग्रीक दंतकथेवरून सुचलेलं हे सुंदर विनोदी अंगाने जाणारं पण प्रेमाविष्काराचं सुरेख नाटक. एक उत्कृष्ट शिल्पकार त्याच्या स्वतःच्याच निर्मितीच्या प्रेमात कसा पडतो ते सांगणारी ही एक ग्रीक दंतकथा आणि या कथेचा आधार घेऊन एका प्रोफेसर आणि ग्रामीण फुलराणीची ही अप्रतिम प्रेमकहाणी म्हणजेच हे बर्नार्ड शाॅचे पिग्मॅलियन नाटक.
भर दुपारी ही कथा इतकी रंगायची की आम्ही कपाट आवरण्याविषयी पूर्णपणे विसरलेलेच असायचो.
शेक्सपियरची जुलिएट, डेस्डेमोना, हॅम्लेट, ते काल्पनिक भूत, ऑथेल्लो, ब्रूटस सारेच आमच्या या सोहळ्यात हळूहळू सहभागी व्हायचे.
मध्येच पपा मला म्हणायचे, ” लंडनला राणीच्या देशात जाऊ आणि शेक्सपियरच्या स्ट्रॅटफॉर्डला नक्की भेट देऊ बरं का बाबी!
मग मी म्हणायचे!” काय पप्पा आधी कबूल केल्याप्रमाणे बेळगावला तर न्या. मध्येच हे लंडन कुठून आलं?”
“अगं जाऊ की! आणि समजा मी नसलो तरी तुम्ही जालच आयुष्यात कधीतरी. त्यावेळी एक वेडा वाचक म्हणून त्याच्याशी माझी ओळख करून द्या. ” पप्पांची भविष्यवाणी खरी ठरली पण आमच्या धोबी गल्लीतल्या घरातलं पप्पांमुळे निर्माण झालेलं ते स्ट्रॅटफोर्ड मला आजही आठवतं आणि तेच खरं वाटतं.
अँटन चेकाव हा एक पप्पांचा आवडता लेखक. त्याची “नेकलेस” ही कथा ते इतकी रंगवून सांगायचे की आकाशातून ऐकणारा तो प्रत्यक्ष लेखकही सुखावत असेल.
WHEN ALL AT ONCE I SAW A CROWD
A HOST OF GOLDEN DAFFODILS
BESIDE THE LAKE BENEATH THE TREES
FLUTTERING AND DANCING
IN THE BREEZE.
वर्ड्सवर्थची “डॅफोडील” ही अशीच अलगद कपाटातून बाहेर यायची. त्यासोबत बालकवींची फुलराणी असायची.
आईच्या बाळा ठावे
प्रेमाच्या गावा जावे
मग ऐकावे या बोला
राजहंस माझा निजला…ही गोविंदाग्रजांची कविता म्हणून दाखवताना पप्पांच्या डोळ्यातून अक्षरशः पाण्याचा पूर व्हायचा.
जे कृष्णमूर्ती म्हणजे चैतन्यवादी तत्त्वचिंतक. पप्पांच्या विचारांवर त्यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांची तत्त्वचिंतनपर लिहिलेली अनेक पुस्तके पप्पांनी संग्रही ठेवली होती. काही पुस्तकांचे मराठी अनुवादही पप्पांनी केले होते. अनेक लेख त्यांचे मासिकातून प्रसिद्ध झाले होते. या सर्वांची कात्रणे पपांनी जपून ठेवलेली होती. कपाट लावण्याच्या निमित्ताने तीही बाहेर आली आणि काही काळ आम्ही “जे कृष्णमूर्ती” यांच्या विचार प्रवाहात नकळत गुंतून गेलो.
शैक्षणिक पुस्तकांच्या राशीत छुंदाला गोखले यांचं अंकगणित हे पुस्तक दिसलं. ते बघताच पपा तिला म्हणाले,
“बाजूलाच ठेव ते. उद्यापासून रोज यातली पाच गणितं तरी सोडवायचीच.
कपाट आवरणं फक्त निमित्त! त्या काही वेळात आमच्या घरात जणू काही विश्व साहित्य संमेलन भरलेलं असायचं. तमाम, गाजलेले, देश विदेशातले मृत अथवा जिवंत लेखक- लेखिका त्यांच्या साहित्यांचा एक सुंदर मेळावाच तिथे भरलेला असायचा. त्या साहित्य गंगेच्या प्रवाहात आम्ही आनंदे विहार करायचो.
तिथे फक्त पुस्तकंच नसायची तर अनेक जपून ठेवलेले आठवणींचे कागदही असायचे. त्यात उषाने अगदी लहान असताना काढलेल्या प्रमाणबद्ध रेषांची चित्रं असायची, छुंदाने सोडवलेल्या एखाद्या कठीण गणिताचा वहीतला कागद असायचा, ” मला फक्त सुखात राहायचे आहे” अशी मी कधीतरी लिहिलेली कागदावरची ओळही जपलेली असायची. कपाट आवरताना एका कागदावर स्थिर झालेली पप्पांची नजर मला दिसली आणि मी विचारले, ” काय बघता एवढं त्या कागदावर?”
“बाबी! हे माझ्या बापाचं हस्ताक्षर आहे. मी चार महिन्यांचा असताना त्यांनी हे जग सोडले. मी माझा बाप पाहिला नाही अनुभवला नाही. या हस्ताक्षरात मी माझा बाप अनुभवतो. ”
काळजात चुकलेला तो ठोका आजही माझ्या आठवणीत तसाच्या तसाच आहे.
आई म्हणायची, ” पसारा आवरा तो. ” कसला पसारा आणि कसा आवरायचा? मुळातच याला पसारा का म्हणायचं?
संध्याकाळ झालेली असायची. भराभर आम्ही सारी पुस्तकं कपाटात ठेवून द्यायचो. खरं म्हणजे पूर्वीपेक्षाही ते कपाट आता अधिकच भरलेलं दिसायचं पण आम्हाला ते तसंच नीटनेटकं वाटायचं.
आज हे सारं काही आठवून लिहिताना जाणवतं, मनाच्या बंद तिजोरीत ही मौल्यवान संस्कार भूषणं अजूनही तशीच आहेत. ज्यांनी आमच्या जगण्यातला आनंद वाढवला, टिकवला.
☆ “विंग कमांडर आशिष वर्धमान : एक चमत्कार …” लेखक : अज्ञात ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
जय हिंद !
आज तुम्हाला एका चमत्कारिक व्यक्तीची ओळख करून देत आहे. हे खरोखरच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.. ते आहेत विंग कमांडर श्री. आशिष वर्धमानजी.
युक्रेनमध्ये युद्धाच्या भयावह परिस्थितीत त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना वाचवताना अकरा गोळ्या झेलल्या. त्यांच्या शौर्याची गाथा असीम आहे. विंग कमांडर आशीष वर्धमान यांनी युक्रेनच्या झेंडा ऑपरेशनदरम्यान त्यांच्या शरीरात रुतलेल्या अकरा गोळ्या स्वतःच्या हाताने काढल्या. ते चार वर्षे कोमामध्ये होते. त्यांचे हृदय प्रत्यारोपण झाले, तसेच पाय कृत्रिम लावण्यात आले. चार वर्षांच्या दीर्घ उपचारांनंतर ते पहिल्यांदा भारतात परतले आहेत.
त्यांचे मोठे बंधू कारगिल युद्धात शहीद झाले आहेत. त्यांची पत्नी विजयवाडा येथे कलेक्टर आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव श्री अशोक पाटनी आहे, जे आर. के. मार्बल्सचे मालक आहेत.
आशीष वर्धमान यांची माहिती म्हणजे एकामागोमाग एक आश्चर्यचकित करणारी माहिती आहे. ते स्वतः वंडर सिमेंटसारख्या प्रसिद्ध कंपनीचे मालक आहेत. श्रीराम मंदिराच्या नव्याने बांधकामासाठी लागलेला संगमरवर हा आर. के. मार्बल्सने मोफत दिला आहे. श्री अशोक पाटनी यांना दानधर्माच्या बाबतीत भामाशाह असे म्हणतात.
इतक्या सगळ्या गोष्टी असूनही विंग कमांडर आशीष वर्धमान अत्यंत साधे आणि विनम्र आहेत. ते सांगतात की त्यांच्या उपचारांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले, जे रशियन दूतावास आणि भारत सरकारने केले. भारत सरकारचे मनापासून कौतुक करताना ते हास्याने भरलेली त्यांची चमत्कारिक जीवनगाथा सांगतात.
ते गलवान घाटीतही युद्धरत होते. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांना राष्ट्रचिन्ह जडवलेली अंगठी दिली होती.
आगामी 26 जानेवारी रोजी माननीय राष्ट्रपती सुश्री द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात येणार आहे. 18 जानेवारी रोजी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सोनी टीव्हीवर अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांचा थेट प्रसारण होणार आहे. तुम्ही नक्की पाहा.
☆ “आत्मविश्वास… एक बहुमूल्य संपत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. तदुसऱ्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.
या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.
जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.
आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.
ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.
ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.
तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.
ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.
तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
याचा विचार करा, कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त “ईश्वरी कृपा” आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे. म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.
पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, “आत्मविश्वास”
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून… !!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(दै. लोकमत मंथन पुरवणीत २२ सप्टें. २०१९ ला प्रकाशित)
सकाळपासून माझी थोडी चुळबुळ सुरु होती. पण कोणाशी बोलावं हे काही कळत नव्हतं. बाबा दोन दिवसांकरता बाहेरगावी गेले होते. नाहीतर त्यांच्याशी बोलून मन थोडं मोकळं करता आलं असतं.
मित्राच्या घरी त्यांचे थोडे घरगुती वाद झाल्याने त्याच्या घरच वातावरण थोड गढूळ झाल होत. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो.
माझी ही चुळबुळ कदाचित आजोबांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरेने हेरली असेल असे वाटतं. कारण त्यांनी शांतपणे मला बोलावलं, समोर बसवलं आणि पत्याचा कॅट काढून पत्ते वाटून म्हणाले, बैस, जरा दोन डाव खेळ. फ्रेश वाटेल आणि विचारांना दिशा मिळेल.
पत्ते खेळतांना ते काही जास्त बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, आपल्याकडे असलेल्या पत्यांमधून आपण चांगला डाव लावण्याचा प्रयत्न करतो. सगळे डाव चांगलेच येतात असे नाही. काही चांगले असतात, लवकर लागतात. काही थोडे अवघड असतात, उशीरा लागतात, पण लागतात हे नक्की. त्यासाठी आवश्यक त्या पत्यांची जुळवाजुळव करावी लागते. काही पत्ते सोडावे लागतात, तर काही समोरच्याने टाकलेले किंवा आपण ओढून घेतलेले उपयोगात येतील का हे बघावे लागतं.
आपल्या आयुष्यात रोज उगवणारा दिवस असाच पत्यांच्या डावासारखा आहे. काय सोडावं आणि काय धरावं याचा शांतपणे आणि योग्य विचार केल्यास रोजचा डाव चांगल्या पध्दतीने सोडवण्यास मदत होते.
काही वेळा वेगळ्या डावांमध्ये आपण हुकूम सुध्दा बोलतो. आपल्याकडे भारी असलेले पत्ते हुकूमाच्या हलक्या पाना पुढे निष्प्रभ ठरतात. पण यातुनच सावरायचे असते. आणि पुढच्या चांगल्या डावाची प्रतीक्षा करायची असते.
हे सगळं बोलून होईपर्यंत आमचे दोन डाव झाले होते. मग ते शांतपणे म्हणाले, दोन डावात तुझ्या लक्षात आले का? आपल्याकडून काही पत्ते सोडले जातात, काही टाकले जातात, तर काही दिले जातात.
जे सोडतो ते दोघांच्याही उपयोगाचे नसतात. म्हणून समोरचाही उचलत नाही.
जे टाकतो ते कदाचित थोड्या कालावधीनंतर उपयोगात येणार असतात. असे पत्ते समोरचा उचलतो.
आणि जे देतो ते हमखास लगेचच उपयोगी आणि डाव लागायला कारणीभूत असतात, व बऱ्याचवेळा आपल्याला हे माहीत सुध्दा असते.
आपल्या रोजच्या जीवनातही येणाऱ्या प्रसंगात देण्याची वृत्ती असावी. त्याने समस्या सुटायला मदत होते. ज्या गोष्टी अपायकारक किंवा निरुपयोगी आहेत त्या सोडून द्याव्या. ज्या गोष्टींचा त्याग आत्ता केला तर चांगलेच होणार आहे त्या टाकून द्याव्या.
जेव्हा कोणाला संसारात, मैत्रीत साथ हवी असते त्या वेळी एकमेकांचा डाव लागतील असे पत्ते (विचार, मदत, संयम, धैर्य) द्यावे. त्यामुळे आपला किंवा त्याचा डाव लागण्यास मदत होते. येथे एकमेकांशी स्पर्धा, ईर्षा असता कामा नये. स्पर्धेत मी नाही तर तु सुध्दा नाही असा विचार असतो. पण रोजच्या डावात तो विचार ठेऊन चालत नाही.
प्रत्येक डाव लागण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागतो. तुमच्या पिढीचा हा त्रास आहे की तुम्हाला लगेच निकाल अपेक्षित असतात. थोडा संयम ठेवण्याची वृत्ती तुमच्याकडे नाही. जुळवाजुळव किंवा काही अंशी तडजोड तुम्ही सहज स्विकारत नाही. त्यामुळे मीच आणि माझेच बरोबर असा ग्रह कदाचित निर्माण होऊन डाव विस्कटण्याची शक्यता असते.
आता शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. म्हणजे तुझी चुळबुळ शांत होईल.
आता मात्र मी मित्रांकडे जाऊन शांतपणे सगळे ऐकून व समजावून घेईन व काय सोडायचे, काय टाकायचे, व काय कोणी द्यायचे हे ठरवून त्यांचा डाव व्यवस्थित लाऊन देईन या बद्दल माझी खात्री झाली आहे.
धन्यवाद आजोबा, पत्याच्या डावातून देणं, घेणं, सोडण, जुळवण, व संयम दाखवणं हे शिकवल्याबद्दल. असे मी म्हणालो आणि मित्राकडे त्याचा डाव सावरायला बाहेर पडलो.
” हल्ली वयाची तीस-पस्तीस वर्षं उलटून गेली तरी मुलांची किंवा मुलींची लग्नच ठरत नाहीत “….. हा विषय सध्या ऐरणीवर आहे.. यावर पॉडकास्टमधे, अनेक निरनिराळ्या माध्यमांवर, पालकांमधे चर्चासत्रं घडतायत…
अशातच परवा माझ्या तेहतीस वर्षांच्या एका लग्नाळु भाच्याने ” ही मुलगी फारच बारीक आहे ” असं कारण देऊन विवाहसंस्थेतून आलेली एक मुलगी माझ्यापुढेच नाकारली. त्या मुलीत असलेल्या चार चांगल्या गोष्टी आमच्या भाच्याच्या दृष्टीने नगण्य होत्या…
यात मला फारसं आश्चर्य वाटलं नाही… तो नाही…. त्याचं तारुण्य ते बोलत होतं..
पण ” बरं, तुला फार बारीक वाटतेय न ही मुलगी मग राहूदे… ऐपवर इतर अनेक मुली आहेत… त्या बघ… ” असं म्हणत माझ्या मैत्रिणीने म्हणजे त्याच्या माऊलीने जेंव्हा ” त्या मुलीचा विषय ” पाच मिनिटांत निकालात काढला… तेंव्हा मात्र या पोराचे चाळीशीपर्यंत काही दोनाचे चार हात होत नाहीत, याची खात्री पटली….
रिक्षातून घरी परतताना माझ्या समस्त आई, आज्या, मावश्या, काकवा, आत्या, माम्या यांनी माझ्या डोक्यात फेर धरला… आम्ही सख्खी, चुलत, मामे, आते, मावस भावंडे लाडाकोडात वाढत केंव्हा मोठी झालो ते कळलचं नाही… शिक्षणं पार पडली … मुलगे नोकरी धंद्याला लागले.. साहजिकच उपवर झाले..
मुली मोठ्या दिसू लागणं.. फारतर पदवीधर होणं… एवढंच क्वालिफिकेशन त्याकाळात मुलींच्या लग्नासाठी पुरेसं असायचं.. “करीअर ” हा शब्द मुलांसाठीही जिथं फारसा महत्त्वाचा नसायचा तिथं मुलींची काय बात ?
मुलानं नोकरीधंदा करावा.. स्वयंपाकपाणी थोडक्यात गृहकृत्ये येणा-या मुलीशी लग्न करावं..
मुलीला वडिलांच्या संपत्तीत हक्क नाही तर तिच्या वडिलांनी किमान दोन-चार तोळे सोनं मुलीच्या अंगावर घालून दोन्ही अंगानं लग्न करून द्यावं… लग्नात मानपानावरून रुसणं हा वरपक्षाचा हक्क..
लग्नानंतर वर्षाच्या आत हललेला पाळणा.. ही लग्नाची यशस्वीता..
…. संसारवेलीवर एक मुलगा नि एक मुलगी फुलणं.. ही संसाराच्या स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्ती…
नव-याने इमाने-इतबारे केलेला नोकरीधंदा, बायकोने टुकीने केलेला संसार-आदरातिथ्य, मुलांचं संगोपन… आईवडिलांच्या वृद्धापकाळात केलेली त्यांची सेवा, यथासांग पार पाडलेले त्यांचे दिवसकार्य…
चांगली निघालेली सुसंस्कृत मुले नि त्यांची वेळेवर झालेली लग्नकार्ये..
आणि…. मुलांनी साजरी केलेली आईची साठी नि वडिलांची पंचाहत्तरी…
एवढ्या माफक अपेक्षा असलेलं जीवन…
कधीतरी हॉटेलातला डोसा.. बांधलेलं एखादं टुमदार घर… बायकोला अस्सल सोन्याचा केलेला छोटासा दागिना…. एखादा दूरचा नाहीतर अगदी क्वचित परदेश प्रवास … हा एखाद्यालाच नशीबाकडून मिळालेला बोनस…
अशा परिस्थितीत जीवनाच्या साथीदाराकडून लग्नासाठीच्या कितीशा अपेक्षा असणार ?
तरीही पसंती -नापसंती असायचीच…
माझ्या आतेभावाला एखादी मुलगी सांगून आलेली असायची… बघण्याचा कार्यक्रम पार पडलेला असायचा.. घरातील समस्त मंडळी गोल बसलेली.. अर्थातच ” मुलगी ” हाच चर्चेचा विषय..
गोरटेली एकशिवडी ती मुलगी सगळ्या महिलावर्गाच्या मनात भरलेली..
” मला नको ही… फारच बारीक आहे.. ” आतेभावाचं डायरेक्ट रिजेक्शन…
” अरे पद्या… नलूमामीकडं बघं.. लग्नात या मुलीच्या निम्मी होती.. उसाचं चिपाड बरं.. आता बघ कशी झालीय… गादीची वळकटी बरी…
“अरे प्रदीपबाळा, पहिल्या बाळंतपणानंतर बायका नको म्हणण्याइतक्या भरतात…
म्हणून सुरुवातीला बारीकच ब-या.. !!”
– – प्रदीपभाऊंना हा सुशीलामामीचा युक्तीवाद पटायचा नि दिवाळीनंतरच्या पहिल्या मुहुर्तावर ते बोहल्यावर चढायचे..
” फार जाड आहे गं ही मुलगी, नाही म्हणून कळवून टाका.. ” वैतागलेल्या पुतण्याला हीच सुशीलाकाकू सांगायची,
” अरे जयंता… काय करायची बारीक मुलगी घेऊन… सासरची माणसे खायला घालतात की नाही, असे लोक विचारणार… शिवाय अशा बारीक पोरींना सारखी आजारपणे…. त्यापेक्षा ही खाल्ले -प्यालेले अंगावर दिसणारी मुलगी बरी रे.. अशा पोरी कामाला वाघ असतात.. आणि दोन पोरं झाली की हे बाळसं जातं रे… !!
…… जयंता केंव्हा त्या बाळसेदार मुलीला पसंती देऊन बसायचा, ते त्याचं त्यालाच कळायचं नाही..
” या टकलू मुलाशी मी आजिबात लग्न करणार नाही ” म्हणून हटून बसलेल्या माझ्या मावसबहिणीच्या तोंडावर
” खल्वाटो निर्धनो क्वचित् ” म्हणजे टकलू माणूस कधीच निर्धन नसतो.. ( नेहमी श्रीमंत असतो ) असं संस्कृत सुभाषित फेकून तिला ” मी याच्याशीच लग्न करणार ” असं म्हणायला माझ्या आईनं. भाग पाडलं होतं…
पुण्यातील मामेबहीण जेंव्हा मिरजेसारख्या लहान गावातील मुलाला केवळ गाव लहान म्हणून नाकारू लागली तेंव्हा…
.. पुणं, पुण्यातील महागाई, तिथली माणसं, लांब-लाब अंतरं, लहान घरं… यापुढे मिरज हे कसं चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या कफ प्रवृत्तीला मिरजेतच राहणं कसं श्रेयस्कर आहे… हे माझ्या शोभामावशीनं एखाद्या निष्णात वकिलाला लाजवेल, अशा युक्तीवादानं पटवून दिलं होतं.. अन् खरच सविताताई लग्न करून जी मिरजेत आली… तिने मिरज कधीच सोडलं नाही…
“कुटुंबाची आर्थिक स्थिती गरिबीची.. स्वत:चं घरही नाही”… म्हणून अतिशय हुशार, उच्चशिक्षित नि कष्टाळु अजितरावांना नाकारणा-या अपर्णाताईला आमच्या आजीने असं काही फैलावर घेतलं…
“तुला देवानं हातपाय दिलेत, आईवडिलांनी शिक्षण दिलं.. ते कशासाठी ?आयतं बसून खाण्यासाठी ?
नव-याबरोबर कष्ट कर… त्याला साथ दे… अगं दोघे मिळून एकच काय चार घरं बांधाल… “
…. अपर्णाताईच्या डोळ्यात तेंव्हा पाणी आलं.. पण तिला आजीचं कुठेतरी पटलं.. तिने अजितरावांना होकार दिला…. नुसताच होकार नाही तर कष्टाचीही साथ दिली…. अजितराव-अपर्णाताईचे चार कारखाने, महालासारखा बंगला.. त्यांचं दृष्ट लागण्यासारखं वैभव पहायला दुर्दैवानं आजी या जगात नव्हती…. पण अपर्णाताईने तिच्या प्रत्येक वास्तुत आजीचा फोटो मात्रं आठवणीने लावलाय… !!
यांनी कधी आंजारून -गोंजारून, कधी रागावून, कधी क्वचित खरं-खोटं बोलूनही लग्नाला तयार केलं..
अर्थात यामागे त्यांनी पाहिलेल्या अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा अनुभव होता.. आपल्या पोरांचं भलं व्हावं.. सारं काही वेळच्या वेळी व्हावं… आयुष्याच्या सप्तरंगांचं त्यांना दर्शन व्हावं.. ही सदिच्छा होती…
अन् त्यासाठी वाईटपणा घेण्याचीही तयारी होती…
कारण त्यांनी आम्हा मुलांना आपलं मानलं होतं..
परवा मला एक बाई भेटल्या.. ज्ञानवृद्ध नि वयोवृद्ध…
” मी नं कुणाचं लग्न ठरवण्याच्या भानगडीत पडत नाही.. अगदी जवळच्या नात्यातही नाही… काही झालं तर उगीच वाईटपणा कोण घेणार ?”
मी दचकले..
… हे बोल या काळाचं प्रतीक तर नव्हेत ? कुणीच कुणाच्या अध्यात मध्यात शिरायचं नाही…
अगदी आई-वडिलांनी सुद्धा… ?
मुलं शिकलेली असतात, वयानं मोठी असतात… त्यांची मतं ठाम असतात..
त्यानी स्वत:च्या आयुष्याची आखणी केलेली असते…
विवाहसंस्था असतात.. मुलं नाव नोंदवू शकतात.. एकमेकांना भेटू शकतात… पटलं तर लग्नही ठरवू शकतात… आई-वडिलांची, नातेवाईकांची यासाठी काहीच गरज नसते..
पण मग वय वाढलं तरी लग्नं का ठरत नाहीत?
ठरली तरी होतीलच असं नाही…
झालं तरी टिकतीलच असंही नाही..
लग्न ठरायचा दर खूप कमी झालाय
नि
लग्न मोडायचा दर खूप वाढलाय..
– – कारण लग्न ही एक अभिक्रिया आहे… रिएक्शन आहे.. अन् अभिक्रियेसाठी -रिएक्शनसाठी उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट असला तर ती अभिक्रिया होते… वेगाने होते… अन् वेगाने होते म्हणून कंटाळवाणी होत नाही…
काही अभिक्रिया तर कॅटॅलिस्टशिवाय होतच नाहीत… लग्नाच्या या अभिक्रियेत आपले गणगोत हे कॅटॅलिस्ट असतात -असले पाहिजेत..
…. पण दुर्दैवाने कॅटॅलिस्टना अभिक्रियेत भागच घ्यायचा नाहीये नि रिएक्टंटना कॅटॅलिस्टची गरजच वाटत नाहीये…. म्हणूनच अभिक्रियेचा लोचा होतोय…. चूक समजून सांगणारी मायेची माणसंच नाहीयेत…. आणि असली तरी मुलांना त्यांचं ऐकायचं नाहीये..
रूळ बदलताना होणारा खडखडाट झालाच.. पण गाडीनं रूळ सोडू नये किंवा रुळावरून घसरू नये, यासाठी सासर-माहेरच्या वडीलधाऱ्यांनी कवचाचं काम केलं.. स्वत:ची जबाबदारी समजून..
कारण लग्न ठरवणं ही जशी त्यांनी आपली जबाबदारी मानली होती तशी ते टिकवण्याचा ठेकाही त्यांनी मायेने घेतला होता.. नि तो आम्हालाही मान्य होता..
ना प्रदीपदादाची बायको कधी जाड झाली…. ना जयंतदादाची कधी बारीक झाली…
सुरुवातीला दोघांना थोडी लाज वाटायची.. रागही यायचा…
पण नंतर एकमेकांना एकमेकांचा सहवासाने असा काही लळा लागला की एकमेकांवाचून रहाणं अशक्य झालं… जाडी, बारीकपणा, टक्कल, गाव, आर्थिक स्थिती… सारं बाजूला पडलं… नि….
तुझं मन माझं झालं
माझं मन तुझं झालं
आता सगळेच साठी -सत्तरीला आलेत..
कुणाची साठी साजरी होते.. कुणाची पंचाहत्तरी..
कुणाचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस..
त्या मंगलप्रसंगी फार वर्षापूर्वी लग्नासाठी कॅटॅलिस्ट झालेली नव्वदीतली काकू बोळक्या तोंडाने म्हणते,
” हा गधड्या तेंव्हा हिच्याशी लग्न करायला तयार नव्हता.. आणि आता बघा कसा बायकोशेजारी हसत बसलाय “
… तेंव्हा आयुष्यात लाभलेल्या सुखाची नकळत उजळणी होते, डोळे भरतात नि तोंडात आपोआप शब्द येतात – – ” थॅंक यू !! “
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले
प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
…लिगो म्हणजेच Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.
जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात, आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंढा नागनाथ इकडे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पनाही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी. ए. ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षांपासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठं प्रोजेक्ट करत आहे, इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनात कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
लिगो म्हणजे नक्की काय? समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॕव्हिटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी) समजून घ्यावी लागेल. विश्वात अशा अनेक घटना घडत असतात की, ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडं ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालनं उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं की, जेव्हा वैश्विक घटना म्हणजे कृष्णविवरांचं (Black Holes) मीलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अशा घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात, त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांवर आदळतील, तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखं आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल, त्यांना गुरुत्वीय लहरी असं म्हटलं गेलं.
पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकीच प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणं कठीण आहे. कारण ह्या तरंगांमुळे पृथ्वीचं होणारं आकुंचन आणि प्रसरण हे अवघं एका फोटाॅनच्या आकाराचं असू शकते. तसेच ह्या तरंगाची क्षमताही त्या उलथापालथीवर अवलंबून आहे. विश्वातील ज्या घटना अशा गुरूत्वीय लहरी निर्माण करू शकतात, तर दोन कृष्णविवरांचं मीलन, दोन न्युट्रॉन ताऱ्याचं एकमेकांभोवती फिरणं आणि सुपरनोव्हा. तर अशा घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात, तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हटलं तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात, पण ते ओळखणं आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटाॅनच्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान जसं पुढे जात आहे, त्यामुळे आता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत, ते नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली, ह्याबद्दल सांगू शकतो.
२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही वेव्ह पृथ्वीवर कळाली. ही गुरुत्वीय लहर १. ३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १. ३ अब्ज वर्षांपूर्वी निघालेली ही वेव्ह तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्षं लागली. आतापर्यंत प्रकाश हे एकाच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्हनी १. ३ अब्ज वर्षांपूर्वीची माहिती पृथ्वीवर पोहोचवली, त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईनने ते स्वप्न बघितलं आणि लिगोने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगोने शोधली, ती तब्बल ३ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास ही वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्हच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत, ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे.
भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की, लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईनच्या ज्या थेअरी ऑफ रिलेटीव्हिटीवर आपण आज हे शोधू शकलो आहेत, ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचं योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकांत भारताच्या अनेक संशोधकांनी आपलं योगदान दिलं आहे. लिगोमध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटरचे असतात. जेव्हा ग्रॅव्हीटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते. तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्मच्या लांबीमध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी की असं लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन कॅबिनेटने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा (जशा DAE, TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc. ) ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्हचा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे.
आईनस्टाईनने बघितलेलं आणि अभ्यासलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रॕव्हीटेशनल वेव्हमुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत, हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचं स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे लिगोचे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम. 🙏
लेखक : श्री विनीत वर्तक ( माहिती स्त्रोत :- गुगल, नासा )
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈