मराठी साहित्य – विविधा ☆ हे जीवन सुंदर आहे…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

हे जीवन सुंदर आहे…! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆

जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल,

प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.

जीवन ही एक रंगभूमी आहे आणि आपण त्यातील एक पात्र आहोत, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे. जीवनाच्या अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या बऱ्यावाईट अनुभवांवर अवलंबून असते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतातच…., नाही का? जीवन हा एक ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते.  जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.

एवढ्याशा आयुष्यात मनुष्याला खूप काही हवं असतं…

आणि नेमकं हवं असतं तेच मिळत नसतं…

हवं ते मिळून सुद्धा खूप काही मिळालेलं नसतं…

चांदण्यांनी भरुन सुध्दा आभाळ त्याचं रिकामं असतं…

जीवन आनंदाने जगण्यासाठी अत्यावश्यक काय आहे असे कोणालाही विचारले तर जवळजवळ सर्वजण एकच उत्तर देतील तो म्हणजे पैसा आणि तो मुबलक असावा. तुमच्या मनातलं बोललो न मी ? अहो, स्वाभाविक आहे, मी ही तुमच्यातीलच एक आहे….!

श्रीसद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे एक वचन आहे, की मनुष्याला मिळणारा पैसा हा कष्टाने मिळत नाही तर प्रारब्धाने मिळतो. त्यामुळे मला इतकाच पैसा का मिळाला हा प्रश्न उचित नाही आणि किती पैसा मिळाला की मनुष्याचे समाधान होईल याचेही उत्तर कोणी अचूकपणे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले तर मनुष्य अधिक सुखी होईल असे वाटते.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्याचा काळ थोडा परीक्षा घेणारा आहे, हे नक्की. आपण कधीतरी विद्यार्थीदशेतून नक्कीच गेले असू. परीक्षेला घाबरणारा विद्यार्थी नापास न होईल तर नवल .. मनुष्य अनेकवेळा जितका वाईट घटना घडल्याने घाबरत नाही, तितका वाईट घटना घडेल या भीतीने घाबरतो. अनेकांना भीतीचीच भीती जास्त वाटत असते. यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे काळजी करायची नाही, काळजी  घ्यायची. चिंता सोडायची.

मी जिंकणार आणि मी नक्कीच जिंकणार !! असे किमान एकदा सकाळी जागे झाल्यावर आणि रात्री झोपताना मनाला सांगायचे.

गंमत बघा, आपल्याला जे काही संत माहीत असतील, ज्या संतांची चरित्रे आपण वाचली असतील, काहींनी अभ्यासलीही असतील, त्यापैकी कितीजण गडगंज श्रीमंत होते, गडगंज सोडून देऊ, किती जण नुसते श्रीमंत होते..? उत्तर आपल्या ओठावर आहे, ते तसेच राहू द्या. मला एक सांगा, कोणत्या साधुसंतांचा टिंगल झाली नाही ? कोणत्या संताला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नाहीत..?, कोणत्या संताची लोकांनी निंदा केली नाही…? अहो अनेक संतांनी जे सोसलं त्यापैकी एक टक्काही आपण उण्यापुऱ्या आयुष्यात सोसलं नसेल…..? आठवून पहा. बरं इतके सहन करूनही ज्यांनी टीका केली, निंदा केली, ज्यांनी विषप्रयोग केला, त्यांच्याविरुद्ध एकाही संताने तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. उलट या सर्वांवर सर्व संतांनी कृपाच केल्याचे आपल्या लक्षात येईल. माउलींनी पसायदान मागितले, श्री सद्गुरु गोंदवलेकर त्यांच्यावर विषप्रयोग होणार हे माहीत असूनही विष प्रयोग करणाऱ्याचे मन मोडू नये म्हणून त्याच्या घरी जेवावयास गेले.

सध्याचा काळ संक्रमणाचा आहे. आगगाडी किंवा  विद्युतरथ जेव्हा रूळ बदलतो, तेव्हा जास्त खडखडाट होतो. आपण थोडे तटस्थ राहून विचार करायचा. शांतपणे विचार केला तर नक्कीच काहीतरी मार्ग मिळू शकेल.

खालील विचार आज आपल्याला उपयुक्त आहेत असे वाटते, म्हणून इथे देत आहे.

१. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते नक्कीच महत्वाचे असते पण त्यापेक्षा आपण त्यास कसे सामोरे जातो किंवा कसा ‘प्रतिसाद’ देतो हे अधिक महत्वाचे असते.

२. मी चांगला नाही, मी यशस्वी होऊ शकत नाही, माझ्या नशिबातच नाही ह्या आपल्या मनातील सर्वात घातक कल्पना आहेत, त्या समूळ नष्ट करुया.

३. मी चांगला आहे, मी ते करु शकतो आणि मी नक्की जिंकेन या शक्तीदायी कल्पना आपण मनात रुजवू.

४. सकारात्मक विचार करण्याची,  सकारात्मक बोलण्याची, सकारात्मक कृती करण्याची सवय लावून घेऊया.

५. कोणतीही गोष्ट किमान दोनदा घडते. एकदा कल्पनेत आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. म्हणून आपल्याला हव्या असलेल्या सकारात्मक कल्पना करुया म्हणजे अगदी तशाच घटना प्रत्यक्षात घडतील.

६. आपण स्वतःला काय समजतो हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या क्षमता ओळखून प्रेम करा. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करुया. ज्याप्रमाणात आपण बदलू त्याप्रमाणात जग बदलतेच.

७. ‘दृष्टिकोन’ बदलू.

८. मनाचे व्यवस्थापन करायला शिकणे हे सुखी होण्याचे मूलभूत सूत्र आहे.

९. ‘मन’ हेच सर्व सुखदुःखाचे ‘मूळ’, ‘खोड’ ‘पान’, ‘फुल’ आणि ‘फळ’ आहे.

१०. ‘निरामय’ जीवनासाठी नुसता शारीरिक व्यायाम पूरेसा नाही तर मनाच्या व्यायामाचीही तितकीच गरज आहे.

११.  इथून जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत हे जर मनुष्याला नक्की करता आले तर मनुष्याचे अनेक व्याप आपसूक कमी होतील.

१२. मनामध्ये समुद्रासारखी ‘स्वीकार्यता’ आणि वागण्यात तशीच ‘मर्यादा’ असावी.

१३. प्रत्येक गोष्टीला अंत आहे, हेच अंतिम सत्य आहे. आपण ते स्वीकारले पाहिजे.

१४. ‘स्मरणात देखील ‘मरण’ आहे आणि हेच खरे ‘मरण’, बाकी सर्व मृत्यू.

१५. मनाची विशालता आकाशासारखी असावी.

१६. जे मनुष्याकडे असते, मनुष्य त्यातीलच थोडेफार इतरांना देऊ शकतो. उदा. ज्याच्याकडे आनंद तो आनंद देतो, ज्याच्याकडे सुख आहे तो सुख आणि  ज्याच्याकडे दुःख ….

१७. ‘शेषशायी’ असूनही भगवंत स्मितहास्य करु शकतात कारण ते कायम ‘सम’ स्थितीत असतात.

१८.कायम ‘सम’ स्थितीत राहणे ही सुद्धा एक साधना आहे.

१९. मला ‘कोणी’तरी पहातो आहे हे कायम ध्यानात ठेवावे, म्हणजे आपल्या हातून कधीही वावगे होणार नाही.

२०. ‘परि’स्थिती कशीही असो, आपली ‘आत्म’स्थिती (आनंदाची स्थिती) कायम राहावी आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण!!!

२१. मैं’ नही । ‘तू’ ही।

                           श्री गोळवलकर गुरुजी.

२२. “पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।।”

                                 समर्थ रामदास

२३. आपण आनंदाने आनंदाला बोलवूया, आनंद आनंदाने आपल्या घरी येईल, आनंद आनंदाने आपल्याकडे राहील, आनंद आनंदाने आपल्या घरी आल्यामुळे आपले घर आनंदाने भरून जाईल, मग सर्व ठिकाणी आनंदी आनंद असेल!!!*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “विचारांचे पक्षी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“विचारांचे पक्षी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

पाखरांना पंख फुटले… घरटे टाकून दूर देशी उडून गेले… आपल्या पंखातले बळ अजमावयला… मीच तर तसं सांगितलं होतं त्यांना… नव्हे नव्हे लहान होती अजाण होती तोपर्यंत मीच त्यांचा सांभाळ की केला होता…जसे जसे त्यांचं बालपण संपून तारुण्य आलं, तेव्हा मी सतत त्यांना प्रेरणा देत गेले ;तो दिवस फार दूर नाही बरं …आता तुमचं आकाश तुम्हालाच पेलायचं आहे.. गगनाला भिडायचं आहे… जोवर बळं आहे तोवर उडत राहायचं आहे… मात्र कधीही पायाखालच्या भूमीला विसरून जायचं नाही… काही काहीही झालं तरी… अहंकाराचा वारा डोक्यात भिनायला वेळ लागत नसतो, पण ज्याचे पाय त्यावेळी न भूमीला टेकता अधांतरी राहतात ना… त्यांचं गर्वाचं घर मोडून तुटून खाली पडल्याशिवाय राहात नाही… मागची आठवण ठेवा… असं आणि बरंच काहीसं त्यांना सांगितलं होतं आपणं… पण तिकडे लक्ष तरी दिलं का त्यांनी… कितीसं  समजलयं त्यांना कुणास ठाऊक… मागची काळजी करू नका पण आठवण मात्र असु द्या… तो दिवस उगवणारच होता आणि उगवला तेव्हा त्यांनी आकाशात भरारी घेतली…लवकर परतून येण्याची घाई न करण्याची जणू शपथच होती घेतली…आपलेच अंतकरण गदगदून आले होते त्यावेळी… आणि किती आवरू म्हणता डोळयातले खळले नव्हते पाणी….  इवलसं काळीज हललं जरासं… मन उदास उदास झालं.. पुन्हा कधी माझी म्हणणारी पिल्लं केव्हा दृष्टीला पडतील… चातकाने मृगाच्या पावसाची वाट दर वर्षी पहावी तसं आपलं होतं गेलं… आठवणींचे पारवे विचाराच्या वावटळीत कलकलाट करत  दारावर नि खिडक्या वर फडफडत राहू लागले… मिळविले काय नि गमावले काय…मनाचा कल्लोळ  भावनांच्या गोंधळात सैरभैर झाला…खोटी खोटी समजुतीचा लेप लावू पाहू लागला…मुलांचं तरूणपण आलं तेव्हा आपलंही वयं वाढत गेलं या कडे खरंच कधी लक्ष नाही गेलं आपलं… शरीर थकले मन हळवे झाले…एकदा तरी पिल्लांनी घरट्याकडे परतायला हवं होतं… आशेचे अपेक्षाभंगाचे पक्षी हृदयाला चोच चोच मारून  घायाळ करून सोडू लागले तरीही… विध्द मन मात्र अजूनही त्यांची वाट बघणं सोडायचं  नाव घेत नाही….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन पाखरा रे… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

मन पाखरा रे ! ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी स्वतःला स्थितप्रज्ञ मानत नाही पण माझी बुद्धी स्थिर आहे असे मला वाटते. मी चंचल नाही. मी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करते आणि निर्णय घेते. माझ्या आजूबाजूला एक मोठा जनसमुदाय असतो, त्यांच्यात होणारे संवाद मी ऐकते पण त्याचा माझ्या मनावर नेहमीच परिणाम होतो असे नाही. खूप वेळा तर मी ऐकते आणि सोडून देते शेवटी मला जे वाटते तेच मी करते.

लोक मला म्हणतात,

“ तू हट्टी आहेस.”

“आहे मी हट्टी!”

लोक मला ‘शिष्ट’ म्हणतात.

“ हो! आहे मी शिष्ट!”

पण त्या दिवशी एक अगदी लहानशी  घटना घडली.  मला माझ्या नवऱ्याने एक चॉकलेट दिलं. मी चॉकलेटचा रॅपर उघडून चॉकलेट मोकळं केलं आणि खाऊनही टाकलं.  सवयीप्रमाणे रॅपर ट्रॅश मध्ये टाकायला उठले आणि त्यावरच्या अक्षरांवर सहज नजर गेली. रॅपर थोडासाच चुरगळला होता.  तो पुन्हा नीट उघडला. त्यावर लिहिले होते,

“ तुझा तुझ्याविषयीचा गैरसमज दूर कर. तू घातलेला हा गंभीर मुखवटा फाडून टाक आणि त्यात तडफडणाऱ्या मनाच्या पाखराला मुक्त कर.”

खरं म्हणजे एक बाजारी कागद! त्यावर लिहिलेल्या शब्दांना काय महत्त्व द्यायचे? कोणीही काहीही  लिहावं. अखेर  एक गंमतच ना? त्याचे काय एवढे?  पुन्हा एकदा मी तो कागद चुरगळला आणि केराच्या टोपलीत फेकूनही दिला.

पण नाही हो!  हे प्रकरण एवढ्यावर नाही मिटलं.  मनात कोंडलेलं एक पाखरू फडफडत राहिलं.  मनाचा गाभारा चोचीनं टोकरत राहिलं. वेदना जाणवायला लागली, जखम भळभळायला लागली. मन  पाखरू बनलं. मुक्ततेसाठी धडपडू लागलं आणि उगीचच वाटू लागलं,

 “मी खरी का खोटी?” 

“मी स्थिर की अस्थिर?”

“ मी सुखी का दुःखी?”

“ मी मुक्त की बंधनात?”

“ कोणतं माझं आकाश?  फक्त डोक्यावरचं की दूरवरच्या त्या डोंगरावरचंही?” 

मिटल्या कमळात एखादा भुंगा तडफडावा ना तसा हा मनाचा भ्रमर आतमध्ये नि:शब्द कोंडल्यासारखा जाणवू लागला. पार नदीच्या उगमापासून ते पावलापाशी थांबलेल्या पाण्यापर्यंत विचार वाहू लागले.  मनात कोंडलेलं एक पाखरू आकाशाचा वेध घेत उंच उंच उडायला लागलं.  माझं मनच पाखरू झालं.  कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर, इकडून तिकडे— तिकडून इकडे.  कधी जमिनीवर, कधी पंख भिरभिरत आभाळी आणि मनाच्या या पाखराला मी जेव्हा पंख पसरून उडताना पाहिलं ना तेव्हा माझ्यातली मी, खरी, खोटी, हरवलेली दिसू लागले. माझंच मन मी पाहू लागले.

वारंवार झालेले मनावरचे घाव गोंजारत राहिले. मनावर  झालेल्या ओरखड्यांच्या खुणा मी तपासू लागले. मन माझं हसलं, रुसलं, भांबावलं, आक्रंदलं आणि पुन्हा पुन्हा पिंजऱ्यात कोंडलं गेलं.

“ हा रंग तुला शोभत नाही.”

 नाही घातला.

“ हे तुला जमणार नाही.”

 नाही केलं.

 “अंथरूण पाहूनच पाय पसर.” तेच केलं. “मुलीने मुलीसारखे रहावे, वागावे.” म्हणजे नेमकं काय पण नाही विचारले प्रश्न.

आता वाटतं मन माझं स्थिर असणं, चंचल नसणं म्हणजे चौकटीत राहणं होतं का? 

आयुष्याचे अनेक कप्पे झाले. ते नीटनेटके रचताना खूप दमछाक झाली. स्वतःपेक्षा इतरांचाच विचार केला. याला काय वाटेल त्याला काय वाटेल यातच बरीचशी ऊर्जा कामी आली.  मनातल्या पाखराने बंद दारावर अनेकदा थाप मारली पण दार उघडून त्या बंद पाखराला मोकळं करण्याचं बळ म्हणण्यापेक्षा धाडस झालं नाही. भय कधी संपलं नाही.  एक कोष विणला आणि त्यातच स्वतःला गुंतवून ठेवलं. शिवाय मला जे योग्य वाटलं ते मी केलं या समाधानातही राहिले.  प्रवाहच पकडून ठेवला.  कधी कुणाविषयी हेवादावा, द्वेष, मत्सर वाटलाच नाही असं नाही. एका सरळ रेषेत आयुष्य जगत असताना रेषेबाहेरचं आपलं सामर्थ्य, आपलं भविष्य तपासून पहावं,  सारे बंध तोडावेत, पूजलेले उंबरठे हटवावेत असं वाटलंच नाही का?

तुज अडवितो कैसा उंबरा 

आकाशी झेप घे रे पाखरा 

सोडी सोन्याचा पिंजरा ..

हे स्वर तसे नेहमी गाभाऱ्यात घुमले.  नाही सोडला पिंजरा.  कम्फर्ट झोन होता तो आपला.  तो सोडून जाण्याचं प्रचंड भय होतं  मनात आणि म्हणून असेल कदाचित तक्रार नव्हती आयुष्याबद्दल.  जे आहे ते चांगलं आणि तेच आपलं यात सुखाने सारं काही चाललं होतं. 

मग इतक्या वर्षानंतर जवळजवळ आयुष्याचा  उत्तरार्धही संपत असताना एका चॉकलेटला गुंडाळलेल्या कागदावरच्या अक्षरांनी इतकी मोठी क्रांती करावी मनात  की सुप्तावस्थेत असलेल्या  क्रांतीच्या बीजाला एकदम मोड यावेत?  विरुद्ध प्रवाहात झेप घ्यावी असे वाटावे?  खरं म्हणजे कुठला प्रवाह? मनाचा की समाजाचा?  आयुष्यभर विरुद्ध प्रवाहातच हातपाय मारले की पण तो होता मनाचा प्रवाह. 

आता आत अंतरात फडफडणारं एक पाखरू उडू उडू पाहतंय.. मनाच्याच प्रवाहात  जाण्याचं आव्हान करतंय.

“ बा पाखरा!  आता उशीर झाला रे! कुठे उडशील? कुठे झेप घेशील? पंखातली ताकद संपली रे!  आणि कितीही भरारी मारलीस ना तरी मुक्त कसा होशील? उगीच भटकंती होईल.  घरट्याची आठवण येईल.मळलेल्या वाटेवरून चालणारे आपण. म्हणून  सांगते,

“या चिमण्यांनो! परत फिरा रे 

घराकडे आपल्या 

जाहल्या तिन्ही सांजा…”

खलील जिब्रान  म्हणतो,

THE RIVER NEEDS TO ENTER THE OCEAN,

नदीचा शेवट सागरातच.

 म्हणून विनविते,

“ मनाच्या पाखरा पुरे झाले उडणे. आवर पंख. घरट्यात  ये.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुनरावृत्तीचे सवाल !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

पुनरावृत्तीचे सवाल ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लोक ताटकळले होते. अशावेळी यावं लागतं, लोक रीत आहे. उद्या आपल्यावरही ही वेळ आहेच की. म्हणून लोक आले होते. किमान आपल्या बिरादरीतलं कुणी गेलं तर जावंच. कारण बिरादरीतलेच लोक काहीही करून हजर राहतात….निदान शेवटच्या वेळेला तरी!

गेलेला त्यांच्यात सर्वच बाजूंनी उजवा होता. त्याच्या शब्दांची सर यांच्या शब्दांना यायला आणखी चार दोन जन्म घ्यावे लागले असते कित्येकांना. मनातून अतीव दु:ख झालेले काही जण होतेच या जमावात, नाही असं नाही! पण ब-याच जणांना, किंबहुना सर्वांनाच घाई होती. आपण अंत्यविधीला उपस्थित होतो हे किमान चार दोन लोकांनी तरी पाहिले असले पाहिजेच असाच अनेकांचा प्रयत्न होता. त्यातील काहीजण तर स्मशानापर्यंत न येता रस्त्यातून मध्येच सटकून आपल्या कामाधंद्याला पळणार होते. कुणी गेलं म्हणजे व्यवहार का थांबून राहतो? नाही. व्यवहार करणारा थांबला की त्याच्या त्याच्यापुरता व्यवहार थांबतो. हे असंच चालतं जगात. 

पण दिवंगताची पत्नी पतीच्या शवापासून तसूभरही हलायला तयार नाहीत. त्या देहातून चैतन्य पुढच्या प्रवासाला कधीचंच निघून गेलेल्याला तसा आता बराच वेळ लोटून गेला आहे. आप्तांनी कर्तव्यभावनेने सारी तयारी कधीच पूर्ण केलीये. आता फक्त उचलायचं आणि चितेपर्यंत पोहोचवायचं…बस्स! 

बाईंनी त्यांच्या पतीचा, नव्हे त्यांच्या पतीच्या निष्प्राण देहाचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवलेत. कुणी जाणता माणूस पुढे झाला. “वहिनी….जाऊ द्या दादांना…त्यांच्या प्रवासाला!” त्यावर बाई त्यांच्यावर एकाएकी बरसल्या. म्हणाल्या, “तुम्ही असाल मोठे कवी! पण तुम्हांला बाईच्या हृदयीची पीडा नाही समजणार!”

— तो बिचारा सभ्य सदगृहस्थ आधीच आपल्या परमप्रिय मित्राच्या देहावसानाने  भांबावून गेला होता. तो मागे सरकला. वहिनी त्याच्याशी बोलताना जणू आपल्या पतीच्या काही समजण्यापलीकडे निघून गेलेल्या निष्प्राण देहालाच प्रश्न विचारू लागल्या…बोलू लागल्या.

… “एकटेच आला होतात मला बघायला आणि माझ्या वडीलांकडे माझा हात मागायला. जातपात एकच आणि त्यात पगारी नोकरी. लेक सुखी राहील. बाप दुसरा कोणता विचार करतो? आणि बालविधवा मुलीचा बाप तर कशालाही तयार झाला असता…नव्हे अनेकांना हो सुद्धा म्हणून बसला होता. माझं पहिलं लग्न अकराव्या वर्षी झालं. कपाळावरचं कुंकू अजून माझ्या आणि इतरांच्याही सवयीचं होण्याआधीच,काळाच्याच भाषेत बोलायचं झालं तर, तीनेक एक महिन्यात पुसावं लागलं. कपाळावर कुंकवाचा मागमूसही राहिलेला नव्हता. आणि तुमचं लग्न तुमच्या पिताश्रींनी तुमच्या नकळत्या वयात लावून दिलं होतं. तुमची आई देवाघरी गेल्यावर तुमच्या वडिलांनी स्वत:च्या संसाराचा दुसरा डाव मांडलेला. तुम्ही आणि तुमची ती दुसरी आई. शंभरात नव्याण्णव जणांच्या नशिबी असलीच सावत्र आई येते…मानवी स्वभाव दुसरं काय? म्हणून मग तुम्हांला वडीलांनी लवकरच बोहल्यावर चढवलं होतं.

तुमची पत्नी तशी तुमच्यापेक्षा वयाने मोठी..खानदानी श्रीमंत…लाडावलेली….आई-वडिलांचा लळा अजून न सुटलेली. ती सारखी माहेरी जाण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीत…बायकोच्या भूमिकेत असली तरी ती बालिकाच की.  लवकरच तुमचे वडीलही परलोकी गेले. तुम्ही बाहेरगावी शिक्षणासाठी असताना तुमच्या सावत्र आईत आणि पत्नीत काहीतरी कुरबूर झाली तर या सूनबाईंनी चक्क स्वत:चाच जीव घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही तिच्यावर रागावलात तर ती जी माहेरी गेली ती गेलीच.

आणि मग तुम्ही ठरवलंत…लग्न करायचं ते बालविधवेशीच. या विचाराला हिंमत लागते. ती तुम्ही दाखवलीत. अगदी वडीलांना आधी न विचारता तुम्ही माझ्या वडीलांना तुमची पसंती त्वरीत सांगितली होतीत आणि वडीलांनी दिलेली नाममात्र वरदक्षिणा स्विकारून विवाह निश्चितही करून टाकला. 

केवळ तुमच्यासाठी मी माझं वैधव्य खंडित केलं होतं….वैधव्याचा पदर माझ्या डोईवरून मागे घेतला होता….आणि कपाळी तुमच्या नावाचं कुंकू रेखलं होतं. आणि तुम्ही आता मला तोच पदर पुन्हा तोंड झाकण्यासाठी पुढे ओढून घ्यायला सांगताय….मी बरं ऐकेन? तुम्ही मला मागे टाकून एकटे जाऊच कसे शकता? तुमच्या कित्येक कथांमध्ये मी तुमच्याशी साधलेल्या संवादांचं प्रतिबिंब पाहून मला मनातून सुखावून जायला व्हायचं. तुमच्या लेखनावर कुणी केलेली टीका मला सहन व्हायची नाही. पण तुम्ही ती टीका मला मोठ्या चवीने वाचून दाखवायचात..! पण तुम्ही साहित्यनिर्मितीसाठी लिहीत नव्हताच मुळामध्ये…तुम्ही फक्त स्वत:ला व्यक्त करीत होतात…स्वत:ला मोकळं करीत होतात. तुम्ही भोगलेलं,अनुभवलेलं शब्दांच्या रूपांत पुस्तकांत जाऊन बसायचं….पानांपानांत दडून बसायचं! ” 

देह ऐकू शकत नव्हता आणि आता काही करूही शकत नव्हता. पण इतर जिवंत माणसांच्या काळजाला त्यांच्या या शब्दांनी घरं मात्र पडत चालली होती. सर्व उरकून घरी जाण्याच्या मन:स्थितीतली माणसंही आता मनातून वरमली असावी. सारेच स्तब्ध झाले होते! 

संवादामधला हा अवकाश जीवघेणाच असतो. पण त्यातूनही ते गृहस्थ दुस-या एकाला म्हणाले…बघ! तुला वहिनींना समजावता येतंय का ते!” आणि ते तेथून दोन पावलं मागे सरून खाली मान घालून उभे राहिले! 

बाईंचा विलाप हस्तनक्षत्रातल्या पावसासारखा घनघोर…अविरत.पण तरीही ही नवी जबाबदारी शिरावर अकस्मातपणे आलेला माणूस पुढे झाला….आणि अत्यंत कोमल स्वरांत म्हणाला….” ही तर केवळ माती उरलीये! या मातीत आता तुमचं माणूस उरलेलं नाही ! ”

…एक प्रदीर्घ हंबरडा उमटला आणि बाईंनी शवाच्या छातीवर टेकवलेलं आपलं मस्तक वर उचललं….त्यांच्या कपाळावरचं कुंकू सैरावैरा होऊन कपाळावरून उतरू लागलं होतं !

(हिंदी साहित्याच्या मालेतले मेरूमणि प्रेमचंद निवर्तले तेंव्हाचा हा प्रसंग. त्यांचे स्नेही आणि जीवलग कवी परिपूर्णानंद वर्मा यांनी ‘बीती यादें’ नावाच्या पुस्तकात वर्णन केला आहे. प्रेमचंद यांच्या अर्धांगिनी शिवरानी देवी पतीनिधनाने अति व्याकुळ झाल्या होत्या. प्रेमचंद यांचे सर्वात घनिष्ठ कवी मित्र जयशंकर ‘प्रसाद’ शिवरानी देवींना प्रेमचंद यांचे शव अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करीत असताना शिवरानी देवींनी दु:खावेगाच्या, अगतिक रागाच्या भरात ‘तुम्ही कवी असू शकता…पण एका स्त्रीचं हृदय तुम्हांला समजणार नाही’ असे उद्गार काढले होते. त्या प्रसंगाचं मी हे स्वैर भाषांतर आणि गांभिर्यपूर्वक स्वातंत्र्य घेऊन स्वैर रुपांतर केलं आहे. प्रेमचंद आणि त्यांच्या पत्नी शिवरानी देवी यांचं भावजीवन मूळातूनच वाचण्याजोगं आहे. असो. प्रेमचंद यांचे वर उल्लेखिलेले मित्र कवी,कथालेखक श्री. जयशंकर प्रसाद यांना कुणी या प्रसंगानंतर हसलेलं कुणी पाहिलं नाही..इतके ते आपल्या या मित्राच्या जाण्याने दु:खी झाले होते…त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत तेही परलोकी गेले.. प्रेमचंद यांचे हिंदी साहित्य वाचकांच्या भावजीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत हे तर निर्विवादच.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साठवणीतल्या आठवणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साठवणीतल्या आठवणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

आमच्या परीक्षा झाल्या की आई वर्षभराच्या साठवणीच्या कामाला  लागायची. प्रथम फळीवरचे मोठे पत्र्याचे  आणि ॲल्युमिनियमचे डबे खाली काढले जायचे. डबे  धुऊन उन्हात वाळवले जायचे.

ऊन कडक आहे… याचा आईला आनंद व्हायचा .त्यात घडी करून ठेवलेले प्लास्टिकचे मोठे कागद असायचे. ते स्वच्छ धुऊन ऊन्हात  वाळवायचे .आदल्या दिवशी गच्ची  झाडून घ्यायची. संध्याकाळी बादलीने पाणी वर न्यायचे आणि गच्ची धुऊन काढायची.

सगळ्यात प्रथम मान सांडग्यांचा असायचा. लाकडी पाट धुवून वाळवून ठेवलेला असायचा. रात्री हरभरा, मूग, उडीद डाळ भिजत घालायची. सकाळी पाट्यावर मिरची आले मीठ घालून जाडसर वाटायची .

पाटावर मध्यभागी सुपारी ठेवली जायची .त्यावर हळदीकुंकू वाहून आई मनोभावे नमस्कार करायची. वर्षभराचे पदार्थ चांगले व्हावेत म्हणून गणपतीची प्रार्थना करायची.

कामाचा” श्री गणेशा” व्हायचा…

त्या सुपारीभोवती गोल गोल सांडगे घालायचे .पाट उचलून वर गच्चीत ठेवायचे काम आमचे असायचे. बाकीच्या पिठाचे सांडगे वर गच्चीत प्लास्टिक वर घातले जायचे. त्यांचा आकार जराही कमी जास्त झालेला आईला चालायचा नाही .एकसारखे सांडगे सुरेख दिसायचे. ते जरासे वाळले की आमची खायला सुरुवात व्हायची.  वरून कडक आणि आतून ओलसर सांडगे खाऊनच निम्मे संपायचे. साठवणीचे करण्यासाठी आई परत एकदा करायची. हे सांडगे तळून भाजलेल्या दाण्याबरोबर खाल्ले जायचे. भाजी नसेल त्या दिवशी  खोबरं,कांदा,लसुण यांच वाटण करून  त्यात सांडगे घालून आई त्याची भाजी करायची .तळून कढीत टाकले की गरम भाताबरोबर खाताना भाताची चव मस्त लागायची.

नंतर पापडाचा नंबर लागायचा. उडीद आणि मूग डाळ गिरणीत समोर उभं राहून आई दळून आणायची. सकाळीच पापडखार, काळीमिरी, घालून उडदाचे पीठ घट्ट भिजवले जायचे .अगदी “दगडासारखे” हा शब्द आईचाच… ते कुटुन द्यायचे काम भावाचे असायचे. वरवंट्याने दणादण तो पीठ कुठून द्यायचा. आई तेलाचा हात लावून बोट्या करून ठेवायची. त्याची चव अप्रतीम लागायची. येता जाता आम्ही ते पापडाचे पीठ आवडीने खात असू. शेजारच्या दोन-तीन काकु त्यांचे जेवण झाले की पोलपाट लाटणे घेऊन यायच्या .गोल बसून घरात गप्पा मारत पापड लाटणे सुरू व्हायचे. लाटलेले पापड हातावर घेऊन आम्ही वर उन्हात नेऊन घालत असु.हे  पापड सारखे हलवायला लागायचे नाही तर कडक  होऊन त्यांचा आकार  बदलायचा. आई खालूनच सांगायची..”पापडाचा द्रोण होऊ देऊ नका रे” वर एकदा येऊन आई नजर टाकून जायची.  रात्री मुगाची खिचडी व्हायची .त्याच्याबरोबर ताजा तळलेला पापड असायचा…

सगळ्यात जास्त व्याप असायचा तो गव्हाच्या कुरडयांचा. त्यासाठी आई तीन दिवस गहू भिजत घालायची. नंतर ते पाटावर  वरवंट्याने वाटायचे .मग  भरपूर पाण्यात कालवायचे. चोथा  व सत्व वेगळे करायचे.  त्याला गव्हाचा  चीक  म्हणायचे.आई लवकर उठून तो चीक  शिजवायची. तो गरम असतानाच कुरडया घालायला लागायच्या.  पात्र भरून  द्यायचं काम बहिणीचे व माझे असायचे. हा.. हा म्हणता.. पांढऱ्याशुभ्र कुरडयांनी प्लास्टिक भरून जायचे. त्यावर्षी काही मंगल कार्य असेल तर रंगीत कुरडया घातल्या जायच्या. सूर्यदेव वर यायच्या आत कुरडया घालून झाल्या पाहिजेत असे आईने ठरवलेले असायचे.

नंतर आई आम्हाला खाण्यासाठी चिक शिजवून द्यायची. त्यात तूप घालून किंवा दूध साखर किंवा हिंग जिऱ्याची कडकडीत फोडणी करून खाल्ला तरी तो छान लागायचा.

सुट्टीच्या दिवशी वडील सकाळीच सायकलवरून मोठ्या मंडईत जायचे.  भरपूर बटाटे आणायचे. बटाटे किसायची मोठ्या भोकाची किसणी वर्षातून एकदाच माळ्यावरून खाली यायची. पहाटे उठून बटाटे उकडायचे ,सोलायचे व थेट प्लास्टिक वर खीसायचे. उन्हाने चार-पाच वाजेपर्यंत  कीस कडकडीत  वाळून जायचा .त्यात  दाणे ,तिखट, मीठ ,साखर घालून  चिवडा केला जायचा. कधी त्यात नाॅयलाॅन साबुदाणा तळून घातला जायचा. गावाला जाताना गाडीत खायला आई हा चिवडा करून घ्यायची.

साबुदाणा दळून आणून त्या पीठात ऊकडलेला बटाटा  घालून  ऊपवासाचे पापड केले जायचे. त्यातही मिरचीचे व  तिखटाचे असे दोन प्रकार होते. बटाट्याचे चिप्स लहानपणी खूप आवडायचे. जाळीचे व प्लेन असे वेफर्स करणारी चपटी किसणी होती .त्या वेफर्सची ट्रायल घेण्यातच बरेचसे बटाटे खर्ची व्हायचे. कितीही प्रयत्न केला तरी तीन-चार फक्त पातळ व्हायचे बाकी जाडच…… तरीसुद्धा ते जाडे जुडे वेफर्स आम्ही आवडीने खात होतो. त्याची दरवर्षी काहीतरी निराळी पद्धत आईला कोणीतरी सांगे. तरी बटाटा पातळ  कापला जायचा नाही. कंटाळून आई विळीवर पातळ काप करून घ्यायची. विकतचे वेफर्स हा फार महाग पदार्थ समजला जायचा त्यामुळे तो आणला जायचा नाही. साबुदाण्याच्या पापड्या घातल्या जायच्या. मध्ये जरा ओलसर असलेल्या त्या ओल्या कच्च्या पापड्या सुद्धा छान लागायच्या. थोडीशी खारट साबुदाण्याची व जिऱ्याची चव यांचा मस्त मेळ जमायचा… या पापडाच्या पिठात शिजवताना बटाटा किसून घालायचा व मिरची वाटून लावायची त्या जरा वेगळ्या पापड्या तळल्यावर सुंदर दिसायच्या.

मसाल्याच्या भरलेल्या मिरच्या, साबुदाणा भरलेल्या उपासाच्या मिरच्या ,कुटाच्या मिरच्या असे मिरच्यांचे प्रकार व्हायचे. दहीभाताला किंवा दही पोह्याला हीच मिरची लागायची.

शेवयांसाठी खास दोन-तीन दिवस राखून ठेवलेले असायचे .त्याचे पीठ जमले….. शेवयांची बारीक तार निघालेली पाहिली की आई खुष व्हायची .हातावर शेवया  करायच्या. लांब करून त्या न तुटतील इतक्या ताणायच्या. लाकडी काठीवर वाळवायच्या. केशर ,बदाम आणि अटीव दुधातल्या त्या खिरीची चव अजून जिभेवर  आहे . त्या शेवयांचे जे तुकडे खाली पडायचे त्याचा कांदा, कोथिंबीर,भाज्या घालून उपमा केला जायचा. तो फारच चवदार लागायचा .तेव्हा नूडल्स हा प्रकार नव्हता . नूडल्स पेक्षा हा प्रकार  टेस्टी असायचा. पण शेवया खूप मेहनत घेऊन केलेल्या असल्यामुळे त्या खिरीसाठीच वापरल्या जायच्या.

ज्या दिवशी जो पदार्थ केला असेल त्या दिवशी रात्रीच्या जेवणात तो पदार्थ असे .वडील ऑफिसमधून आल्यावर आवर्जून चौकशी करायचे.

“वा वा “म्हणायचे. आई खुष होऊन  हसायची. एक एक पदार्थ तयार होऊन डब्यात भरला जायचा त्यावर कोहाळ्याचे सांडगे ,उपवासाच्या पापड्या ,लसणाचे पापड, असे खडू ओला करून लिहिले जायचे. वरची फळी गच्च भरून जायची.

आईला या महिन्यात आराम नसायचाच. कारण हे प्रकार करून संपेपर्यंत वडील मिरच्या, हळकुंड, शिकेकाई आणून द्यायचे. मिरच्यांची डेखे काढायची .मिरच्या, हळकुंड गच्चीत वाळवायचे .वर्षांचे तिखट हळद होऊन जायचे. खूप दिवसापासून लिंबाची साले साठवलेली असायची.” गव्हला कचरा” म्हणजे काय असायचे कोण जाणे? पण  लांब असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी दुकानातून वडील तो आणून द्यायचे. आवळकाठी, रिठे गच्चीत वाळत घातलेले असायचे .हे सगळे घालून  शिकेकाई दळून आणायची  .रविवारी आई या शिकेकाईचे भरपूर पाणी गरम  करून द्यायची. त्यानी केस धुवायचे असा दंडक होता.

महिन्यातून एकदा आई स्वतः चोळून न्हाहु  घालायची. आईच्या हातात  केस होते तोपर्यंत केस लांब आणि जाड होते .कॉलेजमध्ये गेल्यावर केसांना पहिला साबण लावला तेव्हा आई खूप चिडली होती.

मे महिना संपता संपता आईची लोणच्याची गडबड उडायची. कैरीचे तिखट ,गोड लोणचे. तक्कु ,कीसाचे लोणचे, लवंगी मिरची लोणचे असे विविध प्रकार आई करायची. गुळांबा ,साखरआंबा, मुरांबा हे पदार्थ व्हायचे .झाकणाला पांढरे स्वच्छ कापड लावून आई बरण्या बंद करायची .सेल्फ मधला वरचा कप्पा या बरण्यांचा असायचा. शाळा सुरू झाल्यावर डब्यात पोळी भाजी बरोबर लोणचे, गुळांबा असायचा .

कितीतरी दिवस आईचा हा उद्योग चालायचा .आता विचार केला तर आश्चर्य वाटते… पण तेव्हा ते सर्व लागायचे.  वर्षभर बरोबर पुरायचे.

सध्या सारखी शिबीर ,क्लास असे काही नसायचे  पण आम्हाला सुट्टीचा कधी कंटाळा यायचा नाही.

आईला मदत करताना त्यातून खूप शिकायला मिळायचे .आजकाल  एवढे प्रकार कोणी करत नाही आणि लागतही नाहीत .जे पाहिजे ते तयार मिळते. पाकिटे आणायची खायची… पण ती पूर्वीची मजा त्यात नाही एवढे खरे….

 सुमारे दीड फूट उंचीची चिनीमातीची लोणच्याची बरणी ,पत्र्याचे चौकोनी, गोल डबे बरेच वर्ष माझ्या माहेरी माळ्यावर पडून होते .दरवेळेस माळा साफ करताना त्याची अडचण वाटायला लागली..

 पण  ते  काढून  परत वर ठेवले जायचे. 

एके वर्षी वडिलांनी ती  मोठी बरणी  देऊन टाकली ……किती तरी दिवस आम्ही बहिण भाऊ त्या बरणीसाठी हळहळत होतो………. उगीच टाकली असे अजूनही वाटते.

 ती बरणी नुसती बरणी नव्हती…  ते आमचे लहानपण होते.

 तो जपून ठेवावा असा  ठेवा ….आमच्या आनंदाची.. ती एक साठवण होती.

 ती  बरणी म्हणजे  आमच्या कष्टाळू आईची आठवण होती  ……

आजही साठवण लिहिताना आईच आठवली…

आई गेली आणि सारे संपले…… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उडुपी थाळी – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  उडुपी थाळी – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठे महायुद्ध होते कारण त्या काळात या युद्धात भाग न घेतलेले क्वचितच एखादे राज्य असेल. कारण या युद्धात भारतासह अफगाणिस्तान आणि इराणचे सर्व राजे कौरव किंवा पांडवांच्या बाजूने उभे राहिले, परंतु एक राज्य असे होते जे या युद्धक्षेत्रात असूनही युद्धापासून दूर राहिले, ते म्हणजे दक्षिणेतील उडुपीचे राज्य.

जेव्हा उडूप्पीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचला तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही त्यांना आपापल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करू लागले.

उडुपीचा राजा अत्यंत दूरदर्शी होता, त्यांनी श्रीकृष्णाला विचारले – हे माधव! दोन्ही बाजूंनी जो कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुर वाटतो, पण दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा कोणी विचार केला आहे का?

त्यावर श्रीकृष्ण म्हणाले- महाराज! तुम्ही अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे, तुमच्या या शंकेवरून मला असे वाटते की तुमच्याकडे नक्कीच यासंदर्भात काहीतरी योजना आहे, कृपया ती योजना मला सांगावी.

यावर उडुपीचे राजे म्हणाले की – हे वासुदेव! भावा भावांमध्ये होणारे हे युद्ध मला उचित वाटत नाही त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची माझी इच्छा नाही.

परंतु हे ही सत्य आहे की हे युद्ध आता टाळता ही येणार नाही, म्हणूनच मी असे ठरवले आहे की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित राहून लढणाऱ्या सर्व सैनिकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे.

यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले – महाराज!  तुमची कल्पना खूप चांगली आहे, या युद्धात 50 लाख योद्धे सहभागी होतील आणि तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या अन्नाचे व्यवस्थापन पाहणार असेल तर या बाजूने ही आम्ही निश्चिंत राहू.

मला हे सुध्दा माहीत आहे की या विशाल महासागराएवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन भीमसेन आणि तुमच्या शिवाय कुणालाही शक्य नाही.

भीमसेन या युद्धापासून लांब राहू शकत नाहीत, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घ्या, अशा प्रकारे उडुपीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली.

पहिल्या दिवशी त्यांनी उपस्थित सर्व योद्धांसाठी भोजनाची व्यवस्था केली, त्यांची कार्यक्षमता इतकी अफाट होती की दिवसाच्या शेवटी अन्नाचा एक कण ही वाया गेला नाही.

जसजसे दिवस सरत गेले तसतशी योद्ध्यांची संख्याही दिवसागणिक कमी होत होती आणि दोन्ही बाजूचे योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की, प्रत्येक दिवसाच्या शेवटी उडुपीचा राजा कडून एक अन्नाचा कण ही वाया जात नाहीये तर. त्यांना हे कसे समजते की आज एवढ्याच सैन्याचे भोजन बनवायचे आहे?

खर तर तेथील उपस्थित असणाऱ्या सैन्याला एक प्रश्न पडत होता की उडप्पीचा राजांना हे कसे काय समजते की आज किती सैन्य मरणार आहे व ते रोज त्याच आधारे भोजन बनवतात.?

एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचे व्यवस्थापन करणे हा खर तर एक चमत्कारच होता आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाऊ नये अशा पद्धतीने नियोजन करणे हे सुध्दा एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतेच.

अखेर युद्ध संपले आणि पांडव जिंकले.आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी शेवटी युधिष्ठिराने न रहावुन उडुपीच्या राजाला विचारले की – हे महाराज! समस्त देशांचे राजे आमची प्रशंसा करत आहेत की तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केले की त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः भीष्म, गुरू द्रोण आणि आमचा थोरला भाऊ कर्ण यांसारखे महापुरुष करत होते. परंतु मला असे वाटते की तुम्ही आम्हा सर्वांच्यापेक्षा जास्त कौतुकास पात्र आहात, कारण ज्यांनी एवढ्या मोठ्या सैन्यासाठी केवळ जेवणाची व्यवस्थाच केली नाही तर ती व्यवस्था अशा प्रकारे चोख पार पाडली की अन्नाचा एक कण ही वाया जाऊ दिला नाही. मला तुमच्याकडून या कौशल्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

यावर उडुपीचे राजे हसले आणि म्हणाले – “सम्राट! या युद्धात तुम्ही मिळवलेल्या विजयाचे श्रेय कोणाला देणार?”

यावर युधिष्ठिर म्हणाले – “याचे श्रेय श्रीकृष्णाशिवाय कोणाला देता येईल? जर ते नसते तर कौरव सैन्याचा पराभव करणे अशक्य झाले असते.”

तेव्हा उडुपीचे राजे म्हणाले,  हे राजा!  ज्याला तुम्ही माझा चमत्कार म्हणत आहात तो सुद्धा श्रीकृष्णाचाच महिमा आहे, हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

मग उडूप्पीच्या राजांनी या रहस्यावरून पडदा उठवला व व म्हणाले “महाराज! श्रीकृष्ण प्रतिदिन रात्री शेंगदाणे (भुईमुगाच्या शेंगा) खात असे व मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे, व त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या व ते तेथून निघून गेले की मी तेथे जाऊन ती टरफल बाजूला करून त्यांच्या किती शेंगा शिल्लक राहिल्या आहेत त्या मोजत असे.

ते जितक्या शेंगा खात असे दुसऱ्या दिवशी युध्दात १०००  गुणा सैन्य मारले जायचे , समजा त्यांनी ५० शेंगा खाल्या तर दुसऱ्या दिवशी युध्दात ५०००० सैनिक मारले जायचे व मी याच निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करत असे आणि त्यामुळेच कधी अन्नाचा एक कण ही वाया जात नसे.

प्रभू श्री कृष्णाचा हा चमत्कार ऐकून उपस्थित असणारे सगळेच त्यांच्यासमोर नतमस्तक झाले, ही कथा महाभारतातील दुर्मिळ कथांपैकी एक आहे, ही कथा कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात असलेल्या कृष्ण मठात नेहमी सांगितली जाते, कर्नाटकच्या या मठाची स्थापना उडुप्पीच्या सम्राटाद्वारा केली गेली आहे.

प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल, म्हणूनच आज उडुपीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हातांनी बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे.

भारतात ही असे एक शहर नाही जिथे एकही उडुपीचे रेस्टॉरंट नाही , भारता सोबतच  परदेशातही अनेक उडुपी रेस्टॉरंट आहेत.

आणि या उडुपी रेस्टॉरंट्सची एक खास गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या याच आशीर्वादामुळे ते आपल्या हॉटेलमध्ये फक्त सात्विक भोजन बनवतात.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भैरूची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “भैरूची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पहाट झाली. भैरू उठला.

बैल सोडले. औत जोडले.

शेतात गेला. शेत नांगरले.

दुपार झाली. औत सोडले.

बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली.

चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे.

झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

पन्नासेक वर्षांपूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. हा भैरूही त्या भैरू सारखाच पहाटे उठतो…

पहाट झाली. भैरू उठला…

नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला – ‘गुड मॉर्निंग … सुप्रभात’चे मेसेजेस पाठवायला. कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला. आज शनिवार, म्हणजे ‘जय हनुमान, जय बजरंगबली’चे मेसेजेस टाकायला हवेत, भैरूच्या मनात आलं. शाळा-कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे ‘गुड मॉर्निंग…सुप्रभात’चे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. ‘आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काय त्याचं’ या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास-दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता.

चहा-नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुपमधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची ‘बाबाजींची प्रवचनं’ तिकडे, तिकडचं ‘रोज सकाळी एक गाणे’ इकडे, अमुक ग्रुप मधलं ‘दिनविशेष’ तमुक ग्रुप मध्ये, तमुक ग्रुपमधल्या ‘हेल्थ टिप्स’ अमुक ग्रुपमध्ये… एक तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. ‘हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरंय’, आंघोळीला जाताजाता भैरुच्या मनात आलं.

आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचातरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंडओळखही नाही, भैरुच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ ‘आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील?’ असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना ‘वा छान’, ‘मस्तच’ अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. ‘दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे, असं अजिबात नाही,’असं भैरूचं मत होतं.

कुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं, या भावनेनं दुपारी दोनच्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा-बिस्किटांचे फोटो असलेले ‘गुड आफ्टरनून’चे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने ‘सोसायटीची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी’ अशी पोस्ट टाकली होती त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या, ‘रिडेव्हलपमेंटची तूर्तास गरज नाही’ या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. ‘सर्व-पोस्ट-समभाव’ आपल्या अंगी आहे, याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये ‘युती’च्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये ‘आघाडी’च्या बाजूनं आलेली. ‘कुणी का येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट्स फॉरवर्ड करायचं,’ भैरुच्या मनात आलं.

‘डॉलरच्या तुलनेत रुपया’ या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन-चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक-दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते. ‘आपल्याला यातलं XX काही समजत नाही,’  हे पक्कं माहीत असल्याने पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधत भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या ‘ऐका मालकंसची गाणी’वर हा ‘मालकंस नाही, कलावती आहे’ अशी टिप्पणी कुणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात ‘नांवात काय आहे?’असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला.

“काय मागवू रे तुझ्यासाठी – पिझ्झा की बर्गर?” या सौ च्या प्रश्नाला, “दोन्ही” असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू ‘जंकफूड – एक शाप’ ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला.

रात्रीचे नऊ वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र-चांदण्यांची चित्र असलेले ‘गुड नाईट – शुभरात्री’चे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळासोबत्यानं पाठवलेलं ‘मालवून टाक दीप….’ गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. ‘मालवून टाक दीप….’ चे पुढचे शब्द ‘चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!’ हे आहेत, हे ध्यानीमनीही नसलेल्या भैरूनं ते ‘गुड नाईट… स्वीट ड्रीम्स’ अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला.

उद्या पहाटे त्याला उठायचं होतं.उद्या रविवार म्हणजे सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते… मग प्रवचनं, गाणी… इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे.

तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो.

——————

लिहिलेलं बायकोला वाचून दाखवल्यावर, “मी ओळखते बरं का या भैरूला,” असं ती आपल्याकडे बघत डोळे मिचकावत मिश्किलपणे का म्हणाली हे न उमगल्यानं बुचकळ्यात पडलेला मी.

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार-विश्व – आद्य पत्रकार देवर्षि नारद ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार-विश्व – आद्य पत्रकार देवर्षि नारद ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

॥ श्री गणेशायनमः ॥

नारद उवाच –

प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।

भक्तावासं: स्मरै:नित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥1॥

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम ।

तृतीयं कृष्णंपिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥2॥

लम्बोदरं पंचमंच षष्ठं विकटमेवच ।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ॥3॥

नवमं भालचन्द्रंच दशमंतु विनायकम ।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥4॥ 

*

इति श्रीमतनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ॥

लहानपणी रोज संध्याकाळी  प्रार्थना, श्लोक आणि पाढे म्हणताना सर्व प्रथम गणपती स्तोत्र म्हणायचो. मग मारुति स्तोत्र, रामरक्षा, इतर प्रार्थना, काही श्लोक, शेवटी पाढे म्हणायचे असे शिस्तीत ठरलेले असेल ते म्हणावेच लागे. हे सर्व म्हटल्याशिवाय जेवण नाही असा आजोबांचा नियम असे. त्याचा अर्था काय, ते कोणी लिहिले आहे किंवा असे कुठलेही प्रश्न त्या वयात पडत नव्हते. फक्त शिस्त पाळायची एव्हढं कळायचं. पण हे सर्व खूप मोठ्ठं झाल्यावर कळायला लागलं. नारद पुराणात लिहिलेलं हे गणपती स्तोत्र नारद मुनींनी लिहिलेलं आहे हे कळलं. नारद म्हणजे आम्हाला फक्त पौराणिक चित्रपट किंवा कथांमधून दिसले आहेत. पण पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेताना चिपळ्या आणि वीणाधारी नारदांचे एक वेगळे रूप समजले. ते म्हणजे,आद्य पत्रकार नारद ऋषि. नारायण नारायण !

नारायण नारायण .. असे विणेच्या झंकाराच्या पार्श्वभूमीवर उद्गार ऐकले की नारद मुनींचा प्रवेश होणार हे लगेच कळायच. जणू काही एंट्रीला may i come in असेच विचारत असतील आणि ज्या लोकांमध्ये एंट्री घेतली ते सर्व लोक साहजिकच सावध होत असणार. आज पत्रकारांना ओळखपत्र/ अॅक्रिडिटेशन दाखवून प्रवेश घ्यावा लागतो. 

देव ऋषि नारद आणि त्यांची परंपरा –

भगवान विष्णुंचे परम भक्त, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र  देवऋषि नारद. नारद मुख्यत: भक्ति मार्ग प्रवर्तक आणि कीर्तन संस्थेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. तरी ते धर्मज्ञ, तत्वज्ञ, राजनीति तज्ञ आणि संगीतज्ञ होते. ते बृहस्पतीचे शिष्य होते.  

आपण पाहिलेल्या पौराणिक चित्रपटात एका हातात वीणा, दुसर्‍या हातात चिपळ्या घेऊन, नारायण नारायण असा उच्चार करणारे, स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक अशा त्रिलोकात मुक्तपणे  संचार करणारे  नारदमुनि यांच्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. यांना सगळं माहिती आहे, सगळीकडे यांचा वावर आहे, देव, दानव आणि मानव यांच्या जगात काय चाललय,  हे कसं काय याचं आश्चर्य वाटायचं. पण त्यांना वरदान मिळालं होतं ते कधीही कुठल्याही लोकांत संचार करू शकत. त्यामुळे ते सतत भ्रमण करत असायचे. तिथल्या सर्व सूचना आणि बित्तम बातम्या भगवान विष्णुपर्यन्त  पोहोचवायच्या. दानवांच्या कारवायांना आळा घालायचा, मानवांना दिशा द्यायची आणि देवांना माहिती द्यायची, सल्ला द्यायचा अशी लोककल्याणाबरोबर वार्ता प्रसाराची कामे नारदमुनी करत असत. शस्त्रांमध्ये त्यांना देवाचे मन असेच म्हटले आहे. म्हणून सगळीकडेच त्यांचं महत्वपूर्ण स्थान आहे. देवतांप्रमाणेच दानवांनी पण नारदांचा नेहमीच आदर केला आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हे महत्व मान्य केल्याचं भागवत पुराणात सांगितलं आहे.    

त्यांच्यात देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय होता असे म्हणतात. या तिन्ही लोकांत समन्वय साधायचा हे ही कार्य ते करत. म्हणून त्यांना आद्य पत्रकार म्हटले जाते. अध्यात्म, राजनीती, धर्म शास्त्र, यज्ञ प्रक्रिया, संगीत अशा अनेक विषयांचे त्यांना ज्ञान होते. त्यांना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांचे ज्ञान होते. देव आणि माणूस यांच्यातला दुवा म्हणजे नारद मुनि होते. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगातही नारदमुनि देव व मानव यांच्यातील संवादाचे माध्यम होते. त्यांनी वार्ता प्रसारित करताना सद्गुणांची कीर्ती सांगणे हे काम हेतुत: केले. मुख्य म्हणजे खडानखडा माहिती नारदांना असायची.

लोकांना न्याय मिळवून देण्याचीच त्यांची भूमिका असयची. पृथ्वी आणि पाताळ लोकातील भक्तांची खरी भक्ति भगवान विष्णु पर्यन्त पोहोचविणे, त्यांना न्याय मिळेल असा प्रयत्न करणे, लोकांवर होणार्‍या अन्यायाची माहिती देवांपर्यंत पोहोचविणे असे काम नारद करत असत. याचं आपल्याला माहिती असणारं उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद,ध्रुव बाळ आणि अंबरीश यांच्या कथा. नारद मुनींनी या सर्वांचं म्हणणं अनेक वेळा नारायणापर्यन्त पोहोचविले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यात मदत केली होती. एव्हढच नाही तर, दु:खी दरिद्री लोकांचे दु:ख निवारण करणे, दुष्ट, अभिमानी, लोभी आणि भ्रष्टाचारी लोकांचा नायनाट करण्याचे उपाय पण ते सांगत.       

हिन्दी पत्रकारितेच्या विश्वात पहिले हिन्दी वृत्तपत्र ‘उदंत मार्तंड’ हे जुगलकिशोर सुकुल यांनी ३० मे १८२६  रोजी साप्ताहिक स्वरुपात सुरू केले. त्यावर पहिल्या पानावर नारदांचा उल्लेख असे.

नारदमुनी ऋग्वेदातील एक सूक्तकार म्हटले जातात. त्यांच्या ठिकाणी देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय झालेला होता म्हणून त्यांना देवर्षी म्हणतात. असं म्हणतात की वायु पुराणात एकूण आठ देवर्षी असल्याचा उल्लेख आहे, त्यापैकी नारद हे अग्रगण्य आहेत. देवर्षी नारद यांच्याबद्दल अनेक पुराण ग्रंथात माहिती आहे.  नारद पुराण हे नारदांनी रचलेले पुराण आहे . अठरा पुराणांमद्धे हे पुराण सर्व श्रेष्ठ मानले गेले आहे.  

देवर्षी नारद समजले की त्यांचं कार्य समजेल आणि त्यांना विश्वातला पहिला पत्रकार आणि पत्रकारीतेतला आदि पुरुष का म्हटलं आहे ते कळेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे पत्रकारिता क्षेत्राला संबोधले जाते, जे स्थान दिलं जातं, तसेच भारतीय देवतांमध्येही ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या नंतर नारद यांचंच स्थान आहे. 

देवर्षी नारद यांची गुण वैशिष्ठ्ये लक्षात घेतली तर आजच्या पत्रकारांचीच ती वैशिष्ठ्ये आहेत हे लक्षात येते म्हणूनच हे गुण कोणते आहेत हे आजच्या पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्‍यांनी समजून घ्यायला हवेत. सर्वत्र संचार करता करता तिथल्या घटनांनी आपलं ध्येय विचलित होऊ न देता पत्रकाराने आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. सतत सत्याचा शोध घेतला पाहिजे,  चौकस दृष्टी, निरीक्षण शक्ति, जिज्ञासा, संवाद कौशल्य, बहुश्रुतता, याबरोबरच  मैत्री आणि वैर बाजूला ठेवून सत्य, न्याय आणि वस्तुनिष्ठता आंगीकारली पाहिजे. पत्रकारिता करताना ती प्रामाणिकपणे केली पाहिजे, निर्भयपणे केली पाहिजे.

त्यासाठी आज वर्तमानाचे भान ठेवणे, समस्या माहित असणे, संबंधित विषयाचे मूलभूत ज्ञान असणे, आपल्या जीवन मूल्यांची ओळख असणे आणि महत्वाचं म्हणजे आपली परंपरा, आपले प्राचीनत्व, आपली संस्कृती काय आहे याचही ज्ञान असणे आवश्यक आहे,  आपल्या मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा माहिती असणेही आवश्यक आहे. असे सर्व विशेष गुण नारद यांच्यामध्ये होते. आजच्या पत्रकारितेत काम करणार्‍या सर्व नव पत्रकारांनी /विद्यार्थ्यानी या नारद जयंती निमित्त ‘नारद- एक पत्रकार’ म्हणून समजून घ्यावेत आणि पत्रकारिता एक व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून न करता एक ध्येय म्हणून करावी, मग नक्कीच माध्यमांचे चित्र पालटेल .

© डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जत्रेतील नाटक…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जत्रेतील नाटक —” ☆ सुश्री शीला पतकी 

माझ्या गावी हन्नूर अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी अक्षतृतीयानंतर गावची जत्रा भरत असे आमच्या या छोट्या गावाचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर त्या शिवाय गावात मुस्लिम वसाहत भरपूर त्यामुळे त्यांचा देव लगीनशा वली तसेच गावात भुताळसिद्धाचे आणि पांडुरंगाचे देऊळ नदीच्या उतारावरून जाण्यापूर्वी चावडीच्या शेजारी दोन पीर…. ही साधारणपणे माथा टेकण्याची देवळे… 1974 सालापासून सिद्धेश्वर आणि लगीनशा वली यांची जत्रा अक्षय तृतीया नंतर येणाऱ्या गुरुवारी भरते ती साधारणपणे तीन दिवस असते गुरुवार शुक्रवार शनिवार जत्रेसाठी बरीच मंडळी एकत्र येतात. नातेवाईक येतात आसपासच्या गावचे लोक येतात ..एकूण वातावरण सणाप्रमाणे असते. गावांमध्ये त्यावेळी असलेल्या तरुण मुलांमध्ये आत्ताचे तडफदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे वडील पंचप्पा कल्याण शेट्टी हे गावाच्या विकासासाठी धडपडत असत त्यांनी जत्रेमध्ये नाटक बसवण्याची कल्पना मांडली ती सर्वांनी उचलून धरली त्या काळात नाटकांमध्ये स्त्रिया काम करत नसत खेडेगावातन तर नाहीच ! मग पुरुष पार्टीतीलच काही लोकांना स्त्री पार्टी बनवले जायचे

तिसऱ्या दिवशी हा नाटकाचा कार्यक्रम असे. हिंदू मुस्लिम सर्वच जत्रेमध्ये आनंदाने सहभागी  होत असत पांडुरंगाच्या सप्त्याला बाशा मुल्ला सरपंच पुढे होऊन सर्व कार्य पार पाडीत तर कित्येक हिंदू घरामधून पिराला नैवेद्य जाई असे हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर गाव… दीड दोन हजार लोकसंख्या.. गावाला सुंदर देखणी स्वच्छ हरणा नदी वाहत असे …गाव सुखात होत! माणसाचे नाते सुखाशी असले की मग ती रसिक होतात आणि कलांकडे वळतात तसं या गावातल्या मंडळींनी नाट्यकलेकडे आपला मोर्चा वळवला .गावातील हौशी कलावंतांनी यात भाग घेतला होता नाटकाचे नाव होते भगवा झेंडा योगायोगाने मी सेवासदन येथे नुकतीच शिक्षिका म्हणून रुजू झाले होते आपल्या गावची मुलगी शिक्षिका झाली याचा अभिमान होता त्यांनी मला अध्यक्ष म्हणून बोलवले आमचे घरच तेथे होते त्यामुळे काही प्रश्नच नव्हता माझे काका श्री रामचंद्र पत्की हे तेथे वास्तव्याला होते मोठा वाडा होता शेती होती त्यामुळे आमचे हन्नूर ला येणे जाणे भरपूर होते मी तात्काळ निमंत्रण स्वीकारले सकाळी गावाला पोहोचले काकू ने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला स्टेज आमच्या घराच्या जवळच होते स्टेजच्या पाठीमागे रंगपट होता तिथेच मेकअप वगैरे कपडे बदलणे अशा सोयी होत्या आमच्या घरातून हे सगळं दिसत होतं साधारणपणे तीन चार वाजताच रंगपटाची पूजा होऊन आत मध्ये स्त्री पार्टी जे आहेत त्या पुरुषांचे केस कमी करणे दाढीकटिंग मिशा काढण्यासाठी न्हावी हजर झाला ..तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण कसे दिसतोय ते वारंवार आरशात पाहत होते… त्यानंतर तोंड रंगवणे हो हो अगदी रंगवणेच असते भुवया कोळशाने कोरून काळ्या  करणे ओठाला लाल करण्यासाठी हिंगूळ लावणे त्याचेच पावडरमध्ये मिश्रण करून गालावर लाली आणणे आता काळ्या रंगाला गोरं करून त्यावर लाली  म्हणजे मेकअप मनचे  कौशल्य होते… त्यानंतर नाटक ऐतिहासिक असल्यामुळे त्या प्रकारची ड्रेपरी परिधान करणे शिवाजी महाराजांची दाढी.. मिशा ..टोप अंगरखा तलवारी मावळे हे सगळे तयार झाले… इथं पर्यंत  सात वाजले सात नंतर स्टेजची पूजा माननीय सरपंच यांच्या हस्ते झाली स्टेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांना एकीकडे भगवा झेंडा तर दुसरीकडे हिरवा झेंडा लावलेला होता खऱ्या अर्थाने सद्भावना होती ती राष्ट्रीय एकात्मतेची …!त्यानंतर बत्त्यांची सोय झाली बत्त्या अडकवण्यात आल्या समोरच्या मैदानावर पाली टाकल्या गेल्या मधल्या वयाची तरणी पोर मेकअपच्या पाली असलेल्या खोलीला भोकं पाडून पाडून आत डोकावत होती स्त्री पार्टी कशा दिसतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती नाटकासाठी संगीत म्हणून एक पाय पेटी शेजारी असलेल्या वागदरी या गावांमधून डोक्यावरून चालत उचलून आणावी लागायची ती तशी आणली कारण एसटीमध्ये आणली तर तिच्या पट्ट्या निखळण्याची शक्यता असते ही पायपीट सुद्धा अनेक तरुण करतात ती पेटी आणि डग्गे आणि तबला झांज यावर सर्व म्युझिक अवलंबून होते…

तयारी जय्यत झाली नाटकाची अनाऊन्समेंट झाली नावे घोषित झाली प्रत्येक नावाला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि नंतर नाटकाचा पडदा उघडला मागे दरबाराचा सीन बागेचा सीन दऱ्याखोऱ्याचा सीन असे पडदे होते ते वरून सोडण्याची व्यवस्था होती नाटकाच्या कथानका प्रमाणे सिन पुढे जात होते स्त्री पार्टीचे आगमन झाले की लोकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या….. छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले की…. जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा असे पिटातल्या नाटकासारखे लोक नाटक एन्जॉय करत होते…. युद्धाचा प्रसंग चालू झाला की मागे पायपेटी आणि तबला डग्गा याच्यावरती सगळे आवाज काढले जायचे घोड्याचे टापाचे आवाज डग्यावर वाजवले जायचे एखादा शिवाजी महाराजांचा सरदार मुस्लिम सरदाराच्या छाताडावर वर पाय रोवून तलवारीने त्याची मान उडवतो अशी एक्शन करी त्या वेळेला झांज वगैरे जोरात वाजायची…. प्रेक्षकांमध्ये टाळ्या शिट्ट्या आणि घोषणा …वाद्याचे आवाज दुपटीने वाढायचे आणि तो सीन तिथे थांबायचा.  प्रेक्षकांमधून त्या प्रसंगाला वन्स मोअर यायचा आणि वेगवेगळ्या नावाने बक्षीस पुकारले जायचे  बक्षीस साधारणपणे एक रुपयापासून पाच रुपये पर्यंत असे हा कार्यक्रम साधारणपणे दर पंधरा मिनिटांनी होत होता बक्षीस देणारा माणूस प्रत्यक्ष स्टेजवर येऊन बक्षीस देत असे मागे पुन्हा वाद्य आणि समोर टाळ्या साधारण नाटक एक तासभर पुढे गेलं की ते थांबत असे आणि स्त्री  पार्टी करणाऱ्या पात्राला त्याच्या सासुरवाडीकडून पूर्ण आहेर व्हायचा म्हणजे त्याच्या ओरिजिनल बायकोला शेजारी बसवायचे, स्टेजवर पाट टाकले जायचे, मग सासूरवाडीची मंडळी नवरा बायकोला आहेर करायचे गंमत म्हणजे स्टेजवर पाटावर बसलेली दोन्ही मंडळी साडी या वेषातच असे. टॉवेल टोपी धोतर सदरा, त्याच्या बायकोला उत्तम लुगडे म्हणजे साडीचोळी असा आहेर व्हायचा काही हौशी अर्ध्या तोळ्याची अंगठी सुद्धा घालत असत जावयाला कारण त्याने नाटकात स्त्री पार्ट केला आहे म्हणून.  अशा पद्धतीने आहेर बक्षीसे आणि वन्स मोअर असे नाटक पहाटपर्यंत चाले माझ्या काकांनी… माझ्या मुलीला उद्या कामाला जायचे तिचे भाषण आटोपून घ्या असे सांगितल्यामुळे मला स्टेजवर बोलवण्यात आले माझे भाषण झाले माझ्या हस्ते काही बक्षीस वाटण्यात आली ती बक्षीसे वाटत असताना मध्येच एक फेटेवाले गृहस्थ उठले आणि त्याने अध्यक्षरू  छलो भाषण माडिदरू अद्रसलवागे ऐद  रुपये बक्षीsssस …..आणि टाळ्यांचा कडकडाट म्हणजे अध्यक्षांनी उत्तम भाषण केल्याबद्दल पाच रुपये बक्षीस मी कपाळावर हात मारून घेतला आज तागायत कुठल्याही अध्यक्षाला  प्रेक्षकाकडून असे पाच रुपयाचे बक्षीस आले नसेल पण मला ते मिळाले आणि गावात ते नाकारता येत नसते तो त्यांचा अपमान होतो त्यामुळे मी मुकाट्याने ते घेतले अशा पद्धतीने नाटक रात्रभर चालायचे शिवाजी महाराज लढाई जिंकायचे तेव्हा अख्खा गाव जल्लोष करायचा त्यावेळेला हिंदू मुसलमान हे त्यांच्या डोक्यात येत नव्हतं आज मात्र हे सार दुर्दैवाने बदलले आहे

…नाटकाच्या मध्ये विश्रांती काळात रंगपटात चहा जायचा तिथे अध्यक्षाला ही चहा घ्यायला बोलवायचे पुरुष पात्र आपल्या झुपकेदार मिशा संभाळत चहा प्यायची तर तलफ आलेली स्त्री पार्टी थोडसं तोंड वळवून मस्त बिडीचा झुरका घेत बसलेले असायचे मला या सगळ्या दृश्याचे आजही हसू येते ….पण खर सांगू खेडेगावातल्या नाटकांनी आपली नाट्यकला जिवंत ठेवली तिचा आनंद उपभोगला आज सर्वत्र भव्य स्टेज भपकेबाज लाइटिंग विविध तंत्रज्ञानाचा उपयोग एसी थिएटर या सगळ्या सोयी मध्ये पाचशे रुपयाचे तिकीट काढून लोक नाटक पाहतात पण ही मजा नाही हा सर्व गावरान बाज माणसाला निखळ आनंद देऊन जात असे नाटक पहाटे संपायचं त्यावेळेला लहान लहान पोरं पालीवर कुठेतरी झोपलेली म्हातारी माणसं आडवी झालेली बाया बापड्या घराकडे परतलेल्या कार्यकर्ते मंडळी स्टेजच्या विझू पाहणाऱ्या बत्त्या मेंटल गेलं का रॉकेल संपलं याचा शोध घेत हिंडायचे मग स्टेज आवरलं की तिथेच मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर मंडळी झोपून जायचे आणि मग या नाटकाचे पडसाद आणि गुणगान आसपासच्या गावागावातून कितीतरी दिवस चालायचे एखाद्या जत्रेतल्या फोटोग्राफरला बोलवून काढलेला फोटो त्यांच्या घराघरातून खांबाला लटकवलेले असायचे आणि त्या घराला वाटायचे की आपल्या घरात जणू नटसम्राट आहे घरातली माणसं फार भक्ती भावाने आणि अभिमानाने त्या फोटोकडे पाहत राहायचे आणि आल्या गेलेल्यांना त्या नाटकाची वर्णन सांगायची…. मंडळी खेड्यातलं असलं भन्नाट नाटक अनुभवायचे दिवस संपले. ज्यांनी ते अनुभवलं ते समृद्ध झाले या नाटकाची …त्याच्या तयारीची हजामत करणाऱ्या पासून सुरू झालेली त्याची तयारी ..ती बक्षिसे ते आहेर ती वाद्य …रंगपटात ओढल्या गेलेल्या  बिड्या.. मिशी सांभाळत प्यालेला चहा ..ऐनवेळी म्यानातून न निघालेल्या त्यांच्या गंजक्या तलवारी सगळं काही अफलातून …..! याची मजा ज्यानी घेतली ते धन्य …!! हे सगळं आठवलं की आज म्हणावसं वाटतं ….असं असतं  नाटक राजा … देखण  सुरेख निरागस आणि सुंदर निखळ मनोरंजन करणार…….!!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णा – आणि तिच्या काठावरची सांगली !! – लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे  ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णा – आणि तिच्या काठावरची सांगली !! – लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे  ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

कृष्णा…कसलंही वलय नसलेली नदी..गंगेइतकं तिला आध्यात्मिक महत्त्व नाही, साधुसंन्याशांना तिची ओढ नाही.यमुनेसारखी रासलीलेची अद्भुत कहाणी तिच्या काठावर नाही,की जगातलं कुठलंही आश्चर्य पाहायला लोक तिच्या काठी येत नाहीत.नर्मदेसारखी कुणी तिची परिक्रमा करीत नाही….या कृष्णेच्या काठावरची सांगलीही तशीच.साधीसुधी…खरं म्हणजे किती मोठी माणसं तिच्या अंगाखांद्यावर खेळली आहेत.पण तिला त्यांच्याबद्दल प्रेम आहे.गर्व नाही.

सांगली..नाट्यपंढरी ! पहिलं मराठी नाटक विष्णूदास भावेंनी सांगलीत सादर केलं.आजही त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक अभिनेत्याच्या /अभिनेत्रीच्या कारकीर्दीत मानाचा क्षण असतो.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल यासारखे नाटककार सांगलीचे.

खाडिलकर हे नाव संगीतासाठीही प्रसिद्ध! महान गायिका इंदिराबाई खाडिलकर, आशा खाडिलकर इथल्या. आज त्यांची नात वर्षा खाडिलकर (भावे) गायकगायिकांची नव्या पिढ्या  घडवतेय आणि त्यांना जुन्या सांगीतिक वारशाशी बांधून ठेवतेय. 

बालगंधर्व मुळात सांगलीच्या नागठाण्याचे. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, श्री.दा. पानवलकर, कवि सुधांशू, श्रीनिवास जोशी यासारखे अनेक साहित्यिक सांगलीने दिले. नाटककार वसंत कानेटकरांचे वडील कवि गिरीश सांगलीत होते. गरवारेंसारखे उद्योजक सांगलीतच जन्मले आणि पार लंडनला गेले. पारतंत्र्याच्या काळात त्यांनी ब्रिटिश नोकर म्हणून ठेवले. आणि चितळेंची दूध उत्पादने सांगलीत भिलवडीलाच होतात. सराफ बाजारातील अत्यंत विश्वासू नाव पु. ना. गाडगीळ सांगलीचे.त्यांच्या पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील दुकानातही सांगलीच्या राजेसाहेबांचा आणि राणीसाहेबांचा फोटो आहे. 

संपूर्ण हिदुस्थानात प्रसिद्ध असलेली तंतूवाद्ये तयार होतात सांगलीच्या मिरजेत.

आजच्या काळातील क्रिकेटियर स्मृती मानधना सांगलीची.

पण खेळांची परंपरा सांगलीत पूर्वीपासून आहे.इथे मुली उत्तम मलखांब खेळतात. माधवनगरसारख्या सांगलीच्या छोट्या गावात मुलींनी कबड्डीमधे परदेशात नाव कमावलं होतं आणि त्यांचा कोच त्या काळीही एक तरूण मुलगा होता. त्याच्याबरोबर मुली अतिशय सुरक्षित होत्या. मुलींचं झाडावर चढणं,मैदानी खेळ खेळणं माधवनगरला नवं नाही.पण ते इतकं साहजिक होतं,की ‘मुलगी असूनसुध्दा ‘असं कधी कुणी म्हणायचंही नाही…सांगलीतल्या बुधगाव या छोट्या खेड्यात एक स्त्री शाहीर होत्या,ज्यांनी महाराष्ट्राबाहेरही आपल्या डफाची थाप वाजवली होती. यांच्यापैकी कुणीही स्त्री स्वातंत्र्याचा खास डंका मात्र वाजवला नाही. स्त्रीत्वाचे सगळे गुणधर्म, नियम मर्यादा पाळून आपापल्या आवडीच्या क्षेत्रात बिनधास्त मुशाफिरी केली त्यांनी..कोणताही आव न आणता.अशा खूप गोष्टी सांगता  येतील. नावं घेता येतील.हळद, द्राक्षं यांच्या उत्पादनात सांगलीच आजही प्रथम क्रमांकावर आहे.

शहराच्या सोयी असलेलं हे छोट्या गावाचं फीलिंग देणारं शहर मला नेहमीच त्याच्या साधेपणानं मोहवतं. हा साधेपणा इथल्या माणसांमधेही मुरलाय. यांना स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आहे..गर्व नाही..किंबहुना..कसलाही आव नाही हेच यांचं वैशिष्ट्य! सांगलीकरांना आपल्या गावाबद्दल प्रेम आहे,पण इतर गावांबद्दलही आदर आहे.

माझ्या मुलाचं लग्न जमवताना एक सांगलीचं स्थळ आलं होतं.काही कारणानं आपला योग नाही हे सांगायला मी मुलीच्या आईला फोन केला आणि म्हटलं,”तुम्ही काळजी करू नका. हा योग नसला,तरी खूप छान जोडीदार मिळेल तिला. तिला खूप शुभेच्छा.”

त्या पटकन म्हणाल्या,”तुम्हीपण सांगलीच्या ना?” “हो.” मी म्हटलं.

त्यावर त्या म्हणाल्या,”सांगलीत आलात कधी तर आमच्याकडे जरूर या.माहेरवाशीण म्हणून या.” ज्या बाईशी आपला संबंध येणार नाहीये,तिला असं निमंत्रण सांगलीतून सहज मिळू शकतं……

…२००५ चा पाऊस! कधी नव्हे ते कृष्णेनं मर्यादा सोडली.एरवी पूर आला,तरी आततायी बाईसारखं थैमान घालणं हा तिचा स्वभाव नाही. तिच्या काठच्या लोकांना ती आईच वाटते.पण ते वर्ष वेगळं होतं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरात पाणी शिरू लागलं. साठवणीतलं सगळंच धान्य ती घेऊन जाणार हे दिसत असूनही तिनं पटकन दोन मुठी तांदूळ,एक खण, नारळ घेऊन कृष्णेची ओटी भरली.आम्हाला सहज साध्या श्रध्देनं नंतर हे सांगताना ती म्हणाली,”अगं,कृष्णामाई एवढी दारात आली,तसंच कसं पाठवायचं तिला?” तिच्या या भावनेत सांगली आहे.

माझ्या आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं.ती तेव्हा महिला मंडळाचा एकपात्री प्रयोग बसवत होती. तिनंच लिहिलेला.दोनतीन जणी दुपारी प्रॅक्टिसला येणार होत्या.मी आईच्या ऑपरेशनसाठी माहेरी होते. आईच्या मैत्रिणींसाठी काही करावं म्हणून मी उठले,तर एकजण म्हणाल्या,”हे बघ,मी लिंबू सरबताचं मिक्श्चर करून आणलंय.तू फक्त पाणी घालून दे.” ” तुम्ही कशाला आणलंत मावशी?” म्हटल्यावर त्या म्हणाल्या,”अगं,आमच्या सगळ्यांसाठीच तू माहेरवाशीण. आईची सेवा कर..पण आम्ही नको का मदत करायला?”या प्रेमात सांगली आहे.

माझी मैत्रिण नीता जोशी आकाशवाणीवर बरीच वर्षं काम करत होती.आताही एका एनजीओ ने चालवलेल्या रेडिओ स्टेशनची डायरेक्टर आहे.अंगात असंख्य कला असणारी ही …एका प्रोग्रामसाठी मुंबईत गेली.”आपलं खास वैशिष्ट्य दिसेल अशी वेषभूषा असूदे ..” हा आदेश होता.

ती जशी नेहमी राहते,तशीच गेली..साडी,लांबसडक एक वेणी,हातात बांगड्या,कुंकू…अर्थातच पहिल्यांदा माॅडर्न पोषाखातल्या लोकांनी लक्ष दिल नाही.तिचं प्रेझेंटेशन झालं आणि तिच्याभोवती गराडा पडला..आम्हाला माहितच नाही तुमचं टेक्निकल नाॅलेजही साॅलिड आहे हो…असं म्हणत.

तिचं म्हणणं,”मी ठरवलं होतं, माझा साधेपणा हेच माझं वैशिष्ट्य! वेगळा मेकओव्हर मी करणार नाही.” तिच्या या साधेपणात सांगली आहे.

मुंबईला तिच्या गतीचा अभिमान आहे,आर्थिक सत्तेचा झगमगाट,बाॅलिवूडचा लखलखाट आहे..

पुण्याला पुणं सोडून भारतातलं सारंच कमी दर्जाचं वाटतं..

विदर्भाला आपल्या वैदर्भीय संस्कृतीचा..खाद्य पदार्थांचाही गर्व आहे.

सांगलीचे वैशिष्ट्य एवढंच,की तिला कुठलीच गोष्ट म्हणजे आपलं वैशिष्ट्य वाटत नाही..तिला सगळ्याच गावांचं कौतुक आहे. तिच्या मते असतातच की माणसांमधे कमीजास्त गुण…आणि दोषसुध्दा. साधेपणा, सहजता हेच तिचं वैशिष्ट्य!

लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

पुणे

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares