मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली काही निवडक, बिघडलेली, वेडी माणसं..!!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातली काही निवडक, बिघडलेली, वेडी माणसं..!!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का….???

पण श्री सुरेश वाडकरांनी तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. 

सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. 

 

ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. 

 

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात. 

 

एक  जेधे नावाच्या तरुण आहे. 

हा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.                                      

 

डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत. 

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की रूळ ओलांडू नका, पुलावरून जा. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर. तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार…? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. 

 

मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.

दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने  ह्या सिंध्याला बोलत केलं होतं. त्याने सांगितलं, 

“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो.” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण साहब, अब वक्त बदल गया…, आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

 

ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात.

 

खरंच हे जग चालवतो कोण..??? 

 

स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री म्हणत; खंडाळा घाटात आडवा आलेला डोंगर फोडून त्यात बोगदा बनवण्याचं वेड काहींना लागलं होतं. म्हणून मुंबईची रेल्वे घाटातून वर चढून सगळीकडे गेली.  ज्यांना वेड लागतं तेच हे जग घडवत आहेत, सुंदर बनवत आहेत.

 

वरवर पाहता ही माणसे वेडी वाटतात. कारण जे चारचौघे करत नाहीत ते हे करत असतात. पण त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे. 

 

एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!

 

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची. 

आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका…!!! आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले आहे. प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल. 

 

एक छोटी प्रतिज्ञा देशाच्या अर्थकारणात बदल घडवेल.

 

अमेरिका, युरोप सुंदर आहेत हे आपण खूप ऐकलं. आता आपला देशही सुंदर घडवू. थोडा वेडेपणा करू. 

 

अजून एक उदाहरण. शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो. 

जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या असे उपाय सुचवतो.

 

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो. 

म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्या शिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो…??? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो. 

 

असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी.

 पती-पत्नी दोघेही सायकिऍट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना  Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. 

 

अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं. 

आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.

 

एक अभंग आहे….;

“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना “

नीट वाचलं की समजतं;  आम्ही “बी घडलो,” तुम्ही “बी घडाना..! “ 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मुबंईचा डबेवाला…” ☆ श्री रत्नाकर दिगंबर येनजी ☆

? विविधा ?

“मुबंईचा डबेवाला…” ☆ श्री रत्नाकर दिगंबर येनजी

काही दिवसांपुरी एका  व्हाट्सअप ग्रुपवर माझ्या एका जीवलग मित्राने एक पोस्ट शेअर केली होती.त्यात TED वर एक व्यक्ती डबेवाले या विषयावर प्रेझेंटेशन करुन त्यावर Motivation speech देत होती. आता तुम्ही म्हणाल हे TED काय प्रकरण आहे? TEDम्हणजे  (Technology, Entertainment, Design) ही एक Conference असते. जगभर वेगवेगळ्या किंवा युनिव्हर्सिटी कँम्पस किंवा आयोजित केलेल्या चर्चा सत्रात मोठ मोठ्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तीना आपण यशस्वी कसे झालात या विषयावर कमीत कमी पंधरा ते अठरा मिनिटे बोलायला देतात. त्यात आपण श्रोत्यांपुढे सुंदर परिणामकारक भाषण करुन त्यांची मने जिंकावी लागतात. ह्या भाषणाचे छायाचित्रण करुन ते TED च्या संकेतस्थळावर टाकतात व तिकडुन युट्युब वर सुध्दा प्रसरण होते.यामुळे आपण बोललले पंधरा ते अठरा मिनिटाचे भाषण जगातील करोडो लोकांकडे.  पोहचते.

मी नेहमी युट्युब वर असे TED Motivation speech बघतो छान असतात. यात मी आपला मराठ मोळा सिध्दार्थ जाधव याचे एकदा भाषण पाहीले. आपले जाधव साहेब मस्तच बोलले .छाती गौरवाने फुलुन आली. अशाच एका TED च्या सत्रात आंतरराष्ट्रीय प्रेरणा व्याख्याते (International Motivational Speaker) डाँक्टर पवन अगरवाल यांनी स्वतः A study of Logistics and Supply Chain Management of Dabbawala in Mumbai’. या विषयात प्रबंध लिहुन डाँक्टर ही पदवी ग्रहण केली असल्याने त्यांनी मुंबईच्या डबेवाला या विषयावर रंगमंचावर स्वतः बनविलेले Power point presentation सादर केले.महत्वाचे म्हणजे त्यांनी  सर्वांसमोर डबेवालाचा वेश परिधान करुन उत्तम ईग्रजी भाषेत प्रेझेंटेशन दिले. त्यांचे ते थोडक्यात सादरीकरण खरोखरच प्रेरणादायी व परिणामकारक (Effective) होते.

त्यांच्या सादरीकरणात त्यांनी जी माहिती दिली ती मी आपणास थोडक्यात सांगतो.

मुंबईत १८९० साली ही डबे कामाच्या ठिकाणी नेऊन पोहचवण्याची पध्दत सुरु झाली.आज मुबंईत त ५००० ( पाच हजार) डबेवाले जवळजवळ २००००० ( दोन लाख ) डबे डिलीव्हरी करतात. म्हणजे प्रत्येक डबेवाला दररोज चाळीस डबे प्रत्येक घरातुन पिकअप करतो व जवळच्या स्टेशनवर ड्राँप करुन पुन्हा संध्याकाळी त्याच संध्याकाळी पुन्हा रिकामी आलेला डबा सकाळी जिकडुन डबा घेतला तिकडे पुन्हा रिटर्न करतो. असे हे बारा महीने करावे लागते. आपण हे वाचताना आपले हिशोबी मन विचार करत असेल की याचे चार्जेस किती. याचे चार्ज फक्त साडे तिनशे ते चारशे रुपये.म्हणजे दिवसाला जास्तीत जास्त फक्त पंधरा ते वीस . पंचवीस घेतले तरी डोक्यावरुन पाणी.मला सांगा जी मंडळी स्वतःच्या कार्यालयाच्या दरवाज्या पर्यंत डबा डिलीव्हरी घेतो तो माणूस किंवा व्यक्ती महीना कमीतकमी लाखभर पगार घेत असेल त्याच्या साठी दिवसा (पिकअप व ड्राँप डिलीव्हरी)पंचवीस काहीच नाही. आता त्यांची तुमच्या भाषेत H.R. system कशी ती समजवतो. दहा डबेवाले एका मुकादम च्या हाताखाली काम करतात. मुकादम हे पद त्याच्या अनुभवाने व चांगले काम केल्याने मिळते. पण पण…थांबा या मुकादमाला ईतर डबेवाल्यापेक्षा जास्त पगार असेल अस समजु नका कारण मुकादमाचा पगार पुर्वी डबे डिलीव्हरी करत असताना मिळत होता तेव्हढाच आणि महत्वाचे म्हणजे कोणी डबेवाला आजारी किंवा पुर्व सुचनेनुसार गैरहजर असेल तर या मुकादमाला त्या डबेवाल्याचे काम करावे लागते. लोकांची अडचण किंवा त्याला डबा न मिळाल्याने उपास घडु नये हे उद्दिष्ठ.

१८९० पासून जेव्हा ही डबेवाल्यांची मुंबई भर यंत्रणा राबवायला सुरवात झाली तेव्हापासून त्यांनी प्रत्येक डब्यावर त्यांना समजेल अशा कोडींग व चिन्हांचा वापर करायला सुरुवात केली त्यामुळे कुठलाही डबा हरवला असा प्रश्नच आला नाही.१८९० साला पासुन या मंडळींनी एकदाही संप केला नाही व यांच्यापैकी एकाच्याही नावावर पोलिस केस किंवा तक्रार नाही.

एखादा कस्टमरने फक्त दहा महीने यांच्याकडुन सेवा घेतली तर फक्त दहा महिन्याचे डिलीव्हरी चार्जेस देतो व दोन महिने सुट्टी घेतल्याने त्या दोन महिन्याचे पैसे देत नाही. आपण आपल्या शाळेतल्या स्कुल बससाठी पुर्ण बारा महीन्याचे पैसे देतो हे लक्षात घ्या.

आपण म्हणाल हे सगळे कसे परवडते. कारण यांचे या मागे असते समर्पण (Dedication). ही मंडळी जे ह्या प्रकारचे कार्य करतात ते अस समजुन काम करतात की कस्टमर माझा परमेश्वर ( विठ्ठल) आहे. त्याला दररोजचे जेवण पोचवण्याचं काम म्हणजे एक प्रकारची विठ्ठल सेवा. ही सगळी मंडळी विठ्ठलभक्त वारकरी असतात .याची दखल ब्रिटिश राजपुत्र प्रिन्स चार्ल्स ने जेव्हा घेतली तेव्हा “मुबंईचा डबेवाला” हा धडा जगातल्या मोठमोठ्या मँनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट मधे शिकविण्यास सुरवात झाली. ब्रिटिश राज घराण्यात जेव्हा कधी लग्न कार्य असते तेव्हा मुबंईचे तीन चार डबेवाले त्या कार्यक्रमात यजमानासाठी आवर्जून मराठ मोळी पैठणीचा आहेर घेऊन हजर असतात.आता महत्वाचा प्रश्न आपल्या डोक्यात मस्त लेझीम खेळत असेल तो म्हणजे यांचे मासिक वेतन किती. एवढे सगळ कौतुक केल्या वर मला सागांयला लाज वाटते. कारण त्यांचे वेतन रुपये पाच हजार फक्त

©  श्री रत्नाकर दिगंबर येनजी

बांगुर नगर, गोरेगाव, मुबंई.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जिलेबी…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जिलेबी…” ☆ सुश्री शीला पतकी 

मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझे ऑफिस दहाला सुरू होत असे. मी क्लार्क आणि सेवक यांचे काम दहा पासून सुरू होत असल्यामुळे आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असे,

ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणे सोयीचे जाईल. कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे. साधारणपणे डबा खाणा-या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचे मी निरीक्षण करत असे. बिस्किट, वेफर्स, चुरमुरे असे देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असे आवर्जून सांगत असे. त्यांचे वाढीचे वय आहे तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे.

या पद्धतीने मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई, आमचा एक घास घ्या ना, असा आग्रह करीत. त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे.

सोलापुरात विशेषतः तेल-चटणी पोळी देण्याची पद्धत आहे. गरीब माणसांचे ते जेवण आहे. त्यामुळे बहुदा बऱ्याच वेळा मी तेल – चटणी पोळीवाला घास घेत असे.

हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता. पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी होत्या. आणि मी एका मुलीचा एक घास घेतला. तेव्हा मुलीने ओळखले ‘बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना, पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही.

मी म्हणाले ‘चल असं कुठे असता कां ?’ती म्हणाली ‘बाई तिला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे. आणि ती मुलगी रडायला लागली.

इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणे आले. मी ऑफिसात गेले एस.एस.सी. बोर्डाचा फोन होता त्यामुळे मी त्या कामात गर्क होते.

मधली सुट्टी झाल्यामुळे मुली वर्गात गेल्या. सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिस बाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला.

मी कामात बिझी होते. मी दरवाज्या वरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली. म्हणाले ‘शिवा काय चाललंय, कोण रडतंय.’

तेव्हा ते म्हणाले. ‘बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे.’

‘ठीक आहे पाठवा.’ मग तीच ती मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली ‘बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही.

मला खरंच वाटायला लागलं. मी म्हणलं ‘काही हरकत नाही. तुला ती जिलबी खायची होती कां ?’ मी अगदी सहज म्हणाले आणि ‘अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा.’

त्यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं.

ती म्हणाली ‘बाई माझी आई एके ठिकाणी घर कामाला जाते. त्यांच्या घरी आज काही कार्य होते. त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेले जे ताट होते ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला दीड वाजता आणून दिला त्यामध्ये जिलबी होती. पण त्याला भात लागलेला होता. त्यामुळे ते खरकट्या सारखं वाटत होतं. मला वाटलं न जाणं कोणाच्या पानातील असेल तर म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही.’

आणि ती माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली. हे ऐकून माझे डोळे भरून आले. इतकेच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले. त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला.

मी खुर्चीवरून उठले. त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले ‘बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय. तू खूप शिक आणि तुझ्या आईला सुखी कर. तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा, व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत. पण मन लावून अभ्यास कर आणि काही तरी बनण्याची जिद्द ठेव.’

नंतर तिची समजत घालून मी तिला पाठवून दिले. मला जाणवले की तिला लक्षात येत होते .. कुणीतरी वाढून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो आहोत. एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं. पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता.

ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून  बसली. त्यानंतर सोलापूर आकाशवाणी वरती ‘गाणी मनातली’ या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडले त्याच्या मागची घटना, प्रसंग हे सांगणे… असा तो कार्यक्रम होता.

त्याचे प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमां मध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला कां आवडली असे प्रसंग सांगितले. त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी  मुठ्ठी में क्या है…’ हे गाणं लावण्याची मी विनंती केली.

त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री साडे अकरापर्यंत मला लोकांचे फोन येत होते- ‘किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे, आम्ही रडलो…’ असं लोक सांगत होते.

कार्यक्रम खूपच छान झाला होता.

त्यामध्ये साहित्यिक संपादक मा अरविंद जोशी सरांचा फोन आला. ते मला म्हणाले ‘तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला.’

आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाची पावती ठरलं. त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असे माझ्या डोक्यात होते. सुमारे चौदा-पंधरा वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली. त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली. शिक्षणाचे महत्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि ‘जिलबी’ नावाचा लघु चित्रपट तयार झाला. त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधा ताई वाड यांनी मुख्याध्यापकाची भूमिका केली. विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या.

निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे ही डोळे भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्यासाठी संमती दिली होती. या लघुपटाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखल झाला. त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिके मिळाली.

त्यातल्या कथेला पारितोषिक मिळालं.  मुख्याध्यापकाची भूमिका करण्याला निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं. विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषिक मिळालं. दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मला पारितोषिक मिळालं. किमान पाच-सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिके प्राप्त झाली. याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाची निवड झाली. मेलबर्न ला या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आले आणि सगळीकडेच या लघुपटला खूप गौरवण्यात आले. वृत्तपत्रांनी याच्यावरती भरभरून लिहिले.

अशा पद्धतीने एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला.

प्रसंग खूप घडत असतात. टिपणारा माणूस हवा. इतके खरे सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढवली यात शंका नाही.

(माणसाने पूढील आयूष्यात कितीही श्रीमंती आली तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतात. परिस्थिती बदलते पण लहानपण सदैव आठवत रहातं.. अगदी जीवनाच्या अंतापर्यंत..) 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-२ ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

(‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.) – इथून पुढे —-

“शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |l शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||३०||”

अध्यात्म सार. – समर्थ रामदास

या उक्तीनुसार स्वतः शक्ती सामर्थ्य कमविणे गरजेचे वाटले म्हणून हा मुलगा आपल्या घरापासून कोसोमैल दूर असलेल्या टाकळीला गेला. टाकळीत पाय ठेवलेल्या दिवसापासून त्याच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. ‘केल्याने होत आहे रे आधी या केलेची पाहिजे, नव्हे ! आपणच केले पाहिजे’ असे ठरवून त्याने स्वतः रोज सुमारे हजार सूर्यनमस्कार, नंतर सद्ग्रंथाचे वाचन, चिंतन, भिक्षेच्या निमित्ताने समाजमनाचे सूक्ष्म अवलोकन, असे विविध उपक्रम चालू केले. 

साधारण बारा वर्षांनी साधनेचा अर्थात जीवीतकार्याच्या पूर्वतयारीचा एक टप्पा पूर्ण केल्यावर हा तरुण देशाटन करण्याकरिता टाकळीतून बाहेर पडला. अंदाजे चोवीस वर्षाचे वय. स्वयंप्रेरित होऊन स्वतःहून निवडलेला ..  एका अर्थाने जगावेगळं संकल्प !!

 “बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||” 

(श्रीसमर्थांचे संभाजी राजांना पत्र) 

हा एकमेव उद्देश मनात ठेऊन संपूर्ण देशभर प्रवास केला. या मुलाने भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून देश काल परिस्थितीचा अभ्यास केला आणि तो या अनुमानापर्यंत पोचला की आपल्याकडे भारतात कसलीच कमतरता नाही. कमतरता एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करुन, नीट योजना करून कार्य सिद्धीस नेणाऱ्या ‘योजकाची’. एका शब्दात सांगायचे तर संघटनेची आणि सक्षम, लोकोत्तर नेतृत्वाची. हिंदू मनुष्य पराक्रमात, सामर्थ्यात कुठेच कमी नव्हता. कमतरता एकाच गोष्टीत होती ती म्हणजे ‘मी जिंकू शकतो’ या वृत्तीची.  आणि सर्वात महत्वाचा अभाव होता ‘राष्ट्रीय’ दृष्टिकोनाचा!! संघटनेच्या माध्यमातून समाज आपल्याला हवे ते सर्व करू शकतो हे सिद्ध करण्याची गरज होती. बारा वर्षांच्या देशाटनात श्रीसमर्थानी अशी हुकमी माणसे हेरून देशाच्या विविध भागात शेकडो मठ स्थापन केले. प्रत्येक मठात महंत नेमून मुख्य हनुमान भक्ती आणि बलोपासना ही कार्य सांगितलीच, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत करण्याचे महत्कार्य या तरुणांकरवी करायला सुरुवात केली. 

“मुख्य हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वा विषई।।” ( दा.११.०५.०४)

त्या काळात दळणवळणाची अल्पस्वल्प साधने असताना देखील या सर्व मठातील संपर्क, सुसंवाद आणि सुसूत्रता  उत्तम होती. याचा उपयोग छत्रपतींना ‘स्वराज्य’ संस्थापनेसाठी झाला हे सर्वज्ञात आहे. अलौकिक जीवनदृष्टीने कार्य करणाऱ्या आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या या तरुणास समाजाने उस्फूर्तपणे ‘समर्थ’ ही उपाधी बहाल केली. रोज हजार सूर्यनमस्कार घालणारा आणि प्रचलित पद्धतीने मठ स्थापन करुन राजाश्रयावर मठ न चालविणारा हा आगळा संत लोकांना आकर्षित करीत होता. तरुण पिढी हनुमान आणि बलोपासनेमुळे धष्टपुष्ट होत होती आणि संकुचित विचार सोडून समाजाचा म्हणजेच समष्टीचा विचार अंगी बाणवत होती.

छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला हे खरेच. पण कोणीही एकटा मनुष्य राज्य तोपर्यंत निर्माण करू शकत नाही, जोपर्यंत तत्कालीन समाज ते मनापासून स्वीकारीत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! ह्या उद्गारांना विशेष मूल्य नक्कीच आहे. पण हे वाक्य त्याकाळातील समाजातील प्रत्येक मनुष्याचे ‘ब्रीदवाक्य’ झाले होते, याचीही आपण दखल घेतली पाहिजे. जेव्हा समाज एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होतो तेंव्हाच शिवाजी महाराजांसारखे असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व घडते. शिवाजी महाराजांचे भौगोलिक साम्राज्य  आजच्या दोन-तीन जिल्ह्याइतके मर्यादित असले तरी भावनिकरित्या ते राज्य इथे राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याचे होते. दिल्लीश्वराने स्वराज्य बुडविण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यात कधीही यश मिळाले नाही. शेवटी त्याला स्वतःला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले आणि स्वतःला इथेच गाडून घ्यावे लागले तरीही स्वराज्य जिंकणे त्यास शक्य झाले नाही. ह्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपतींच्या मागे असलेली समाजाची सात्विक शक्ती आणि विजिगीषू वृत्ती. ही वृत्ती प्रज्वलीत करण्याचे काम ह्या मठातून अखंड चालू राहिले.

त्या काळात युद्ध होतं होतीच, माणसे मरत होती, मारीत होती, जगत होती. फक्त  कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? कशासाठी मारायचे? हे सांगणार कोणी नव्हते. ते सांगण्याचे काम कोणी केले असेल तर त्या समर्थांनी. ह्यामुळेच जिवा महाला, बाजीप्रभू तानाजी, येसाजी मरायला तयार झाले. हे जेव्हा मरायला तयार झाले तेव्हा त्यांची पत्नी विधवा होणारच होती, त्यांच्या मुलांचे पितृछत्र हरपणारच होते. पण त्यांनी आपल्या कुटुंबापुरता संकुचित विचार न करता देशाचा, थोडक्यात कर्तव्याचा विचार केला आणि ही शिकवण समर्थांमुळेच शक्य झाली.

आपण संकल्पित केलेलं कार्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. श्रीसमर्थ रामदास स्वामी या बाबतीत भाग्यवान ठरले. श्रीसमर्थांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की श्रीसमर्थ कर्मयोगी होते. शके १७५२ (इसवीसन 1674)  ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदूना सार्वभौम राजा मिळाला. सुमारे सातशे वर्षांची गुलामी नष्ट झाली. ही फक्त राजकीय गुलामी नव्हती तर सांस्कृतिक गुलामी देखील होती. छत्रपतींनी ही गुलामी झिडकारून टाकली आणि नवी हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली. अनेक बाटलेल्या हिंदूंना त्यांनी नवीन विधिविधान निर्माण करुन शुद्धीकरण करुन स्वधर्मात घेतले. छत्रपतींनी समर्थाना आपले गुरु मानले होते. सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थानी निःस्पृहपणे ते परत देऊन टाकले. त्याकाळात आणि आजही असा संत महात्मा बघायला मिळणे अति दुर्मिळ!  अशा या समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य लिहिले. 

“उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करायला।”

एका सामान्य कुटुंबातील मुलगा मनाशी  संकल्प करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतःच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून, रामावर प्रचंड श्रद्धा ठेवून सामान्य मनुष्यातील सात्विक शक्तीचे जागरण करून हिंदू सिंहासन निर्माण करु शकतो. हे मराठवाड्यातील जांब गावच्या ठोसरांच्या नारायणाने सिध्द करून दाखविले. फक्त त्यासाठी त्याला ‘नारायणा’चे ‘रामदास’ व्हावे लागले. ‘नारायण ठोसर ते समर्थ रामदास’ हा प्रवास विलक्षण आहे, तो मुळातून अभ्यासायला हवा, खास करून तरूणांनी! आजची समाजाची परिस्थिती फार वेगळी आहे असे नाही. ‘संघशक्ती कलींयुगे’ हेच खरे. 

दासनवमी म्हणजे श्रीसमर्थांचा निर्वाणदिन. संत सूक्ष्मातून जास्त कार्य करतात असे म्हटले जाते. धर्मजागृती चे त्यांचे कार्य चालू असेलच, त्याला आपला हातभार कसा लागेल याचा विचार आपण सर्वांनी करावा असे +नम्रपणे सुचवावेसे वाटते. बलोपासना आणि सगुणभक्ती या दोन गोष्टी सर्वांनी कराव्यात असा त्याचा प्रयत्न असे. प्रयत्न, विवेक आणि वैराग्य अशी त्यांची त्रिसूत्री होती. आजच्या पावनदिनी आपण सर्वांनी त्यांच्या चरित्राचे चिंतन करावे, रामनाम स्मरण करावे आणि राष्ट्रीय विचारसरणीने कार्य करणाऱ्या एखाद्या संघटनेत सक्रीय सहभागी व्हावे. *’समर्थ’ होण्याचा प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी आधी ‘दास’ होऊन दाखवावे. आपण प्रयत्न करू.

।।जय जय रघुवीर समर्थ।।

– समाप्त –

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “डिफॉल्ट मोड म्हणजे काय ?” – लेखक : डॉ. यश वेलणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “डिफॉल्ट मोड म्हणजे काय ?” – लेखक : डॉ. यश वेलणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे, असे पाहिले आहे का?

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात.

आपण शांत बसलेले असतानादेखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो, त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे.

कॉम्प्युटर सुरू केला, की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठरावीक भाग असा असतो, जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो.

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते, असे त्यांनीच दाखवून दिले.

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो, त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते.

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो.

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे?

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते.

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते.

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही. शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता, त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल?

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते.

आपल्या मेंदूच्या लॅटरल प्रीफ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता, त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते, त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते.

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्य आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात. तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा ‘डिफॉल्ट मोड’ बदलणे आवश्यक आहे.

त्यासाठीचा एक साधा उपाय हे करून पहा:

शांत बसा. एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा.

ज्यावेळी ही हालचाल समजते, त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो, तो चांगला श्वास, गुड ब्रेथ.

असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल?

अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच – दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत, की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा…

लेखक :डॉ. यश वेलणकर

प्रस्तुती :श्रीमती राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “वन्ही तापला तापला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“वन्ही तापला तापला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

पूरे करं बाबा आता तुझं असं आग ओकत राहणं… नाही रे नाही होतं आम्हाला हा ताप सहन करणं… त्या तुझ्या कडकडीत उन्हाच्या झळीने सावल्या देखिल करपून गेल्या… हिरव्या लता झाडाझुडांच्या फांद्या फांद्या भेगाळल्या.. नदी नाले ओढे बावी तळी विहिरी कोरडी कोरडी ठाक कि रे झाली… पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसली भुमी नि माणसं राहिली तहानलेली… भेगाळलेल्या शेतामध्ये फुले निवडूंगाचा लाल बोंड… खायला चारा नसे पाणी नसे पिण्याला सुकून गेली सारी सारी तोंड… अविचाराने करत आलो निर्सगाचा र्हास तो आम्ही… त्याचीच फळे भोगतोय कि रे जन्मोजन्मी… हालेना झाडाचे ते पान वारा देखील रागावला.. जणू होळीचा तो वणवा वणवा गावातून नाही अजूनही शमला… निळ्या आभाळाच्या छताला भास्कर तो सदा तळपला… साऱ्या सृष्टीचा जीव तो व्याकुळला…

… जरा थांब तू घेशील सबुरीने.. देतो तुला वचन गळाशपथेने.. करीन सांभाळ वसुंधरेचा लाविन एकेक झाड..निश्चिय करतो हिरवाई आणायचा…विचाराला देईन कृतीची जोड.. तुझे रूप तुला मुळचे आणीन पुन्हा तू चिंता सोड… पण पण तू आता आवरते घे रे तापण्याला…अंगी अवसान गळपटले ते शिक्षा भोगण्याला… तू आमची मायबाप मग चुकले माकले लेकरू तुझे त्याला तू क्षमा नाही करणार तो कोण करणार सांग बरे आम्हाला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – ओढ गावाची, ओढ निसर्गाची ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग – ओढ गावाची, ओढ निसर्गाची ☆ श्री विश्वास देशपांडे

(माझ्या रंगसोहळा या पुस्तकातील लेख)

निसर्ग जेवढा आपल्या डोळ्यांनी आपल्याला बाहेर दिसतो, तेवढाच तो मनामनात खोलवर रुजलेला असतो. आपलं बालपण  गेलं, त्या ठिकाणच्या आठवणी या बहुतांशी निसर्गाशी निगडित असतात. कोणाला आपल्या गावातली नदी आठवते, कोणाला आपली शेत, त्या शेतातली झाडं , त्या झाडांशी निगडित असलेल्या अनेक आठवणी असं हे निसर्गचित्र तुमच्या आमच्या मनात पक्कं रुजलेलं असतं . ती  झाडं , ते पशुपक्षी तुमच्या आमच्या मनाच्या आठवणींचा एक कप्पा व्यापून असतात. आपल्याकडे निरनिराळ्या समारंभाचे फोटो काढलेले असतात. त्याचे विविध अल्बम आपण आठवणी म्हणून जपून ठेवतो. पण कधी कधी या फोटोंमधले रंग फिके होऊ लागतात. चित्र धूसर होतात. पण मनामधला निसर्ग मात्र पक्का असतो. त्याचे रंग कधीही फिके होत नाहीत. उलट जसजसे वय वाढत जाते,  तसतसे ते रंग गडद, अधिक गहिरे होत जातात. त्याचा हिरवा रंग मनाला मोहवीत असतो.

तुम्ही कामानिमित्त शहरात राहायला गेलेले असा, लॉकडाऊन मुळे घरात अडकलेले असा, तुमचा फ्लॅट, तुमचं घर छोटं असो की मोठं, तुमच्या मनात बालपणाचा तो निसर्ग ठाण मांडून बसलेला असतो. कोकणातून मुंबईत कामानिमित्त येणारे चाकरमानी, खेड्यापाड्यातून कामानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक झालेली माणसं ही सगळी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जायला मिळावं म्हणून केवढी आसुसलेली असतात. त्यांचं गाव, त्या गावातला निसर्ग त्यांना बोलावत असतो. त्याची ओढ असते. आणि तिथे गेल्यावर काय होतं  ? जणू जादू होते. शहरामध्ये दररोजच्या कामाने त्रासलेला तो जीव, तिथे गेल्यानंतर ताजातवाना होतो. जणू जादूची कांडी फिरते. काय विशेष असते त्या गावात असे ? पण ते विशेष त्यालाच माहिती असते, ज्याने तिथे आपले बालपण घालवलेले असते.   कवी अनिल भारती यांची ‘ खेड्यामधले घर कौलारू ..’ ही रचना पहा. किती साधे आणि सोपे शब्द.. ! पण त्यातला गोडवा किती कमालीचा…! मालती पांडे यांनी गायीलेलं हे गीत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल.

आज अचानक एकाएकी

मानस तेथे लागे विहरू

खेड्यामधले घर कौलारू.

पूर्व दिशेला नदी वाहते

त्यात बालपण वाहत येते

उंबरठ्याशी येऊन मिळते

यौवन लागे उगा बावरू

माहेरची प्रेमळ माती

त्या मातीतून पिकते प्रीती

कणसावरची माणिक मोती

तिथे भिरभिरे स्मृती पाखरू

आयुष्याच्या पाऊलवाटा

किती तुडविल्या येता-जाता

परि आईची आठवण येता

मनी वादळे होती सुरु.

अगदी साधे सोपे शब्द. पण त्या शब्दात ताकद केवढी ! जणू तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जातात ते शब्द. शब्द आपल्याला वाटतात तेवढे साधे नसतात. त्यांना आठवणींचा गंध असतो. पहिल्या पावसाने माती ओली होते. एक अनामिक पण हवाहवासा वाटणारा गंध आपल्यापर्यंत पोहचवते. जसं आपण म्हणतो, फुलाला सुगंध मातीचा, तसाच मातीलाही स्वतःचा एक सुगंध असतो. तो सुगंध आणतात त्या पावसाच्या धारा. जसा मातीला गंध असतो, तसाच शब्दांनाही गंध असतो. आणि तो गंध अनेक आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो.

वरच्या कवितेतलं दुसरं कडवं नदीशी संबंधित आहे. कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या गावात नदी असते, त्याचं बालपण समृद्ध असतं . आणि ते खरंच आहे. नद्यांना केवढं मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ! प्रत्येकाच्या गावातली नदी छोटी असेल किंवा मोठी, पण तिच्याशी त्याच्या अनेक आठवणी निगडित असतात. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नुसती नावं घेतली तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. कुठेतरी लग्नात गुरुजींनी म्हटलेले मंगलाष्टक आठवते. कुठे अलाहाबादचा त्रिवेणी संगम आठवतो. तसंही ज्याच्या त्याच्या गावातली नदी ही त्याच्यासाठी गंगेसारखीच पवित्र असते. जेव्हा लोक नासिकला जातात आणि गोदावरीत स्नान करतात, किंवा तिथे जाऊन येतात, तेव्हा मी गोदावरीवर गेलो होतो असं म्हणत नाहीत. मी गंगेवर गेलो होतो असंच म्हटलं जातं . ( उगवतीचे रंग – विश्वास देशपांडे )

या कवितेचं तिसरं कडवं बघा. गावाकडची ओढ का असते लोकांना ? तर ‘ माहेरची प्रेमळ माती..’ ही माती केवळ अन्नधान्य पिकवीत नाही. त्या मातीतून प्रीती म्हणजेच प्रेमही पिकतं. शेतातल्या कणसांना जे दाणे लागतात, ते माणिक मोत्यांसारखे मौल्यवान आहेत. आणि त्याच्याशी कवीच्या स्मृती निगडित आहेत. स्मृतींचं पाखरू जणू तिथं घिरट्या घालत असतं . आणि शेवटचं कडवं तर अप्रतिमच. आयुष्यात आपण सुख दुःखाच्या, संकटांच्या अनेक पाऊलवाटा तुडवतो. पण त्याचं फार काही वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा आईची आठवण होते, मग ती आपली आई असो वा काळी आई म्हणजे शेती, तिची आठवण आली की मनात वादळे सुरु होतात. मन तिच्या आठवणीने आणि ओढीने बेचैन होते.

असा हा निसर्ग आपल्याला समृद्ध करीत असतो. त्याच्यात आणि आपल्यात एक अतूट नातं असतं . खरं म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग असतो. पण आपलं अलीकडंच जीवनच असं काही झालं आहे, की ते नातं तुटायची वेळ जणू काही येते. आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग वजा केला तर, काहीच शिल्लक राहणार नाही.

मला कधी कधी भीती वाटते ती पुढच्या पिढीची. जी शहरातून राहते आहे. आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाला आणि अनुभवाला पारखी होते आहे. याचा बराचसा दोष आमच्याकडेही जातो. आम्ही लहानपणी जी नदी पाहिली , अनुभवली ती आता आम्ही आमच्या मुलांना, भावी पिढीला अनुभवायला देऊ शकू का ? आम्हाला जसा निसर्गाचा लळा लागला, तसा त्यांना लावता येईल का ? त्यांच्या चार भिंतीच्या पुस्तकी शिक्षणात निसर्ग शिक्षणाला स्थान असेल का ? पुस्तकातल्या माहितीवर जशी आम्ही त्यांची परीक्षा घेतो, तशी त्यांना निसर्गज्ञान, निसर्ग अनुभव देऊन घेता येईल का ? त्यांना जंगलं , प्राणी, पक्षी हे अनुभवायला देता येतील का ?  मोबाईल, टीव्ही, सिनेमे, पुस्तके यांच्यापलीकडेही एक वेगळे जग अस्तित्वात आहे याची जाणीव आम्हाला त्यांना करून देता येईल का ? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पर्यावरण दिवस, वसुंधरा दिन इ साजरे करून आपण आपल्या मनाचे समाधान फक्त करून घेऊ.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

एप्रिल महिन्यातलं कडक ऊन.. पारा चढलेला ..अंगाची लाहीलाही..जोरात  फॅन सुरू केला तरी उकडतच होत.

काही वेळानंतर थोडं थोडं वातावरण बदलायला लागलं. हळूहळू वारा वहायला लागला. अचानकच काळे ढग दिसायला लागले. अंधारून आल्यासारखं झालं .आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला. झाडांच्या फांद्या हलायला लागल्या.  धप्प धप्प आवाज करत दोन नारळ पडले. एक झावळी पण सुसू आवाज करत पडली..

फांद्या पुढे पुढे येत होत्या ..

त्या पावसाला आनंदानी हसत हसत  ” ये ये “म्हणत आहेत असंच मला वाटायला लागलं …

वातावरण बदलूनच गेलं …

आलाच पाऊस वळवाचा… कोसळायलाच लागला ..बराच वेळ  धो धो पाऊस बरसला .

काही वेळातच आला तसा  निघूनही गेला…….

वातावरण शांत झाले .पाणी रस्त्यावरून वहात होते .खिडकीतून मी बघत होते .

बाहेर पडायचा  मोह झालाच ..गेले..  मुलं जमली होती .शेजारच्या बिल्डींग मधल्या आंब्याच्या झाडाच्या खाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या .पोरांना भलतीच  मज्जा वाटत होती .मुलं कैऱ्या गोळा करायला लागली. 

काही कैऱ्या फुटल्या होत्या, काही पाण्यात चिखलात पडल्या होत्या ,रस्त्यावर सोसायटीच्या झाडांमध्ये पडल्या होत्या.

 मुलांना फार गंमत वाटत होती.

” मला मिळाली ” “मला पण सापडली”

” अरे ही एक बघ केवढी मोठी आहे “

पोरं ओरडतच होती. एकाने चार कैऱ्या मला दिल्या .आजूबाजूचे लोकही जमा झाले होते .त्यांनाही त्या मुलांनी कैऱ्या दिल्या .खूप धमाल चालली होती .गार हवा आता फार सुखकारक वाटत होती.

इतक्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये नुकतेच ते लोक  राहायला आले होते .

पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या. त्यांच्याकडे बघत ती उभी होती .डोळे भरून वाहत होते. जवळ जाऊन  विचारलं ..

“काय झालं  ग?”

तिचा चेहरा रडवेला झाला होता. ती म्हणाली …

“सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता .असाच पाऊस काल आमच्या शेतातही पडला  म्हणे.आंब्याचं खूप नुकसान झालं आहे .पीकं तर पार आडवी झाली आहेत.”

आता तर तिचा बांधच फुटला .ती फारच जोरात रडायला लागली ….

मी नि:शब्द झाले ..काय बोलायचं याच्यावर ? सांत्वन तरी कसं करायचं? मला काही समजेना..

ती पुढे म्हणाली

” नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच  हाता तोंडाशी आलेला घास घेऊन जातो”

मी नुसती उभीच..

” नको मला या कैऱ्या “

असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या .आणि शेजारच्या जीन्यानी वर निघून गेली.

इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते …

आता खाली बघितलं मगाशी ती पुढे येणारी फांदी कदाचीत पावसाला

” थांब थांब ” म्हणत असावी का?…

अस आता मला वाटायला लागलं…

प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो. वास्तव  वेगळं असतं  का?

अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही … तेवढाच आमचा संबंध..त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही … हे आज स्पष्टपणे कळलं..

मोठ्या ब्रॅण्डेड दुकानात वस्तूची जी किंमत असेल ती आम्ही देतो. आणि भाजी घेताना मात्र दहा वीस  रुपयांसाठी घासावीस करतो.

आज तिच्यामुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली .

असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा..

खरं सांगू तेव्हापासून पूर्वी इतका वळीव आता आनंदाचा राहिलेला नाही .

असा पाऊस आला की आता आठवतो तो  कष्ट  करणारा शेतकरी  

त्याच शेत ….

तिचा रडवेला चेहरा..

आणि खूप काही….

कधी आम्ही शहाणे होणार कोण जाणे… पण निश्चित विचार करूया आणि थोडं बदलूया…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१ ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’

इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे  माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही,  पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥” 

(संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!

मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध  केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.

घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.

“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।” 

रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात,  हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते. 

जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान….”  ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.

– क्रमशः भाग पहिला

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तुपुरुषास पत्र… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वास्तुपुरुषास पत्र… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

वास्तुपुरुषास,

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

 

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले, “वास्तू प्रसन्न आहे हं तुमची.”आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली.

तुझी शांत करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही.मग उरते फक्त  घर. तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !

अगदी अपराधी वाटलं. मग काय, तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं. म्हणून आज हे परत एकदा नव्याने पत्र!

 

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या. जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस, ते घरकूल खरंच सोडवत नाही.

घरात बसून कंटाळा येतो, म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर 4 दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते.

आजारपणात डॉक्टर म्हणतात-आराम व्हावा म्हणून ऍडमिट करा. पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही, हेच खरं.

 

तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे.

 अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते , दारावरच तोरण हसतमुखाने सामोरं येतं ,

 तर उंबरा म्हणतो, ‘थांब. लिंबलोण उतरू दे.’

 बैठकीत विश्वास मिळतो तर माजघरात आपुलकी. स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !

 तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.

 खरंच वास्तुदेवते, या सगळ्यांमुळे तुझी ओढ लागते.

 

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक.’

दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर.’

भिंती म्हणतात, ‘मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस.’

छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर.’

जमीन म्हणते, ‘कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत.’

तर बाहेरचं  कौलारू छप्पर सांगतं, ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि  आत ऊन, वारा लागणार नाही.’

 

इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी  यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि

निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं, असा आशीर्वाद दे.

 

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.

एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंबपद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही, पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !

 

कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या  खाणाखुणा नाही, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटा मातीचं!

 

पण एक मात्र छान झाले की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते,ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.

खरंच. हा अमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.

 

वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची, ‘शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरुष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.’

मग आज इतकंच म्हणतो की, ‘तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं,मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट  एकत्र वास्तव्यास येऊ देत.’

आणि या माझ्या मागण्याला तू ‘तथास्तु’ असंच म्हण, हा माझा आग्रह आहे .

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares