मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

एप्रिल महिन्यातलं कडक ऊन.. पारा चढलेला ..अंगाची लाहीलाही..जोरात  फॅन सुरू केला तरी उकडतच होत.

काही वेळानंतर थोडं थोडं वातावरण बदलायला लागलं. हळूहळू वारा वहायला लागला. अचानकच काळे ढग दिसायला लागले. अंधारून आल्यासारखं झालं .आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला. झाडांच्या फांद्या हलायला लागल्या.  धप्प धप्प आवाज करत दोन नारळ पडले. एक झावळी पण सुसू आवाज करत पडली..

फांद्या पुढे पुढे येत होत्या ..

त्या पावसाला आनंदानी हसत हसत  ” ये ये “म्हणत आहेत असंच मला वाटायला लागलं …

वातावरण बदलूनच गेलं …

आलाच पाऊस वळवाचा… कोसळायलाच लागला ..बराच वेळ  धो धो पाऊस बरसला .

काही वेळातच आला तसा  निघूनही गेला…….

वातावरण शांत झाले .पाणी रस्त्यावरून वहात होते .खिडकीतून मी बघत होते .

बाहेर पडायचा  मोह झालाच ..गेले..  मुलं जमली होती .शेजारच्या बिल्डींग मधल्या आंब्याच्या झाडाच्या खाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या .पोरांना भलतीच  मज्जा वाटत होती .मुलं कैऱ्या गोळा करायला लागली. 

काही कैऱ्या फुटल्या होत्या, काही पाण्यात चिखलात पडल्या होत्या ,रस्त्यावर सोसायटीच्या झाडांमध्ये पडल्या होत्या.

 मुलांना फार गंमत वाटत होती.

” मला मिळाली ” “मला पण सापडली”

” अरे ही एक बघ केवढी मोठी आहे “

पोरं ओरडतच होती. एकाने चार कैऱ्या मला दिल्या .आजूबाजूचे लोकही जमा झाले होते .त्यांनाही त्या मुलांनी कैऱ्या दिल्या .खूप धमाल चालली होती .गार हवा आता फार सुखकारक वाटत होती.

इतक्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये नुकतेच ते लोक  राहायला आले होते .

पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या. त्यांच्याकडे बघत ती उभी होती .डोळे भरून वाहत होते. जवळ जाऊन  विचारलं ..

“काय झालं  ग?”

तिचा चेहरा रडवेला झाला होता. ती म्हणाली …

“सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता .असाच पाऊस काल आमच्या शेतातही पडला  म्हणे.आंब्याचं खूप नुकसान झालं आहे .पीकं तर पार आडवी झाली आहेत.”

आता तर तिचा बांधच फुटला .ती फारच जोरात रडायला लागली ….

मी नि:शब्द झाले ..काय बोलायचं याच्यावर ? सांत्वन तरी कसं करायचं? मला काही समजेना..

ती पुढे म्हणाली

” नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच  हाता तोंडाशी आलेला घास घेऊन जातो”

मी नुसती उभीच..

” नको मला या कैऱ्या “

असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या .आणि शेजारच्या जीन्यानी वर निघून गेली.

इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते …

आता खाली बघितलं मगाशी ती पुढे येणारी फांदी कदाचीत पावसाला

” थांब थांब ” म्हणत असावी का?…

अस आता मला वाटायला लागलं…

प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो. वास्तव  वेगळं असतं  का?

अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही … तेवढाच आमचा संबंध..त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही … हे आज स्पष्टपणे कळलं..

मोठ्या ब्रॅण्डेड दुकानात वस्तूची जी किंमत असेल ती आम्ही देतो. आणि भाजी घेताना मात्र दहा वीस  रुपयांसाठी घासावीस करतो.

आज तिच्यामुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली .

असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा..

खरं सांगू तेव्हापासून पूर्वी इतका वळीव आता आनंदाचा राहिलेला नाही .

असा पाऊस आला की आता आठवतो तो  कष्ट  करणारा शेतकरी  

त्याच शेत ….

तिचा रडवेला चेहरा..

आणि खूप काही….

कधी आम्ही शहाणे होणार कोण जाणे… पण निश्चित विचार करूया आणि थोडं बदलूया…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१ ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’

इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे  माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही,  पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.

“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥” 

(संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!

मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध  केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.

घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.

“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।” 

रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात,  हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते. 

जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान….”  ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.

– क्रमशः भाग पहिला

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तुपुरुषास पत्र… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वास्तुपुरुषास पत्र… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

वास्तुपुरुषास,

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

 

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले, “वास्तू प्रसन्न आहे हं तुमची.”आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली.

तुझी शांत करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही.मग उरते फक्त  घर. तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !

अगदी अपराधी वाटलं. मग काय, तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं. म्हणून आज हे परत एकदा नव्याने पत्र!

 

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या. जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस, ते घरकूल खरंच सोडवत नाही.

घरात बसून कंटाळा येतो, म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर 4 दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते.

आजारपणात डॉक्टर म्हणतात-आराम व्हावा म्हणून ऍडमिट करा. पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही, हेच खरं.

 

तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे.

 अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते , दारावरच तोरण हसतमुखाने सामोरं येतं ,

 तर उंबरा म्हणतो, ‘थांब. लिंबलोण उतरू दे.’

 बैठकीत विश्वास मिळतो तर माजघरात आपुलकी. स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !

 तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.

 खरंच वास्तुदेवते, या सगळ्यांमुळे तुझी ओढ लागते.

 

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक.’

दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर.’

भिंती म्हणतात, ‘मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस.’

छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर.’

जमीन म्हणते, ‘कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत.’

तर बाहेरचं  कौलारू छप्पर सांगतं, ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि  आत ऊन, वारा लागणार नाही.’

 

इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी  यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि

निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं, असा आशीर्वाद दे.

 

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.

एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंबपद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही, पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !

 

कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या  खाणाखुणा नाही, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटा मातीचं!

 

पण एक मात्र छान झाले की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते,ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.

खरंच. हा अमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.

 

वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची, ‘शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरुष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.’

मग आज इतकंच म्हणतो की, ‘तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं,मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट  एकत्र वास्तव्यास येऊ देत.’

आणि या माझ्या मागण्याला तू ‘तथास्तु’ असंच म्हण, हा माझा आग्रह आहे .

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- निघताना बाबांनी त्यांचे आशिर्वाद म्हणून दिलेला तो छोटासा कागदी फोटो म्हणजे पिवळ्या धमक रंगाचं जरी काठी सोवळं नेसलेलं, हसतमुख, प्रसन्न मुद्रा असलेलं दत्तरूप होतं. आज इतक्यावर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय. आजही त्याचं दर्शन घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडित असणारी माझ्या बाबांची त्या क्षणीची ही आठवणसुद्धा!)

आईबाबांचा निरोप घेऊन मी निघण्यासाठी वळलो. बाहेर पडलो. आई मला निरोप द्यायला दारापर्यंत आली…

“जपून जा. गेल्यावर पोचल्याचं पत्र टाक लगेच. सांभाळ स्वत:ला…” तिचा आवाज भरून आला तशी ती बोलायची थांबली. मी कसंबसं ‘हो’ म्हंटलं.. आणि चालू लागलो. आता क्षणभर जरी रेंगाळलो तरी हे मायेचे पाश तोडून जाणं कठीण जाईल याची मला कल्पना होती.

माझा लहान भाऊ शाळेत गेलेला होता. मोठा भाऊ बँकेत मॅनेजरना सांगून मला बसमधे बसवून द्यायला आला होता.

“कांही अडचण आली, तर माझ्या ब्रँचच्या नंबरवर मला लगेच फोन कर” तो मनापासून म्हणाला. एरवी अतिशय मोजकंच बोलणारा तो. पण त्याचं  प्रेम आणि आधार मला त्याच्या कृतीतून जाणवायचा. आम्हा दोघात सव्वा दोन वर्षांचं अंतर. त्यामुळे माझ्या अजाण वयात माझ्याशी माझ्या कलानं खेळणारा माझा हक्काचा जोडीदार तोच. तो पहिलीत गेला तेव्हा हट्ट करून मीही त्याच्या मागे जाऊन वर्गात बसलो होतो.आई रोज त्याचा अभ्यास घ्यायची, तेव्हा त्याच्याबरोबर मीही अभ्यासाला बसायचो. पहिली आणि दुसरी अशी दोन वर्ष मी त्याच्याजवळ रोज वर्गात जाऊन बसत दोन इयत्ता एकदम करुन त्याच्याबरोबर थेट तिसरीतच प्रवेश घेतला होता. पूर्वी हे सगळे अधिकार मुख्याध्यापकांकडे असल्याने माझी वेगळी परीक्षा घेऊन मला थेट तिसरीत प्रवेश मिळाला होता. पुढे पूर्वीच्या एसएससी म्हणजे ११ वी पर्यंत आम्ही दोघेही एकाच वर्गात एकाच बाकावर बसून शिकलो. त्यामुळे आम्ही दोघे सख्खे भाऊ वर्गमित्रही. परिस्थितीवशात हेच त्याच्यावर खूप मोठा अन्याय करणारं ठरलं होतं. तो माझ्यापेक्षा खूप हुशार असूनही माझे नोकरीचे वय नसल्याने मी पुढे शिकू शकलो आणि तो मात्र आम्हा सर्वांसाठी शिक्षण तिथंच थांबवून मिळेल ती नोकरी करीत भटकंती करत राहिला. त्याची सुरुवातीची अशी कांही वर्षें संघर्ष आणि तडजोडीत गेल्यानंतर एस् एस् सी मधल्या चांगल्या मार्कांमुळे त्याला नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळाला होता. तरीही आम्हा सर्वांच्या जबाबदारीमुळे त्याचा त्यावेळचा सुरुवातीचा सगळा पगार घरखर्चासाठीच संपून जायचा. तरीही त्या वयातल्या स्वतःच्या हौसामौजा बाजूला ठेवून तो हे मनापासून करीत राहिला. मला आठवतंय, पगार झाला की तो स्वतःसाठी अगदी मोजके पैसे ठेवून बाकी सगळे आईकडे घरखर्चासाठी द्यायचा. मी इस्लामपूरला रहायला गेल्यानंतरच्या त्याच्या पगाराच्या दिवशी त्याने मला बाजूला बोलवून घेतले आणि स्वतःसाठी ठेवून घेतलेल्या दहा रुपयातले पाच रुपये माझ्या हातावर ठेवले.

“हे काय? मला कशाला? नको” मी म्हणालो.

“असू देत”

“पण का?.. कशासाठी? मला लागलेच तर मी घेईन ना आईकडून. आणि तसेही मी इथे असताना मला कशाला लागणारायत?”

त्याला काय बोलावं सूचेना. त्यानं मला आधार दिल्यासारखं थोपटलं. म्हणाला,

“नाही लागले, तर नको खर्च करूस. तुझे हक्काचे म्हणून वेगळे ठेव. कधीतरी उपयोगी पडतील.”

खरंतर म्हणूनच माझं मुंबईला जायचं ठरलं तेव्हा माझ्या भाडेखर्चाची जुळणी करायचा विषय निघाला तेव्हा त्यानेच दर महिन्याला मला दिलेले ते पैसे खर्च न करता मी साठवलेले होते, ते त्याला दाखवले.

“हे पुरेसे आहेत अरे.वेगळी तजवीज कशाला?”मी म्हंटलं.तो अविश्वासाने बघत राहिला होता..!

त्याचेच पैसे बरोबर घेऊन मी आज मुंबईला निघालो होतो.

त्याचा हात निरोपासाठी हातात घेतला, तेव्हा हे सगळं आठवलं न्  माझे डोळे भरून आले.

रात्रभरच्या संपूर्ण बस प्रवासात मी टक्क जागा होतो. न कळत्या वयापासूनच्या या अशा सगळ्या आठवणी मनात गर्दी करत होत्या. रात्र सरेल तसा मनातला हा अंधारही दूर होईल असं वाटलं.’सगळं सुरळीत होईल. काळजी करू नको ‘ घर सोडतानाचे बाबांचे हे शब्द आठवले आणि मनातलं मळभ हळूहळू दूर झालं.

मुंबई मी पूर्वी कधी पाहिलेलीही नव्हती. माझं असं ध्यानीमनी नसताना मु़बईला येणं  माझ्या आयुष्यातल्या निर्णायक वळणावर मला घेऊन जाणाराय याची त्याक्षणी मला कल्पना कुठून असायला?पण यानंतर घडणाऱ्या घटनांची पावलं सूत्रबध्दपणे त्याच दिशेने पडत होती हे आज मागे वळून पहाताना मला लख्खपणे जाणवतंय.आणि या जाणिवांमधेच ‘त्या’च्या दत्तरुपातल्या आस्तित्वाच्या दिलासा देणाऱ्या गडद सावल्याही मिसळून गेलेल्या आहेत!

मुंबईतलं सुरुवातीचं माझं वास्तव्य अर्थातच माझ्या मोठ्या बहिणीच्या बि-हाडी दादरलाच होतं.त्यामुळे माझं ‘घरपण’ शाबूत होतं!एकच रुखरुख होती ती म्हणजे माझ्या बालवयापासून इतकी वर्षं विनाविघ्न सुरु असलेल्या दत्तसेवेत मात्र खंड पडणार होता. एरवीही ते तसं सगळं इथं शक्यही नव्हतंच.इथं  गुरुचरित्राची ती पोथी नव्हती.बाबांना मिळालेल्या प्रसाद पादुका नव्हत्या. ही सगळी हरवलेपणाची भावना मनात घर करू लागली. पहिल्या दिवशी  आंघोळ होताच मी तिथल्या देवघरातल्या दत्ताच्या तसबिरीकडे पाहून हात जोडले. अलगद डोळे मिटले. पण मिटल्या डोळ्यांसमोर ती तसबिरीतली दत्तमूर्ती साकार झालीच नाही. अंत:चक्षूंना दिसू लागलं होतं, बाबांनी मला दिलेल्या फोटोतलं पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, लालचुटूक रंगाचं उपकरण घेतलेलं हसतमुख, प्रसन्नमुद्रा असणारं ते दत्तरुप!! त्याच्या नजरेचा स्पर्श होताच मनातली कांहीतरी हरवलेपणाची भावना खालमानेनं निघून गेली!

एक-दोन दिवस असेच गेले. मग एक दिवस रात्री माझी बहीण आणि मेहुणे दोघांनीही मला दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे जाऊन माझं नाव नोंदवून यायला सांगितलं. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस कुठे आहे, तिथे किती नंबरच्या बसने, कोणत्या दिशेला कसे जायचे हे सगळे समजावूनही सांगितलं. मुंबईत कुणीही बरोबर नसताना एकट्यानेच हे सगळे करायचे याचं दडपण होतंच शिवाय मला त्याची काही गरजच वाटत नव्हती. कारण माझी स्टेट बँकेच्या टेस्ट इंटरव्ह्यूमधून नुकतीच निवड  झाली होती. फक्त पोस्टिंग व्हायला काही दिवस वाट पहायला लागणार होती. थोडा उशीर झाला तरी अनिश्चितता नव्हती. शिवाय तोपर्यंत एका खाजगी नोकरीच्या बाबतीत मेव्हण्यांनी स्वतःच बोलणीही पक्की करत आणली होती. असं असताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधे नाव कशाला नोंदवायचं असंच मला वाटत होतं.

“नाही..नको.आता त्याची काय गरज आहे?” मी म्हणालो.

“हे बघ. आता गरज नाहीय असं वाटलं तरी अचानक गरज उद्भवलीच तर? त्यानंतर नाव नोंदवायचं म्हटलं तर वेळ हातातून निघून गेलेली असेल. आत्ता मोकळा आहेस तर ते काम उरकून टाक.त्यात नुकसान तर कांही नाहीये ना? हवं तर मी रजा घेऊन येतो तुझ्याबरोबर.”मेव्हणे मनापासून म्हणाले. ‘ते माझ्या हिताचंच तर सांगतायत. त्यांना विरोध करून दुखवायचं कशाला?’असा विचार करून मी ‘ एकटा जाऊन नाव नोंदवून यायचं कबूल केलं.

प्रत्येकाला भविष्यात घडणाऱ्या विविध घटना, त्यांचा घटनाक्रम, त्यांचं प्रयोजन..हे सगळं पूर्णत: अज्ञातच तर असतं. पण घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग विनाकारण घडत नसतोच. त्याला कांही एक कार्यकारणभाव असतोच. माझ्या बहिण आणि मेव्हण्यांचं मला एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदवायला प्रवृत्त करणंही याला अपवाद नव्हतं. कारण नंतर पुढे घडणाऱ्या सगळ्याच अनपेक्षित घटना त्या त्या वेळी नकारात्मक परिणाम करणाऱ्या असल्या तरी त्यांतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचं ‘त्या’नेच माझ्यासाठी केलेलं हे नियोजन होतं याचा थक्क करणारा प्रत्यय मला लवकरच येणार होता!

ते सगळंच अघटीत वेळोवेळी मला कडेलोटाच्या काठावर नेऊन उभं करणारं,माझी कसोटी पहाणारं ठरणार तर होतंच आणि माझ्या मनातलं ‘त्या’चं स्थान अधिकाधिक दृढ करणारंही!

क्रमश:.. (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त — चहा – अमृततुल्य पेय – भाग-२ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त — चहा – अमृततुल्य पेय – भाग-२ ☆ सुश्री त्रिशला शहा 

(त्यात परत अजून गोळी चहा,डस्ट,चाॅकलेट, ग्रीन टी ,लेमन टी हे ही उपप्रकार आहेतच)…

काही हाँटेल्समध्ये तर चहाला वेगळे नाव देऊन तो प्रसिद्धीस उतरवलाय.पुण्यामध्ये ‘अम्रुततुल्य चहा ‘  प्रसिद्ध आहे तर सांगलीमध्ये  ‘ हरमन चहा ‘म्हणून प्रसिद्ध आहे.याशिवाय ‘ मटक्यातील चहा ‘सुध्दा नावारुपाला येतोय.

चहा कसा प्यायचा यातही खूप गमतीदार प्रकार आहेत.पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी  खेड्यामध्ये,झोपडीत चुलीवर साखरेऐवजी गुळ घालून चहा केला जातो.चहा पिण्यासाठी कपाचा वापर केला जातो.कपभर चहा किंवा चहाचा कप ही संकल्पना यामुळेच रुजली असेल.पण व्यक्ती आणि स्थान परत्वे चहा पिण्याच्या साधनात पण बदल होत गेला.पुर्वी किंवा आजही काही लोक चहा पिण्यासाठी कपबशीचा वापर करतात,पण आता मात्र या कपबशीची जागा ‘ मग ‘ ने घेतली आहे.बशी न देता नुसत्या मगमधून चहा देण्याची फँशन आली आणि ती रुढही झाली.वेगवेगळ्या रंगांचे,डिझाईनचे मग बाजारात उपलब्ध आहेत.त्याही पुढे जाऊन आता थर्माकोलचे युज अँड थ्रो वाले मग लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.विशेषतः समारंभात, टपरीवर अशा कपांचा वापर केला जातो.

उत्साह वाढविणार पेय म्हणून चहाकडे पाहिल  जात असल तरी या चहाच्या अतिरिक्त सेवनाने त्याचे दुष्परिणाम सुध्दा दिसून येतात. चहा पिण्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो.चहा खरतरं दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घेतला जातो.पण काही जण दिवसातून तीन चार वेळा चहा घेतात.शिवाय घरात कुणी पाहुणा आला तर त्यांना कंपनी म्हणून, आँफिसमध्ये काम करताना उत्साह वाटावा म्हणून चहा घेत रहातात.दिवसातून दहा कप चहा पिणारे सुध्दा काही लोक आहेत.इतका चहा पिण्याने भूक मरते,जेवणावर परिणाम होतो हे लक्षातच घेत नाहीत.शरीरात उष्णता वाढते,पित्त वाढते हे बरेचजण विसरतात. आयुर्वेदात तर चहा पिणे वर्ज्य आहे असे म्हणतात. चहा  कधीही नुसता न पिता त्याबरोबर काहीतरी खावे म्हणजे त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही.

चहाबद्धल कितीही चांगल्या वाईट समजूती असल्या तरी ते एक उत्साह वाढविणारे तसेच मैत्री वाढविणारे पेय आहे हे नक्कीच.

 – समाप्त –

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोन्ट मिस युवर पॉवर — ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

डोन्ट मिस युवर पॉवर — ☆ श्री सुनील देशपांडे

आपल्या जीवनात सगळ्यात पॉवरफुल शब्द कुठला असा प्रश्न जर मला विचारला तर मी उत्तर देईन

‘अहोss’ ……. 

या शब्दाचं सामर्थ्य जाणून असलेल्या पिढीचा सध्या अस्त होत आहे. खरं म्हणजे हा शब्द, स्त्रीप्रधान संस्कृतीचा मेरुमणी आहे. 

या शब्दात असं काय आहे ? असं विचारण्यापेक्षा या शब्दात काय नाही असे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल…… 

….. यात प्रेम आहे, यात धाक आहे, यात जरब आहे, यात आजारी माणसाची अगतिकता आहे, मदत याचना आहे,  आज्ञा आहे, यात सर्व काही आहे. ही नुसती एक हाक सुद्धा आहे.   हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याच्यासाठी हा उच्चारलेला असतो, ती व्यक्ती हातातलं सगळं काम सोडून धावत सुटते.

यामधली भावना, हा शब्द उच्चारण्याची पद्धती आणि स्वर यावर अवलंबून असते. या मधला अर्थ उच्चारणाऱ्याला आणि ज्याच्यासाठी उच्चारला आहे त्याला त्या दोघांनाच निश्चित समजतो.

यात परिचय ही आहे. हो, कुणाशीही परिचय करून देताना – ‘हे आमचे अहो’ असा परिचय करून दिल्यानंतर घरातील संपूर्ण परिस्थितीची जाणीव समोरच्याला येते.

हे माझे मिस्टर – हे अगदीच नाटकी वाटतं.  हा माझा नवरा – हे वाक्य तर इतकं रुक्ष वाटतं की,  कडक उन्हाळ्यात  तापलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूच्या वठलेल्या संपूर्ण निष्पर्ण वृक्षा सारखं वाटतं. 

अलीकडच्या मुलींना अर्थात आमच्या पिढीतील सुद्धा नवऱ्याला नावाने हाक मारणाऱ्या मुलींना या शब्दाच्या सामर्थ्याची कधी कल्पनाच आलेली नाही. त्यामुळेच अलीकडच्या मुलींनी घरामध्ये स्वतःचं महत्व कमी करून घेतल्याचे जाणवते. 

माझ्या बायकोने जर मला ‘अरे सुनील जरा इकडे ये’ असे सांगितले असते तर मी तिला उत्तर दिले असते ‘हो थोड्या वेळाने येतो’ . पण ती जेव्हा अहोss  म्हणते त्या वेळेला होss चा शेवटचा हेल  संपायच्या आत मी हजर असतो.  

प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा ‘अहो ss  मला हरणाचं कातडं आणून द्या ना!’ असं म्हटल्या म्हटल्या लगेच धनुष्यबाण घेऊन त्या हरणा मागं धावले असतील, क्षण सुद्धा वाया घालवला नसेल. नाहीतर खरं म्हणजे त्यांनी लक्ष्मणाला सांगायला पाहिजे होतं की ‘जा रे त्या हरणाची शिकार करून ये’ पण नाही, ते अहो ऐकलं आणि सगळं संपलं! 

प्रभू रामचंद्रांसारख्या ईश्वरीय व्यक्तिमत्त्वाला सुद्धा खरं म्हणजे चुकीच्या वेळेला, चुकीचं कृत्य करण्यासाठी भाग पाडणारा तो शब्द किती सामर्थ्यवान असेल त्याची कल्पना करा! 

हा शब्द म्हणजे विवाहित स्त्रीचे घरातलं सामर्थ्य आहे. 

नवीन पिढीतील सर्व तरुणींना प्रेम विवाहित असो किंवा लिव्हइन मधील सुद्धा, माझी एक विनंती आहे.  एकदा अहोss हा शब्द प्रयोग वापरून तर पहा. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला एकदा कल्पना आली तर आपण काय मिस करत होतो याची कल्पना येईल. 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संत जनाबाई”… लेखिका : सुश्री अरुणा ढेरे – संग्राहक : श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “संत जनाबाई”… लेखिका : सुश्री अरुणा ढेरे – संग्राहक : श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

तुळशीचे बनी । जनी उकलिते वेणी

हाती घेउनिया लोणी । डोई चोळी चक्रपाणी

माझे जनीला नाही कोणी । म्हणूनी देव घाली पाणी

जनी सांगे सर्व लोकां । न्हाऊ घाली माझा सखा

 …. यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेला जनाबाईचा हा अभंग ऐकला तेव्हा आतून अगदी हलून गेले. बाई म्हणून जनाबाईचा विचार तोपर्यंत इतका थेट, इतका स्पष्ट आणि इतका तीव्र असा मनात आला नव्हता. इतर संतांचे अभंग, तसे जनीचेही अभंग. ऐकता- वाचताना तिच्या स्त्रीत्वाची अशी झणझणून जाणीव नव्हती झाली.

हा अभंग ऐकताना डोळ्यांसमोर सहज आली ती एक तरुण मुलगी. निळ्यासावळ्या मंजिर्‍यांनी बहरलेल्या, हिरव्यागार पानांनी डवरलेल्या तुळशीच्या बनात उभी असलेली. तिच्या विठ्ठलाची आवडती तुळस. जनी त्या तुळसबनात आपली वेणी उकलून केस मोकळे करते आहे. लांब असतील का तिचे केस? आणि दाटही? की असतील लहानसर, पातळ आणि मऊशार? कुरळे असतील, का असतील सरळच? कोण जाणे ! पण तिचा विठू त्या केसांच्या मुळांना लोणी लावून चोळणार आहे. मग गरम पाण्यानं तिला न्हाऊ घालणार आहे. केवढा आनंद आहे जनीला त्या गोष्टीचा ! तिला तिचं असं कुणीच नाही जगात. पण विठू आहे. तो तिचाच आहे. अगदी तिचा. किती साधेपणानं सांगते आहे जनी, की माझा सखा मला न्हाऊ घालणार आहे.

जनीच्या या साधेपणानं मी हलून गेले. तुळशीचा असावा तसा तिच्या बाई असण्याचा वेगळाच दरवळ या अभंगातून आला. त्यानं मी हलून गेले. आणि त्याहीपेक्षा तिच्या आणि विठूच्या जगावेगळ्या जवळिकीनं हलून गेले.

जनाबाईचं महिपतींनी लिहिलेलं लौकिक चरित्र अगदी साधं आणि थोडकं आहे. ती मराठवाड्यातली- परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची मुलगी. पाच-सात वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. पंढरपूरला नामदेवांच्या घरी तिच्या वडलांनी तिला नेऊन ठेवलं. पुढे तेही वारले. जनी नामदेवांच्या घरीच राहिली, वाढली. बस्स. इतकंच तर तिचं चरित्र !

पण माणसाचं जगणं अशा ढोबळ तपशिलांपुरतं थोडंच असतं? त्या पलीकडेच तर ते बहुतेककरून उरलेलं असतं. जनीची सगळी कविता म्हणजे तिचं आंतरचरित्र आहे. आणि मराठी कवितेच्या प्रारंभकाळात अशी धीट, कणखर, नि:संदिग्ध आणि जगण्यात घुसळून आलेली कविता एका बाईनं लिहिली आहे, हे अद्भुतही फार अभिमानाचं आहे.

जनीच्या पोरकेपणाची, अनाथपणाची जाणीव तिच्या अभंगांच्या मुळाशी सारखी उमळते आहे. अगदी एकटी आहे ती. तिला तिचं माणूस कोणी नाहीच. म्हणून तर तिचं विठूशी असलेलं नातं अनेकपदरी आणि दाट, गहिरं आहे.

‘तुजवीण बा विठ्ठला । कोणी नाही रे मजला’

– असं तिनं विठूला कळवळून सांगितलं आहे.

‘माय मेली, बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला’

– असं स्वत:ला त्याच्यावर निरवलं आहे. आणि त्यानंही तिचा शब्द फुलासारखा झेलला आहे. आई, बाप, सखा, सहचर, मुलगा- तिला हव्या त्या नात्यांनी तो तिला भेटला आहे.

माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण करणारी जी जी नाती आहेत, ती ती सगळी नाती जनीनं विठ्ठलाशी जोडली आहेत.

‘राना गेली शेणीसाठी । वेचू लागे विठो पाठी’

किंवा

‘पाणी रांजणात भरी । सडासारवण करी ।

धुणे धुऊनिया आणी । म्हणे नामयाची जनी ।’

– असे तिचे अभंग पहा. जनी जी जी कामं करते, ती ती सगळी तिच्याबरोबर तिच्यासाठी विठू करतो आहे. तिचा एक सुंदर अभंग आहे.

साळी कांडायासी काढी । चक्रपाणी उखळ झाडी

कांडिता कांडिता । शीण आला पंढरीनाथा

कांडिताना घाम आला । तेणे पीताम्बर भिजला

पायी पैंजण, हाती कडी । कोंडा पाखडोनी काढी

हाती आले असे फोड । जनी म्हणे, मुसळ सोड

देवच साळी कांडतो आहे. घामेजून जातो आहे. हाताला फोड आले आहेत. शेवटी जनीच म्हणते आहे की, ‘पुरे कर आता. मुसळ बाजूला ठेव.’

जनीला पडणारे कष्ट, तिची होणारी दमणूक, तिचे सोलवटून निघणारे हात- जनीच्या आंतरविश्वात त्या विठ्ठलानं तिचं सगळं दु:ख स्वत:वर ओढून घेतलं आहे. तोच दमला आहे. घामानं भिजला आहे. त्याच्या हातांना फोड आले आहेत. कष्टांचं, दु:खाचं, एकटेपणाचं हे रूपांतर विलक्षण थक्क करणारं आहे.

देवाच्या थोरवीची जाणीव जनीला आहे. अगदी स्पष्ट आहे. त्याच्या पीताम्बराचा, हातातल्या सोन्याच्या कड्याचा, पायातल्या पैजणांचा उल्लेख ती करतेच आहे ना ! पण तिच्यासाठी दोघांमध्ये द्वैत नाहीच आहे. गरीब आणि श्रीमंत, किंवा उपेक्षित, वंचित आणि सुपूजित, प्रतिष्ठित, इतकाच नव्हे तर माणूस आणि परमेश्वर हा भेदही त्यांच्या नात्यात सहज नाहीसा झालेला आहे. म्हणून विठूचं तिच्याबरोबर कष्ट करणं, तिच्यासोबत सतत असणं, हे तिच्यासाठी स्वाभाविकच आहे. ती त्याला इतकी बरोबरीच्या नात्यानं वागवते, इतकी सहज त्याला रागावते, त्याला जवळ घेते, त्याला सलगी देते, की अरूपाला रूप देण्याचं, निर्गुणाला सगुण केल्याचं किंवा अलौकिकाला लौकिकात साक्षात् केल्याचं तिनं जे अपूर्व साहस केलं आहे, त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. चमत्काराच्या पातळीवर जनी विठूशी नातं सांगतच नाही; ती जणू वस्तुस्थितीचंच निवेदन करते.

पहा ना, तिच्या एका अभंगात- ती धुणं घेऊन नदीकडे निघाली आहे. उपाशी आहे. विठूवर रागावली आहे. तो मागे धावतो आहे. मला का टाळून चाललीस, म्हणून विचारतो आहे. ती फटकारते आहे त्याला. ‘कशाला मागे आलायस?’ म्हणून झिडकारते आहे. आणि तो बिचारा खाली मान घालून मुकाट तिच्यामागे चालतो आहे. इतर कुठे पाहिलं आहे असं दृश्य? फक्त जनीचाच हा अनुभव आहे.

अर्थात् हे तिला शक्य झालं आहे ते केवळ संतपुरुषांमुळेच. तिच्या बाईपणाचा अडसर तिच्या परमार्थाच्या वाटेतून त्यांनी दूर केला. त्यांनी तिच्यावरचं दडपण दूर केलं. आपण बाई आहोत म्हणून बंदिनी आहोत, क्षुद्र आहोत, असहाय आहोत आणि नीचतम आहोत, ही त्या काळात प्रत्येक बाईच्या मनात आणि जीवनात स्पष्ट जागी असणारी जाणीव संतांमुळे मालवली. संतांनी देवापाशी स्त्री-पुरुष भेद नाही, असं आश्वासन दिलं म्हणून जनीसारखीला आपलं स्त्रीपण स्वाभाविकपणे स्वीकारता आलं, ‘स्त्रीजन्म म्हणवुनी न व्हावे उदास’ अशी एक समजूत मिळाली.

या समजुतीनं जनीचं स्त्रीपण फार मनोज्ञ केलं आहे. तिच्या अभंगांमधून ते सारखं जाणवतं. असं वाटतं की, पुरुष जाणतो, पण ते बुद्धीनं जाणतो. बाई जाणते ती हृदयानं जाणते. जनीची प्रगल्भता आणि तिचं शहाणपण हे काही पुस्तकांतून आलेलं, शिक्षणातून आलेलं शहाणपण नव्हे. ते तिच्या जगण्यातून, तिच्या अनुभवांतून, तिच्या बाईपणातून आलेलं शहाणपण आहे.

ती एक शहाणी, बुद्धिमान, प्रतिभावंत आणि अनुभवी अशी बाई आहे. ती बाई आहे म्हणून विठ्ठलाला लेकुरवाळा झालेला पाहते. ती बाई आहे म्हणून त्याला ‘माझे अचडे बचडे’ म्हणून कौतुकानं कुरवाळते. ती बाई आहे म्हणून ‘विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या’ असं त्याला प्रेमानं रागे भरते. ती बाई आहे म्हणून रात्री शेज सजवून त्याची वाट पाहते. आणि ती बाई आहे म्हणून ‘पुरे पुरे रे विठ्ठला, जनीचा अंतरंग धाला’ असा तृप्तीचा उद्गार काढते.

तिच्या बाईपणाचा सर्वात उत्कृष्ट उद्गार मात्र विठूसाठी नाही. तो ज्ञानदेवांसाठी आहे. कदाचित ज्यांच्यासाठीच्या खर्‍याखुर्‍या कळवळ्यानं ज्ञानदेवांनी मराठी गीताभाष्याचा अट्टहास केला, त्या स्त्री-शूद्रांची ती प्रतिनिधी आहे म्हणून असेल, किंवा कदाचित त्या विलक्षण प्रज्ञावंताचं कोवळं वय तिच्यातल्या प्रौढ, जाणत्या बाईला विसरता येत नसेल, किंवा कदाचित- काय असेल सांगता येत नाही, पण ज्ञानदेवांविषयीची आपली आंतर-ओल व्यक्त करताना जनीनं लिहिलं आहे-

‘मरोनिया जावे । बा माझ्या पोटी यावे’

पुढच्या जन्मी माझ्या पोटी ये ज्ञानदेवा ! अविवाहित, एकट्या जनीचे हे विलक्षण उद्गार तिच्या बाईपणाच्या आंतरसालीमधला जो कोवळा गाभा प्रकट करतात, त्या गाभ्यातला तुळस मंजिर्‍यांसारखा निळासावळा अंधार मी इतर कुठे कधी पाहिलेलाच नाही.

(संपादित)

लेखिका : अरुणा ढेरे

संग्राहक : अनिल कुमकर

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नवरात्र नरसिंहाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ “नवरात्र नरसिंहाचे” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

नरसिंहाचे नवरात्र जवळ आलं की तयारी सुरू होते. घर स्वच्छ केले जाते. पूजेची उपकरणे घासली जातात. पूजेचे सामान बाजारातून आणले जाते .अगदी देवही उजळले जातात…

खरं सांगायचं तर नेहमी सगळी स्तोत्र , म्हटली जात नाहीत. नवरात्र जवळ आलं की आधी पुस्तकं बाहेर निघतात .

नृसिंह कवच, स्तवन, प्रार्थना, भक्तीभावाने  म्हटले जाते .प्रल्हादाची आरती म्हणायची.

विष्णुसहस्रनाम म्हटले जाते. द्वादशनाम स्तोत्र, शंकराचार्यांचं संकटनाशन  स्तोत्र म्हणताना वृत्ती लीन होते .

रोज घरी  देवाची नेहमी एकच आरती सवयीने  म्हटली जाते. बाकीच्या आरत्यांची नवरात्रीच्या आधी आठवण येते..त्या म्हणून घ्यायच्या…नरसिंह पुष्पांजली म्हणायची..

या सगळ्यांची आधी जरा उजळणी करून घ्यायची असते. 

 

आता तयारी कशाची करायची  समजले आहे ……

ती करून घेतली की मग नंतर म्हणताना  आनंदाने सहज हे सगळे  म्हटले जाते.

 

आमच्या नरसिंहाचे नवरात्र सुरु होते.

साग्रसंगीत पूजा ,आरती होते.

खरंतर देव देवघरात  रोजच असतात…

पण नवरात्र सुरू झालं की एकदम वेगळं वातावरण होतं.

मंद दिवा समोर तेवत राहतो..

हार फुलं घालून केलेली पूजा बघत रहावीशी वाटते …येता-जाता त्याच्याकडे बघूनही समाधान वाटतं….

आजची आरती खरचं आतून आर्ततेनी  म्हटली जाते .

नमस्कार पंचक वाचताना….

 

दयासागर दीननाथा उदारा

मला ज्ञान देऊन  अज्ञान वारा 

कृपेचा तुझ्या नित्य मेवा मिळावा.

नमस्कार साष्टांग लक्ष्मी नरसिंहा

 

अशी प्रार्थना करायची .

आता त्याची कृपा हाच मेवा आहे हे पूर्णपणे समजले आहे .

भक्ती करत राहू ..

देवाला आळवत राहू..

मनातली श्रद्धा जागृत ठेऊ…

 

सांभाळायला तो  आहेच ही खात्री आहे .

संकटकाळी तोच धावून येणार आहे.

फक्त त्याची सेवा आपल्या हातून प्रामाणिकपणे घडू दे.

हीच त्यांच्या चरणाजवळ अनन्यतेनी प्रार्थना.

नरहरी राया तुमच्या चरणाशी आमच्या सर्वांचा साष्टांग दंडवत.

 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपली उपासना फळ का देत नाही?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आपली उपासना फळ का देत नाही?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

मुळात आपण ज्या नगण्य प्रमाणात उपासना करतो, बढाया मारतो व देवाकडून अखंड अपेक्षा ठेवतो, ते खरे पाहता हास्यास्पद आहे, याची जाणीव या लेखात होते.

माधवाचार्य हे थोर गायत्री उपासक. वृंदावनात त्यांनी सलग तेरा वर्षे गायत्रीचे अनुष्ठान मांडलं. पण तेरा वर्षांत अब्जावधीचा जप होऊनही ना त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसली ना भौतिक लाभ. हतोत्साही होऊन ते काशीस आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटकू लागले.

तीन चार महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला. परिचय वाढला, तसं माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली.

“आलं लक्षात! गायत्रीऐवजी तुम्ही कालभैरवाची उपासना एक वर्ष केलीत, तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल.”

अवधुतांचे बोलणे मनावर घेऊन माधवाचार्यांनी साधनेला सुरुवात केली. कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर साधना केली. कधी सुरू केली, हेही विसरलेले माधवाचार्य एक दिवशी उपासनेला बसले असताना त्यांना

“मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे?” असं ऐकू आलं. भास म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपासना चालू ठेवली.

“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”

पुन्हा भास समजून माधवाचार्यांनी उपासना सुरू ठेवली.

“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”

आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले,

“आपण कोण आहात? जे कोणी आहात, ते पुढे येऊन बोलाल? माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे.”

“ज्याची उपासना तू करत आहेस,तोच काळभैरव मी मनुष्यरुपात आलोय. वरदान माग.”

“मग समोर का नाही येत?”

“माधवा! तेरा वर्षे जो तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास, त्याचं तीव्र तेजोवलय तुझ्याभोवती आहे. माझ्या मनुष्यरूपाला ते सहन होणार नाही, म्हणून मी तूला सामोरा येऊ शकत नाही.”

“जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल, तर आपण माझ्या काहीच कामाचे नाहीत. आपण जाऊ शकता.”

“मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही. मला जाताच येणार नाही.”

“तर मग, गेली तेरा वर्षांचं माझं गायत्री अनुष्ठान का फळले नाही? याचं उत्तर द्या.”

“माधवा! ते निष्फळ झालं नाही. ते अनुष्ठान तुझी जन्मोजन्मीची पापे  नष्ट करत होते. तुला अधिकाधिक निर्दोष करत होते.”

“मग आता मी काय करू?”

“परत वृंदावनात जा, अनुष्ठान सुरू कर. तुला अजून एक वर्ष करायचंय. हे एक वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल.”

“तुम्ही किंवा गायत्री कुठे असता?”

“आम्ही इथेच असतो. पण वेगळ्या मितीत. हे मंत्र, जप आणि कर्मकांडे तुम्हाला आमच्या मितीत बघण्याची सिद्धी देतात. ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता.”

माधवाचार्य वृंदावनात परतले. शांत, स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले. एक वर्ष पूर्ण झालं. पहाटे उठून अनुष्ठानाला बसणार, तोच,

“मी आलेय माधवा! वरदान माग.”

“मातेssss”

टाहो फोडून माधवाचार्य मनसोक्त रडले.

“माते! पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हटला तेव्हा खूप लालसा होती. आता मात्र काहीच नको गं. तू पावलीस तेच खूप.”

“माधवा! मागितलं तर पाहिजेच.”

“माते! हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असशील, असं वरदान दे.”

“तथास्तु!”

पुढे तीन वर्षांत माधवाचार्यांनी ‘माधवनियम’ नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे.

लक्षात घ्या. जो काही मंत्र, जप, कर्मकांडं तुम्ही श्रद्धेने करता, त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो. पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढे घालून बसलेली असतात. देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते. जसजसे तुम्ही उपासना वाढवता, तसतसे वेढे कमी होतात, शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की ‘तेज’ चढलं. ते तेज म्हणजे खरंतर पूर्वकर्माच्या वेढ्यात झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं.

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सुश्री स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त — चहा – अमृततुल्य पेय – भाग-१ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ २१मे… आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त –☕ चहा ☕- अमृततुल्य पेय – भाग-१ ☆ सुश्री त्रिशला शहा 

“काय बाई तरी, त्या मालतीबाईंच्या घरी गेले, तर साधा चहासुध्दा विचारला नाही “, ” चहाला या बरं का घरी, ” ” पावणं चला जरा च्या घेऊ”, ” झालं का चहापाणी?”, मालक, जरा च्या-पान्याच बघा की ”  मंडळी या सगळ्या बोलण्यातून एकच शब्द वारंवार येतोय आणि तो म्हणजे  ‘ चहा’. या सगळ्यामध्ये महत्वाचे जाणवते ते म्हणजे आपुलकीची जाणीव. एकमेकांच्या मैत्रीतला दुवाच जणू या चहाने जपलाय. या चहामुळे अनेक नाती जोडली जातात, शिवाय अनेक कार्यक्रम, मिटींग यांची सांगता चहापानाने होते.

भारत आणि आता काही प्रमाणात परदेशात सुध्दा ‘चहा’ एक अनमोल पेयच बनून राहिले आहे. कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वेळी चहा प्यायला चालतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आजारी व्यक्ती, स्त्री-पुरुष, देशविदेशातील व्यक्ती यातील कुणालाही चहा पिणं वर्ज्य नाही. झोपून उठल्यावर, कामाचा शीण जावा म्हणून, मित्रांनी आग्रह केला म्हणून, अभ्यास करताना, ड्रायव्हिंग करतान झोप येऊ नये म्हणून, खूप थंडी आहे म्हणून, डोक दुखतयं म्हणून, टाईमपास, पाहुणचार म्हणून यातील कोणतेही कारण चहा पिण्यास पुरेसे आहे.

पूर्वी  चहा पावडरची एक जाहीरात रेडिओ वर लागायची ” अवं सुवासिनीनं कुकवाला आन् मर्दानं चहाला नगं म्हणू नये”. म्हणजे इथेसुध्दा चहाला एक मानाचं पेय म्हणून प्रसिध्दी, दर्जा मिळवून दिला गेलाय हे लक्षात येत. तस अगदी साध वाटणारं चहा नावाच हे पेय म्हणजे पाणी, दूध, साखर आणि चहापावडर भांड्यात  एकत्र करुन  गँसवर उकळलेल एक  पेय आणि ते गरम पिण्याचीच मजा. यामध्ये मग काहीजण आलं, वेलची, गवती चहा, चाँकलेट पावडर, चहाचा मसाला असे आपल्या आवडीनुसार चहात घालतात, तर काहीजण कच्चे दूध घालतात, काहीजण पाणी न घालता नुसते दूध वापरतात. दुधाऐवजी लिंबू टाकून काहीजण पितात. अशा कितीतरी प्रकारे चहा प्याला जातो. काही हाँटेल्स किंवा टपऱ्या, गाडे या निव्वळ चहासाठी प्रसिद्ध आहेत. तिथे तर चहाचे अजून वेगळे प्रकार पहायला मिळतात. विशेषतः टक्कर चहा, कटिंग चहा, स्पेशल चहा, साधा चहा, गुळाचा चहा इत्यादी.

प्रत्येकाच्या चहा पिण्याच्या पध्दती पण वेगवेगळ्या. कुणाला जास्त साखरेचा गोड चहा लागतो तर कुणाला चहापावडर जास्त टाकलेला, कुणाला एकदम फिक्का तर कुणाला बिन दुधाचा, कुणाला फक्त दुधाचा तर कुणाला मसाल्याचा. प्रत्येकाची चहा पिण्याची पध्दत वेगळी काहींना एकदम गरम चहा लागतो, काहींना थोडा थंड आवडतो, काहींना चहात दुधाची साय घातलेली आवडते. अर्थात चहा पिण्याच्या कितीही वेगळ्या पध्दती असल्या तरी चहा पिण्याची एक तल्लफ असते आणि तो त्याचवेळी प्याला तर त्याची लज्जतही वाढते हे खरचं.

चहा बनविण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या चहा पावडरमध्येसुध्दा खूप प्रकार आहेत. त्यामध्ये सध्या प्रसिद्ध असलेले म्हणजे जी. एस् चहा, रेड लेबल, ब्रुकबाँड, सोसायटी, ताजमहल, गिरनार, वाघ बकरी, सरस्वती, अग्नी, लाँयन, मगदूम चहा, फँमिली मिक्श्चर चहा असे कितीतरी प्रकार उपलब्ध आहेत. त्यात परत अजून गोळी चहा, डस्ट, चाँकलेट, ग्रीनटी, लेमनटी हेही उप प्रकार आहेतच.

क्रमशः…

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares