मराठी साहित्य – विविधा ☆ “खंडाळ…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ “खंडाळ” ☆ प्रा. भरत खैरकर 

घराच्या पडलेल्या भिंती बुरुजाची आठवण करून देणा-या.. त्यावर वाढलेलं.. वाळून गेलेलं गवत.. हिरवळ चिकटवल्यासारखा भिंतीचा हिरवा रंग ..अधून मधून पडलेली ढेखळं.. त्यात न पोहोचणारी सूर्याची किरण.. आणि गालावरच्या खडीसारखं  अंधार सावल्यांचा त्यातलं वास्तव्य ..ही सारी  खंडाळ्याची सौंदर्य स्थाने!

ह्या खंडाळ्याभोवती अनेक कथा आहेत .मातीच्या ढिगार्‍याखाली धनाचा हंडा आहे आणि त्याचा प्रकाश रात्री काही क्षणापुरताच पडतो. ज्याच्या नशिबात तो प्रकाश असेल तो त्याला दिसतो. मात्र हंडा दिसत नाही वगैरे. हा प्रकाश त्या धनावर लक्ष ठेवणाऱ्या शेषनागाच्या मस्तकावरचा मनी  चमकला की पडतो. रात्री बेरात्री हा नाग बाहेर पडतो.. मोहल्लातल्या तिसऱ्या पिढीने त्याला पहिल्याच सांगतात. देशमुखाचा वाडा असतांना जशी या ठिकाणी रौनक होती, तशी आता राहिली नाय !असे म्हातारे सांगतात. 

देशमुख बुढीची जमा असली तरीपण बुढाचं  कारभारी होता.. चांगला ५० जणांचा कुटुंब कबिला असलेला तो वाडा होता म्हणे.. पण आज एक म्हणून शिल्लक नाही.. कशी राहणार पडलेल्या घरात आणि देशमुखकी थाट आता थोडीच राहिला  शिल्लक ?देशमुख नागपूरला गेला मात्र त्यानं जागा विकली नाही. ती खंडाळ्याच्या रूपात गावाच्या मधोमध आजही तशीच आहे.

रात्रीच्या वेळेला खंडाळ्याच्या बुरुजावरल्या  बाभळीवर घुबडांचे घुत्कार ऐकू  येऊ लागले की रडणाऱ्या मला आई म्हणायची ‘भूत आलं रे बाळू बाभळीवर.. रडणाऱ्या पोरास्नी नेते बरं आणि उलटं टांगते रात्रभर बाभळीवर.. झोप बघू आता.’ आईच्या ह्या फुसक्या धमकीचा माझ्यावर जबरदस्त परिणाम व्हायचा. मी श्वास घेताना सुद्धा तो त्या बाभळीवरल्या भुताला ऐकू जाईल म्हणून दाबून ठेवायचो आणि मग गुदमरायला लागलं की आईच्या कुशीत तो श्वास दडवायचो..खंडाळ्याची काळीबाभूळ साऱ्या मोहल्यातील पोरांना चूप ठेवण्यासाठी वापरलेला हुकमी एक्का होता. लहानपणी लपाछपी खेळण्यासाठी खंडाळं  आम्हांला जणू पूर्वजांकडून मिळालेलं वरदान ठरलं होतं. खंडाळ्यात लपलं की खंबा वाजवायला जाणाऱ्या गड्याला तो परतेस्तोवर कुठे गेले? याचा पत्ताच लागायचा नाही आणि तो चुकून त्या खंडाळ्यात घुसलाच तर पोरं त्याला विविध आवाज काढून आपापल्याकडे त्याचं लक्ष वेधयाचे आणि गोंधळलेल्या त्याला अशा मध्ये” रेश”  बसायची. विचारा पुन्हा डाव द्यायला म्हणून खंब्याकडे जायचा .. पुन्हा तेच त्याच्यावर ‘ रेश’ यायची तो चिडायचा आणि मग खंडाळ्यात लपायचं नाही बा.. नाहीतर मी खेळत नाही.. म्हणून पूर्णविरामापर्यंत पोहोचायचा ..पण पोरं कुठे सोडतात ‘डाव ..डाव.. पचव्या ..सुपाऱ्या गिटक्या ..’ म्हणून त्याची मिरवणूक काढायचे ..त्याला भंडावून भंडावून सोडायचे.. मग खूप चिडलेला तो ‘साले ,हुटींनचेहो, लपा बरं आता.. घ्या बर आता.. म्हणत पुन्हा धावतच खांब्याकडे पळायचा.

मोठ्यांना खंडाळ्याबद्दल काय वाटतं कुणास ठाऊक? मात्र आमचं ते खंडाळ जीव की प्राण होतं.. त्याच्यावर आम्ही काय काय नाही म्हणून खेळलो.. लपाछपी, किल्ला किल्ला, वाडा वाडा, चोर पोलीस, भाजीपाला, टिप्पर गोटी..बाजार बाजार, बाहुला बाहुली सुद्धा ! पडलं धडलं तरी येथील माती आम्हांला जास्त मार लागू देत नाही.. पडलेल्या जागी” थू थू” करून थुंकायचं आणि जोराने उजवी लाथ आपटून पुन्हा स्वतःलाच लगावून घ्यायचं .. अन् पडलेल्या जागेचा कसा बदला घेतला म्हणून खुश व्हायचं.. बस एवढं केलं ना तर मार म्हणून मुद्दाम लागतच नाही.

रात्री अंगावर घुबड बसणाऱ्या काळ्या बाभळीची मात्र दिवसाच्या उजेडात मुळीच भीती वाटत नसे.. तिची खंडाळ्यात पडलेली  मोरपंखी अंधार सावली आम्हां मुलांना मायेचा छत वाटे.. उन्हात खेळू नका रे सांगणाऱ्या प्रौढ आवाजांना काळी बाभूळ तोंड बंद करायला ठेवायला सांगे. बाभूळ एवढी विशाल की खंडाळ्याचा अर्धा अधिक भाग तिने व्यापलेला आहे. आपल्याला प्रश्न पडतो बाभळीसारखं झाड वाड्याच्या मधोमध देशमुखांना कां ठेवलं असावं? तेव्हा त्याला काही उत्तर मिळत नाही. देशमुखचा वारसा म्हणून काळी बाभूळ मानायची तेव्हाच तर तिच्यावरच्या घुबडाचा आम्हां मुलांना वचक राहायचा आणि ही बाभूळ अशी एक अनामिक दबाव आमच्यावर ठेवायची ..त्यामुळे कसं कां होईना काही प्रमाणात त्या जमिनीचे रक्षण मात्र व्हायचं.. हे खरं आहे!

अमावस्येच्या रात्री मात्र मोठ्यांसह कुणीही खंडाळ्याकडे भटकायचं नाही. पौराणिक कथेतील खंडाळ्यासारखं तेव्हा हे खंडाळ कुणीतरी काहीतरी गुपित गुंडाळून गावाच्या अगदीमध्ये  दडवून  ठेवलंय असं वाटायचं ..अमावस्याला खरोखरच देशमुखचा आत्मा येथे येऊन दर महिन्याला आपली जागा पाहून जातो ..अंधारात गडप झालेल्या त्या काळ्या बाभळीवर तो रात्रभर बसून सारं सारं पाहत असतो.. तोच पोरांनी उकरलेली आणि गाववाल्यांनी खणून नेलेली माती रात्रभर सावरीत असतो.. देशमुख  ह्या जमिनीवर लय जीव आहे ..तो मेला तरीबी त्याचा आत्मा येथे भटकत राहतो म्हणून तिकडे कोणी जायचं नाही हा ठरलेला शिरस्ता..!

खंडाळ्याला आता कुणी ओळखत नाही तेथे असलेली भितकांड भुरभुर पडणाऱ्या मातीसकट कधीचीच भुईसपाट झाली आहे.. काळी बाभूळ तिचा तर पत्ताच नाही .. कोणीतरी रातूनच अख्खी बाभूळ कापून नेल्याचं सांगतात लोक ..मुलांचे घोळके अंगाखांद्यावर खेळवत एका सुखी कुटुंबाची किल्ली असलेलं खंडाळ.. आता जमीन दोस्त झालेलं आहे . बिन मालकाची जागा बिन नवऱ्याची बायको ह्या दोन्ही जगाला स्वस्तच! तसंच ह्या खंडाळ्यावर अतिक्रमण वाढत गेल आहे. नगरपालिकेने रितसर  हे खंडाळ ताब्यात घेतलं तर म्हणतात! मात्र त्यावर पालिकेचा नियोजित बगीचा अजून उगवायचा आहे ..उगवत आहे फक्त बेशरमाच्या झाडासारखी अतिक्रमणवाल्यांची गर्दी आणि मिळेल तो कापतोय त्या काळ्या बाभळीचा शिल्लक राहिलेला भल्ला मोठा काळा बुंधा ..मात्र बुंधा कापणाऱ्यांनी मुळे सलामत असलेली ती बाभूळ  कधीही बहरून येऊ शकते तिच्या काळ्याभोर.. मोरपंखी अंधार सावल्यासह.. देशमुखांच्या जमेसह आणि बाभळीवरल्या भयकारी घुबडासह याची जाणीव ठेवावी.. एवढच महत्त्वाचं वाटतं आणि सांगावसं वाटतं…

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमचा स्नेहमेळावा… भाग – २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ आमचा स्नेहमेळावा… भाग – २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(दुसर्‍या दिवशी बातमी आली, ते काही हुतात्मा झाले नाहीत. त्यांना पकडून तुरुंगात टाकले. बातमी चांगलीच होती, पण माझी कविता मात्र हुतात्मा झाली.) – इथून पुढे) 

तिसर्‍या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आमच्या वर्गातील मुले आणि अप्रत्यक्ष साक्षीदार शाळेतील सगळीच मुले. मी सहावीत असतानाची ही घटना. आमच्या वर्गात रमण अग्रवाल नावाचा एक मुलगा होता. त्याने मला कशावरून तरी चिडवलं. त्यावर मी काही तरी बोलले. त्यातून आमची बाचाबाची सुरू झाली. बाचाबाची नंतर हातघाईत रूपांतरित झाली. प्रथम मी त्याला मारले, मग त्याने मला. आमची चांगलीच जुंपली. मग कुणी तरी आमच्या वर्गशिक्षकांना बोलावून आणले. त्यांनी चौकशी सुरू केली. मी म्हंटले, ‘याने मला चिडवले, म्हणून मी मारले.’ तो म्हणाला, ‘मी घरात बहिणींना चिडवतो, तसं हिला चिडवलं. तिने मला मारले, म्हणून मी तिला मारले.’ सरांच्या लक्षात आले, की प्रकरण काही फारसे गंभीर नाही. त्यांनी आम्हाला दोघांनाही एकमेकांना सॉरी म्हणायला संगितले. आम्ही वटारलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघत ‘सॉरी’ म्हंटलं. त्यानंतर किती तरी दिवस आमची कट्टी होती. मग बट्टी कधी झाली आठवत नाही. त्यावेळी विशेष म्हणजे वर्गातल्या बर्‍याच मुलांची सहानुभूती मला होती. मारामारीला सुरुवात माझ्याकडूनच झाली होती, तरीही. तो जरा जास्तच खोड्याळ होता, म्हणून असेल, किंवा वर्गात  आम्ही मुली अल्पसंख्य होतो, म्हणून असेल, किंवा माझे मामा शाळेचे मुख्याध्यापक होते, म्हणूनही असेल. पुढे मात्र या टोकाची भांडणे कधी झाली नाहीत. आम्हीही मोठे होत होतो. आमची समजही वाढत होती. वरील आठवण मात्र प्रत्येकाच्या मनात घटना नुकतीच घडून गेल्यासारखी ताजी टवटवीत होती.

मी वर्गातील एकटीच मुलगी (म्हणजे बाई). त्यामुळे माझं माहेरवाशिणीसारखं कौतुक होत होतं. अनेकांच्या अनेक आठवणी ऐकता ऐकता दोन कसे वाजले, कळलेच नाही. पोटातील कावळे काव काव करता करता अक्षरश: कोकलायला लागले.

        वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे

        सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे

        कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात

        श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात.

        स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल

        उदर भरण आहे, चित्त होण्या विशाल.

प्रार्थना म्हणून उदरभरणाला सुरुवात झाली. जेवण साधेच,पण चविष्ट होते. कोथिंबीरीची वडी, मसालेभात, रस्सा आणि गाजर हलवा, वा: क्या बात थी ! नंतर पुन्हा ग्रूप – ग्रूपने गप्पा झाल्या. फनी गेम्स झाले. गाण्याच्या भेंड्या झाल्या. कुणी नकला करून दाखवल्या. मी नुकतीच कॉम्प्युटर शिकले होते. मी त्यावरून चित्रे घेऊन त्यावर आधारित कवितेचा ४-६ ओळी स्वत: रचल्या होत्या व अशी तयार केलेली भेट-कार्डे सर्वांना वाटली. सर्वांनाच भेट-कार्डे आवडली.  

संध्याकाळी ५ वाजता आम्ही सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. अधून-मधून फोन करायचे नक्की ठरले. तसे सुरूवातीला दोन –तीन महीने फोन येत-जात राहिले. नंतर हळू हळू हे प्रमाण कमी होत होत थांबले. दर वर्षी एकदा असंच जमायचं ठरलं. त्याप्रमाणे पुढल्या वर्षी सारस बागेत जमायचे ठरले. तेव्हा उपस्थिती होती, दहा – अकरा होती. त्या पुढल्या वर्षी आम्ही फक्त चौघेजण होतो. मग आमचं गेटटुगेदर थांबलच. बाय करून सगळे जण निघालो.

रमण अग्रवालने मला आणि दिवेकर सरांना घरी यायचा खूप आग्रह केला, तेव्हा परत घरी पोचवण्याच्या अटीवर आम्ही तिघे त्याच्या गाडीतून त्याच्या घरी गेलो. रमणचा बंगला खूप छान आहे. वरती किचनच्या शेजारी भली मोठी लंब-रुंद गच्ची. अर्ध्या गच्चीवर आच्छादन. अर्धी उघडी. मी तर गच्चीच्या प्रेमातचं पडले. आमचं चहा-पाणी नाश्ता गच्चीवरच झाला.

माझ्या लग्नाच्या आधी मी पुणे विद्यापीठात नोकरी करत असताना रमण काही कामासाठी विद्यापीठात आला होता. तेव्हा त्याची ५-१० मिनिटे ओझरती भेट झाली होती. त्यानंतर आज.

रमणची बायको घरात नव्हती. ती दुकानात गेली होती. रमण व्यवसायाने वकील. मुलाला मात्र त्याने स्टेशनरीचे दुकान काढून दिले होते आणि ते छान चालले होते. उगीचच मनात आलं, या मारवाड्यांच्या रक्तातच धंदा आहे. बोलता बोलता कळलं, रमणची सासुरवाडी मिरजेची. म्हणजे सांगलीहून अवघी ७-८ मैलांवर. आधी माहीत असतं, तर कितीदा तरी भेटणं होऊ शकलं असतं. ‘आता मात्र मिरजेला आलात की दोघेही या.’ ‘जेवायलाच या.’ हे म्हणाले. रमणची सून घरात होती. तिने आमचा चांगला आदर-सत्कार केला. तासभर तरी त्याच्याकडे पुन्हा गप्पा झाल्या. मग आम्ही निघालो. निघताना त्याच्या सुनेने साडी-ब्लाऊज पीस देऊन माझी ओटी भरली. रमणला म्हंटलं, ‘हे सगळं मला डोईजड होतय.’ तो म्हणाला, ‘माझ्या बहिणी घरी आल्या, की मी त्यांना तसं कधीच घरी पाठवत नाही.’ माझी बोलतीच बंद झाली. स्नेहसोहळ्यात मी माहेरवाशीण म्हणून चांगलं मिरवून घेतलं. आता रमणच्या घरच्या ओटीने माहेरपण सफळ संपूर्ण झालं.

त्यानंतर रमण एकदाच पाच-दहा मिनिटे उभ्या उभ्या आला होता. त्याच्या सासुरवाडीच्या घरात कुणाचे तरी लग्न होते. वरातीतून मधेच वेळ काढून तो पाच-दहा मिनिटे येऊन गेला. त्याच्या बायकोला येणे शक्यच नव्हते. त्यांतर त्याची माझी भेट झाली नाही. राजोरे , सावळेकर वगैरे काही उत्साही मुलांनी गाड्या घेऊन आमच्याकडे यायचे ठरवले. शांतीनिकेतनच्याच्या रम्य परिसरात गेटटुगेदर करायचे ठरले. पण प्रत्यक्षात ते स्वप्नांचे इमलेच ठरले. स्वप्न सरले. इमले कोसळले.

आमच्या गेटटुगेदरनंतर आदमुलवारच्या मुलाच्या लग्नासाठी मी गेले होते  आणि त्यानंतर 2-3  वर्षांनी राजोरेच्या मुलीच्या लग्नासाठी तिथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या त्यांच्या ग्रूपमधील चार-सहा  मुले भेटली. आदमुलवार हुशार, तसाच हुरहुन्नरी. तो उत्तम चित्रकारही होता. सेंडॉफच्या वेळे त्याने मुख्याध्यापक गो.प्र. सोहोनी यांचे पोट्रेट काढून त्यांना भेट केले होते. ते शेवटपर्यंत त्यांच्या खोलीत होते.

त्यानंतर बरेच दिवस कुणाच्या गाठी-भेटी झाल्या नाहीत. मग पुन्हा कुणाच्या तरी उत्साहाने उचल खाल्ली. एम्प्रेसगार्डनसारखा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे ठरले. तो दिवस होता, २१ मार्च २०२० . पण म्हणतात ना, ‘मॅन प्रपोजेस ……’ त्यावेळी  करोनाचा विळखा आवळत चालला होता. १६ मार्चपासून संचार बंदी लागू करण्यात आली. आमचा मेळा जमलाच नाही. नंतर कुणीच भेटले नाही. पुन्हा काही दिवस काही जणांशी फोनवर संपर्क होत राहिला. हळू हळू कमी होत होत तोही थांबला.

आता कुणाला भेटावसं वाटलं, तर मनाच्या तळात असलेले प्रसंग ढवळून पृष्ठभागावर आणायचे आणि त्यांना भेटायचं.

समाप्त –

सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रवींद्रनाथ ठाकूर यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन – –☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “रवींद्रनाथ ठाकूर यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन – –☆ श्री जगदीश काबरे ☆

स्वतःच्या शैक्षणिक अनुभवावरून भारतीय मनाशी व परंपरेशी सहजपणे नाते प्रस्थापित करू शकणारी शिक्षणपद्धती अस्तित्वातच नाही हे रवींद्रनाथ ठाकूरांना तीव्रतेने जाणवू लागले होते. म्हणून या विषयावर चिंतन करता त्यांना आढळून आले की, ब्रिटिश शासनकर्त्यांनी निर्माण केलेल्या या इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे एकतर मुलांवर बालपणीच परकीय भाषेचा ताण येतो, परीक्षेचा धसका निर्माण होतो आणि मुख्य म्हणजे या शिक्षणपद्धतीमुळे देशातील शहरे व खेडी यांच्यात दुफळी निर्माण होऊ लागली आहे.

रवींद्रनाथांनी शिक्षणपद्धतीवर चिंतन करून शंभरापेक्षा जास्त निबंध लिहिले आहेत. यापैकी पहिला निबंध ‘शिक्षार हेरफेर’ (शिक्षणात फेरबदल) हा लेख त्यांच्या वयाच्या एकतिसाव्या वर्षी म्हणजेच १८८२ मध्ये प्रसिद्ध झाला. या निबंधामधील केंद्रगत विचारानुसारच त्यांनी पुढे नऊ वर्षांनंतर म्हणजे १९०१ सालच्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या शिक्षणसंस्थेची सुरुवात केली. ‘शिक्षार हेरफेर’ या निबंधात रवींद्रनाथांनी स्पष्टपणे त्यांची मते नोंदवली आहेत ती अशी :

इंग्रजांनी सुरू केलेली वसाहतवादी शिक्षणपद्धती मुलांच्या मानसिक शक्तीचा ऱ्हास करणारी व त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्तींना दाबून टाकणारी असल्यामुळे मुलांना ती आनंददायक वाटत नाही. शिवाय हे शिक्षण इंग्रजीतून देण्यात येत असल्यामुळे ती मुलांच्या भावभावनांची व कल्पनाशक्तीची वाढच खुंटवून टाकते. या शिक्षणाचा त्यांच्या जीवनाशी काहीही संबंध नसल्यामुळे ती वरवरची, दिखाऊ व फक्त उपजीविकेचे साधन पुरवणारी ठरते, तीतून कोणत्याही प्रकारचा आत्मिक विकास होत नाही. कारकून तयार करणारी ही शिक्षणपद्धती फक्त पोशाखी विद्या आहे. खेड्यांशी व लोकपरंपरेशी तिचा सुतराम संबंध नाही. भारतीय माणसे तयार करू शकणारी शिक्षणपद्धती कशी असावी याचा आपणच विचार केला पाहिजे, शासनकर्ते आपल्या समाजासाठी हा विचार करणार नाहीत, तशी अपेक्षा करणेसी योग्य नाही. आपणच आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून नवी पद्धत शोधून काढली पाहिजे. 

एकोणिसाव्या शतकाल भारतात प्रचलित असलेली केवळ पौरोहित्याचे शिक्षण देणारी जुनाट व पाठांतरावर आधारलेली शिक्षणपद्धतीही रवींद्रनाथांना मान्य नव्हती आणि इंग्रजांनी सुरू केलेली पद्धतीही मान्य नवहती त्यामुळे अगदी स्वतंत्रपणे विचार करूनच त्यांनी प्राचीन साहित्याचा अभ्यास करून नवा शिक्षणदानाचा प्रयोग १९०१ साली सुरू केला.

या प्रयोगात पहिली अट होती ती म्हणजे निदान प्राथमिक शिक्षण व शक्यतोवर सर्वच शिक्षण मातृभाषेतूनच देण्यात आले पाहिजे. शिक्षण मातृभाषेतून देण्यात आले पाहिजे हे रवींद्रनाथांचे मत सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम होते. हा मातृभाषेचा आग्रह त्यांच्या प्रत्येक शिक्षणविषयक निबंधात अग्रस्थानी असतो. पुनरावृत्तीचा दोष पत्करूनही प्रत्येक निबंधात त्यांनी शिक्षणात मातृभाषेचे माध्यम असावे या त्यांच्या मताशी कधीही तडजोड केली नाही. कारण त्यांच्या मते मातृभाषा ही मातृस्तन्यासारखी असते. मातृस्तन्य पचवण्यासाठी बाळाला काहीही कष्ट व त्रास सहन करावा लागत नाही. सहजपणे शरीराची वाढ होत जाते व एकदा शरीर बळकट झाले की मग इतर अन्न ग्रहण करण्याची क्षमताही नैसर्गिकपणे वृद्धिंगत होते. शिक्षणपद्धतीही अशीच असावी. आधी परिचित वातावरणाशी नाळ जोडणारी, हळूहळू विकसित होत अपरिचित ज्ञानालाही स्वतःत सामावून घेण्याची शक्ती निर्माण करणारी. हेच चिरंतन सत्य आहे अशी रवींद्रनाथांची दृढ धारणा होती.

शिक्षण हे केवळ आर्थिक उन्नतीसाठी नव्हे तर आत्मिक ऐश्वर्यासाठी असावे. शिक्षणाचा मुख्य उद्देश चिंतन-मननशक्ती, कल्पनाशक्ती व कर्मशक्तीचा विकास करणे, हा असावा. शिक्षणाने माणसामाणसांमधील भेद वाढवू नयेत, हे भेद शक्यतोवर कमी करण्याचा सतत प्रयत्न करावा, हाच वैचारिक मूलस्रोत रवींद्रनाथांच्या सर्व-त्यांच्याच निबंधांमधून अखंडीतपणे प्रवाहित होताना दिसतो. कारण पाठांतराधिष्ठित पौरोहित्याचे पंतोजीछाप शिक्षण देणाऱ्या शिक्षणपद्धतीने जातिभेद नाहीसा करण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि मेकॉलेप्रणीत इंग्रजी शिक्षणाने देशातील माणसांचे शिक्षित व अशिक्षित असे विभाजन केले. हा तथाकथित शिक्षित वर्ग समाजापासून तुटत गेला, स्वदेशापासून तुटतोच आहे. ज्या शिक्षणपद्धतीमध्ये बहुजन समाजाच्या पारंपरिक प्रज्ञेचा आदर नाही, निसर्गाचा आदर नाही, लोककलांचा समावेश नाही व जे काही आहे तेही इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे फक्त शहरातल्या पैसेवाल्या लोकांनाच परवडू शकते अशी शिक्षणपद्धती भारतीय समाजाला पोषक ठरू शकत नाही. या इंग्रजांच्या पद्धतीत विज्ञान शिक्षण दिले जाते. पण ते विद्यार्थ्यांमध्ये जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याइतके त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे अंधविश्वास, रूढिग्रस्तता कमी होत नाही. खेड्यांची उन्नत्ती करण्याचे प्रयत्नच होत नाहीत. हीच रवींद्रनाथांच्या शिक्षणविषयक चिंतनाची दिशा होती. 

अशा सर्व चिंतन मननातून १९०१ साली त्यांनी कलकत्त्यापासून १४५ मधील दूर असलेल्या निसर्गरम्य बोलपूर या लहान गावाबाहेरची जागा नैसर्गिक वातावरणात शिक्षण व्हावे म्हणून शाळेसाठी निवडली आणि शांतिनिकेतन सुरू केले. त्या शाळेचा आज वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत. आज शांतीनिकेतन मधून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी जगभर आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कर्तृत्वाने शांतिनिकेतनची पताका फडफडवत आहेत. रवींद्रनाथ टागोर ( ठाकूर ) हे किती द्रष्टे होते हेच यावरून सिद्ध होते.

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टाहो…” – लेखिका : सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “टाहो…” – लेखिका : सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..  

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबा करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘रॅंस्र्’ या शब्दावरून ‘रॅ़स्र्स्री’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

करमणुकीच्या क्षेत्रातदेखील आपल्या मातृभाषेबद्दल विलक्षण उदासीनता आहे. नाटकांची नावे पाहिली की, मराठी शब्द सगळे झिजून गेले की काय अशी शंका वाटते. ऑल द बेस्ट, फायनल ड्राफ्ट, लूज कंट्रोल, बॅलन्सिंग अ‍ॅक्ट, गेट वेल सून, प्लेझंट सरप्राइझ, ऑल लाइन क्लियर आणि अशी किती तरी. चित्रपटांची तीच गत आहे. पोस्टर बॉयज, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, पोस्टर गर्ल, फॅमिली कट्टा, हंटर, चीटर, लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड, सुपर स्टार, बाइकर्स अड्डा, हे झाले काही नमुने. आकाशवाणी आणि प्रकाशवाणीवर तर सर्व मंडळी आपली खास गंगाजमनी भेसळ भाषाच बोलतात. निवेदक, वक्ते, नट, बातमीदार, तज्ज्ञ, स्पर्धक आणि पंच, झाडून सगळे जण. उदाहरणं देत बसत नाही (किती देणार?) पण आपल्या टी.व्ही. सेटचं बटण दाबलं तर प्रचीती येईल. मी चुकूनही मराठी कार्यक्रम पहात नाही. आपल्या भाषेच्या चिंधडय़ा उडताना नाही बघवत. मुलं म्हणतात, ‘‘काही तरीच तुझं. जमाना बदलतो आहे. भाषा बदलणारच.’’ कबूल, पण दुर्दैव असं की, मी नाही बदलले. माझ्या या आग्रही वृत्तीमुळे घरात मराठी वृत्तपत्रदेखील मी घेत नाही. ‘आजची यंग जनरेशन फ्रस्ट्रेटेड का?’, ‘दबावांच्या टेरर टॅक्टिक्स’, ‘तरुण जोडप्याचा सुइसाइड पॅक्ट’ असे मथळे; आणि लाइफ स्टाइल, हेल्थ इज वेल्थ, स्टार गॉसिप, हार्ट टु हार्ट, अशी सदरं पाहिली की वाटतं, सरळ इंग्रजी वृत्तपत्रच का घेऊ नये? ‘तुम्हाला आपल्या भाषेचं प्रेम नाही?’ मला विचारतात. प्रेम आहे म्हणून तर हा कठोर नियम मी लागू केला आहे. माझा स्वत:चा असा खासगी निषेध म्हणून मी इंग्रजी बिरुदं मिरवणारी नाटकं आणि सिनेमे पहात नाही. दृष्टीआड भ्रष्टी.

इतका वेळ मी इंग्रजी शब्दांच्या आगंतुकीवर आग पाखडून, आपले शब्द नाहीसे होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला; पण शब्दच काय- अवघी भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपल्या असंख्य लहान मुलांना मराठी नीट लिहिता- वाचता- बोलता येत नाही. ‘मम्मी, व्हॉट इज प्रतिबिंब?’ असं आमचा मिहिर विचारीत होता, अशी लाडाची तक्रार अलीकडेच कानी आली; पण त्याबद्दल खेद वाटण्याऐवजी मम्मीला खोल कुठे तरी अभिमानच वाटत होता. इंग्रजी येणं, हे आजच्या काळाची नितांत गरज आहे, याबद्दल दुमत नाही. सद्य:युगामधली ती प्रगतीची भाषा आहे, हे कुणीही मान्य करील; पण इंग्रजी अथवा मराठी, या दोन भाषांमधून एकीची निवड करा, असा प्रश्नच नाही आहे. इथे निवड नव्हे तर सांगड घालण्याबद्दलची ही किफायत आहे. आजच्या जमान्यात मुलांना तीन भाषा यायला हव्यात- मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा- इंग्रजी. दुर्दैव असं की, या तिन्हीपैकी एकही भाषा उत्तम येते असं कुणी क्वचितच आठवतं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विशेष दक्ष राहिलं पाहिजे. हे अशक्य नाही, हे मी स्वानुभवाने सांगते. सात ते अकरा वर्षांमधल्या माझ्या बालपणीचा काळ ऑस्ट्रेलियात गेला, कॅनबेरा शहरात. साहजिकच शाळा इंग्रजी होती आणि झाडून सगळ्या मित्रमैत्रिणी इंग्रजी बोलणाऱ्या, पण घरात मात्र कटाक्षाने शुद्ध मराठी बोलले जाई.

मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले. माझ्या मुलीची मुलं मराठीमधून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरं देतात. सुरुवातीला मी अन्शुनीला माझ्याबरोबर मराठीतून बोलायची सक्ती करीत असे; पण मग पुढे मी येणार आहे हे कळताच, आता मराठी बोलावं लागणार म्हणून ती धास्तावते, असं विनीने मला सांगितलं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला. एका व्यक्तिगत पराभवाची नोंद झाली.

उद्याच्या मराठी भाषादिनी, या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींची आवर्जून आठवण करावीशी वाटते.

सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मॅक्सीन (आडनाव आठवत नाही) नावाची तरुण अमेरिकन विद्यार्थिनी मराठी भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिली होती. पाहता पाहता ती उत्तम मराठी बोलू लागली. एवढंच नव्हे तर पुढे तिने फलटणला चक्क मराठी शाळा काढली. फलटणला एका पार्टीत ती मला भेटली. ती काठापदराचं लुगडं नेसली होती. ‘छान साडी आहे तुमची,’ मी तिला म्हटलं. मॅक्सीन हसून म्हणाली, ‘मळखाऊ आहे.’ तिचा हा शब्द मी आजतागायत विसरले नाही. दुसरा उल्लेख आहे माजी तुरुंगाधिकारी उद्धव कांबळे यांचा. बिकट परिस्थितीला तोंड देऊन, उत्तम प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण करत कांबळे यांनी पुढे यूपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा मराठीमधून देणारे ते पहिले विद्यार्थी. पुढे त्यांच्या क्षेत्रात एक अतिशय सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं. मराठी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम असून समर्पक सुंदर प्रतिशब्दांची त्यांनी एक सुंदर यादी बनवली आहे. माझ्या ‘आलबेल’ नाटकाच्या आणि पुढे ‘सुई’ या एड्सवरच्या लघुपटाच्या तुरुंगाबाबतच्या प्रवेशांसाठी त्यांची बहुमोल मदत झाली.

काही वर्षांपूर्वी मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं झेंडा फडकावला होता. कुरकुरत का होईना, पण जनतेनं- आणि विशेष करून दुकानदारांनी तिची दखल घेतली; पण पुढे हा संग्राम मंदावला आणि परकीय पाहुणीचं- इंग्रजीचं फावलं. खरं तर, मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? इमारतीला सदन, हवेली किंवा महाल म्हणण्याऐवजी ‘हाइट्स’ किंवा ‘टॉवर्स’ म्हटलं की तिची उंची वाढते का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. त्यासाठी जागतिक मराठी परिषदेचं अधिवेशन भरण्याची वाट पाहू नये.

लहानपणी केलेले एक अवलोकन मला छान आठवतं. सभोवतालची वडीलधारी मंडळी बदलत्या चालीरीती, पुसट होत चाललेले रीतिरिवाज आणि तरुण पिढीचे एकूण रंगढंग, यावर सतत तोंडसुख घेत असत. त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. आपण मोठं झाल्यावर चुकूनसुद्धा असं काही करायचं नाही, असा मी ठाम निश्चय केला होता; पण काळ लोटला तसा तो निर्धार शिथिल झाला असावा. मीही आता जनरूढीच्या बदलत्या आलेखाबद्दल तक्रारीचा सूर आळवू लागले आहे, याची मला कल्पना आहे. तसंच तळमळीचे हे माझे चार शब्द म्हणजे निव्वळ अरण्यरुदन ठरणार आहे याचीही मला पूर्ण जाणीव आहे. पण काय करू? मामलाच तसा गंभीर आहे. प्रसंग बाका आहे. आपली मायबोली काळाच्या पडद्यामागे खेचली जात आहे आणि ‘कुणी मला वाचवा होऽ’ असा टाहो फोडते आहे; पण ही हाक कुणाला ऐकूच जात नाही, कारण तिची लेकरं बहिरी झाली आहेत. डेफ् ..  स्टोन डेफ्!

  ☆

लेखिका : सई परांजपे

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ दिले निमंत्रण अवकाशाला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ दिले निमंत्रण अवकाशाला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

‘ऐलपैल’ हा माझा पहिलावहिला कवितासंग्रह. त्याचा प्रकाशन सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्याच्या एस्. एम्. जोशी सभागृहात संपन्न झाला. अध्यक्ष होते नामवंत साहित्यिक, समीक्षक, संपादक डॉ. प्रा. रमेश वरखेडे आणि प्रमुख पाहुणे होते प्रख्यात निवेदक, वक्ते, संपादक व ‘शब्दमल्हार’चे प्रकाशक मा. स्वानंद बेदरकर. सूत्रसंचालक होते ‘मधुश्री’प्रकाशनाचे मा. पराग लोणकर. मा. वरखेडे सरांनी माझ्या कवितांचे केलेले साक्षेपी समीक्षण सह्रदय समीक्षेचा वस्तुपाठ ठरावा. स्वानंदाने आपले मनोगत व्यक्त करतांना माझ्या काही कवितांचे वाचनही केले. मन आणि कान धन्य करणारा तो एक अनन्यसाधारण अनुभव होता. रसिक, मित्र, आप्तांची उपस्थिती आणि प्रतिसाद यांनी मन भरून आले. त्याचा संदर्भ असलेली ही कविता :

दिले निमंत्रण अवकाशाला

 *

दिले निमंत्रण अवकाशाला, क्षितिजतटावर बाहू पसरुन

उरी घ्यावया धरेस एका, किति आभाळे आली दाटुन

 *

अंध गुहेचे दार बंद हे, कुणी उघडले किती दिसांनी

मोरपीस किरणांचे फिरले, काळोखावर जणु युगांनी

 *

पत्ता शोधित आले दारी, दूर दिशांतुन काही पक्षी

वठल्या रानी पानोपानी, वसंत फुलवित रेखित नक्षी

 *

रसज्ञ आले आप्त मित्रही, घ्याया श्रवणी कवनकहाणी

स्मरून अपुला जुना जिव्हाळा, दाखल झाले जिवलग कोणी

 *

विदग्ध वक्ते मंचावरती, (त्यात जरासा एक कवीही)

ह्रदयीचे ह्रदयाशी घेण्या, झाले उत्सुक श्रवणभक्तही

 *

प्रगल्भ रिमझिम रसवंतीची, बरसु लागली मंचावरुनी

सचैल भिजली अवघी मैफल, कृतार्थ झाली माझी गाणी

 *

जुने भेटता पुन्हा नव्याने, पुन्हा नव्याने जन्मा आलो

रिंगण तुमचे पडता भवती, उचंबळाचा सागर झालो

 *

अनन्य उत्कट अमृतक्षण हा, तुमची किमया तुमचे देणे

अवचित यावे जसे फळाला, कधीकाळचे पुण्य पुराणे

 *

जन्ममृत्युच्या वेशीवरती, अंधुक धूसर होता सारे

आप्त मित्र अन् रसिकजनांनो!करतिल सोबत तुमचे तारे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमचा स्नेहमेळावा… भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ आमचा स्नेहमेळावा… भाग – १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

संध्याकाळची साडे सातची वेळ. कोल्हापुरातील एक कार्यक्रम संपवून मी घरी परतत होते. गाडीत असतानाच फोन वाजला.

‘हॅलो… ’

‘हॅलो… हा उज्ज्वला केळकरांचाच फोन आहे का?’

हो. मी उज्ज्वला केळकरच बोलतेय. आपण कोण?’

‘अग कुमुद, ’मी उल्हास सावळेकर बोलतोय. ’

‘काय? ‘ मी चकीत. माझ्या आनंदाश्चर्याला पारावार राहिला नाही. काय काय आणि किती किती बोलू, असं मला झालं, पण तिथे गाडीत सविस्तर बोलणंही शक्य नव्हतं. मग म्हंटलं, ’मी बाहेर आहे. घरी गेले की तुला लगेच फोन करते. ’

उल्हास सावळेकर हा माझा वर्गमित्र. इयत्ता ५वी पासून ते ११वीपर्यन्त आम्ही एका वर्गात होतो. असे आणखीही खूप जण होते. कॅँप एज्युकेशन सोसायटी हायस्कूल ही शाळा प्रामुख्याने मुलांची शाळा होती. पूर्वी फक्त सातवीपर्यंतच मुली घेत. मलाही कधी सातवी पास होते आणि मुलींच्या शाळेत जाते, असं झालं होतं. पण कसचं काय? माझ्या आधीच्या बॅचपासून मॅनेजमेंटचं धोरण बदललं आणि आठवीपासून मुलींनाही प्रवेश दिला गेला. या शाळेतून ११वी पास झालेल्या मुलींची माझी दुसरी बॅच. अर्थात मुली हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असायच्या. सात, आठ फार तर दहा. ११वीला आमच्या ‘अ’ तुकडीत (गणित घेतलेली तुकडी) तीन मुली होतो, तर ‘ब’ तुकडीत चार मुली. एकूण मुलींचा पट सात.

मला उल्हासशी कधी बोलते, असं झालं होतं. काय काम असेल बरं त्याचं माझ्याकडे? सगळ्यात प्रश्न पडला होता, माझं नाव त्याला कसं कळलं? आणि मोबाईल नंबर कुठून मिळाला? 

मी घरी पोचले. चपला काढल्या आणि हातात फोन घेऊन सुरूच झाले. सर्वात आधी हेच विचारले, ‘माझं नाव तुला कसं कळलं आणि मोबाईल नंबर कुठून मिळाला? 

तो म्हणाला, ‘अग, आपल्या वर्गात तो गिरीधर राजोरे होता ना, त्याचा सर्वात मोठा भाऊ जवाहर. लता त्यांच्या वर्गात होती ना! त्यांच्या ग्रूपचा अजून परस्परांशी संपर्क आहे. लताकडून व्हाया जवाहर- गिरीधर राजोरे तुझं नाव आणि नंबर मला मिळाला. ’

आता लता कोण, हे सांगायचं तर खूप मोठी लांबड लावायला हवी. पण त्याला इलाज नाही. लता म्हणजे माझी मामेबहीण. माझ्या मुंबईच्या मामांची मुलगी. माझ्यापेक्षा ४ वर्षांनी मोठी. ती १०वी११वीला पुण्याला आमच्याकडे म्हणजे आण्णांकडे ( माझे मोठे मामा आणि तिचे मोठे काका) शिकायला आली होती. त्या काळात आठवीनंतर शाळेत मुली घेत नसत. लताची गोष्ट वेगळी. ती सोहोनीसरांची पुतणी. त्यामुळे वर्गात ती एकटीच मुलगी. वर्गाच्या दारासमोरच्या भिंतीशेजारी तिच्यासाठी आडवा बाक टाकलेला असे. हळू हळू वर्गात ती अ‍ॅडजेस्ट झाली. वर्गात मुली नाहीत, म्हणून मैत्रिणी नाहीत. मित्रच सगळे. त्यातही, राजोरे, दोषी, नागूल, पेंढारकर ही जवळची स्नेही मंडळी. लता म्हणजे जगन्मित्र॰ यापैकी कित्येकांचे धाकटे भाऊ दोन दोन वर्षानी लहान, आमच्याच शाळेत शिकत असायचे. यापैकी काही जणांचे स्नेहबंध ती कॉलेजला गेल्यावर, तर काहींचे तिच्या लग्नानंतरही टिकून राहिले. विशेषत: जवाहर आणि त्याची बायको खूपदा तिच्याकडे येत. काही वेळा मीपण तिथे असे. जवाहरचा तीन नंबरचा भाऊ गिरीधर आमच्या वर्गात होता. तेव्हा माझ्या नावाचा आणि फोन नंबरचा प्रवास लता-जवाहर-गिरीधर-उल्हास असा झाला. मला मजा वाटली. मुलांच्या चिकाटीचं कौतुकही वाटलं.

उल्हास बोलत होता, ‘ आपली १९५९ ची एस. एस. सी. ची बॅच. यंदा आपल्याला एस. एस. सी. होऊन ५० वर्षे होतील. त्या निमित्ताने अंदा आण गेटटुगेदर करू या. ‘

‘छानच आहे कल्पना. आपल्या शाळेतच करायचं का?

‘नाही. शाळेची काही अडचण आहे म्हणे. एम्प्रेस गार्डनमध्ये करायचं ठरतय. तुला वर्गातल्या इतर मुलींची नवे, फोन नंबर माहीत आहेत का?’

‘नाही रे! रिझल्टनंतर कुणाच्या गाठी-भेटीच नाहीत. आता गेटटुगेदरच्या वेळी कोण कोण भेटतात बघू. ‘

अर्धा तास तरी आम्ही फोनवर बोलत होतो. काही जुन्या आठवणी निघाल्या. त्यानंतर गेटटुगेदर होईपर्यंत सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत राहिले. कार्यक्रमाचं नियोजन, कुणी कुठे थांबायचं, नाश्त्याचा, जेवणाचा मेन्यू, एम्प्रेस गार्डनमध्ये कसं पोचायचं, मला अद्ययावत माहिती मिळत होती.

अखेर गेटटुगेदरचा दिवस उजाडला. नऊ- साडे नऊपर्यंत सारे जमले. आही त्यावेळी ११वीला ८० जण होतो. त्यादिवशी सगळी मिळून ५०-५५ मुले हजर होती. ४-६ मुले मागच्या पुढचा एखाद्या इयत्तेतील होती. मुले म्हणजे त्यावेळची. आता त्यापैकी बरीच जण आजोबा या पदवीला पोचली होती. मुले-सुना, मुली-जावई तर सगळ्यांनाच होते. मला सांगताना सहकुटुंब जमायचे असं सांगितलं होतं, पण तिथे पाहीलं, तर सारे एकेकटेच आले होते. एक मी वगळता कुणाचंच कुटुंब नव्हतं. हे आले होते, म्हणजे काय, तर ते म्हणजे सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित होते आणि त्यांनीही फारसे आढेवेढे न घेता यायचं कबूल केलं होतं. आमच्या भाग्याने आम्हाला शिकवणारे तीन गुरुजनही उपस्थित होते. दिवेकरसर, बुलबुलेसर आणि जोशीसर.

सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने केली. नंतर प्रत्येकाने आपलं नाव, आपलं कुटुंब, आपण काय करतो, किंवा करत होतो, इ. माहिती सांगितली. नंतर आम्ही शाल, श्रीफल देऊन आमच्या तीनही गुरुवार्याँचा आदर सत्कार केला. त्यांच्याविषयी कुणी कुणी बोलले. मग सुरू झाल्या शाळेतल्या आठवणी. किती तरी दिवस मनाच्या कोठीत बंदिस्त असलेल्या, एकेका आठवणींच्या नमुनेदार चिजा बाहेर निघाल्या. या आठवणी काही केवळ ११वीतल्याच नव्हत्या. शाळेत आल्यापासून सेंडॉफ होऊन बाहेर पडेपर्यंतच्या आठवणी.

माझ्या बाबतीतल्या तीन आठवणी अजूनही सगळ्यांच्या लक्षात होत्या. त्यापैकी एक म्हणजे, एका नाटिकेत मी घरोघरी जाऊन आंबाबाईचा जोगवा मागणार्‍या जोगतिणीचे काम केले होते. एका घरातली बाई तिला भिकारीण म्हणते, तेव्हा ती संतापते. तिच्या अंगात येतं आणि उदो-उदो म्हणत ती घुमू लागते. केस मोकळे सोडलेले. खाली बसून पिंगा घातल्यासारखी ती कंबर आणि वरचा भाग हलवते. मधून मधून उदो-उदो म्हणून किंचाळते. या माझा कामाला टाळ्या मिळाल्या होत्या. बक्षीसही मिळालं होतं बहुतेक.

दुसरी आठवण माझ्या वर्गातल्या मुलांपुरती मर्यादित आहे. आम्ही आठवीत होतो तेव्हा. गोवा मुक्ती आंदोलनाचे वेळी कार्यकर्ते हेमंत सोमण पोर्तुगीजांच्या पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले, अशी बातमी आली. काही कोण जाणे, मला कविता सुचली. मी वर्गात वाचून दाखवली. मुलांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. दुसर्‍या दिवशी बातमी आली, ते काही हुतात्मा झाले नाहीत. त्यांना पकडून तुरुंगात टाकले. बातमी चांगलीच होती, पण माझी कविता मात्र हुतात्मा झाली.

– क्रमशः भाग पहिला 

सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त दोनशे रुपयांची उधारी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

फक्त दोनशे रुपयांची उधारी लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी संभाजीनगरात येतो… !!

एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का? 

या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल.

मात्र संभाजीनगरातील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..

सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी संभाजीनगरात होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि संभाजीनगरातील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून संभाजीनगरच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण संभाजीनगरात झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते संभाजीनगरात एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीय रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डला काशिनाथ काकांनी मदत केली आणि त्याला रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशिनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. 1989 मध्ये त्याने संभाजीनगरात सोडलं त्यावेळी काशिनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतला. तिकडे राजकारणात जाऊन त्याने मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथ काका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्याला होती. गेली 30 वर्ष त्याला भारतात यायला जमलं नाही,

मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसूकच संभाजीनगरकडे वळली आणि त्यानं शोध घेतला तो काशिनाथ काकांचा. तब्बल दोन दिवस त्याने काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून तो रडायला लागला. खर तरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही तो आवर्जून सांगतो. काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं, मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होता, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डला आनंद आहेच मात्र मलाही अभिमान असल्याचं रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. काशिनाथ काकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होत, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला. नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.

काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्याने काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

निसर्गचक्र अव्याहत चालू आहे. ते कधीपासून सुरू झाले किंवा कधीपर्यंत चालू राहील असा प्रश्न पडला तर त्याचे एकच उत्तर देता येईल. अनंत काळापासून हे सृष्टीचक्र चालू आहे आणि अनंत काळ हे सृष्टीचक्र चालू राहील असे आपण म्हणू शकतो.

निसर्गात विविधता आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे असे आपल्या लक्षात येईल. असे म्हटले जाते की दिवस उजाडल्यावर हरीण जीव वाचवण्यासाठी पळत असते तर वाघ हरीण पकडण्यासाठी (त्याचे भक्ष्य) पळत असतो. दोघांचे वैर नसते, एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष्य असते…. , थोडक्यात एक जीव मेल्याशिवाय दुसऱ्या जीवाचे पोट भरू शकत नाही असे आपल्या लक्षात येईल. आपण असे अनुमान काढू शकतो की सृष्टीचे चक्र अव्याहत आणि विनासायास चालण्यासाठी मृत्यू अनिवार्य आहे, (मग तो ८४ दशलक्ष योनीतील कोणत्याही जीवाचां असो)

समर्थ दासबोधात आपल्याला सांगतात,

“सरता संचिताचे शेष। 

नाही कणाचा अवकाश। 

भरतां न भरतां निमिष्य। 

जाणें लागे।।”

(दासबोध ३. ९. ३)

सर्व संतांनी मृत्यूचे यथार्थ वर्णन विविध प्रकारे केलेले आढळते. यक्ष प्रश्न म्हणून महाभारतात एक संवाद आहे. त्यात जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते असा एक प्रश्न विचारला गेला. त्यावर धर्मराज युधिष्ठिराने दिलेले उत्तर अगदीच योग्य आणि लोकप्रिय आहे. प्रत्येक जण मरणार आहे हे माहीत असूनही तो अमर असल्या सारखा जगतो. मंडळी, पटतंय ना ?

समर्थ रामदास स्वामी इथेच थांबत नाहीत. ते पुढे म्हणतात,

मरणाचे स्मरण असावें ।

हरिभक्तीस सादर व्हावें । 

मरोनि कीर्तीस उरवावे । 

येणे प्रकारें ॥

 (दा. 12. 10. 13)

सध्या विज्ञान युग आहे असं म्हटले जाते. महान शास्त्रज्ञ न्यूटनने अनेक सिद्धांत मांडले आणि ते जगप्रसिद्ध आहेत. त्यातील एक आहे.

१. क्रियेला प्रतिक्रिया आहे.

२. जगातील ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, तर तिचे एका रूपातून दुसऱ्या रुपात रूपांतरण होत असते.

आपल्या घरात एकाच खांबावरून वीज येते, पण त्या एकाच विजेने घरातील विविध प्रकारची उपकरणे चालत असतात. थोडक्यात ऊर्जेचे रूपांतरण एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत होत असते.

मनुष्य जिवंत असण्याचे एकमेव लक्षण म्हणजे त्याच्या अंगी असलेली चैतन्य शक्ति. मनुष्य जिवंत असतो तेव्हा त्याच्या अंगी चैतन्य असते असे मान्य करावेच लागेल, कारण मेलेला मनुष्य आणि जिवंत मनुष्य यात विशेष फरक नसतो, फक्त एक हालचाल करू शकत नाही तर दुसरा मात्र आपल्या इच्छेने हालचाल करू शकतो…..

आता एक महत्वाचा मुद्दा आपल्या चटकन लक्षात आला असेल. मनुष्याच्या अंतरी असलेले चैतन्य जेव्हा त्याचे शरीर सोडते, तेव्हा तो मृत झाला असे म्हटले जाते. थोडक्यात मनुष्याच्या अंगी असलेल्या चैतन्याचे रूपांतरण दुसऱ्या रुपात होणार असेल तर त्याला पहिले रूप अथवा आधीचे शरीर सोडणे क्रमप्राप्त ठरते…..

लौकिक अर्थाने मनुष्याचा मृत्यू हा त्याच्या जीवनाचा शेवट समजला जातो, पण न्यूटनचा सिद्धांत अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल की मृत्यू तर ऊर्जेचे रूपांतरण आहे. एका महान तत्त्ववेत्ता म्हणतो की मृत्यू हा शेवट नसून तर ती खरी सुरुवात आहे…..

झाडांची पाने गळतात, तेव्हा ती दुसऱ्या पानांना जागा करून देत असतात. पहिली पाने आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य पूर्ण करून कृतार्थ होत असतात. मनुष्याने हे सूत्र लक्षात ठेवले तर तो अधिक सजगतेने जीवन जगू शकेल, आनंदी होऊ शकेल….

आपण एक प्रयोग करून पाहू. आपण आजपासून मरणाकडे “ऊर्जा रूपांतरण” (Energy transformation) या भूमिकेतून पाहायला सुरुवात करू. त्यामुळे मृत्युकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकेल, पटतंय का ?

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दृष्टी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दृष्टी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

जोशी काकांबरोबर आम्ही ट्रीपला जात असु. काका एकदम वेगळेच होते. दरवेळेस जी प्रसिद्ध ठिकाणं दाखवणार आहेत ती दाखवायचेच… पण त्याच्या पलीकडचं असं काहीतरी आम्हाला दाखवायचे.

 मला तर तेच जास्त आवडायचे…

असेच एकदा काकांबरोबर दोन दिवसांच्या ट्रिपला गेलो होतो. प्रवास सुरू झाला. दीड तास झाल्यानंतर काकांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.

काका म्हणाले.. ” शेतातल्या पायवाटेने थोडं तुम्हाला चालावं लागेल. चला… जरा वेगळी गंमत दाखवतो… तुम्ही कधी पाहिली नसेल…. “

थोडं पुढे गेलो लांबूनच झाडं दिसायला लागली…. कशाची आहेत ते ओळखायला येईना…

जवळ जाऊन बघितलं तर तिथे डोंगरी आवळ्यांची असंख्य झाडं तिथे होती. झाडावर आवळ्यांचे अक्षरशः घोसच्या घोस लगडलेले होते. टपोरे फिकट हिरवटसर आवळे इतके सुंदर दिसत होते… त्यांचा मंद मधुर वास आसमंतात पसरला होता… वाऱ्याबरोबर दरवळत होता… बघताना खूप मजा वाटत होती…

दृष्टी सुख घेत कितीतरी वेळ आम्ही उभे होतो…. अशी आवळ्यांची शेती आम्ही प्रथमच बघितली. नंतर काकांनी सांगितले की आयुर्वेदीक औषध बनवण्यासाठी हे सगळे आवळे नेले जातात. ते टपोरे आवळे ती झाडं अजूनही स्मरणात आहेत….

काकांनी हे एक निराळच आम्हाला दाखवलं… काका म्हणाले, ” आपण ज्या झाडाखाली उभे आहोत ते झाड कशाचे आहे माहित आहे का ? ” आम्हाला ओळखता येईना. मग काकांनी सांगितले ” हा कदंब वृक्ष आहे. या वृक्षाची काय बरं माहिती आहे कोणाला?”

आम्हाला कोणाला काही माहिती नव्हती. कदंब वृक्षाचा संबंध कृष्णाशी आहे हे मात्र माहीत होते. काकांनी त्या वृक्षाची पूर्ण माहिती दिली. झाडाची रचना कशी आहे.. श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी त्याच्यावर कसे बसत असतील याचे रसभरीत वर्णन काकांनी केले.

काकांनी विचारले की कोणाला ‘ श्रीकृष्ण अष्टकम् ‘ येते का ?

बहीण, मी आणि अजून दोघीजणी पुढे आलो. काका म्हणाले ” चला हात जोडा आपण म्हणू या “

त्या कदंब वृक्षाखाली उभं राहून आम्ही – – 

“भजे व्रजेक मंडनम् 

समस्त पाप खंण्डनम्

स्वभक्त चित्तरंजनम् 

सदैव नंद नंदनम्”

हे श्रीकृष्ण अष्टकम् म्हटले…. आताही घरी म्हणताना तो वृक्ष आणि काका आठवतात…

तिथुन निघालो.. काका म्हणाले ” रात्री पण एक तुम्हाला गंमत दाखवणार आहे…… “

आता रात्री काय काका दाखवणार आहेत याची मला उत्सुकता लागली.

दिवसभर आम्ही काही काही पाहत होतो…. आपण एका छोट्या खेड्यात रात्री राहणार आहोत अस त्यांनी आधीच सांगितलं होतं. तिथे आटोपशीर छान छोट्या छोट्या खोल्या होत्या. साधसं चवदार जेवण झालं. आता रूमवर जायचं झोपायचं असं वाटलं….

तर काका म्हणाले.. ” चला आता गंमत बघायला “

इतक्या रात्री त्या खेड्यात काय बघायचं?…. निघालो… गाडी पुढे गेली. नुसता अंधार आणि अंधारच होता… तिथे अंधारात काय बघायचं? पुढे काय असेल ?आम्हाला कोणाला काहीच कल्पना येईना….

आमचे तर्क सुरू झाले…. काजवे… कोणीतरी म्हटलं.. या दिवसात नाही दिसत.

आदिवासींचा नाच….. इथे कुठले आदिवासी… काका भूत तर नाही ना…

कसलाच अंदाज येई ना…. नाही म्हटलं तरी मनात भीती दाटून आली…..

काका शांतच होते. आमच्या कोणत्याच प्रश्नांना ते उत्तर देत नव्हते.. एका जुनाट मोठ्या पडक्या अशा देवळासमोर गाडी थांबली. गाडीच्या लाईटच्या उजेडात आम्हाला दिसले… समोर लांबलचक मोठ्या पायऱ्या होत्या. काकांनी आम्हाला त्या पायऱ्यांवर बसायला सांगितले. काकांच्या हातात मोठा टॉर्च होता. काकांनी तो बंद केला. गाडीचा लाईटही बंद झाला होता. पूर्ण अंधार होता….

आता इथे काय पाहायचं….

…. काका म्हणाले ” आकाश…… “

” आकाशात काय बघायचे?”

आम्ही वर बघायला लागलो.. शहराच्या उजेडात कधी न बघायला मिळालेले आकाश आम्हाला दिसले….

असंख्य चांदण्यांनी भरलेले….. त्या गडद अंधारात चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. चंद्र आणि शुक्राची चांदणी गोड दिसत होती… सप्तर्षी दिसले… खूप वर्षानंतर आम्ही ते बघीतले…. निसर्गाचं एक अलौकिक असं रूप आम्हाला दिसत होतं…. आकाशात इतक्या चांदण्या असतात…..

अंधारात डोळे जरा सरावले. काका म्हणाले, ” जरा इकडे तिकडे बघा “

… तेव्हा लक्षात आलं की आमच्या आसपास चांदण पसरलेले आहे… त्या चांदण्या खाली आपण बसलेलो आहोत हे आम्ही अनुभवले….. सगळे निशब्द झालो होतो…. निरव शांतता……

असा चांदण्याचा अनुभव आम्ही आधी कधी घेतलाच नव्हता…

अपार आनंद झाला होता….

मी घरी गॅलरीत उभी होते आणि हे आज आठवले…..

काय, कुठे आणि कसं बघायचं हे सांगणारे जोशी काका आठवले…..

विचार करता करता लक्षात आलं की जरा बाहेर बघितलं तर हे पसरलेलं सुखाचं चांदणं दिसेल….

पण आम्ही ते बघतच नाही….. लांब लांब जाऊन काय काय पाहायच्या नादात हा हाताशी असलेला आभाळभर आनंद बघायचा राहूनच जातो का काय…..

एक सांगू….

बघा ना कधीतरी तुम्ही पण….. तुमचं तुमचं आभाळ

आताशा मी बघत असते …. चांदण्यांबरोबर अजूनही काही काही दिसते….

कल्पनेच्या पलीकडलं….. अदभुत असं….

दरवेळेस काहीतरी मला वेगळंच दिसतं….

….. कधीतरी वर आभाळात गेलेले ही दिसतात… बोलता येत त्यांच्याशी….. मनातल्या मनात….

…. आपलं सुखदुःख… सांगता येतं…

आयुष्याच्या वळणावर असे जोशी काकांसारखे भेटले… त्यांच्या अनुभवानी, ज्ञानानी त्यांनी माझं आयुष्य अधिक समृद्ध केलं … जगणं अधिक सुंदर झालं…..

आज कोजागिरी…

काकांची आठवण आली….

आज रात्री आकाश… चंद्राच चांदणं तुम्हीही बघा हं….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘गृहिणी सचिवः सखी… वगैरे वगैरे !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

गृहिणी सचिवः सखी… वगैरे वगैरे !’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

आपल्या सर्वात लाडक्या सणाचे अर्थात दिवाळीचे कवित्व संपत आले. या बहुपेडी सणाच्या निमित्याने घरचे अन दारचे सोपस्कार पार पाडतांना गृहिणींच्या शक्तीचा पार निचरा झाला असेलच. दिवाळीच्या तोंडावर नवऱ्याला हातात झाडू घ्यायला लावत साफसफाई करायला लावणाऱ्या गृहिणीवर बरेच विनोद वाचले. पण ते तेवढ्यापुरतेच, कारण विनोद ही गांभीर्याने घ्यायची गोष्टच नव्हे. आणखीन एक चीज आहे जी बहुदा चटपटीत आणि चमचमीत असावी अशी मान्यता आहे. त्यात समाजप्रबोधन औषधाला देखील असू नये याची काळजी घेतल्या जाते. ती म्हणजे जाहिरात! मात्र प्रत्येक नियमाला अपवाद असतो मंडळी.

कॉटन किंग या ब्रँडची ३ वर्षांपूर्वीची अधिकृत जाहिरात! गोष्टीचे नांव, ‘कशा असतात ह्या बायका!’ भाऊबीजेला आपल्या ‘लाडक्या झिपऱ्या’ लहान भावाला कॉटन किंगचा शर्ट देणारी बहीण, या पलीकडे भावा-बहिणीच्या नात्याचे अलवार पदर उलगडणारी, लहानपणीच नव्हे तर मोठेपणी देखील एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही आजच्या आधुनिक काळातील भावाच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या बहिणीची गोष्ट! प्रत्येक स्त्रीची स्वतःच्या आयुष्यातील सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखवतांनाच पुरुषप्रधान संस्कृतीवर तरलतेने भावनात्मक भाष्य करणारी ही यू ट्यूब वरील जाहिरात माझ्या मनांत घर करून राहिली आहे. तुम्ही देखील ती अवश्य पहा! ही ऍड आठवण्याचे कारण भाऊबीज तर आहेच, पण त्यापलीकडे स्त्रीच्या बहुमुखी व्यक्तिमत्वाचे घडवलेले विलोभनीय दर्शन आहे.

 

महाकवी कालिदासांनी आपल्या ‘रघुवंशम्’ या प्रसिद्ध संस्कृत महाकाव्यात स्त्रीच्या विविध रूपांचे हृद्य वर्णन केले आहे. रघुवंशकुलोत्पन्न अयोध्येचा राजा (दशरथाचा पिता) अज आपली प्राणप्रिय पत्नी इंदुमती हिच्या निधनानंतर शोकसंतप्त होत विलाप करीत म्हणतो,

“गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ ।

करुणाविमुखेन मृत्युना हरता त्वां बत किं न मे ह्रतम” ।।-

(रघुवंशम् -अष्टम सर्ग – ।। ६७ ।।)

(भावार्थ – “हे वल्लभे, तूच माझी गृहलक्ष्मी, मंत्री, सचिव, एकांतात अनन्य हृदयस्थ सखी आणि………… संगीत-नृत्यादि मनोरम कलांच्या प्रयोगात माझी प्रिय शिष्या होतीस. म्हणूनच सांग (समष्टीरूपाने-एकंदरीत) तुझे हरण करणाऱ्या क्रूर काळाने माझे सर्वस्व हरले नाही कां?)

या श्लोकानुसार एकाच स्त्रीच्या किती भूमिका असतात हे ध्यानात येते. तिला मखरात बसवण्यात भारतीय संस्कृतीचा खूप मोठा हातभार आहे. या पार्श्वभूमीवर एक वाक्य आठवले. मध्यंतरी मुलीशी मैत्री वाढवण्याकरता मुलांमध्ये एका संवादाची आवर्तने होत होती, ‘जेवलीस कां?’ हा ‘डेंजर ट्रेंड’ असल्याचे ध्यानात आल्यावर मुंबई पोलिसांनी अशा भविष्यकालीन रोमियोंसाठी एक प्रसिद्ध टिवटिव केली होती, ‘ती जेवेल रे तिच्या घरी, काळजी करू नकोस!’ 

आपल्या पतीला अन मुलांना संबंधित स्त्री सतत विचारात असते ‘जेवलास कां?’ अन आपण तिला असे कधी विचारतो? कित्येक घरांमध्ये कर्त्या पुरुषाला अन मुलांना सकस अन्न द्यायचा परिपाठ आहे. त्यांना अंगमेहनत पडते, म्हणून ही तथाकथित कल्याणकारी योजना! गर्भारपण, मासिकपाळी नामक नैसर्गिक प्रक्रियांमध्ये स्त्रियांच्या रक्तातील लोह तत्व कमी होऊन त्यांना रक्तक्षय होत असतो. याखेरीज अनियमित निकृष्ट आहार अन नियमित उपवासामुळे हा आजार वृद्धिंगत होत असतो. या बाबतीत स्त्रीचे शैक्षणिक, आर्थिक अन सामाजिक स्थान कुठलेही असू दे, तिला या सार्वत्रिक समस्येने ग्रासलेले असते असे खेदाने म्हणावे लागेल. याला माझ्या आत्मानुभवाची जोड आहे. स्वतः कडे दुर्लक्ष करणे हा भारतीयच नव्हे तर अखिल स्त्रीजातीचा स्थायीभाव असावा. स्वतःला त्यागाची मूर्ती म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या स्त्रीला इतरांकडून प्रोत्साहन मिळाले तर यात दोष हा कुणाचा? 

शेवटी मला सर्व वयाच्या स्त्रियांना असे आवाहन करावेसे वाटते की कोणी ‘जेवलीस कां?’ असे म्हणो अथवा न म्हणो, आपण आपल्या रोजच्या सकस, संतुलित अन नियमित आहाराचे महत्व ध्यानी घ्यावे! पुरुषमंडळींना घरी यायला उशीर झाला तरी आपण झोपायच्या किमान दोन तास आधी आपली रात्री जेवायची वेळ कां चुकवायची?

…… तुम्हाला काय वाटतं?

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print