रामायणातील अनेक महत्त्वाच्या पात्रांबद्दल आपण आजवर चर्चा केली. राम आणि सीता यांच्या जीवन चरित्रावर पण आपण बोललो. पण या दोघांचे पती पत्नी म्हणून सहजीवन कसे होते ते आज पाहू या.
राम आणि सीता हे एकमेकांवर निस्सीम प्रेम असणारे एक असे अलौकिक जोडपे आहे की ज्यांची कीर्ती युगानुयुगे अमर राहील. राम आणि सीता यांना नियतीने एकत्र आणले होते. त्यांनी कधी एकमेकांना पाहिले नव्हते किंवा एकमेकांबद्दल ऐकले देखील नव्हते. विश्वामित्र ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन जातात. रामलक्ष्मण राक्षसांचा नायनाट करतात. अशा वेळी जनक राजाकडून सीतेच्या स्वयंवरासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण जनकाकडून विश्वामित्रांना येते आणि ते आपल्यासोबत राम लक्ष्मणाला घेऊन जातात.
जनकाने त्या विवाहासाठी एक पण ठेवलेला असतो, तो म्हणजे शिवधनुष्य उचलण्याचा. जेव्हा तेथे उपस्थित सगळे राजे ते उचलण्यात अयशस्वी होतात, तेव्हा विश्वामित्राच्या आदेशानुसार राम ते शिवधनुष्य उचलतो. ते त्याच्या हातून भंग होते. आणि मग सीता रामाला वरमाला घालते. मात्र विवाहापूर्वी सीता रामलक्ष्मणाला पुष्पवाटिकेत पाहते ,त्याचवेळा हा लावण्यमूर्ती असलेला राम तिच्या मनात भरतो. आणि त्याच्याशीच आपला विवाह व्हावा ही इच्छा तिच्या मनात निर्माण होते. सीता ही भूमीकन्या तर राम हा विष्णूचा अंश. त्यांच्या विवाहाने जणू भूमी आणि आकाश एकत्र येतात.
आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,
स्वयंवर झाले सीतेचे.
लग्नानंतर जेव्हा श्रीराम पित्याला दिलेल्या वचनानुसार वनवासाला निघतात, तेव्हा ते सीतेचा निरोप घ्यायला येतात. रामाशिवाय राहायचे ही कल्पना देखील सीता सहन करू शकत नाही. म्हणून राम जेव्हा तिला समजावतात की वनवासातले जीवन अत्यंत कठीण आणि दुःखदायक आहे. तेव्हा तू अयोध्येतच राहा. त्या प्रसंगी क्षणाचाही विचार न करता सीता म्हणते निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.
इतकी ती राममय झाली आहे. राम आणि सीता यांची शरीरे फक्त वेगळी आहेत. आत्मा एकच आहे. ते एकजीव झालेले आहेत. एवढेच नाही तर सीता ही रामाची शक्ती देखील आहे. सीतेशिवाय राम अपूर्ण आहे. म्हणून तो सीताराम आहे. त्यामुळे श्रीराम आपल्यासोबत वनवासात सीतेला घेऊन जातात. जसा राम हा सर्व बाबतीत आदर्श आहे तशीच सीता सुद्धा. ती आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून, आणि आपल्या दिरांवर पुत्रवत प्रेम करणारी वहिनी आहे.
सीतेला रामाच्या पराक्रमावर कधीही न ढळणारा विश्वास आहे. म्हणून वनवासात जेथे हिंस्त्र प्राणी आहेत, राक्षसांची भीती आहे अशा ठिकाणी सुद्धा रामाच्या पराक्रमावर श्रद्धा असणारी सीता त्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून निर्धास्त आहे. निर्भय आहे. एवढेच नाही तर वनवासातील हा रामासोबतचा काल तिच्या जीवनातला आनंददायक आणि सुखकारक असा काल आहे कारण या काळात आपल्या प्रिय राघवाबरोबर तिला राहायला मिळते. त्यापुढे राजप्रासादातील आणि स्वर्गातील सुखे देखील तिला तुच्छ आहेत.
रामाच्या पराक्रमावर तिचा किती विश्वास असावा, आणि रामावर तिचे किती प्रेम असावे याची साक्ष देणारा एक प्रसंग रामायणात आहे. रावण तिला पळवून घेऊन जाताना आपल्या शौर्याचे वर्णन तिच्यापुढे करतो. तो म्हणतो की मी देवांना सुद्धा बंदी बनवले आहे. तेव्हा सीतेने त्याला दिलेले उत्तर अतिशय सुंदर आहे. ती म्हणते, ‘ तू कसला शूर आणि पराक्रमी ? तू तर सिंहीणीचे हरण केले आहेस. एखाद्या कोल्ह्याप्रमाणे . माझे पती राम म्हणजे नरसिंह आहेत. आणि कोल्हा कधीही सिंहाची बरोबरी करू शकत नाही. ‘ किती सुंदर आणि बाणेदार उत्तर आहे. तेही रावणासारख्या महापराक्रमी पुरुषाला न घाबरता धिटाईने दिलेले.
आता तिला रावणाने पळवून नेल्यानंतर रामाची काय अवस्था होते ? तर तो प्रचंड शोकविव्हल होतो. सीतेचा विरह त्याला सहन होत नाही. जणू रामाची शक्तीच हरवते. असे त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम असते. रावणाच्या लंकेत काही काळ काढला म्हणून ती अपवित्र झाली असे लोकांनी म्हणू नये म्हणून सीता अग्निपरीक्षा देते. तिच्या मनात एका रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नसतो. म्हणून तर अमर अशा पाच पतिव्रतांमध्ये सीतेचे नाव घेतले जाते. अर्थात रामाच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही शंका नसते. ती पवित्र आहे हे राम जाणून होता. लोकांना असे वाटते की राम जर आदर्श पती असेल तर त्याने सीतेचा त्याग का केला ?
त्याचे उत्तर असे देता येईल की रामायण काळात राजघराण्यातील व्यक्तींबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल आपली मते व्यक्त करण्याची लोकांना मुभा होती. आताही आपण जी रामायण मालिका पाहतो आहोत, त्यातही दशरथ, कैकयी, भरत इ बद्दल चर्चा करताना लोकांना वेळोवेळी दाखवले आहे. अशाच पद्धतीने सीता परत आल्यानंतर नगरवासी तिच्याबद्दल चर्चा करत होते. रामाच्या कानावर ही वार्ता येते. कोणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून रामाने सीतेचा त्याग केलेला नाही तर अयोध्यानगरीतील अनेक पौरजनांच्या मनात ही शंका होती.
या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी राम हा केवळ पती नव्हता. तो राजा देखील होता. या प्रसंगाच्या निमित्ताने त्याचा पतिधर्म आणि राजधर्म यात संघर्ष निर्माण झाला आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की राम कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाही. रामायणातले अनेक प्रसंग त्याची साक्ष देतात. तो आधी प्रजाहितदक्ष आणि कर्तव्यकठोर राजा आहे आणि बाकीच्या सगळ्या भूमिका नंतर. जेव्हा कुटुंब आणि राष्ट्र यांच्यात निर्णय घेण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कुटुंबाच्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्रभावनेला परमोच्च महत्व दिले पाहिजे. ‘ ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत ‘ रामाने तेच केले. आपल्या राज्यासाठी त्याने हा सर्वोच्च त्याग केला. रामाने पत्नीचा नव्हे तर राजाने राणीचा त्याग केला आहे. रामाच्या मनात पत्नी म्हणून सीतेचे स्थान कायमच आहे. रामाच्या या स्वभावाची सीतेला देखील कल्पना होती. म्हणून तिला आपल्यावर हा झालेला अन्याय आहे अशी तिची तक्रार नव्हती.
रामाने तिचा त्याग केला असता तर त्याला दुसरे लग्न करता आले असते. यज्ञाच्या वेळी दुसरी पत्नी करता येते असे रामाला सांगितले गेल्यावर सुद्धा राम त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देतो. तो म्हणतो की रामाच्या हृदयसिंहासनावर एकाच व्यक्ती पत्नी म्हणून विराजमान आहे. आणि ती म्हणजे फक्त सीता. म्हणून दुसरे लग्न न करता सीतेची सोन्याची मूर्ती तयार करून यज्ञाला बसतो. इतके प्रेम रामाचे सीतेवर आहे. त्यामुळे तो जेव्हा राजाच्या भूमिकेत होता, तेव्हा राजाचे कर्तव्य त्याने पार पडले. आणि पतीच्या भूमिकेत होता, तेव्हा एका सीतेशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार त्याच्या मनात नव्हता. म्हणून तो आदर्श पती सुद्धा आहेच. राम आणि सीता यांचे सहजीवन आदर्श सहजीवनाचा एक सुंदर नमुना आहे. आणि राम सीता ही एक अलौकिक प्रेमकथा सुद्धा.
मी गेली अंदाजे तीस वर्षे याच रस्त्यावरून जातो आहे. शाळेत असताना याच रस्त्यावरून सुरवातीला चालत, मग सायकलवरुन आणि हल्ली काही वर्षे स्कुटर वरुन किंवा गाडीतून.
शाळेत असताना मी आणि माझे मित्र आमच्या घरापासून अंदाजे दिढ किलोमीटर अंतरावर थोडी विश्रांती घयायचो.रस्त्याच्या आजूबाजूला काही आंब्याची, रतांब्याची, फणसाची झाडें होती, या ठिकाणी एक जांभळीचे झाड होते. माझे मित्र मोठया आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घ्यायचे पण मी मात्र या जांभळी खाली थांबायचो. त्या झाडाच्या सावलीखली दोन मिनिटे थांबून आम्ही पुन्हा चालू लागायचो किंवा सायकलवर पुन्हा बसायचो.
जाता येता त्या जांभळीच्या झाडाकडे का कोण जाणे पण माझे लक्ष असायचेच. जानेवारी महिना आला की झाडाला पालवी फुटायची, हिरवीचुटुक पालवी, मग हळूहळू लहान लहान हिरवी फळे मग ती तांबळी होतं, जासजस उन्हाळा वाढू लागला की तांबडी जांभळे काळी होतं.
या झाडाला घोसाने जांभळे लागत. जांभळे पिकली की काळिभोर जांभळे टपटप खाली पडत, मग खाली भटकी कुत्री जमत आणि जांभळे खात आणि मे अखेर पर्यत धस्थपूष्ठ होतं.
आम्ही मित्र पण जांभळी खाली जमायचो, आमच्यातील माझ्यासकट सर्व झाडावर चढायचे.पिशवीभर जांभळे काढायचो आणि घरी नेऊन घरच्याना दयायचो. जांभळीचे झाड अत्यन्त कोरम असते, त्याच्या फानदी वरुन आम्ही कधी ना कधी पडून हात, ढोपरे मोडून घेतली आहेत.
मी वकिली शिक्षण मुंबईमध्ये घेतले आणि पुन्हा आमच्याच या तालुक्याच्या गावी प्रॅक्टिस करू लागलो. पुन्हा घरून याच रस्त्यावरून जाऊ येऊ लागलो जातायेता या झाडावर माझे लक्ष असेच.
गाव वाढले, वस्ती वाढली, लोकांनी लांब घरे घेतली. त्या झाडाखाली आता भाजीवाली, फळवली बायका बसू लागल्या.मी मुद्दाम जांभळीखाली बसणाऱ्या मावशीकडून कधी भाजी, कधी शेंगा, कधी आंबे घेऊ लागलो. माझ्या बरोबर कधी कधी बायको असायची ती पण भाजीवल्या मावशीच्या ओळखीची झाली.
एक दिवस चांगल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हणून मी थांबलो, तशी भाजीवाली मावशी मला सांगायला लागली
“भाऊंनू, आमका आता दुसरी जागा बघूची लकतली ‘
“कशाक?
“ह्या जागेची मोजणी सुरु आसा दोन दिवस, रस्त्याच्या रुंदीकरण सुरु होतला. ही झाडा पण तोडतले म्हणतात ‘.
“काय, झाडा तोडतले? म्हणजे ही जांभळी पण..
“होय तर, ह्या जांभळीवर पट्टे मारलेत ते काय, सरकारचे म्हणून ‘.
मला एकदम टेन्शन आले, गेली कित्येक वर्षे या इथे जांभळीला पहायची सवय, ते झाड तोडणार? मग या झाडावरची जांभळे खाणाऱ्या पक्षी, कावळे, कुत्री, आम्ही माणसे यांनी काय करावे? या झाडा पासून मिळणारी सावली, आमच्यापासून हिरावून नेणार?
मी दुसऱ्या दिवशी रस्ते बांधकाम विभागात गेलो आणि चौकशी केली. तेथल्या अधिकाऱ्याने मला तेंच उत्तर दिले
“वाहने खुप वाढली आहेत, सध्याचा रस्ता पुरा पडत नाही, रुंदीकरण करायला हवे, असे सरकारचे म्हणणे, मोजणी झाली आहे. पुढील महिन्यात काम सुरु होईल, त्यामुळे झाडें तोंडावीच लागतील,’.
मी दोन दिवसांनी जिल्हा कलेक्टरना भेटलो आणि या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणारे पत्र त्यांच्या हवाली केले. कलेक्टरसाहेबांचे तेंच म्हणणे. त्या भागात आता वस्ती वाढली आहे. याच रस्त्यावरून हायवे कडे जाता येते, त्यामुळे रुंदीकरण करावेच लागेल.’.
कोणीच दिलासा देत नाही हें पाहून मी कोर्टात सरकार विरुद्ध दावा ठोकला. मी स्वतः वकील होतोच.कोर्टाचा निकाल लागेपर्यत रुंदीकरण थांबले.
शेवटी कोर्टात केस उभी राहिली. सरकारच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्या नंतर मी कोर्टाला म्हणालो “रस्ता रुंदीकरण करणे आवश्यकच असेल तर करा पण झाडें का तोडता?
माननीय कोर्टाने मला विचारले “वाटेल आलेली झाडें तोडल्याशिवाय रुंदीकरण करणे शक्य आहे काय? तुम्हाला झाडें तोडू नये असे वाटतं असेल तर झाडें उचलून दुसरीकडे लावा’.
“हें कसे शक्य आहे? मी विचारले.
कोर्ट म्हणाले “शक्य आहे. काही देशात झाडें कुपळून दुसरीकडे लावतात आणि ती जगतात, तुम्ही हवे असल्यास माहिती घ्या ‘.
मी विचार केला आणि कोर्टाला विचारले “मला या रस्त्यावरील जांभळीचे झाड मिळाले तर मी ते माझ्या बागेत लावू इच्छितो, त्याची परवानगी द्यावी ‘.
कोर्टाने मला जांभळीचे झाड न तोडता दुसरीकडे लावायची परवानगी दिली.
मी कोर्टाचा निकाल हातात घेतला आणि आमच्या शहरातील कॉलेज मधील biology चे प्रोफेसर वर्दे यांना भेटायला गेलो.
वर्दे यांना विचारले “असे झाड जमिनीतून कुपळून काढून दुसऱ्या ठिकाणी लावणे शक्य होते काय?
“होय, हल्ली परदेशात मोठमोठे वृक्ष कुपळून ते दुसऱयाठिकाणी लावली गेली आणि ती जगली, अशी उदाहरणे आहेत.’
वर्देनी मला या संबधी माहिती असलेली पुस्तके दिली.
मी घरी आलो आणि बायकोला मी जांभळीचे झाड रस्त्यावरून काढून आपल्या आवारात लावतो आहे, असे सांगितले.
बायको माझ्यावर चिडली. असले नको ते धंदे का करता, अशी झाडें कधी जगत नाहीत ‘असे सांगून माझा हिरेमोड करू लागली. मी तिला सांगितले “लहानपणा पासून त्या जांभळीच्या झाडाला मोठे होताना, त्याला जांभळे लागताना, त्या झाडाची जांभळे खाताना मी पाहिले आहे. ते झाड तोडून त्याचे सरपण करावे, हें मला पाहवणार नाही.
माझा हा कदाचित वेडेपणा असेल कदाचित पण माणसाने कधीतरी वेडेपणा करायला हवा. मी तो करणार आहे. तुला पटत नसेल तर मला साथ देऊ नकोस पण मला या वेडापासून दूर नेऊ नकोस ‘
माझा स्वभाव माहित असल्याने बायकोने बडबड केली आणि ती गप्प बसली.
मग मी कामाला लागलो. माझ्या ओळखीच्या शिवा लमाणीला बोलावले आणि त्याला माझ्या घराच्या मागील जागा दाखवली. त्याच्या माणसानी जागा साफ केली आणि चार बाय चार खड्डा खणला. त्यात जुना पालापाचोळा, शेणखत आणि मुंगीची पावडर टाकली. सतत दोन दिवस पाणी त्या खड्ड्यात ओतले आणि माती भुसभूशीत केली.
मग आमचा मोर्चा रस्त्यावरील जांभळीच्या झाडाकडे वळवला. कुदली फवडीने झाडाभोवती खणत आणि कमीत कमी पाळे तोडून दहा कामगारांनी झाड बाहेर काढले आणि ट्रॉली मध्ये ठेवले.मग ट्रॉली आमच्या घराकडे निघाली.
घराच्या मागच्या बाजूला तयार केलेल्या खड्यात जांभळीचे झाड उभे केले आणि त्यात माती भरली, शेणखत भरले वर पाणी ओतले.
☆ हा माणूस परका ? – लेखक – श्री महेश कुलकर्णी ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆
सिगफ्रीड वुल्फ
हा माणूस परका ?
तर लेखासमवेत असेलला फोटो पाहून तुम्ही म्हणाल, “काय हे, आजच्या दिवशी परक्या माणसाचा फोटो टाकतोय?” पण त्यामागे कारणच तसे आहे. फोटोमधील माणसाचे नाव आहे Mr. Siegfried Wolf. Mr.Wolf हे Universität Heidelberg मध्ये प्राध्यापक आहेत. तर त्यांच्याबद्दल लिहिण्याचे कारण असे की, २०१४ मध्ये आम्ही German भाषा शिकत होतो. भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले होते. वीर सावरकर ह्यांच्या ऐतिहासिक उडीबद्दल काही जुने लेख आणि छायाचित्र त्या काळी German वृत्तपत्रांमध्ये झळकली होती, असे आमच्या ऐकिवात होते. ती इंटरनेटवर मी German भाषेत शोधत होतो आणि ते शोधत असताना मला एक PDF मिळाली. तर ती pdf होती वीर सावरकर ह्यांच्यावर लिहिलेली जवळ जवळ ७०० German पाने आणि लेखक होते हे Mr.Wolf. Mr.Wolf ह्यांच्या पुस्तकाचे PHD च्या विषयाचे नाव खालीलप्रमाणे: Thesis: ‘The Construction of a Collective Identity in India: Vinayak Damodar Savarkar and his Hindutva-Concept’, final grade : Magna Cum Laude.
त्यांचा PHD चा विषय पाहून आणि ७०० German पानांचे पुस्तक पाहून मी थक्क झालो. मी त्यांना लगेच ईमेल पाठवून धन्यवाद दिले.
एखादा परकीय माणूस आयुष्याची ६ वर्षं वीर सावरकर ह्यांच्यावर PHD करण्यात घालवतो आणि आपण साधे त्यांचे विचार on to the last man पोहोचवू शकत नाही, ह्याची मला तर शरम वाटते. आम्ही Germany मध्ये असताना ह्या सदगृहस्थांना भेटता आले नाही, पण भविष्यात त्यांना आम्ही नक्की भेटू. वीर सावरकर ह्यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा म्हणून Germany मधून काही हालचाली करता येतील का? अशा आशयाचे पत्र मी त्यांना आता पाठवणार आहे.
वीर सावरकर अमर रहे… अखंड भारत अमर रहे.!!
लेखक : श्री महेश कुलकर्णी
प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे-जोशी.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ दासबोधातील समर्थ बोध… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
दासबोधातील समर्थ बोध
मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥
सरळ अर्थ :-
लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत, ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुसद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा.
विवेचन:-
समर्थांचे जीवन चरित्र या ओवीत सामावले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. समर्थांच्या चरित्राचा ढोबळमानाने अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की पहिली बारा वर्षे ते घरी होते, नंतरची बारा वर्षे टाकळी येथे त्यांनी साधना केली. त्यानंतर बारा वर्षे देशाटन करून त्यांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर पुढील ३६ वर्षे त्यांनी राष्ट्राचे पूनरूत्थान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
आज आपण जे सुरक्षितता (safety) या विषयाबद्दल बोलतो, लिहितो त्याबद्दल हा विलक्षण आगळावेगळा संत सुमारे चारशे वर्षांपूर्वी लिहून गेला आहे, असे आपल्या लक्षात येईल.
समर्थांनी आधी हरिकथा केली, अर्थात स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर मिळवलेली विद्या, ज्ञान देशभर भ्रमंती करून तपासून पाहिले आणि त्यानंतर महाराष्ट्रात त्याचा यशस्वी प्रयोग केला…!
समर्थांचे काही आवडते शब्द आहेत. त्यामध्ये विवेक, प्रयत्न आणि सावधान किंवा सावधानता यांचा क्रम खूप वरचा आहे.
मनुष्याने कोणतेही कार्य करताना आपले विहित कार्य ( अर्थात हरिकथा) सोडू नये असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. व्यवहारात असो परमार्थात मनुष्याने अत्यंत सावधान असले पाहिजे. अन्यथा त्याला कोणीही लुबाडेल.
मनुष्य प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक त्याने वरील ओवी कायम लक्षात ठेवावी आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा असे समर्थ आपल्याला सांगत असावेत.
जय जय रघुवीर समर्थ
(तळटीप : या निमित्ताने समर्थांचे चरित्र प्रत्येक वाचकाने वाचावे असे मी आपल्याला सुचवीत आहे.)
☆ भोजन– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
लहानपणी खूप पदार्थ नसायचे.
जेवणाच्या बाबतीत लाडही नसायचे.
आईचा स्वयंपाक होत आला की पाटपाणी घ्यायचे.
त्यात सुध्दा क्रम आणि जागा ठरलेली असायची.
पाट, पाण्याचे लोटी-भांडे ,ताट , वाटी (चमचा गरज असेल तर) , हातांनीच जेवायचे.
पान पद्धतशीर वाढायचे. घरात जेवायला केलेले सगळे पदार्थ अगदी थोडे थोडे वाढले जायचे. नैवेद्य दाखवल्यावर जेवायला सुरवात करायची. आधी श्लोक म्हणायचे. एका सुरात, एका तालात.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,
उदर भरण नोव्हे जाणिजे यज्ञ कर्म.
पानात पहिले वाढलेले सगळ्यांनी खायचेच.मग लागेल तसे परत घ्यायचे.
पानात काहीही टाकायचे नाही.आवड नावड नाही . पहिले वाढलेले सगळे खायचे.नको असेल तर परत घ्यायचे नाही. हा दंडक होता.ही शिस्त होती.नावडते पदार्थ पाण्याच्या घोटाबरोबर गिळायचे, पण पानात काही टाकायचे नाही. जेवणाला नावे ठेवायची नाहीत.पदार्थ कसाही झाला तरी खायचा.माऊली कष्टाने रांधून , प्रेमाने सगळ्यांना जेवायला वाढतेय.साक्षात अन्नपूर्णा आहे ती.कशालाही नावं ठेवायची नाहीत.पूर्वी स्टोव्हवर,चुलीवर, कोळश्याच्या शेगडीवर स्वयंपाक करायचा. कधीतरी पदार्थाला धुराचा किंवा रॉकेलचा, करपलेला वास यायचा. पण न बोलता जेवायचे. खूप कडक शिस्त होती.नसते लाड चालायचेच नाहीत.अन्नाला नावे ठेवायची नाहीत.
शाळेतही श्लोक म्हणूनच डबा खायचा.एकमेकांना वाटावाटी करुन खायचा.समजा कोणी आणला नसेल तर त्याचंही पोट भरायचे.हे संस्कार न कळत घडत होते.
जनी भोजनी नाम वाचे वदावे ,
अती आदरे गद्य घोषे म्हणावे
हरी चिंतने अन्न सेवेत जावे ,
तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे ..
धुवा हात पाय चला भोजनाला
बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला
नका मागू काही अधाशीपणाने
नका टाकू काही करा स्वच्छ पाने.
आई नेहमी म्हणायची, ‘खाऊन माजावे पण टाकून माजू नये.अन्नाचा शाप बाधतो.’ अर्थ फारसा कळायचा नाही.पण पानात वाट्टेल ते झाले तरी टाकायचे नाही, हा संस्कार सहज घडला.अन्नाचा कणही वाया जाता कामा नये,असा सक्त नियम होता.
मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझिया हातूनी देशसेवा
त्यासाठी मला शक्ती दे देवराया..
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल कृषीकर्मी राबती दिनरात
श्रमिक श्रम करुनी वस्तु या निर्मितात
करुन स्मरण तयांचे अन्न सेवा खुशाल
उदरभरण आहे चित्त होण्या विशाल.
अशा श्लोकांतून अन्नसेवनाचा संस्कार सहज घडतो.
आपल्यावर झालेला संस्कार पुढच्या पिढीवर रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा.आज सगळं बदललं आहे तरी आपण सांगत राहायचे.ह्याचा परिणाम होतो.आधी विरोध होईल.वेळ नसतो आम्हांला, हे ऐकून घ्यावे लागेल.ही शाश्वत मूल्ये ,जीवनमूल्ये आपल्याला मिळाली, ती सांगत रहायची ,रुजवत राहायची.
नको तिथे लाड नाहीत.वेळच्या वेळी सांगायचे .त्यामुळे चांगली शिस्त, संस्कार मनात रुजतात.सगळ्या भाज्या, पदार्थ आवडीने खाल्ले जातात .पानात पडेल ते खायचे. टाकायचे नाही. हवे तेवढेच घ्यायचे .दोन घास कमी पोटात गेल्याने काही बिघडत नाही.हे विचार मिळतात.
गोष्ट छोटी असते.संस्कार महत्त्वाचा.
तेव्हा लग्नाच्या पंगतीतही ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक खणखणीत आवाजात म्हटला जात असे.
‘पार्वतीपते हर हर महादेव’च्या गजराने भोजनास प्रारंभ होत असे. लहान मुलांनाही पंगतीत बसून हवं नको विचारुन वाढले जात असे.पान स्वच्छ केल्याशिवाय उठता येत नसे.
लहान असताना बोडणाला कुमारिका म्हणून जेवायला एकटेच जावे लागे. बोलावणे आल्यावर ‘नाही’ म्हणत नसत.
लहान मुलांनाही बटू म्हणून जेवायला जावेच लागे. कळतनकळत पानात न टाकता सगळे व्यवस्थित जेवण व्हायचे.
बदल करायचा कालानुरूप पण शाश्वत जीवनमूल्यं सोडायची नाहीत. तोच आपल्या समृद्ध जीवनाचा पाया आहे. त्यातला भाव , मर्म समजून घ्यायचे अन्नदान हा संस्कार आहे.
अन्न वाया घालवणे हा माज आहे.
अन्नाचा त्या पूर्णब्रह्माचा अपमान करायचा नाही, हा संस्कार आहे.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कुठल्याही गोष्टी चा सुवर्णमध्य हा निश्चितच चांगला असतो. कुठलीही टोकाची भूमिका, मते ही बरेचवेळा चुकीच्या मार्गाने जाण्याची संभावना असते. हा नियम वाढदिवस साजरे करणे, विशिष्ट दिवस साजरे करणे ह्याला लागू पडतो. मान्य आहे काही नाती अशी असतात की त्याला विशिष्ट दिवशीच महत्व असतं अस नसतं पण ते साजरे केले तर तो दिवस ती व्यक्ती, ते नातं आपल्या मनात दिवसभर रुंजी घालून आपला दिवस आनंदात घालवत हे पण खरं.
१६ जून ! फादर्स डे. मला बाबांची आठवण, त्यांच्या बरोबर घालवलेला काळ हा संपूर्णपणे आठवतो, अजूनही त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून खुप आनंद मिळतो. पण खास करून त्यांच्या वाढदिवशी म्हणा किंवा फादर्स डे ला ते संपूर्ण दिवसभर मनात असतात.
बाबा”हा शब्द दिसायला छोटा, अगदी साधासरळ,सुटसुटीत. पण ह्या इटुकल्या पिटुकल्या शब्दांत काय काय सामावलेलं असतं बघा.ह्या शब्दांत असतं प्रेम,जिव्हाळा, भक्कम आधार, संकटकाळी मौनातून मिळणारा दिलासा.म्हणूनच की काय सहसा मूल जे सुरवातीचे एक दोन शब्द बोलायला शिकतो त्यात”बाबा हा शब्द असतोच असतो.
“बाबा”ही व्यक्ती अशी असते नं तिच्याबद्दल आईवर वा आईशी बोलतो तितकं भरभरून बोलल्या जात नाही .पण मनाचा एक अख्खा पूर्ण कप्पा आपल्या बाबांनी व्यापलेला असतो.त्यांच्याबद्दल भरभरून शब्द बाहेर पडत नाहीत पण मौनातल्या आणि मनातल्या ह्या प्रेमाची,हक्काची,खंबीर पाठींब्याची पकड जबरदस्त असते. बाबा हा प्रत्येकाचा असा नाजूक कोपरा असतो नं मग ते बाबा अति अति विख्यात लता मंगेशकर ह्यांचे असोत की माझ्या सारख्या अति अति सामान्य साधना केळकर हिचे असोत. बाबा इज बाबा ! खरचं वडीलांची जागा आपल्या सगळ्यांसाठीच स्पेशल.
मला नं बाबा असा उल्लेख आला की नेहमी कवी “बी”ह्यांची “गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या”ही कविता आठवते. ह्या कवितेचं वर्णन करायचं तर ही भावपूर्ण अर्थ असलेली अफाट लोकप्रियता लाभलेली कविता असं म्हणता येईल. ह्या कवितेची आठवण म्हणजे आम्हां भावंडांना पाळण्यावर झोपवितांना बाबा त्यांच्या सुरेल आवाजात आम्हाला ऐकवतं. तेव्हा ही कविता बाबांच प्रेम,ते करीत असलेले लाड,त्यांनी केलेले कौतुक झेलीत खूप आवडायची. अर्थ समजायच तेव्हा वयचं नव्हतं. पण ती कविता बाबांनी ऐकविल्याशिवाय आम्हाला झोपच यायची नाही. पुढे बाबा आमच्या मुलांना झोपवितांना,खेळवितांना ही कविता गायचे तेव्हा त्यातील शब्दनशब्द खरोखरच अंतर्बाह्य हलवून जायचा, ह्यातच ह्या कवितेची महती आली.
माहेरी जातांना प्रत्येक खेपेला आम्ही घरी पोहोचण्याच्या नेमक्या वेळी बाबा व-ह्यांडात पेपर हातात घेऊन बसलेले असतात. हातात पेपर,नजर मात्र रस्त्याकडे,आमची वाट बघत असलेली,कान आमची चाहूल घेत असतात. हे क्षण आम्हा माहेरवाशिणींसाठी लाखमोलाचे बरं का. सहसा मुलांना वडिलांकडून खूप अपेक्षा असतात.पण एका इंटरव्ह्यू मधील अनुराग कश्यप चे वाक्य मनाला खूप भिडून गेले ते म्हणाले,” जितक्या वर्षांचे आपण स्वतः असतो तितक्याच वर्षांचं आपल्या बाबांचं वडीलपणं असतं. आधी ते माणूस असतात मग आपण झाल्यावर ते बाप बनतात”. खरचं ह्या अँगलने कधी विचारच आला नव्हता मनात. संसारात दोघेही कमावते असले तर एकावर आर्थिक बाबतीत पूर्ण ताण येत नाही. त्यामुळे बाबा नेहमी त्यांच्या कार्यालयातील सहका-यांना आर्थिक मदत करायचे.अशा कित्येक लोकांच्या अडीनडीला ते धाऊन जात आणि ते ही अगदी कुणालाही न सांगता. त्यांनी केलेली मदत ह्या हाताची ह्या हाताला देखील कळतं नव्हती. जेव्हा ते लोक पैसे परत करुन आभार मानायला येतं तेव्हाच कळायचं. अशात-हेने कित्येक सहका-यांच्या मुलांच्या शिक्षणात तसेच लग्नकार्यात ह्यांच्या मदतीचे योगदान असायचे.
ती सोसायटीत नवीनच राहायला आली होती .येता जाता बोलून सगळ्यांशी तीची मैत्री झाली. काही दिवसातच कळलं की ती तथाकथीत सुधारणावादी मताची आहे. अध्यात्म, पूजा मंत्र, स्तोत्र काही न.. करणारी …सडेतोड बोलणारी आहे.
तिच्याशी गप्पा तशाच व्हायच्या. हळदी कुंकवाला बोलावलं तर साडी नेसून येऊन जायची पण नंतर तिच्या कॉमेंट्स सुरूच असायच्या…. “तुम्हाला कंटाळा कसा येत नाही हे सगळं करत बसायला? तासंतास कस ग बसता त्या पोथ्या परत परत वाचायला? तीच तीच स्तोत्र म्हणून काय मिळतं तुम्हाला ?…नवीन काहीतरी जरा वाचा….”
आईने दिलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा तिने डब्यात ठेवून दिली होती. हे तिनेच आम्हाला सांगितले.
पहिले काही दिवस यावरून गरमागरम चर्चा व्हायची. ती त्याला ठामपणे उत्तर द्यायची. काही दिवसांनी लक्षात आलं त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये …मग मात्र आम्ही ठरवलं आता यावर बोलायचं नाही. मैत्रीण म्हणून ती छान आहे ना मग झालं …..
असू दे …आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं त्याप्रमाणे तो वागत असतो.अस सुरू होत.. बरीच वर्षे झाल्यानंतर सगळ्यांना तिची सवय पण झाली..
नंतर एके दिवशी तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढवला..
ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं .नवऱ्याने प्रकरण गंभीर आहे हे ओळखलं .ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं. मेंदूत रक्तस्त्राव झाला होता .अगदी माइल्ड होता.. आणि लगेचच ऍडमिट केल्याने फार फायदा झाला.
हळूहळू सुधारणा होईल डॉक्टरांनी सांगितले .तरी बरेच दिवस ती दवाखान्यात होती .
नंतर बरी झाली पण उच्चार इतके स्पष्ट येत नव्हते.
तिला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी डॉक्टरांनी औषधं कशी घ्यायची खबरदारी काय घ्यायची हे नीट समजावले .आणि सहज म्हणाले..
“अजून एक तुम्हाला सांगू का ?घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो .
प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम…”
डॉक्टरांचे ते बोलणं ऐकून ती थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. डॉक्टर असं काही सांगतील असे तिला वाटलेच नव्हते.
“हो हो” असं त्यांना म्हणाली .
घरी आल्यानंतर चार दिवसांनी तिच्या मनात काय आले कोण जाणे? डॉक्टरांनी स्वतः सांगितले आहे तर हा उपाय पण करावा असे तिला वाटले. फोन करून तिने मला हे सांगितले.
“तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं…”
तिला म्हटलं “अग तुला बरं व्हायचं आहे. आता बाकी काही बोलु नकोस. माझ्याकडे सज्जनगडावर रामदासीबुवांनी म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे. ती तुला पाठवते. ती तू ऐक .कुठल्याही दुकानात तुला रामरक्षेचे पुस्तक अगदी पाच दहा रुपयात मिळेल. ते आणून घे आणि बघून म्हण….”
तिचा गळा दाटून आला होता…. “नीता”.. एवढेच ती म्हणाली
” राहू दे उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस.मात्र शांतपणे ,श्रद्धेने, मनोभावे म्हणत रहा. तुझा विश्वास नाही हे माहित आहे. तरी बरं होण्यासाठी तरी कर.. हा फिजीओथेरपीचा एक प्रकार आहे असं समज … थोडे दिवस करून तर बघ मग आपण निवांत बोलू “तिला म्हणाले.
काही दिवसांनी तिने मला भेटायला बोलावले .
“हे बघ” ती म्हणाली
बघितले तर चक्क… छोट्याशा देवघरात बाळकृष्ण अन्नपूर्णा ठेवले होते. शेजारी समई मंद तेवत होती .समोर दोन निरांजन तबकात होती. उदबत्तीचा मंद सुगंध येत होता. फुलं वाहिली होती. शेजारीच रामाचा फोटो होता .त्याला मोगऱ्याचा गजरा घातला होता. मी बघतच राहिले.
ती म्हणाली
“काय झालं माहित नाही… पण ऑनलाइन हे सगळं मागवलं अंतरंगातूनच काहीतरी वाटलं असं करावं ..खरंच ग… खूप शांत समाधानी वाटतं आहे .तुम्ही हे का करत होता हे आजारी पडल्यानंतर मला कळलं. इथे समोर बसून रामरक्षा म्हणताना काही तरी भारल्यासारखं वेगळच वाटत होतं .मला ते तुला शब्दात सांगता येणार नाही.”
” राहू दे गं …तु ते अनुभवलसं बरी झालीस हे महत्त्वाचं. आता तू पण हा आनंद घे.”
तिला पसायदान ,मनाचे श्लोक आणि हरीपाठ अशी पुस्तकं दिली .
तिचे डोळे भरून वाहयलाच लागले होते ……असु दे होत कधी असंही…
ती पूर्ण बरी झाली याच श्रेय डॉक्टरांनाच आहे. मात्र त्या अवघड वेळी तिला रामरायाने मानसिक आधार दिला …पूजा ,जप ,स्तोत्र पठण यासाठी तर करायचे असतात. प्रयत्न, कष्ट आपण करायचे असतात .पण त्याचा हात हातात असू द्यायचा. तो सांभाळतो.. कोणीतरी एका अदृश्य शक्ती आहे तिच्यावर विश्वास ठेवायचा .
जमेल तशी साधना करायची . श्रद्धेने भक्ती करायची.त्याने मन खंबीर बनतं.दोघांचा मेळ जमला की मग शरीरही बरं होण्यासाठी साथ देतं .
डॉक्टर तर तिला म्हणाले होते .. “काहीही येत नसेल तर नुसती बाराखडी तरी म्हणा.”
☆ तस्वीर तेरी दिल में… जिस दिन से उतारी है!☆ श्री संभाजी बबन गायके☆
तस्वीर तेरी दिल में… जिस दिन से उतारी है!
… (शार्लटची चारूलता होताना !)
स्वीडन या संपन्न देशातल्या एका राजघराण्यातली ही गोंडस,सुंदर,देखणी राजकन्या….शार्लट ! तिच्या नावाचं इंग्लिश भाषेतील स्पेलिंग Charlotte असं काहीसं तिरपागडं आणि आपल्याला चार्लेट असा उच्चार करायला उद्युक्त करणारं. युरोपातले पालक आपल्या मुलीचं नाव ठेवायचं झाल्यास याच नावाला पसंती देतात. .. या नावाचा एक अर्थ ‘नाजुक’ असाही होतो. आणि ती होतीही तशीच. सडपातळ आणि सिंहासारखी कटी असलेली….जणू एखादी नाजूक वेल,लता ! हीच शार्लट चारूलता कशी झाली याची ही हृदयंगम कहाणी.
शार्लट अठरा-एकोणीस वर्षांची असेल. मनानं कलावंत असलेली शार्लट सातत्याने कलेची उपासना करण्यात दंग असे. तिला माणसांत आणि माणसांच्या चित्रांमध्ये खूप रस होता. रेषा आणि रंगांनी कागदावर साक्षात माणूस चितारता येतो याची तिला खूप गंमत वाटे. लंडन येथील एका कला महाविद्यालयात ती चित्रकला शिकत होती. व्यक्तिचित्रं साकारू शकणाऱ्या सर्वोत्तम कलाकाराच्या शोधात ती होती…तिलाही हे तंत्र शिकून घ्यायचं होतं.
ही कला अंगी असणारा एक अवलिया माणूस तिच्या घरापासून ९७०० किलोमीटर्सवर आहे, हे तिला माहीत झाल्यापासून ती त्याला भेटायला उतावीळ झाली. आणि आपल्या व्हॅनमधून त्याच्याकडे निघाली सुद्धा. लंडनवरून तब्बल बावीस दिवसांनी ती दिल्लीत पोहोचली….तिला हवा असणारा कलाकार इथेच तर होता. प्रद्युम्नकुमार त्याचं नाव. महानंदिया हे कुलनाम. ओरिसातल्या अत्यंत दुर्गम भागात जन्मलेला हा तरूण पुस्तकी अभ्यासापेक्षा निसर्गामध्ये, रंगांमध्ये जास्त रमतो याची त्याच्या पोस्टमनची नोकरी करीत असलेल्या वडिलांना अतिचिंता होती. त्याचे ग्रह काय म्हणताहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रद्युम्नची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवली….’ हा मोठा कलावंत तर होईलच पण याचं लग्न दूरवरच्या एखाद्या सुंदर,श्रीमंत मुलीशी होईल…तिची राशी वृषभ असेल ! आणि तीच याला शोधत येईल ! ‘
– आपले वडील आणि ते ज्योतिषी यांच्यातला हा संवाद छोटा प्रद्युम्न चोरून ऐकत होताच….त्या लहान मुलाला तोवर लग्न वगैरे विषय माहीत नव्हता…पण आपल्या पत्नीची राशी वृषभ असेल हे त्याने पक्के ध्यानात ठेवले !
प्रदयुम्न प्रचंड जातीयवाद,गरीबी,अवहेलना यांना तोंड देत देत शेवटी चित्रकलेच्या शिक्षणासाठी दिल्लीत पोहोचला. शिकताना उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याने लोकांची पोर्टेट्स काढून देऊन सोडवला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे हुबहू पोर्टेट काढून प्रदयुम्न यांनी सर्वांची वाहवा मिळवली. एक दर्जेदार कलाकार म्हणून प्रदयुम्न आता दिल्लीत प्रसिद्धीस आले आणि याच जोरावर त्यांनी दिल्ली प्रशासनाकडून कनॉट प्लेसमधील प्रसिद्ध आणि पवित्र कारंज्याजवळ पोर्टेट काढून देण्यासाठी बसण्याची परवानगी मिळवली.
गोष्ट आहे १९७५ मधली. प्रद्युम्न असेच त्या कारंज्याजवळ बसून लोकांची पोर्टेट्स काढून देण्यात मग्न होते. शार्लट त्यांच्यासमोर उभी राहिली…’ माझं पोर्टेट काढून द्याल?’ तिच्या प्रश्नाने ते भानावर आले आणि आपल्यासमोर प्रत्यक्षात जणू एक चित्रच उभे असल्याचं त्यांनी पाहिलं…चार्लट ! ती त्यांच्यासमोर बसली. त्यांनी तिच्या डोळ्यांत पाहिले….निळेशार डोळे! कुणीही हरवून जावे असे. इथपर्यंत प्रद्युम्नसाठी ती एक कलाकार विद्यार्थिनी, त्याची ग्राहक एवढंच होती. कितीतरी वेळ ती त्यांच्यासमोर स्तब्ध बसून होती. त्यांना वेगळं सुंदर व्यक्तिचित्र काढण्याची गरजच नव्हती….तिचं सौंदर्य कुंचला आणि रंग यांच्या माध्यमातून आपसूकपणे कागदावर चितारलं जात होतं. बघता बघता चित्र पूर्ण झालं आणि ते चित्र बघता बघता चार्लट मंत्रमुग्ध झाली. प्रद्युम्न यांनी तिला अचानकपणे विचारलं,” तु वृषभ राशीची आहेस का?” तिने हो म्हणताच प्रद्युम्न नकळत म्हणून गेले….”मग तु माझी पत्नी होशील!” हे ऐकताच सुरुवातीला चार्लट भांबावूनच गेली असावी….मग ते पुढे भेटत राहिले. आता प्रद्युम्न तिचं चित्र कागदावर नव्हे तर त्याच्या हृदयाच्या पटावर रेखाटू लागले….चार्लटचा राजकुमाराचा शोध संपला होता….ते दोघेही हिंदू रितीरिवाजानुसार रीतसर विवाहबद्ध झाले…चि.सौ.कां.चार्लट आता सौ.चारूलता प्रदयुम्न महानंदिया झाली होती.
“आपण आता स्वीडनला जाऊयात!” एके दिवशी चारूलता त्यांना म्हणाली. “नको, माझा अभ्यासक्रम पुरा होऊ देत. आणि मला तुझ्या खर्चाने तिकडे यायला नको आहे. मी माझ्या हिंमतीवर येईन. मग त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी बेहत्तर.” त्याचा हा विचार तिला सुखावून गेला…स्वाभिमानी आहे हा राजकुमार..तिनं मनात म्हटलं. आणि ती मायदेशी निघून गेली. त्याकाळी पत्र हे मोठं माध्यम होतं संवादाचं. इतक्या दूरवर पत्रं पोहोचायला उशीर लागायचा…पण संदेश या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वायूवेगानं पोहोचायचा. ‘ तस्वीर तेरी दिल में..जिस दिन से उतारी है…फिरू तुझे संग लेके, नये नये रंग लेके…सपनों की महफिल में…तुफान उठायेगी दुनिया मगर…रुक न सकेगा दिल का सफर !.’….असं झालं असेल!
मध्ये बरेच दिवस,महिने गेले. राजकुमार त्याच्या ऐटबाज घोड्यावर बसून आपल्याकडे येईल या वाटेकडे चार्लट…चारू डोळे लावून बसली होती. पण राजकुमार फक्त कलेच्या राज्यातील राजकुमार. खिशात दाम नव्हता. मग जवळच्या साऱ्या चीजवस्तू विकून टाकल्या…बाराशे रुपये आले. साठ रुपयांची एक जुनी वापरलेली सायकल विकत घेतली. ब्रश,रंग,कागद,कॅनव्हासची पिशवी पाठीला अडकवली आणि राजकुमार मोहिमेवर निघाले. रस्त्यात लोकांची चित्रं काढून दिली आणि अन्न,निवारा मिळवला. काही दिवस सलग दोन-तीन दिवस उपवाशी रहावे लागले. विरोध,संशय,मानहानी सहन करावी लागली. दिल्लीतून अमृतसर. तिथून अफगणिस्तान, इराण,तुर्की,बुल्गेरीया,युगोस्लोव्हाकीया,जर्मनी,ऑस्ट्रीया…डेन्मार्क ! किती दूरचा प्रवास…किती कष्ट. नशिबाने त्यावेळी आंतरराष्ट्रीय सीमांवरील नियम काहीसे सोपे असावेत. कारण प्रद्युम्न यांना कुठल्या सीमेवर फार थांबावे लागले नाही. उलट या माणसाच्या सहनशक्तीपुढे,त्याच्या उद्देशामुळे तिथले अधिकारीही स्तंभित झाले. खरी अडचण आली ती डेन्मार्कच्या सीमेवर. पाच महिने आणि बावीस दिवसांनी प्रद्युम्न स्वीडनच्या सीमेवर पोहोचले…..
आपल्या देशातल्या राजघराण्यातली एक सुंदर कन्या भारतातल्या एका गरीब माणसाच्या प्रेमात पडूच कशी शकते,लग्न कशी करू शकते याचं त्यांना नवल वाटणं साहजिकच होतं. आणि हा माणूस चक्क सायकलवर एवढा प्रवास करून येथे पोहोचतो! प्रद्युम्न यांच्याजवळ त्यांच्या विवाहाची काही छायाचित्रे होती. अधिका-यांनी चार्लटशी संपर्क साधला….ती धावत निघाली…तिचा राजकुमार पोहोचला होता. प्रदयुम्न यांनी तिच्या शहरापर्यंतचा प्रवास मग रेल्वेतून केला…..वधू वराला घ्यायला सहकुटुंब आली होती….हे खरं रिसेप्शन ! प्रेम सिद्ध झाल्यावर जगाचा विरोध मावळत जातो. इतर रंगाच्या,वंशाच्या माणसांनी जवळपास राहूही नये अशी समाजव्यवस्था असणाऱ्या त्या ठिकाणच्या उमद्या मनाच्या लोकांनी हा भारतीय जावई मनापासून स्विकारला !
भावनेच्या भरात अनेक विवाह होतातही. पण ते प्रदीर्घ काळापर्यंत टिकणे महत्त्वाचे असते. चारूलता आणि प्रद्युम्न यांचा विवाह सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या आसपास पोहोचतो आहे. चारूलतेच्या संसार वेलीवर फुले उमलली आहेत. स्वीडनच्या कला विश्वात प्रद्युम्न यांना मानाचे स्थान मिळाले आहे. ओरिसातील एका विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
चार्लट आणि प्रद्युम्न कुमार महानंदिया (Mahanandia) आपल्या महान इंडियाचं परदेशात,जगात प्रतिनिधित्व करत आहेत,असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
या हृदयस्पर्शी प्रेमकथेवर चित्रपट निघणार नाही,असे होणार नाही. चित्रपटातून काय,कसे दाखवले जाईल, काय नाही..हे ठाऊक नाही. पण हे वाचून तुमच्याही मनाच्या कॅनव्हासवर एक व्यक्तिचित्र निश्चितच रेखाटले गेले असावे…फक्त या व्यक्तिचित्रात एक नव्हे तर दोन व्यक्ती आहेत…चार्लट-चारूलता आणि प्रद्युम्न !
☆ “छप्पन…” – लेखक : श्री प्रकाश एदलाबादकर ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
छप्पन (५६) या संख्येला मराठी भाषेत वेगळेच महत्त्व आहे. समजा, माझे आणि एखाद्याचे भांडण झाले तर,तो किंवा मी असे म्हणतो की, ‘अबे जा बे …तुझ्यासारखे छप्पन पाह्यले.’
माझ्याही मनात हा प्रश्न आला होता की,’ छप्पनच का ? पंचावन्न किंवा सत्तावन्न का नाही ?’
शंकानिरसनासाठी मी,मराठी भाषेच्या एका प्रसिद्ध ,ज्येष्ठ साहित्यिकाला भेटलो. ते मला म्हणाले की , “संत नामदेवांनी ज्ञानेश्वरी संबंधाने लिहिलेल्या ओव्या तू वाचल्या आहेस का ?”
“हो . एकतरी ओवी अनुभवावी. तेच ना ?'”मी उत्तरलो .
“बरोबर .त्यात एक ओळ आहे . ‘केलासे छप्पन भाषांचा गौरव ‘ .अर्थ असा की ज्ञानेश्वरीत मराठी भाषेतील छप्पन भाषांमधील शब्द आलेले आहेत . त्यांच्या काळात मराठीच्या छपन्न बोली होत्या . वऱ्हाडी ,झाडी , मालवणी ,कोंकणी , अहिराणी ,माणदेशी, अशा अनेक परंतु छप्पन बोली होत्या . आता एक लक्षात घे .छपन्न प्रकारच्या बोली बोलणारे छपन्न प्रकारचे समाज .प्रत्येकाची रीतभात वेगळी,वृत्ती वेगळी, व्यवहार वेगळा ! अशी छपन्न प्रकारच्या मनोवृत्तीची माणसे होती .म्हणून ‘तुझ्यासारखे छपन्न पाहिले’ असे म्हणण्याची पद्धत आली .”
ते पुढे म्हणाले , ” छपन्न प्रकारचे समाज म्हणजे स्वयंपाक करण्याच्या छपन्न रीती. म्हणून ‘छपन्न भोग’ . छपन्न प्रकारचे नैवेद्य . समाजात एखादी बाई खूप भांडकुदळ , वचवचा बोलणारी , उठवळ स्वभावाची असेल तर ,तिला ‘छप्पन टिकल्यांची आवा’ म्हणतात .म्हणजे सर्व छपन्न प्रकारच्या समाजात जाऊन आपल्या नावाचा दगड पाडून आलेली .”
नाना पाटेकरच्या चित्रपटाच्या “अब तक छपन्न ‘ या शीर्षकामागीलही कारण हेच असेल काय?
☆
लेखक: श्री. प्रकाश एदलाबादकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈